26 Dec 2021

‘८३’च्या निमित्ताने....

ते फक्त क्रिकेट नव्हतं...
-----------------------------



काल शनिवारी ‘८३’ बघितला. भारताने १९८३ मध्ये कपिल देवच्या जिगरबाज नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्यावहिल्या वन डे वर्ल्ड कपच्या यशोगाथेची कहाणी सांगणारा हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट. तो बघताना अनेकदा डोळे पाणावले. हृदय उचंबळून आलं. देशप्रेमाच्या भावनेनं मन ओथंबून गेलं. सिनेमा संपला, तरी किती तरी वेळ हा प्रभाव टिकून राहिला. मग पुन:पुन्हा त्या अंतिम सामन्याची क्षणचित्रं यू-ट्यूबवर बघितली. परत परत तो अपार जल्लोष, ती उत्कट विजयी भावना मनात साठवून घेतली. 
मला हा सिनेमा एवढं भावण्याचं आणखी एक वैयक्तिक कारण आहे. ते म्हणजे, मी १९८३ मध्ये सात-आठ वर्षांचा होतो, तरी मला हा वर्ल्ड कप बिलकुलच आठवत नाही. मला १९८१ च्या घटना आठवतात. महंमद अझरुद्दीननं हैदराबादकडून रणजी स्पर्धेत १५१ धावा केल्याची बातमी पेपरमध्ये वाचल्याचं मला लख्ख आठवतं. मला १९८२ ची एशियाड स्पर्धा अंधुक अंधुक आठवते. १९८४ नंतरच्या तर सर्वच घटना नीट आठवतात. १९८३ चा वर्ल्ड कप मात्र अजिबात आठवत नाही. मी तेव्हा तिसरीत गेलो होतो. जूनमध्ये शाळा नुकतीच सुरू झाली असणार. तेव्हा या वर्ल्ड कपची चर्चा आजूबाजूला होत असणारच. पेपर तर मी रोज वाचायचो. टीव्ही फार नव्हते, पण आजोबांना रेडिओवर कॉमेंटरी ऐकायची सवय होती. हे सगळं असूनही माझ्या स्मरणाच्या हार्ड डिस्कमधून वर्ल्ड कपची फाइल कायमची उडालेली आहे. या गोष्टीची मला निरंतर खंत वाटत आलेली आहे. मला १९८७ चा वर्ल्ड कप व्यवस्थितच आठवतो. इतकंच काय, तर १९८५ चा ऑस्ट्रेलियात झालेला बेन्सन अँड हेजेस मिनी वर्ल्ड कप आणि त्यात फायनलमध्ये आपण पाकिस्तानला धूळ चारून मिळविलेलं अजिंक्यपद, शास्त्रीला मिळालेली ऑडी हे सगळं आठवतं. पण १९८३ मात्र... टोटल ब्लँक! त्यामुळं ‘८३’ या सिनेमानं मला माझ्या आयुष्यातून कायमचे हरवलेले ते क्षण पुन्हा जगण्याची संधी दिली. सिनेमात नाट्यरूपानं का होईना, ते सगळं पुन्हा पाहता आलं, ते वातावरण अनुभवता आलं आणि म्हणूनच हा सिनेमा मला एवढा भिडला. (याच कारणामुळं मला या सिनेमाचं परीक्षण लिहिता येणार नाही.)
कबीर खाननं ‘८३’ सिनेमा अगदी ‘दिल से’ तयार केला आहे, हे त्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. खरं सांगायचं तर या सिनेमाचा ट्रेलर मी प्रथम पाहिला तेव्हा मला तो काही तितकासा भावला नव्हता. अगदी रणवीरसिंहही कपिल म्हणून पटला नव्हता. इतर खेळाडू तर सोडूनच द्या! मात्र, त्यामुळंच मी अगदी किमान अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या तुलनेत तो खूपच उजवा निघाला आणि अंत:करणापर्यंत पोचला. 
हा सिनेमा अर्थातच केवळ वर्ल्ड कपमधल्या त्या विजयापुरता नाही. तो अर्थातच केवळ क्रिकेटपुरताही नाही. भारताला जागतिक स्तरावर एक ताकद म्हणून ओळख मिळवून देणारी, देशवासीयांचा स्वाभिमान जागविणारी, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी अशी ती एक ऐतिहासिक घटना होती. म्हणूनच कबीर खाननं चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्या काळात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचे सूचक उल्लेख करून आपल्याला त्या काळात नेलंय. फूलनदेवी आणि नवाबपूरची दंगल हे त्यातले ठळक उल्लेख. 
भारतीय क्रिकेट मंडळ आणि तेव्हाच्या क्रिकेटपटूंची एकूणच सांपत्तिक स्थिती, क्रिकेटच्या जगात, त्यातही वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं असलेलं स्थान, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षं झाली तरी इंग्लंडबाबत मनात असलेली ‘साहेबाचा देश’ ही मानसिकता, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि एकूणच तेथील पत्रकार, सर्वसामान्य यांच्या मनात भारताबद्दल असलेली तुच्छतावादी मानसिकता, वेस्ट इंडिजच्या संघाचा तेव्हा असलेला प्रचंड दबदबा, आपले क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या संघाचे उत्साही आणि धडाकेबाज मॅनेजर मानसिंह असे सगळे बारकावे आणि व्यक्तिरेखा कबीर खाननं अगदी बारकाईनं टिपल्या आहेत. 

सिनेमाचा सगळा भर हा आपल्या संघाने इंग्लंडमध्ये पोचल्यापासून ते वर्ल्ड कप जिंकेपर्यंत खेळलेला प्रत्येक सामना आणि त्याच्या आगेमागे ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर घडत असलेल्या घटना यावरच केंद्रित आहे. त्यातही टनब्रिज वेल्सच्या मैदानावर कपिलने झिंबाब्वेविरुद्ध मारलेलं जबरदस्त शतक आणि १७५ धावा करून मोडलेला ग्लेन टर्नरचा विश्वविक्रम हा सर्वच घटनाक्रम अत्यंत प्रभावी झाला आहे. कपिल आणि सुनील यांच्यात असलेली काहीशी तेढ, श्रीकांतचा गमत्या स्वभाव, इंग्लंडच्या राणीला भेटण्याचा प्रसंग, श्रीकांत व कपिलला एका साउथ इंडियन कुटुंबाकडून भोजनाचं आलेलं आमंत्रण व त्यांच्या घरातील प्रसंग, नंतर ब्रिटिश राजदूतांच्या पार्टीतील श्रीकांतचं जोरदार भाषण, संदीप व रवी शास्त्री यांना आणि तीन-चार जणांसह रात्री मजा करायला बाहेर जायचं असतं तेव्हा कपिल त्यांना सल्ला देतो तो प्रसंग, गावसकरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वगळण्याचा प्रसंग, वेंगसरकरचा जबडा मोडून तो वर्ल्ड कपला मुकण्याचा प्रसंग, इंग्लंडला हरवल्यानंतर भारतीय चाहत्यांना ढोल वाजवू न देणाऱ्या त्यांच्या उद्धट प्रेक्षकांना भारतीय प्रेक्षकांनी ठोकणं अशा अनेक घटनांच्या साखळीतून वर्ल्ड कपच्या मोहिमेचा हा थरार आपल्यासमोर उलगडत जातो.
भारतीय संघाला या स्पर्धेला जाण्यापूर्वी कुणीही फार मोजत नव्हतं, हे आता सर्वश्रुत आहे. या सिनेमातही ठायी ठायी त्याचा प्रत्यय देणारे प्रसंग आहेत. भारतीय संघाला लॉर्ड्सचे पासच दिलेले नसतात. मॅनेजर मानसिंह हे पासेस मागायला जातात, तेव्हा उद्धट इंग्रज अधिकारी ‘भारताची एकही मॅच लॉर्ड्सला नाही, तुमचा संघ फायनलला गेला तर नक्की पास देऊ’ असं सांगतो. त्यानंतरच्या प्रसंगात मानसिंह त्याच अधिकाऱ्याकडे पुन्हा जातात तेव्हा थिएटरमध्ये एकच जल्लोष होतो, हे सांगणे न लगे. इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय पाठीराख्यांचाही एक समांतर ट्रॅक या सिनेमात आहे. त्यातही एक लहान मुलगा आणि त्याचे वडील हे जणू काही समस्त भारतीय प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सिनेमाभर दिसत राहतात. या मुलाच्या हातातील तिरंग्यामुळंच कपिल आणि त्याच्या संघाला प्रेरणा मिळते. 
कपिलला व्यवस्थित इंग्लिश बोलता येत नसतं. या मुद्द्याचाही सिनेमात अनेकदा उल्लेख येतो. त्या अनुषंगाने कपिलची पहिली प्रेस कॉन्फरन्स आणि तिथं असलेले दोन-तीन पत्रकार आणि फायनलपूर्वीची भरगच्च प्रेस कॉन्फरन्स आणि तिथंही पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या आत्मविश्वासानं ‘वी आर हिअर टु विन’ असं कपिल म्हणतो, त्याच आत्मविश्वासानं हेच वाक्य ऐकवणारा कपिल बघताना डोळे भरून न आले तरच नवल. 
भारतीय संघाच्या बसमध्ये मानसिंह कपिलला ‘टीम मीटिंग’ घ्यायला सांगतात, तो प्रसंगही असाच जमून आलाय. त्या बसमध्ये रंगीत टीव्ही असतो आणि व्हीसीआरवर लागलेलं ‘हम बन तुम बने एक दुजे के लिए’ हे गाणं आणि त्या गाण्यातील ‘आय डोण्ट नो व्हॉट यू से’ या ओळींचा विनोदासाठी केलेला चपखल वापर यासाठी दिग्दर्शकाला आपली दाद जातेच. तसंच बहुतेक सामन्यांची प्रत्यक्ष दृश्यं आणि त्यात खऱ्या सामन्यातला एखादा फोटो आणि टीव्हीवर दिसणारा सामन्यात मूळ सामन्याचीच ध्वनिफीत वापरणं अशा काही युक्त्यांनी मजा येते.
भारतीय संघ या वर्ल्ड कपपूर्वी आधीच्या दोन वर्ल्ड कपमध्ये केवळ एक सामना जिंकू शकला होता. तोही ईस्ट आफ्रिकेविरुद्ध. मात्र, १९८३ च्या वर्ल्ड कपनं भारतीय क्रिकेट आरपार बदलून गेलं. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांचा एक प्रसंग सिनेमात आहे. नवाबपूरच्या दंगली थांबविण्यासाठी पंतप्रधानांनी क्रिकेटज्वराचा उपयोग करून घेतला, असं त्यात सूचित करण्यात आलंय. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोचल्यानंतरच खऱ्या अर्थानं भारतात माध्यमांनी (म्हणजे वृत्तपत्रंच!) या स्पर्धेचं जोरदार वार्तांकन सुरू केलं आणि सर्वसामान्य जनतेतही स्पर्धेची चर्चा सुरू झाली. मग होस्टेलवर वर्गणी काढून टीव्ही आणले गेले. गावोगावी अँटिने बसविले गेले. ‘पिक्चर दिसतंय का?’ हा अँटेना हलवून विचारायचा प्रश्न सर्व देशभरात विचारला जाऊ लागला. सिनेमात हे सगळं क्रिकेटचं वाढतं प्रेम चढत्या भाजणीनं दाखवण्यात आलंय. भारतानं पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकला, तरी ‘भारत नशिबानं जिंकला’ असं लिहिणाऱ्या इंग्लिश वृत्तपत्रांच्या पानांनी कपिल बूट साफ करत बसतो, हे दृश्य फारच बोलकं! (भारत जिंकला तर I will eat my words म्हणणारा समीक्षक भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शेवटी महिन्यानंतर चक्क त्यानं लिहिलेला लेख पाण्यात (की दारूत?) बुडवून खातो, याचाही उल्लेख सिनेमाच्या शेवटी येतो.) थोडक्यात, सर्वांच्या नाकावर टिच्चून भारतानं, विशेषत: कपिलनं आपल्या जिगरी वृत्तीच्या बळावर हा वर्ल्ड कप खेचून आणला होता. या मूळ घटनेतच इतकं नाट्य आहे, की त्यावर गेली ३८ वर्षं चित्रपट तयार कसा झाला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. करोनापूर्व काळातच तयार झालेला हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अखेर जवळपास दोन वर्षं जावी लागली. मात्र, हा सिनेमा बघण्याची मज्जा मोठ्या पडद्यावरच, यात काही वाद नाही.

अखेर कलाकारांविषयी. रणवीरसिंह कपिल म्हणून शोभत नाही, हे ट्रेलर बघून झालेलं माझं मत सिनेमा बघितल्यानंतर पूर्ण पुसलं गेलं. त्यानं फारच मेहनतीनं ही भूमिका साकारली आहे, यात वाद नाही. श्रीकांत झालेला जिवा हा अभिनेता मजा आणतो. पंकज त्रिपाठीनं मानसिंहच्या भूमिकेत हा सिनेमा अक्षरश: तोलून धरला आहे. आदिनाथ कोठारेला दिलीप वेंगसरकरांची छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. सुनील गावसकर झालेला ताहिर भसीन मुळीच गावसकर वाटत नाही. पण त्यानं काम चांगलं केलंय. बाकी बलविंदर संधूचं काम करणाऱ्या कलाकारानं (बहुतेक अॅमी विर्क असं नाव आहे) पण लक्षात राहण्यासारखं काम केलंय. नीना गुप्तानं कपिलच्या आईचं काम सुंदर केलंय. इतर संघांचे खेळाडू (जसेच्या तसे दिसणारे) मिळणं अवघडच. त्यातल्या त्यात व्हिव रिचर्ड्सला जरा वाव आहे. तो कलाकारही बराचसा रिचर्ड्ससारखा दिसणारा निवडला आहे. दीपिका पदुकोणनं कपिलच्या पत्नीची - रोमीची छोटी भूमिका साकारली आहे. अंतिम सामन्यापूर्वी सकाळी लॉर्डसवरचा सूर्योदय पाहत तिचं आणि कपिलचं संभाषण हा या सिनेमाचा एक हायपॉइंट आहे. त्याच सकाळी लॉर्ड्सवर तिरंगा वर वर जातानाचं दृश्य पाहताना डोळे वाहिल्याशिवाय राहत नाहीत. चित्रपटातली दोन-तीन गाणीही स्फूर्तिदायी आहेत. 
भारतामधल्या क्रिकेटचं भवितव्य कायमचं बदलवून टाकणारी या स्फूर्तिदायी यशोगाथा पाहायला हवीच. क्रिकेट न आवडणाऱ्यांनीही जरूर पाहावा, तसंच आपल्या लहान मुलांना आवर्जून दाखवावा असाच हा चित्रपट आहे.

---

याच शीर्षकाचा माझा आणखी एक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

18 comments:

  1. 👌👌👍खूपच मस्त लिहिलंय ...हा world cup आमच्या पिढीतील अनेकांप्रमाणे माझ्याही हृदयाच्या अगदी जवळचा आहे ..ती excitement त्यावेळी अनुभवली आहे ..त्याकाळी क्रिकेट मध्ये प्रचंडच interest होता व क्रिकेट बऱ्यापैकी समजत ही असे.. त्यामुळे यात व्यक्त झालेलं सर्व काही खूप आवडल ..आज रात्री १० च्या शोची तिकिटे पूर्वीच काढून ठेवली आहेत . Review वाचून सिनेमा पाहण्यासाठी मन फारच अधीर झालं आहे. धन्यवाद.💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान लिहिलं आहे....

      Delete
    2. धन्यवाद! कृपया आपले नाव लिहा...

      Delete
  2. खूपच छान केलंय समीक्षण, नक्की पाहणार सिनेमा.

    ReplyDelete
  3. तुम्हीं केलेलं समीक्षण वाचून कधी एकदा हा चित्रपट पाहीन असे झाले आहे. सगळ्या त्या आठवणी आणि शाळेमध्ये असल्याने फक्त commentary ऐकून समाधान मानले होते, तरीही तुम्ही केलेल्या वर्णनामुळे सगळे प्रसंग डोळ्यासमोरून गेले.
    खूप छान, सुंदर.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! कृपया आपले नाव लिहा!!

      Delete
  4. अतिशय सुंदर वर्णन, आता सिनेमा टॉकीज ला जावून कधी बघतो असे झाले आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की पाहा. कृपया आपले नाव लिहा...

      Delete
  5. मनापासून केलेलं समीक्षण !

    ReplyDelete
  6. Yessss ही बालपणीची excitementअनुभवली आहे. त्या काळात सोलापूरातtv नसल्याने वडिलांनी पुण्याला काकंकडे मैच बघण्यासाठी रेल्वेने पावलं होतं. आणि त्या अभूतपूर्व क्षणांचे साक्षीदार झालो.त्या रोमांचक आठवणी आपल्या उत्कृष्ट समीक्षणाने जाग्या केल्यास आहेत👏👏

    ReplyDelete
  7. एकदम यथार्थ लिहिलयस श्रीपाद.. खुप खूप मजा आली चित्रपट पाहताना.. 😊 🙏🏻

    ReplyDelete