17 Dec 2024

दुबई ट्रिप - डिसेंबर २४ - भाग ३

वाळवंटातली ‘स्वप्नभूमी’
-----------------------------


दुबई/अबूधाबी, १० डिसेंबर २४

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करून नऊ वाजता सर्वांनी हॉटेल लॉबीत जमायचं होतं. आज आमचं दुबईतील हॉटेलमधून चेक-आउट होतं. मग सर्व सामान बसमध्ये नेऊन ठेवलं. इथून आज आम्ही अबूधाबीला जाणार होतो. मात्र, त्यापूर्वी दुबईतील ‘गोल्ड सूक’ला (सराफी बाजार) भेट द्यायची होती. मग अर्ध्या तासात बस तिकडं पोचली. तिथं फारूकभाईंनी सगळ्यांना एकत्र जमवून सर्व सूचना दिल्या. सोने खरेदी करायची असेल तर काय काळजी घ्या, पावती घ्या, व्हॅट रिटर्न घ्या, अमुक इतके ग्रॅम सोने न्या, तमुक अंगावर घालून जा वगैरे वगैरे. (बहुतेकांना आता हे माहिती आहे.) आम्हाला तिथं त्यांनी शक्यतो लहान दुकानांतून खरेदी करायचा सल्ला दिला. तिथं आपले कल्याण, जॉयअलुक्कास, मलबार वगैरे मोठमोठे ब्रँड होतेच. ‘पीएनजी’चं दुकान असल्याचं मला माहिती होतं. पण आम्ही हिंडलो, त्या भागात तरी ते दिसलं नाही. आम्ही सर्व जण आधी एका मोठ्या दुकानात शिरलो. तिथं सोन्याचे दर विचारले. साधारण ७० ते ७१ हजार रुपये २२ कॅरेटला, तर ७४ हजार रुपये २४ कॅरेटला असा भाव होता. आपल्याकडच्या आणि तिथल्या भावात निश्चितच चार-पाच ते सात-आठ हजार रुपयांचा फरक होता. शिवाय काही दुकानदार भारतीय चलनांतही पैसे स्वीकारायला तयार होते. आम्हाला सोनं घ्यायचं नव्हतं. त्यामुळं आम्ही मोजकी एक-दोन दुकानं पाहिली आणि त्या गल्लीत असंच भटकायला बाहेर पडलो. तिथं भेट द्यायच्या वस्तू (पिशव्या, पाउच, की-चेन वगैरे) खरेदी केल्या. या बाजारात मधल्या रस्त्यावर वरून छत घातलं होतं. असंच एक मार्केट आम्ही लंडनमध्ये पाहिलं होतं. कडक उन्हाळ्यात या छताचा चांगला उपयोग होत असणार. ते मार्केट आपल्या तुळशीबाग, मंडईसारखंच होतं. मात्र, अतिशय नीटनीटकं व खूपच स्वच्छ होतं. जागोजागी बाक ठेवले होते. दुकानं नुकतीच उघडत होती. बहुतेक दुकानांत भारतीय किंवा पाकिस्तानी कामगार दिसत होते. दुबईत त्यामुळे सर्वत्र हिंदी बोलली जाते किंवा बोलल्याचं त्यांना नीट समजतं. आम्ही काल खजूर घेतले तिथंही मुंबईतील महंमद अली रोडवर राहणारे एक मुस्लिम ज्येष्ठ कामगार होते. आम्ही मराठीत बोलत असल्याचं त्यांना व्यवस्थित समजत होतं. एवढंच नव्हे, तर तेही मराठी बोलू शकत होते. पण ते गमतीनं असं म्हणाले, की मी मुंबईतला आहे हे मुद्दाम सांगत नाही; नाही तर लोक खूप कन्सेशन मागतात. 
आम्ही त्या गल्लीत बरंच फिरलो. तिथं अत्तराची, धूपदाणीची, मसाल्याची आणि केशराचीही दुकानं होती. यातल्या बऱ्याच वस्तू आम्ही घेतल्या होत्या. काही महाग वाटल्या. शेवटी एका दुकानातून बरीच घासाघीस करून अत्तर आणि काही बॅगा वगैरे भेटवस्तू घेतल्या. तो मुलगा केरळी होता. ‘तुम्ही बोहनीचं गिऱ्हाइक आहात,’ असं तो (चुकून) बोलून गेला. मग आम्ही कसले सोडतोय! त्यानं सांगितलेल्या किमतीपेक्षा २०-२५ दिरहॅम कमी करूनच आम्ही त्या वस्तू तिथून घेतल्या. आम्हाला या बाजारात फिरायला साधारण एक तास दिला होता. अकरा वाजता एका विशिष्ट ठिकाणी जमायचं होतं. मग पुन्हा चालत तिथं जाऊन थांबलो. मात्र, आमच्यातलं एक जोडपं लवकर आलं नाही. त्यांची सोन्याची खरेदी चालली होती. तोवर आम्ही तिथं बाकांवर बसून टाइमपास केला. व्हिडिओ काढले. अखेर ते जोडपं आलं. आमच्या ग्रुपमधल्या २२ जणांपैकी बहुतेक पाच-सहा जणांनी सोनेखरेदी केली. बाकीच्यांनी आमच्यासारखीच इतर लहान-मोठ्या भेटवस्तूंची खरेदी केली. मग आम्ही बसमधून अबूधाबीकडं निघालो. दुबईच्या शेख झायेद रोडवरून जाताना पुन्हा एकदा ‘बुर्ज खलिफा’ आणि इतर उत्तुंग इमारतींचं दर्शन घडलं. मनोमन ‘बाय बाय दुबई’ म्हटलं.
आता आमची बस दुबईवरून अबूधाबीकडं धावू लागली होती. आम्ही दुपारी दोनच्या सुमारास अबूधाबीतील आमच्या हॉटेलमध्ये पोचलो. पण इथं आम्ही लगेच रूम ताब्यात घेणार नव्हतो. फक्त वॉशरूम ब्रेक घेतला आणि आमचे पासपोर्ट तिकडं जमा केले. तिथून आम्ही लगेच यास आयलंड भागात असलेल्या ‘फेरारी वर्ल्ड’कडं (खरा उच्चार फरारी) निघालो. अबूधाबी या शहराचा निम्मा भाग वेगेवगळ्या छोट्या छोट्या बेटांवर वसला आहे. दुबईच्या तुलनेत अबूधाबी हे लहान शहर वाटत असलं, तरी तेही पुष्कळ मोठं व आडवं पसरलेलं होतं. शिवाय हे राजधानीचं शहर असल्यानं इथला डौल काही वेगळाच होता. यास आयलंड हे तुलनेनं मोठं बेट. तिकडं जाण्यासाठी खाडी पूल ओलांडावा लागतो. डावीकडं अबूधाबी पोर्ट दिसत राहतं. प्रसिद्ध लुव्र म्युझियमही इकडंच आहे. तिथंच आणखी एक मोठं अम्युझमेंट पार्क विकसित होत आहे. थोड्याच वेळात आम्ही त्या ‘स्वप्नभूमी’त प्रवेश केला. डाव्या बाजूलाच ‘वॉर्नर ब्रदर्स’चा बोर्ड दिसला. भल्या मोठ्या जागेत हे ’वॉर्नर ब्रदर्स’ वसलं आहे. आमचं ‘फेरारी वर्ल्ड’ थोडं पुढं होतं. त्याशेजारीच ‘सी वर्ल्ड’ होतं. यास बेटावरील या भव्य विस्तार असलेल्या जागेत या तीन जादुईनगरी विकसित करण्यात आल्या आहेत. एका तिकिटात कुठल्याही दोन अम्युझमेंट पार्कमध्ये प्रवेश असतो. आम्ही ‘फेरारी वर्ल्ड’ आणि ‘सी वर्ल्ड’ निवडलं होतं. त्यापैकी ‘सी वर्ल्ड’ आम्ही दुसऱ्या दिवशी पाहणार होतो.
अखेर आमची बस ‘फेरारी वर्ल्ड’समोर थांबली. तिथं समोरच एक आणखी मोठा डोम होता. त्यात वेगवेगळी दुकानं, रेस्टॉरंट होती. इथंच असलेल्या ‘रसोईघर’ या गुजराती रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणार होतो. आम्ही तिथं पोचलो तेव्हा तीन वाजले होते. सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती. मग तिथल्या गरमागरम गुजराती थाळीवर आम्ही तुटून पडलो. अगदी पोटभर जेवण झाल्यावर बरं वाटलं. मग समोरच रस्ता क्रॉस करून आम्ही ‘फेरारी वर्ल्ड’मध्ये शिरलो. ‘फेरारी’ या जगप्रसिद्ध कार ब्रँडनं इथं हे अफलातून अम्युझमेंट पार्क उभं केलं आहे. यात वेगळं काय असेल, याची मला उत्सुकता होती. आत ‘फेरारी’च्या अनेक उत्तमोत्तम कार डिस्प्लेला होत्या, यात काही आश्चर्य नव्हतं. पण बाकी सगळा माहौल इतर चार अम्युझमेंट पार्कसारखाच होता. इथं एक-दोन एक्स्ट्रीम राइड होत्या. त्या सोडल्या, तर आम्ही सात-आठ राइड धनश्रीनं व मी केल्या. आमचा टूर मॅनेजर सागर याला त्या अवघड राइड करायच्या होत्या. मग नीलही त्याच्यासोबत गेला. ग्रुपमधली काही तरुण, धाडसी मंडळीही तिकडं गेली. मला ती एक कारमध्ये बसून त्या पार्कमध्ये हळूवार गतीनं फिरवतात, ती राइड आवडली. त्याशिवाय तो एक टर्बो टॉवर नावाचा प्रकारही एंजॉय केला. टायरमध्ये बसून गोल गोल फिरत एकमेकांना धडका मारायची ती राइडही केली. यातल्या काही राइड आम्ही सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओतही केल्या होत्या. इथंही त्या पुन्हा करताना मजा आली. तिथं ती कार रेसिंगची राइडही होती. पण तिला खूप गर्दी होती आणि टाइम स्लॉट आधी बुक करावा लागत होता. त्यामुळं आम्ही ती नुसतीच पाहिली. इतर भयंकर राइड लांबूनच बघितल्या, त्यात बसलेले लोक ओरडत-किचाळत होते. शिवाय तिथं मोठ्या आवाजात संगीत लावलेलं होतं. एकूण वातावरण एकदम झकास होतं. सगळेच मस्ती करण्याच्या मूडमध्ये होते. आम्ही शेवटी एक जीटी नावाची राइड केली. ती पण भन्नाट आणि बऱ्यापैकी वेगवान होती. यात त्या ‘फेरारी वर्ल्ड’च्या आवाराच्या बाहेर तो ट्रॅक नेऊन पुन्हा आत आणला होता. यानंतर आम्ही ते पार्क चारही बाजूंनी निवांत फिरून पाहिलं. ठिकठिकाणी आगामी ख्रिसमसच्या सणासाठीची सजावट करून ठेवली होती. एका ठिकाणी तर शुभ्र बर्फाचा आभास निर्माण करणारी सुंदर सजावट आणि तो ख्रिसमस ट्री उभारला होता. एका बाजूला इटलीतलं एक गाव उभं केलं होतं. त्याचीही काही तरी स्टोरी होती; पण आम्हाला आता निघण्याची गडबड असल्यानं ती नीट पाहता आली नाही. 
सात वाजता आम्ही सगळे बाहेर आलो. बस सगळ्यांची वाट पाहत थांबलीच होती. सगळ्यांनीच इथल्या राइड छान एंजॉय केल्या होत्या. उशिरा जेवण झालं होतं, म्हणून फार भूक नव्हती. इथून आम्ही अबूधाबी शहरात गेलो. रात्री तिथल्या ‘घी अँड राइस’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आमचं डिनर होतं. तिथं जेवलो. मग बसनी पुन्हा आमच्या ‘रमादा’ नावाच्या हॉटेलमध्ये आलो. इथं आता ‘चेक-इन’ केलं. माझा साडू नीलेश कुलकर्णी अबूधाबीतच असतो. आम्ही त्याला फोन केला होता. तो राहतो ते ठिकाण आमच्या हॉटेलपासून फक्त चार किलोमीटरवर होतं. मग तो टॅक्सी करून आम्हाला भेटायला हॉटेलवर आला. त्याच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. त्यानंतर तो आम्हाला त्याच्या घरी बोलवत होता. मात्र, बराच उशीर झाला होता व आम्ही दमलो होतो. मग तो तिथून पुन्हा टॅक्सी करून परत गेला. आमची रूम अठराव्या मजल्यावर होती. इथल्या लिफ्टला ठरावीक मजल्यांनंतर मर्यादित प्रवेश होता. आपल्या रूमचं कार्ड लावलं तरच लिफ्ट त्या मजल्यांपर्यंत जात होती. ही चांगली सोय होती. मी ती प्रथमच इथं पाहिली. इथली रूम आणि एकूण सोयी-सुविधांच्या मानानं आम्हाला दुबईचंच हॉटेल चांगलं वाटलं. अर्थात इथं एकच दिवस राहायचं होतं. शिवाय इतके दमलो होतो, की लगेच झोप लागली.

अबूधाबी, ११ डिसेंबर २०२४

आज आमचा इथला शेवटचा दिवस. सकाळी ब्रेकफास्ट झाला आणि लगेच साडेआठ वाजता ‘चेक-आउट’ केलं. आज आम्हाला सकाळी इथलं ‘बीएपीएस हिंदू मंदिर’ आणि ‘शेख झायेद ग्रँड मॉस्क’ बघायला - थोडक्यात देवदर्शनाला - जायचं होतं. ‘बीएपीएस’नं अबूधाबी ते दुबई रोडवर फेब्रुवारीत हे भव्य स्वामिनारायण मंदिर उभारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच वर्षी फेब्रुवारीत या मंदिराचं उद्घाटन झालं. यूएईच्या राष्ट्रप्रमुखांनी या मंदिरासाठी ‘बीएपीएस’ला जवळपास ७० ते ७५ एकर जागा मोफत दिली. त्यातील २७ एकर क्षेत्रावर हे मंदिर उभं आहे. बाकी जागेवर पार्किंग आणि इतर सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे. आम्ही सकाळी ११ च्या आसपास मंदिराच्या परिसरात पोचलो. तिथं प्रचंड बंदोबस्त दिसला. लांबून फोटो काढायला मनाई होती. विमानतळावर होते तशी काटेकोर सुरक्षा तपासणी, एक्स-रे स्कॅनिंग वगैरे प्रकार होऊन मगच आत सोडण्यात आलं. वर गेल्यावर एका बाजूला चप्पल-बूट ठेवण्याची रूम आणि एका बाजूला वॉशरूम अशी व्यवस्था होती. तिथं मंदिराच्या पायऱ्या सुरू होत होत्या. समोर जलतरण तलावासारख्या जागेत पाणी खेळतं ठेवण्यात आलं होतं. दुपारची वेळ झाल्यानं ऊन अगदी टोचायला लागलं होतं. त्या पायऱ्यांपासून पुढं आणि गाभाऱ्यापर्यंत फोटो काढायला परवानगी होती. त्यामुळं सगळ्यांनी तिथं फोटो काढून घेतले. तिथं अनेक स्थानिक हिंदूही येताना दिसले. विशेषत: लग्न समारंभ आटोपून दर्शनाला आलेली बरीच मंडळी, त्यातही गुजराती अधिक, दिसत होती. आम्ही त्या पायऱ्या चढून वर गेलो आणि मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केला. इथं जैन शिल्पकलेनुसार, अतिशय सुंदर कोरीवकाम आणि शिल्पं खोदलेल्या खांबांवर हे मंदिर उभं होतं. मंदिरात स्वामिनारायणांसोबत विष्णू-लक्ष्मी, राम-लक्ष्मण-सीता-मारुती, अय्यप्पा, बालाजी असे सर्व देव नांदत होते. तिथं मध्ये ध्यानासाठी मोकळी जागा ठेवली होती. आम्ही सगळीकडं फिरून तिथं पाच मिनिटं बसलो. फारच शांत वाटलं. पुन्हा प्रदक्षिणेसाठी बाहेर पडलो. त्या मार्गावर मंदिराच्या कळसांचंं सुंदर कोरीव काम पाहता आलं. मात्र, तिथं पाच पाच फुटांवर सुरक्षारक्षक उभे होते. बराच वेळ त्या परिसरात घालविल्यावर मग आम्ही खाली आलो. ग्रुपमधल्या मंडळींचं आता पायऱ्यांवर परत फोटोसेशन सुरू झालं. मग आम्ही तिथं एक स्मृतिवस्तू दुकान होतं, तिथं चक्कर मारून आलो. तिथं देवघरापासून ते धूपारतीपर्यंत बऱ्याच गोष्टी विक्रीस होत्या. आता सगळे एकत्र आले आणि आम्ही बाहेर पडायला निघालो. तिथं कोपऱ्यात ‘प्रसादम्’ वाटप सुरू होतं. मग सगळे तिकडं धावले. तिथं एका द्रोणात सुंदर गरमागरम खिचडी प्रसाद म्हणून समोर आली. खाताना तोंड पोळलं इतकी गरम होती. पण तिथं ती खायला छानच वाटलं. मग बरीच पायपीट करून आम्ही बसपाशी आलो. आमचे ड्रायव्हर व फारूकभाई गाडीतच थांबले होते. 

सगळ्यांना घेऊन बस आता अबूधाबीतील ग्रँड मॉस्ककडं निघाली. अर्ध्या-एक तासात आम्ही तिथं पोचलो. तिथं त्या मॉस्कला बऱ्याच ठिकाणांहून प्रवेशद्वारे होती. आमच्या बसनं जवळपास त्या मशिदीला पूर्ण प्रदक्षिणा घातली आणि मग आम्ही एका ठिकाणाहून आत शिरलो. ही मशीद भव्य होती, यात वादच नाही. इथं आत जाताना स्त्रियांनी पूर्ण अंग झाकलेले कपडे घालायचे, असा ड्रेसकोड आमच्या मॅनेजरनं चार चार वेळा बजावून सांगितला होता. तरीही दोघींच्या ड्रेसच्या बाह्या पूर्ण नव्हत्या, म्हणून मग त्यांना तिथून ते काळे ग्लोव्ह्ज विकत घ्यायला लागले. एका ठिकाणी जमा झालो. मग स्त्रिया व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या. तिथल्या एका बाईनं येऊन सर्व स्त्रियांना बघूनच ‘तपासलं’ आणि मग ती रांग आत सोडली. मग आम्हीही आत गेलो. तिथं ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी ऑपरेटेड गाड्या होत्या. मग फारूकभाई काही लोकांना घेऊन त्या गाडीतून पुढं गेले. आमचा मॅनेजर सागर याच्या हातावर गोंदलं होतं, म्हणून तो आला नाही. (नंतर तो म्हणाला, की त्याला तसंही मशिदीत यायचंच नव्हतं. मी याआधीही कधी गेलेलो नाही.)  त्या अंडरपासमधून बरीच पायपीट केली. दोन्ही बाजूला शेख झायेद यांनी ही मशीद उभारताना काय विचार केला, सर्व धर्मांचे धर्मगुरू तिथं कसे बोलावले होते वगैरे चित्रं व फोटो होते. ती पायपीट संपल्यावर एका ठिकाणी एस्कलेटरवरून वर गेल्यावर एकदम त्या मशिदीच्या समोरील प्रांगणात आम्ही आलो. इथून आता त्या मशिदीची भव्यता बऱ्यापैकी जाणवत होती. इटलीतून आणलेल्या संगमरवरात बरंचसं बांधकाम आहे. या मशिदीत एका वेळी ५५ हजार लोक नमाज पढू शकतात, असं फारूकभाईनं सांगितलं. तिथं आत फिरण्यासाठी कठडे उभारून एक रस्ता केला होता. त्यातून आम्ही फिरलो. आतली झुंबरं अतिशय मोठी व सुंदर होती. तिथला गालिचा इराणमधील १२०० कामगारांनी एकहाती विणला आहे, अशी माहितीही आमच्या गाइडनं दिली. तो गालिचाही फार सुंदर होता, यात शंका नाही. मशिदीचा परिसर अतिशय टापटीप व स्वच्छ होता. अनेक पर्यटक अतिशय शांतपणे तिथं फिरत होते. जागोजागी त्यांचे लोक मार्गदर्शनासाठी तैनात होते. इथं बरीच पायपीट झाल्यावर आम्ही बाहेर आलो. फोटोही बरेच झाले. बाहेर आल्यावर ती बॅटरी ऑपरेटेड गाडी आली. आम्ही लगेच तिच्यात बसलो आणि त्या एस्कलेटरपाशी आलो. तिथून पुन्हा त्या अंडरपासमधून तंगडतोड करीत सागर बसला होता, तिथपर्यंत आलो. इथं आता बायकांना डोईवरचे वस्त्र काढायची ‘परवानगी’ होती म्हणे. आमच्या ग्रुपमधल्या अनेक बायकांनी लगेच त्याची अंमलबजावणी केली. 
इथंही खाली त्या एरियात वॉशरूम आणि जोडीला बरीच दुकानं होती. आम्हाला अर्थात तिथं काही खरेदी करायची नसल्यानं आम्ही सगळे लगेचच निघालो आणि बाहेर आलो. आता दुपारचे अडीच वाजून गेल्यानं सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आता आमचा मोर्चा पुन्हा एकदा यास आयलंडकडे निघाला. काल थांबलो होतो, तिथंच बस थांबली. आजचं दुपारचं जेवण पुन्हा ‘रसोईघर’मध्येच होतं. तीन वाजून गेल्यानं आम्ही सगळेच त्या गुजराती थाळीवर तुटून पडलो.
जेवण झाल्यावर पुन्हा आम्हाला न्यायला बस आली. तिथून सगळे ‘सी वर्ल्ड’कडे निघालो. ते खरं तर अगदी जवळ होतं. पण पायी जायची परवानगी नव्हती म्हणे. पाच मिनिटांत तिकडं उतरलो. आमची तिकिटं आधीच काढलेली असल्यानं फारूकभाईंनी सगळ्यांना एकेक करून आत सोडलं. इथून आम्हाला थेट विमानतळावर जायचं असल्यानं सगळ्यांना साडेपाचपर्यंत परत त्या ठिकाणी यायला सांगितलं. खरं तर हातात वेळ कमी होता. म्हणून आम्ही लगेच त्या ‘सी वर्ल्ड’मध्ये शिरलो. मुख्य मंडप गोलाकार व बराच मोठा होता. त्या अर्धवर्तुळाकृती डोमखाली वेगवेगळे विभाग होते. त्या जगभरातल्या समुद्रांतील मासे व इतर जलचरांचं जीवन पाहायला मिळत होतं. आम्हाला अंटार्क्टिका विभागातले पेंग्विन बघण्यात रस होता. तिथं गेलो. पेंग्विन बघितले, पण तिथल्या अतिथंड तापमानात अक्षरश: कुडकुडायला झालं. लगेच बाहेर आलो. मनात विचार आला, या वाळवंटी प्रदेशात आपण राहतो आहोत, हे त्या पेंग्विनना कळत तरी असेल का? दुसरीकडं एका ठिकाणी डॉल्फिन बघायला मिळाले. त्यांचे ट्रेनरही तिथंच होते. ते आपल्याला विशिष्ट पद्धतीने हातवारे करायला सांगतात. आपण तसा हात फिरवला, की तो डॉल्फिन त्याच दिशेनं उडी मारायचा. एकूण मजा आली. तिथं फ्लेमिंगोही होते. यापूर्वी सिंगापूरच्या जुरांग बर्ड पार्कमध्ये असे जवळून फ्लेमिंगो बघितले होते. हे ‘सी वर्ल्ड’ चांगलं होतं; मात्र आमच्याकडं वेळ कमी होता. आम्ही पुन्हा त्या मुख्य गोलात आलो, तेव्हा तिथं एक चमू नृत्यनाटिका सादर करत होता. उपस्थित प्रेक्षकांकडून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत होता. आम्ही मात्र एक झलक बघून परत निघालो.

बरोबर साडेपाच वाजता आम्ही पहिल्या जागी येऊन थांबलो. बाकीची मंडळी येईपर्यंत पावणेसहा-सहा वाजत आले. सूर्यास्त झाला. पश्चिम दिशा केशरिया रंगानं न्हाऊन निघाली होती. त्या परिसरात अतिशय शांत वाटत होतं. मंद वारं सुटलं होतं. आम्ही सगळे अगदी हळूहळू पावलं टाकत बसकडं निघालो होतो. खरोखर, त्या ‘स्वप्नभूमी’तून पाय निघत नव्हता. अर्थात निघावं तर लागणारच होतं. सगळे बसमध्ये बसल्यावर सागरनं आणि फारूकभाईंनी निरोपाचं भाषण ठोकलं. ते व्यावसायिक सफाईचं असलं, तरी सगळ्यांना भिडलं. आम्ही टाळ्या वगैरे वाजवून त्यांचं आणि ड्रायव्हर तबरेजभाई यांचं कौतुक केलं. इथून विमानतळ अगदी जवळ होता. आम्ही दहा मिनिटांत शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन पोचलो. इथून ट्रॉल्या वगैरे घेऊन सगळे आत शिरलो. काहींना व्हॅट रिटर्न घ्यायचा होता, ते त्या काउंटरला गेले. आम्ही सरळ ‘चेक-इन’ काउंटरला गेलो. इथं फारशी गर्दी नसल्यानं सगळे सोपस्कार भराभर झाले. आमचं फ्लाइट आठ वाजून ५० मिनिटांनी होतं. आम्ही पावणेसात वाजताच आत येऊन बसलो होतो. मग त्या विमानतळावर जरा इकडं-तिकडं फिरून टाइमपास केला. नीलला एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट मिळालं तर हवं होतं. तसं एक दुकान सापडलं. पण सगळ्या वस्तू अपेक्षेप्रमाणं चिनी होत्या. अर्थात काहीच न घेता निघालो. आम्हाला सोबत पॅक डिनर दिलं होतं. ते विमानतळावर बसून खावं की विमानात नेऊन खावं, असा जरा डिलेमा होता. अखेर विमानात ते नेऊ देतात हे कळल्यावर विमानातच खाऊ, असं ठरलं. दुपारचं जेवण उशिरा झाल्यानं कुणालाच फारशी भूक नव्हती. 
अखेर वेळेवर बोर्डिंग सुरू झालं. तेच ‘अकासा एअर’चं ‘बोइंग ७३७- मॅक्स’ एअरक्राफ्ट होतं. ते वेळेत निघालं. म्हणजे प्रत्यक्षात ‘टेक-ऑफ’ झालं, तेव्हा सव्वानऊ वाजले होते. तो सीटबेल्टचा सिग्नल ऑफ झाल्याबरोबर मी ते बरोबर आणलेलं पॅक डिनर (बिर्याणी होती) फोडून खाल्लं. माझ्या नावे असलेलं ती चीजी बर्गर नको म्हणून सांगितलं व एक मस्त ‘मसाला चाय’ घेतला. मला प्रवासात झोप येत नाहीच. बराच वेळ जागा होतो. क्वचित कधी तरी झोप लागली. बरोबर तीन तासांनी म्हणजे सव्वाबाराच्या सुमारास, म्हणजे भारतातील वेळेनुसार पावणेदोनच्या सुमारास आम्ही मुंबईत उतरलो. विमान थांबलं तिथं नेमका एअरोब्रिज नव्हता. मग त्या बसनं उभ्यानं प्रवास करणं आलं. मुख्य इमारतीत येऊन, इमिग्रेशन वगैरे करून बाहेर पडेपर्यंत अर्धा तास गेला. सामान ताब्यात घेतलं. मॅनेजर सागरसह सर्वांंचा निरोप घेतला आणि बाहेर आलो. कॅब आधीच बुक केली होती. तो ड्रायव्हर जरा नवोदित होता. त्याला आम्ही दिसेपर्यंत आणखी थोडा वेळ गेला. शेवटी आमची भेट झाली. पहाटे पावणेतीनला आमचा पुण्याकडं प्रवास सुरू झाला. ही वेळ डेंजर होती. मी त्या ड्रायव्हर पोराशी गप्पा मारत, त्याला जागता ठेवत, त्याच्या ड्रायव्हिंगकडं लक्ष देत असा प्रवास केला. सुदैवानं घाटात फार जॅम वगैरे नव्हतं. आम्ही बरोबर सहा वाजता घरी पोचलो. त्या नवशिक्या ड्रायव्हरचे आभार मानले आणि घरात शिरलो. पुण्यात प्रचंड थंडी होती. त्यामुळं आधी गोधडीत शिरून गुडुप झोपलो. इथूनही वेगळ्या स्वप्नभूमीचा प्रदेश सुरू होतो. तोवर दुबई-अबूधाबीतल्या स्वप्नभूमीची दृश्यं मिटत चाललेल्या डोळ्यांपुढं कॅलिडोस्कोपसारखी सरकत होती...



(समाप्त)

----

लंडनवारी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

16 Dec 2024

दुबई ट्रिप - डिसेंबर २४ - भाग २

खेळ मांडियेला वाळवंटी...
--------------------------------


दुबई, ८ डिसेंबर २०२४

आम्ही साधारण अर्धा-एक तास असू त्या १२४ व्या मजल्यावर. तिथे गोल फिरून सर्व बाजूंनी आजूबाजूचा परिसर पाहता येत होता. आम्ही निवांत सगळं पाहिलं. अर्थातच फोटो, व्हिडिओ काढून झाले. मग जिन्याने १२५ व्या मजल्यावर गेलो. तिथंही असाच, पण जरा लहान डेक होता. शिवाय स्मृतिवस्तू विकणारं एक दुकानही होतं. मागच्या बाजूनं समुद्र होता. तिकडून संध्याकाळचं ऊन येत होतं. त्या ऊन-सावलीच्या प्रकाशात फोटो चांगले येत होते. तिथून खरं तर आमचा पाय निघत नव्हता. पण इलाज नव्हता. आता निघावंच लागणार होतं. या मजल्यावरून खाली जायला कमी गर्दी होती. आम्ही ती लाइन धरली. बऱ्याच वेळानं लिफ्ट आली. ही लिफ्ट जरा मोठी होती. साधारण २०-२१ लोक त्यात बसू शकत होते. आम्ही लगेच नंबर लावला आणि खाली उतरलो. पुन्हा बरंच चालत दुबई मॉलमध्ये आलो. आमचे खाण्याचे जिन्नस लॉकरमधून ताब्यात घेतले. तिथं जरा वेळ बसलो. चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. आम्हाला इथं दोन तास फ्री होते. आम्ही तो मॉल फिरू शकत होतो; मात्र दमल्यामुळं आम्ही तिथंच बसलो. सोबत आणलेला खाऊ तिथं बसून खाल्ला. बाकी तो मॉल आपल्याकडच्या कुठल्याही मॉलसारखाच होता. प्रचंड मोठा होता एवढं मात्र खरं. इथं समोर कृत्रिम तलावासारखा एक जलाशय होता. तिथं सहा वाजता फाउंटन शो होणार होता. तो बघून आम्ही निघणार होतो. एव्हाना माझ्या फोनची बॅटरी संपत आली होती. तिथं एका ठिकाणी प्लग दिसला. तिथं चार्जर लावायला लागलो, तोच एक सुरक्षारक्षक आला आणि सांगू लागला, की इथं लावू नका. तिकडं हेल्प डेस्क आहे तिथं जा. मग मी चालत चालत थोड्या अंतरावर असलेल्या हेल्प डेस्कवर गेलो. तिथं मी मला फोन चार्जिंग हवं आहे, असं सांगितलं. त्यावर तिथल्या माणसानं संगणकावर माझी माहिती भरून घेतली. लायसन्स आहे का, विचारलं. ते माझ्या खिशात होतं. ते त्यानं ठेवून घेतलं आणि एक पॉवर बँक दिली. मी ती तीन तास वापरू शकतो आणि नंतर परत देऊन माझं लायसन्स घेऊन जाऊ शकतो, असं त्यानं सांगितलं. माझं काम झालं. माझं लायसन्स तिथं दिलं आणि ती पॉवर बँक घेऊन आलो. पुढच्या दोन तासांत माझा फोन बऱ्यापैकी चार्ज झाला. मग तो फाउंटन शो सुरू होण्यापूर्वी मी ती पॉवर बँक परत देऊन माझं लायसन्स परत घेऊन आलो. सहा वाजण्यापूर्वी आम्ही समोरच्या त्या मोकळ्या जागेत गेलो. तिथं आधीच भरपूर लोक येऊन बसले होते. तिथली बसायची बाकं, कट्टे वगैरे सगळं भरलं होतं. आम्ही जरा मागच्या बाजूला असलेल्या एका कट्ट्यावर बसलो. नीलला कॉफी किंवा असंच काही तरी प्यायला हवं होतं. समोर एक स्टॉल होता. मग तिथं एक लेमोनेड आम्ही विकत घेतलं आणि ते दोघं प्यायलो. थोड्याच वेळात तो शो सुरू झाला. एकेकदा ते कारंजं बरंच म्हणजे सहा-सात मजल्यांएवढं उंच गेलं, तेव्हा जमलेल्या सगळ्यांनी एकच जल्लोष केला. आता अंधार पडल्यामुळं हा शो आणि आजूबाजूच्या इमारती हजारो दिव्यांनी झगमगत होत्या. मागे ‘बुर्ज खलिफा’ची इमारतही अगदी लखलखत होती. किती फोटो काढावेत आणि किती नाही, असं झालं होतं! अर्थात फाउंटन शो संपल्यावर आम्हाला निघणं भाग होतं. त्या मॉलमधून चालत चालत बाहेर बसपर्यंत येईतो बराच वेळ गेला. साधारण सात वाजता आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो. आता आजचं डिनर हे क्रूझवर असणार होतं. तेव्हा आमची बस आता तिकडं निघाली. 
दुबईत एकच नैसर्गिक कालवा किंवा जलस्रोत आहे. बाकी सगळे कृत्रिमरीत्या समुद्रातून पाणी वळवून तयार केले आहेत. अशाच एका मोठ्या कालव्यातून बोटिंग चालते. आपल्याकडं गोव्याला मांडवीतून जशा क्रूझ चालतात, साधारण तसाच प्रकार. फक्त इथलं आजूबाजूचं नेपथ्य फारच भपकेबाज आणि नेत्रदीपक होतं. दोन्ही बाजूंना उत्तुंग इमारती आणि त्यातून चालणारी आपली बोट असा सगळा नजारा होता. त्या छोट्याशा बोटीला क्रूझ म्हणत असले, तरी ती गोव्यातल्या त्या क्रूझर बोटींपेक्षाही जरा लहानच होती. आमची वेळ रात्री आठची होती. मग थोडा वेळ तिथं वेटिंग करणं आलं. बरोबर आठ वाजता त्या जेट्टीवरून आम्हाला आत सोडलं. तिथं बऱ्याच नौका डुलत होत्या आणि हळूहळू पर्यटक येत होते. इथल्या पाण्याचा एकदम घाणेरडा असा वास आला. तो अगदी नाकातच बसला. तसेच नाक मुठीत धरून पुढं गेलो. त्या नौकेत चढल्यावर तो वास गेला. सुदैवानं आम्हाला वरच्या डेकवर जागा मिळाली होती. आम्ही एक टेबल धरलं. बोट नऊ वाजता सुटणार होती. तोवर तिथं एक चिनी दिसणारी मुलगी फटाफट सगळ्यांचे फोटो काढू लागली. ती नंतर त्याचे पैसे मागणार हे उघड होतं. तरी तिला विचारल्यावर ‘देअर इज नथिंग फ्री इन दुबाय’ असं हसत हसत म्हणाली. मग मीही खिदळत ‘नको गं बाय’ म्हणत तिला वाटे लावलं. साधारण साडेआठला त्यांनी ते बुफे जेवण सुरू केलं. आम्ही भुकेजले होतोच. आधी आलेल्या कोकसदृश ‘वेलकम ड्रिंक’नं भूक आणखीनच वाढली होती. मग बुफेची रांग धरली. अर्ध्या तासात आमचं जेवण होत आलं, तशी ती बोट सुटली. आता आम्ही दोन्ही किनाऱ्यांवरचा सगळा ‘नजारा’ बघत निघालो. आम्हाला वाटलं, त्यापेक्षा ही राइड बरीच मोठी निघाली. त्यांनी आम्हाला पुष्कळ लांब नेलं. एका टोकाला ‘दुबई आय’ हे जायंट व्हील होतं. तिथपर्यंत आम्ही गेलो. जेवण आटोपलं, तसं डेकवर नाचगाणी सुरू झाली. एका अरबी बाबाने ‘याराना’तल्या बच्चनसारखं अंगभर लाइट लावून जोरदार डान्स केला. मग नंतर ते प्रवाशांना नाचायला बोलवायला लागले. हिंदी गाणी लागली. नंतर तर ‘झिंगाट’ही लागलं तेव्हा आमच्या ग्रुपमधल्या उत्साही बायकांनीही नाचून घेतलं. आज आमचं नशीब जोरावर होतं. त्यामुळं ‘दुबई शॉपिंग फेस्टिव्हल’तर्फे क्वचित कधी तरी होणारा ड्रोन लेझर शोही अवकाशात सुरू झाला. परतीच्या प्रवासात तो अद्भुत असा शो आकाशाच्या पटलावर पाहताना भान हरपलं. या दोन महिन्यांतच हा शो सादर होतो. सध्या इथला सीझन सुरू झाल्यानं हा शो दाखवण्यात आला होता आणि आम्ही भाग्यवंत, म्हणून आम्हाला तो सहजच पाहायला मिळाला. आता नौका हळूहळू एक राउंड पूर्ण करून पुढच्या बाजूनं आम्ही जिथून चढलो होतो, त्या जेट्टीच्या बाजूला येऊन थांबली. मग सावकाश खाली उतरलो आणि जेट्टीवरून पुन्हा बसकडं निघालो. बसनं मग पुढच्या अर्ध्या तासात हॉटेलवर सोडलं. बसमधून झगमगत्या दुबईचं निवांत दर्शन घेताना अजिबात कंटाळा येत नव्हता. सुखाच्या लहरींवर तरंगतच आम्ही हॉटेलवर परतलो. संपूर्ण दिवस भरपूर हिंडणं आणि बघणं झालं होतं. त्यामुळं अंथरुणाला पाठ टेकताच निद्रादेवी गळ्यात पडल्या.

दुबई, ९ डिसेंबर २०२४

आजही नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट करून, नऊ वाजता एकत्र जमायचं होतं. आज मिरॅकल गार्डन आणि डेझर्ट सफारी असे दोनच मुख्य कार्यक्रम होते. त्यातही ‘डेझर्ट सफारी’विषयी विशेष ऐकलं होतं. म्हणून मला त्या सफारीची अधिक उत्सुकता होती. अर्थात पहिल्या दिवसापासून शॉपिंगचीही अनेकांना उत्सुकता होती. म्हणून मग टूर मॅनेजर सागरनं आज पहिल्यांदा बस जुन्या दुबईतील एका दुकानापाशी नेली. इथं फक्त ड्रायफ्रूट्स, खजूर, चॉकलेट्स अशा गोष्टी होत्या ‘गोल्ड सूक’ला (इथला सराफी बाजार) उद्या जायचंच होतं. त्यामुळं इथं फक्त खाऊची खरेदी करायची, असं मॅनेजरनं सांगितलं. आम्ही पडत्या खजुराची आज्ञा पाळून, लगेच ती खरेदी करून टाकली. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी तिथं किलोकिलो खजूर, ड्रायफ्रूट्स आणि खजुराची ती चॉकलेटं यांची शॉपिंग करून टाकली. आता इथून आमची बस निघाली ती थेट मिरॅकल गार्डनला. या वाळवंटात शेकडो प्रजातींची फुलं आणि झाडं या लोकांनी रुजवली आहेत. हे अतिशय कष्टाचं आणि खर्चीक काम, म्हणून त्याचं कौतुक अधिक! मिरॅकल गार्डनमध्ये शिरताना मला सिंगापूरच्या ‘गार्डन बाय द बे’ या भव्य उद्यानाची आठवण झाली. आम्ही सहा वर्षांपूर्वी तिथं गेलो होतो. दुबईचं हे गार्डन तुलनेनं लहान असलं, तरी अतिशय सुंदर होतं, यात शंका नाही. असं गार्डन म्हणजे फोटो काढण्याची सुवर्णसंधीच. आम्ही तिथं भरपूर फोटो, व्हिडिओ, रील्स काढले. नंतर जरा ऊन जाणवायला लागलं. या बागेत झाडांना, वेलींना घोडे, हत्ती, विमान असे विविध आकार दिले आहेत. फुलांचं तर एवढं वैविध्य होतं, की नजर तृप्त होत होती. इथं मधोमध एक जरा उंच जागा होती. तिथं पायऱ्यांनी चढून जाता येत होतं. तिथं आइस्क्रीम वगैरे विकायला होतं. शिवाय खुर्च्या ठेवल्या होत्या. फोटो काढून मिळत होते. आपले भारतीय पर्यटक सर्वत्र होतेच. त्यातही पहिल्यांदा परदेश प्रवास करणाऱ्या, विशेषत: मराठी महिला चटकन ओळखू येत होत्या. झगमगीत साडी, चमकणारी पर्स, गॉगल आणि मोठ्या आवाजात बडबड हे त्यांना ओळखायचं व्यवच्छेदक लक्षण होतं. आम्ही पूर्ण फिरून त्या गार्डनची चक्कर पूर्ण केली. बाहेरच्या गोलाच्या परिघावर वेगवेगळी दुकानं होती. तिथं मग फ्रिजवर चिकटवायच्या स्मृतिवस्तूंची खरेदी केली. आता खरं तर उन्हाची वेळ झाली होती आणि भूकही लागली होती. मग आम्ही गार्डनमधून बाहेर पडलो आणि बसमध्ये एसीत जाऊन बसलो. सोबत आणलेला कोरडा खाऊ खाल्ला. थोड्या वेळात सगळी मंडळी परतली. आमच्या ग्रुपमधील दोन तरुण जोडपी होती, त्यांचं सगळीकडं जरा अधिक वेळ फोटोसेशन चालायचं. त्यामुळं ती चौघं सगळ्यांत शेवटी यायची. नंतर हळूहळू सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि माफक चेष्टा, टोमणे हेही सुरू झालं. औपचारिकतेची भिंत आता पडू लागली होती. 
आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी निघालो. दुबईतील ‘पेशवा’मध्ये पोचलो. ही खरं तर पहिली, मूळ शाखा. आम्ही पहिल्या रात्री ‘इब्न बतुता’मध्ये जेवलो ती शाखा नंतर सुरू झाली. इथंही ‘मराठमोळं’ इं. तेच जेवण होतं. आमचा मॅनेजर सागर यानं तिथल्या लोकांना सांगितलं, की हा मेन्यू आधीच तिकडं झालाय. मग ते म्हणाले, की थोडा वेळ थांबा. मेन्यू बदलतो. आम्हाला त्यांनी एक वेगळा हॉलच दिला होता. आम्ही वाट पाहत बसलो. पण थोड्या वेळातच आमची तपश्चर्या फळाला आली. चक्क पिठलं-भाकरी असं जेवण आलं. इतर पदार्थही होतेच. पण आम्ही पिठलं-भाकरीवर अधिक ताव मारला, हे सांगायला नकोच. इथं नंतर त्या मालकीणबाई जोशी यांची भेट झाली. तिथं इराणी केशरही विकायला होतं. भारतीय चलन चालणार होतं. मग ती एक डबी विकत घेतली. बाहेर पडल्यावर बरीच भारतीय रेस्टॉरंट, आयुर्वेदिक दुकानं वगैरे दिसली. इथंच ती प्रसिद्ध लिमोझिन कारही रस्त्यात दिसली. तिचे फोटो काढले. 
आता आम्ही पुन्हा हॉटेलला जाणार होतो. आता ही बस आम्हाला तिथं सोडून जाणार होती. पुढचा टप्पा ‘डेझर्ट सफारी’चा असल्यामुळं त्या वेगळ्या गाड्या आम्हाला न्यायला येणार होत्या. हॉटेलला पोचलो. जरा फ्रेश झालो. मग अडीच वाजता सागरनं ग्रुपमधील लोकांचे पाच-पाच, सहा-सहा जणांचे गट केले. ज्या ज्येष्ठ नागरिकांना सफारीची राइड हळू वेगात हवी होती, अशांचा वेगळा गट झाला. आमच्या गटात आम्ही तिघं आणि दोन काका आले. थोड्याच वेळात आमचा ड्रायव्हर आला. तो आम्हाला घेऊन बेसमेंटमधील पार्किंगमध्ये गेला. नील पुढे बसला, ते दोन काका मध्ये बसले आणि धनश्री व मी सर्वांत मागे बसलो. आमची ‘लँड क्रूझर’ लगेच निघाली. दुबई शहराच्या बाहेर पडून २०-३० किलोमीटर दूर गेल्यावर वाळवंट सुरू झालं. तिथं सगळ्या गाड्या पुन्हा एकत्र थांबल्या. इथं या गाड्यांच्या चाकांमधली हवा जरा कमी करतात. तो सोहळा पार पडल्यावर आमची ‘डेझर्ट सफारी’ एकदम धडाक्यात सुरू झाली. आमच्या ड्रायव्हरनं सगळ्यांना सीट बेल्ट लावायला सांगितलं. आम्ही सज्ज होऊन बसलो. गाडी वाळूच्या टेकाडांवर जोरात धावू लागली. इथं ते ट्रॅक तयारच होते. आमच्या पुढे आणि मागे बऱ्याच गाड्या धूळ उडवीत धावताना दिसू लागल्या. आमच्या ड्रायव्हरला हे रोजचं असणार. त्यानं सरावानं त्या टेकाडांवरून गाडी शब्दश: ‘उडवायला’ सुरुवात केली. आम्ही एकदम जोरजोरात हसायलाच लागलो. फारच धमाल येत होती. बरंच अंतर कापल्यावर मग पुन्हा एके ठिकाणी सगळ्या गाड्या एकत्र थांबल्या. इथं जागोजागी हातात तो ‘बाज’ पक्षी घेऊन, अरबी वेषातले पुरुष उभे होते. तो पक्षी आपल्या हातावर, डोक्यावर ठेवून फोटो काढले जात होते. याला अर्थातच पैसे होते. माझं प्राणी व पक्ष्यांवरच प्रेम ‘दुरून डोंगर साजरे’ याच प्रकारातलं असल्यानं मी काही त्या पक्ष्याला हात लावला नाही. तसेही त्या पक्ष्याच्या पायाला दोरा बांधून, पट्टीने त्याचे डोळे झाकून एकूण हालच चालवले होते त्या माणसाने. ते फोटोसेशन एकदाचं आटपलं आणि आम्ही पुन्हा दणके खात एका ठिकाणी थांबलो. या लोकांनी वाळवंटात मध्येच चौसोपी वाड्यासारखं बांधकाम करून आत अत्याधुनिक सोयीसुविधा केल्या आहेत. मला एके ठिकाणी मोबाइलला रेंज देणारा टॉवर लावलेला एक ट्रकही उभा दिसलो. आम्हाला त्या वाड्यात नेलं. ते सगळं स्मृतिवस्तू दुकान, हे घ्या, ते घेऊन बघा टाइप सगळं होतं. महत्त्वाचं म्हणजे तिथं वॉशरूमची व्यवस्था होती. कुणाला त्या छोट्या, जाड टायरच्या बॅटरीवरच्या गाड्या चालवायच्या असतील, तर तीही सशुल्क सोय तिथं उपलब्ध होती. आतल्या दुकानांत अरबी ड्रेसपासून ते घड्याळांपर्यंत अनेक वस्तू होत्या. आम्ही फक्त विंडो शॉपिंग केलं आणि बाहेर आलो. आमचा मुख्य कॅम्प दुसरीकडं होता, हे मी तोवर सागरकडून कन्फर्म करून घेतलं. मग आम्ही पुन्हा आमच्या ‘लँड क्रूझर’मध्ये बसलो आणि पुन्हा दणके खात, आपटत, उडत ‘डेझर्ट कॅम्प’कडं निघालो. थोड्याच वेळात आमचा ‘रायना डेझर्ट कॅम्प’ आला. ‘रायना’ ही इथली बडी पर्यटन कंपनी आहे. आमच्या कंपनीचं त्यांच्यासोबत ‘टायअप’ होतं. तसं ते इथं प्रत्येकालाच स्थानिक कंपनीशी करावं लागतं. तुम्ही (म्हणजे भारतातील टूर कंपनी) इथं स्वतंत्रपणे टूर ऑपरेट करूच शकत नाही. 

इथं मुख्य कॅम्प असल्यानं हा ‘वाडा’  आकारानं मोठा होता. चारही बाजूंनी बांधकाम आणि मध्ये मोकळी जागा अशी रचना होती. इथं उंट सफारी, आत मेंदी, हुक्का वगैरे सगळ्या सोयी होत्या. मुख्य जेवण तर होतंच. मधोमध तयार केलेल्या उंच अशा स्टेजवर होणारा बेली डान्स आणि इतर मनोरंजक कार्यक्रम हे मुख्य आकर्षण होतं. आम्ही आत शिरलो तेव्हा पावणेसहा-सहा वाजत आले होते. संधीप्रकाश होता. मंद वारा सुटला होता. मावळतीचं आकाश केशरी झालं होतं. आकाशात दर मिनिटाला असं एक विमान इकडून तिकडं जात होतं. खाली दणकेबाज म्युझिक सुरू झालं होतं. एकूण माहौल होता. आम्हाला हाताला ते बँड बांधून आत सोडलं. एका ठिकाणी बसायची जागा दिली. मी अगदी त्या मधल्या रंगमंचाच्या जवळची खुर्ची पटकावली. आमच्या ग्रुपमधली इतर मंडळीही त्याच टेबल रांगेत बसली. तिथं बारही होता. फक्त मद्य फुकट नव्हतं. आपापल्या पैशानं घ्यायचं होतं. आम्ही अर्थातच फुकट मिळणाऱ्या ज्यूसकडं धाव घेतली. हळूहळू अंधार पडायला लागला. मग ते मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले. सर्वांत आधी एका अरबी वेषातील दाढीधारी पुरुषाने येऊन जोरदार नाच करून दाखवला. सर्कशीतील कलाकारांचं असतं तसं त्याचं लवचीक शरीर अक्षरश: लवलवत होतं. मग आणखी एक पथक आलं. त्यात तीन पुरुष आणि तीन मुली होत्या. त्यांचाही नाच जोरदार झाला. मग एक ढोलकनृत्य झालं. शेवटी सगळ्यांना ज्याची उत्सुकता होती, ती बेली डान्सर आली. मात्र, ती जे काही नाचली, त्यात फार दम नव्हता. अगदीच नवखी आणि नवशिकी वाटली. पण ती मधल्या एका डान्सनंतर परत आली, तेव्हा मात्र तिनं जोरदार डान्स करून दाखवला. तरीही तो ‘बेली डान्स’ नक्कीच नव्हता. 
मध्येच मला हुक्का ओढून पाहायची लहर आली. एका कोपऱ्ऱ्यात ती सोय होती. तिथं ‘शीशा’ असं लिहिलेलं काउंटरही होतं. तिथं ‘पेड’ सुविधा होती आणि त्यासाठीच हुक्का भरला जात होता. मी तिथं जाऊन पाहिलं. काही लोक तिथं बसले होते; पण फुकट असलेली ती सुविधा तिथं सुरू असलेली काही दिसली नाही. मग निमूट जागेवर येऊन बसलो. थोड्या वेळात ‘जेवण तयार आहे’ अशी घोषण झाली. मग आम्ही सगळे तिकडं धावलो. बुफे लावलेला होता. या वेळी मी अरब स्पेशालिटी असलेले काही गोड पदार्थ घेतले. एक खजुराच्या केकसारखा पदार्थ होता, त्याचं नाव विसरलो. पण तो छान लागत होता. बाकी भारतीय जेवणही होतंच. भूक लागली होती, त्यामुळं आम्ही तिथं आडवा हात मारला. इकडं मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच होते. ती कथित बेली डान्सर तिसऱ्यांदा मंचावर आली आणि या वेळी ‘लैला मैं लैला’वर नाचून गेली. मला क्षणभर जामखेडच्या पंचमीच्या जत्रेत बसल्यासारखं वाटलं. असो. 
ही मौज लवकरच संपणार होती, तशी ती संपली. आमच्या मॅनेजरनं आम्हाला इथून लवकर बाहेर पडण्याची सूचना केली होती. याचं कारण या लँड क्रूझर गाड्या एकदम बाहेर पडतात आणि त्या वाळवंटी ट्रॅकवरही ट्रॅफिक जॅंम होण्याची शक्यता असते म्हणे. मग आम्ही सगळे गडबडीतच बाहेर पडलो आणि आपापल्या गाड्यांमध्ये जाऊन बसलो. जाताना पुन्हा ‘हवाहवाई’ अशी दणदणीत सफर झाली. एकदाचं ते वाळवंट संपलं आणि आम्ही डांबरी रस्त्यावर आलो. पुन्हा एके ठिकाणी थांबून सगळ्यांनी आपापल्या गाड्यांमध्ये हवा भरून घेतली. मग आमची गाडी सुसाट निघाली. नऊ-साडेनऊच्या दरम्यान आम्ही हॉटेलमध्ये येऊन पोचलोसुद्धा. 



(क्रमश:)

-------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

दुबई ट्रिप - डिसेंबर २४ - भाग १

ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड...
-------------------------------


पुणे व मुंबई, ७ सप्टेंबर २०२४

गेल्या वर्षी लंडनची मोठी सहल झाल्यानंतर माझा उत्साह भलताच वाढला. गेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या भरात मनात अचानक विचार आला, की पुढील वर्षी आपण पन्नासाव्या वर्षात पदार्पण करतोय, तर त्या दिवशी आपण पृथ्वीवरच्या सर्वांत उंच इमारतीवर - अर्थात ‘बुर्ज खलिफा’वर - असायला हवं. मनात काय, काय वाट्टेल ते येईल हो! पण ते अंमलात येणं तितकंच कठीण. पण आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करायची असल्यास ती होतेच, असा माझा अनुभव आहे. माझ्या सततच्या घोकण्याला वैतागून म्हणा,  किंवा मला वाढदिवसाची गिफ्ट द्यायची म्हणून म्हणा, पण अखेर धनश्रीही तयार झाली. ट्रिपला आमच्यासोबत कुणी तरी आलं तर आम्हाला बरं वाटतं. म्हणून नेहमीच्या भिडूंना विचारून पाहिलं. पण कुणाची वेळ जमेना, तर कुणाचा मेळ जमेना. आम्हाला जायचं तर होतंच. अशा वेळी एक सुरक्षित मार्ग म्हणजे ‘कंडक्टेड टूर’ घेणे. आम्ही तिघंही जाणार होतो, हे नक्की होतं. मग जुलैत ‘गिरिकंद’च्या कार्यालयात जाऊन टूरला जायचं, एवढं निश्चित केलं. चार रात्री आणि पाच दिवस अशी टूर होती. त्यात तीन दिवस दुबई आणि एक दिवस अबूधाबी असे मुक्काम होते. टूरची कार्यक्रमपत्रिका चांगली होती. फक्त त्यात ‘म्युझियम ऑफ फ्युचर’चा समावेश नव्हता. अशा कंडटेक्ड टूरमध्ये संग्रहालयांच्या भेटी शक्यतो कमी असतात. याचं कारण त्यात बराच वेळ जातो आणि काहींना ती आवड असेलच असं नाही. हे कारण पटण्यासारखं असलं, तरी मला मात्र थोडं वाईटच वाटलं. अर्थात मुख्य उद्देश ‘बुर्ज खलिफा’वर जायचं हाच असल्यानं बाकी इतर एक-दोन गोष्टी कमी-अधिक चालणार होत्या. अबूधाबीत पॅरिसच्या लुव्र म्युझियमची शाखा सुरू झाली आहे, हे मला माहिती होतं. मात्र, अजून कुठल्याच टूरमध्ये त्या म्युझियमच्या भेटीचा समावेश नव्हता. (मी तिकडं गेल्यावर तिथल्या लोकल गाइडनं मला बसमधून ते म्युझियम दाखवलं. एका कराराद्वारे हे म्युझियम २०३७ पर्यंत अबूधाबीत राहणार आहे, असं कळलं. तोवर नक्कीच तिथं किंवा पॅरिसला जाऊन पाहता येईल.) सहलीची तारीख आम्हाला १४ नोव्हेंबरच्या आसपास हवी होती. एकीकडं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांकडंही माझं लक्ष होतं. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊन जातील, मग दिवाळीही होईल आणि नोव्हेंबरच्या मध्यात मला सहज जाता येईल, असा अंदाज होता. मात्र, तो चुकला. आधी आम्ही १२ नोव्हेंबरची तारीख बुक केली होती. मग नीलच्या संभाव्य सेमिस्टर परीक्षांचा अंदाज घेऊन ती १९ नोव्हेंबर केली. मात्र, ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या नेमक्या त्याच तारखांमध्ये आल्या. आमची टूर १९ ते २३ नोव्हेंबर होती आणि आपल्याकडं २० ला मतदान आणि २३ ला मतमोजणी होणार, असं कळलं. मला आता त्या काळात जाणं शक्यच नव्हतं. मग पुन्हा ‘गिरिकंद’मध्ये जाऊन, तारखा बदलून घेतल्या आणि त्यासाठी काही हजार रुपये जादाही मोजले. असो. आता ७ डिसेंबरला आम्ही दुबईला जाणार आणि १२ डिसेंबरला पुन्हा परत येणार, हे निश्चित झालं होतं.
यूएईचा व्हिसा आम्हाला टूर कंपनीकडूनच ऑनलाइन मिळाला. दोन डिसेंबरला आमची तिकिटं, व्हिसा वगैरे सगळं हाती आलं. सलग दुसऱ्या वर्षी आम्ही परदेशी टूरला जायला निघालो होतो. त्यामुळं तयारीचा आत्मविश्वास बराच वाढला होता. तशी ही टूर छोटी होती. शिवाय मुंबई विमानतळ ते परत मुंबई विमानतळ अशी सर्व टूर नियोजनबद्ध होती. सोबत टूर मॅनेजर असणार होता. त्यामुळं अगदी निवांत होतो. ट्रिपची तिकिटं हातात आल्यावर कळलं, की आम्हाला शनिवारी संध्याकाळी सहाचं विमान पकडायचं आहे. आधी ते शनिवारी पहाटे वगैरे असणार असं कळलं होतं. संध्याकाळचं फ्लाइट असल्यानं आता शनिवारी सकाळी निवांत निघालो तरी चालणार होतं. त्यानुसार आमच्या नेहमीच्या कॅबवाल्याला सांगून ठेवलं. शनिवारी सकाळी पावणेअकराला निघालो. आम्हाला फूड मॉलला थांबून अगदी आरामात, तीनपर्यंत विमानतळावर पोचलो, तरी चालणार होतं. मात्र, कॅबवाल्याला तिथून दुपारी दोन वाजता उतरणारं कस्टमर घ्यायचं होतं, त्यामुळं तो जरा गडबड करत होता. अर्थात, आम्ही शांतपणे खाऊन-पिऊन मग निघालो. अडीचला छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ ला पोचलो. तिथं आमचा टूर मॅनेजर सागर तिखिले भेटला. आम्हाला त्यानं तिथंच कोरड्या खाऊचे तीन (कॉम्प्लिमेंटरी) पुडे दिले. आम्हाला आत जाऊन चेक-इन, इमिग्रेशन वगैरे करायला सांगितलं. आमची जाताना व येतानाची फ्लाइट ‘अकासा एअर’ची होती. या विमान कंपनीद्वारे मी प्रथमच प्रवास करत होतो. मुंबई विमानतळावर आता सवयीनं चेक-इन, सिक्युरिटी, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार करून आम्ही बोर्डिंगच्या आधी तासभर त्या ७२ नंबरच्या गेटवर जमलो. त्याआधी नीलच्या हौसेपोटी पाचशे रुपये उडवून सँडविच व मसाला चाय यांचा आस्वाद घेतला. मुंबई विमानतळ अतिशय सुंदर आहे. मात्र, तिथं काहीही विकत घ्यायचं नाही. आमचं बोर्डिंग वेळेत सुरू झालं. फ्लाइट वेळेत निघाली. हे एअरक्राफ्ट बोइंगचं ‘७३७ मॅक्स’ हे होतं. हे सिंगल आइल असलेलं लेटेस्ट मॉडेल आहे. ते खरं तर देशांतर्गत प्रवासात वापरतात. यात एका बाजूला तीन आणि एका बाजूला तीन अशा सीट असतात. एकूण क्षमता १८० प्रवाशांची असते. ‘एअरबस’च्या निओ-ए-३२० ला स्पर्धा म्हणून 'बोइंग'नं हे एअरक्राफ्ट आणलं आहे. मध्यंतरी याच्या सुरक्षिततेचे काही मुद्दे चर्चेत आले होते. आता मात्र हे एअरक्राफ्ट सुरक्षित घोषित करण्यात आलं आहे. यात समोरच्या सीटवर डिस्प्ले नसतो. त्यामुळं माझी जरा निराशाच झाली. मला तो फ्लाइट पाथ बघायला आवडतो. अर्थात हा प्रवास केवळ दोन तास ५५ मिनिटांचा होता. त्यामुळं अगदी देशांतर्गत उड्डाणांच्या वेळी वापरतात तसंच हे लहान एअरक्राफ्ट होतं. मुंबई विमानतळावर सूर्य अस्ताला निघाला होता आणि आमचं विमान हळूहळू धावपट्टीकडं निघालं होतं. बरोबर सव्वासहा वाजता विमानानं उड्डाण केलं आणि ते वेगानं पश्चिम दिशेला उंच उंच निघालं. मुंबई अवघ्या मिनिटभरात संपली आणि अरबी समुद्र सुरू झाला. मी खिडकीतून खाली पाहत होतो. अंधार पडल्यावर समुद्रावर असंख्य दिवे लुकलुकताना दिसले. एवढ्या प्रमाणावर जहाजं किंवा होड्या किंवा नौका किंवा मचवे किंवा तराफे किंवा गलबतं असतील, असं वाटत नाही. शिवाय हे दिवे स्थिर आणि एका ओळीत होते. ते कसले असावेत, हे मला कळलं नाही. (जाणकारांनी जरूर सांगावं.) 
बरोबर तीन तासांनी म्हणजे सव्वानऊ वाजता आमचं विमान अबूधाबीच्या शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. त्याआधी विमानात ते चीजी बर्गर खाणं झालं. अबूधाबी येण्याआधी बरीच झगमगती शहरं, बंदरं दिसली. ती बहुतेक ओमानमधली असावीत. पण डिजिटल डिस्प्ले नसल्यानं ती नक्की कुठली, ते काही कळलं नाही. यूएईची प्रमाणवेळ आपल्यापेक्षा दीड तासांनी मागे आहे. त्यामुळं तिथं पावणेआठ वाजले होते. सिक्युरिटी, इमिग्रेशन वगैरे पार करून बाहेर यायला आणखी एक तास गेला. इथं आमचा सगळा ग्रुप पहिल्यांदा एकत्र आला. एकूण २२ जण होते. त्यात पुण्यातले १८, तर नाशिक व नगरचे प्रत्येकी दोन जण होते. इथं आमची बस आली. हीच बस पुन्हा विमानतळावर सोडायला येईपर्यंत पाच दिवस कायम आमच्यासोबत होती. फारूकभाई नावाचे लोकल गाइडही सोबत होते. आमचा पहिला मुक्काम दुबईत असल्यानं ही एसी कोच बस लगेच दुबईकडं धावायला लागली. यूएईत अमेरिकेप्रमाणे उजवीकडून वाहने चालवितात. आपल्या अगदी उलट. मी आतापर्यंत तीन देश पाहिले असले तरी त्या सर्व देशांत आपल्यासारखंच डाव्या हाताने वाहन चालवीत होते. यूएईत मात्र प्रथमच लेफ्ट हँडला ड्रायव्हर बसलेला पाहिला. यूएईतील अबूधाबी ते दुबई हा सर्वांत मोठा हायवे आहे. या आठ पदरी हायवेलाही शेख झायेद यांचंच नाव होतं. शेख झायेद हे आत्ताच्या अमिरांचे पिताश्री. त्यांनी यूएईची उभारणी केली. त्यामुळं आपल्याकडं जसं सर्वत्र महात्मा गांधी किंवा नेहरूंचं नाव असतं (किंवा असायचं) त्याप्रमाणे इकडे सर्वत्र शेख झायेद यांचंच नाव दिलं आहे. तर या आठपदरी हायवेनं जातानाच यूएईची प्रगती डोळ्यांत भरली. जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या अनेक नामवंत मोटारी त्या हायवेनं सुसाट धावत होत्या. संपूर्ण हायवेवर मधोमध हायमास्ट दिवे होते. अधूनमधून दिसणारे छोट्या मशिदींचे मिनार आपण मुस्लिम राष्ट्रात असल्याची जाणीव करून देत होते. सर्वत्र अरेबिक आणि खाली इंग्लिशमध्ये पाट्या लिहिलेल्या होत्या. आमची बस जोरात, पण एका ठरावीक वेगाने मार्गक्रमणा करत होती. दुबई साधारण ३० किलोमीटर राहिलं असताना आम्ही जेवायला थांबलो. ‘इब्न बतुता’ नावाच्या (इब्न बतुता हा चौदाव्या शतकातील एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रवासी होता.) एका मोठ्या हॉटेलच्या कॉम्प्लेक्ससमोर आमची बस थांबली. इथं समोर असलेल्या महाकाय ‘इब्न बतुता गेट’नं आमचं लक्ष वेधून घेतलं. आतमध्ये ‘पेशवा’ नावाचं मराठमोळं रेस्टॉरंट होतं. इथंच आम्ही जेवणार होतो. सचिन जोशी व त्यांच्या पत्नी यांचं हे हॉटेल आहे. बँकॉक, पटाया आणि दुबईत आणखी एक अशा त्यांच्या चार शाखा आहेत, अशी माहिती नंतर मिळाली. आमच्या फर्ग्युसन रोडवरही एक पेशवा नावाचं हॉटेल आहे. मात्र, त्यांचा व यांचा काही संबंध नाही, हेही समजलं. इथं गरमागरम ‘मराठमोळं’ इ. जेवण जेवून आम्ही तृप्त झालो. भारतीय वेळेनुसार आता जवळपास रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्यामुळं आम्हाला भुका लागल्याच होत्या. जेवल्यावर बरं वाटलं. पुन्हा बसमध्ये बसलो आणि दुबईत पोचलो. दुबई जवळ येऊ लागलं, तसं रस्त्यावर काहीसं ट्रॅफिक जॅमही लागलं. दुबईतील उत्तुंग इमारतींचं रात्रीचं ते प्रथम दर्शन केवळ स्तिमित करणारं होतं. आम्ही ‘डाउनटाउन’ दुबईतूनच पुढं निघालो होतो. त्यामुळं ‘बुर्ज खलिफा’चंही दर्शन घडलंच. आमचं हॉटेल ‘बर दुबई’ या जुन्या दुबईतील भागात होतं. हॉटेल चांगलं होतं. खोल्या ताब्यात घेतल्या आणि दमल्यामुळं लगेच झोपलो.

दुबई, ८ डिसेंबर २०२४

दुसऱ्या दिवशी आमचा भरगच्च कार्यक्रम सुरू झाला. हॉटेलमध्ये कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट होता. तो हाणून नऊला बसमध्ये बसायचं होतं. सुरुवातीला सिटी टूर नामक प्रकार होता. यात ती गाडी गावभर फिरवून हे बघा, ते बघा, इथं फोटो काढा, तिथं फोटो काढा असले प्रकार असतात. ‘कंडक्टेड टूर’ असल्यामुळं ते सहन करावं लागतंच. आमचा गाइड फारूकभाई मात्र चांगला होता. तो अतिशय आत्मीयतेनं सगळी माहिती देत होता. त्यानं या राष्ट्राच्या सुरुवातीच्या काळापासून ते आजच्या प्रगतीपर्यंतचा प्रवास व्यवस्थित सांगितला. सुरुवातीला आम्हाला एका इस्लामिक गॅलरी नावाच्या प्रदर्शनात नेण्यात आलं. तिथला एक उंचापुरा, अरबी माणूस आम्हाला इतिहासाची माहिती सांगता सांगता, हळूच तिथल्या विणलेल्या कारपेटची जाहिरात करू लागला, तसतसं आम्ही हळूच काढता पाय घेतला. तिथून आम्ही ‘बुर्ज अल् अरब’ या हॉटेलपाशी गेलो. शिडाच्या आकाराची इमारत आणि शेजारी क्रूझच्या आकाराचे २८ मजले (त्यातले तीन पाण्याखाली) असलेलं हे हॉटेल १९९९ मध्ये सुरू झालं. हे दुबईतलं पहिलं सात स्टार हॉटेल आणि पहिलं आंतरराष्ट्रीय आकर्षणही! मला तेव्हा या हॉटेलविषयीच्या बातम्या वाचल्याचं आठवत होतं. ते आज प्रत्यक्ष समोर पाहायला मिळालं होतं. तिथं शेजारी बीच होता. तिथंही बरंच काही ‘प्रेक्षणीय’ पाहायला होतं. मात्र, आमचा अगदी फॅमिली टाइप ग्रुप असल्यानं तिकडं बघून न बघितल्यासारखं केलं व सोबत असलेल्या काका-काकूंचे फोटो काढून दिले. 
यानंतर आम्ही प्रसिद्ध अशा पाम आयलंडकडं निघालो. इथं मोनोरेल राइड होती. दुबईच्या पाम जुमैराह बीचजवळ इकडचे सर्व राजे व राजघराण्याच्या लोकांचे बंगले व खासगी बीचेस आहेत. त्याशेजारीच पलीकडं हे ‘पाम आयलंड’ (पामच्या झाडाच्या आकाराचं वसवलेलं बेट) आहे. या आयलंडची उभारणी झाली, तेव्हाच्या बातम्याही मला आठवत होत्या. शाहरुख खानला या प्रकल्पाचा ब्रँड अम्बेसेडर केलं होतं, हेही आठवलं. इथं त्याला एक बंगला भेट देण्यात आला आहे. आम्ही त्या मोनोरेलच्या पहिल्या स्टेशनवर बसलो आणि चौथ्या स्टेशनला उतरलो. सुरुवातीला अपार्टमेंट, मग व्हिला आणि शेवटच्या परिघावर पंचतारांकित हॉटेल अशी या बेटाची रचना आहे. मधे समुद्राचं पाणी आहे. त्याखालून जाण्यासाठी बोगदे केले आहेत. शेवटी बहामाज येथील अटलांटिस हॉटेलसारखीच रचना असलेलं, त्याच नावाचं भव्य हॉटेल आहे. इथं ‘हॅपी न्यू इयर’ या शाहरुख खानच्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. शेवटच्या स्टेशनला उतरलो. तिथं बस आलीच होती. मग तिथून त्या समुद्राखालील बोगद्यातून प्रवास करून पुन्हा मुख्य भूमीवर आलो. हे आयलंड आणि तिथले बंगले, व्हिला हे सगळं अतिश्रीमंत प्रकरण आहे. आपण नुसतं बघायचं! जगात पैसा किती प्रकारे आणि कुठं कुठं खर्च केला जाऊ शकतो, याचं हे आदर्श उदाहरण म्हणायला हरकत नाही. अर्थात ही श्रीमंती नजराणा पाहून आमचे डोळे निवले असले, तरी पोटातले कावळे शांत झाले नव्हते. मग तिथून पुन्हा ‘खानाखजाना’ नावाच्या एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेलो. आम्ही येणार हे आमच्या टूर मॅनेजरनं आधीच सांगितलेलं असल्यामुळं तिथं बुफे लावलेलाच असायचा. त्यामुळं त्यात फार वेळ जायचा नाही. इथं जेवण झाल्यावर आम्ही दुबई मॉलकडं, म्हणजेच ‘बुर्ज खलिफा’कडं जायला निघालो. दुबई मॉल प्रचंड मोठा आहे. या मॉलच्या आतूनच ‘बुर्ज खलिफा’वर जाण्यास एंट्री आहे. बसनं आम्हाला मॉलच्या दारात सोडलं. तिथून आम्ही बरंच चालत ‘ऑन द टॉप, बुर्ज खलिफा’ अशा पाट्या लावलेल्या दिशेनं निघालो. आमची तिकिटं आधीच काढली होती. तरीही रांग होतीच. खाण्याचे पदार्थ वर नेता येत नाहीत. त्यामुळं आम्हाला आमच्या सॅक तिथल्या लॉकरमध्ये ठेवाव्या लागल्या. मग पुन्हा कडेकोट सिक्युरिटी चेकमधून रांगेत आलो. बरंच अंतर पार केल्यानंतर, एक-दोन एलेव्हेटरनी वर गेल्यावर, पुन्हा बरंच चालल्यावर मग वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या लिफ्टची रांग आली. तिथंही डावं-उजवं होतंच. काही लोकांना आमच्या आधी पुढं सोडलं जात होतं. ‘वशिल्याचे असणार’ अशा नजरेनं आम्ही त्यांच्याकडं बघत होतो. अखेर अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही त्या लिफ्टसमोर आलो. एकूण तीन लिफ्ट होत्या. या लिफ्ट अतिवेगवान आहेत. केवळ एका मिनिटात त्या १२४ व्या मजल्यावर पोचवतात. त्या लिफ्टच्या दारावर तसा ‘डिजिटल डिस्प्ले’ही दिसतो. आता आम्ही अगदी अधीर झालो होतो. थोड्याच वेळात आमचा नंबर आला आणि आम्ही आठ ते दहा लोक त्या लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्टचं दार बंद झालं आणि सुसाट वेगानं ती लिफ्ट वरच्या मजल्यांकडं निघाली. लिफ्टच्या आत तेवढ्या त्या एका मिनिटातही त्या इमारतीचं काम कसं झालं वगैरे दाखवणारा व्हिडिओ सुरू होता. तो त्या लिफ्टच्या सर्व दारांवर व छतावरही दिसत होता. छतावर आकाशाचं चित्र दिसत होतं आणि आपण वर वर जातोय, असा आभास निर्माण केला जात होता. अर्थात तो आभास नव्हता, तर वस्तुस्थिती होती. आम्ही एका मिनिटात लिफ्टमधून बाहेर आलो आणि त्या मजल्यावर तयार केलेल्या खास प्रेक्षक गॅलरीत पोचलो. समोरचं दृश्य पाहून मी अक्षरश: थक्क झालो... साधारण वर्षभरापूर्वी पाहिलेलं स्वप्न अखेर वाढदिवशी नाही, तर त्यानंतर २२-२३ दिवसांनी का होईना, असं पूर्ण झालं होतं. मी ‘बुर्ज खलिफा’च्या १२४ व्या मजल्यावर होतो... ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड!



(क्रमश:)

--------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------------



1 Dec 2024

ग्राहकहित दिवाळी अंक लेख - २४

निळ्या डोळ्यांचा ‘सपनों का सौदागर’
---------------------------------------------

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास उण्यापुऱ्या शंभर ते सव्वाशे वर्षांचा. अनेक नामांकित कलाकारांनी ही चित्रपटसृष्टी गाजवत ठेवली आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा या चित्रपटसृष्टीवर उमटवला आहे. या चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहायचा झाला, तर काही नावं त्यातून कधीच वगळता येणार नाहीत. राज कपूर हे असंच एक नाव. केवळ राज कपूरच नव्हे, तर हे कपूर खानदानच अतिशय कर्तृत्ववान. हिंदी चित्रपटसृष्टीची ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणता येईल एवढा नावलौकिक या घराण्यातील बऱ्याच जणांनी कमावला. त्यातही राज कपूरचं नाव कायम पुढे राहील. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध त्रयी म्हणजे राज कपूर, दिलीपकुमार आणि देव आनंद. या तिघांनीही या मायावी दुनियेवर अक्षरश: राज्य केलं. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं. प्रत्येकाची छाप वेगळी. प्रत्येकाचा प्रभावही वेगळा. यंदा राज कपूरची जन्मशताब्दी. त्यामुळं या निळ्या डोळ्यांच्या राजकुमाराच्या आयुष्याचा वेध घेणं यंदा अगदी औचित्यपूर्ण ठरेल.
राज कपूरला अवघं ६४ वर्षांचं आयुष्य लाभलं. मात्र, या काळात त्यानं निर्माण केलेल्या सिनेमांनी त्या त्या काळावर अगदी अतुलनीय अशी छाप टाकली. राज कपूरला अभिनयाला किंवा एकूणच कलेचा वारसा घरातूनच मिळाला. ‘द ग्रेट’ पृथ्वीराज कपूर यांचं हे थोरलं गोंडस अपत्य पुढं आपल्या कामाच्या जोरावर मोठं नाव कमावणार, यात आश्चर्य नव्हतं. भारतातील चित्रपटसृष्टीवर पंजाब प्रांतातील मंडळींचा पगडा मोठा आहे. रावी, सतलज, झेलम, चिनाब आणि बियास या पाच नद्यांच्या खोऱ्यांत राहणाऱ्या या उंचपुऱ्या, धिप्पाड, देखण्या माणसांनी चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षं आपला ठसा उमटवला आहे. कपूर मंडळीही त्याच प्रांतातून आलेली. मायानगरी मुंबईत त्यांनी जम बसवला आणि अल्पावधीत चित्रपटसृष्टीवरही आपली पकड बसविली. पृथ्वीराज कपूर हे या घराण्यातील ज्येष्ठ, अध्वर्यू म्हणावेत असे मोठे कलाकार. त्यांच्या तिन्ही मुलांनी पुढं चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केलं.
‘प्रभात’ कंपनीच्या चित्रपटातून नारदाची भूमिका करून, सिनेमाजगतात पाऊल ठेवणाऱ्या राज कपूरच्या कारकिर्दीचा काळही मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या भारावलेल्या, मंतरलेल्या काळाचा प्रभाव पुढं त्याच्या कलाकृतींवर पडला; तसंच त्याच्या कलाकृतींनीही त्या काळावर आपली लखलखीत नाममुद्रा कायमची उमटविली.
राज कपूर जन्माला आला, तो काळ भारताच्या पारतंत्र्याचा होता. ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय जनता स्वातंत्र्याचा लढा लढत होती. पहिलं महायुद्ध होऊन गेलं होतं (आणि वीस वर्षांनी दुसरं सुरू होणार होतं…) सिनेमा अद्याप ‘मूक’ होता आणि तिकडं अमेरिकेत चार्ली चॅप्लिन नावाच्या महान कलाकारानं आपल्या आगळ्यावेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींनी सर्व जगावर मोहिनी घातली होती. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना अखेरचं ‘चले जाव’ असं ठणकावून सांगितलं, तेव्हा राज १८ वर्षांचा कोवळा तरुण होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा राज २३ वर्षांचा होता. त्याच्या सर्व प्रमुख कलाकृती स्वातंत्र्यानंतर आल्या. त्यावर त्या काळाच्या भारावलेपणाची, रोमँटिसिझमची अपरिहार्य अशी छाप पडली होती. राज कपूरने दिग्दर्शित केलेले पहिले ‘आग’, ‘बरसात’ असे काही चित्रपट पाहिले, की त्यात नवथर तारुण्यातील मुसमुसलेल्या प्रणयाची कोवळीक स्पष्टपणे दिसून येते. पुढे पं. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशाच्या उभारणीचं दशक सुरू झालं. देशात उत्साहाचं वारं होतं. नवं काही तरी घडवायची, नवनिर्माणाची जिद्द होती. याच काळात देशात अनेक नव्या संस्था सुरू झाल्या, नवी धरणं बांधली गेली, उत्कृष्ट साहित्य निर्माण झालं, त्यातही वंचितांचा प्रवाह ठळक झाला. नेहरूंनी स्वीकारलेली समाजवादी मिश्र अर्थव्यवस्था भारतासारख्या विशाल आणि विविधतेनं संपन्न असलेल्या देशासाठी एक वेगळी वाट घेऊन आली. त्या काळात निर्माण झालेल्या चित्रपटांवरही याचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. राज कपूरनं या काळात निर्माण केलेल्या ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटांतही हेच म्हणता येईल. गरीब नायक, श्रीमंत खलनायक, गरिबीतही आनंदात राहणारे नायकाचे सगेसोयरे आणि श्रीमंताची मुलगी असलेली, मात्र गरीब नायकावर जीव जडवणारी नायिका असा सर्वसाधारण साचा ठरलेला असायचा. राज कपूरचं वैशिष्ट्य हे, की त्यानं मनोरंजनाचं मूल्य कमी लेखलं नाही. त्याचे सिनेमे केवळ कंठाळी किंवा प्रचारकी नसत. उत्कृष्ट पटकथा, चांगला अभिनय, उत्तम संगीत आणि भव्य निर्मिती या चार खांबांवर उभी राहिलेला तो सिनेमा एक निव्वळ कलाकृती म्हणूनही मोठाच असायचा. स्वत: राज कपूर संगीताचा चांगला जाणकार होता. शंकर-जयकिशन या तेव्हाच्या नवोदित पोरांना हाताशी धरून, शैलेंद्रसारखा गुणी गीतकार आणि मुकेशसारखा – जो पुढे राज कपूरचा आवाज म्हणूनच ओळखला गेला – वैशिष्ट्यपूर्ण गायक असा संच त्यानं मोठ्या हिकमतीनं गोळा केला होता. राधू कर्मकारसारखा जाणता सिनेमॅटोग्राफरही जोडीला होता. नायिका म्हणून नर्गीसला पर्याय नव्हता. अशा सगळ्या भांडवलावर राज कपूरनं एकापेक्षा एक उत्तम सिनेमे काढले आणि समाजमनावर गारूड केलं. राज कपूरवर चार्ली चॅप्लिनचा असलेला प्रभाव त्याच्या सगळ्या सिनेमांत दिसतोच. कारुण्यरसातून हास्य फुलवण्याचं किंवा हास्यरसातून कारुण्य भिडविण्याचं विलक्षण कसब असलेला तो अद्भुत कलाकार होता. राज कपूरनं त्याच्या ‘राजू’ या नायकामध्ये चॅप्लिनसदृश गुण दाखवले आणि एकाच वेळी प्रेक्षकांना हसवलंही आणि रडवलंही. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देश अनेक समस्यांशी झुंजत होता. दारिद्र्य खूप होतं. मूलभूत सुविधांचाही अभाव होता. निरक्षरता होती. शिक्षणाचं एकूणच प्रमाण कमी होतं. स्त्रियांना स्वातंत्र्य आताएवढं नव्हतं. मोठमोठी कुटुंबं असायची. कमावणारे फार तर एक किंवा दोघे जण. अशा स्थितीत तेव्हा एकूण सर्वसाधारण जनतेसाठी मनोरंजन हा भाग प्राधान्यक्रमात फारच तळाला होता. रेडिओ अगदी कमी होते. नाटकं असायची, पण ती मोठ्या शहरांतच शक्यतो बघायला मिळायची. याव्यतिरिक्त गावोगावी भरणाऱ्या यात्रा, जत्रा आणि त्यात येणारे तमाशासारखे खेळ हीच लोकांच्या मनोरंजनाची प्रमुख साधनं होती. अशा काळात तुलनेत स्वस्तात उपलब्ध होणारा मोठ्या पडद्यावरचा सिनेमा आपल्याकडच्या मनोरंजन क्षेत्रात एक क्रांतीच घेऊन आला. थिएटरमधील अंधारात उजळलेला रूपेरी पडदा आणि त्यावर दिसणारी स्वप्नसदृश दृश्यं सर्वसामान्यांना हरखून टाकणारी होती. रोजच्या व्यथा-वेदना दोन क्षण विसरायला लावणारी होती. त्यामुळं चित्रकर्त्यांना लोक ‘स्वप्नं विकणारे व्यापारी’, अर्थात ‘सपनों के सौदागर’ म्हणायला लागले. मात्र, हे बिरूद सर्वार्थानं शोभलं ते केवळ राज कपूरला!

गरीब असला, तरी गोरा अन् निळ्या डोळ्यांचा नायक; देखणी नायिका; त्यांच्यातला कधी उत्कट, तर कधी आक्रमक, धसमुसळा रोमान्स; भव्य, डोळे विस्फारायला लावणारी स्वप्नदृश्यं अशा ऐवजानं नटलेला सिनेमा म्हणजे शब्दश: स्वप्नं विकणंच तर होतं! राज कपूरला ती कला बरोबर साध्य झाली होती. पडद्यावर काय शोभून दिसतं किंवा काय दाखवायचं असतं याचं नेमकं भान त्याला होतं. पैसे त्याच्याकडं सुरुवातीपासूनच होते. असं असलं तरी ऐदीपणा न करता त्यानं कष्टानं ते ऐश्वर्य वाढवलं. चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. हा स्टुडिओ म्हणजे त्या काळातली एक स्वप्ननगरीच होती. सिनेमाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तिथं उपलब्ध होत्या. राज कपूरनं या साधनसामग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि एकेका सिमेमाच्या रूपानं एकेक स्वप्नमहाल उभा केला. त्या काळातलं त्या स्टुडिओतलं वातावरण भारलेलं असायचं. कल्पना करा… एकीकडं ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासोबत पटकथेवर चर्चा रंगली आहे, दुसरीकडं म्युझिक रूममध्ये शंकर-जयकिशन, शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी आणि खुद्द राज कपूर नव्या गाण्याच्या सिच्युएशनबद्दल, चालीबद्दल चर्चा करताहेत, तिसरीकडं अतिशय भव्य-दिव्य अशा सेट्सची निर्मिती होत आहे…. काय माहौल असेल तो! या स्टुडिओतून असे अनेक चित्रपट तयार झाले. तेव्हा तयार होणारे हे चित्रपट तत्कालीन तंत्रानुसार, कृष्णधवल असले, तरी त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सप्तरंगी स्वप्नं पेरली. हे सिनेमे येऊन आज जवळपास ७० ते ८० वर्षांचा काळ लोटला, तरी पिढ्यांमागून पिढ्या त्यांची लोकप्रियता अबाधित आहे. अतिशय ‘पॅशन’ने, आंतरिक ऊर्मीने या कलाकृती त्या लोकांनी तयार केल्या असणार म्हणूनच त्या काळावर मात करून आजही तेवढ्याच ताज्यातवान्या आणि उत्फुल्ल वाटतात. राज कपूरचं हे श्रेय सहज पुसता येण्यासारखं नाही.
राज कपूरचा जन्म १४ डिसेंबर १९२४ चा. पेशावरजवळ किस्सा ख्वानी बाजार या भागात कपूर मंडळींची खानदानी हवेली होती. याच हवेलीत राजचा जन्म झाला. (दिलीपरकुमारचाही जन्म पेशावरचाच. आता हा भाग पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात येतो.) ‘धाई घर खत्री’ या जातीची किंवा समुदायाचा भाग असलेली ही मंडळी पंजाबी हिंदू. यांचं मूळ गाव तेव्हाच्या पंजाबमधील लायलपूर (आताचं फैसलाबाद) जिल्ह्यातील समुंद्री. पृथ्वीराज कपूर व रामशरणी देवी (मेहरा) या दाम्पत्याला एकूण सहा अपत्ये झाली. त्यातील राज हा सर्वांत थोरला. त्याचं जन्मनाव सृष्टीनाथ कपूर असं होतं, तर पूर्ण नाव रणबीर राज कपूर असं होतं. राजला शम्मी व शशी हे दोन धाकटे भाऊ, तर ऊर्मिलादेवी या नावाची एक बहीण होती. इतर दोन भावंडं जन्मानंतर लगेचच दगावली, पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे भाऊ त्रिलोक कपूर हेही अभिनेते होते. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर हे पृथ्वीराज यांचे चुलतभाऊ. बोनी, अनिल व संजय कपूर ही सुरिंदर कपूर यांची अपत्ये. पृथ्वीराज यांना थिएटरचं वेड होतं. त्यापायी मुंबईला यायचं म्हणून त्यांनी १९३० च्या दशकातच गाव सोडलं. पृथ्वीराज मुंबईला येऊन स्थिसस्थावर होईपर्यंत राजचं शिक्षण वेगवेगळ्या शहरांत (डेहराडून, कलकत्ता आणि मग मुंबई) झालं.
राज कपूरनं वयाच्या ११ व्या वर्षी इन्किलाब नावाच्या हिंदी चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर प्रभात कंपनीच्या चित्रपटात त्याला नारदाचीही भूमिका करायला मिळाली होती. त्याबाबत अशी दंतकथा सांगितली जाते, की या कामाचा मेहनताना म्हणून ‘प्रभात’ने राज कपूरला तब्बल पाच हजार रुपये दिले होते. ही बाब पृथ्वीराज कपूर यांना समजल्यावर त्यांनी प्रभात कंपनीला ताबडतोब हे पैसे परत घ्यायला लावले आणि इतर कलाकारांना जेवढे मानधन दिले जाते, तेवढेच राजला द्या, असे सांगितले. मात्र, कंपनीने हे मानधन परत घेतले नाही. मग राजने ही रक्कम सत्कारणी लावत चेंबूरमध्ये जागा घेतली आणि नंतर तिथे स्टुडिओ उभारला. (अर्थात हा ऐकीव किस्सा आहे. यात कमी-अधिक होऊ शकतं.) राज कपूरला पहिला मोठा ब्रेक मिळाला तो १९४७ च्या ‘नीलकमल’ या चित्रपदाद्वारे. किदार शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात राजच्या नायिका होत्या बेगम पारा आणि मधुबाला. या चित्रपटाला थोडे फार यश मिळाले, मात्र त्याच वर्षी आलेले ‘जेलयात्रा’, ‘दिल की रानी’ आणि ‘चित्तोड विजय’ हे चित्रपट मात्र साफ पडले. (त्यातूनच राज कपूरला कसे सिनेमे काढू नयेत, याचं प्रशिक्षण आपोआप मिळालं.) पुढच्याच वर्षी, म्हणजे १९४८ मध्ये राजने ‘आर. के. फिल्म्स’ ही स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. ‘आग’ हा या बॅनरचा पहिला चित्रपट. राज कपूरचं दिग्दर्शन असलेलाही हा पहिलाच चित्रपट. यात नर्गीस, कामिनी कौशल आणि प्रेमनाथ होते. या सिनेमाला व्यावहारिक यश मोठं मिळालं नसलं, तरी समीक्षकांनी राजच्या या कलाकृतीचं कौतुकच केलं.

सन १९४९ हे वर्ष राजच्या कारकिर्दीला मोठं वळण देणारं यशस्वी वर्षं ठरलं. या वर्षी आला मेहबूब खान दिग्दर्शित ‘अंदाज’ हा चित्रपट. यात राजसोबत दिलीपकुमार आणि नर्गीस होते. (या तिघांचा एकत्र असा हा पहिला व शेवटचा सिनेमा ठरला.) प्रेमाचा त्रिकोण दाखविणारा, सुंदर गाणी आणि देखणे कलाकार असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला, यात नवल नव्हतं. पाठोपाठ आला ‘आर. के. फिल्म्स’चा ‘बरसात’. हा चित्रपटानं ‘अंदाज’चेही सर्व रेकॉर्ड तोडले आणि तो सुपरडुपर हिट ठरला. त्यापूर्वी अशोककुमारचा ‘किस्मत’ हा चित्रपट सार्वकालिक सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. मात्र, ‘बरसात’ने तेही रेकॉर्ड तोडलं. शंकर-जयकिशनचं संगीत आणि कोवळ्या मुकेश, मन्ना डे व लताच्या आवाजातील गाणी भारतातील घराघरांत पोचली आणि तुफान लोकप्रिय ठरली. (ही गाणी आजही लोकप्रिय आहेत, यात शंका नसावी.) या दोन चित्रपटांच्या यशानं राजला दिलीपकुमार आणि देव आनंदच्या जोडीनं ‘मेगा स्टार’ बनवलं. मग राजनं १९५१ मध्ये ‘आवारा’ हा चित्रपट निर्माण केला आणि अर्थात दिग्दर्शितही केला. यात राजसोबत पृथ्वीराज कपूर आणि नर्गीस प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटानं तर इतिहास घङवला, केवळ भारतातच नव्हे, तर चीन, अफगाणिस्तान, तुर्कस्थान आणि सोविएत युनियन या देशांमध्येही तो धो धो चालला. विशेषत: रशियात राजची लोकप्रियता गगनाला भिडली. ‘मेरा जूता है जापानी…’ गाणं तर जगभरातील चित्ररसिकांच्या मुखातून ऐकू येऊ लागलं. ‘आवारा’त राज कपूरनं त्याचा नायक राजू थेट चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल ठेवणारा असा उभा केला होता. गरिबी असली तरी काहीएक मूल्यं जपणारी माणसं आणि श्रीमंतीमुळं माणुसकी विसरलेली, पैशाला महत्त्व देणारी खल प्रवृत्तीची माणसं असा हा पारंपरिक संघर्ष राजनं उभा केला. या संघर्षाला वैश्विक अपील होतं. या सिनेमामुळं राज कपूर हे नाव अल्पावधीत जगभरातील रसिकांना माहिती झालं. हीच जादू १९५५ मध्ये आलेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटानं करून दाखवली. या सिनेमानं ‘आवारा’चे विक्रम मोडले. ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ म्हणत एका छत्रीत भिजत जवळ येणारे राज आणि नर्गीस हे तत्कालीन चित्रपटसृष्टीतील रोमान्सचं ‘आयकॉनिक’ दृश्य ठरलं. ‘आवारा’ आणि ‘श्री ४२०’ या दोन्ही सिनेमांवर तत्कालीन नेहरू प्रणीत समाजवादी व्यवस्थेचा पगडा स्पष्ट होता. देश उभारणीच्या त्या स्वप्नाळू काळात राजचे हे दोन्ही सिनेमे म्हणजे जणू त्या स्वप्नाळू प्रवासाचाच मार्ग योग्य असल्याच्या विश्वासावर शिक्कामोर्तबच होतं. प्रेक्षकांनी या दोन्ही सिनेमांना जबरदस्त उचलून धरून त्यातील ‘सोशल’ संदेशाला जणू ‘राज’मान्यताच दिली होती!
राज कपूर या काळात स्वत:च्या बॅनरव्यतिरिक्त अन्य बॅनरच्या सिनेमांतून नायकाच्या भूमिका करत होता. नर्गीससोबत त्याने जे १७-१८ सिनेमे केले त्यात केवळ सहा त्याच्या ‘आर. के. फिल्म्स’चे होते. बाकी इतर बॅनरचेच होते. त्यात १९५२ मध्ये ‘अनहोनी’ आणि ‘बेवफा’ हे दोन चित्रपट होते. नंतर १९५६ मध्ये ‘रोमन हॉलिडे’वरून बेतलेला ‘चोरी चोरी’ हा या जोडीचा अखेरचा चित्रपट ठरला. (त्यानंतर त्याच वर्षी आलेलल्या ‘जागते रहो’मध्ये नर्गीसची पाहुणी कलाकार म्हणून छोटी भूमिका होती. पहाटे दारी आलेल्या राज कपूरला ती पाणी देते, असं ते दृश्य होतं.) राज कपूर आणि नर्गीस यांच्यात पडद्यावर जसा रोमान्स रंगला, तसाच तो पडद्याबाहेरही रंगत होता. मात्र, राज विवाहित होता आणि नर्गीससाठी पत्नी कृष्णा आणि मुलांना सोडण्याचा त्याचा कोणताही इरादा नव्हता. मग नर्गीसनंच हे संबंध तोडले. (आजच्या भाषेत ‘ब्रेक-अप’ केलं…) पुढं ‘मदर इंडिया’च्या चित्रिकरणादरम्यान तिला आगीतून वाचविणाऱ्या सुनील दत्तच्या प्रेमात ती पडली आण त्याच्याशीच विवाहबद्ध झाली.
मधल्या काळात राजनं दो उस्ताद, अनाडी आणि छलिया यासारख्या बाहेरच्या बॅनरच्या चित्रपटांत नायक म्हणून भूमिका केल्या. नंतर १९६० मध्ये त्यानं त्याच्या ‘आर. के. फिल्म्स’द्वारे ‘जिस देश में गंगा बहती है’ हा भव्य चित्रपट निर्माण केला. यात त्यानं भूमिका केली असली, तरी दिग्दर्शन त्याचे नेहमीचे छायालेखक राधू कर्मकार यांच्याकडं सोपवलं होतं. त्यानंतर राजनं मोठा ब्रेक घेतला. तो ‘संगम’ या भव्य चित्रपटाच्या तयारीला लागला. अखेर चार वर्षांनी म्हणजे १९६४ मध्ये ‘संगम’ प्रदर्शित झाला. ‘संगम’ हा सर्वार्थानं भव्य चित्रपट होता. टेक्निकलरमध्ये चित्रित केलेला हा राजचा पहिलाच चित्रपट. लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंडमध्ये चित्रित झालेलाही हा पहिलाच हिंदी चित्रपट. शिवाय तब्बल चार तासांची लांबी आणि प्रथमच दोन मध्यंतर असणाराही पहिलाच चित्रपट. प्रेमाचा त्रिकोण दाखवणारी कथा. राजेंद्रकुमार दुसरा नायक, तर नायिका होती नृत्यनिपुण वैजयंतीमाला. अनेक विक्रमांची सोबत घेऊन आलेला ‘संगम’ सुपरडुपर हिट ठरला, यात आश्चर्य नव्हतं. ‘संगम’ची सर्व गाणीही अतिशय गाजली. शंकर-जयकिशन त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा राज ४० वर्षांचा होता. पारंपरिक नायक म्हणून यशस्वी ठरलेला त्याचा हा शेवटचाच चित्रपट.
‘संगम’नंतर राज कपूरने त्याहून मोठं व भव्य स्वप्न पाहिलं ते ‘मेरा नाम जोकर’चं… हाही ‘संगम’सारखाच चार तासांच्या दीर्घ लांबीचा, दोन मध्यंतर असलेला, उत्तम गाणी, राज कपूरव्यतिरिक्त धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, सिमी गरेवाल, पद्मिनी, मनोजकुमार अशा अनेक स्टार कलाकारांचा भरणा असलेला असा भव्य-दिव्य सिनेमा होता. तब्बल सहा वर्षं या सिनेमाची निर्मिती सुरू होती. आधीच भरपूर प्रसिद्धीही झाली होती. यात सर्कसचा भाग मोठा असल्यानं सिनेमात रशियन कलाकारही होते. एक नायिकाही रशियन होती. सिनेमाचं काही चित्रीकरण रशियात झालं होतं. हा सिनेमा १८ डिसेंबर १९७० रोजी प्रदर्शित झाला. मात्र, कदाचित प्रचंड अपेक्षांच्या ओझ्यामुळं असेल, हा सिनेमा साफ पडला. अगदी फ्लॉप ठरला. सिनेमाची एकूण प्रचंड लांबी आणि राज कपूरला जे काही दाखवायचं होतं ते, या दोन्ही गोष्टी तेव्हा प्रेक्षकांच्या पचनी पडल्या नाहीत. या सिनेमावर राज कपूरनं भरपूर खर्च केला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानं राज कपूर आर्थिक संकटात सापडला. विशेष म्हणजे कालांतराने हा चित्रपट (जरा लांबी कमी करून) पुन्हा प्रदर्शित झाला, तेव्हा तो चांगला चालला. आता तर या चित्रपटाची ‘क्लासिक’ सिनेमांमध्ये गणना केली जाते. खुद्द राज कपूरचाही हा आवडता सिनेमा होता. तो ढोबळमानानं त्याच्याच आयुष्यावर आधारित होता, असंही म्हटलं जातं. या सिनेमात बराच खोल, आध्यात्मिक अर्थ दडला होता, असं राजचं म्हणणं होतं. पुढं समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. ‘मिसअंडरस्टूड मास्टरपीस’ असं त्या चित्रपटाचं वर्णन केलं गेलं.
मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला जे दारूण अपयश आलं, त्यामुळं राज कपूर अतिशय निराश झाला. त्यानंतर त्यानं स्वत: पडद्यावर कधीही मुख्य नायकाची भूमिका केली नाही. एकूणच अभिनय कमी केला. ‘कल, आज और कल’ किंवा ‘धरम करम’ यासारख्या थोरल्या पुत्रानं - रणधीर कपूरनं – दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत त्यानं चरित्र भूमिका मात्र साकारल्या.
राज कपूरनं त्याचं सगळं लक्ष आता दिग्दर्शनाकडं केंद्रित केलं. त्यानं आता धाकटा मुलगा ऋषी कपूरला नायक म्हणून ‘लाँच’ करण्यासाठी ‘बॉबी’ या आगळ्यावेगळ्या धाटणीच्या प्रेमकथेचा घाट घातला. या सिनेमात संपूर्ण नवा, काळानुसार बदललेला राज कपूर दिसला. ऋषी कपूरसमोर कोवळी डिंपल कपाडिया नावाची १६ वर्षांची मुलगी नायिका होती. यात राज आणि नर्गीसची पहिल्यांदा भेट झाली, तेव्हाचा प्रसंग (नायिकेनं पिठानं भरलेला हात नकळत केसांना लावणे) राजनं ऋषी व डिंपलवर जसाच्या तसा चित्रित केला. मधल्या काळात १९७१ मध्ये शंकर-जयकिशन जोडीतला जयकिशन हे जग सोडून गेला होता. मग राज कपूरने ‘बॉबी’साठी नवे संगीतकार निवडले – लक्ष्मीकांत-प्यारेलाल. त्या दोघींनीही ‘बॉबी’च्या संगीतात धूम उडवून दिली. चित्रपट जबरदस्त हिट झाला. गोव्याच्या पार्श्वभूमीवर ऋषी आणि डिंपलची कोवळी प्रेमकथा प्रेक्षकांना भावली. ‘बॉबी’च्या जोरदार यशामुळं ‘मेरा नाम जोकर’चं अपयश धुतलं गेलं. ‘आर. के. फिल्म्स’चा बॅनर पुन्हा जोरदार झळकू लागला. राज कपूरची ‘शोमनशिप’ पुन्हा एकदा सिद्ध झाली.

यानंतर राज कपूरची दिग्दर्शनाची जणू दुसरी इनिंग सुरू झाली. पुढील एक दशकभरात राज कपूरनं ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ (१९७८), ‘प्रेमरोग’ (१९८२) आणि ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५ हे अतिशय वेगळे, दर्जेदार आणि नायिकाप्रधान असे तीन चित्रपट दिले. यात त्या त्या काळातील सामाजिक समस्यांचाही ऊहापोह करण्यात आला होता. या तिन्ही चित्रपटांत त्यानं अनुक्रमे झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे आणि मंदाकिनी या तीन नायिकांना खास त्याच्या पद्धतीनं पेश केलं. पद्मिनी कोल्हापुरेचा अपवाद वगळता, अन्य दोन नायिकांच्या शरीर प्रदर्शनाची जोरदार चर्चा त्या वेळी झाली. त्यातही ‘राम तेरी…’मधून रूपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या मंदाकिनीचं सिनेमातलं ओलेतं देहप्रदर्शन खळबळजनक होतं. राज कपूरची ही तर ‘शो-वुमन’शिप आहे, अशी टीकाही या काळात झाली. मात्र, राज कपूरनं या टीकेला कधी उत्तर दिलं नाही. तो त्याचं काम करत राहिला.
‘राम तेरी गंगा मैली’नंतर राज कपूरने ‘हीना’ हा पुढील चित्रपट तयार करायला घेतला. ‘राम तेरी गंगा मैली’च्या वेळी त्याने संगीताची धुरा रवींद्र जैन या गुणी संगीतकाराकडं सोपवली होती. ‘राम तेरी गंगा मैली’ची सर्व गाणी जोरदार गाजली होती. पुढच्या ‘हीना’ या चित्रपटाचं संगीतही रवींद्र जैन यांच्याकडंच सोपवण्यात आलं. यात नायक होता ऋषी कपूर आणि नायिका होती पाकिस्तानमधील झेबा बख्तियार ही अभिनेत्री. या चित्रपटाचं चित्रीकरण अपूर्ण असतानाच राज कपूरचं निधन झालं. पुढं त्याचा थोरला मुलगा रणधीर कपूरनं हा चित्रपट पूर्ण केला आणि तो १९९१ मध्ये प्रदर्शित झाला.
राज कपूरला चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीत पार पडला. या सोहळ्याच्या वेळीच राज कपूर कोसळला. त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरामन व्यासपीठावरून खाली आले. राजने जेमतेम पुरस्कार स्वीकारला. मात्र, त्याची प्रकृती खूपच ढासळली. त्यामुळं त्याला त्या सोहळ्यातूनच थेट दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तिथं तो साधारण एक महिना मृत्यूशी झुंज देत होता. अखेर दोन जून १९८८ रोजी त्याची प्राणज्योत मावळली. राजला अनेक वर्षं दम्याचा त्रास होता. याशिवाय सर्व कपूर मंडळींप्रमाणे राजला मद्यपानाचा प्रचंड षौक होता. या दोन्ही गोष्टींमुळं त्याला तुलनेनं फार लवकर मृत्यू आला.
पुण्याजवळ लोणी काळभोर गावापाशी राजबाग ही राज कपूरची मोठी जागा होती. तिथंच त्याची ‘समाधी’ आणि स्मृती संग्रहालय उभारण्यात आलं आहे. ही जागा आता पुण्यातील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या मालकीची आहे. राज कपूरचा या जागेवर विशेष लोभ होता. त्याच्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरणही राजबागेत झालं होतें. इथंच असलेल्या राजच्या बंगल्यात ‘बॉबी’ चित्रपटातील ‘हम तुम एक कमरें में बंद हो…’ या प्रसिद्ध गाण्याचं चित्रीकरण झालं होतं.
मुंबईत चेंबूरला असलेला आर. के. स्टुडिओ ही राजच्या कार्यकर्तृत्वाची सर्वांत मोठी खूण. त्याचं खरं स्मारक तेच… मात्र, अलीकडं कपूर कुटुंबीयांनी ही मालमत्तादेखील विक्रीस काढल्याचं वृत्त आहे. अर्थात स्टुडिओ विकला गेला, तरी तिथं राज कपूरच्या स्मृती जागविल्या जातील, अशी आशा आहे. अर्थात, अशा भौतिक वास्तूंत किंवा तत्सम वारशात मावणारा हा कलाकार नव्हताच. तो त्याच्या अनेक लोकप्रिय, उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात कायमस्वरूपी वस्तीला आला आहे, हे खरं. प्रत्येक माणसात गुण-दोष असतातच. राजही काही सद्गुणांनी परिपूर्ण होता, असं नव्हे. तसा दावा खुद्द त्यानंही केला नसता. मात्र, तो जे जगला ते मनस्वीपणे. कलेवर निरतिशय प्रेम करीत!
अगदी अलीकडं ‘हीना’ चित्रपटाच्या आधी ‘चिठ्ठीए’ हे लताचं गाणं तयार होत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. त्यात राज कपूर त्या स्टुडिओत बसून त्या गाण्यातल्या प्रत्येक तानेला, लयीला, सुरांना दाद देताना दिसतो. हा अखेरच्या काळातला राज कपूर होता. संपूर्ण आयुष्य तो ज्या पॅशननं जगला, तीच पॅशन त्या छोट्याशा व्हिडिओतही दिसत होती.
राज कपूर जन्मला त्याला येत्या १४ डिसेंबरला १०० वर्षं पूर्ण होतील. या मोठ्या कलाकाराला त्याच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रेमपूर्वक अभिवादन!

---

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२४)

---

देव आनंदवरील ‘ग्राहकहित’मधील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----