तमसेच्या तीरी...
------------------
लंडन, शनिवार, १९ ऑगस्ट २०२३.
कुठल्याही शहराचं नीट दर्शन घ्यायचं असेल, तर तिथले गल्ली-बोळ तुडवावेत. त्या शहरात नदी असेल तर नदीकाठ फिरावा. समुद्र असेल तर किनारा गाठावा. आम्ही लंडनला येऊन तीन दिवस झाले, तरी इथली प्रसिद्ध अशी थेम्स (किंवा टेम्स) नदी बघितली नव्हती. (खुद्द लंडनकर तिला ‘ठेम्स’ म्हणतात, असं हर्षवर्धननं नंतर मला सांगितलं.) या थेम्सचं आपल्या मराठी साहित्यिकांनी ‘तमसा’ असं केव्हाच भाषांतर करून टाकलं आहे, हे मला माहिती होतं. तर या तमसेच्या दर्शनाचा योग आम्हाला आज येणार होता.
शनिवार आणि रविवारी आमचे यजमान हर्षवर्धन व अनुजाला सुट्टी असते. शिवाय आम्ही येणार म्हणून त्यांनी सोमवार व मंगळवारीही रजा टाकली होती. त्यामुळे आता चार दिवस ते आमच्यासोबत असणार होते. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो आणि आनंदात होतो. शनिवारी विशेष असा कुठला कार्यक्रम ठरवला नव्हता. ती जबाबदारी आम्ही हर्षवरच टाकली होती. त्या दोघांनी आमचा कार्यक्रम आखला. शनिवारी जरा निवांत आवरून, नाश्ता करून मग सगळेच सात जण बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे अंडरग्राउंड ट्रेनने जायचं हे नक्की होतं. मग बागेतून मेनर हाउस स्टेशनला गेलो. तिथून पिकॅडिली लाइन घेऊन किंग्ज क्रॉस स्टेशनला उतरलो. हे एक भलं मोठं स्टेशन आहे. इथून केवळ शहरांतर्गत ट्यूब ट्रेनच्या तीन-चार लाइन एकत्र येत नाहीत, तर अन्य शहरांत जाणाऱ्या आणि परदेशांत जाणाऱ्या ट्रेनही याच स्टेशनवरून सुटतात. अर्थात आम्हाला अंडरग्राउंड असताना एवढी कल्पना आली नाही. खालच्या खालीच एका लाइनकडून दुसऱ्या लाइनला जायची सोय होती. पाचेक मिनिटं चालावं लागतं. तिथून आम्ही नॉर्दर्न लाइनला आलो. इथून दक्षिणेला जाणारी ट्रेन घेऊन आम्ही बँक स्टेशनला उतरलो. हे नाव ‘बँक ऑफ इंग्लंड’वरून या स्टेशनला देण्यात आलं आहे. आम्ही स्टेशनवरून मुख्य रस्त्याला लागलो, तेव्हा हर्षनं समोर ‘बँक ऑफ इंग्लंड’ दाखवली. लंडनमधल्या अनेक जुन्या इमारतींप्रमाणे ही पण एक दगडी, पण बुलंद इमारत आहे. ही आपल्या रिझर्व्ह बँकेसारखी इंग्लंडची प्रमुख बँक. सन १९९१ मध्ये जेव्हा भारतावर सोने गहाण टाकायची वेळ आली होती, तेव्हा ते सोने याच बँकेत गहाण ठेवण्यात आले होते, ही कटू स्मृती मनात आल्याशिवाय राहिली नाही. (अर्थात ३२ वर्षांनी भारताने ब्रिटनला मागे टाकून जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आज पाचवे स्थान मिळविले आहे आणि या सर्व प्रवासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत.)
इथं प्रत्येक स्टेशनच्या बाहेर एक नकाशा असतो. त्यात पाच मिनिटांच्या पायी अंतरावर, दहा मिनिटांच्या अंतरावर कोणकोणती प्रसिद्ध ठिकाणं आहेत, हे लिहिलेलं असतं. हर्षनं तो नकाशा पाहिला आणि आम्ही लंडनच्या आगीचं मेमोरियल आधी बघायला जायचं ठरवलं. चालत दहा मिनिटांत आम्ही त्या ठिकाणी पोचलो. तिथं एक उंच मनोरा उभारला आहे. साधारण दोनशे फूट उंचीचा असावा. खाली सर्व माहिती दिली होती. मला ‘द ग्रेट लंडन फायर’विषयी ऐकून माहिती होतं. सन १६६६ मध्ये लंडन शहरात ही महाप्रचंड आग लागली होती. (आपल्याकडे त्या वर्षी छत्रपती शिवरायांची आग्र्याहून ऐतिहासिक सुटका झाली होती.) या आगीत तब्बल ८२ हजार घरं, ८७ चर्च आणि अशीच किती तरी प्रचंड प्रमाणात मालमत्ता जळून खाक झाली होती. एका बेकरीत ही आग लागली होती. तेव्हा वाऱ्याचा वेग जास्त होता. त्यामुळं फार कमी काळात ही आग सर्व शहरभर पसरली होती. हा मनोरा त्या बेकरीच्या जागेपासून बरोबर दोनशे फूट अंतरावर उभा केला आहे. (ती बेकरी अर्थातच आता तिथं नाही.) या आगीमुळं एक झालं. लंडन शहर मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवित झालं. पुण्याचा चेहरामोहरा पानशेत पुरानंतर बदलला तसंच काहीसं! लंडन अधिक सुनियोजित झालं. आगीपासून शहर वाचविण्यासाठीच्या उपाययोजना केल्या गेल्या. रस्ते मोठे केले गेले. थोडक्यात लंडनसाठी तरी ही आग म्हणजे इष्टापत्ती ठरली. लंडनमध्ये आजही अनेक जुन्या, पण भक्कम इमारती दिसतात. त्यातल्या अनेक दोनशे-दोनशे, अडीचशे वर्षं एवढ्या जुन्या आहेत. हे मेमोरियल पाहिल्यानंतर आम्ही चालत, शहराच्या अगदी मध्यवस्तीतील गल्ली-बोळांतून फिरत निघालो. सेंट्रल लंडनमध्ये उत्तुंग इमारती आहेत, पण अगदी मोजक्या आहेत व एकाच ठिकाणी एकवटल्या आहेत. त्यातली एक ‘वॉकीटॉकी’ बिल्डिंग आम्हाला दूरवरूनही दिसत होती. तिचा आकार वॉकीटॉकीसारखा आहे. आम्ही त्या इमारतीच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढले. तिथून जवळच लीडनहॉल मार्केट आहे. हेही अगदी जुनं मार्केट आहे. त्याची नवी इमारतही १९८१ मध्ये उभारली आहे. उंचच उंच छत असलेल्या या मार्केटमध्ये आता दुकानं, कॅफे होते. लंडनमध्ये अशा पुरातन वास्तू मोठ्या कौशल्यानं जतन केल्या आहेत. आतमध्ये सर्व आधुनिक सोयी असतात. मात्र, बाहेरील भाग जुन्या पद्धतीच्या इमारतींसारखा तसाच ठेवलेला असतो. इथून बाहेर पडताना आम्हाला एक वेगळीच इमारत दिसली. स्टीलच्या भक्कम लिफ्ट आणि पाइपलाइन बाहेरच्या बाजूला दिसत होत्या. हर्षनं आम्हाला या इमारतीची कथा सांगितली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधकाम पद्धतीत एक साचेबद्धपणा आला होता. पाइपलाइन, लिफ्ट आदी सर्व झाकण्याकडे (कन्सील) स्वाभाविक कल होता. तेव्हा फ्रान्समधल्या काही वास्तुविशारदांनी बंड म्हणून अशा काही इमारती उभारण्याचं ठरवलं म्हणे. त्यापैकी ही एक. यात सर्व काही उघडं आणि बाहेरच्या बाजूला आहे. काहीशी ओबडधोबड अशी ती इमारत आजही वापरात आहे. तिथं कार्यालयं आहेत. मात्र, नंतर ही वास्तुविशारद मंडळींची बंडखोरी बहुतेक शमली असावी किंवा त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नसावा. नंतर काही अशा इमारती उभ्या राहिल्या नाहीत. त्या परिसरात इतर अनेक उत्तुंग इमारती होत्या. त्या दिवशी शनिवार असल्यानं ऑफिसं बंद होती. त्यामुळं त्या भागात तसा शुकशुकाट होता आणि आम्ही निवांत त्या परिसरातून चालू शकत होतो.
यानंतर हर्षनं आम्हाला ‘गार्डन ॲट १२०’ या ठिकाणी नेलं. एका बहुमजली इमारतीच्या टेरेसवर बाग केली आहे आणि तिथं मोफत प्रवेश आहे. तिथं लिफ्टसमोर बऱ्यापैकी रांग होती. जगभरातले सर्व खंडांतले लोक त्या रांगेत दिसत होते. आपलेही लोक होतेच. त्यात काही दाक्षिणात्य, तर काही शीख होते. आम्हीही ती लाइन धरली. थोड्याच वेळात पंधराव्या मजल्यावर आम्ही पोचलो. टेरेसवर गेल्यावर ही इमारत पंधरा मजली इमारतीपेक्षा उंच वाटत होती. हिचा एक मजला दोन मजल्यांएवढा असेल, वगैरे बोलून आम्ही स्वत:ची समजूत घातली. बाग खरोखर छान होती. त्या उंचीवरून सर्व लंडन शहराचं विहंगम दृश्य दिसत होतं. इथून मला सर्वप्रथम थेम्स नदी दिसली. तो प्रसिद्ध टॉवर ब्रिजही दिसला. आम्ही तिथं फोटोसेशन केलं. बसायलाही जागा होती. त्यामुळं जरा वेळ बसून आराम केला. अनेक लोक येत होते, जात होते. दोन मराठी तरुणही दिसले. ते व्हिडिओ कॉलवरून कुणाशी तरी मराठीत बोलत होते, म्हणून कळलं. आमच्याप्रमाणे त्यांचाही असाच समज झाला होता, की ‘गार्डन ॲट १२०’ म्हणजे ते १२० व्या मजल्यावर आहेत. ते तसं तिकडं कॉलवर कुणाला तरी सांगत होते. मी त्या मुलाचं ऐकून म्हटलं, १२० नाही, हा पंधरावा मजला आहे. त्यानं एक क्षण चमकून पाहिलं आणि मग तिकडं सांगायला लागला, की बरंच उंच आहे. पंधरावा मजला आहे. माझ्या चुलतभावाचा - मंदारचा - त्या दिवशी वाढदिवस होता. मग आम्हीही त्याला तिथून व्हिडिओ कॉल लावला आणि शुभेच्छा दिल्या. त्या मजल्याच्या एक मजला खाली एक वॉशरूम होतं. तिथंही रांग होती. एकूणच लंडनमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहं जरा कमीच दिसली. ट्यूब स्टेशनं बरीच जुनी असल्यानं तिथं वॉशरूम नाहीत. बाहेर रस्त्यांवरही फारशी दिसली नाहीत. हॉटेलमध्ये जाणे किंवा या इमारतीसारख्या ठिकाणी जाणे हाच एक पर्याय दिसला.
आम्ही तिथून निघालो. इथून जवळच एक दुसऱ्या महायुद्धात बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झालेलं चर्च आहे, ते बघायला जाऊ, असं हर्षनं सुचवलं. मग पुन्हा बऱ्यापैकी चालत आम्ही त्या ठिकाणी गेलो. हे अठराव्या शतकातलं चर्च. त्याच्या आता केवळ भिंती उरल्या होत्या आणि मागे एक टॉवर. त्या भिंतींवर सर्वत्र झाडी, गवत उगवलं होतं. तिथंही पर्यटकांची गर्दी होतीच. आत पाहतो तर चर्चच्या जुन्या उंच, कमानीदार खिडक्या धरून एकेका मॉडेलचं फोटोशूट सुरू होतं. त्यात एक काळी साडी नेसलेली आपली भारतीय तरुणीही होतीच. बाकी दोन गोऱ्या होत्या. फोटोग्राफर मात्र तिकडचे, व्यावसायिक फोटोग्राफर दिसत होते. वास्तविक तिथं त्या उंचवट्यावर चढू नये, असे फलक होते. मात्र, ते कुणीही पाळताना दिसत नव्हतं. मग नीललाही तिथं जाऊन फोटो काढायची लहर आली. एकूण त्या ऐतिहासिक ठिकाणाचा फोटोसेशन स्पॉट झालेला दिसला. मला शनिवारवाड्याची आठवण आली. मी पुण्यात पहिल्यांदा आलो, तेव्हा शनिवारवाड्याच्या बुरुजांच्या भिंतींवर लोक पेपर तोंडावर घेऊन झोपलेले बघून असाच धक्का बसला होता.
तिथून निघालो. आता आम्ही हळूहळू नदीच्या दिशेनं सरकत होतो. एके ठिकाणी रस्ता ओलांडून पलीकडं आलो, तो थेट नदीच्या उत्तर दिशेच्या काठीच आलो. थेम्सच्या काठावर चालण्यासाठी मोठा रॅम्प बांधला आहे. आम्ही तिथं आलो होतो. डावीकडं पाहिलं तर साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर तो टॉवर ब्रिज दिसत होता. मग लगेच त्या दिशेनं चालायला सुरुवात केली. या रस्त्यावर पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी वाढली होती. ‘टॉवर ऑफ लंडन’पाशी आलो. हा एक छोटेखानी किल्ला आहे. इथंच आपला प्रसिद्ध कोहिनूर हिरा ठेवला आहे. तो बघण्याची इच्छा होती. मात्र, या किल्ल्याच्या आत जायला साधारण २५ की ३० पौंड तिकीट होतं. त्यात कोहिनूर हिऱ्याची प्रतिकृतीच इथं ठेवली आहे; मूळ हिरा इथं नाहीच, असं हर्षनं सांगितल्यावर तर आम्ही आत जाण्याचा निर्णय रद्दच केला. त्याऐवजी त्या पुलावर जाण्यात मला अधिक इंटरेस्ट होता. थोड्याच वेळात चालत आम्ही पुलाच्या पलीकडच्या बाजूला गेलो आणि तिकडच्या जिन्यानं त्या पुलावर आलो. डाव्या बाजूला ते दोन भव्य टॉवर दिसत होते. मला अगदी धन्य धन्य झालं. लंडनची ओळख म्हणून हा पूल प्रसिद्ध आहे. शिवाय मोठ्या बोटी जाताना हा पूल दुभंगतो आणि वर जातो हेही माहिती होतं. पुलाच्या मध्यभागी गेल्यावर दोन पूल आणि त्यात साधारण एक-दीड इंचांची गॅप स्पष्ट दिसते. अगदी खालचं नदीतलं पाणीही दिसतं. आम्ही पूल ओलांडून पलीकडं आलो. हा अनुजाचा आवडता ‘साउथ बँक’ भाग होता. इथं एकूण जत्रेचंच वातावरण असतं. आम्ही सकाळपासून नुसते चालत होतो. पण आता हा दक्षिण किनाराही पायी चालायचाच होता. तिथं एका ठिकाणी ॲम्फी थिएटरसारख्या अर्धवर्तुळाकार सिमेंटच्या पायऱ्या होत्या. समोर खाली एक छोटं स्टेज होतं. तिथं डीजे मंडळी होती आणि त्यांनी लावलेल्या संगीतावर समोर लोक नृत्य करत होते. अर्जेंटिनी टँगो नृत्य सुरू होतं. आम्ही तिथं बसलो. अनेक लोक प्रेक्षक म्हणून त्या पायऱ्यांवर बसले होते. मधल्या मोकळ्या जागेत वेगवेगळ्या वयाचे, वर्णाचे, धर्माचे लोक आपापल्या जोडीदाराबरोबर नृत्य करत होते. दोन बायका एकमेकींसोबत अतिशय सुरेख नाचत होत्या. एक अतिशय जर्जर झालेले आजोबाही आपल्या तरुण जोडीदारणीबरोबर झकास नृत्य करत होते. मला ते दृश्य बघून इतकं बरं वाटलं! आमच्या शेजारी एका बाबागाडीत एका अगदी तान्ह्या मुलाला घेऊन त्याचा बाबा बसला होता. आई जागेवर नव्हती. त्या मुलाला ऊन लागू नये, म्हणून तो अगदी शेजारच्या भिंतीला खेटून बसला होता. थोड्या वेळात त्याची आई आली. दोघंही त्या बाळाला ते नृत्य दाखवत होते, गाणी ऐकवत होते. ते बाळही अगदी मजेत बसलं होतं. आम्ही हर्ष व अनुजाला डान्स करायला जायचा आग्रह धरत होतो. मात्र, एकूणच आपल्या अंगात असं जाहीररीत्या नाचण्याचा मोकळेपणाही नाही आणि आत्मविश्वासही नाही. ‘ये अपने बस की बात नहीं’ असं आपण ठरवून टाकलेलं असतं! मोकळेपणाने नाचण्याच्या या मंडळींच्या वृत्तीला दाद देत आम्ही तिथून निघालो. इथं शेजारीच एक ‘स्कूप’ नावाची काचेची इमारत आहे. आइस्क्रीमच्या स्कूपमध्ये चमचा घालून उचललं तर कसं दिसेल तसा या इमारतीचा आकार आहे. पुढं शेजारी थेम्स नदीत एक भलं मोठं जहाज उभारलेलं दिसलं. ‘बेलफास्ट’ नावाची ही युद्धनौका होती. तिचं रूपांतर आता संग्रहालयात करण्यात आलं आहे. आम्ही शेजारच्या गल्ल्यांमधून जात असताना आणखी एक म्युझियम दिसलं. ‘द क्लिंक प्रिझन म्युझियम’ असं नाव. शेजारीच एक हाडांचा सापळा टांगला होता. कारागृहातील छळछावण्या बघण्यात आम्हाला काही रस नव्हता. शिवाय तिकीट होतंच.
खरं तर आता आम्हाला कडाडून भूक लागली होती. शेजारीच भली मोठी ‘शार्ड’ बिल्डिंग दिसत होती. ही शंकूच्या आकाराची इमारत लंडनमधील सर्वांत उंच इमारत आणि ती बरीच दुरूनही दिसते. आता आम्ही त्या इमारतीच्या अगदी जवळ आलो होतो. त्या परिसरात असलेल्या बरो मार्केटमधल्या खाऊ गल्लीत आपल्याला जायचं आहे, असं सांगून हर्षनं आम्हाला तिकडं नेलं. जाताना शेक्सपीअरचं ग्लोब थिएटर दिसलं. आता त्याचा तोंडवळा आधुनिक इमारतीचा असला, तरी हीदेखील खूप जुनी वास्तू आहे. आम्ही नदीशेजारच्या उंच ओट्यासारख्या भागावरून पाहिलं, तर एका फटीतून आतल्या ॲम्फी थिएटरचा मुख्य रंगमंच दिसत होता चक्क... तिथं काही कलाकार प्रॅक्टिसही करत होते. आम्हाला तिथं आत जायचं नव्हतं. शेवटी बरीच पायपीट केल्यावर आम्ही बरो मार्केटमध्ये पोचलो. आता साधारण दुपारचे अडीच वाजले होते. कडाक्याची भूक लागली होती. मात्र, त्या मार्केटमध्ये आम्हाला ‘व्हेज’मध्ये फारच कमी पर्याय होते. एका ठिकाणी कलिंगडाचं ज्यूस होतं. फारसा विचार न करता लगेच घेतलं. ते पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं. सर्व मार्केट फिरल्यावर सर्वांत आधी आपण जे ठिकाण हेरून ठेवलेलं असतं, तेच आपल्याला आवडतं, असा नेहमीचा अनुभव आहे. आम्हीही अगदी सुरुवातीला एका ठिकाणी व्हेज बर्गर मिळतो, हे बघून ठेवलं होतं. मग तिथंच गेलो. सुदैवानं सातही जणांना बसायला जागा मिळाली. तो महाप्रचंड बर्गर एरवी मी खाल्ला नसता. मात्र, एवढी भूक लागली होती, की तो बर्गर सहज खाऊ शकलो. आता पुन्हा उत्साह आला होता. पुन्हा आम्ही तिथून लंडन ब्रिजच्या दिशेने निघालो. (टॉवर ब्रिजच्या पुढेच हा ब्रिज आहे. ‘लंडन ब्रिज इज फॉलिंग डाउन फॉलिंग डाउन’ या गाण्यातला ब्रिज तो हा, ही माहिती हर्षनं दिली. तोवर मीही टॉवर ब्रिजलाच लंडन ब्रिज समजत होतो. बाकी हा लंडन ब्रिज अगदी साधा आहे. टॉवर ब्रिजसमोर हा ब्रिज म्हणजे ‘दगडूशेठ’समोर गल्लीतलं मंडळ!) एक मात्र झालं. या टॉवर ब्रिजचे दोन पूल उचलताना आम्हाला बघायला मिळाले. यजमान स्थानिक असल्याचा हा फायदा. टॉवर ब्रिज केव्हा उचलतात याचं एक शेड्यूल असतं. त्यानुसार, दोन्हीकडची वाहतूक अर्थात बंद केली जाते. त्या दिवशी साडेचार वाजता हा पूल उचलणार आहेत, असं हर्षला कळलं होतं. मग आम्ही तोवर बरो मार्केटमध्ये खादाडी करून बरोबर सव्वाचारला त्या पुलावर आलो. बरोबर साडेचार वाजता तो पूल दोन्ही बाजूंनी वर गेला. समोरून एक नौका आली. ती खरं तर फार प्रचंड नव्हती. मात्र, काही का असेना, आम्हाला तो ब्रिज उचलताना बघायला मिळाला होता.
इथून आम्ही पुन्हा ‘साउथ बँके’ने पुढं निघालो. इथं फक्त पादचाऱ्यांसाठीचा एक छान पूल होता. (तरी आख्ख्या लंडनमध्ये झेड ब्रिजच्या तोडीचा एकही ब्रिज दिसला नाही, हे मी अभिमानाने नमूद करू इच्छितो. नदीला समांतर असा पूल बांधणारे फक्त आपणच!) तो ओलांडायच्या आधी आम्हाला डाव्या बाजूला एक उंच व प्रशस्त वास्तू दिसली. ही टेट मॉडर्न आर्ट गॅलरी. वास्तविक ही एक मिल होती. मला दिसलेला तो उंच टॉवर म्हणजे या मिलची चिमणी होती. मात्र, आता त्या मिलचं रूपांतर एका अत्यंत देखण्या अशा मॉडर्न आर्ट गॅलरीत करण्यात आलं आहे. एव्हाना चालून चालून आमचे पाय बोलायला लागले होते. तरीही ही गॅलरी बघायचा मोह टाळणं कठीण होतं. (शिवाय महत्त्वाचं म्हणजे एंट्री फ्री!) मग तिकडं गेलो. गॅलरीत एक प्रशस्त असं चित्रांचं दालन होतं. त्यात सगळी आधुनिक, अर्थात मॉडर्न आर्ट म्हटली जाणारी चित्रं व शिल्पं होती. इथं अक्षरश: काय बघू आणि काय नाही, असं होत होतं. एका टप्प्यानंतर मेंदूची काही ग्रहण करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमताही संपून जाते, असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं फार ताण न देता, सगळं केवळ बघण्यात आनंद मानायचा असं मी ठरवलं. मग मला ते प्रदर्शन बघायला जरा मजा येऊ लागली. बाकी मंडळी चालून चालून दमल्यानं तिथल्या सोफ्यांवर विसावली होती. थोड्या वेळानं आम्ही खाली उतरलो. आता आम्ही तो पादचाऱ्यांचा पूल ओलांडून पुन्हा उत्तर किनाऱ्याकडं निघालो होतो. हा पूल जिथं संपतो, तिथून समोरच थोड्या अंतरावर सेंट पॉल चर्च होतं. हा आमचा आजचा अखेरचा पॉइंट होता.
सेंट पॉल चर्चची इमारत भव्य आहे. आपण अनेक सिनेमांत ते पाहिलं आहे. अगदी अलीकडं ‘झिम्मा’तही हा परिसर दिसला होता. रोमला रोमन कॅथॉलिक पंथाच्या चर्चला उत्तर म्हणून लंडनमध्ये हे (प्रॉटेस्टंट) चर्च उभारण्यात आलं. दोन्ही चर्चमध्ये घुमटाच्या उंचीवरून काही काळ चक्क स्पर्धा सुरू होती म्हणे. ते काही असो. एवढं भव्य आणि कमालीचं देखणं असं हे प्रार्थना मंदिर आहे. आम्हाला वेळेअभावी आत जाता आलं नाही. मात्र, त्या सर्व परिसरात फिरून आम्ही ते चर्च नीट बघितलं.
इथून घरी परत जाताना डबल डेकर बसनं (म्हणजे इथं बहुतेक सगळ्या बस डबल डेकरच आहेत...) जाऊ, असं हर्ष म्हणाला. मला कित्येक वर्षांपासून डबल डेकरमध्ये बसायचं होतं. ते स्वप्न आता साकार होणार, म्हणून मला आनंद झाला. मात्र, तो फार टिकला नाही. तिथला बसस्टॉप काही तरी काम निघाल्यामुळं बंद होता असं कळलं. मग आम्ही पुन्हा ‘अंडरग्राउंड’ची वाट धरली. मेनर हाउस स्टेशनवरून घरी येताना पुन्हा पायी चालावं लागलं. आज प्रचंड चालणं झालं होतं. आम्ही किमान दहा किलोमीटर तर सहजच चाललो असू. अक्षरश: पायाच्या बोटाला फोड येईपर्यंत आम्ही पायपीट केली. मात्र, आज आम्ही लंडनचा महत्त्वाचा भाग, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इथली थेम्स नदी मनसोक्त भटकंती करून पाहिली होती. कुठलीही संस्कृती नदीच्या काठी विकसित होते, असं म्हणतात. आम्हाला लंडनची संस्कृती थेम्सच्या काठी भरभरून दिसली होती. लंडन शहराला लागलेल्या महाप्रचंड आगीच्या स्मारकापासून ते थेट सेंट पॉलसारख्या भव्य प्रार्थनामंदिरापर्यंत अनेक वास्तू बघितल्या होत्या. त्यातही ठळक लक्षात राहिले ते हसरे, सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असलेल्या जगभरातील माणसांचे चेहरे! थेम्स नदी कदाचित नदी म्हणून फार सुंदर नसेल - किंबहुना नाहीच - मात्र तिच्या नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी तिचं रूपांतर निखालसपणे आनंदसरितेत केलंय यात शंका नाही!
(क्रमश:)
----------
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
-----
किती बारकाईने व छान केलय वर्णन...सारे काही डोळ्यासमोर उभे केलेत ...फोटो पण एकदम साजेसे ..सुरेख ...! लंडन वारी एन्जॉय करत आहे...धन्यवाद !👏👌👍🙏
ReplyDeleteमन:पूर्वक धन्यवाद, वीणाताई!
Delete