२. वाहे गुरू...
---------------
...कुरुक्षेत्र
गेल्यानंतर अंबाला कैंट. आणि अंबाला शहर ही दोन स्टेशनंही मागं पडली अन् आमची पश्चिम एक्स्प्रेस थोड्याच वेळात पंजाबमध्ये शिरली. हरियाणा आणि पंजाबमध्ये वरवर
पाहता काहीच फरक नाही. तसंच लँडस्केप, तशीच दूरदूर पसरलेली गव्हाची शेती... फक्त
आता गुरुमुखीतून लिहिलेल्या पाट्या दिसू लागल्या. स्टेशनवर दाढी आणि पगडीधारी लोकं
जास्त दिसू लागले. एखाद्या गावातून गुरुद्वारा डोकावू लागलं अन् पंजाबच्या मातीचा
सुगंध जाणवायला लागला. खन्ना नावाचं एक मोठं गाव लागलं. हिंदी चित्रपटसृष्टीला
समस्त खन्नांची खाण पुरवणारी हीच ती भूमी असावी, अशी मी स्वतःची समजूत करून घेतली.
खन्नांपेक्षाही मला चोप्रांच्या पंजाबी लँडस्केपचा नजारा कुठं दिसतोय का, ते
पाहण्यात रस होता. पण ट्रेनच्या दोन्ही बाजूंना उभं राहून पाहिलं, तर ‘तसं’ सरसों
के खेतीवालं दृश्य दिसेना. आकाश अगदीच ढगाळलेलं होतं आणि भर दुपारीही
अंधारल्यामुळं वातावरणात उगाचच एक उदासीनता जाणवत होती. अशा स्थितीत बल्ले बल्ले
करीत भांगडा करणारा, रसिला पंजाब मी आजूबाजूला शोधत होतो. सिनेमाच्या फार
प्रभावाखाली येऊन वास्तवातली लँडस्केप शोधू नयेत, हे बुद्धी वारंवार बजावत होती.
पण मन ऐकायला तयार नव्हतं. जालंधर आणि लुधियाना ही पंजाबातील दोन मोठ्ठी शहरं कधी
येऊन गेली ते मला कळलंही नाही. लहानपणापासून केवळ होजिअरीच्या संदर्भातच ही दोन
नावं ऐकलेली. पण प्रत्यक्षात ट्रेन तिथून गेली, तेव्हा ही शहरं नीट पाहताच आली
नाहीत. सिनेमावरून राज्याची अन् स्टेशनावरून गावाची परीक्षा करू नये, हे नक्की.
लवकरच एक मोठ्ठी नदी लागली आणि लगेच ब्यास हे स्टेशन आलं. ही नदीही अर्थात तीच
म्हणजे ब्यास उर्फ व्यास नदी होती. घुमानला येणारी स्पेशल ट्रेन याच स्टेशनवर
थांबणार होती, असं कळलं होतं. आता पुढचं स्टेशन म्हणजे अमृतसर. आम्ही आवरीआवरी
सुरू केली. लॅपटॉप बंद झाले. चपला आत गेल्या, पाय बुटांत गेले. साडेसातला पोचणारी
गाडी पंधरा-वीस मिनिटं उशिरानं अमृतसर स्टेशनात दाखल झाली. आम्ही बाहेर पडलो.
अमृतसरचं स्टेशन बाहेरून सुंदर दिसतं.
थोडा सुवर्णमंदिरासारखा लूक देण्याचा
प्रयत्न केला आहे. त्याचे फोटो काढले. आम्हाला पुरी पॅलेस नावाच्या हॉटेलात जायचं
होतं. रिक्षावाले फसवणार हे आधीच गृहीत धरून एकदम स्टेशनाच्या बाहेर आलो. तिथं
पगडीधारी पोलिसमामांना पत्ता विचारून घेतला. स्टेशनच्या बाहेर आल्यावर खरं शहर
कळतं. अमृतसर मला आधी वाटलं, तेवढं काही इम्प्रेसिव्ह वाटलं नाही. मुळात
आपल्यासारख्या रिक्षा नव्हत्या. सगळ्या धूर सोडणाऱ्या सिक्स सीटर रिक्षा. त्यात
स्टेशनच्या समोरचा रस्ता दुभाजकानं बंद केलेला. आम्ही रिक्षा थांबवतोय तर एकही
रिक्षा थांबेना. मग पोलिसमामांनी आम्हाला रस्त्याच्या पलीकडं जाण्याचा उपदेश केला.
त्यानुसार पलीकडं गेलो, तर लगेच दहा-दहा रुपये सीट घेऊन जाणारी रिक्षा मिळाली.
आम्ही कदाचित जुन्या अमृतसर शहराच्या भागात होतो. दोन्ही बाजूला साधीशीच दुकानं...
फारसा झगमगाट नाही. अरुंद रस्ते, वाट्टेल तशी हाकली जाणारी वाहनं आणि सर्वांत
महत्त्वाचं म्हणजे समरांगणावर सुरू असलेल्या शंखनादासारखा सतत सुरू असलेला हॉर्नचा
आवाज... अमृतसरचं हे प्रथमदर्शन फारसं सुखावह नव्हतं. किंबहुना अपेक्षाभंग करणारंच
होतं. मग एकदम लक्षात आलं, आपण पुण्यासारख्या तशा मोठ्या शहरातून आलो आहोत. इथं
तसं असणारच नाही. पुढं रिक्षा एका अगदी निर्जन, अंधाऱ्या भागातून गेली. हा भाग तर
शहरात आहे की नाही, असा प्रश्न पडावा. अखेर पंधरा मिनिटांत आमचं हॉटेल आलं.
सुदैवानं हॉटेल अन् आमची रूम चांगली होती. बाकीचे सहकारी, मित्र भेटले. आता नऊ
वाजले होते. आम्हाला लगेच सुवर्णमंदिर बघायला जायची घाई झाली होती. एसीतून प्रवास
झाल्यानं फारसा थकवा नव्हताच. थोडं फ्रेश होऊन आम्ही लगेच बाहेर पडलो...
आमचं हॉटेल एका
अरुंद रस्त्यावर होतं. डाव्या बाजूला पाहिलं, तर तिथं एक रेल्वेचं फाटक दिसलं आणि
एक गाडीही उभी असलेली दिसली. उजव्या बाजूला मुख्य रस्त्याकडं जाणारा रस्ता होता.
आम्ही तिथून चौकात आलो. तिथं सिक्स सिटर रिक्षांची बरीच गर्दी होती. एका रिक्षात
बसून निघालो. या वेळी मात्र आम्ही स्थानिक नसल्याचं ओळखून त्या रिक्षावाल्यानं ६०
रुपये घेईन, असं सांगितलं. (पुण्याच्या बाहेर कुठंही गेलं, तरी मला सगळं स्वस्तच
वाटतं.) आम्ही सुवर्णमंदिर पाह्यला आतुर झालो होतो. त्यामुळं लगेच त्या रिक्षातून
निघालो. अमृतसरच्या जुन्या भागातूनच आमची रिक्षा निघाली. सुवर्णमंदिर फार लांब
नव्हतं. दोन-अडीच किलोमीटर असावं. अनेक गल्ल्या-बोळकांडं पार करीत आणि सतत हॉर्न
वाजवत रिक्षा निघाली. अखेर एका बॅरिकेडपाशी रिक्षा थांबवून त्यानं आम्हाला खाली
उतरवलं. इथून पुढं रिक्षा जात नसल्यानं आम्हाला चालत जावं लागणार होतं. साधारण
आपल्याकडं गणपतीत बुधवार चौकाकडून दगडूशेठ गणपतीकडं चालायला लागल्यावर असते,
तेवढ्या गर्दीत, पण तुलनेनं रुंद रस्त्यानं आम्ही सरळ निघालो.
समोर सुवर्णमंदिर
दिसत होतं. ब्लू स्टार ऑपरेशनचा सगळा इतिहास झर्रकन डोळ्यांसमोरून गेला. हे सगळं
प्रत्यक्षात घडलं जून १९८४ मध्ये. तेव्हा मी नुकताच चौथीत गेलो होतो. पण पेपरमध्ये
त्या संदर्भातल्या बातम्या वाचल्याचं मला चांगलंच आठवतं. अर्थात नंतर अनेक
पुस्तकांतून हा सगळा इतिहास नीटच वाचायला मिळाला. तेव्हा इथं कसं वातावरण असेल,
याची आत्ता कल्पनाच करता येईना. शिवाय तिथं याबाबतचा एकही शब्द जाहीर उच्चारायची
चोरी. त्यामुळं मी तो विषय मनातून झटकून टाकला आणि आत्ताच्या सुवर्णमंदिरात लक्ष
घालायचं ठरवलं. तेलकर आणि पेंढारकर दोघंही यापूर्वी इथं आले होते. मात्र,
त्यांनाही आत्ता समोर जे संगमरवरी पटांगण केलंय, ते नवीन होतं. डाव्या बाजूच्या अनेक
रॅक होत्या, तिकडं बूट काढायचे होते. तिथं अनेक पंजाबी महिला स्वेच्छेनं हे काम
करीत होत्या. इथं हे काम सेवा म्हणूनच केलं जातं हे माहिती होतं. त्यामुळं अगदी
चांगल्या घरांतल्या, उच्चभ्रू महिलाही आमचे बूट उचलून ठेवत होत्या. त्या वेळी
कसंसंच वाटलं. पण त्या मुलीनं तत्परतेनं मला एक टोकन दिलं. ते घेऊन आम्ही मुख्य
मंदिराकडं निघालो. वातावरण छान होतं. हवेत गारवा होता आणि तिथं प्रसन्न वाटत होतं.
आम्ही डोईवर रुमाल बांधले आणि वाहत्या पाण्यात पाय बुचकळून आत प्रवेश केला. समोरच
दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालेलं, सुवर्णतेजानं झळाळतं ‘हरमंदिर साहिब’ दिसलं.
इथंच गुरू ग्रंथसाहिब विराजमान आहेत. आत दर्शनाला जाण्यासाठी त्या समोरच्या बाजूला
खूपच मोठी रांग होती. आम्ही मग आत जाण्याचा नाद सोडून निवांत तो परिसर पाहण्याचं
ठरवलं. माझ्या डोक्यातून भिंद्रनवालेचा विषय जात नव्हता. अकाल तख्त मागं दिसत
होतं. इथंच तो लपून बसला होता. सभोवतालच्या उंचच उंच तटबंद्यांमध्ये एके-४७ घेऊन
त्याचे साथीदार भारतीय सैन्याचा घास घ्यायला टपले होते. आत्ता तिथं भजनांची
रेकॉर्ड सुरू होती. कुटुंब-कबिल्यासह अनेक लोक येत होते. अत्याधुनिक मोबाइलवर
शूटिंग करीत होते. भारी कॅमेऱ्यांतून फोटो काढत होते. मला एकदम ब्रार, सुंदरजी,
जनरल वैद्य यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करावंसं वाटलं. ते मी मनातल्या मनात
केलंही. त्या सुंदर, पवित्र देवस्थानाच्या आत रणगाडे कसे काय शिरले असतील, याची
कल्पनाच करवत नव्हती. असो. मी पुन्हा वास्तव जगात आलो. सगळा परिसर फिरून पाहिला.
तिथल्या त्या तळ्याकाठी शांत बसून राहिलो. फोटो वगैरे काढले. भाविकांची गर्दी कमी
होत नव्हती. अनेक जण आतच बाजूला ओवऱ्यांसाठी जागा आहे, तिथं झोपले होते. अनेक
पुरुष समोरच्या बाजूला त्या तळ्यात उतरून आंघोळ करीत होते. त्या बाजूला जाऊन आम्ही
परत आलो. बाहेर हातातली ती प्रसिद्ध कडी मिळत होती. एका दुकानातून ती विकत घेतली. मग
तिथून बाहेर पडलो.
रात्रीचे अकरा वाजत
आले होते आणि आता आम्हाला सणकून भूक लागली होती. अभिजितनं येतानाच एक शुध ढाबा
नावाचं हॉटेल हेरून ठेवलं होतं. मग तिथं गेलो. भरपूर गर्दी होती. टिपिकल पंजाबी
माहौल होता. आम्हाला एका कोपऱ्यात जागा मिळाली. गाणी वाजत होती. लोक मनापासून
एंजॉय करीत खादडी करीत होते. मला एकदम पुण्यात असल्याचा भास झाला. पण आजूबाजूची
भाषा आणि सगळीकडं दिसणाऱ्या रंगबिरंगी पगड्या यामुळं लगेच मी भानावर आलो. आम्ही
लच्छा पराठा आणि दाल-मखनीची ऑर्डर दिली. नंतर नान आणि दाल फ्राय आणि असंच काय काय
मागवून हादडलं मनसोक्त. हे झाल्यावर बाहेर येऊन पंजाबी लस्सी पिण्याचीही आमची
लालसा होती. पण एक तर तशी रस्त्यावर लस्सी विकणारी दुकानं तोपर्यंत बंद झाली होती
आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं जेवण तुडुंब झालं होतं. मग लस्सीचा बेत उद्यावर ढकलून
आम्ही रिक्षात बसलो... हॉटेलात आल्यानंतर लगेच आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी
आठ वाजता आम्हाला घुमानला नेणारी बस येणार होती. म्हणून अगदी गजर वगैरे लावून लवकर
उठलो. तिघांचंही वेळेत आवरून झालं. आता ब्रेकफास्टला जाणार, तेवढ्यात सुनीत (भावे)
सांगत आला, की पुण्याहून येणारी रेल्वेगाडी उशिरा येत असल्यानं ग्रंथदिंडी अन्
सगळेच कार्यक्रम दुपारी दोनला सुरू होणार आहेत. त्यामुळं बस आता बारा वाजता निघणार
आहे. आमचं तर आवरून झालं होतं. मग आम्ही ब्रेकफास्ट झाल्यावर त्या वेळात जालियनवाला
बाग पाहायला जायचं ठरवलं. सुनीत अन् रमेशही (पडवळ - आमचा नाशिकचा सहकारी)
आमच्याबरोबर आले. रिक्षा करून जालियनवाला बागेत गेलो. तिथंही गर्दी प्रचंड होती.
तिथला तो ‘ऐतिहासिक गली’ हा फलक पाहताना माझ्या अंगावर काटा आला. इथूनच जनरल डायर
नावाचा नरराक्षस आपले बंदूकधारी सैनिक घेऊन आत शिरला होता. आम्ही आत शिरलो. दारातच
एक संग्रहालय आहे. अगदी आत शिरतानाच हे संग्रहालय का केलंय, देव जाणे. तिथंही खूपच
गर्दी होती. मग आम्ही एकदम आत गेलो. मला वाटलं होतं, त्यापेक्षा हे मैदान छोटं
आहे. आजूबाजूची सगळी घरं, इमारती आणि मध्ये असलेली हिरवळ व बाग पाहून मला तर थेट
शनिवारवाड्याचीच आठवण झाली. उजव्या बाजूला इंडियन ऑइलनं तयार केलेली अखंड ज्योत
दिसली. डोडेनियाच्या गवताचे सैनिक केलेले दिसले. समोरच एक सिमेंटचा त्रिकोण होता.
त्यावर ‘गोलीयाँ यहाँ से चलाई गई’ असं लिहिलेलं होतं.
ते वाचतानाही डोकं बधीर होत
होतं. डाव्या बाजूला अजून एक संग्रहालयवजा शेड होती. तिथं गेलो. जालियनवाला
हत्याकांडाचं एक मोठं पेंटिंग तिथं होतं. पुढं तो शहिदों का कुआँ दिसला.
भिंतीवरच्या गोळ्यांच्या खुणा पाहिल्या. सगळा परिसर नीट जतन करून ठेवला असला, तरी
एकूण मामला शनिवारवाड्यासारखाच वाटला. (म्हणजे आता काहीच महत्त्व उरलेलं नाही, अशा
अर्थानं!) शिवाय अशा जागेचं स्मारक नक्की कसं असावं, हाही एक प्रश्न वाटला. म्हणजे
त्या घटनेचं गांभीर्य तेवढ्या प्रमाणात जपलं जात नाहीये, असं वाटून गेलं. अर्थात
अजून चार वर्षांनी या घटनेला शंभर वर्षं होतील. तेव्हा भावनात्मकदृष्ट्या आपण त्या
काळाला किती अटॅच उरलो आहोत, हाही मुद्दा आहेच. शेवटी काहीशा विमनस्क स्थितीतच
तिथून बाहेर पडलो... हॉटेलवर परतलो. आमची बस येऊन थांबली होती. ती आणखी एक तास उशिरा
म्हणजे दुपारी एक वाजता निघाली. आता वेध लागले होते साहित्य संमेलनाचे...
घुमानचे....
(क्रमशः)
(क्रमशः)
---------------------------------------
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
No comments:
Post a Comment