27 Sept 2018

रिव्ह्यू - मंटो

गेले द्यायचे राहून...
-----------------------



‘मंटो’ पाहताना सतत काही तरी टोचत राहिल्याची, निसटत राहिल्याची, हरवत चालल्याची दुखरी जाणीव आपल्या अंतर्मनाला होत राहते. नक्की काय तुटत असतं तेव्हा? सेपिया टोनमधला स्वातंत्र्यपूर्व काळ? कलावंताची कदर करणारा समाज? लेखणीतली प्रतिभा ओळखू शकणारे रसिक? ‘स्व’ जागृत असलेला भोवताल? नक्की काय? की हे सगळंच? एकदम? कलंदर, मनस्वी लेखकाला भोगावे लागणारे अटळ भोग भोगून सआदत हसन मंटो आपल्यातून निघून गेला. पण शरीरानंच गेला फक्त! सआदत हसन गेला... ‘मंटो’ राहिला! आपल्या रक्तात, आपल्या अंतर्मनात, आपल्या सभोवतालात, आपल्या विवेकबुद्धीत... ‘मंटो’ असा सगळीकडं भरून वर दशांगुळे उरला... मग वाटतं, ‘मंटो’नं आपल्याला एवढं दिलं; मग आपण त्याला काय दिलं? त्याला द्यायचं देणं राहूनच गेलं...
नंदिता दास या बुद्धिमान, विचारी, कलावंत स्त्रीनं ‘मंटो’ जेव्हा रूपेरी पडद्यावर आणायचा ठरविला आणि त्यात ‘मंटो’ची भूमिका नवाझुद्दीन सिद्दिकी करणार हे कळल्यापासूनच हा सिनेमा पाहायची उत्सुकता होती. तो पाहायचा योग अखेर आज (गुरुवार, २७ सप्टेंबर) आला. ‘मंटो’ची पडद्यावर पुनर्भेट झाली आणि धन्य झालो. ‘मंटो’ हे नाव मी प्रथम ऐकलं किंवा वाचलं ते अंबरीश मिश्र यांच्या ‘शुभ्र काही जीवघेणे’ या अप्रतिम पुस्तकात. त्यानंतरही मंटोविषयी कुठं कुठं काय काय वाचण्यात आलं. पण समग्र मंटो असा काही वाचला नव्हता. त्यामुळं हा सिनेमा बघावा का, बघितला तरी कळेल का, अशा जरा शंका होत्या. पण तरी कोऱ्या पाटीनं एखादी कलाकृती पाहण्याचा फायदा असतोच. कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता मी ही कलाकृती पाहिली आणि त्यामुळंच कदाचित ती जास्त भावली. याचं कारण नंदिता दासला जो ‘मंटो’ जसा दाखवायचा होता, तो आणि तसाच फक्त बघायला मिळाला. आणि सांगायला आनंद वाटतो, की हा ‘मंटो’ही काही कमी अस्वस्थ करणारा नव्हता. तोही तितकाच भुंगा लावून गेला, विचारात पाडून गेला आणि खरं तर अस्वस्थ करून गेला.
लेखक किंवा कवी जमातीला अलौकिक प्रतिभेचं देणं असतं, तसाच लौकिक जगण्याचा शापही असतो. सगळं जग एक गोष्ट पाहत असतं, तिथं याला दुसरंच काही तरी दिसत असतं. सगळ्यांना जे आणि जसं वाटत असतं, त्यापेक्षा वेगळंच याला काही तरी वाटत असतं. ‘मंटो’ला असंच ‘सत्य’ दिसत होतं. ते अर्थात त्याचं स्वत:चं ‘सत्य’ होतं. पण ते ‘सत्य’ होतं आणि ते आपण लिहून लोकांसमोर आणलं पाहिजे हा त्याचा विचार प्रामाणिकच होता. पण लेखकाला दिसणारं आणि भिडणारं सगळंच त्याच्या सभोवतीचा समाज पेलू शकत नाही, हे साधारणत: प्रत्येक लेखकाच्या काळात घडणारं अटळ प्राक्तन मंटोच्याही भाळी होतंच. त्यात देशाच्या फाळणीसारखी जखम मंटोच्या कपाळावर अश्वत्थाम्यासारखी कोरली गेली. त्याची लाडकी मुंबई सोडून त्याला जावं लागलं. मंटो मुंबईतून गेला, तरी त्याच्यातून मुंबई काही जाऊ शकली नाही. एखादा कलावंत आणि त्याचं सभोवताल यांचं असं अद्वैत असतंच. एकदा मुळं उखडल्यावर झाड दुसरीकडं जाऊन पुन्हा रुजू शकत नाही, तसंच कलावंताचंही असतं. त्यामुळंच मंटो लाहोरमध्ये जाऊन आणखी आणखी तुटत गेला.
त्यात तिथं ‘ठंडा गोश्त’सारख्या त्याच्या कथेवर त्याच्यावर भरण्यात आलेला खटला त्याच्यातल्या मनस्वी लेखकावर खूप खोलवर घाव करणारा ठरला. वास्तविक मंटोला खटले नवे नव्हते. इस्मत चुगताई यांच्यासारखी प्रागतिक विचारांची लेखिका मैत्रीणही त्याच काळात असे खटल्यांचे घाव सोसत होती. पण किमान मुंबईत इस्मतआपाची सोबत तरी होती. लाहोरला गेल्यानंतरचं मंटोचं तुटलेपण फारच अस्वस्थ करणारं होतं.
हा सगळा प्रवास नंदिता दासनं दोन तासांच्या सिनेमात प्रत्ययकारी पद्धतीनं दाखवला आहे. मंटोच्या काही गोष्टी नाट्यरूपांतरासारख्या पडद्यावरच दाखविल्यानं त्या आणखी प्रभावी झाल्या आहेत. चित्रपटाची सुरुवातच अशा एका गोष्टीनं होते. ‘ठंडा गोश्त’ ही कथाही नाट्यरूपानं अंशत: समोर येते. तेच ‘टोबा टेक सिंह’चं!
मंटोचं व्यक्तिमत्त्व नवाझुद्दीन सिद्दिकीनं मोठ्या ताकदीनं पेश केलं आहे. आता मंटो म्हटलं, की नवाझुद्दीनचाच चेहरा डोळ्यांसमोर येईल, एवढी छाप त्यानं या व्यक्तिरेखेवर उमटवली आहे. एखादी भूमिका एखादा कलाकार अक्षरश: जगला, असं म्हणण्याची पद्धत आहे. हे वास्तविक घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. पण नवाझुद्दीनबाबत तसंच म्हणावंसं वाटतं. मंटोचा चष्मा आणि झब्बा-पायजमा एवढ्या पेहरावात त्यानं संपूर्ण ‘मंटो’ उभा केला आहे. त्याच्या देहबोलीत मंटोचा काहीसा विक्षिप्तपणा, मनस्वीपणा तंतोतंत आला आहे. त्याचं सतत सिगारेट ओढत राहणं, कॉफीशॉपमधल्या चर्चेत प्रत्येक वेळी ठामपणे मतं मांडणं, लेखनाच्या योग्य मोबदल्यासाठी आग्रही असणं, न्यायालयात स्वत:चा युक्तिवाद स्वत:च करणं, श्याम चढ्ढा (तेव्हाचा बॉलिवूडमधला स्टार ) या जीवलग मित्रासोबतचे सगळे प्रसंग या सर्व प्रसंगांत नवाझुद्दीननं ‘मंटो’ मूर्तिमंत उभा केला आहे.
रसिका दुग्गलनं मंटोच्या पत्नीचं - सफियाचं - काम फार समजून-उमजून केलंय. इस्मतआपाच्या भूमिकेत राजश्री देशपांडे एकदम परफेक्ट. अगदी छोट्या भूमिकांत ऋषी कपूर, परेश रावल, इला अरुण, जावेद अख्तर, रणवीर शौरी, दिव्या दत्ता असे दिग्गज कलाकार दर्शन देऊन जातात. त्यामुळं सिनेमाची दृश्यात्मक श्रीमंती वाढली आहे.
या चित्रपटात तो काळ उभा करणं हे महत्त्वाचं होतं. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई आणि लाहोर ही दोन्ही शहरं यात उत्कृष्टरीत्या उभारली आहेत. कलादिग्दर्शन अव्वल दर्जाचं आहे. बॉलिवूडमधले अनेक तत्कालीन चेहरे, उदा. नौशाद, अशोककुमार, हिमांशू रॉय, जद्दनबाई (नर्गिसची आई), नर्गिस - यात दिसतात. या चित्रपटाला झाकीर हुसेन यांचं पार्श्वसंगीत आहे. ते लक्षात राहतं.
तेव्हा एका कलाकाराच्या अस्वस्थतेची ही अस्वस्थ करणारी कहाणी नक्की पाहा; कारण ‘मंटो’ला विसरून चालणार नाही.

जाता जाता : ‘मंटो’ पाहताना, बोलताना सारखे चिं. त्र्यं. खानोलकर आठवत होते. का कोण जाणे! दोघांत मला काय साम्य वाटलं माहिती नाही. पण सारखे आठवले. या मजकुराचं शीर्षक म्हणूनही ‘गेले द्यायचे राहून’ याच ओळी डोक्यात आल्या. (सिनेमात एका ठिकाणी ‘मंटो’ मुलीशी बोलताना माउलींच्या ‘काट्याच्या अणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड, एक वसेचिना’चा हिंदी किंवा उर्दू संदर्भ असलेल्या ओळी म्हणतो, तेव्हा खानोलकर आठवले का? कोण जाणे! )

तर, खानोलकरांवर कोणी करील का असा छान मराठी सिनेमा?

----

दर्जा : चार स्टार

---

3 comments:

  1. आपली आजची, २७ सप्टेंबरची फेसबुकवरचीपोस्ट पाहून नेटफ्लिक्सवर मंटो पाहिला. खूप सुंदर सिनेमा.
    धन्यवाद.
    🙏🏻

    ReplyDelete
  2. आपली आजची, २७ सप्टेंबरची फेसबुकवरचीपोस्ट पाहून नेटफ्लिक्सवर मंटो पाहिला. खूप सुंदर सिनेमा.
    धन्यवाद.
    🙏🏻

    ReplyDelete
  3. आपली आजची, २७ सप्टेंबरची फेसबुकवरचीपोस्ट पाहून नेटफ्लिक्सवर मंटो पाहिला. खूप सुंदर सिनेमा.
    धन्यवाद.
    🙏🏻

    ReplyDelete