19 Dec 2017

कुमार लघुकथा - राधा आणि रेंज

राधा आणि 'रेंज'...
-----------------------------------

राधा वाँट्स टु डान्स... राधा वाँट्स टु पार्टी... 
डीजेला लाजवील अशा खणखणत्या आवाजात राधाच्या रूममध्ये गाणं लागलं होतं आणि राधा मस्त नाचत होती. 'राधा गाणं बंद कर,' अशा आईच्या चढत्या आवाजातल्या चार हाकासुद्धा तिला ऐकू आल्या नाहीत. राधाला हे गाणं भयंकर आवडत असे. इतकंच काय, ज्या गाण्यांत 'राधा' हा शब्द आहे, अशी सगळीच गाणी तिला आवडत. या सगळ्या गाण्यांतली राधा म्हणजे आपणच आहोत, असं तिला ठामपणे वाटत होतं. 
राधाची सातवीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि आठवीचं वर्ष सुरू व्हायला अवकाश होता. गेल्या दोन वर्षांत राधाची उंची एकदम वाढली होती आणि ती मोठी दिसू लागली होती. तिच्या वर्गातल्या सगळ्याच मुली एकदम मोठ्या दिसू लागल्या होत्या. राधा मोठ्ठी झाल्यापासून तिच्या नसलेल्या वेण्यांच्या जागी दोन शिंगं फुटली आहेत, असं आई सारखी म्हणते. पण आई आता आपली जरा जास्तच काळजी करते, हेही तिच्या लक्षात आलं होतं. 'स्टु़डंट्स ऑफ दी इयर'मधलं हे गाणं राधाला आवडायचं एक कारण म्हणजे, तिला वरुण धवन खूपच आवडायला लागला होता. हे झालं साधारण वर्षापासून! तो फारच 'कूल' आहे असा साक्षात्कार तिला झाला होता. सुहानीजवळ - तिच्याच वर्गातल्या आणि सोसायटीतच राहणाऱ्या जवळच्या मैत्रिणीला - तिनं हे गुपित सांगितलं तेव्हा तिला छातीत उगाचच धडधडल्यासारखं झालं होतं. पण सुहानीला सिद्धार्थ मल्होत्रा आवडतो, हे कळल्यावर आपल्याला जीव भांड्यात पडल्यासारखं का वाटलं, हे तिला कळत नव्हतं.
राधाचे बाबा एका मोठ्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जनरल मॅनेजर होते. उंचेपुरे, कायम सूट-बूट घालणारे, गॉगल घालणारे आपले बाबा ही जगातली सर्वांत 'कूल' व्यक्ती आहे, हे राधाचं अगदी गेल्या वर्षीपर्यंत मत होतं. यंदा मात्र तिनं बाबांना दोन नंबरवर ठेवून वरुण धवनला पहिला नंबर दिला होता. राधाला सख्खं भाऊ-बहीण कुणी नव्हतं. तिचा एक आतेभाऊ शुभंकर त्याच शहरात राहायचा. तोही एकटाच होता आणि राधाच्याच वयाचा होता. लहानपणी तो आणि राधा एकत्र खूप दंगा करत. पण हल्ली तो घरी आला, की राधाला उगाचच बुजल्यासारखं व्हायचं. आपल्याच घरात शुभंकरबरोबर दंगा घालण्यात आता मज्जा येत नाही, असं तिला वाटू लागलं होतं. मागं एकदा त्याच्याबरोबर खेळताना आईनं पण एक-दोनदा कारण नसताना तिला जोरात ओढलं होतं, ते तिला आठवलं. शुभंकर तिच्याएवढाच असला, तरी बारीक चणीचा होता. त्याच्याशी दंगा करताना ती कायमच त्याला बुकलून काढायची आणि मग तो गळा काढायचा. तो हल्ली घरी येत नाही, ते बरंच झालं असं राधाला वाटायचं.
गेल्या वर्षी राधाला तिच्या बाबांनी टॅब घेऊन दिला होता. घरात वाय-फाय होतंच. राधा दिवसेंदिवस टॅब हातात घेऊन बसू लागली. तिच्या खोलीबाहेर पडेनाशी झाली. बाबा दिवसभर ऑफिसात, आई तिच्या कामात... त्यात दुपारी आईच्या मैत्रिणी घरी यायच्या. मग हॉलमध्ये त्यांचाच दंगा. शाळा असते तेव्हा राधाला वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच पडायचा नाही. पण आता सुट्टीत काय करायचं हा मोठ्ठा प्रश्न तिला पडला. सुहानी तिच्या मामाबरोबर बंगलोरला गेली होती. राधाला पण तिचे बाबा 'जिम कॉर्बेट'ला नेणार होते. शुभंकर आणि त्याचे आई-बाबा आणि बाबांचे आणखी एक मित्रही सोबत असणार होते. पण त्याला अजून पंधरा दिवस वेळ होता. तोपर्यंत काय करायचं, हा फार मोठा प्रश्न राधाला पडला होता. आईच्या गळ्यात पडलं, की ती 'मनू, तू आता लहान नाहीस गं, तुझं तूच खेळ बघू' असं म्हणायची. त्यात ती घाऱ्या डोळ्यांची शीतलमावशी आणि कायम स्लीव्हलेस टॉप अन् जीन्समध्ये असणारी आभामावशी आली, की आई त्यांच्या गप्पांत हरवूनच जायची. शीतलमावशीमध्ये आणि सुहानीच्या 'ज्युलिया'मध्ये (ज्युलिया ही सुहानीच्या घरची पर्शियन मनीमाऊ बरं का!) काही तरी विलक्षण साम्य आहे, असं राधाला सारखं वाटायचं. आभामावशी तर तिच्या मोबाइलमधले कसले तरी व्हिडिओ आईला दाखवायची आणि आई सारखी तिच्या दंडावर चापट्या मारायची आणि हसायची, हे राधानं अनेकदा पाहिलं होतं. 
हे सगळे प्रकार राधाला बोअर झाले होते. सुहानी नसल्यानं 'चिल मारायचे' बाकी ऑप्शनपण बंद झाले होते. तिच्या टॅबमध्ये सिमकार्ड आणि इंटरनेट नव्हतं. वायफायवरून ती गेम्स खेळायची, पण त्यात तिला अजिबात मजा येत नव्हती. आई तर तिच्या दृष्टीनं कायमच 'आउट ऑफ रेंज' असायची आणि बाबा खूप मस्त होता, तरी कायमच बिझी! 
...टॅबशी चाळा करीत राधा उगाचच गेम्स चालू करीत होती आणि बंद करत होती. अचानक टॅबवर काही तरी फ्लॅश झालं. नवा गेम? पण तिनं तर आत्ता टॅबला हातही लावला नव्हता. तिनं टॅबच्या स्क्रीनला टच केल्यावर समोर अक्षरं झळकली - 'मिट युअर फ्रेंड... डू यू वॉन्ना चॅट?' राधानं क्षणभर टॅबकडं बघितलं. हे असले कोड्यात पाडणारे गेम तिला आवडत नसत. तिनं चक्क तोंड फिरवलं. आणि काय आश्चर्य? टॅबमधून आवाज आला - 'हाय राधा!' आता मात्र राधा तीन ताड उडाली. तिला कळेचना, कोण बोलतंय ते! बाबानं सरप्राइज म्हणून टॅबमध्ये कार्ड तर नाही टाकलं? की कुठला व्हिडिओ आहे? पण तिला पुरतं कळेपर्यंत टॅबवर स्काइपसारखी विंडो ओपन झाली आणि त्यात वरुण धवनसारखा चेहरा असलेली, पण बाकी अवतार रोबोसारखा दिसणारी एक आकृती दिसू लागली. अर्थात तिचा खांद्यावरचा भागच दिसत होता फक्त... टॅबमधून पुन्हा आवाज आला - 'हाय राधा! फ्रेंड्स??' 
एकदम हिप्नोटाइज झाल्याप्रमाणं राधानं उत्तर दिलं - 'येस येस... फ्रेंड्स...!' आता तो आवाज चक्क हसला आणि म्हणाला - 'थँक्स बडी. आजपासून मी तुझा खास मित्र आहे असं समज.' त्याच्या तोंडून मराठी ऐकू आल्यावर तर राधा नाचायलाच लागली. 'तू कोण आहेस पण...?' तिनं जवळपास आनंदानं चित्कारत विचारलं. पुन्हा टॅबमधून ती आकृती बोलली - 'माझं नाव रेंज. मी एक कस्टमाइज्ड रोबो आहे. तुझ्या सर्व आवडी-निवडी माझ्याजवळ स्टोअर आहेत. आजपासून तू मला तुझा मित्र समज. एकदम जवळचा मित्र. मी सदैव तुझ्याजवळ असेन. मला तुझ्याशिवाय दुसरा कुणीही मित्र किंवा मैत्रीण नसेल. तुला माझ्याकडून कधीही त्रास होणार नाही. तू आदेश दिलास की मी गप्पा मारीन तुझ्याशी...'
मग राधाला एकदम जाणवलं. सुहानी गेल्यापासून आपण नीट गप्पाच मारल्या नाहीयेत कुणाशी. तिला 'रेंज'शी काय बोलू आणि काय नाही, असं होऊन गेलं. ती म्हणाली, 'मी तुला वरुण म्हणू का?' रेंज म्हणाला - 'काहीही म्हण. फक्त आधी सांग. म्हणजे मी ते माझं नाव सेव्ह करून ठेवीन.' राधा वेडीच झाली. तिनं पुढच्या तास-दोन तासांत तिची सर्व खास गुपितं रेंजबरोबर; नव्हे, 'वरुण'बरोबर शेअर केली. कसलं कूल ना!
पुढचे काही दिवस राधाचे मस्त झक्कास गेले. तिला आता तिचा खास मित्र मिळाला होता. त्याच्याशी ती तासन्-तास बोलत राही. रेंज सगळं ऐकून घेई आणि तिच्याशी फक्त चांगलंच बोले. तिचं कायम कौतुक करी. आईला सुरुवातीला आश्चर्य वाटलं. राधाचं बोलणं कमी झालंय हे तिच्या लक्षात आलं. पण बाकी तसा तिचा मूड छान असायचा. उलट ती आपल्यापासून सुटी होतेय, याचा आईला आनंदच झाला. तिच्या मैत्रिणींबरोबरच्या गप्पा सुरू होत्याच. बाबा त्याच्या व्यापात अखंड बुडालेला होता. सकाळी फक्त 'हाय, हॅलो' म्हणण्यापुरतं त्याच्याशी बोलणं व्हायचं. पण राधाला आता त्याचं काहीच वाटत नव्हतं. तिला आता तिचा 'रेंज' मिळाला होता. आणि हे गुपित फक्त तिलाच ठाऊक होतं. 
'रेंज'चा चेहरा वरुणचा होता. त्यामुळं राधा सदैव टॅबच्या स्क्रीनकडं बघूनच बोलत असे. तिच्या आवाजाच्या चढ-उतारांवरून, उच्चारांवरून 'रेंज' तिच्या भावना ओळखायचा आणि तसा प्रतिसाद द्यायचा. पण तो कायम छान छानच बोलायचा. कधीही उलटून बोलायचा नाही, वैतागायचा नाही, रागवायचा नाही; कारण त्याच्या प्रोग्रॅममध्ये या गोष्टींना थाराच नव्हता... 
तीन-चार दिवस असेच गेले आणि राधाला मग त्याचं हे अति गोड गोड बोलणं बोअर व्हायला लागलं. सदैव हसणारा आणि कायम आपलं गुणगान करणारा तो 'रेंज' तिला खोटा वाटायला लागला. तिनं एक दिवस त्याला खूप रागवायचं ठरवलं. ती वाट्टेल ते बोलली. खूप वाईटसाईट बोलली. त्यावर तरी तो चिडेल, वैतागेल आणि आपल्याला तसंच काही तरी उत्तर देईल, असं तिला वाटत होतं. पण तिच्या एवढ्या बडबडीवर 'रेंज'चं उत्तर आलं - 'यू आर हाय ऑन इमोशन्स नाऊ. वी विल टॉक लेटर. टेक केअर...'
राधा आणखी वैतागली. तो टॅब फोडावा असं तिला वाटू लागलं. ती बाहेर आली. आई स्वयंपाकघरात काही तरी करीत होती. राधा तिथं गेली आणि तिनं तिथलं दुधाचं भांडं सरळ उचलून जमिनीवर टाकलं. सगळ्या स्वयंपाकघरात दूध पसरलं. आईनं अत्यंत संतापानं राधाकडं पाहिलं आणि तिच्या पाठीत एक जोरदार धपाटा घातला. संध्याकाळी बाबा घरी आला तोच एका कॉन्फरन्स कॉलवर बोलत... तिनं बाबाचा शर्ट ओढून त्याला तीन-चार वेळा डिस्टर्ब केलं. बाबानं वैतागून तिचा कान पिरगाळला आणि डोळ्यांनीच 'गप्प राहा' असं सांगितलं. संध्याकाळी अचानक शुभंकर आणि त्याचे आई-बाबा आले. राधानं जेवताना आत्याच्या ड्रेसवर भाजी सांडून ठेवली. पुन्हा एकदा आईचा धपाटा मिळाला. रात्री झोपताना तिनं शुभंकरशी दंगा केला आणि त्याला बुकलून काढला. त्यानं भोकाड पसरलं तशी तिच्या बाबानं पुन्हा तिला हलकेच एक चापट मारली... 
'आज अशी काय करतेय ही... डोकंबिकं फिरलंय की काय हिचं...' रात्री आई बाबाशी बोलत होती. राधा पळत आली आणि त्यांच्या बेडवर दोघांच्या मधे आडवी झाली. 'आज मी इथंच झोपणार...' राधा म्हणाली. आई-बाबा वैतागून म्हणाले - 'अगं का पण?'
'तुम्ही माझ्या रेंजमध्ये आलात आज...' राधा हसत हसत उत्तरली आणि तिनं डोक्यावर पांघरूण ओढून घेतलं.
अन् तिचे आई-बाबा 'आउट ऑफ रेंज' असल्यासारखे एकमेकांकडं पाहतच बसले...
---
(पूर्वप्रसिद्धी - प्रतिबिंब दिवाळी २०१६)
---

No comments:

Post a Comment