कावेरीच्या उगमापासून कॉफीच्या बियांपर्यंत...
-------------------------------------------------------
कूर्ग, १४ एप्रिल २५
आज ब्रेकफास्ट झाल्यावर बरोबर नऊ वाजता अराफात हॉटेलपाशी आला. आम्ही लगेच निघालो ते तलकावेरीला. हे कावेरी नदीचं उगमस्थान. मडिकेरीपासून साधारण ४५ किलोमीटर अंतर. आठ किलोमीटर आधी त्रिवेणी संगम लागतो. आम्ही मंगळुरू रस्त्याकडे निघालो. आम्हाला परवा येताना तलकावेरीकडं जाणाऱ्या रस्त्याची मोठी कमान दिसली होती. मडिकेरीपासून साधारण सात-आठ किलोमीटर अंतरावर हा फाटा आहे. आम्ही तिकडं वळलो. आतला रस्ता आतापर्यंतच्या रस्त्यांच्या तुलनेनं थोडा लहान व काही काही ठिकाणी जरा खराब होता. अराफात सारखा म्हणत होता, की इकडं यायचं तर अगदी सकाळी सहा वाजता निघायला पाहिजे. त्या रस्त्यावर मस्त वातावरण असतं. क्वचित धुकं वगैरेही असतं. अर्थात आम्ही नऊ वाजता निघालो असल्यानं थोड्याच वेळात ऊन चांगलंच तापलं आणि काचा बंद करून कारमधला एसी सुरू करावा लागला. तलकावेरीकडं जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निसर्गानं अक्षरश: सौंदर्याची उधळण केली होती. डोंगरदऱ्या, उतारावर घनदाट झाडी, छोटी छोटी गावं, मंगलोरी कौलं घातलेली टुमदार घरं असं ते सगळं दृश्य म्हणजे कुठल्याही चित्रकारासाठी पर्वणीच. (मध्येच बोलताना मंगलोरी कौलांचा विषय निघाला, तर अराफात म्हणाला, की आम्हीही इकडं त्याला कौलं असंच म्हणतो.)
साधारण तास-सव्वा तासानं आम्ही त्रिवेणी संगमापाशी पोचलो. इथं बागमंडला मंदिर आहे. त्रिवेणी संगमावर आता मोठा पूल झाला आहे. इथं कावेरी, कनिके व संज्योती (गुप्त) या नद्यांचा संगम आहे. कावेरीच्या उगमापासून हे स्थान अगदी जवळ असल्याने इथं नदीचं पात्र अगदी लहान होतं. दुसरी नदीही लहान होती. त्यामुळं तो त्रिवेणी संगमाचा परिसर तसा अगदी छोटा होता. तिथं टुमदार घाट बांधलेला होता. आम्ही तिथं जाऊन पाण्यात पाय भिजवले. काही काही भाविक पाण्यात उतरून स्नान करत होते. बाजूला दोन छोटी मंदिरं होती. ऊन रणरणायला लागलं असलं, तरी एकूण तो परिसर रमणीय होता. आम्ही तिथून मग बागमंडला मंदिरात गेलो. इथं बाहेर चपला काढण्यासाठी स्टँड होते आणि सगळीकडं एका जोडाला तीन रुपये असा स्टँडर्ड दर होता. शिवाय प्रत्येक ठिकाणी यूपीआयचा स्कॅनरही असायचा. इथंही बाहेरच ड्रेसकोडचा बोर्ड होता. आत मोबाइलवरून फोटो काढण्यास मनाईचे फलक लावले होते. आम्ही गेलो तेव्हा तिथं गर्दी कमी होती, तरीही एक गार्ड आत फिरून कुणी फोटो, सेल्फी वगैरे काढत नाहीय ना, हे अगदी डोळ्यांत तेल घालून पाहत होता. शिवाय तो ड्रेसकोडबाबतही बराच कडक असावा. कारण आम्ही नंतर बाहेर पडलो, तेव्हा स्कर्ट घातलेली एक ललना बाहेरूनच दर्शन घेताना दिसली. आम्ही अगदी थांबून पाहिलं, पण ती काही आत गेली नाही. गार्ड समोरच उभा होता. हे मंदिर छान होतं. इथल्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीलाच जे दार होतं, त्यावर मोठं गोपुरासारखं बांधकाम होतं. त्या तुलनेत आतल्या मंदिराचा कळस उंचीनं अगदीच लहान होता. मंदिराच्या संकुलाला चारी बाजूंनी मजबूत दगडी भिंतींचं कुंपण होतं. आतमध्ये आपल्यासारख्याच देवळी होत्या. तिथं काही भाविक सावलीला बसून होते. आतमध्ये मुख्य मंदिरासोबत सुब्रह्मण्यम, गणपती यांची छोटी छोटी मंदिरं होती. तिथं खूप शांत, छान वाटलं. दर्शन घेऊन थोडा वेळ ‘देवाचिये द्वारी बसलो क्षणभरी’! अर्थात पुढं निघायचं होतं.
बाहेर आलो. ऊन जाणवत होतं, म्हणून एके ठिकाणी शहाळ्याचं पाणी प्यायलो. अराफातला बोलावलं. आता पुढचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आणखी चढणीचा होता. छोटेखानी घाटच. मात्र, आडवा पसरलेला. अखेर अर्ध्या तासानं ती तलकावेरी क्षेत्राची कमान दिली. इथं बाहेर बऱ्याच चारचाकी गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. अनेक स्थानिक मंडळी दुचाकीवरूनही सहकुटुंब सहलीला आल्याप्रमाणे तिथं आलेली दिसली. इथंही अगदी बाहेरच चपला स्टँड होता. तिथून आत त्या फरशीच्या पायऱ्यांवरून भर उन्हात चालत जायचं होतं. अर्थात सगळेच लोक तसे अनवाणीच निघाले होते. त्या कमानीखालीच जरा सावली होती. आम्ही पाच मिनिटं तिथं थांबून, फोटो सेशन करून पुढं निघालो. काही पायऱ्या चढून गेल्यावर कावेरीचा उगम असलेलं ते कुंड लागलं. तिथं पुजारी आणि सुरक्षारक्षक बसले होते. पाण्यात नाणी टाकू नयेत, हात-पाय धुऊ नयेत, फोटो काढू नयेत वगैरे बऱ्याच सूचनांचा फलक तिथं होता. आम्ही त्याचं पालन करीत फक्त कुंडाचं व तिथल्या देवीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. काही भाविक मात्र तिथंही मोबाइल काढून शूटिंग करत होते. मग त्यांना त्या सिक्युरिटी गार्डचा ओरडा खावा लागला. शेजारी आणखी एक कुंड होतं. तिथं मात्र भरपूर नाणी पडलेली दिसली. इथं बहुतेक ती नाणी टाकून इच्छा व्यक्त करायची जागा असावी. आम्हीही त्या कुंडात नाणी टाकली. इथून आणखी वर डोंगरावर जाण्याचाही एक रस्ता होता. मात्र, तेव्हा ऊन झालं असल्यानं आणि आम्हाला लवकर परत निघायचं असल्यानं आम्ही वर गेलो नाही. अर्धात जिथं कुंड होतं, तिथूनही समोरचं निसर्गदृश्य अत्यंत सुंदर दिसत होतं. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगांनी तो सर्व परिसर व्यापला होता. त्यामुळं एवढ्या उन्हातही डोळ्यांना गार वाटत होतं. थोडा वेळ तिथं फोटोसेशन करून आम्ही खाली उतरलो. अराफातभाई आमची वाट पाहत थांबलेच होते. लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा मडिकेरीत येईपर्यंत आम्हाला एक वाजला. मग आधी ‘अंबिका उपाहार’ या अराफातच्या लाडक्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. इथं बदल म्हणून मी नॉर्थ इंडियन थाळी मागवली. भरपूर जेवण झालं. नंतर लस्सी मागवली.
जेवणं झाल्यावर आम्हाला आता पहिल्या दिवशी राहिलेल्या कॉफी प्लँटेशनकडं जायचं होतं. अराफातला सकाळीच तसं सांगितल्यामुळं तो खूश झाला होता. आम्ही लगेच तिकडं गेलो. पहिल्या दिवशी आम्हाला भेटलेला उंचापुरा, भरघोस मिशा असलेला माणूसच तिथं होता. ‘तुम्ही परत आलात हे बघून आनंद झाला,’ असं त्यानं आवर्जून सांगितलं. आम्ही प्रत्येकी दोनशे रुपयांचं तिकीट काढलं. इथं मात्र स्कॅनरची सोय नव्हती. त्यामुळे रोख पैसे द्यावे लागले. त्यांनी एक तरुण मुलगा गाइड म्हणून दिला. त्यानं अर्ध्या तासाची पायी भटकंती करून ते सर्व प्लँटेशन आम्हाला नीट दाखवलं. सुरुवातीला हातात काठ्या दिल्या. त्यामुळं ट्रेक करत असल्याचा फील येतो म्हणे. त्या मुलानं आम्हाला कॉफीची निरनिराळी झाडं दाखवली. कॉफीच्या बिया, पानं, त्या बिया काढण्यापासून ते कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सर्व काही तिथं दाखवण्यात आलं. स्थानिक वेगळी झाडं बघायला मिळाली. 'सिल्व्हर ओक'ची झाडं तिथं विपुल प्रमाणात दिसली. वेगळ्या आकाराच्या संत्र्यांचं एक झाडही होतं. सागाची उंच झाडं होती. एकूण दोनशे रुपये तिकीट काढलं, त्याचं सार्थक झालं. ही पाहणी संपवून आम्ही वर येऊन बसलो, तर त्यांनी तिथली स्पेशल ब्लॅक कॉफी आणून दिली. ती अतिशय सुंदर होती. शिवाय अर्धा तास पायपीट केल्यानंतर ती मिळाल्यामुळं गरम असली, तरी छान वाटली. त्यानंतर मग तिथला कॉफीचा कारखाना बघायला गेलो. तिथल्या माणसानं अगदी बारकाईनं पुन्हा एकदा सगळी प्रक्रिया सांगितली. कॉफीचे विविध प्रकार दाखवले. तिथली स्पेशल ‘कावेरी कॉफी’ही दाखवली. यात मार्केटिंगचा भाग अर्थातच होता. मात्र, अमुक एक घ्याच, अशी सक्ती अजिबात नव्हती. त्यामुळं आम्ही वरच्या दुकानात जाऊन आम्हाला हवी ती खरेदी केली.
आता इथून आम्हाला जायचं होतं ते फोर्ट म्युझियमला. मडिकेरी गावाच्या अगदी मध्यभागी हा जुना किल्ला आहे. आम्ही अगदी थोड्याच वेळात तिथं पोचलो. एका जुन्या चर्चच्या जागी हे शासकीय संग्रहालय आहे. मात्र, त्या दिवशी आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी असल्यानं हे संग्रहालय बंद होतं. मग आम्ही त्या किल्ल्याच्या परिसरात नुसता एक फेरफटका मारला. मुख्य इमारतीत आता न्यायालय व इतर काही सरकारी कार्यालये आहेत. समोरच्या बाजूला दोन हत्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. तिथं शेजारी या किल्ल्याची माहिती लिहिली होती. कूर्गच्या राजाने १६८१ मध्ये हा किल्ला उभारला. किल्ल्यात एक गणपती मंदिरही होतं. आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतलं. पलीकडून गावात निघणारा आणखी एक रस्ता व मोठं दगडी प्रवेशद्वार होतं. ते पाहून मला आपल्या पन्हाळ्यावरील ‘तीन दरवाजा’ची आठवण आली. नील त्या वरच्या तटाच्या भिंतीवरही जाऊन आला. तिथं आणखी काही मराठी पर्यटक होते. थोडा वेळ रेंगाळून निघालो,
आता आम्हाला शेवटच्या पर्यटनस्थळी - राजाज टोम्ब - इथं जायचं होतं. इथल्या राजांची समाधी असलेली ही एक बाग आहे. तिकडं जाताना अराफातनं जुन्या मडिकेरी गावातून मुद्दाम कार नेली. त्यामुळं आम्हाला ते शांत, निवांत पहुडलेलं गाव बघता आलं. महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणाची (शिरूर, वैजापूर, येवला, फलटण, श्रीगोंदा इ,) आठवण येईल, असं ते ‘सुशेगाद’ गाव होतं. दोन दोन मजली घरं, समोर छोटं अंगण, तिथं लावलेल्या दुचाकी गाड्या, घरांसमोर ठेवलेली छोटी फुलझाडं, काही ठिकाणी रांगोळ्या, तर काही घरांसमोर बकऱ्या बांधलेल्या अशा संमिश्र वस्तीच्या त्या भागातून जाताना त्या गावाचं ‘खरं’ दर्शन घडलं. आता अराफात त्याच्या घरी वगैरे नेतो की काय, असं आम्हाला क्षणभर वाटलं. पण तो पक्का प्रोफेशनल होता. त्यानं तसं काही न करता आम्हाला थेट त्या राजांच्या समाधीपाशी सोडलं. तिथंही तिकीट होतं. ते काढून आम्ही आत शिरलो, तेव्हाच आभाळ भरून आलं होतं. त्या दोन समाध्या आमच्या जेमतेम पाहून झाल्या आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. आम्ही पळतच येऊन कारमध्ये बसलो. इथून पुढं ‘ॲबी फॉल’कडे जायची आमची इच्छा नव्हती. जोरदार पाऊस आला तर सगळा रस्ता चिखलाचा आहे आणि तुम्हालाही भिजावं लागेल, असं अराफात म्हणाला. एकूणच तिथून सहा किलोमीटरवर असलेल्या आणि आता अगदी क्षीण धार पडत असलेल्या त्या धबधब्याकडं जायला तोही फारसा उत्सुक नव्हता, हे आमच्या लक्षात आलं. मग आम्हीही म्हटलं, की नको आता जायला तिकडं. चला हॉटेलवर. पडत्या फळाची आज्ञा घेऊन अराफातनं आम्हाला थेट हॉटेलवर आणून सोडलं. तेव्हा जेमतेम साडेचार, पाचच वाजले होते. मात्र, आता पावसानं चांगलाच जोर पकडला होता. उद्या आमचं चेक-आउट होतं, त्यामुळं आम्ही अराफातला सकाळी नऊ वाजता यायला सांगितलं अन् त्याचा निरोप घेतला.
आज आम्ही लवकरच हॉटेलवर आल्यामुळं आणि बाहेर पाऊस पडत असल्यानं रेस्टॉरंटमधूनच वर चहा मागवला. इथं कॅरमची पण सोय होती. मग नीलनं खाली रिसेप्शनला फोन करून कॅरम मागवला. थोड्याच वेळात हॉटेलचा माणूस कॅरम घेऊन आला. अगदी पावडरसह. मी खूप दिवसांनी कॅरम बोर्डवर हात साफ करून घेतला. काही काही फेव्हरिट शॉट जसेच्या तसे जमताहेत का, ते पाहिलं. चक्क जमले. आपल्या मेंदूची क्षमता अचाट असते हे खरं. किती तरी वर्षांनी खेळूनही मधल्या गोलात असलेली सोंगटी डावीकडच्या बॉक्समध्ये एका फटक्यात पाडता आली. तो विशिष्ट कट अगदी जसाच्या तसा जमला, याचा आनंद झाला. थोडा वेळ कॅरम खेळलो, पण आम्ही बाल्कनीत बसलो होतो आणि तिथ आता जोरात पाऊस यायला लागला. मग आत येऊन उरलेला डाव खेळलो. मग नीलला कंटाळा आल्यावर कॅरम परत देऊन टाकला. खरं तर आज आम्हाला मडिकेरीतल्या आणखी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन डिनर करायचं होतं. मात्र, पाऊस एवढा वाढला, की आम्ही तो बेत रद्द केला. शेवटी हॉटेलच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो. आज सुट्टीचा शेवटचा दिवस असल्यानं बरेच लोक चेक-आउट करून गेले होते. त्यामुळं डिनरला तिथं फक्त आम्ही तिघंच होतो. अर्थात त्यांनी व्यवस्थित सर्व्ह केलं. जेवून आम्ही वर आलो. आता सगळं आवरून ठेवायचं होतं. उद्या ब्रेकफास्ट करून परतीचा प्रवास सुरू करायचा होता...
कूर्ग/मंगळुरू/बंगळुरू/पुणे, १५ एप्रिल २५
मंगळवारी सकाळी लवकर उठून आवरून ठेवलं. ब्रेकफास्ट केला. बॅगा आवरून ठेवल्या. बरोबर नऊ वाजता अराफात आला. आम्ही इथल्या रेस्टॉरंटमध्ये जे काही दोन-तीन दिवस जेवलो होतो, त्याचं बिल त्यांनी एकदम दिलं. मग ते पेमेंट केल्यावर चेक-आउट पूर्ण झालं. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आमचं बंगळुरूला जाणारं विमान मंगळुरूवरून दुपारी ३.२५ वाजता निघणार होतं. मध्ये १३७ किलोमीटरचा प्रवास होता. आम्हाला निदान दोन वाजता तरी मंगळुरूत पोचायला हवं होतं. त्यामुळं आम्ही नऊ वाजता निघालो. मात्र, रस्त्यानं फारशी वाहतूक नसल्यानं आम्ही १२.३० वाजताच मंगळुरू शहरात पोचलो. मग दुपारचं जेवण शहरातच कुठल्याही तरी रेस्टॉरंटमध्ये करून घ्यावं, असं ठरवलं. त्यानुसार अराफातनं आम्हाला एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. खरं तर ते रेस्टॉरंट अगदीच साधं होतं. मात्र, आता आमच्याकडं वेळ नव्हता. अर्थात तिथं जेवण व्यवस्थित मिळालं. मग जेवून आम्ही लगेच विमानतळाकडं निघालो. बरोबर दीड वाजता आम्ही विमानतळावर पोचलो. अराफातला निरोप दिला. त्याच्या दोन मुलींसाठी खाऊसाठी पैसे दिले. त्यामुळं तो खूश झाला. आम्ही ‘डिजियात्रा’त नोंदणी केलेली असल्यानं आमचं चेक-इन फटाफट झालं. हा विमानतळ अगदीच छोटा होता. गर्दीही कमी होती. इथून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइट जास्त संख्येने होत्या. आमचं विमान वेळेत आलं. वेळेत निघालं. इथून टेक-ऑफ करतानाही विमान दरीच्या बाजूकडे जाईल आणि तिथून विरुद्ध दिशेने उडेल असा माझा अंदाज होता. तसंच झालं. त्या अपघातानंतर केलेला का कायमस्वरूपी इलाज असणार. आमचं फ्लाइट अर्ध्याच तासाचं होतं. मात्र, बंगळुरू विमानतळावर ‘गो अराउंड’ करावं लागल्यानं जरा वेळ लागला. तरी पाच वाजता आम्ही लँड झालो होतो. इथून आम्ही आतल्या आत जे ‘अन्तर्राज्यीय स्थानांतर’ असतं, तिकडं जाऊ शकलो. तिथंही ‘डिजियात्रा’मुळं प्रवेश सुकर झाला. (पुण्यात प्रवास सुरू करताना माझं ‘डिजियात्रा’ चाललं नव्हतं. त्यामुळं मला रेग्युलर रांगेतून आत यावं लागलं होतं. सुदैवानं मंगळुरू व बंगळुरूत ती अडचण आली नाही आणि माझाही प्रवेश सहज झाला.) इथल्या गेटवर जाऊन बसलो. महागामोलाची कॉफी घेतली. पाण्याची बाटलीही अशीच महागाची विकत घेतली. (आमची स्टीलची पाण्याची बाटली अराफातच्या गाडीतच विसरली. त्याचा फोनही आला होता. पण काय करणार? राहू दे म्हटलं आता तुम्हाला...) गेटची एकदा बदलाबदली होणं हे जवळपास रिच्युअल असतं. ते झालं. मग त्या गेटवरून बोर्डिंग सुरू झालं आणि आम्ही एकदाचे पुणेगामी विमानात बसलो. खरं तर हा तासाभराचा प्रवास; पण पुण्याला चक्क लँडिंग सिग्नल मिळेना. पुण्यावरही आमचं ‘गो अराउंड’ सुरू झालं. मी तसा बऱ्याचदा पुणे विमानतळावर उतरलोय, मात्र इथं ‘गो अराउंड’ करायची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती. आता पुण्यातल्या रस्त्यांवरच्या ट्रॅफिक जॅमची लागण आकाशालाही झालेली दिसते. असो. फार उशीर झाला नाही. आम्ही साडेआठला उतरलो. मग त्या बॅटरी ऑपरेटेड गाड्यांतून एअरो मॉलला गेलो. तिथून ‘रॅपिडो’ची कॅब बुक केली. मात्र, त्यांचा अधिकृत थांबा तिथं नसल्यानं आम्हाला त्या कॅबवाल्यानं सिम्बायोसिस रस्त्यानं जरा मागं बोलावलं. मग तिथवर चालत गेलो. कॅबनं साडेदहा वाजता घरी सुखरूप पोचलो.
कूर्गची ट्रिप अगदी जशी व्हायला हवी होती तशी झाली. थोडं आमचं नियोजन, बरीचशी ‘विहंग टूर्स’च्या परांजपे दाम्पत्याची आस्था आणि स्थानिक नागरिक व हवामानाची साथ यामुळं ही ट्रिप यशस्वी झाली.
या ट्रिपला आम्हाला सर्व मिळून माणशी ३० हजार रुपये खर्च आला.
(‘विहंग टूर्स’चे शैलेंद्र परांजपे यांचा फोन नंबर - ९५५२५५७५७२)
(समाप्त)
---------