17 Dec 2024

दुबई ट्रिप - डिसेंबर २४ - भाग ३

वाळवंटातली ‘स्वप्नभूमी’
-----------------------------


दुबई/अबूधाबी, १० डिसेंबर २४

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करून नऊ वाजता सर्वांनी हॉटेल लॉबीत जमायचं होतं. आज आमचं दुबईतील हॉटेलमधून चेक-आउट होतं. मग सर्व सामान बसमध्ये नेऊन ठेवलं. इथून आज आम्ही अबूधाबीला जाणार होतो. मात्र, त्यापूर्वी दुबईतील ‘गोल्ड सूक’ला (सराफी बाजार) भेट द्यायची होती. मग अर्ध्या तासात बस तिकडं पोचली. तिथं फारूकभाईंनी सगळ्यांना एकत्र जमवून सर्व सूचना दिल्या. सोने खरेदी करायची असेल तर काय काळजी घ्या, पावती घ्या, व्हॅट रिटर्न घ्या, अमुक इतके ग्रॅम सोने न्या, तमुक अंगावर घालून जा वगैरे वगैरे. (बहुतेकांना आता हे माहिती आहे.) आम्हाला तिथं त्यांनी शक्यतो लहान दुकानांतून खरेदी करायचा सल्ला दिला. तिथं आपले कल्याण, जॉयअलुक्कास, मलबार वगैरे मोठमोठे ब्रँड होतेच. ‘पीएनजी’चं दुकान असल्याचं मला माहिती होतं. पण आम्ही हिंडलो, त्या भागात तरी ते दिसलं नाही. आम्ही सर्व जण आधी एका मोठ्या दुकानात शिरलो. तिथं सोन्याचे दर विचारले. साधारण ७० ते ७१ हजार रुपये २२ कॅरेटला, तर ७४ हजार रुपये २४ कॅरेटला असा भाव होता. आपल्याकडच्या आणि तिथल्या भावात निश्चितच चार-पाच ते सात-आठ हजार रुपयांचा फरक होता. शिवाय काही दुकानदार भारतीय चलनांतही पैसे स्वीकारायला तयार होते. आम्हाला सोनं घ्यायचं नव्हतं. त्यामुळं आम्ही मोजकी एक-दोन दुकानं पाहिली आणि त्या गल्लीत असंच भटकायला बाहेर पडलो. तिथं भेट द्यायच्या वस्तू (पिशव्या, पाउच, की-चेन वगैरे) खरेदी केल्या. या बाजारात मधल्या रस्त्यावर वरून छत घातलं होतं. असंच एक मार्केट आम्ही लंडनमध्ये पाहिलं होतं. कडक उन्हाळ्यात या छताचा चांगला उपयोग होत असणार. ते मार्केट आपल्या तुळशीबाग, मंडईसारखंच होतं. मात्र, अतिशय नीटनीटकं व खूपच स्वच्छ होतं. जागोजागी बाक ठेवले होते. दुकानं नुकतीच उघडत होती. बहुतेक दुकानांत भारतीय किंवा पाकिस्तानी कामगार दिसत होते. दुबईत त्यामुळे सर्वत्र हिंदी बोलली जाते किंवा बोलल्याचं त्यांना नीट समजतं. आम्ही काल खजूर घेतले तिथंही मुंबईतील महंमद अली रोडवर राहणारे एक मुस्लिम ज्येष्ठ कामगार होते. आम्ही मराठीत बोलत असल्याचं त्यांना व्यवस्थित समजत होतं. एवढंच नव्हे, तर तेही मराठी बोलू शकत होते. पण ते गमतीनं असं म्हणाले, की मी मुंबईतला आहे हे मुद्दाम सांगत नाही; नाही तर लोक खूप कन्सेशन मागतात. 
आम्ही त्या गल्लीत बरंच फिरलो. तिथं अत्तराची, धूपदाणीची, मसाल्याची आणि केशराचीही दुकानं होती. यातल्या बऱ्याच वस्तू आम्ही घेतल्या होत्या. काही महाग वाटल्या. शेवटी एका दुकानातून बरीच घासाघीस करून अत्तर आणि काही बॅगा वगैरे भेटवस्तू घेतल्या. तो मुलगा केरळी होता. ‘तुम्ही बोहनीचं गिऱ्हाइक आहात,’ असं तो (चुकून) बोलून गेला. मग आम्ही कसले सोडतोय! त्यानं सांगितलेल्या किमतीपेक्षा २०-२५ दिरहॅम कमी करूनच आम्ही त्या वस्तू तिथून घेतल्या. आम्हाला या बाजारात फिरायला साधारण एक तास दिला होता. अकरा वाजता एका विशिष्ट ठिकाणी जमायचं होतं. मग पुन्हा चालत तिथं जाऊन थांबलो. मात्र, आमच्यातलं एक जोडपं लवकर आलं नाही. त्यांची सोन्याची खरेदी चालली होती. तोवर आम्ही तिथं बाकांवर बसून टाइमपास केला. व्हिडिओ काढले. अखेर ते जोडपं आलं. आमच्या ग्रुपमधल्या २२ जणांपैकी बहुतेक पाच-सहा जणांनी सोनेखरेदी केली. बाकीच्यांनी आमच्यासारखीच इतर लहान-मोठ्या भेटवस्तूंची खरेदी केली. मग आम्ही बसमधून अबूधाबीकडं निघालो. दुबईच्या शेख झायेद रोडवरून जाताना पुन्हा एकदा ‘बुर्ज खलिफा’ आणि इतर उत्तुंग इमारतींचं दर्शन घडलं. मनोमन ‘बाय बाय दुबई’ म्हटलं.
आता आमची बस दुबईवरून अबूधाबीकडं धावू लागली होती. आम्ही दुपारी दोनच्या सुमारास अबूधाबीतील आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. पण इथं आम्ही लगेच रूम ताब्यात घेणार नव्हतो. फक्त वॉशरूम ब्रेक घेतला आणि आमचे पासपोर्ट तिकडं जमा केले. तिथून आम्ही लगेच यास आयलंड भागात असलेल्या ‘फेरारी वर्ल्ड’कडं (खरा उच्चार फरारी) निघालो. अबूधाबी या शहराचा निम्मा भाग वेगेवगळ्या छोट्या छोट्या बेटांवर वसला आहे. दुबईच्या तुलनेत अबूधाबी हे लहान शहर वाटत असलं, तरी तेही पुष्कळ मोठं व आडवं पसरलेलं होतं. शिवाय हे राजधानीचं शहर असल्यानं इथला डौल काही वेगळाच होता. यास आयलंड हे तुलनेनं मोठं बेट. तिकडं जाण्यासाठी खाडी पूल ओलांडावा लागतो. डावीकडं अबूधाबी पोर्ट दिसत राहतं. प्रसिद्ध लुव्र म्युझियमही इकडंच आहे. तिथंच आणखी एक मोठं अम्युझमेंट पार्क विकसित होत आहे. थोड्याच वेळात आम्ही त्या ‘स्वप्नभूमी’त प्रवेश केला. डाव्या बाजूलाच ‘वॉर्नर ब्रदर्स’चा बोर्ड दिसला. भल्या मोठ्या जागेत हे ’वॉर्नर ब्रदर्स’ वसलं आहे. आमचं ‘फेरारी वर्ल्ड’ थोडं पुढं होतं. त्याशेजारीच ‘सी वर्ल्ड’ होतं. यास बेटावरील या भव्य विस्तार असलेल्या जागेत या तीन जादुईनगरी विकसित करण्यात आल्या आहेत. एका तिकिटात कुठल्याही दोन अम्युझमेंट पार्कमध्ये प्रवेश असतो. आम्ही ‘फेरारी वर्ल्ड’ आणि ‘सी वर्ल्ड’ निवडलं होतं. त्यापैकी ‘सी वर्ल्ड’ आम्ही दुसऱ्या दिवशी पाहणार होतो.
अखेर आमची बस ‘फेरारी वर्ल्ड’समोर थांबली. तिथं समोरच एक आणखी मोठा डोम होता. त्यात वेगवेगळी दुकानं, रेस्टॉरंट होती. इथंच असलेल्या ‘रसोईघर’ या गुजराती रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणार होतो. आम्ही तिथं पोचलो तेव्हा तीन वाजले होते. सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती. मग तिथल्या गरमागरम गुजराती थाळीवर आम्ही तुटून पडलो. अगदी पोटभर जेवण झाल्यावर बरं वाटलं. मग समोरच रस्ता क्रॉस करून आम्ही ‘फेरारी वर्ल्ड’मध्ये शिरलो. ‘फेरारी’ या जगप्रसिद्ध कार ब्रँडनं इथं हे अफलातून अम्युझमेंट पार्क उभं केलं आहे. यात वेगळं काय असेल, याची मला उत्सुकता होती. आत ‘फेरारी’च्या अनेक उत्तमोत्तम कार डिस्प्लेला होत्या, यात काही आश्चर्य नव्हतं. पण बाकी सगळा माहौल इतर चार अम्युझमेंट पार्कसारखाच होता. इथं एक-दोन एक्स्ट्रीम राइड होत्या. त्या सोडल्या, तर आम्ही सात-आठ राइड धनश्रीनं व मी केल्या. आमचा टूर मॅनेजर सागर याला त्या अवघड राइड करायच्या होत्या. मग नीलही त्याच्यासोबत गेला. ग्रुपमधली काही तरुण, धाडसी मंडळीही तिकडं गेली. मला ती एक कारमध्ये बसून त्या पार्कमध्ये हळूवार गतीनं फिरवतात, ती राइड आवडली. त्याशिवाय तो एक टर्बो टॉवर नावाचा प्रकारही एंजॉय केला. टायरमध्ये बसून गोल गोल फिरत एकमेकांना धडका मारायची ती राइडही केली. यातल्या काही राइड आम्ही सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओतही केल्या होत्या. इथंही त्या पुन्हा करताना मजा आली. तिथं ती कार रेसिंगची राइडही होती. पण तिला खूप गर्दी होती आणि टाइम स्लॉट आधी बुक करावा लागत होता. त्यामुळं आम्ही ती नुसतीच पाहिली. इतर भयंकर राइड लांबूनच बघितल्या, त्यात बसलेले लोक ओरडत-किचाळत होते. शिवाय तिथं मोठ्या आवाजात संगीत लावलेलं होतं. एकूण वातावरण एकदम झकास होतं. सगळेच मस्ती करण्याच्या मूडमध्ये होते. आम्ही शेवटी एक जीटी नावाची राइड केली. ती पण भन्नाट आणि बऱ्यापैकी वेगवान होती. यात त्या ‘फेरारी वर्ल्ड’च्या आवाराच्या बाहेर तो ट्रॅक नेऊन पुन्हा आत आणला होता. यानंतर आम्ही ते पार्क चारही बाजूंनी निवांत फिरून पाहिलं. ठिकठिकाणी आगामी ख्रिसमसच्या सणासाठीची सजावट करून ठेवली होती. एका ठिकाणी तर शुभ्र बर्फाचा आभास निर्माण करणारी सुंदर सजावट आणि तो ख्रिसमस ट्री उभारला होता. एका बाजूला इटलीतलं एक गाव उभं केलं होतं. त्याचीही काही तरी स्टोरी होती; पण आम्हाला आता निघण्याची गडबड असल्यानं ती नीट पाहता आली नाही. 
सात वाजता आम्ही सगळे बाहेर आलो. बस सगळ्यांची वाट पाहत थांबलीच होती. सगळ्यांनीच इथल्या राइड छान एंजॉय केल्या होत्या. उशिरा जेवण झालं होतं, म्हणून फार भूक नव्हती. इथून आम्ही अबूधाबी शहरात गेलो. रात्री तिथल्या ‘घी अँड राइस’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आमचं डिनर होतं. तिथं जेवलो. मग बसनी पुन्हा आमच्या ‘रमादा’ नावाच्या हॉटेलमध्ये आलो. इथं आता ‘चेक-इन’ केलं. माझा साडू नीलेश कुलकर्णी अबूधाबीतच असतो. आम्ही त्याला फोन केला होता. तो राहतो ते ठिकाण आमच्या हॉटेलपासून फक्त चार किलोमीटरवर होतं. मग तो टॅक्सी करून आम्हाला भेटायला हॉटेलवर आला. त्याच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. त्यानंतर तो आम्हाला त्याच्या घरी बोलवत होता. मात्र, बराच उशीर झाला होता व आम्ही दमलो होतो. मग तो तिथून पुन्हा टॅक्सी करून परत गेला. आमची रूम अठराव्या मजल्यावर होती. इथल्या लिफ्टला ठरावीक मजल्यांनंतर मर्यादित प्रवेश होता. आपल्या रूमचं कार्ड लावलं तरच लिफ्ट त्या मजल्यांपर्यंत जात होती. ही चांगली सोय होती. मी ती प्रथमच इथं पाहिली. इथली रूम आणि एकूण सोयी-सुविधांच्या मानानं आम्हाला दुबईचंच हॉटेल चांगलं वाटलं. अर्थात इथं एकच दिवस राहायचं होतं. शिवाय इतके दमलो होतो, की लगेच झोप लागली.

अबूधाबी, ११ डिसेंबर २०२४

आज आमचा इथला शेवटचा दिवस. सकाळी ब्रेकफास्ट झाला आणि लगेच साडेआठ वाजता ‘चेक-आउट’ केलं. आज आम्हाला सकाळी इथलं ‘बीएपीएस हिंदू मंदिर’ आणि ‘शेख झायेद ग्रँड मॉस्क’ बघायला - थोडक्यात देवदर्शनाला - जायचं होतं. ‘बीएपीएस’नं अबूधाबी ते दुबई रोडवर फेब्रुवारीत हे भव्य स्वामिनारायण मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच वर्षी फेब्रुवारीत या मंदिराचं उद्घाटन झालं. यूएईच्या राष्ट्रप्रमुखांनी या मंदिरासाठी ‘बीएपीएस’ला जवळपास ७० ते ७५ एकर जागा मोफत दिली. त्यातील २७ एकर क्षेत्रावर हे मंदिर उभं आहे. बाकी जागेवर पार्किंग आणि इतर सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे. आम्ही सकाळी ११ च्या आसपास मंदिराच्या परिसरात पोचलो. तिथं प्रचंड बंदोबस्त दिसला. लांबून फोटो काढायला मनाई होती. विमानतळावर होते तशी काटेकोर सुरक्षा तपासणी, एक्स-रे स्कॅनिंग वगैरे प्रकार होऊन मगच आत सोडण्यात आलं. वर गेल्यावर एका बाजूला चप्पल-बूट ठेवण्याची रूम आणि एका बाजूला वॉशरूम अशी व्यवस्था होती. तिथं मंदिराच्या पायऱ्या सुरू होत होत्या. समोर जलतरण तलावासारख्या जागेत पाणी खेळतं ठेवण्यात आलं होतं. दुपारची वेळ झाल्यानं ऊन अगदी टोचायला लागलं होतं. त्या पायऱ्यांपासून पुढं आणि गाभाऱ्यापर्यंत फोटो काढायला परवानगी होती. त्यामुळं सगळ्यांनी तिथं फोटो काढून घेतले. तिथं अनेक स्थानिक हिंदूही येताना दिसले. विशेषत: लग्न समारंभ आटोपून दर्शनाला आलेली बरीच मंडळी, त्यातही गुजराती अधिक, दिसत होती. आम्ही त्या पायऱ्या चढून वर गेलो आणि मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केला. इथं जैन शिल्पकलेनुसार, अतिशय सुंदर कोरीवकाम आणि शिल्पं खोदलेल्या खांबांवर हे मंदिर उभं होतं. मंदिरात स्वामिनारायणांसोबत विष्णू-लक्ष्मी, राम-लक्ष्मण-सीता-मारुती, अय्यप्पा, बालाजी असे सर्व देव नांदत होते. तिथं मध्ये ध्यानासाठी मोकळी जागा ठेवली होती. आम्ही सगळीकडं फिरून तिथं पाच मिनिटं बसलो. फारच शांत वाटलं. पुन्हा प्रदक्षिणेसाठी बाहेर पडलो. त्या मार्गावर मंदिराच्या कळसांचंं सुंदर कोरीव काम पाहता आलं. मात्र, तिथं पाच पाच फुटांवर सुरक्षारक्षक उभे होते. बराच वेळ त्या परिसरात घालविल्यावर मग आम्ही खाली आलो. ग्रुपमधल्या मंडळींचं आता पायऱ्यांवर परत फोटोसेशन सुरू झालं. मग आम्ही तिथं एक स्मृतिवस्तू दुकान होतं, तिथं चक्कर मारून आलो. तिथं देवघरापासून ते धूपारतीपर्यंत बऱ्याच गोष्टी विक्रीस होत्या. आता सगळे एकत्र आले आणि आम्ही बाहेर पडायला निघालो. तिथं कोपऱ्यात ‘प्रसादम्’ वाटप सुरू होतं. मग सगळे तिकडं धावले. तिथं एका द्रोणात सुंदर गरमागरम खिचडी प्रसाद म्हणून समोर आली. खाताना तोंड पोळलं इतकी गरम होती. पण तिथं ती खायला छानच वाटलं. मग बरीच पायपीट करून आम्ही बसपाशी आलो. आमचे ड्रायव्हर व फारूकभाई गाडीतच थांबले होते. 

सगळ्यांना घेऊन बस आता अबूधाबीतील ग्रँड मॉस्ककडं निघाली. अर्ध्या-एक तासात आम्ही तिथं पोचलो. तिथं त्या मॉस्कला बऱ्याच ठिकाणांहून प्रवेशद्वारे होती. आमच्या बसनं जवळपास त्या मशिदीला पूर्ण प्रदक्षिणा घातली आणि मग आम्ही एका ठिकाणाहून आत शिरलो. ही मशीद भव्य होती, यात वादच नाही. इथं आत जाताना स्त्रियांनी पूर्ण अंग झाकलेले कपडे घालायचे, असा ड्रेसकोड आमच्या मॅनेजरनं चार चार वेळा बजावून सांगितला होता. तरीही दोघींच्या ड्रेसच्या बाह्या पूर्ण नव्हत्या, म्हणून मग त्यांना तिथून ते काळे ग्लोव्ह्ज विकत घ्यायला लागले. एका ठिकाणी जमा झालो. मग स्त्रिया व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या. तिथल्या एका बाईनं येऊन सर्व स्त्रियांना बघूनच ‘तपासलं’ आणि मग ती रांग आत सोडली. मग आम्हीही आत गेलो. तिथं ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी ऑपरेटेड गाड्या होत्या. मग फारूकभाई काही लोकांना घेऊन त्या गाडीतून पुढं गेले. आमचा मॅनेजर सागर याच्या हातावर गोंदलं होतं, म्हणून तो आला नाही. (नंतर तो म्हणाला, की त्याला तसंही मशिदीत यायचंच नव्हतं. मी याआधीही कधी गेलेलो नाही.)  त्या अंडरपासमधून बरीच पायपीट केली. दोन्ही बाजूला शेख झायेद यांनी ही मशीद उभारताना काय विचार केला, सर्व धर्मांचे धर्मगुरू तिथं कसे बोलावले होते वगैरे चित्रं व फोटो होते. ती पायपीट संपल्यावर एका ठिकाणी एस्कलेटरवरून वर गेल्यावर एकदम त्या मशिदीच्या समोरील प्रांगणात आम्ही आलो. इथून आता त्या मशिदीची भव्यता बऱ्यापैकी जाणवत होती. इटलीतून आणलेल्या संगमरवरात बरंचसं बांधकाम आहे. या मशिदीत एका वेळी ५५ हजार लोक नमाज पढू शकतात, असं फारूकभाईनं सांगितलं. तिथं आत फिरण्यासाठी कठडे उभारून एक रस्ता केला होता. त्यातून आम्ही फिरलो. आतली झुंबरं अतिशय मोठी व सुंदर होती. तिथला गालिचा इराणमधील १२०० कामगारांनी एकहाती विणला आहे, अशी माहितीही आमच्या गाइडनं दिली. तो गालिचाही फार सुंदर होता, यात शंका नाही. मशिदीचा परिसर अतिशय टापटीप व स्वच्छ होता. अनेक पर्यटक अतिशय शांतपणे तिथं फिरत होते. जागोजागी त्यांचे लोक मार्गदर्शनासाठी तैनात होते. इथं बरीच पायपीट झाल्यावर आम्ही बाहेर आलो. फोटोही बरेच झाले. बाहेर आल्यावर ती बॅटरी ऑपरेटेड गाडी आली. आम्ही लगेच तिच्यात बसलो आणि त्या एस्कलेटरपाशी आलो. तिथून पुन्हा त्या अंडरपासमधून तंगडतोड करीत सागर बसला होता, तिथपर्यंत आलो. इथं आता बायकांना डोईवरचे वस्त्र काढायची ‘परवानगी’ होती म्हणे. आमच्या ग्रुपमधल्या अनेक बायकांनी लगेच त्याची अंमलबजावणी केली. 
इथंही खाली त्या एरियात वॉशरूम आणि जोडीला बरीच दुकानं होती. आम्हाला अर्थात तिथं काही खरेदी करायची नसल्यानं आम्ही सगळे लगेचच निघालो आणि बाहेर आलो. आता दुपारचे अडीच वाजून गेल्यानं सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आता आमचा मोर्चा पुन्हा एकदा यास आयलंडकडे निघाला. काल थांबलो होतो, तिथंच बस थांबली. आजचं दुपारचं जेवण पुन्हा ‘रसोईघर’मध्येच होतं. तीन वाजून गेल्यानं आम्ही सगळेच त्या गुजराती थाळीवर तुटून पडलो.
जेवण झाल्यावर पुन्हा आम्हाला न्यायला बस आली. तिथून सगळे ‘सी वर्ल्ड’कडे निघालो. ते खरं तर अगदी जवळ होतं. पण पायी जायची परवानगी नव्हती म्हणे. पाच मिनिटांत तिकडं उतरलो. आमची तिकिटं आधीच काढलेली असल्यानं फारूकभाईंनी सगळ्यांना एकेक करून आत सोडलं. इथून आम्हाला थेट विमानतळावर जायचं असल्यानं सगळ्यांना साडेपाचपर्यंत परत त्या ठिकाणी यायला सांगितलं. खरं तर हातात वेळ कमी होता. म्हणून आम्ही लगेच त्या ‘सी वर्ल्ड’मध्ये शिरलो. मुख्य मंडप गोलाकार व बराच मोठा होता. त्या अर्धवर्तुळाकृती डोमखाली वेगवेगळे विभाग होते. त्या जगभरातल्या समुद्रांतील मासे व इतर जलचरांचं जीवन पाहायला मिळत होतं. आम्हाला अंटार्क्टिका विभागातले पेंग्विन बघण्यात रस होता. तिथं गेलो. पेंग्विन बघितले, पण तिथल्या अतिथंड तापमानात अक्षरश: कुडकुडायला झालं. लगेच बाहेर आलो. मनात विचार आला, या वाळवंटी प्रदेशात आपण राहतो आहोत, हे त्या पेंग्विनना कळत तरी असेल का? दुसरीकडं एका ठिकाणी डॉल्फिन बघायला मिळाले. त्यांचे ट्रेनरही तिथंच होते. ते आपल्याला विशिष्ट पद्धतीने हातवारे करायला सांगतात. आपण तसा हात फिरवला, की तो डॉल्फिन त्याच दिशेनं उडी मारायचा. एकूण मजा आली. तिथं फ्लेमिंगोही होते. यापूर्वी सिंगापूरच्या जुरांग बर्ड पार्कमध्ये असे जवळून फ्लेमिंगो बघितले होते. हे ‘सी वर्ल्ड’ चांगलं होतं; मात्र आमच्याकडं वेळ कमी होता. आम्ही पुन्हा त्या मुख्य गोलात आलो, तेव्हा तिथं एक चमू नृत्यनाटिका सादर करत होता. उपस्थित प्रेक्षकांकडून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत होता. आम्ही मात्र एक झलक बघून परत निघालो.

बरोबर साडेपाच वाजता आम्ही पहिल्या जागी येऊन थांबलो. बाकीची मंडळी येईपर्यंत पावणेसहा-सहा वाजत आले. सूर्यास्त झाला. पश्चिम दिशा केशरिया रंगानं न्हाऊन निघाली होती. त्या परिसरात अतिशय शांत वाटत होतं. मंद वारं सुटलं होतं. आम्ही सगळे अगदी हळूहळू पावलं टाकत बसकडं निघालो होतो. खरोखर, त्या ‘स्वप्नभूमी’तून पाय निघत नव्हता. अर्थात निघावं तर लागणारच होतं. सगळे बसमध्ये बसल्यावर सागरनं आणि फारूकभाईंनी निरोपाचं भाषण ठोकलं. ते व्यावसायिक सफाईचं असलं, तरी सगळ्यांना भिडलं. आम्ही टाळ्या वगैरे वाजवून त्यांचं आणि ड्रायव्हर तबरेजभाई यांचं कौतुक केलं. इथून विमानतळ अगदी जवळ होता. आम्ही दहा मिनिटांत शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन पोचलो. इथून ट्रॉल्या वगैरे घेऊन सगळे आत शिरलो. काहींना व्हॅट रिटर्न घ्यायचा होता, ते त्या काउंटरला गेले. आम्ही सरळ ‘चेक-इन’ काउंटरला गेलो. इथं फारशी गर्दी नसल्यानं सगळे सोपस्कार भराभर झाले. आमचं फ्लाइट आठ वाजून ५० मिनिटांनी होतं. आम्ही पावणेसात वाजताच आत येऊन बसलो होतो. मग त्या विमानतळावर जरा इकडं-तिकडं फिरून टाइमपास केला. नीलला एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट मिळालं तर हवं होतं. तसं एक दुकान सापडलं. पण सगळ्या वस्तू अपेक्षेप्रमाणं चिनी होत्या. अर्थात काहीच न घेता निघालो. आम्हाला सोबत पॅक डिनर दिलं होतं. ते विमानतळावर बसून खावं की विमानात नेऊन खावं, असा जरा डिलेमा होता. अखेर विमानात ते नेऊ देतात हे कळल्यावर विमानातच खाऊ, असं ठरलं. दुपारचं जेवण उशिरा झाल्यानं कुणालाच फारशी भूक नव्हती. 
अखेर वेळेवर बोर्डिंग सुरू झालं. तेच ‘अकासा एअर’चं ‘बोइंग ७३७- मॅक्स’ एअरक्राफ्ट होतं. ते वेळेत निघालं. म्हणजे प्रत्यक्षात ‘टेक-ऑफ’ झालं, तेव्हा सव्वानऊ वाजले होते. तो सीटबेल्टचा सिग्नल ऑफ झाल्याबरोबर मी ते बरोबर आणलेलं पॅक डिनर (बिर्याणी होती) फोडून खाल्लं. माझ्या नावे असलेलं ती चीजी बर्गर नको म्हणून सांगितलं व एक मस्त ‘मसाला चाय’ घेतला. मला प्रवासात झोप येत नाहीच. बराच वेळ जागा होतो. क्वचित कधी तरी झोप लागली. बरोबर तीन तासांनी म्हणजे सव्वाबाराच्या सुमारास, म्हणजे भारतातील वेळेनुसार पावणेदोनच्या सुमारास आम्ही मुंबईत उतरलो. विमान थांबलं तिथं नेमका एअरोब्रिज नव्हता. मग त्या बसनं उभ्यानं प्रवास करणं आलं. मुख्य इमारतीत येऊन, इमिग्रेशन वगैरे करून बाहेर पडेपर्यंत अर्धा तास गेला. सामान ताब्यात घेतलं. मॅनेजर सागरसह सर्वांंचा निरोप घेतला आणि बाहेर आलो. कॅब आधीच बुक केली होती. तो ड्रायव्हर जरा नवोदित होता. त्याला आम्ही दिसेपर्यंत आणखी थोडा वेळ गेला. शेवटी आमची भेट झाली. पहाटे पावणेतीनला आमचा पुण्याकडं प्रवास सुरू झाला. ही वेळ डेंजर होती. मी त्या ड्रायव्हर पोराशी गप्पा मारत, त्याला जागता ठेवत, त्याच्या ड्रायव्हिंगकडं लक्ष देत असा प्रवास केला. सुदैवानं घाटात फार जॅम वगैरे नव्हतं. आम्ही बरोबर सहा वाजता घरी पोचलो. त्या नवशिक्या ड्रायव्हरचे आभार मानले आणि घरात शिरलो. पुण्यात प्रचंड थंडी होती. त्यामुळं आधी गोधडीत शिरून गुडुप झोपलो. इथूनही वेगळ्या स्वप्नभूमीचा प्रदेश सुरू होतो. तोवर दुबई-अबूधाबीतल्या स्वप्नभूमीची दृश्यं मिटत चाललेल्या डोळ्यांपुढं कॅलिडोस्कोपसारखी सरकत होती...



(समाप्त)

----

लंडनवारी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment