निळ्या डोळ्यांचा ‘सपनों का सौदागर’
---------------------------------------------
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास उण्यापुऱ्या शंभर ते सव्वाशे वर्षांचा. अनेक नामांकित कलाकारांनी ही चित्रपटसृष्टी गाजवत ठेवली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा या चित्रपटसृष्टीवर उमटवला आहे. या चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहायचा झाला, तर काही नावं त्यातून कधीच वगळता येणार नाहीत. राज कपूर हे असंच एक नाव. केवळ राज कपूरच नव्हे, तर हे कपूर खानदानच अतिशय कर्तृत्ववान. हिंदी चित्रपटसृष्टीची ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणता येईल एवढा नावलौकिक या घराण्यातील बऱ्याच जणांनी कमावला. त्यातही राज कपूरचं नाव कायम पुढे राहील. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध त्रयी म्हणजे राज कपूर, दिलीपकुमार आणि देव आनंद. या तिघांनीही या मायावी दुनियेवर अक्षरश: राज्य केलं. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं. प्रत्येकाची छाप वेगळी. प्रत्येकाचा प्रभावही वेगळा. यंदा राज कपूरची जन्मशताब्दी. त्यामुळं या निळ्या डोळ्यांच्या राजकुमाराच्या आयुष्याचा वेध घेणं यंदा अगदी औचित्यपूर्ण ठरेल.
राज कपूरला अवघं ६४ वर्षांचं आयुष्य लाभलं. मात्र, या काळात त्यानं निर्माण केलेल्या सिनेमांनी त्या त्या काळावर अगदी अतुलनीय अशी छाप टाकली. राज कपूरला अभिनयाला किंवा एकूणच कलेचा वारसा घरातूनच मिळाला. ‘द ग्रेट’ पृथ्वीराज कपूर यांचं हे थोरलं गोंडस अपत्य पुढं आपल्या कामाच्या जोरावर मोठं नाव कमावणार, यात आश्चर्य नव्हतं. भारतातील चित्रपटसृष्टीवर पंजाब प्रांतातील मंडळींचा पगडा मोठा आहे. रावी, सतलज, झेलम, चिनाब आणि बियास या पाच नद्यांच्या खोऱ्यांत राहणाऱ्या या उंचपुऱ्या, धिप्पाड, देखण्या माणसांनी चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षं आपला ठसा उमटवला आहे. कपूर मंडळीही त्याच प्रांतातून आलेली. मायानगरी मुंबईत त्यांनी जम बसवला आणि अल्पावधीत चित्रपटसृष्टीवरही आपली पकड बसविली. पृथ्वीराज कपूर हे या घराण्यातील ज्येष्ठ, अध्वर्यू म्हणावेत असे मोठे कलाकार. त्यांच्या तिन्ही मुलांनी पुढं चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केलं.
‘प्रभात’ कंपनीच्या चित्रपटातून नारदाची भूमिका करून, सिनेमाजगतात पाऊल ठेवणाऱ्या राज कपूरच्या कारकिर्दीचा काळही मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या भारावलेल्या, मंतरलेल्या काळाचा प्रभाव पुढं त्याच्या कलाकृतींवर पडला; तसंच त्याच्या कलाकृतींनीही त्या काळावर आपली लखलखीत नाममुद्रा कायमची उमटविली.
राज कपूर जन्माला आला, तो काळ भारताच्या पारतंत्र्याचा होता. ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय जनता स्वातंत्र्याचा लढा लढत होती. पहिलं महायुद्ध होऊन गेलं होतं (आणि वीस वर्षांनी दुसरं सुरू होणार होतं…) सिनेमा अद्याप ‘मूक’ होता आणि तिकडं अमेरिकेत चार्ली चॅप्लिन नावाच्या महान कलाकारानं आपल्या आगळ्यावेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींनी सर्व जगावर मोहिनी घातली होती. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना अखेरचं ‘चले जाव’ असं ठणकावून सांगितलं, तेव्हा राज १८ वर्षांचा कोवळा तरुण होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा राज २३ वर्षांचा होता. त्याच्या सर्व प्रमुख कलाकृती स्वातंत्र्यानंतर आल्या. त्यावर त्या काळाच्या भारावलेपणाची, रोमँटिसिझमची अपरिहार्य अशी छाप पडली होती. राज कपूरने दिग्दर्शित केलेले पहिले ‘आग’, ‘बरसात’ असे काही चित्रपट पाहिले, की त्यात नवथर तारुण्यातील मुसमुसलेल्या प्रणयाची कोवळीक स्पष्टपणे दिसून येते. पुढे पं. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशाच्या उभारणीचं दशक सुरू झालं. देशात उत्साहाचं वारं होतं. नवं काही तरी घडवायची, नवनिर्माणाची जिद्द होती. याच काळात देशात अनेक नव्या संस्था सुरू झाल्या, नवी धरणं बांधली गेली, उत्कृष्ट साहित्य निर्माण झालं, त्यातही वंचितांचा प्रवाह ठळक झाला. नेहरूंनी स्वीकारलेली समाजवादी मिश्र अर्थव्यवस्था भारतासारख्या विशाल आणि विविधतेनं संपन्न असलेल्या देशासाठी एक वेगळी वाट घेऊन आली. त्या काळात निर्माण झालेल्या चित्रपटांवरही याचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. राज कपूरनं या काळात निर्माण केलेल्या ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटांतही हेच म्हणता येईल. गरीब नायक, श्रीमंत खलनायक, गरिबीतही आनंदात राहणारे नायकाचे सगेसोयरे आणि श्रीमंताची मुलगी असलेली, मात्र गरीब नायकावर जीव जडवणारी नायिका असा सर्वसाधारण साचा ठरलेला असायचा. राज कपूरचं वैशिष्ट्य हे, की त्यानं मनोरंजनाचं मूल्य कमी लेखलं नाही. त्याचे सिनेमे केवळ कंठाळी किंवा प्रचारकी नसत. उत्कृष्ट पटकथा, चांगला अभिनय, उत्तम संगीत आणि भव्य निर्मिती या चार खांबांवर उभी राहिलेला तो सिनेमा एक निव्वळ कलाकृती म्हणूनही मोठाच असायचा. स्वत: राज कपूर संगीताचा चांगला जाणकार होता. शंकर-जयकिशन या तेव्हाच्या नवोदित पोरांना हाताशी धरून, शैलेंद्रसारखा गुणी गीतकार आणि मुकेशसारखा – जो पुढे राज कपूरचा आवाज म्हणूनच ओळखला गेला – वैशिष्ट्यपूर्ण गायक असा संच त्यानं मोठ्या हिकमतीनं गोळा केला होता. राधू कर्मकारसारखा जाणता सिनेमॅटोग्राफरही जोडीला होता. नायिका म्हणून नर्गीसला पर्याय नव्हता. अशा सगळ्या भांडवलावर राज कपूरनं एकापेक्षा एक उत्तम सिनेमे काढले आणि समाजमनावर गारूड केलं. राज कपूरवर चार्ली चॅप्लिनचा असलेला प्रभाव त्याच्या सगळ्या सिनेमांत दिसतोच. कारुण्यरसातून हास्य फुलवण्याचं किंवा हास्यरसातून कारुण्य भिडविण्याचं विलक्षण कसब असलेला तो अद्भुत कलाकार होता. राज कपूरनं त्याच्या ‘राजू’ या नायकामध्ये चॅप्लिनसदृश गुण दाखवले आणि एकाच वेळी प्रेक्षकांना हसवलंही आणि रडवलंही. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देश अनेक समस्यांशी झुंजत होता. दारिद्र्य खूप होतं. मूलभूत सुविधांचाही अभाव होता. निरक्षरता होती. शिक्षणाचं एकूणच प्रमाण कमी होतं. स्त्रियांना स्वातंत्र्य आताएवढं नव्हतं. मोठमोठी कुटुंबं असायची. कमावणारे फार तर एक किंवा दोघे जण. अशा स्थितीत तेव्हा एकूण सर्वसाधारण जनतेसाठी मनोरंजन हा भाग प्राधान्यक्रमात फारच तळाला होता. रेडिओ अगदी कमी होते. नाटकं असायची, पण ती मोठ्या शहरांतच शक्यतो बघायला मिळायची. याव्यतिरिक्त गावोगावी भरणाऱ्या यात्रा, जत्रा आणि त्यात येणारे तमाशासारखे खेळ हीच लोकांच्या मनोरंजनाची प्रमुख साधनं होती. अशा काळात तुलनेत स्वस्तात उपलब्ध होणारा मोठ्या पडद्यावरचा सिनेमा आपल्याकडच्या मनोरंजन क्षेत्रात एक क्रांतीच घेऊन आला. थिएटरमधील अंधारात उजळलेला रूपेरी पडदा आणि त्यावर दिसणारी स्वप्नसदृश दृश्यं सर्वसामान्यांना हरखून टाकणारी होती. रोजच्या व्यथा-वेदना दोन क्षण विसरायला लावणारी होती. त्यामुळं चित्रकर्त्यांना लोक ‘स्वप्नं विकणारे व्यापारी’, अर्थात ‘सपनों के सौदागर’ म्हणायला लागले. मात्र, हे बिरूद सर्वार्थानं शोभलं ते केवळ राज कपूरला!
गरीब असला, तरी गोरा अन् निळ्या डोळ्यांचा नायक; देखणी नायिका; त्यांच्यातला कधी उत्कट, तर कधी आक्रमक, धसमुसळा रोमान्स; भव्य, डोळे विस्फारायला लावणारी स्वप्नदृश्यं अशा ऐवजानं नटलेला सिनेमा म्हणजे शब्दश: स्वप्नं विकणंच तर होतं! राज कपूरला ती कला बरोबर साध्य झाली होती. पडद्यावर काय शोभून दिसतं किंवा काय दाखवायचं असतं याचं नेमकं भान त्याला होतं. पैसे त्याच्याकडं सुरुवातीपासूनच होते. असं असलं तरी ऐदीपणा न करता त्यानं कष्टानं ते ऐश्वर्य वाढवलं. चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. हा स्टुडिओ म्हणजे त्या काळातली एक स्वप्ननगरीच होती. सिनेमाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तिथं उपलब्ध होत्या. राज कपूरनं या साधनसामग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि एकेका सिमेमाच्या रूपानं एकेक स्वप्नमहाल उभा केला. त्या काळातलं त्या स्टुडिओतलं वातावरण भारलेलं असायचं. कल्पना करा… एकीकडं ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासोबत पटकथेवर चर्चा रंगली आहे, दुसरीकडं म्युझिक रूममध्ये शंकर-जयकिशन, शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी आणि खुद्द राज कपूर नव्या गाण्याच्या सिच्युएशनबद्दल, चालीबद्दल चर्चा करताहेत, तिसरीकडं अतिशय भव्य-दिव्य अशा सेट्सची निर्मिती होत आहे…. काय माहौल असेल तो! या स्टुडिओतून असे अनेक चित्रपट तयार झाले. तेव्हा तयार होणारे हे चित्रपट तत्कालीन तंत्रानुसार, कृष्णधवल असले, तरी त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सप्तरंगी स्वप्नं पेरली. हे सिनेमे येऊन आज जवळपास ७० ते ८० वर्षांचा काळ लोटला, तरी पिढ्यांमागून पिढ्या त्यांची लोकप्रियता अबाधित आहे. अतिशय ‘पॅशन’ने, आंतरिक ऊर्मीने या कलाकृती त्या लोकांनी तयार केल्या असणार म्हणूनच त्या काळावर मात करून आजही तेवढ्याच ताज्यातवान्या आणि उत्फुल्ल वाटतात. राज कपूरचं हे श्रेय सहज पुसता येण्यासारखं नाही.
राज कपूरचा जन्म १४ डिसेंबर १९२४ चा. पेशावरजवळ किस्सा ख्वानी बाजार या भागात कपूर मंडळींची खानदानी हवेली होती. याच हवेलीत राजचा जन्म झाला. (दिलीपरकुमारचाही जन्म पेशावरचाच. आता हा भाग पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात येतो.) ‘धाई घर खत्री’ या जातीची किंवा समुदायाचा भाग असलेली ही मंडळी पंजाबी हिंदू. यांचं मूळ गाव तेव्हाच्या पंजाबमधील लायलपूर (आताचं फैसलाबाद) जिल्ह्यातील समुंद्री. पृथ्वीराज कपूर व रामशरणी देवी (मेहरा) या दाम्पत्याला एकूण सहा अपत्ये झाली. त्यातील राज हा सर्वांत थोरला. त्याचं जन्मनाव सृष्टीनाथ कपूर असं होतं, तर पूर्ण नाव रणबीर राज कपूर असं होतं. राजला शम्मी व शशी हे दोन धाकटे भाऊ, तर ऊर्मिलादेवी या नावाची एक बहीण होती. इतर दोन भावंडं जन्मानंतर लगेचच दगावली, पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे भाऊ त्रिलोक कपूर हेही अभिनेते होते. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर हे पृथ्वीराज यांचे चुलतभाऊ. बोनी, अनिल व संजय कपूर ही सुरिंदर कपूर यांची अपत्ये. पृथ्वीराज यांना थिएटरचं वेड होतं. त्यापायी मुंबईला यायचं म्हणून त्यांनी १९३० च्या दशकातच गाव सोडलं. पृथ्वीराज मुंबईला येऊन स्थिसस्थावर होईपर्यंत राजचं शिक्षण वेगवेगळ्या शहरांत (डेहराडून, कलकत्ता आणि मग मुंबई) झालं.
राज कपूरनं वयाच्या ११ व्या वर्षी इन्किलाब नावाच्या हिंदी चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर प्रभात कंपनीच्या चित्रपटात त्याला नारदाचीही भूमिका करायला मिळाली होती. त्याबाबत अशी दंतकथा सांगितली जाते, की या कामाचा मेहनताना म्हणून ‘प्रभात’ने राज कपूरला तब्बल पाच हजार रुपये दिले होते. ही बाब पृथ्वीराज कपूर यांना समजल्यावर त्यांनी प्रभात कंपनीला ताबडतोब हे पैसे परत घ्यायला लावले आणि इतर कलाकारांना जेवढे मानधन दिले जाते, तेवढेच राजला द्या, असे सांगितले. मात्र, कंपनीने हे मानधन परत घेतले नाही. मग राजने ही रक्कम सत्कारणी लावत चेंबूरमध्ये जागा घेतली आणि नंतर तिथे स्टुडिओ उभारला. (अर्थात हा ऐकीव किस्सा आहे. यात कमी-अधिक होऊ शकतं.) राज कपूरला पहिला मोठा ब्रेक मिळाला तो १९४७ च्या ‘नीलकमल’ या चित्रपदाद्वारे. किदार शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात राजच्या नायिका होत्या बेगम पारा आणि मधुबाला. या चित्रपटाला थोडे फार यश मिळाले, मात्र त्याच वर्षी आलेले ‘जेलयात्रा’, ‘दिल की रानी’ आणि ‘चित्तोड विजय’ हे चित्रपट मात्र साफ पडले. (त्यातूनच राज कपूरला कसे सिनेमे काढू नयेत, याचं प्रशिक्षण आपोआप मिळालं.) पुढच्याच वर्षी, म्हणजे १९४८ मध्ये राजने ‘आर. के. फिल्म्स’ ही स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. ‘आग’ हा या बॅनरचा पहिला चित्रपट. राज कपूरचं दिग्दर्शन असलेलाही हा पहिलाच चित्रपट. यात नर्गीस, कामिनी कौशल आणि प्रेमनाथ होते. या सिनेमाला व्यावहारिक यश मोठं मिळालं नसलं, तरी समीक्षकांनी राजच्या या कलाकृतीचं कौतुकच केलं.
सन १९४९ हे वर्ष राजच्या कारकिर्दीला मोठं वळण देणारं यशस्वी वर्षं ठरलं. या वर्षी आला मेहबूब खान दिग्दर्शित ‘अंदाज’ हा चित्रपट. यात राजसोबत दिलीपकुमार आणि नर्गीस होते. (या तिघांचा एकत्र असा हा पहिला व शेवटचा सिनेमा ठरला.) प्रेमाचा त्रिकोण दाखविणारा, सुंदर गाणी आणि देखणे कलाकार असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला, यात नवल नव्हतं. पाठोपाठ आला ‘आर. के. फिल्म्स’चा ‘बरसात’. हा चित्रपटानं ‘अंदाज’चेही सर्व रेकॉर्ड तोडले आणि तो सुपरडुपर हिट ठरला. त्यापूर्वी अशोककुमारचा ‘किस्मत’ हा चित्रपट सार्वकालिक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. मात्र, ‘बरसात’ने तेही रेकॉर्ड तोडलं. शंकर-जयकिशनचं संगीत आणि कोवळ्या मुकेश, मन्ना डे व लताच्या आवाजातील गाणी भारतातील घराघरांत पोचली आणि तुफान लोकप्रिय ठरली. (ही गाणी आजही लोकप्रिय आहेत, यात शंका नसावी.) या दोन चित्रपटांच्या यशानं राजला दिलीपकुमार आणि देव आनंदच्या जोडीनं ‘मेगा स्टार’ बनवलं. मग राजनं १९५१ मध्ये ‘आवारा’ हा चित्रपट निर्माण केला आणि अर्थात दिग्दर्शितही केला. यात राजसोबत पृथ्वीराज कपूर आणि नर्गीस प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटानं तर इतिहास घङवला, केवळ भारतातच नव्हे, तर चीन, अफगाणिस्तान, तुर्कस्थान आणि सोविएत युनियन या देशांमध्येही तो धो धो चालला. विशेषत: रशियात राजची लोकप्रियता गगनाला भिडली. ‘मेरा जूता है जापानी…’ गाणं तर जगभरातील चित्ररसिकांच्या मुखातून ऐकू येऊ लागलं. ‘आवारा’त राज कपूरनं त्याचा नायक राजू थेट चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल ठेवणारा असा उभा केला होता. गरिबी असली तरी काहीएक मूल्यं जपणारी माणसं आणि श्रीमंतीमुळं माणुसकी विसरलेली, पैशाला महत्त्व देणारी खल प्रवृत्तीची माणसं असा हा पारंपरिक संघर्ष राजनं उभा केला. या संघर्षाला वैश्विक अपील होतं. या सिनेमामुळं राज कपूर हे नाव अल्पावधीत जगभरातील रसिकांना माहिती झालं. हीच जादू १९५५ मध्ये आलेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटानं करून दाखवली. या सिनेमानं ‘आवारा’चे विक्रम मोडले. ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ म्हणत एका छत्रीत भिजत जवळ येणारे राज आणि नर्गीस हे तत्कालीन चित्रपटसृष्टीतील रोमान्सचं ‘आयकॉनिक’ दृश्य ठरलं. ‘आवारा’ आणि ‘श्री ४२०’ या दोन्ही सिनेमांवर तत्कालीन नेहरू प्रणीत समाजवादी व्यवस्थेचा पगडा स्पष्ट होता. देश उभारणीच्या त्या स्वप्नाळू काळात राजचे हे दोन्ही सिनेमे म्हणजे जणू त्या स्वप्नाळू प्रवासाचाच मार्ग योग्य असल्याच्या विश्वासावर शिक्कामोर्तबच होतं. प्रेक्षकांनी या दोन्ही सिनेमांना जबरदस्त उचलून धरून त्यातील ‘सोशल’ संदेशाला जणू ‘राज’मान्यताच दिली होती!
राज कपूर या काळात स्वत:च्या बॅनरव्यतिरिक्त अन्य बॅनरच्या सिनेमांतून नायकाच्या भूमिका करत होता. नर्गीससोबत त्याने जे १७-१८ सिनेमे केले त्यात केवळ सहा त्याच्या ‘आर. के. फिल्म्स’चे होते. बाकी इतर बॅनरचेच होते. त्यात १९५२ मध्ये ‘अनहोनी’ आणि ‘बेवफा’ हे दोन चित्रपट होते. नंतर १९५६ मध्ये ‘रोमन हॉलिडे’वरून बेतलेला ‘चोरी चोरी’ हा या जोडीचा अखेरचा चित्रपट ठरला. (त्यानंतर त्याच वर्षी आलेलल्या ‘जागते रहो’मध्ये नर्गीसची पाहुणी कलाकार म्हणून छोटी भूमिका होती. पहाटे दारी आलेल्या राज कपूरला ती पाणी देते, असं ते दृश्य होतं.) राज कपूर आणि नर्गीस यांच्यात पडद्यावर जसा रोमान्स रंगला, तसाच तो पडद्याबाहेरही रंगत होता. मात्र, राज विवाहित होता आणि नर्गीससाठी पत्नी कृष्णा आणि मुलांना सोडण्याचा त्याचा कोणताही इरादा नव्हता. मग नर्गीसनंच हे संबंध तोडले. (आजच्या भाषेत ‘ब्रेक-अप’ केलं…) पुढं ‘मदर इंडिया’च्या चित्रिकरणादरम्यान तिला आगीतून वाचविणाऱ्या सुनील दत्तच्या प्रेमात ती पडली आण त्याच्याशीच विवाहबद्ध झाली.
मधल्या काळात राजनं दो उस्ताद, अनाडी आणि छलिया यासारख्या बाहेरच्या बॅनरच्या चित्रपटांत नायक म्हणून भूमिका केल्या. नंतर १९६० मध्ये त्यानं त्याच्या ‘आर. के. फिल्म्स’द्वारे ‘जिस देश में गंगा बहती है’ हा भव्य चित्रपट निर्माण केला. यात त्यानं भूमिका केली असली, तरी दिग्दर्शन त्याचे नेहमीचे छायालेखक राधू कर्मकार यांच्याकडं सोपवलं होतं. त्यानंतर राजनं मोठा ब्रेक घेतला. तो ‘संगम’ या भव्य चित्रपटाच्या तयारीला लागला. अखेर चार वर्षांनी म्हणजे १९६४ मध्ये ‘संगम’ प्रदर्शित झाला. ‘संगम’ हा सर्वार्थानं भव्य चित्रपट होता. टेक्निकलरमध्ये चित्रित केलेला हा राजचा पहिलाच चित्रपट. लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंडमध्ये चित्रित झालेलाही हा पहिलाच हिंदी चित्रपट. शिवाय तब्बल चार तासांची लांबी आणि प्रथमच दोन मध्यंतर असणाराही पहिलाच चित्रपट. प्रेमाचा त्रिकोण दाखवणारी कथा. राजेंद्रकुमार दुसरा नायक, तर नायिका होती नृत्यनिपुण वैजयंतीमाला. अनेक विक्रमांची सोबत घेऊन आलेला ‘संगम’ सुपरडुपर हिट ठरला, यात आश्चर्य नव्हतं. ‘संगम’ची सर्व गाणीही अतिशय गाजली. शंकर-जयकिशन त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा राज ४० वर्षांचा होता. पारंपरिक नायक म्हणून यशस्वी ठरलेला त्याचा हा शेवटचाच चित्रपट.
‘संगम’नंतर राज कपूरने त्याहून मोठं व भव्य स्वप्न पाहिलं ते ‘मेरा नाम जोकर’चं… हाही ‘संगम’सारखाच चार तासांच्या दीर्घ लांबीचा, दोन मध्यंतर असलेला, उत्तम गाणी, राज कपूरव्यतिरिक्त धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, सिमी गरेवाल, पद्मिनी, मनोजकुमार अशा अनेक स्टार कलाकारांचा भरणा असलेला असा भव्य-दिव्य सिनेमा होता. तब्बल सहा वर्षं या सिनेमाची निर्मिती सुरू होती. आधीच भरपूर प्रसिद्धीही झाली होती. यात सर्कसचा भाग मोठा असल्यानं सिनेमात रशियन कलाकारही होते. एक नायिकाही रशियन होती. सिनेमाचं काही चित्रीकरण रशियात झालं होतं. हा सिनेमा १८ डिसेंबर १९७० रोजी प्रदर्शित झाला. मात्र, कदाचित प्रचंड अपेक्षांच्या ओझ्यामुळं असेल, हा सिनेमा साफ पडला. अगदी फ्लॉप ठरला. सिनेमाची एकूण प्रचंड लांबी आणि राज कपूरला जे काही दाखवायचं होतं ते, या दोन्ही गोष्टी तेव्हा प्रेक्षकांच्या पचनी पडल्या नाहीत. या सिनेमावर राज कपूरनं भरपूर खर्च केला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानं राज कपूर आर्थिक संकटात सापडला. विशेष म्हणजे कालांतराने हा चित्रपट (जरा लांबी कमी करून) पुन्हा प्रदर्शित झाला, तेव्हा तो चांगला चालला. आता तर या चित्रपटाची ‘क्लासिक’ सिनेमांमध्ये गणना केली जाते. खुद्द राज कपूरचाही हा आवडता सिनेमा होता. तो ढोबळमानानं त्याच्याच आयुष्यावर आधारित होता, असंही म्हटलं जातं. या सिनेमात बराच खोल, आध्यात्मिक अर्थ दडला होता, असं राजचं म्हणणं होतं. पुढं समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. ‘मिसअंडरस्टूड मास्टरपीस’ असं त्या चित्रपटाचं वर्णन केलं गेलं.
मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला जे दारूण अपयश आलं, त्यामुळं राज कपूर अतिशय निराश झाला. त्यानंतर त्यानं स्वत: पडद्यावर कधीही मुख्य नायकाची भूमिका केली नाही. एकूणच अभिनय कमी केला. ‘कल, आज और कल’ किंवा ‘धरम करम’ यासारख्या थोरल्या पुत्रानं - रणधीर कपूरनं – दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत त्यानं चरित्र भूमिका मात्र साकारल्या.
राज कपूरनं त्याचं सगळं लक्ष आता दिग्दर्शनाकडं केंद्रित केलं. त्यानं आता धाकटा मुलगा ऋषी कपूरला नायक म्हणून ‘लाँच’ करण्यासाठी ‘बॉबी’ या आगळ्यावेगळ्या धाटणीच्या प्रेमकथेचा घाट घातला. या सिनेमात संपूर्ण नवा, काळानुसार बदललेला राज कपूर दिसला. ऋषी कपूरसमोर कोवळी डिंपल कपाडिया नावाची १६ वर्षांची मुलगी नायिका होती. यात राज आणि नर्गीसची पहिल्यांदा भेट झाली, तेव्हाचा प्रसंग (नायिकेनं पिठानं भरलेला हात नकळत केसांना लावणे) राजनं ऋषी व डिंपलवर जसाच्या तसा चित्रित केला. मधल्या काळात १९७१ मध्ये शंकर-जयकिशन जोडीतला जयकिशन हे जग सोडून गेला होता. मग राज कपूरने ‘बॉबी’साठी नवे संगीतकार निवडले – लक्ष्मीकांत-प्यारेलाल. त्या दोघींनीही ‘बॉबी’च्या संगीतात धूम उडवून दिली. चित्रपट जबरदस्त हिट झाला. गोव्याच्या पार्श्वभूमीवर ऋषी आणि डिंपलची कोवळी प्रेमकथा प्रेक्षकांना भावली. ‘बॉबी’च्या जोरदार यशामुळं ‘मेरा नाम जोकर’चं अपयश धुतलं गेलं. ‘आर. के. फिल्म्स’चा बॅनर पुन्हा जोरदार झळकू लागला. राज कपूरची ‘शोमनशिप’ पुन्हा एकदा सिद्ध झाली.
यानंतर राज कपूरची दिग्दर्शनाची जणू दुसरी इनिंग सुरू झाली. पुढील एक दशकभरात राज कपूरनं ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ (१९७८), ‘प्रेमरोग’ (१९८२) आणि ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५ हे अतिशय वेगळे, दर्जेदार आणि नायिकाप्रधान असे तीन चित्रपट दिले. यात त्या त्या काळातील सामाजिक समस्यांचाही ऊहापोह करण्यात आला होता. या तिन्ही चित्रपटांत त्यानं अनुक्रमे झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे आणि मंदाकिनी या तीन नायिकांना खास त्याच्या पद्धतीनं पेश केलं. पद्मिनी कोल्हापुरेचा अपवाद वगळता, अन्य दोन नायिकांच्या शरीर प्रदर्शनाची जोरदार चर्चा त्या वेळी झाली. त्यातही ‘राम तेरी…’मधून रूपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या मंदाकिनीचं सिनेमातलं ओलेतं देहप्रदर्शन खळबळजनक होतं. राज कपूरची ही तर ‘शो-वुमन’शिप आहे, अशी टीकाही या काळात झाली. मात्र, राज कपूरनं या टीकेला कधी उत्तर दिलं नाही. तो त्याचं काम करत राहिला.
‘राम तेरी गंगा मैली’नंतर राज कपूरने ‘हीना’ हा पुढील चित्रपट तयार करायला घेतला. ‘राम तेरी गंगा मैली’च्या वेळी त्याने संगीताची धुरा रवींद्र जैन या गुणी संगीतकाराकडं सोपवली होती. ‘राम तेरी गंगा मैली’ची सर्व गाणी जोरदार गाजली होती. पुढच्या ‘हीना’ या चित्रपटाचं संगीतही रवींद्र जैन यांच्याकडंच सोपवण्यात आलं. यात नायक होता ऋषी कपूर आणि नायिका होती पाकिस्तानमधील झेबा बख्तियार ही अभिनेत्री. या चित्रपटाचं चित्रीकरण अपूर्ण असतानाच राज कपूरचं निधन झालं. पुढं त्याचा थोरला मुलगा रणधीर कपूरनं हा चित्रपट पूर्ण केला आणि तो १९९१ मध्ये प्रदर्शित झाला.
राज कपूरला चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीत पार पडला. या सोहळ्याच्या वेळीच राज कपूर कोसळला. त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरामन व्यासपीठावरून खाली आले. राजने जेमतेम पुरस्कार स्वीकारला. मात्र, त्याची प्रकृती खूपच ढासळली. त्यामुळं त्याला त्या सोहळ्यातूनच थेट दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तिथं तो साधारण एक महिना मृत्यूशी झुंज देत होता. अखेर दोन जून १९८८ रोजी त्याची प्राणज्योत मावळली. राजला अनेक वर्षं दम्याचा त्रास होता. याशिवाय सर्व कपूर मंडळींप्रमाणे राजला मद्यपानाचा प्रचंड षौक होता. या दोन्ही गोष्टींमुळं त्याला तुलनेनं फार लवकर मृत्यू आला.
पुण्याजवळ लोणी काळभोर गावापाशी राजबाग ही राज कपूरची मोठी जागा होती. तिथंच त्याची ‘समाधी’ आणि स्मृती संग्रहालय उभारण्यात आलं आहे. ही जागा आता पुण्यातील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या मालकीची आहे. राज कपूरचा या जागेवर विशेष लोभ होता. त्याच्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरणही राजबागेत झालं होतें. इथंच असलेल्या राजच्या बंगल्यात ‘बॉबी’ चित्रपटातील ‘हम तुम एक कमरें में बंद हो…’ या प्रसिद्ध गाण्याचं चित्रीकरण झालं होतं.
मुंबईत चेंबूरला असलेला आर. के. स्टुडिओ ही राजच्या कार्यकर्तृत्वाची सर्वांत मोठी खूण. त्याचं खरं स्मारक तेच… मात्र, अलीकडं कपूर कुटुंबीयांनी ही मालमत्तादेखील विक्रीस काढल्याचं वृत्त आहे. अर्थात स्टुडिओ विकला गेला, तरी तिथं राज कपूरच्या स्मृती जागविल्या जातील, अशी आशा आहे. अर्थात, अशा भौतिक वास्तूंत किंवा तत्सम वारशात मावणारा हा कलाकार नव्हताच. तो त्याच्या अनेक लोकप्रिय, उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात कायमस्वरूपी वस्तीला आला आहे, हे खरं. प्रत्येक माणसात गुण-दोष असतातच. राजही काही सद्गुणांनी परिपूर्ण होता, असं नव्हे. तसा दावा खुद्द त्यानंही केला नसता. मात्र, तो जे जगला ते मनस्वीपणे. कलेवर निरतिशय प्रेम करीत!
अगदी अलीकडं ‘हीना’ चित्रपटाच्या आधी ‘चिठ्ठीए’ हे लताचं गाणं तयार होत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. त्यात राज कपूर त्या स्टुडिओत बसून त्या गाण्यातल्या प्रत्येक तानेला, लयीला, सुरांना दाद देताना दिसतो. हा अखेरच्या काळातला राज कपूर होता. संपूर्ण आयुष्य तो ज्या पॅशननं जगला, तीच पॅशन त्या छोट्याशा व्हिडिओतही दिसत होती.
राज कपूर जन्मला त्याला येत्या १४ डिसेंबरला १०० वर्षं पूर्ण होतील. या मोठ्या कलाकाराला त्याच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रेमपूर्वक अभिवादन!
---
(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२४)
---
देव आनंदवरील ‘ग्राहकहित’मधील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
----
खूप सुंदर लेख 👌👌👌👏👍
ReplyDeleteमनापासून धन्यवाद, वीणाताई!
Delete