25 Jul 2018

दोन नाट्यछटा, एक नाटुकलं....

नाट्यछटा १
--------------
रिमोट माझ्याच हाती हवा...
-------------------------------------------------


नमस्कार मंडळी...

अहो, शाळेतून घरी आलं, दप्तर बाजूला टाकलं, की मला रिमोट माझ्याकडंच हवा असतो. अहो, का म्हणून काय विचारता? टीव्हीवरचे सगळे कार्टून मला बघायचे असतात. टॉम अँड जेरी म्हणू नका, छोटा भीम म्हणू नका... ऑगी अँड द कॉक्रोजेस म्हणू नका, बेन टेन म्हणू नका, मिस्टर बीन म्हणू नका, डोरेमॉन म्हणू नका… सगळेच माझी वाट पाहत असतात. मग मी नको का त्यांना भेटायला?
...तर काय सांगत होतो, जरा कुठं टीव्ही सुरू केला, की आज्जीचं झालंच सुरू - नील बाळा, सोन्या, जेवण कर रे नीट. पानात लक्ष दे. आता तुम्ही मला सांगा, मी कार्टून बघू की पानात लक्ष देऊ? हे असं सुरू असतं. म्हणून म्हणतो, की रिमोट माझ्याच हाती हवा...
अहो, हे लोक दुपारी मला बळंच झोपवतात. संध्याकाळी आई घरी आली, की तिची होमवर्कची भुणभुण सुरू - नील, हे केलंस का? नील, ते केलंस का? आता सांगा, होमवर्क करू की संध्याकाळचे कार्टून बघू? बरं, ते झालं. आजी मात्र ‘चार दिवस सासूचे..’ बघत बसणार. तेव्हा ती इकडचा डोळा तिकडं करणार नाही. मला मात्र म्हणणार, की नील, पानात लक्ष देऊन जेव म्हणून... आता सांगा, काय करावं या लोकांना? म्हणूनच म्हणतो, रिमोट माझ्या म्हणजे माझ्याच हाती हवा… रात्री बाबा आला, की याचं ‘घडी प्रस्तुत गुंतता हृदय हे…’ सुरू… हातात जेवायचं ताट... तो जेवत जेवत मालिका बघणार... आणि मला मात्र म्हणतात - नील, पानात लक्ष दे रे...! बघा, कसे असे हे लोक? म्हणूनच म्हणतो, की रिमोट माझ्याच हाती हवा... 
पण एक मात्र आहे. मला घरात सगळे असले, तरच कार्टून बघायला आवडतं. कारण हे सगळे लोक रिमोट माझ्याकडं देतात आणि माझ्याकडं बघत बसतात... आता काय म्हणावं या लोकांना?
----

नाट्यछटा २
---------------

काय करावं बाई या आईचं?
---------------------------------

बाई बाई बाई बाई...
काय हे कलियुग आलंय हो...
सकाळपासून कामं करून कंबर मोडून गेली बाई माझी...
अहो, तुम्ही सांगा... पाचवीतल्या मुलीला एवढी कामं कशी येणार? कशी जमणार?
सकाळ झाली, की उठायचं... दाराला लावलेलं दूध घ्यायचं, ते तापवायचं... 
सगळ्यांचा चहा करायचा... मग केरवारे करायला घ्यायचे...
आईला अंथरुणातून उठवायचं... ती आधी बाहेर यायलाच नको म्हणते... मुळात तिचं माझ्याकडं लक्षच नसतं... पण काय करणार? घरातली एक जबाबदार व्यक्ती म्हणून मलाच सगळं बघावं लागतं... तिला नीट उठवायचं... तिच्या तोंडात ब्रश घालायचा... अनेकदा तर मीच तिचा ब्रश करून देते... मग दूध घेतानाही तिचं लक्ष नसतंच... कधी साडीवर सांडून ठेवेल याचा नेम नसतो...
अहो, कित्येकदा मीच तिला ‘फू फू’ करून प्यायला लावते ते दूध... मग किनई आमच्या कामवाल्या बाई येतात... त्यांनाही काय हवं-नको ते मीच बघते... कणीक काढून द्यायची, किती पोळ्या हव्यात ते सांगायचं... कुणाकुणाचे डबे आहेत ते पाहायचं... हे सगळं मीच करते... 
आता तुम्हीच सांगा मंडळी, पाचवीतल्या मुलीला एवढी कामं कशी येणार? कशी जमणार? 
नाही मी म्हणते, जमणार कशी? सांगाच...
पुन्हा नाश्त्याचं मलाच बघावं लागतं... आईला एक काम धड जमत नाही. कधी मीठच जास्त घालेल, कधीच कमीच घालेल... अहो, का म्हणून काय विचारता? तिचं लक्षच नसतं ना मुळी कामात?
मग नाश्त्याचं मीच बघते... आईला पोहे, उपमा जे काही आहे ते भरवते... नंतर पाणी प्यायला देते... सगळं कसं नीट, शिस्तीत करते...
तिला आंघोळीचा पण फार कंटाळा... कसंबसं तयार करते... मग तिला बाथरूममध्ये ढकललं, की मला हुश्श वाटतं बाई... तेवढाच जरा वेळ आराम... पण ती बाहेर आली, की पुन्हा माझं काम सुरू... तिची वेणी घालावी लागते... ड्रेस नीट घातलाय की नाही ते बघावं लागतं...
मग एकदा तिचं आवरून झालं, की मग मला स्वत:चं आवरून शाळेची व्हॅन गाठायची असते... 
आता तुम्हीच सांगा, पाचवीतल्या मुलीला एवढी कामं कशी येणार? कशी जमणार?
नाही, मी म्हणते, सांगाच तुम्ही - जमणार तरी कशी?
पुन्हा शाळेतून मी दमून येते, तर आईनं घरभर पसारा करून ठेवलेला असतो. तो आवरावा लागतो... पण तिचं मुळी माझ्याकडं लक्षच नसतं...
आता तुम्ही विचाराल, की मुली, तुझी आई मूक-बधीर आहे का? तर नाही हो, चांगली ठणठणीत आहे.
मग विचाराल, की ती अपंग वगैरे आहे का? तर नाहीच मुळी... हाती-पायी एकदम धड आहे...
आता विचाराल, की मुली, तुझी आई जरा वेडी आहे का गं? तर नाही हो, म्हणजे नव्हती... पूर्वी खरंच नव्हती ती अशी...
मग तुम्ही विचाराल, की मुली, मग तुझ्या आईला झालंय तरी काय?
अहो, काय सांगू कप्पाळ...
सकाळपासून तिच्या हातात असतो तिचा तो स्मार्टफोन आणि त्यात ते मेलं व्हॉट्सअप की काय ते...
आता बोला... बसला ना विश्वास तुमचा आता?
म्हणूनच म्हणते, खरंच पडतं हो मला हल्ली खूप काम... पण तुम्ही खरोखर सांगा, पाचवीतल्या मुलीला एवढी कामं कशी येणार? कशी जमणार?
सांगाच मंडळी...

---

एक नाटुकलं...
----------------

एक झाड ताडमाड...
--------------------

(सूत्रधार मुलगा/मुलगी समोर येऊन ठेक्यात म्हणतो/म्हणते...)

आपल्या सिमेंटच्या शहरापासून लांब,
इंद्रधनुष्य टेकतं त्या टेकडीच्या मागं
एक होतं जंगल सुंदर, छान...
फुललं होतं तिथलं प्रत्येक पान

जंगलात होती खूप सारी झाडं
आणि झाडांच्या वरती खूप माकडं...

माकडांसोबतच होते अस्वल, सिंह आणि वाघोबा...
ससा, हरिण, हत्तीदादा आणि कोल्होबा...

सगळ्यांना पडे एकच प्रश्न...
जंगलात झाडांचे कशाला एवढे प्रस्थ...
या जंगलात झाडांचे कशाला हो प्रस्थ...

(एका नारळाच्या झाडाखाली ससा आणि अस्वलदादा बोलत आहेत....)

ससा - दादा, हे एवढं मोठं झाड कशाचंय? मला याची फार भीती वाटते...
अस्वलदादा - अरे, घाबरू नकोस. हे तर नारळाचं झाड... माणसं याला ना कल्पवृक्ष म्हणतात... 
तेवढ्यात नारळाचं झाड बोलू लागतं - एक मिनिट ससोबा, मी सांगतो तुम्हाला... अहो, मी तर कोकणचा कल्पवृक्ष... माझ्या खोबऱ्यापासून ते करवंटीपर्यंत सगळ्यांचा उपयोग होतो. अगदी माझ्या खाली पडलेल्या झावळ्यांचाही झोपडीसाठी उपयोग होतो. म्हणून मला कल्पवृक्ष म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे कल्पिलेली प्रत्येक गोष्ट देणारा... कळलं...
ससा - व्वा नारळदादा, आता मला एक मस्त शहाळं द्या... हा अस्वलदादा मला ते फोडून देईल.
(ससोबा शहाळं पिऊ लागतात... म्हणतात - व्वा..)

तेवढ्यात हत्तीदादा कोवळ्या बांबूचा फडशा पाडताना दिसतात...

हत्ती - अरे ससोबा, या जंगलात एवढी झाडं आहेत, की आपण ती सगळी कधीच पाहू शकणार नाही. पण प्रत्येक झाडाचा काही ना काही उपयोग आहे. आपलं सगळं अन्न या झाडांपासूनच येतं. आता मी एवढा मोठा आहे, पण मी पक्का शाकाहारी आहे, माहितीय ना. हा ऊस, कोवळा बांबू, हे उंच गवत असा सगळा माझा खाऊ नसता, तर माझं पोट कसं भरलं असतं, सांग बघू...

आता हे ऐकून हरीण येतं...

हरीण - खरं आहे हत्तीभाऊ सांगतात ते... आम्ही सर्व हरणं फक्त गवतावर जगतो. या जंगलात एवढी झाडं आणि पाला आहे म्हणून आम्ही जगतोय. आम्ही गवत खाणारे म्हणून आम्हाला तृणभक्षी पण म्हणतात...

आता एक मोठ्ठी डरकाळी ऐकू येते... ती ऐकून हरीण पळूनच जाते, तर ससोबा थरथर कापू लागतात. ऐटीत वाघोबांची स्वारी येते.

वाघ - हे सगळे प्राणी गवत खातात आणि त्यांना मारून मी खातो. म्हणजे त्यांची संख्या मर्यादेत ठेवतो. त्यामुळं जंगलात वनस्पती आणि त्यावर जगणारे जीव यांचं संतुलन राहतं. मला घाबरू नका. मी फक्त भूक लागल्यावरच शिकार करतो. आणि वीस वेळा प्रयत्न केल्यावर कुठं मला एखादी शिकार सापडते. पण हे जंगल, इथली झाडी-झुडपं मला खूप आवडतात. विशेषतः आमच्या गुहेत नसतो, तेव्हा मी हमखास करवंदाच्या जाळीत आराम करीत बसलेला असतो. मला ती गार गार जागा फार आवडते.

अस्वलदादा - कळली की ससोबा, झाडांची महती? झाडं आहेत म्हणून जंगल आहे. झाडं कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि आपण सजीवांना आवश्यक असलेला ऑक्सिजन नावाचा वायू बाहेर टाकतात, असं मी एकदा जंगलात आलेली माणसं सांगताना ऐकलं होतं. मलाही मध आणि मोहाची फुलं फार आवडतात. हा मध वनस्पतींच्या फुलांपासूनच तयार होतो. आपणा सगळ्यांचं जीवन या झाडांवरच अवलंबून आहे.

मग शेजारच्या झाडावरून उड्या मारत मारत माकडभाऊ येतात अन् म्हणतात...

माकडभाऊ - अरे, ही झाडं नसती, तर आम्ही कुठं राहिलो असतो? आमचं घर म्हणजे हे झाडच. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना कसली मजा येते, माहितीय!

त्यांचं हे बोलणं ऐकून शेजारचं मोठ्ठं वडाचं आणि आंब्याचं झाड बोलू लागतं.


वड - अरे, तुम्ही किती छान बोलताय आमच्याबद्दल... खूप मस्त वाटलं अस्वलभाऊ... पण एक सांगू, तुम्हीसुद्धा आम्हाला हवे आहात. तुमच्यामुळं या आपल्या जंगलाच्या घराला शोभा आली आहे
आंबा - अरे, माझी फळं तुम्हाला भरभरून देताना इतका आनंद होतो की काय सांगू! खरं तर आपण एकत्र राहतोय म्हणून या जंगलात मजा आहे.
वड - पण हे त्या माणसांना कळतंय का? त्यांनी तर शहरं वसवण्यासाठी झाडं तोडण्याचा आणि जंगलं सपाट करण्याचा सपाटाच लावलाय
वाघोबा - त्यामुळंच नैसर्गिक अधिवास नष्ट होत चाललाय आणि बिबट्यासारखे माझे भाऊबंद माणसांच्या वस्तीत शिरायला लागले आहेत. पण माणसं तिथंही त्यांना जगू देत नाहीत.
हत्तीदादा - आता यंदा गणेशोत्सवात माझ्याच रूपातील गणपतीबाप्पाची हे लोक पूजा करतील. तेव्हा बाप्पांनी त्यांना झाडं लावण्याची आणि वाढविण्याची सुबुद्धी द्यावी, एवढीच प्रार्थना....

सगळे गाऊ लागतात

माणसा माणसा, सोड तुझी हाव
अरे, एक तरी झाड लाव...
एक तरी झाड लाव...
झाड देईल फळं, झाड देईल माया...
ते तोडण्यात अक्कल घालवू नको वाया... 
नकोस करू तू जंगलाचं भक्षण,
अरे, झाडच करील तुझं रक्षण...
झाडच करील तुझं रक्षण...

झाडं लावा, झाडं जगवा,
झाडं लावा, झाडं जगवा...

मोठा होईन, शहाणा होईन, एक तरी झाड लावीन...!

---

(कॉपीराइट C सुरक्षित...)

(हे नाटुकले किंवा या नाट्यछटा कुठेही लिखित वा प्रयोग म्हणून वापरायच्या असल्यास लेखकाची पूर्वपरवानगी आवश्यक!)

संपर्क :

shree.brahme@gmail.com

मोबाइल - 9881098050
---

2 comments: