ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड...
-------------------------------
पुणे व मुंबई, ७ सप्टेंबर २०२४
गेल्या वर्षी लंडनची मोठी सहल झाल्यानंतर माझा उत्साह भलताच वाढला. गेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या भरात मनात अचानक विचार आला, की पुढील वर्षी आपण पन्नासाव्या वर्षात पदार्पण करतोय, तर त्या दिवशी आपण पृथ्वीवरच्या सर्वांत उंच इमारतीवर - अर्थात ‘बुर्ज खलिफा’वर - असायला हवं. मनात काय, काय वाट्टेल ते येईल हो! पण ते अंमलात येणं तितकंच कठीण. पण आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करायची असल्यास ती होतेच, असा माझा अनुभव आहे. माझ्या सततच्या घोकण्याला वैतागून म्हणा, किंवा मला वाढदिवसाची गिफ्ट द्यायची म्हणून म्हणा, पण अखेर धनश्रीही तयार झाली. ट्रिपला आमच्यासोबत कुणी तरी आलं तर आम्हाला बरं वाटतं. म्हणून नेहमीच्या भिडूंना विचारून पाहिलं. पण कुणाची वेळ जमेना, तर कुणाचा मेळ जमेना. आम्हाला जायचं तर होतंच. अशा वेळी एक सुरक्षित मार्ग म्हणजे ‘कंडक्टेड टूर’ घेणे. आम्ही तिघंही जाणार होतो, हे नक्की होतं. मग जुलैत ‘गिरिकंद’च्या कार्यालयात जाऊन टूरला जायचं, एवढं निश्चित केलं. चार रात्री आणि पाच दिवस अशी टूर होती. त्यात तीन दिवस दुबई आणि एक दिवस अबूधाबी असे मुक्काम होते. टूरची कार्यक्रमपत्रिका चांगली होती. फक्त त्यात ‘म्युझियम ऑफ फ्युचर’चा समावेश नव्हता. अशा कंडटेक्ड टूरमध्ये संग्रहालयांच्या भेटी शक्यतो कमी असतात. याचं कारण त्यात बराच वेळ जातो आणि काहींना ती आवड असेलच असं नाही. हे कारण पटण्यासारखं असलं, तरी मला मात्र थोडं वाईटच वाटलं. अर्थात मुख्य उद्देश ‘बुर्ज खलिफा’वर जायचं हाच असल्यानं बाकी इतर एक-दोन गोष्टी कमी-अधिक चालणार होत्या. अबूधाबीत पॅरिसच्या लुव्र म्युझियमची शाखा सुरू झाली आहे, हे मला माहिती होतं. मात्र, अजून कुठल्याच टूरमध्ये त्या म्युझियमच्या भेटीचा समावेश नव्हता. (मी तिकडं गेल्यावर तिथल्या लोकल गाइडनं मला बसमधून ते म्युझियम दाखवलं. एका कराराद्वारे हे म्युझियम २०३७ पर्यंत अबूधाबीत राहणार आहे, असं कळलं. तोवर नक्कीच तिथं किंवा पॅरिसला जाऊन पाहता येईल.) सहलीची तारीख आम्हाला १४ नोव्हेंबरच्या आसपास हवी होती. एकीकडं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांकडंही माझं लक्ष होतं. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊन जातील, मग दिवाळीही होईल आणि नोव्हेंबरच्या मध्यात मला सहज जाता येईल, असा अंदाज होता. मात्र, तो चुकला. आधी आम्ही १२ नोव्हेंबरची तारीख बुक केली होती. मग नीलच्या संभाव्य सेमिस्टर परीक्षांचा अंदाज घेऊन ती १९ नोव्हेंबर केली. मात्र, ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या नेमक्या त्याच तारखांमध्ये आल्या. आमची टूर १९ ते २३ नोव्हेंबर होती आणि आपल्याकडं २० ला मतदान आणि २३ ला मतमोजणी होणार, असं कळलं. मला आता त्या काळात जाणं शक्यच नव्हतं. मग पुन्हा ‘गिरिकंद’मध्ये जाऊन, तारखा बदलून घेतल्या आणि त्यासाठी काही हजार रुपये जादाही मोजले. असो. आता ७ डिसेंबरला आम्ही दुबईला जाणार आणि १२ डिसेंबरला पुन्हा परत येणार, हे निश्चित झालं होतं.
यूएईचा व्हिसा आम्हाला टूर कंपनीकडूनच ऑनलाइन मिळाला. दोन डिसेंबरला आमची तिकिटं, व्हिसा वगैरे सगळं हाती आलं. सलग दुसऱ्या वर्षी आम्ही परदेशी टूरला जायला निघालो होतो. त्यामुळं तयारीचा आत्मविश्वास बराच वाढला होता. तशी ही टूर छोटी होती. शिवाय मुंबई विमानतळ ते परत मुंबई विमानतळ अशी सर्व टूर नियोजनबद्ध होती. सोबत टूर मॅनेजर असणार होता. त्यामुळं अगदी निवांत होतो. ट्रिपची तिकिटं हातात आल्यावर कळलं, की आम्हाला शनिवारी संध्याकाळी सहाचं विमान पकडायचं आहे. आधी ते शनिवारी पहाटे वगैरे असणार असं कळलं होतं. संध्याकाळचं फ्लाइट असल्यानं आता शनिवारी सकाळी निवांत निघालो तरी चालणार होतं. त्यानुसार आमच्या नेहमीच्या कॅबवाल्याला सांगून ठेवलं. शनिवारी सकाळी पावणेअकराला निघालो. आम्हाला फूड मॉलला थांबून अगदी आरामात, तीनपर्यंत विमानतळावर पोचलो, तरी चालणार होतं. मात्र, कॅबवाल्याला तिथून दुपारी दोन वाजता उतरणारं कस्टमर घ्यायचं होतं, त्यामुळं तो जरा गडबड करत होता. अर्थात, आम्ही शांतपणे खाऊन-पिऊन मग निघालो. अडीचला छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ ला पोचलो. तिथं आमचा टूर मॅनेजर सागर तिखिले भेटला. आम्हाला त्यानं तिथंच कोरड्या खाऊचे तीन (कॉम्प्लिमेंटरी) पुडे दिले. आम्हाला आत जाऊन चेक-इन, इमिग्रेशन वगैरे करायला सांगितलं. आमची जाताना व येतानाची फ्लाइट ‘अकासा एअर’ची होती. या विमान कंपनीद्वारे मी प्रथमच प्रवास करत होतो. मुंबई विमानतळावर आता सवयीनं चेक-इन, सिक्युरिटी, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार करून आम्ही बोर्डिंगच्या आधी तासभर त्या ७२ नंबरच्या गेटवर जमलो. त्याआधी नीलच्या हौसेपोटी पाचशे रुपये उडवून सँडविच व मसाला चाय यांचा आस्वाद घेतला. मुंबई विमानतळ अतिशय सुंदर आहे. मात्र, तिथं काहीही विकत घ्यायचं नाही. आमचं बोर्डिंग वेळेत सुरू झालं. फ्लाइट वेळेत निघाली. हे एअरक्राफ्ट बोइंगचं ‘७३७ मॅक्स’ हे होतं. हे सिंगल आइल असलेलं लेटेस्ट मॉडेल आहे. ते खरं तर देशांतर्गत प्रवासात वापरतात. यात एका बाजूला तीन आणि एका बाजूला तीन अशा सीट असतात. एकूण क्षमता १८० प्रवाशांची असते. ‘एअरबस’च्या निओ-ए-३२० ला स्पर्धा म्हणून 'बोइंग'नं हे एअरक्राफ्ट आणलं आहे. मध्यंतरी याच्या सुरक्षिततेचे काही मुद्दे चर्चेत आले होते. आता मात्र हे एअरक्राफ्ट सुरक्षित घोषित करण्यात आलं आहे. यात समोरच्या सीटवर डिस्प्ले नसतो. त्यामुळं माझी जरा निराशाच झाली. मला तो फ्लाइट पाथ बघायला आवडतो. अर्थात हा प्रवास केवळ दोन तास ५५ मिनिटांचा होता. त्यामुळं अगदी देशांतर्गत उड्डाणांच्या वेळी वापरतात तसंच हे लहान एअरक्राफ्ट होतं. मुंबई विमानतळावर सूर्य अस्ताला निघाला होता आणि आमचं विमान हळूहळू धावपट्टीकडं निघालं होतं. बरोबर सव्वासहा वाजता विमानानं उड्डाण केलं आणि ते वेगानं पश्चिम दिशेला उंच उंच निघालं. मुंबई अवघ्या मिनिटभरात संपली आणि अरबी समुद्र सुरू झाला. मी खिडकीतून खाली पाहत होतो. अंधार पडल्यावर समुद्रावर असंख्य दिवे लुकलुकताना दिसले. एवढ्या प्रमाणावर जहाजं किंवा होड्या किंवा नौका किंवा मचवे किंवा तराफे किंवा गलबतं असतील, असं वाटत नाही. शिवाय हे दिवे स्थिर आणि एका ओळीत होते. ते कसले असावेत, हे मला कळलं नाही. (जाणकारांनी जरूर सांगावं.)
बरोबर तीन तासांनी म्हणजे सव्वानऊ वाजता आमचं विमान अबूधाबीच्या शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. त्याआधी विमानात ते चीजी बर्गर खाणं झालं. अबूधाबी येण्याआधी बरीच झगमगती शहरं, बंदरं दिसली. ती बहुतेक ओमानमधली असावीत. पण डिजिटल डिस्प्ले नसल्यानं ती नक्की कुठली, ते काही कळलं नाही. यूएईची प्रमाणवेळ आपल्यापेक्षा दीड तासांनी मागे आहे. त्यामुळं तिथं पावणेआठ वाजले होते. सिक्युरिटी, इमिग्रेशन वगैरे पार करून बाहेर यायला आणखी एक तास गेला. इथं आमचा सगळा ग्रुप पहिल्यांदा एकत्र आला. एकूण २२ जण होते. त्यात पुण्यातले १८, तर नाशिक व नगरचे प्रत्येकी दोन जण होते. इथं आमची बस आली. हीच बस पुन्हा विमानतळावर सोडायला येईपर्यंत पाच दिवस कायम आमच्यासोबत होती. फारूकभाई नावाचे लोकल गाइडही सोबत होते. आमचा पहिला मुक्काम दुबईत असल्यानं ही एसी कोच बस लगेच दुबईकडं धावायला लागली. यूएईत अमेरिकेप्रमाणे उजवीकडून वाहने चालवितात. आपल्या अगदी उलट. मी आतापर्यंत तीन देश पाहिले असले तरी त्या सर्व देशांत आपल्यासारखंच डाव्या हाताने वाहन चालवीत होते. यूएईत मात्र प्रथमच लेफ्ट हँडला ड्रायव्हर बसलेला पाहिला. यूएईतील अबूधाबी ते दुबई हा सर्वांत मोठा हायवे आहे. या आठ पदरी हायवेलाही शेख झायेद यांचंच नाव होतं. शेख झायेद हे आत्ताच्या अमिरांचे पिताश्री. त्यांनी यूएईची उभारणी केली. त्यामुळं आपल्याकडं जसं सर्वत्र महात्मा गांधी किंवा नेहरूंचं नाव असतं (किंवा असायचं) त्याप्रमाणे इकडे सर्वत्र शेख झायेद यांचंच नाव दिलं आहे. तर या आठपदरी हायवेनं जातानाच यूएईची प्रगती डोळ्यांत भरली. जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या अनेक नामवंत मोटारी त्या हायवेनं सुसाट धावत होत्या. संपूर्ण हायवेवर मधोमध हायमास्ट दिवे होते. अधूनमधून दिसणारे छोट्या मशिदींचे मिनार आपण मुस्लिम राष्ट्रात असल्याची जाणीव करून देत होते. सर्वत्र अरेबिक आणि खाली इंग्लिशमध्ये पाट्या लिहिलेल्या होत्या. आमची बस जोरात, पण एका ठरावीक वेगाने मार्गक्रमणा करत होती. दुबई साधारण ३० किलोमीटर राहिलं असताना आम्ही जेवायला थांबलो. ‘इब्न बतुता’ नावाच्या (इब्न बतुता हा चौदाव्या शतकातील एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रवासी होता.) एका मोठ्या हॉटेलच्या कॉम्प्लेक्ससमोर आमची बस थांबली. इथं समोर असलेल्या महाकाय ‘इब्न बतुता गेट’नं आमचं लक्ष वेधून घेतलं. आतमध्ये ‘पेशवा’ नावाचं मराठमोळं रेस्टॉरंट होतं. इथंच आम्ही जेवणार होतो. सचिन जोशी व त्यांच्या पत्नी यांचं हे हॉटेल आहे. बँकॉक, पटाया आणि दुबईत आणखी एक अशा त्यांच्या चार शाखा आहेत, अशी माहिती नंतर मिळाली. आमच्या फर्ग्युसन रोडवरही एक पेशवा नावाचं हॉटेल आहे. मात्र, त्यांचा व यांचा काही संबंध नाही, हेही समजलं. इथं गरमागरम ‘मराठमोळं’ इ. जेवण जेवून आम्ही तृप्त झालो. भारतीय वेळेनुसार आता जवळपास रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्यामुळं आम्हाला भुका लागल्याच होत्या. जेवल्यावर बरं वाटलं. पुन्हा बसमध्ये बसलो आणि दुबईत पोचलो. दुबई जवळ येऊ लागलं, तसं रस्त्यावर काहीसं ट्रॅफिक जॅमही लागलं. दुबईतील उत्तुंग इमारतींचं रात्रीचं ते प्रथम दर्शन केवळ स्तिमित करणारं होतं. आम्ही ‘डाउनटाउन’ दुबईतूनच पुढं निघालो होतो. त्यामुळं ‘बुर्ज खलिफा’चंही दर्शन घडलंच. आमचं हॉटेल ‘बर दुबई’ या जुन्या दुबईतील भागात होतं. हॉटेल चांगलं होतं. खोल्या ताब्यात घेतल्या आणि दमल्यामुळं लगेच झोपलो.
दुबई, ८ डिसेंबर २०२४
दुसऱ्या दिवशी आमचा भरगच्च कार्यक्रम सुरू झाला. हॉटेलमध्ये कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होता. तो हाणून नऊला बसमध्ये बसायचं होतं. सुरुवातीला सिटी टूर नामक प्रकार होता. यात ती गाडी गावभर फिरवून हे बघा, ते बघा, इथं फोटो काढा, तिथं फोटो काढा असले प्रकार असतात. ‘कंडक्टेड टूर’ असल्यामुळं ते सहन करावं लागतंच. आमचा गाइड फारूकभाई मात्र चांगला होता. तो अतिशय आत्मीयतेनं सगळी माहिती देत होता. त्यानं या राष्ट्राच्या सुरुवातीच्या काळापासून ते आजच्या प्रगतीपर्यंतचा प्रवास व्यवस्थित सांगितला. सुरुवातीला आम्हाला एका इस्लामिक गॅलरी नावाच्या प्रदर्शनात नेण्यात आलं. तिथला एक उंचापुरा, अरबी माणूस आम्हाला इतिहासाची माहिती सांगता सांगता, हळूच तिथल्या विणलेल्या कारपेटची जाहिरात करू लागला, तसतसं आम्ही हळूच काढता पाय घेतला. तिथून आम्ही ‘बुर्ज अल् अरब’ या हॉटेलपाशी गेलो. शिडाच्या आकाराची इमारत आणि शेजारी क्रूझच्या आकाराचे २८ मजले (त्यातले तीन पाण्याखाली) असलेलं हे हॉटेल १९९९ मध्ये सुरू झालं. हे दुबईतलं पहिलं सात स्टार हॉटेल आणि पहिलं आंतरराष्ट्रीय आकर्षणही! मला तेव्हा या हॉटेलविषयीच्या बातम्या वाचल्याचं आठवत होतं. ते आज प्रत्यक्ष समोर पाहायला मिळालं होतं. तिथं शेजारी बीच होता. तिथंही बरंच काही ‘प्रेक्षणीय’ पाहायला होतं. मात्र, आमचा अगदी फॅमिली टाइप ग्रुप असल्यानं तिकडं बघून न बघितल्यासारखं केलं व सोबत असलेल्या काका-काकूंचे फोटो काढून दिले.
यानंतर आम्ही प्रसिद्ध अशा पाम आयलंडकडं निघालो. इथं मोनोरेल राइड होती. दुबईच्या पाम जुमैराह बीचजवळ इकडचे सर्व राजे व राजघराण्याच्या लोकांचे बंगले व खासगी बीचेस आहेत. त्याशेजारीच पलीकडं हे ‘पाम आयलंड’ (पामच्या झाडाच्या आकाराचं वसवलेलं बेट) आहे. या आयलंडची उभारणी झाली, तेव्हाच्या बातम्याही मला आठवत होत्या. शाहरुख खानला या प्रकल्पाचा ब्रँड अम्बेसेडर केलं होतं, हेही आठवलं. इथं त्याला एक बंगला भेट देण्यात आला आहे. आम्ही त्या मोनोरेलच्या पहिल्या स्टेशनवर बसलो आणि चौथ्या स्टेशनला उतरलो. सुरुवातीला अपार्टमेंट, मग व्हिला आणि शेवटच्या परिघावर पंचतारांकित हॉटेल अशी या बेटाची रचना आहे. मधे समुद्राचं पाणी आहे. त्याखालून जाण्यासाठी बोगदे केले आहेत. शेवटी बहामाज येथील अटलांटिस हॉटेलसारखीच रचना असलेलं, त्याच नावाचं भव्य हॉटेल आहे. इथं ‘हॅपी न्यू इयर’ या शाहरुख खानच्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. शेवटच्या स्टेशनला उतरलो. तिथं बस आलीच होती. मग तिथून त्या समुद्राखालील बोगद्यातून प्रवास करून पुन्हा मुख्य भूमीवर आलो. हे आयलंड आणि तिथले बंगले, व्हिला हे सगळं अतिश्रीमंत प्रकरण आहे. आपण नुसतं बघायचं! जगात पैसा किती प्रकारे आणि कुठं कुठं खर्च केला जाऊ शकतो, याचं हे आदर्श उदाहरण म्हणायला हरकत नाही. अर्थात ही श्रीमंती नजराणा पाहून आमचे डोळे निवले असले, तरी पोटातले कावळे शांत झाले नव्हते. मग तिथून पुन्हा ‘खानाखजाना’ नावाच्या एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेलो. आम्ही येणार हे आमच्या टूर मॅनेजरनं आधीच सांगितलेलं असल्यामुळं तिथं बुफे लावलेलाच असायचा. त्यामुळं त्यात फार वेळ जायचा नाही. इथं जेवण झाल्यावर आम्ही दुबई मॉलकडं, म्हणजेच ‘बुर्ज खलिफा’कडं जायला निघालो. दुबई मॉल प्रचंड मोठा आहे. या मॉलच्या आतूनच ‘बुर्ज खलिफा’वर जाण्यास एंट्री आहे. बसनं आम्हाला मॉलच्या दारात सोडलं. तिथून आम्ही बरंच चालत ‘ऑन द टॉप, बुर्ज खलिफा’ अशा पाट्या लावलेल्या दिशेनं निघालो. आमची तिकिटं आधीच काढली होती. तरीही रांग होतीच. खाण्याचे पदार्थ वर नेता येत नाहीत. त्यामुळं आम्हाला आमच्या सॅक तिथल्या लॉकरमध्ये ठेवाव्या लागल्या. मग पुन्हा कडेकोट सिक्युरिटी चेकमधून रांगेत आलो. बरंच अंतर पार केल्यानंतर, एक-दोन एलेव्हेटरनी वर गेल्यावर, पुन्हा बरंच चालल्यावर मग वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या लिफ्टची रांग आली. तिथंही डावं-उजवं होतंच. काही लोकांना आमच्या आधी पुढं सोडलं जात होतं. ‘वशिल्याचे असणार’ अशा नजरेनं आम्ही त्यांच्याकडं बघत होतो. अखेर अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही त्या लिफ्टसमोर आलो. एकूण तीन लिफ्ट होत्या. या लिफ्ट अतिवेगवान आहेत. केवळ एका मिनिटात त्या १२४ व्या मजल्यावर पोचवतात. त्या लिफ्टच्या दारावर तसा ‘डिजिटल डिस्प्ले’ही दिसतो. आता आम्ही अगदी अधीर झालो होतो. थोड्याच वेळात आमचा नंबर आला आणि आम्ही आठ ते दहा लोक त्या लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्टचं दार बंद झालं आणि सुसाट वेगानं ती लिफ्ट वरच्या मजल्यांकडं निघाली. लिफ्टच्या आत तेवढ्या त्या एका मिनिटातही त्या इमारतीचं काम कसं झालं वगैरे दाखवणारा व्हिडिओ सुरू होता. तो त्या लिफ्टच्या सर्व दारांवर व छतावरही दिसत होता. छतावर आकाशाचं चित्र दिसत होतं आणि आपण वर वर जातोय, असा आभास निर्माण केला जात होता. अर्थात तो आभास नव्हता, तर वस्तुस्थिती होती. आम्ही एका मिनिटात लिफ्टमधून बाहेर आलो आणि त्या मजल्यावर तयार केलेल्या खास प्रेक्षक गॅलरीत पोचलो. समोरचं दृश्य पाहून मी अक्षरश: थक्क झालो... साधारण वर्षभरापूर्वी पाहिलेलं स्वप्न अखेर वाढदिवशी नाही, तर त्यानंतर २२-२३ दिवसांनी का होईना, असं पूर्ण झालं होतं. मी ‘बुर्ज खलिफा’च्या १२४ व्या मजल्यावर होतो... ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड!
(क्रमश:)
--------------
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
------------
झकास वर्णन ...आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत असेच वाटल वाचताना...👌👏👍🌹
ReplyDeleteमनापासून धन्यवाद, वीणाताई!
Delete