-----------------------------
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा यशराज फिल्म्सचा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला येत्या २० ऑक्टोबर रोजी २५ वर्षं पूर्ण होतील. ‘यशराज फिल्म्स’ला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर १९९५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज यशराज फिल्म्सचा सुवर्णमहोत्सव आणि ‘डीडीएलजे’चा चक्क रौप्यमहोत्सव साजरा होतोय. केवढा काळ बदलला! काही पिढ्या बदलल्या... मात्र, ‘डीडीएलजे’ची जादू कायम राहिली आहे. एखादा चित्रपट जन्मताना सर्व शुभयोग एकत्र यावेत, तसं ‘डीडीएलजे’चं झालं असावं. हा सिनेमा म्हणजे एक दंतकथा ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट हे त्याचं बिरुद तर ध्रुवताऱ्यासारखं अढळ राहील, असं वाटतंय. एकाच चित्रपटगृहात सर्वाधिक काळ चाललेला हाच चित्रपट! हिंदीतला सर्वाधिक यशस्वी रोमँटिक चित्रपट हाच! लोकप्रियतेचे उच्चांक गाठून नवनवे माइलस्टोन तयार केले ते याच चित्रपटानं...! या चित्रपटातील संवाद, गाणी, एकेक दृश्य प्रचंड गाजलं. पुढं अनेक वेळा त्याची कॉपी झाली. ‘राज’ आणि ‘सिमरन’ ही भारतीय प्रेमकथांमधली ‘सर्वनामं’ झाली. विशेषनामांचं सर्वनाम होणं यापेक्षा लोकप्रियतेचा आणखी कोणता मोठा पुरस्कार असेल! सुरुवातीला हा चित्रपट नाकारणाऱ्या शाहरुखच्या करिअरमधला हा सर्वांत यशस्वी सिनेमा ठरला. या चित्रपटानं त्याच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब झालं. काजोलला या चित्रपटानं अव्वल श्रेणीतल्या नायिकांमध्ये कायमचं स्थान दिलं.
‘डीडीएलजे’ प्रदर्शित झाला १९९५ मध्ये... म्हणजे मागच्या शतकात! हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या फक्त दोन महिने आधीच भारतात पहिला मोबाइल कॉल केला गेला होता. एका मोठ्या क्रांतीची ती सुरुवात होती. त्या अर्थानं ‘डीडीएलजे’ हा मोबाइलपूर्व काळातला शेवटचा मोठा सुपरडुपर हिट चित्रपट. चित्रपटाचं निम्मं कथानक परदेशात घडत असलं, तरी त्यात मोबाइल नाही. भारतानं आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारून अवघी चारच वर्षं झाली होती. मधल्या दोन वर्षांत देशात जातीय दंगली, बॉम्बस्फोट आदी घटनांनी वातावरण पूर्ण बिघडलं होतं. अशा वेळी मोठ्या रुपेरी पडद्यावरचं मनोरंजन हा इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी एक महत्त्वाचा भाग होता. यशराज फिल्म्स म्हणजे वर्षानुवर्षं लोकप्रिय चित्रपट देणारी फॅक्टरीच झाली होती. या वेळी यश चोप्रांचा मुलगा आदित्य दिग्दर्शनात उतरला होता. त्याची ही पहिलीच फिल्म असणार होती. आदित्यच्या डोक्यात या चित्रपटाचा प्लॉट पक्का होता. परदेशात राहूनही ‘भारतीय संस्कार’ जपणारं पंजाबी कुटुंब आणि ‘बॉय मीट्स गर्ल’ फॉर्म्युला! शाहरुख वगळता चित्रपटाचं सगळं कास्टिंगही तयार होतं. शाहरुखची बहीण त्याच काळात खूप आजारी होती. त्यामुळं शाहरुख वेगळ्या मन:स्थितीत होता. सुरुवातीला तर त्यानं राजचा रोल खूप ‘गर्लिश’ आहे, म्हणून नाकारलाच होता. अखेर त्यानं ही भूमिका स्वीकारली आणि ‘डीडीएलजे’ नावाच्या इतिहासाला सुरुवात झाली...
आज २५ वर्षांनंतर हा चित्रपट पाहिला तर काही ठिकाणी हसू येतं. अमरीश पुरीचा ‘भारतीय संस्कारां’चा आग्रह आणि त्यावर त्याच्या मुलींची व अगदी आईचीही प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. याउलट मुलाचं अपयश सेलिब्रेट करणारा अनुपम खेरचा बाप हा जास्त ‘आज’चा (तेव्हा काळाच्या पुढचा) वाटतो. चित्रपटाची लांबी तब्बल तीन तास १० मिनिटांची! तीही तेव्हाच्या सिंगल स्क्रीनला साजेशीच. पहिला चित्रपट तयार करताना आदित्यनं कोणतीही कसूर बाकी ठेवली नव्हती. परदेशांतली लोकेशन्स, उत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट कलाकार, सुपरहिट संगीत आणि विनोदापासून ते मारामारीपर्यंत सर्व मसाल्याचं योग्य मिश्रण... सगळी भेळ उत्कृष्टपणे जमून आली होती. हा चित्रपट वेगवेगळ्या अर्थांनी ‘माइलस्टोन’ ठरला. मात्र, माझ्या मते तो एवढा हिट होण्याचं कारण म्हणजे विसाव्या शतकातल्या शेवटचा दशकात आलेला हा चित्रपट दोन्ही पिढ्यांना धरून ठेवणारा कदाचित शेवटचाच चित्रपट होता. एका अर्थानं यश चोप्रांच्याही पिढीला आवडेल आणि आदित्यच्याही पिढीला आवडेल असा हा शेवटचाच ब्लॉकबस्टर! त्यानंतरही फॅमिली ड्रामा आणि प्रेमकथा आल्याच; पण एवढं उत्तुंग यश कुठलाही दुसरा सिनेमा मिळवू शकला नाही. पुढच्या पाच वर्षांत आपण एकविसाव्या शतकात प्रवेश करणार होतो. जग बदलणार होतं, सिनेमाही बदलणार होताच! ‘डीडीएलजे’ त्याआधीच्या काळातला सिनेमा होता. आपल्याला जुन्या काळाशी जोडून घेणारा एक धागा सदैव हवाच असतो. ‘डीडीएलजे’नं माझ्या पिढीला कायमस्वरूपी हा धागा पुरवला. एकाच वेळी परदेशांतलं लोकेशन, तिथली धमाल आणि सोबत ‘कधीही हात न सोडणारे’ भारतीय संस्कार हा ‘कॉम्बो पॅक’ अफलातूनच होता. नायिकेला ‘जरासा झूम लू मैं’ म्हणत परदेशांतल्या रस्त्यांवर बागडण्याचं स्वातंत्र्यही होतं... आणि ‘परक्या पुरुषा’सोबत रात्री नकळत ‘तसलं’ काही तर घडलं नाहीय ना, या विचारानं रडण्याचा ‘संस्कारी’ हक्कही अबाधित होता. भारतीय मानसिकतेला काय आवडतं, काय झेपतं, याचा अचूक अंदाज आदित्य चोप्राला होता. मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला झेपेल एवढीच ‘बंडखोरी’ करायची हे तर यशाचं आदिसूत्र! या चित्रपटातही सिमरनला तिची आई सांगते - बेटा, सपने मत देखो ऐसा कौन कहता है? बस, उनके पूरे होने की शर्त मत रखो! आता हे फारच थोर तत्त्वज्ञान झालं. आज २५ वर्षांनी त्याकडं बघताना गंमत वाटते, पण १९९५ मध्ये ते किती अचूक होतं, हे या चित्रपटाच्या अफाट यशानं सिद्ध केलंच.

एका व्यापक अर्थानं बघायचं तर ‘डीडीएलजे’ हे एक भव्य आणि हवंहवंसं वाटणारं स्वप्न होतं. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भारतीय तरुणाईला मोहवून टाकणारं स्वप्न! आई-वडील, पालक यांच्या मनाविरुद्ध, त्यांना दुखवून नव्हे, तर त्यांचं मन जिंकून आयुष्यातली उद्दिष्टं, ध्येयं साध्य करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या पिढीला ‘राज’ आवडला नसता तरच नवल! एकविसाव्या शतकात भारतीय तरुणाईकडं वेगवेगळ्या कारणांनी जग जिंकण्याचा आत्मविश्वास आला आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांना सगुण साकार रूप मिळण्यासाठी बहुतांश वेळेला ‘बंडखोरी’ आवश्यक ठरली. एकविसावं शतक सुरू होताना झळकलेला फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट याचं प्रमाण होता. या तरुणाईला आता ‘आपल्या टर्मवर’ जगायचं होतं. पालक आणि त्यांच्यातले संबंध दुभंग तरी होते किंवा भावशून्य तरी! पाचच वर्षात एका शतकाचा फरक पडायचा होता, तो हा असा! या पार्श्वभूमीवर ‘डीडीएलजे’नं भारतीय मानसिकतेला सदैव कुरवाळायला आवडत असलेला ‘लाडाकोडा’चा, ‘संस्कारा’चा, ‘फील गुड’चा भाव पुरवला.
भारतीय समाजमनाला हवी असणारी, आवडणारी ही ‘हेही हवं आणि तेही हवं’वाली स्वप्नाळू (आणि काहीशी चतुर) मेजवानी आदित्य चोप्रानं अगदी नीट पुरवली. ही पंजाबी डिश सगळ्यांना आवडण्यासारखीच होती. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असं सगळं काही होतं त्यात! ‘जा, सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ म्हणणारा कर्तव्यकठोर, पण प्रेमळ बाप होता, ‘हे हे हे सेन्योरिटा’ करत फ्लर्ट करणारा आगाऊ; पण तरीही हवाहवासा वाटणारा हिरो होता, ‘बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं’ असंही म्हणणारा हिरो होता, ‘अपने देस की मिट्टी’ होती, ‘सरसों का साग और मकई दी रोटी’ होती... टिपिकल पंजाबी लग्न होतं, तिथल्या ‘सोणी कुड्या’ होत्या, प्रेमळ आज्जी होती... काय नव्हतं ते विचारा!
मुंबईत ‘मराठा मंदिर’ला मॅटिनीला वर्षानुवर्षं ‘डीडीएलजे’ सुरू राहिला... सध्या ‘करोना’नं त्याला खीळ बसली असली, तरी पुन्हा सगळं सुरळीत झाल्यावर ‘डीडीएलजे’ पुन्हा पहिल्याच दिमाखात सुरू राहील. ‘मेरे ख्याबों में जो आए...’ म्हणत लतादीदींचा तो चिरतरुण सूर कानी पडत राहील... ‘जरा सा झूम लूँ मैं...’ म्हणत आशाबाईंचा अवखळ सूर मनाला आनंद देत राहील... ‘तुझे देखा तो ये जाना सनम...’ म्हणत मोहरीच्या शेतावरून विहरत, लहरत येणारा कुमार सानूचा तो सानुनासिक आवाज थिएटर दुमदुमवत राहील... अमरीश पुरींचा दमदार आवाज अस्सल ‘पंजाबी माती’चा सुगंध घेऊन येईल... हिमानी शिवपुरी, सतीश शहाच्या गमतीजमती आठवत राहतील... मंदिरा बेदी, करण जोहर यांचं रूपेरी पडद्यावरचं हे पदार्पण केवढं अविस्मरणीय ठरलं हे आठवून त्यांनाही आश्चर्य वाटत राहील...
शेवटी ‘डीडीएलजे’ हे आपल्या सगळ्या भारतीयांचं रुपेरी स्वप्न आहे.... जोवर भारतीय सिनेमा आहे आणि इथला शेवटचा प्रेक्षक आहे तोवर ‘डीडीएलजे’ नावाचं हे स्वप्नही आपल्या डोळ्यांत राहीलच!
(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संवाद पुरवणीत १८ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)
(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संवाद पुरवणीत १८ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)
-----
अहाहा...कित्ती योग्य लिहिलय या चित्रपटाविषयी ...हा चित्रपट खरच फार गोड होता ...कितीही वेळा पाहिला तरी तेव्हढाच एन्जॉय करता येतो...
ReplyDelete