खेळ मांडियेला वाळवंटी...
--------------------------------
दुबई, ८ डिसेंबर २०२४
आम्ही साधारण अर्धा-एक तास असू त्या १२४ व्या मजल्यावर. तिथे गोल फिरून सर्व बाजूंनी आजूबाजूचा परिसर पाहता येत होता. आम्ही निवांत सगळं पाहिलं. अर्थातच फोटो, व्हिडिओ काढून झाले. मग जिन्याने १२५ व्या मजल्यावर गेलो. तिथंही असाच, पण जरा लहान डेक होता. शिवाय स्मृतिवस्तू विकणारं एक दुकानही होतं. मागच्या बाजूनं समुद्र होता. तिकडून संध्याकाळचं ऊन येत होतं. त्या ऊन-सावलीच्या प्रकाशात फोटो चांगले येत होते. तिथून खरं तर आमचा पाय निघत नव्हता. पण इलाज नव्हता. आता निघावंच लागणार होतं. या मजल्यावरून खाली जायला कमी गर्दी होती. आम्ही ती लाइन धरली. बऱ्याच वेळानं लिफ्ट आली. ही लिफ्ट जरा मोठी होती. साधारण २०-२१ लोक त्यात बसू शकत होते. आम्ही लगेच नंबर लावला आणि खाली उतरलो. पुन्हा बरंच चालत दुबई मॉलमध्ये आलो. आमचे खाण्याचे जिन्नस लॉकरमधून ताब्यात घेतले. तिथं जरा वेळ बसलो. चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. आम्हाला इथं दोन तास फ्री होते. आम्ही तो मॉल फिरू शकत होतो; मात्र दमल्यामुळं आम्ही तिथंच बसलो. सोबत आणलेला खाऊ तिथं बसून खाल्ला. बाकी तो मॉल आपल्याकडच्या कुठल्याही मॉलसारखाच होता. प्रचंड मोठा होता एवढं मात्र खरं. इथं समोर कृत्रिम तलावासारखा एक जलाशय होता. तिथं सहा वाजता फाउंटन शो होणार होता. तो बघून आम्ही निघणार होतो. एव्हाना माझ्या फोनची बॅटरी संपत आली होती. तिथं एका ठिकाणी प्लग दिसला. तिथं चार्जर लावायला लागलो, तोच एक सुरक्षारक्षक आला आणि सांगू लागला, की इथं लावू नका. तिकडं हेल्प डेस्क आहे तिथं जा. मग मी चालत चालत थोड्या अंतरावर असलेल्या हेल्प डेस्कवर गेलो. तिथं मी मला फोन चार्जिंग हवं आहे, असं सांगितलं. त्यावर तिथल्या माणसानं संगणकावर माझी माहिती भरून घेतली. लायसन्स आहे का, विचारलं. ते माझ्या खिशात होतं. ते त्यानं ठेवून घेतलं आणि एक पॉवर बँक दिली. मी ती तीन तास वापरू शकतो आणि नंतर परत देऊन माझं लायसन्स घेऊन जाऊ शकतो, असं त्यानं सांगितलं. माझं काम झालं. माझं लायसन्स तिथं दिलं आणि ती पॉवर बँक घेऊन आलो. पुढच्या दोन तासांत माझा फोन बऱ्यापैकी चार्ज झाला. मग तो फाउंटन शो सुरू होण्यापूर्वी मी ती पॉवर बँक परत देऊन माझं लायसन्स परत घेऊन आलो. सहा वाजण्यापूर्वी आम्ही समोरच्या त्या मोकळ्या जागेत गेलो. तिथं आधीच भरपूर लोक येऊन बसले होते. तिथली बसायची बाकं, कट्टे वगैरे सगळं भरलं होतं. आम्ही जरा मागच्या बाजूला असलेल्या एका कट्ट्यावर बसलो. नीलला कॉफी किंवा असंच काही तरी प्यायला हवं होतं. समोर एक स्टॉल होता. मग तिथं एक लेमोनेड आम्ही विकत घेतलं आणि ते दोघं प्यायलो. थोड्याच वेळात तो शो सुरू झाला. एकेकदा ते कारंजं बरंच म्हणजे सहा-सात मजल्यांएवढं उंच गेलं, तेव्हा जमलेल्या सगळ्यांनी एकच जल्लोष केला. आता अंधार पडल्यामुळं हा शो आणि आजूबाजूच्या इमारती हजारो दिव्यांनी झगमगत होत्या. मागे ‘बुर्ज खलिफा’ची इमारतही अगदी लखलखत होती. किती फोटो काढावेत आणि किती नाही, असं झालं होतं! अर्थात फाउंटन शो संपल्यावर आम्हाला निघणं भाग होतं. त्या मॉलमधून चालत चालत बाहेर बसपर्यंत येईतो बराच वेळ गेला. साधारण सात वाजता आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो. आता आजचं डिनर हे क्रूझवर असणार होतं. तेव्हा आमची बस आता तिकडं निघाली.
दुबईत एकच नैसर्गिक कालवा किंवा जलस्रोत आहे. बाकी सगळे कृत्रिमरीत्या समुद्रातून पाणी वळवून तयार केले आहेत. अशाच एका मोठ्या कालव्यातून बोटिंग चालते. आपल्याकडं गोव्याला मांडवीतून जशा क्रूझ चालतात, साधारण तसाच प्रकार. फक्त इथलं आजूबाजूचं नेपथ्य फारच भपकेबाज आणि नेत्रदीपक होतं. दोन्ही बाजूंना उत्तुंग इमारती आणि त्यातून चालणारी आपली बोट असा सगळा नजारा होता. त्या छोट्याशा बोटीला क्रूझ म्हणत असले, तरी ती गोव्यातल्या त्या क्रूझर बोटींपेक्षाही जरा लहानच होती. आमची वेळ रात्री आठची होती. मग थोडा वेळ तिथं वेटिंग करणं आलं. बरोबर आठ वाजता त्या जेट्टीवरून आम्हाला आत सोडलं. तिथं बऱ्याच नौका डुलत होत्या आणि हळूहळू पर्यटक येत होते. इथल्या पाण्याचा एकदम घाणेरडा असा वास आला. तो अगदी नाकातच बसला. तसेच नाक मुठीत धरून पुढं गेलो. त्या नौकेत चढल्यावर तो वास गेला. सुदैवानं आम्हाला वरच्या डेकवर जागा मिळाली होती. आम्ही एक टेबल धरलं. बोट नऊ वाजता सुटणार होती. तोवर तिथं एक चिनी दिसणारी मुलगी फटाफट सगळ्यांचे फोटो काढू लागली. ती नंतर त्याचे पैसे मागणार हे उघड होतं. तरी तिला विचारल्यावर ‘देअर इज नथिंग फ्री इन दुबाय’ असं हसत हसत म्हणाली. मग मीही खिदळत ‘नको गं बाय’ म्हणत तिला वाटे लावलं. साधारण साडेआठला त्यांनी ते बुफे जेवण सुरू केलं. आम्ही भुकेजले होतोच. आधी आलेल्या कोकसदृश ‘वेलकम ड्रिंक’नं भूक आणखीनच वाढली होती. मग बुफेची रांग धरली. अर्ध्या तासात आमचं जेवण होत आलं, तशी ती बोट सुटली. आता आम्ही दोन्ही किनाऱ्यांवरचा सगळा ‘नजारा’ बघत निघालो. आम्हाला वाटलं, त्यापेक्षा ही राइड बरीच मोठी निघाली. त्यांनी आम्हाला पुष्कळ लांब नेलं. एका टोकाला ‘दुबई आय’ हे जायंट व्हील होतं. तिथपर्यंत आम्ही गेलो. जेवण आटोपलं, तसं डेकवर नाचगाणी सुरू झाली. एका अरबी बाबाने ‘याराना’तल्या बच्चनसारखं अंगभर लाइट लावून जोरदार डान्स केला. मग नंतर ते प्रवाशांना नाचायला बोलवायला लागले. हिंदी गाणी लागली. नंतर तर ‘झिंगाट’ही लागलं तेव्हा आमच्या ग्रुपमधल्या उत्साही बायकांनीही नाचून घेतलं. आज आमचं नशीब जोरावर होतं. त्यामुळं ‘दुबई शॉपिंग फेस्टिव्हल’तर्फे क्वचित कधी तरी होणारा ड्रोन लेझर शोही अवकाशात सुरू झाला. परतीच्या प्रवासात तो अद्भुत असा शो आकाशाच्या पटलावर पाहताना भान हरपलं. या दोन महिन्यांतच हा शो सादर होतो. सध्या इथला सीझन सुरू झाल्यानं हा शो दाखवण्यात आला होता आणि आम्ही भाग्यवंत, म्हणून आम्हाला तो सहजच पाहायला मिळाला. आता नौका हळूहळू एक राउंड पूर्ण करून पुढच्या बाजूनं आम्ही जिथून चढलो होतो, त्या जेट्टीच्या बाजूला येऊन थांबली. मग सावकाश खाली उतरलो आणि जेट्टीवरून पुन्हा बसकडं निघालो. बसनं मग पुढच्या अर्ध्या तासात हॉटेलवर सोडलं. बसमधून झगमगत्या दुबईचं निवांत दर्शन घेताना अजिबात कंटाळा येत नव्हता. सुखाच्या लहरींवर तरंगतच आम्ही हॉटेलवर परतलो. संपूर्ण दिवस भरपूर हिंडणं आणि बघणं झालं होतं. त्यामुळं अंथरुणाला पाठ टेकताच निद्रादेवी गळ्यात पडल्या.
दुबई, ९ डिसेंबर २०२४
आजही नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करून, नऊ वाजता एकत्र जमायचं होतं. आज मिरॅकल गार्डन आणि डेझर्ट सफारी असे दोनच मुख्य कार्यक्रम होते. त्यातही ‘डेझर्ट सफारी’विषयी विशेष ऐकलं होतं. म्हणून मला त्या सफारीची अधिक उत्सुकता होती. अर्थात पहिल्या दिवसापासून शॉपिंगचीही अनेकांना उत्सुकता होती. म्हणून मग टूर मॅनेजर सागरनं आज पहिल्यांदा बस जुन्या दुबईतील एका दुकानापाशी नेली. इथं फक्त ड्रायफ्रूट्स, खजूर, चॉकलेट्स अशा गोष्टी होत्या ‘गोल्ड सूक’ला (इथला सराफी बाजार) उद्या जायचंच होतं. त्यामुळं इथं फक्त खाऊची खरेदी करायची, असं मॅनेजरनं सांगितलं. आम्ही पडत्या खजुराची आज्ञा पाळून, लगेच ती खरेदी करून टाकली. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी तिथं किलोकिलो खजूर, ड्रायफ्रूट्स आणि खजुराची ती चॉकलेटं यांची शॉपिंग करून टाकली. आता इथून आमची बस निघाली ती थेट मिरॅकल गार्डनला. या वाळवंटात शेकडो प्रजातींची फुलं आणि झाडं या लोकांनी रुजवली आहेत. हे अतिशय कष्टाचं आणि खर्चीक काम, म्हणून त्याचं कौतुक अधिक! मिरॅकल गार्डनमध्ये शिरताना मला सिंगापूरच्या ‘गार्डन बाय द बे’ या भव्य उद्यानाची आठवण झाली. आम्ही सहा वर्षांपूर्वी तिथं गेलो होतो. दुबईचं हे गार्डन तुलनेनं लहान असलं, तरी अतिशय सुंदर होतं, यात शंका नाही. असं गार्डन म्हणजे फोटो काढण्याची सुवर्णसंधीच. आम्ही तिथं भरपूर फोटो, व्हिडिओ, रील्स काढले. नंतर जरा ऊन जाणवायला लागलं. या बागेत झाडांना, वेलींना घोडे, हत्ती, विमान असे विविध आकार दिले आहेत. फुलांचं तर एवढं वैविध्य होतं, की नजर तृप्त होत होती. इथं मधोमध एक जरा उंच जागा होती. तिथं पायऱ्यांनी चढून जाता येत होतं. तिथं आइस्क्रीम वगैरे विकायला होतं. शिवाय खुर्च्या ठेवल्या होत्या. फोटो काढून मिळत होते. आपले भारतीय पर्यटक सर्वत्र होतेच. त्यातही पहिल्यांदा परदेश प्रवास करणाऱ्या, विशेषत: मराठी महिला चटकन ओळखू येत होत्या. झगमगीत साडी, चमकणारी पर्स, गॉगल आणि मोठ्या आवाजात बडबड हे त्यांना ओळखायचं व्यवच्छेदक लक्षण होतं. आम्ही पूर्ण फिरून त्या गार्डनची चक्कर पूर्ण केली. बाहेरच्या गोलाच्या परिघावर वेगवेगळी दुकानं होती. तिथं मग फ्रिजवर चिकटवायच्या स्मृतिवस्तूंची खरेदी केली. आता खरं तर उन्हाची वेळ झाली होती आणि भूकही लागली होती. मग आम्ही गार्डनमधून बाहेर पडलो आणि बसमध्ये एसीत जाऊन बसलो. सोबत आणलेला कोरडा खाऊ खाल्ला. थोड्या वेळात सगळी मंडळी परतली. आमच्या ग्रुपमधील दोन तरुण जोडपी होती, त्यांचं सगळीकडं जरा अधिक वेळ फोटोसेशन चालायचं. त्यामुळं ती चौघं सगळ्यांत शेवटी यायची. नंतर हळूहळू सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि माफक चेष्टा, टोमणे हेही सुरू झालं. औपचारिकतेची भिंत आता पडू लागली होती.
आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी निघालो. दुबईतील ‘पेशवा’मध्ये पोचलो. ही खरं तर पहिली, मूळ शाखा. आम्ही पहिल्या रात्री ‘इब्न बतुता’मध्ये जेवलो ती शाखा नंतर सुरू झाली. इथंही ‘मराठमोळं’ इं. तेच जेवण होतं. आमचा मॅनेजर सागर यानं तिथल्या लोकांना सांगितलं, की हा मेन्यू आधीच तिकडं झालाय. मग ते म्हणाले, की थोडा वेळ थांबा. मेन्यू बदलतो. आम्हाला त्यांनी एक वेगळा हॉलच दिला होता. आम्ही वाट पाहत बसलो. पण थोड्या वेळातच आमची तपश्चर्या फळाला आली. चक्क पिठलं-भाकरी असं जेवण आलं. इतर पदार्थही होतेच. पण आम्ही पिठलं-भाकरीवर अधिक ताव मारला, हे सांगायला नकोच. इथं नंतर त्या मालकीणबाई जोशी यांची भेट झाली. तिथं इराणी केशरही विकायला होतं. भारतीय चलन चालणार होतं. मग ती एक डबी विकत घेतली. बाहेर पडल्यावर बरीच भारतीय रेस्टॉरंट, आयुर्वेदिक दुकानं वगैरे दिसली. इथंच ती प्रसिद्ध लिमोझिन कारही रस्त्यात दिसली. तिचे फोटो काढले.
आता आम्ही पुन्हा हॉटेलला जाणार होतो. आता ही बस आम्हाला तिथं सोडून जाणार होती. पुढचा टप्पा ‘डेझर्ट सफारी’चा असल्यामुळं त्या वेगळ्या गाड्या आम्हाला न्यायला येणार होत्या. हॉटेलला पोचलो. जरा फ्रेश झालो. मग अडीच वाजता सागरनं ग्रुपमधील लोकांचे पाच-पाच, सहा-सहा जणांचे गट केले. ज्या ज्येष्ठ नागरिकांना सफारीची राइड हळू वेगात हवी होती, अशांचा वेगळा गट झाला. आमच्या गटात आम्ही तिघं आणि दोन काका आले. थोड्याच वेळात आमचा ड्रायव्हर आला. तो आम्हाला घेऊन बेसमेंटमधील पार्किंगमध्ये गेला. नील पुढे बसला, ते दोन काका मध्ये बसले आणि धनश्री व मी सर्वांत मागे बसलो. आमची ‘लँड क्रूझर’ लगेच निघाली. दुबई शहराच्या बाहेर पडून २०-३० किलोमीटर दूर गेल्यावर वाळवंट सुरू झालं. तिथं सगळ्या गाड्या पुन्हा एकत्र थांबल्या. इथं या गाड्यांच्या चाकांमधली हवा जरा कमी करतात. तो सोहळा पार पडल्यावर आमची ‘डेझर्ट सफारी’ एकदम धडाक्यात सुरू झाली. आमच्या ड्रायव्हरनं सगळ्यांना सीट बेल्ट लावायला सांगितलं. आम्ही सज्ज होऊन बसलो. गाडी वाळूच्या टेकाडांवर जोरात धावू लागली. इथं ते ट्रॅक तयारच होते. आमच्या पुढे आणि मागे बऱ्याच गाड्या धूळ उडवीत धावताना दिसू लागल्या. आमच्या ड्रायव्हरला हे रोजचं असणार. त्यानं सरावानं त्या टेकाडांवरून गाडी शब्दश: ‘उडवायला’ सुरुवात केली. आम्ही एकदम जोरजोरात हसायलाच लागलो. फारच धमाल येत होती. बरंच अंतर कापल्यावर मग पुन्हा एके ठिकाणी सगळ्या गाड्या एकत्र थांबल्या. इथं जागोजागी हातात तो ‘बाज’ पक्षी घेऊन, अरबी वेषातले पुरुष उभे होते. तो पक्षी आपल्या हातावर, डोक्यावर ठेवून फोटो काढले जात होते. याला अर्थातच पैसे होते. माझं प्राणी व पक्ष्यांवरच प्रेम ‘दुरून डोंगर साजरे’ याच प्रकारातलं असल्यानं मी काही त्या पक्ष्याला हात लावला नाही. तसेही त्या पक्ष्याच्या पायाला दोरा बांधून, पट्टीने त्याचे डोळे झाकून एकूण हालच चालवले होते त्या माणसाने. ते फोटोसेशन एकदाचं आटपलं आणि आम्ही पुन्हा दणके खात एका ठिकाणी थांबलो. या लोकांनी वाळवंटात मध्येच चौसोपी वाड्यासारखं बांधकाम करून आत अत्याधुनिक सोयीसुविधा केल्या आहेत. मला एके ठिकाणी मोबाइलला रेंज देणारा टॉवर लावलेला एक ट्रकही उभा दिसलो. आम्हाला त्या वाड्यात नेलं. ते सगळं स्मृतिवस्तू दुकान, हे घ्या, ते घेऊन बघा टाइप सगळं होतं. महत्त्वाचं म्हणजे तिथं वॉशरूमची व्यवस्था होती. कुणाला त्या छोट्या, जाड टायरच्या बॅटरीवरच्या गाड्या चालवायच्या असतील, तर तीही सशुल्क सोय तिथं उपलब्ध होती. आतल्या दुकानांत अरबी ड्रेसपासून ते घड्याळांपर्यंत अनेक वस्तू होत्या. आम्ही फक्त विंडो शॉपिंग केलं आणि बाहेर आलो. आमचा मुख्य कॅम्प दुसरीकडं होता, हे मी तोवर सागरकडून कन्फर्म करून घेतलं. मग आम्ही पुन्हा आमच्या ‘लँड क्रूझर’मध्ये बसलो आणि पुन्हा दणके खात, आपटत, उडत ‘डेझर्ट कॅम्प’कडं निघालो. थोड्याच वेळात आमचा ‘रायना डेझर्ट कॅम्प’ आला. ‘रायना’ ही इथली बडी पर्यटन कंपनी आहे. आमच्या कंपनीचं त्यांच्यासोबत ‘टायअप’ होतं. तसं ते इथं प्रत्येकालाच स्थानिक कंपनीशी करावं लागतं. तुम्ही (म्हणजे भारतातील टूर कंपनी) इथं स्वतंत्रपणे टूर ऑपरेट करूच शकत नाही.
इथं मुख्य कॅम्प असल्यानं हा ‘वाडा’ आकारानं मोठा होता. चारही बाजूंनी बांधकाम आणि मध्ये मोकळी जागा अशी रचना होती. इथं उंट सफारी, आत मेंदी, हुक्का वगैरे सगळ्या सोयी होत्या. मुख्य जेवण तर होतंच. मधोमध तयार केलेल्या उंच अशा स्टेजवर होणारा बेली डान्स आणि इतर मनोरंजक कार्यक्रम हे मुख्य आकर्षण होतं. आम्ही आत शिरलो तेव्हा पावणेसहा-सहा वाजत आले होते. संधीप्रकाश होता. मंद वारा सुटला होता. मावळतीचं आकाश केशरी झालं होतं. आकाशात दर मिनिटाला असं एक विमान इकडून तिकडं जात होतं. खाली दणकेबाज म्युझिक सुरू झालं होतं. एकूण माहौल होता. आम्हाला हाताला ते बँड बांधून आत सोडलं. एका ठिकाणी बसायची जागा दिली. मी अगदी त्या मधल्या रंगमंचाच्या जवळची खुर्ची पटकावली. आमच्या ग्रुपमधली इतर मंडळीही त्याच टेबल रांगेत बसली. तिथं बारही होता. फक्त मद्य फुकट नव्हतं. आपापल्या पैशानं घ्यायचं होतं. आम्ही अर्थातच फुकट मिळणाऱ्या ज्यूसकडं धाव घेतली. हळूहळू अंधार पडायला लागला. मग ते मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले. सर्वांत आधी एका अरबी वेषातील दाढीधारी पुरुषाने येऊन जोरदार नाच करून दाखवला. सर्कशीतील कलाकारांचं असतं तसं त्याचं लवचीक शरीर अक्षरश: लवलवत होतं. मग आणखी एक पथक आलं. त्यात तीन पुरुष आणि तीन मुली होत्या. त्यांचाही नाच जोरदार झाला. मग एक ढोलकनृत्य झालं. शेवटी सगळ्यांना ज्याची उत्सुकता होती, ती बेली डान्सर आली. मात्र, ती जे काही नाचली, त्यात फार दम नव्हता. अगदीच नवखी आणि नवशिकी वाटली. पण ती मधल्या एका डान्सनंतर परत आली, तेव्हा मात्र तिनं जोरदार डान्स करून दाखवला. तरीही तो ‘बेली डान्स’ नक्कीच नव्हता.
मध्येच मला हुक्का ओढून पाहायची लहर आली. एका कोपऱ्ऱ्यात ती सोय होती. तिथं ‘शीशा’ असं लिहिलेलं काउंटरही होतं. तिथं ‘पेड’ सुविधा होती आणि त्यासाठीच हुक्का भरला जात होता. मी तिथं जाऊन पाहिलं. काही लोक तिथं बसले होते; पण फुकट असलेली ती सुविधा तिथं सुरू असलेली काही दिसली नाही. मग निमूट जागेवर येऊन बसलो. थोड्या वेळात ‘जेवण तयार आहे’ अशी घोषण झाली. मग आम्ही सगळे तिकडं धावलो. बुफे लावलेला होता. या वेळी मी अरब स्पेशालिटी असलेले काही गोड पदार्थ घेतले. एक खजुराच्या केकसारखा पदार्थ होता, त्याचं नाव विसरलो. पण तो छान लागत होता. बाकी भारतीय जेवणही होतंच. भूक लागली होती, त्यामुळं आम्ही तिथं आडवा हात मारला. इकडं मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच होते. ती कथित बेली डान्सर तिसऱ्यांदा मंचावर आली आणि या वेळी ‘लैला मैं लैला’वर नाचून गेली. मला क्षणभर जामखेडच्या पंचमीच्या जत्रेत बसल्यासारखं वाटलं. असो.
ही मौज लवकरच संपणार होती, तशी ती संपली. आमच्या मॅनेजरनं आम्हाला इथून लवकर बाहेर पडण्याची सूचना केली होती. याचं कारण या लँड क्रूझर गाड्या एकदम बाहेर पडतात आणि त्या वाळवंटी ट्रॅकवरही ट्रॅफिक जॅंम होण्याची शक्यता असते म्हणे. मग आम्ही सगळे गडबडीतच बाहेर पडलो आणि आपापल्या गाड्यांमध्ये जाऊन बसलो. जाताना पुन्हा ‘हवाहवाई’ अशी दणदणीत सफर झाली. एकदाचं ते वाळवंट संपलं आणि आम्ही डांबरी रस्त्यावर आलो. पुन्हा एके ठिकाणी थांबून सगळ्यांनी आपापल्या गाड्यांमध्ये हवा भरून घेतली. मग आमची गाडी सुसाट निघाली. नऊ-साडेनऊच्या दरम्यान आम्ही हॉटेलमध्ये येऊन पोचलोसुद्धा.
(क्रमश:)
-------
No comments:
Post a Comment