फिल्मी प्रेम
----------
सिनेमातलं प्रेम
हा एक अत्यंत स्वप्नाळू विषय आहे. हे स्वप्नही कसं! पाहिजे तेव्हा, पाहिजे
तिथं, पाहिजे तितक्या वेळा, पाहिजे त्याला पाहता येईल असं... एकदम मस्त!
या प्रेमाला 'फिल्मी प्रेम'
असं म्हणून नाकं मुरडणारीही काही अरसिक मंडळी या भूतलावर आहेत. पण अशा
लोकांना कायम गणिताच्या पेपरची किंवा गाडी चुकल्याचीच स्वप्नं पडतात,
त्याला कोण काय करणार? त्यांच्या आयुष्याचीच गाडी चुकली आहे म्हणायचं आणि
आपण पुन्हा आपल्या फिल्मी प्रेमात रमायचं... खरंच, या सिनेमानं आम्हाला प्रेमाच्या प्रेमात पाडलं. प्रेम कसं करतात, ते शिकवलं... नीट दाखवलं... त्याबाबत सिनेमा आपल्या सगळ्यांचा गुरू आहे अगदी...
सिनेमा येण्यापूर्वी आपल्याकडं माणसं प्रेम
कसं करीत होती, देव जाणे! कथा-कादंबऱ्या वगैरेंचा थोडाफार आधार असेल. पण
तरी दृश्यमाध्यमाचं सामर्थ्य काही आगळंच... एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ही
तंत्रज्ञानाधिष्ठित सिनेमा नावाची कला जन्माला आली नसती, तर हे जग प्रेमाच्या हजारो प्रकारांना पारखं झालं असतं. सिनेमा आला आणि आम्ही प्रेम
करायला शिकलो. सिनेमा म्हणजे स्वप्नांची दुनिया... या स्वप्नाळू जगात आपण
सर्व भावभावनांचे रंग पाहिले; सर्व रसांचा परिपोष होताना पाहिला; सर्व
विकारांचा प्रादुर्भाव होताना पाहिला... प्रेम ही
तर माणसाची आदिम भावना. त्यामुळं तिचा रंग या रूपेरी पडद्यावर न खुलता तरच
आश्चर्य होतं! थिएटरच्या अंधारात, समोरच्या भव्य पडद्यावर, सप्तरंगांत प्रेमाचे असे 'एक से एक' आविष्कार खुलताना आपण पाहिले आणि पंचेद्रिये तृप्त झाली. प्रतिभावान लेखक-कवींना प्रेमासारख्या विषयानं कायमच आव्हान दिलंय. प्रेमाची नुसती कल्पना करून नव्हे, तर स्वतः त्या आगीत पोळून, तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या कलावंतांची प्रेमासंबंधीची
अभिव्यक्ती अजरामर कलाकृतीच्या माध्यमातून काळाच्या पटलावर स्वतःचं नाव
कायमचं कोरून ठेवत आली आहे. अशा कलाकृती पाहताना केवळ मनोरंजन होत नाही, तर
नवं काही तरी अनुभवल्याचा आनंद मिळतो. भारतात सिनेमा आला, त्याला आता शंभर
वर्षं होऊन गेली. सिनेमा आधी मूकपट होता, नंतर बोलू लागला, त्यालाही ८५
वर्षं होऊन गेली. या काळात सिनेमातल्या प्रेमाची किती तरी रूपं आपल्यासमोर उलगडत गेली. ती पाहून आपणही रोमांचित झालो, पुलकित झालो, मोहरलो...
भारतात सिनेमा सुरू झाला, तेव्हा त्यावर धार्मिक, पौराणिक कथानकांचा पगडा असायचा. त्यामुळं त्यात आपण आज ज्याला स्त्री-पुरुषातलं प्रेमाचं नातं म्हणतो, तशा नात्याला फारसं स्थान नव्हतं. समाजही एकूण रुढीप्रिय आणि सनातनी होता. प्रेम हा विषय सामाजिक मुळीच नव्हता. जे काही कथित 'प्रेम'
होतं, तो चार भिंतींच्या आत पूर्ण करायचा रिवाज होता. अर्थात याचा अर्थ
सगळाच समाज मागास होता, असं नाही. लेखनातून, चित्रांतून, नाटकांतून प्रेमाची वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर येत होती आणि त्यांना ती भावतही होती. पण सिनेमा या माध्यमाचं बालपण अद्याप सरलं नव्हतं, एवढंच!
मग हळूहळू सिनेमाही वयात येऊ लागला. प्रेमाची भाषा बोलू लागला. प्रेमाचं शारीर प्रदर्शन पाश्चात्त्य सिनेमांत फार पूर्वीच घडलं, तरी आपल्याकडं ते यायला वेळ लागला. पण इथल्या सिनेमातलं प्रेम
इथल्या मातीचा खास रंग लेऊनच पडद्यावर अवतरलं. भारतात पहिला सिनेमा तयार
झाला १९१३ मध्ये. त्यानंतर गेल्या १०४ वर्षांत हजारो सिनेमे तयार झाले. यात
प्रेमपटांची संख्याही हजारोंमध्येच आहे. अन्य सर्व रसांप्रमाणेच प्रेमरसाचं, शृंगाररसाचं यथार्थ दर्शन इथल्या नामवंत कलावंतांनी घडवलं. मुळात प्रेम
या भावनेतच अभिव्यक्तीच्या इतक्या प्रचंड शक्यता दडल्या आहेत, की पुढील
कित्येक शतके हा विषय सिनेमाला पुरून उरेल. शिवाय इतर विकारांपेक्षा प्रेमाच्या छटा विपुल... त्यामुळं प्रत्येक दिग्दर्शक आपल्या परीनं प्रेमाचे रंग दाखवत गेला. विसाव्या शतकातल्या भारतीयांना या लोकांनी प्रेम
करायला शिकवलं. यात मग राज कपूर, गुरुदत्त, यश चोप्रांसारखे दिग्दर्शक
असतील, दिलीपकुमार, देव आनंद, शाहरुखसारखे नायक असतील, मधुबाला ते
माधुरीपर्यंतच्या सर्व ड्रीमगर्ल्स असतील किंवा नौशादपासून ते ए. आर.
रेहमानपर्यंत सुरांचे सौदागर असतील... किशोर, रफी, लता-आशा यांचा गळा
असेल... या सगळ्यांनी आमच्या प्रेमाला मूर्त रूप दिलं... त्यांच्या नजरेतून आम्ही प्रेम पाहिलं! त्यांच्या देहबोलीतून आम्ही प्रेम अनुभवलं. त्यांच्या आवाजातून आम्हीच व्यक्त झालो आणि त्यांच्या तालावर आम्ही डोलत राहिलो...
हिंदी
सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात चित्रकर्मींवर भारतीय अभिजात साहित्याचा
पगडा होता. त्यामुळं कादंबऱ्यांवरून प्रेरित होऊन सिनेमे बनविण्यात आले.
शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांवरून अनेक सिनेमे निघाले.
'देवदास' हा त्यातला प्रमुख. या सिनेमांमुळं आपण वाचलेल्या कादंबऱ्यांमधील
पात्रं पडद्यावर जिवंत झाल्याचा अनुभव तत्कालीन प्रेक्षकांना घेता आला.
त्यामुळं या सिनेमांना मोठा प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्योत्तर काळातील
पहिल्या दोन दशकांत भारतात नवनिर्मितीची, सर्जनाची लाट आली होती. कथा,
काव्य, सिनेमा, नाटक, चित्रकला या सर्वच क्षेत्रांत नव्यानं काही करून
दाखवणाऱ्या तरुणांची सळसळती ऊर्जा पसरली होती. राज कपूरसारख्या तरुणानं
पडद्यावर प्रेमाची 'आग' लावली होती, नंतर 'बरसात'
केली आणि तमाम रसिकांनी 'आह' म्हणत त्याला दाद दिली. तेव्हा राज आणि
नर्गिसचा ऐन तारुण्यातला कोवळा प्रणय पाहायला प्रेक्षकांनी थिएटरांवर तोबा
गर्दी केली. 'पतली कमर है तिरछी नजर है' म्हणत थेट शारीर प्रेमाचं
आक्रमक विधान राज कपूरनं केलं. 'बरसात'मधलं राज कपूरच्या एका हातात
व्हायोलिन आणि उजव्या हातावर रेललेली प्रणयधुंद नर्गिस हे दृश्य खूप गाजलं.
इतकं, की राज कपूरनं आपल्या आर. के. स्टुडिओचा लोगो तसाच बनवला. राज
राज-दिलीप-नर्गिस त्रयीचा 'अंदाज' हा मेहबूब खानचा सिनेमाही याच काळातला. प्रेमाचा
त्रिकोण दाखवणारा हा पहिला सुपरहिट सिनेमा. या तिघांनीही दुर्दैवानं
पुन्हा एकत्रित काम कधीही केलं नाही. पण दिग्दर्शक राज कपूरनं
स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदी सिनेमाला पडद्यावर रोमान्स करायला शिकवलं,
असं म्हटलं तर वावगं ठरू नये. राज कपूरला संगीताचा उत्तम कान होता.
त्यामुळं त्यानं शंकर-जयकिशनला हाताशी धरून अनेक चांगली रोमँटिक गाणी दिली.
या गाण्यांचं चित्रिकरणही बहारदार होतं. तत्कालीन प्रेक्षकांना खऱ्या
अर्थानं स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाण्याचं काम राज कपूरच्या रोमँटिक
सिनेमांनी केलं. तत्कालीन गरीब-श्रीमंत झगडा, नेहरूंचा समाजवाद, रशियाचा
प्रभाव या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब राजच्या सिनेमांत दिसत असे. त्यामुळं
राजचा नायक अनेकदा गरीब, भणंग असे. म्हणून असेल, पण त्याच्या चित्रपटांतला
रोमान्स हा काहीसा आक्रमक, बेधुंद (ज्याला इंग्रजीत रॉ म्हणतात, तसा)
होता. भारतीय समाजमानसाची नस त्यानं अचूक ओळखली होती. तत्कालीन
समाजव्यवस्थेत सामान्य माणसाला प्रत्यक्षात शक्य नसलेला प्रणय राज कपूरनं
पडद्यावर आणला. एका अर्थानं फार मोठ्या प्रेक्षकसमूहाची ती भूक त्यानं
भागवली. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा प्रणय सवंग वाटणार नाही, याची काळजी
तो घेत असे. त्यामुळं त्याच्या सर्व सिनेमांतला प्रणय प्रेक्षकांना
हवाहवासा वाटे. पुढं 'संगम'मध्ये राज कपूरनं पुन्हा प्रेमाच्या
त्रिकोणाचाच हिट फॉर्म्युला वापरला. लांबीनं प्रचंड मोठा 'संगम'
प्रेक्षकांना आवडला; पण तोपर्यंत राज कपूरच्या रोमान्समधला 'रॉनेस' हरवला
होता. नंतर 'मेरा नाम जोकर'मधून राजनं प्रेमाचं
आणखी एक विराट रूप विदूषकाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला, पण
तोवर काळ बदलला होता. 'आराधना'तून 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू'
म्हणणाऱ्या, रंगील्या (आणि रंगीत) नायकाचं आगमन झालं होतं. त्यानंतर मग राज
कपूरनं जणू बदललेल्या काळावर सूड म्हणून प्रेमाचं
खुल्लमखुल्ला 'दर्शन' घडविणारा 'बॉबी' केला. बदलत्या काळाचं भान राज
कपूरनं यात अचूक टिपलं होतं. त्यामुळं 'बॉबी' सुपरहिट झाला आणि 'हम तुम इक
कमरे में बंद हो और चाबी खो जाए' म्हणत प्रेक्षक प्रेमीजनही आपापल्या 'कमऱ्यां'मध्ये प्रेमरत झाले.
राजचा
भव्यदिव्य 'संगम' प्रदर्शित होण्याच्या चार वर्षे आधी, म्हणजे १९६० मध्ये
के. असीफचं आयुष्यभराचं स्वप्न असलेला 'मुघले आझम' पडद्यावर अवतरला. भारतीय
चित्रपटसृष्टीतील टॉप १० अशा प्रेमपटांमध्ये
'मुघले आझम'चा समावेश निश्चित असेल. दिलीपकुमार आणि मधुबाला या तेव्हाच्या
सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्रीनं यात साकारलेलं सलीम आणि अनारकलीचं प्रेम
रूपेरी पडद्यावरची दंतकथा म्हणून अजरामर झालं आहे, यात शंका नाही. हा केवळ
पडद्यावरचा रोमान्स नव्हता, तर के. असीफ या अवलिया चित्रकर्मीचा सिनेमा या
माध्यमाशीच असलेलादेखील तो एक रोमान्स होता. 'मुघले आझम' हा असीफच्या
स्वप्नाचा भव्य आविष्कार होता. असा भव्य-दिव्य चित्रपट लोकांनी त्यापूर्वी
पाहिला नव्हता. अर्थात या सिनेमाची मूळ कथा म्हणजे सलीम व अनारकलीचं प्रेम,
ती या सगळ्या भव्यदिव्यतेत कुठं हरवून जात नाही, हे दिग्दर्शकाचं यश...
दिलीपकुमार, मधुबालाचा पडद्यामागचा रोमान्स या काळात संपुष्टात आला होता.
शूटिंगच्या वेळी सिनेमातले संवाद वगळता दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते, असं
सांगतात. अशाही स्थितीत असीफनं सलीम-अनारकलीचं उत्कट प्रेम
या दोघांच्या रूपातून दाखवलं. पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेला दमदार
सम्राट अकबर आणि दुर्गा खोटे यांनी उभी केलेली मूर्तिमंत जोधाबाई यांचाही
या सिनेमाच्या यशात मोठा वाटा होता. उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांकडून
तानसेनासाठी प्लेबॅक घेण्याचं असीफचं स्वप्न होतं. ज्या काळात गायक एका
गाण्यासाठी पाचशे रुपये घेत, त्या काळात असीफनं खाँसाहेबांना २५ हजार रुपये
मोजून तानसेनसाठी गायला लावलं होतं, असं म्हणतात. अशा अनेक दंतकथांनी
भरलेला हा चित्रपट प्रत्यक्ष पडद्यावर अवतरला, तेव्हा त्याचं ते अचाट रूप
पाहून प्रेक्षक हरखून गेले. 'प्यार किया तो डरना क्या' हा प्रेमिकांना मिळालेला महत्त्वाचा धडा ही या चित्रपटाचीच देणगी होय.
असीफच्या आधी असाच एक अवलिया चित्रकर्मी आपल्या आगळ्यावेगळ्या धाटणीच्या सिनेमांतून जनतेला प्रेमाचे
अनोखे रंग दाखवीत होता. त्याचं नाव गुरुदत्त. गुरुदत्तचा 'प्यासा' हा
चित्रपट म्हणजे एक कविता होती. या सिनेमाचा नायक एक कवी असतो म्हणून नव्हे,
तर आशय, संगीत, अभिनय, छायाचित्रण अशा सर्वच प्रकारांत गुरुदत्तची ही
अभिजात कलाकृती प्रेक्षकांना एखाद्या आर्त, विरही कवितेसारखी भासली. प्रेमात विरहाचं माहात्म्य फार मोठं! हवं ते प्रेम
न मिळण्याचं प्राक्तन अनेकांच्या भाळी अटळपणे लिहिलेलं असतं. याशिवाय
आजूबाजूची प्रतिकूल परिस्थिती, सामाजिक दबाव अशा अनेक अडथळ्यांना प्रेमी
जीवांना तोंड द्यावं लागतं. सामान्य प्रेक्षकांच्या या भावभावनांना
'प्यासा' आणि नंतर गुरुदत्तच्याच 'कागज के फूल'नं आगळं परिमाण दिलं.
गुरुदत्तच्या नायकाचं प्रेम हे केवळ हवं ते प्रेयस
मिळविण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यात तुटलेपणाच्या आर्ततेची धग होती. ही
भावना वैश्विक असते. त्यामुळं त्याचे हे दोन्ही चित्रपट 'प्रेम' या भावनेला फार वेगळी उंची देऊन गेले.
सत्तरच्या दशकातही अनेक चांगले प्रेमपट
आले. हा काळ भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता. अनेक दिग्गज कलाकार
ऐन भरात होते. उत्तमोत्तम कथा-कल्पना सादर करीत होते. यात महत्त्वाचा
उल्लेख करावा लागेल तो १९६५ मध्ये आलेल्या देवआनंद-वहिदाच्या 'गाइड'चा.
आर.
के. नारायण यांच्या या कलाकृतीवर सिनेमा करण्याचा देवचा मानस त्याचा
अत्यंत सर्जनशील, प्रतिभावान भाऊ विजय आनंद याच्यामुळं सिद्धीस गेला.
'गाइड' हा काळाच्या पुढचा चित्रपट होता. प्रेमात
स्त्रीच्या निवडीचं स्थान या सिनेमानं अधोरेखित केलं. विवाहसंस्था, लैंगिक
सुख, धर्म, समाज अशा अनेक संस्थांच्या साचेबद्धपणावर या सिनेमानं
प्रतीकात्मकरीत्या आघात केला. 'तेरे मेरे सपने अब एक रंग है' अशा
विश्वासानं एखादी स्त्री आपल्याला आवडलेल्या (पर)पुरुषाकडं प्रेमाचा हक्क मागू शकते, हे या सिनेमानं दाखवून दिलं. अर्थात, 'गाइड'मधलं प्रेम
तेवढ्यापुरतंच नव्हतं... विजयआनंदच्या दिग्दर्शनामुळं या नात्यातले अनेक
गहिरे रंग अत्यंत तरलपणे प्रेक्षकांसमोर आले. त्यामुळं काळाच्या पुढच्या या
सिनेमातलं प्रेमही प्रेक्षकांच्या पचनी पडलं.
सत्तरच्या दशकाच्या अखेरीस राजेश खन्ना नावाचा सुपरस्टार उदयाला आला आणि प्रेक्षकांना प्रेमाचा
एक धोपटमार्ग सापडला. राजेश खन्नाच्या अदा, लकबी यावर तरुणी प्रचंड फिदा
झाल्या. एकापाठोपाठ एक असे १५ हिट सिनेमे राजेश खन्नानं दिले. त्याच्या
सिनेमांचा पॅटर्न ठरलेला होता. तरीही 'दाग', 'अमरप्रेम', 'कटिपतंग' अशा सिनेमांतून प्रेमाचे
वेगवेगळे रंग राजेश आणि त्याच्या दिग्दर्शकांनी दाखविले. मात्र, हे सगळे
सिनेमे मुख्य प्रवाहातल्या सिनेमाचे सगळे गुण-दोष घेऊन आले होते. त्यामुळं
त्यात प्रेमासोबतच इतर मालमसालाही ठासून भरलेला असायचा. तरीही राजेश खन्नाच्या नायकानं एक काळ गाजवला, यात वाद नाही.
नंतर
अमिताभचं युग अवतरलं. देशातला काळही बदलत चालला होता. स्वातंत्र्यानंतरचा
रोमँटिसिझम संपला होता. व्यवस्थेवर संतापलेल्या 'अँग्री यंग मॅन'चा उदय
झाला होता. अशा या नायकाला व्यवस्थेशी दोन हात करता करता आपल्या प्रेयसीवर प्रेमही
करायची जबाबदारी पार पाडावी लागत होती. त्याचा रांगडा प्रणय
प्रेक्षकांनाही सुखावत होता. अमिताभसोबतच धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र
आदी हिरोमंडळींनी या काळात ही जबाबदारी मोठ्या निष्ठेनं पार पाडली.
त्यातही 'कभी कभी'सारख्या सर्वार्थानं रोमँटिक सिनेमातून वेगळा अमिताभही
प्रेक्षकांसमोर येत होता. त्याच वेळी समांतर धारेतला सिनेमा बाळसं धरू
लागला होता. हृषीकेश मुखर्जी, बासू चटर्जी, बासू भट्टाचार्य, सई परांजपे या
दिग्दर्शकांनी प्रामुख्यानं अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, फारुक
शेख, दीप्ती नवल, शबाना आझमी, स्मिता पाटील या मंडळींना घेऊन अनेक
उत्तमोत्तम सिनेमे या काळात केले. यातला प्रामुख्यानं 'छोटी सी बात',
'रजनीगंधा', 'नरमगरम', 'बातो बातों में', 'चष्मेबद्दूर', 'गोलमाल' या
सिनेमांचा उल्लेख करावा लागेल. शहरी मध्यमवर्गीय माणसाची स्वप्नं, त्याचं
जगणं, त्याचं प्रेम तंतोतंत पडद्यावर उभे करणारे हे सिनेमे होते आणि म्हणूनच ते आजही प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. यातलं प्रेम
व. पु. काळे, वि. आ. बुवा, रमेश मंत्री, शं. ना. नवरे आदी मंडळींच्या
कथा-कादंबऱ्यांसारखं होतं. मुंबईसारख्या महानगरात चाकरमानी वर्ग मोठ्या
प्रमाणावर उदयास येत होता. फोर्टातलं ऑफिस, लोकल किंवा बसचा रोजचा प्रवास,
थोडी मित्रमंडळी आणि छोटंसं घर यातच त्याचं सगळं विश्व सामावलं होतं. यातच
त्याचं प्रेमही फुलायचं. हे सगळं काहीसं निरागस,
भाबडं जग या काळातल्या समांतर सिनेमांनी फार प्रभावीपणे समोर आणलं. याच
काळात गुलजार यांनी 'कोशिश'मधून, तर सईनं 'स्पर्श'मधून अनुक्रमे मूकबधीर
आणि अंध व्यक्तींच्या प्रेमाचा फार वेगळा पदर प्रेक्षकांना दाखविला.
याच
काळात के. बालचंदर या दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या आलेल्या 'एक दुजे के
लिए' या सिनेमानं संपूर्ण भारतात धिंगाणा घातला. कमल हसन आणि रती
अग्निहोत्री यांनी यात दाक्षिणात्य तरुण आणि उत्तर भारतीय मुलगी यांचं
भाषेच्या पलीकडं जाणारं प्रेम रंगवलं होतं. यातले
'वासू-सपना' तुफान लोकप्रिय ठरले. यातलं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत
सुपरहिट ठरलं. 'हम बने तुम बने एक दुजे के लिए' किंवा 'सोला बरस की बाली
उमर को सलाम' वगैरे गाणी प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येऊ लागली. हा सिनेमा
पाहण्यासाठी प्रेमी जीवांच्या रांगा लागल्या. सिनेमाचा शेवट दुःखान्त आहे. वासू आणि सपनाप्रमाणेच देशात कित्येक प्रेमी युगुलांनी आपलं प्रेम यशस्वी होणार नाही, या भीतीनं आत्महत्या केल्या. 'एक दुजे के लिए'चं नाव घेतल्याशिवाय फिल्मी प्रेम हा विषय कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, एवढी ती आता दंतकथा झालीय.
ऐंशीच्या दशकात यश चोप्रा अद्याप फॉर्मात होते. 'सिलसिला'सारख्या सिनेमातून त्यांनी प्रेमाचे
'रंग बरसवले'! अमिताभ-रेखाच्या प्रत्यक्ष जीवनात सुरू असलेल्या रोमान्सची
फोडणी या सिनेमाला होती. हॉलंडमधल्या ट्युलिपच्या बागांतून फिरणारा स्वेटर
घातलेला तरणाबांड, देखणा अमिताभ आणि त्याच्या बाहूपाशांत विसावलेली, मोकळे
केस सोडलेली, साडीतून सौष्ठव दाखवणारी चारुगात्री रेखा असं हे फिल्मी रोमान्सचं चित्र भारतीय प्रेक्षकांच्या नेत्रपटलावर कायमचं ठसलं आहे. याच दशकाच्या अखेरीस 'चांदनी'तूनही यश चोप्रांनी प्रेमाचे
असेच उत्कट रंग पडद्यावर चितारले. या वेळी सुपरस्टार श्रीदेवी त्यांच्या
दिमतीला होती. स्विस पर्वतांमधून 'तेरे मेरे होठों पे मिठे मिठे गीत मितवा'
असं गात फिरणारी, पिवळ्या साडीतून, स्लिव्हलेस ब्लाउजमधून नजरेला आव्हान
देणारी श्रीदेवी म्हणजे प्रेमाचं, शृंगाराचं साक्षात रूप होती. यश चोप्रा भारतीय प्रेमपटांचे
अनभिषिक्त सम्राट होते. त्यांना भारतीय प्रेक्षकांचं मानस अचूक कळत होतं.
विशेषतः पुरुषांचं मन! त्यामुळं या पुरुषी नजरांना सुखावणाऱ्या नायिका
त्यांनी प्रत्येक सिनेमातून फार रोमँटिकपणे पेश केल्या. मुळातच सुंदर
असणाऱ्या अनेक अभिनेत्री यश चोप्रांच्या सिनेमांत आणखी वेगळ्या, अधिक सुंदर
दिसल्या याला कारण दिग्दर्शकाची नजर! त्याला शिव-हरीच्या सुमधुर संगीताची
आणि लता मंगेशकरांच्या स्वर्गीय आवाजाची जोड! आणखी काय हवं! भारतीय
प्रेक्षकाच्या रोमान्सच्या सगळ्या कल्पना तेव्हापासून या चित्रचौकटींशी आणि
या सूरांशी बद्ध झाल्या, असं म्हणायला हरकत नाही. याच यश चोप्रांनी
'लम्हें'सारखा काळाच्या पुढचा सिनेमाही दिला.
'चांदनी' प्रदर्शित झाला, त्याच्या आगे-मागेच दोन प्रेमपट प्रदर्शित झाले होते. एक होता नासीर हुसैनचा 'कयामत से कयामत तक' आणि दुसरा होता सूरज बडजात्याचा 'मैंने प्यार किया'! या दोन चित्रपटांनी भारतीय सिनेमाला अनुक्रमे आमीर खान आणि सलमान खान हे दोन सुपरस्टार दिले. नव्वदच्या दशकातल्या खान साम्राज्याची ती सुरुवात होती. पुढे दोनच वर्षांनी 'दिवाना' अन् तरीही 'बाजीगर' असणारा शाहरुख खान आला आणि खान साम्राज्याचे तीन महास्तंभ उभे राहिले. या त्रयीनं त्यापुढील काळातले हिंदी सिनेमातले बहुतांश सगळे प्रेमपट स्वतःच्या नावावर केले. आमीरचे 'दिल', 'दिल हैं के मानता नहीं', 'रंगीला'; सलमानचे 'बागी', 'पत्थर के फूल', 'साजन', 'हम आप के है कौन'; तर शाहरुखचे 'डर', 'अंजाम', 'याराना' असे सिनेमे या काळात आले. हे सगळे बहुतांश प्रेमपट होते आणि प्रत्येकाची स्टाइल वेगळी होती. हळूहळू ती ती स्टाइल त्या अभिनेत्याची ओळख बनली. शाहरुखच्या मागे-पुढे अजून दोन तगडे नायक चित्रपटसृष्टीत आले. 'फूल और काँटे'मधून अजय देवगण आणि 'खिलाडी'मधून अक्षयकुमार! हे पाचही नायक पुढील २५ वर्षं भारतातील सिनेमासृष्टी दणाणून सोडणार होते. सोबतीला 'ओल्ड हॉर्स' अनिल कपूर, गोविंदा आणि अमिताभ होतेच.
'चांदनी' प्रदर्शित झाला, त्याच्या आगे-मागेच दोन प्रेमपट प्रदर्शित झाले होते. एक होता नासीर हुसैनचा 'कयामत से कयामत तक' आणि दुसरा होता सूरज बडजात्याचा 'मैंने प्यार किया'! या दोन चित्रपटांनी भारतीय सिनेमाला अनुक्रमे आमीर खान आणि सलमान खान हे दोन सुपरस्टार दिले. नव्वदच्या दशकातल्या खान साम्राज्याची ती सुरुवात होती. पुढे दोनच वर्षांनी 'दिवाना' अन् तरीही 'बाजीगर' असणारा शाहरुख खान आला आणि खान साम्राज्याचे तीन महास्तंभ उभे राहिले. या त्रयीनं त्यापुढील काळातले हिंदी सिनेमातले बहुतांश सगळे प्रेमपट स्वतःच्या नावावर केले. आमीरचे 'दिल', 'दिल हैं के मानता नहीं', 'रंगीला'; सलमानचे 'बागी', 'पत्थर के फूल', 'साजन', 'हम आप के है कौन'; तर शाहरुखचे 'डर', 'अंजाम', 'याराना' असे सिनेमे या काळात आले. हे सगळे बहुतांश प्रेमपट होते आणि प्रत्येकाची स्टाइल वेगळी होती. हळूहळू ती ती स्टाइल त्या अभिनेत्याची ओळख बनली. शाहरुखच्या मागे-पुढे अजून दोन तगडे नायक चित्रपटसृष्टीत आले. 'फूल और काँटे'मधून अजय देवगण आणि 'खिलाडी'मधून अक्षयकुमार! हे पाचही नायक पुढील २५ वर्षं भारतातील सिनेमासृष्टी दणाणून सोडणार होते. सोबतीला 'ओल्ड हॉर्स' अनिल कपूर, गोविंदा आणि अमिताभ होतेच.
त्यापूर्वी
एन. चंद्रा असं नाव धारण करणाऱ्या एका मराठमोळ्या दिग्दर्शकानं
'तेजाब'मधून अशाच एका मराठमोळ्या मुलीला प्रेक्षकांसमोर सादर केलं होतं.
तिचं नाव होतं माधुरी दीक्षित. तिनं बघता बघता श्रीदेवीचं साम्राज्य खालसा
केलं आणि 'धक धक' करत ती लाखो भारतीयांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाली.
नव्वदच्या दशकातल्या नायिकेचे सगळे गुण तिच्यात होते. ती दिसायला सोज्वळ
सुंदर होतीच; पण हॉट, सेक्सीही होती. उत्तम नाचू शकत होती, विनोद करू शकत
होती, प्रसंगी हाती बंदूक घेऊन शत्रूला गोळ्या घालू शकत होती. माधुरीच्या
नायिकेनं नव्वदच्या दशकातलं फिल्मी प्रेम
पूर्णपणे पादाक्रांत केलं. 'तेजाब'पासून ते 'देवदास'पर्यंत सुमारे पंधरा
वर्षं माधुरी सुपरस्टार नायिकेच्या सम्राज्ञीपदावर राहिली. तिच्या जोडीला
मग मनीषा कोईराला, रवीना टंडन, करिश्मा कपूर, काजोल या अभिनेत्री आल्या आणि
प्रेक्षकांच्या 'प्रेमा'ला अनेक पर्याय मिळू लागले. सूरज बडजात्यानं १९९४ मध्ये आणलेल्या 'हम आप के है कौन' या गोग्गोड प्रेमपटानं
सलमान आणि माधुरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं. या सिनेमाला
'लग्नाची व्हिडिओ कॅसेट' म्हणून हिणवलं गेलं; पण तो सिनेमाच्या इतिहासातील
सर्वांत यशस्वी सिनेमांपैकी एक ठरला, हे वास्तव आहे.
यश
चोप्रांची यादी चालवत त्यांचा पुत्र आदित्य चोप्रा १९९५ मध्ये एक चित्रपट
घेऊन आला - दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! चोप्रा स्कूलचा प्रभाव आदित्यवर
स्पष्ट दिसून येत असला, तरी त्यानं या 'बॉय मीट्स गर्ल' कथेला वेगळी
ट्रीटमेंट दिली. युरोपात सुट्टीत मजा करण्यासाठी बाहेर पडलेली सिमरन आणि
तिला भेटलेला राज आणि त्यांच्या प्रेमाची भारतात -
पंजाबमध्ये होणारी खास भारतीय पद्धतीनं 'सुफळ संपूर्ण' होणारी 'कहाणी'
प्रेक्षकांना भावली. एवढी, की हा सिनेमा मुंबईत 'मराठा मंदिर'ला
आत्ताआत्तापर्यंत रेग्युलर शोला दाखवला जात होता. सर्वाधिक यशस्वी
सिनेमांमध्ये त्यानं अढळ स्थान मिळवलं. 'डीडीएलजे' ही जागतिकीकरणानंतरच्या
बदलत्या भारताची (पण आपले कौटुंबिक संस्कार इ. जपणाऱ्या मुलांची) क्लासिक
शो-केस विंडो ठरली. या सिनेमाचं वेगळेपण होतं ते त्याच्या या नेपथ्यात!
भारतीय प्रेक्षकांची मानसिकता अचूक ओळखणाऱ्या चोप्रांनी त्यामुळंच याही
सिनेमाद्वारे उत्तुंग यश मिळवलं.
मणिरत्नम हा या काळातला महत्त्वाचा दिग्दर्शक. त्याच्या 'बॉम्बे'नं प्रेमकथेला राजकीय, सामाजिक नेपथ्याची एक अढळ आणि अपरिहार्य चौकट दिली. त्याच्याच 'दिल से'मधून त्यानं या प्रेमकथेचा
परीघ विस्तारत त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं अटळ परिमाण दिलं. जोडीला
ए. आर. रेहमानसारखा अवलिया जादूगार होताच. या दोघांनी नव्वदीतल्या प्रेमपटांना
अक्षय स्मरणाचं कोंदण दिलं. मणिरत्नमच्या जोडीलाच नाव घ्यावं लागेल ते
सुभाष घईंचं. राज कपूरनंतर 'शोमॅन' हा किताब मिळाला तो फक्त घईंना. त्यांचे
सर्व चित्रपट साधारणतः मसालापटच असायचे. पण त्यात प्रेमाचा
एक ट्रॅक अर्थातच असायचा. जोडीला (बहुतांश वेळी) लक्ष्मीकांत-प्यारेलाल
यांचं खणखणीत संगीत. त्यामुळंच 'कर्ज'पासून ते 'ताल'पर्यंत जवळपास दोन दशकं
घईंनी सिनेमाजगतावर राज्य केलं.
एकविसावं शतक उजाडलं आणि भारतीय सिनेमातील प्रेमाचा
रंगही बदलला. मल्टिप्लेक्स संस्कृतीचं आगमन झालं. वेगवेगळे तरुण दिग्दर्शक
सिनेमांत प्रयोग करू लागले. भारतात जागतिकीकरणाचं पर्व सुरू होऊन दशक
लोटलं होतं. त्याचे समाजावर भले-बुरे परिणाम हळूहळू दिसू लागले होते.
महानगरी जीवन अधिक वेगवान होत चाललं होतं. खेडी ओस पडू लागली होती. भौतिक
सुखसमृद्धी सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोचली होती. या वातावरणात हिंदी
सिनेमाही वेगळ्या अभिव्यक्ती समोर आणू लागला. यातला पहिला महत्त्वाचा
सिनेमा म्हणजे फरहान अख्तरचा 'दिल चाहता है'! या सिनेमानं हिंदी सिनेमा
खऱ्या अर्थानं एकविसाव्या शतकात आणला. ही तीन मित्रांची गोष्ट होतीच, पण ती
त्यांच्या प्रेमाविषयीच्या नव्या जाणिवांचीही गोष्ट होती. या सिनेमानं प्रेम या संकल्पनेचं आधुनिकीकरण केलं, असं म्हणायला हरकत नाही. प्रेमाची
व्याप्ती वाढली, विविध नातेसंबंध, त्यातले ताणतणाव आणि नाजूक बंध असं
सगळंच सिनेमाच्या परिघावर येऊ लागलं.
इम्तियाझ अलीच्या 'जब वी मेट'सारख्या
निखळ प्रेमपटानं इथल्या बदललेल्या स्त्रीच्या
जाणिवा प्रखरपणे समोर आणल्या. तिच्यातली ताकद आम्हाला दाखवून दिली. नागेश
कुकनूरनं 'डोर'सारख्या सिनेमातून प्रेमाचा वेगळाच
पैलू दाखवला. प्रदीप सरकारनं 'परिणिता'चा रिमेक केला आणि विद्या बालनसारखी
उत्कृष्ट अभिनेत्री हिंदी सिनेमाला मिळाली. 'परिणिता'मधल्या प्रेमाला
खास बंगाली अभिजाततेचा स्पर्श होता. हा सिनेमाही प्रचंड हिट झाला. त्यातली
गाणीही खूप गाजली. विक्रमादित्य मोटवानीचा 'लूटेरा' आणि रितेश बत्राच्या
'द लंचबॉक्स' या आगळ्यावेगळ्या सिनेमांनाही मोठा प्रतिसाद लाभला. प्रेमाच्या वेगळ्या मिती दाखविण्याचं काम या सिनेमांनी केलं होतं.
गेल्या
आठ-दहा वर्षांत तर आपल्या आजूबाजूचं जग वेगानं बदलतं आहे. सोशल मीडिया आणि
स्मार्टफोनमुळं संवादाची अगणित क्षेत्रं खुली झाली आहेत. प्रेमाची व्याख्या आणि परीघ सगळंच बदलत आहे. त्यामुळं प्रेमाच्या नवनव्या गोष्टी समोर येत राहणारच. या जगात प्रेम आहे तोवर प्रेमाचा सिनेमाही असेलच...!
--
(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१७)
---
No comments:
Post a Comment