लक्षात राहिलेली असाइनमेंट
----------------------------------
पत्रकारितेच्या पेशात सर्वांत आनंददायक भाग विविधांगी अनुभवांचा असतो. एरवी सहजासहजी जे अनुभव घेता येत नाहीत ते या पेशात सहज घेता येतात. वेगवेगळ्या व्यक्तींना भेटता येतं, अनेक ठिकाणांना भेटी देता येतात आणि अनेक घटनाचं वार्तांकन प्रत्यक्ष उपस्थित राहून करता येतं. अनेक जण केवळ या अनुभवांसाठी पत्रकारितेत येतात. अर्थात पत्रकारितेत सर्वांनाच हे ‘थ्रिल’ अनुभवता येतं असं नाही. विशेषत: डेस्कला, म्हणजे उपसंपादक म्हणून जी मंडळी काम करत असतात, त्यांना वार्ताहरांसारखी बाहेर जाऊन असे वार्तांकन करण्याची संधी तुलनेनं कमी वेळा मिळते. माझ्या सुदैवानं मी उपसंपादक असूनही मला काही अविस्मरणीय असाइनमेंट मिळाल्या. माझ्या परीने मी त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला.
मी ‘सकाळ’मध्ये काम करीत असताना केलेल्या एका दौऱ्याची हकीकत इथं सांगणार आहे. आपल्या संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होताना, म्हणजे डिसेंबर २००२ मध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या नातेवाइकांशी बोलून एक रिपोर्ताज करावा, असं मला तेव्हाचे आमचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं. ही मोठीच जबाबदारी होती. मी अगदी थरारून गेलो. मी लगेच या घटनेची सर्व माहिती जमा करण्यास सुरुवात केली आणि जोडीला दिल्लीला जाण्याची तयारीसुद्धा! साधारण आठ ते दहा दिवसांचा दौरा होता.
या दौऱ्याची हकीकत सांगण्यापूर्वी १३ डिसेंबर २००१ याच दिवसाची एक आठवण सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही. नगरचे नुकतेच दिवंगत झालेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासंदर्भातील ही आठवण आहे. मी १९९९-२००० या वर्षात बी. सी. जे. (बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) हा कोर्स पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पूर्ण केला. या वर्षाच्या शेवटी दिल्लीला ट्रिप जायची. आम्ही मार्च २००० मध्ये दिल्लीच्या ट्रिपला गेलो. या ट्रिपच्या निमित्ताने मी दिल्ली प्रथमच पाहिली. संसद भवन पाहायला मिळालं. संसदेचं अधिवेशन सुरू होतं. तिथल्या कडक सुरक्षाव्यवस्थेतून आत प्रेक्षक गॅलरीत जाऊन कामकाज पाहिलं. नंतर तिथल्या प्रसिद्ध व्हरांड्यातून आम्ही फिरत होतो. राम नाईकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं दिलीप गांधी बसले होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. ‘मी पण नगरचाच’ वगैरे सांगून जरा जवळीक दाखवली. त्यांनी त्यांचं कार्ड दिलं. ते घेतलं आणि आम्ही तिथून परतलो. त्यानंतर पुढच्याच वर्षी १३ डिसेंबर २००१ रोजी संसद भवनावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला. आम्ही ‘सकाळ’ ऑफिसमध्ये तेव्हा टीव्हीवर बातम्या बघत होतो. त्या वेळी एका चॅनेलवर खासदार दिलीप गांधी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून बचावले, असं सांगत होते. मला एकदम आठवलं, की माझ्याकडं त्यांचं कार्ड आहे. मी ऑफिसमध्ये सांगून, त्यांच्याशी बोलता येतंय का बघू असं ठरवलं. माझ्या कार्डवर त्यांचा मोबाइल आणि दिल्लीतल्या घरचा असे दोन्ही नंबर होते. मोबाइल लावला तर तो लागला नाही. मग थोड्या वेळाने घरचा लँडलाइन नंबर लावला. गांधी घरीच होते. मी त्यांना माझा परिचय सांगितला आणि त्या घटनेविषयी विचारलं. त्यांनी सांगितलं, की हल्ला झाला, तेव्हा ते त्या व्हरांड्यातच होते. संसद भवनाच्या त्या प्रसिद्ध मोठमोठ्या गोल खांबांजवळून ते जात असताना अचानक गोळी आली आणि त्यांच्या जवळून गेली. त्या वेळी ते त्या खांबांमागे गेले आणि त्यामुळे वाचले इ. इ.
मी सर्व तपशील देऊन ती बातमी लिहिली आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ डिसेंबर २००१ रोजी ‘सकाळ’च्या पहिल्या पानावर माझ्या बायलाइनने (‘श्रीपाद ब्रह्मे यांजकडून’ अशी बायलाइन देण्याची तेव्हा स्टाइल होती...) प्रसिद्ध झाली. ‘गोळी सुटली आणि मी खांबामागे लपलो...’ असं काही तरी शीर्षक होतं. ती बातमी मी बरेच दिवस जपून ठेवली होती. थोडक्यात, ही हल्ल्याची घटना घडली त्या दिवशीही वार्तांकनात मी थोडाफार असा सहभाग नोंदवला होताच. कदाचित त्यामुळेच दीक्षितसाहेबांनी मला या मुलाखती घेण्यासाठी पाठवण्याचं ठरवलं असावं. काही का असेना, मला ही असाइनमेंट मिळाली हे खरं!
तेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बरंच काय काय घडत होतं. जगात उलथापालथ सुरू होती. एकविसावं शतकाचं आगमन सर्व जगानं मोठ्या उत्साहानं केलं होतं. मात्र, दहशतवादाचं एक अदृश्य सावट तोवर सगळीकडं पसरलेलं स्पष्ट जाणवत होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन वर्षांपूर्वीच कारगिलचं युद्ध झालं होतं. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोर बसयात्रा काढून पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढं केला होता. मात्र, पाकिस्ताननं ‘कारगिल’ घडवून आपला विश्वासघात केला होता. कारगिलमध्ये पाकिस्तानला आपण चोख धडा शिकवला असला, तरी पुढच्या काळात पाकिस्तानबरोबरच्या संबंधांत कमालीची कटुता आली होती. जगभरात दहशतवादाचं सावट गडद होत होतं. त्यात ११ सप्टेंबर २००१ रोजी कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेननं न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्सवर विमानं धडकवून इतिहासातला सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणला. या भयानक हल्ल्यानं सर्व जग भयचकित झालं होतं. या हल्ल्यानंतर केवळ तीनच महिन्यांत भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. तिथे तैनात असलेल्या कडक सुरक्षाव्यवस्थेमुळं दहशतवादी आतपर्यंत जाऊ शकले नाहीत. देशातील सर्व प्रमुख राजकीय नेते तेव्हा संसदेच्या इमारतीत होते. दहशतवादी संसदेच्या मुख्य इमारतीत प्रवेश करू शकले असते, तर काय झालं असतं, याची कल्पनाही करवत नाही.
या हल्ल्याची वर्षपूर्ती जवळ आली, तेव्हा म्हणजे साधारणत: २००२ च्या नोव्हेंबर महिन्यात संपादक अनंत दीक्षित यांनी मला बोलावून, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस व जवानांच्या नातेवाइकांना भेटून लेख करण्याची कामगिरी सोपविली. मी दोन-अडीच वर्षांपूर्वी दिल्लीला गेलो होतोच. आता या दौऱ्यानिमित्त पुन्हा दिल्लीवारी होणार, याचा आनंद होता. तेव्हा मोबाइल खूप प्रमाणात सर्वांकडे नव्हते. माझ्याकडे तर मोबाइल नव्हताच. आमचं दिल्लीला ऑफिस होतं आणि विजय नाईक, अनंत बागाईतकर ही ज्येष्ठ मंडळी तिथं होती. त्यामुळं मी निर्धास्त होतो.
पुण्यातून २५ नोव्हेंबर २००२ रोजी पहाटेच्या वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसनं मी दिल्लीला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला हजरत निजामुद्दीनला पोचलो. इंडियन न्यूजपेपर्स सोसायटीच्या (आयएनएस) गेस्ट हाउसमध्ये माझी राहण्याची सोय होती. याच इमारतीत आमचं ‘सकाळ’चं कार्यालय होतं. इतर वृत्तपत्रांचीही कार्यालयं त्या इमारतीत होती. रफी अहमद किडवाई मार्गावर तेव्हा दिल्ली मेट्रोचं काम सुरू होतं, हे आठवतंय. ‘आयएनएस’च्या समोरचा रस्ता पूर्ण खोदून ठेवला होता. संसद भवनाला भेट द्यायची होती. म्हणून मग विजय नाईकांना फोन केला. ‘संसदेसाठीच्या पासाचा अर्ज करून ठेवू, उद्या मिळेल,’ असं ते म्हणाले. आमचं तिथलं ऑफिस साधारण साडेदहाला उघडायचं. तेव्हा विवेक नाशिककर हे तिथं कार्यालयीन सहायक होते. मग मी माझे फोटो त्यांच्याकडं देऊन ठेवले. नाशिककरांनी अर्ध्या तासात संसदेतून माझा अर्ज आणला. मी तो भरून दिला.
माझ्याकडं या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची यादी होती. नाईकसाहेबांनी या मंडळींचे पत्ते मिळवून दिले होतेच. मग मी माझी मोहीम सुरू केली. पहिले हुतात्मा होते मातबरसिंह नेगी. दिल्लीत मंदिर मार्ग परिसरात नेगींचं घर होतं. रिक्षानं गेलो. तिथं मातबरसिंह नेगींचं घर शोधलं. त्यांच्या पत्नी, मुलगा, जावई, मुलगी भेटले. नेगींच्या पत्नी टिपिकल पंजाबी घरातल्या. त्यांना पतीच्या आठवणीनं गहिवरून येत होतं. एवढ्या लांबून पुण्याहून हा एक मुलगा मुलाखत घ्यायला आलाय, असं काहीसं कौतुकही त्यांच्या डोळ्यांत होतं. ही पहिली मुलाखत उत्तम झाली. मला आता पुढच्या मुलाखतीचे वेध लागले होते. पुढचे पोलिस हुतात्मा होते बिजेंद्रसिंह गुर्जर. ते मोलडबंद नावाच्या गावात राहत होते. मग आकाशवाणीच्या स्टॉपवरून ४६० नंबरची बस पकडून बदरपूरला गेलो. तिथं मोलडबंद गावात गुर्जर यांचं घरही लगेच सापडलं. मुळात वर्षभरात या हुतात्मा पोलिसांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रसिद्धी बऱ्यापैकी झाली होती. त्यामुळं कुणालाही विचारलं, तर लगेच लोक पत्ता सांगायचे. अर्थात पुढे वेगळे अनुभवही आले. बिजेंद्रसिंहांचं घर टिपिकल उत्तर भारतीय. वरच्या गच्चीत बाजा वगैरे टाकलेल्या होता. हुक्काही दिसला. हे सर्व पोलिस व त्यांचे कुटुंबीय तसे अगदी साधे होते. बिजेंद्रसिंहांची पत्नी, पाच मुलं व सासरे भेटले. त्यांचेही फोटो काढले. बिजेंद्रसिंहांचे सासरे सुभेदार होते. त्यांचं नाव लक्षात नाही आता, पण त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. पहिल्याच दिवशी दोन मुलाखती चांगल्या झाल्यानं मला हुरूप आला. तेव्हा मी वहीत मुद्दे लिहून घेत होतो. मुलाखती झाल्यावर लगेच रात्री त्या सविस्तर लिहून काढल्या आणि मगच झोपलो.
बुधवार, २७ नोव्हेंबर २००२. आज राठधाना या गावी शहीद नानकचंद यांच्या घरी जायचं होतं. दिल्लीतल्या ‘महाराणा प्रताप अंतर्राज्यीय बस अड्ड्या’वर पोचलो. तिथं लगेच सोनीपतची बस मिळाली. एक वाजता सोनीपतला पोचलो. हरियाणा राज्यात मी प्रथमच येत होतो. धुळीनं माखलेल्या त्या गावातून लगेच ‘राठधाना’ला जायला बस नव्हती. मग सायकलरिक्षा करून सुभाष चौकात गेलो. तिथं तो सायकलरिक्षावाला म्हणाला, की आणखी दुसरीकडंनंच राठधानाला जाणारे ‘टप्पू’ मिळतील. (हे एक अजबगजब वाहन आहे. उत्तरेत तेव्हा सर्रास दिसायचं. आता आहेत की नाही, माहिती नाही.) त्यानं एका ठिकाणी नेऊन घातलं. तिथनं जाम लवकर रिक्षा मिळेना. अखेर एक रिक्षावाला ठरवला. जाऊन-येऊन व तिथं थांबण्याचे ७५ रुपये ठरले. एकदाचा राठधानात पोचलो. अगदी छोटंसं गाव होतं. शहीद नानकचंदांचं घर शोधून काढलं. त्यांच्या पत्नी गंगादेवी एकट्याच घरात होत्या. मग शेजारच्या एक बाई आल्या. गंगादेवी निरक्षर होत्या. नानकचंद हे हरिजन होते. त्यामुळं ‘आम्हाला मदत मिळताना जातिभेद केला जातोय,’ असं गंगादेवींनी डोळ्यांत पाणी आणून सांगितलं. उत्तर भारतातलं हे भयंकर जातवास्तव असं धाडकन माझ्या अंगावर कोसळलं होतं. मला अस्वस्थ व्हायला झालं. काय करावं ते सुचेचना. गंगादेवींना पाच मुलं आहेत. त्यापैकी एकही घरी नव्हता. थोरल्या मुलाला दिल्ली पोलिसांत नोकरी मिळालीय, असं त्या सांगत होत्या. मग तिथले काही फोटो काढले. त्यांच्या स्मारकाचं कामही रखडलंय. त्यामागचं कारणही त्यांचं दलित असणं हेच होतं. देशासाठी प्राणार्पण केलेल्या या शहिदाच्या नशिबी आपल्या स्वत:च्या गावात एक बरंसं स्मारकही नव्हतं! अस्वस्थ मनस्थितीतच तिथून निघालो.
आता मला पूँठकुलाँला जायचं होतं. तेव्हा अंगात उत्साह बराच होता. सोनीपतहून दिल्लीला पोचेपर्यंत पाच वाजले. लगेच बलवानाला (ते बवाना आहे, हे नंतर कळलं.) जाण्याचा निर्णय मी घेतला. (अतिउत्साह नडतो, तो असा) दोन-चार जणांनी सांगितल्यावरून नरेलाला आधी जाण्याचं ठरवलं. मग आयएसबीटी ते नरेला हा जवळजवळ पावणेदोन तासांचा प्रवास उभ्यानं, असह्य गर्दीत पार केला, हे चांगलंच आठवतंय. (सध्याच्या कोव्हिडकाळात हे नुसतं आठवूनही अंगावर काटा येतो तो भाग वेगळा!) नरेलालाच जाईपर्यंत आठ वाजले होते. अजून पूठकुलाँ दृष्टिक्षेपातही नव्हतं. तरीही लगेच बस मिळाली, म्हणून बवानालाही गेलो. मात्र, तिथं गेल्यावर पूठकुलाँला आणखीन अर्धा तास लागेल, असं कळल्यावर माझा उत्साह संपला. दिल्लीला परत जायला रात्री उशिरा गाड्याही नव्हत्या. मग तिथूनच नाईकांना फोन केला. नंतर पूठकुलाँला उद्या येण्याचं ठरवलं व सरळ दिल्लीची परतीची बस पकडली. ती दहाला आयएसबीटीला पोचली.
गुरुवार, २८ नोव्हेंबर २००२. आज संसद भवनात जायचं होतं. सकाळी साडेदहा वाजता मी संसद भवनात गेलो. कडेकोट बंदोबस्त होता. दोन-अडीच वर्षांपूर्वी मी संसदेत आलो होतो, त्या तुलनेत आता हे फारच जाणवलं. अर्थात माझ्याकडं पास असल्यानं सहज आत जाऊ शकलो. मला ११ नंबरच्या गेटपाशी शहीद जवानांची नावं लावली होती, ती जागा पाहायची होती. पण तिथं फारच सिक्युरिटी असल्यानं जाता आलं नाही. मग प्रेस गॅलरीत जाऊन बसलो. प्रश्नोत्तराचा तास व शून्य प्रहरातली चर्चा ऐकली. पंतप्रधान वाजपेयी राज्यसभेत होते; पण चंद्रशेखर, शरद पवार लोकसभेत पाहायला मिळाले. बाकीही बरेच होते. प्रेस गॅलरीत बागाईतकर होतेच. नंतर नाईकही आले. शून्य प्रहर झाल्यावर एक वाजता संसदेचे तेव्हाचे उपसंचालक (सुरक्षा) व्ही. पुरुषोत्तम राव यांना भेटलो. त्यांच्याकडून सुरक्षाव्यवस्थेबाबत माहिती घेतली. गेल्या वर्षभरात संसदेत वाढवलेल्या सुरक्षाव्यवस्थेची (अर्थात माध्यमांना देणं शक्य आहे इतपतच) माहिती राव यांनी दिली. नंतर राम नाईकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं खासदार दिलीप गांधी भेटले. त्यांना गेल्या वर्षी फोनवर घेतलेल्या मुलाखतीची आठवण करून दिली.
संसदेतून लगेच बाहेर पडलो. आज पूँठकुलाँला शहीद ओमप्रकाश यांच्याकडं काहीही करून जायचं होतंच. मग मोरीगेटला गेलो. पण तिथून बवानाला थेट बस नसल्याचं कळलं. मग आझादपूरची बस पकडून तिथं गेलो. तिथून बवानाची बस पकडली. रस्त्यातच पूठकुलाँ गाव अशी पाटी दिसली. मग तिथंच उतरलो. ९७२ नंबरची बस पकडून पूठकुलाँला गेलो. तिथं शहीद ओमप्रकाश (हेडकॉन्स्टेबल) कुणालाच माहिती नव्हते. मी हादरलोच. पण मी सायकलरिक्षानं सुलतानपुरी पोलिस ठाण्यात गेलो. तिथं कळलं, की हे पूठकुलाँ नाही, पूठ खुर्द गाव आहे म्हणून! मग तिथल्या पोलिसानं एक रिक्षा बघून दिली. त्यानं २० मिनिटांत पूठकुलाँला पोचवलं. आता मी योग्य ठिकाणी आलो होतो. त्यामुळं तिथं ओमप्रकाश यांचं घर लगेच सापडलं. त्यांचे म्हातारे आई-वडील भेटले. त्यांच्या पत्नी, मुलगा भेटले. भावाच्या घरी गेलो. अगदी दाटीवाटीच्या वस्तीत असलेलं हे एक साधं घर होतं. ओमप्रकाश दहशतवादी हल्ल्यात मरण पावल्यानं अचानक हे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. इतर माध्यमांचे प्रतिनिधीही येत होते. वाहिन्यांचा एवढा सुळसुळाट नव्हता. तरी मिळणाऱ्या प्रसिद्धीनं ओमप्रकाश यांचं कुटुंब चांगलंच बावरून गेलं होतं, असं आज विचार करताना जाणवतं.
शुक्रवार, २९ नोव्हेंबर २००२. आज उत्तर प्रदेशातील हरिपुरा गावी हुतात्मा घनश्याम गुर्जर यांच्या घरी जायचं होतं. सकाळी सात वाजता नवी दिल्ली रेल्वे स्टेशन गाठलं. कोसीकलाँचं तिकीट काढलं. पावणेआठला आग्रा पॅसेंजर आली. तिच्यात बसलो. ही गाडी अकराला कोसीकलाँ गावात पोचली. तिथून ‘टप्पू’तून हरीपुरा गावात गेलो. गाव अगदी छोटं होतं. रस्त्यातच घनश्याम गुर्जर यांचा मोठ्ठा बंगला लागला. त्यांचा मुलगा बच्चूसिंह भेटला. घनश्याम यांची पत्नी भेटली. आता त्या बंगल्याशेजारीच घनश्याम यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. ते बच्चूसिंहनं दाखवलं. आतापर्यंत भेटलेल्या कुटुंबांत नेगींनंतर घनश्याम गुर्जर यांचंच कुटुंब जरा सुस्थितीतलं वाटलं. वडिलांच्या स्मारकासाठी बच्चूसिंह यांनी कंबर कसली होती. इथंही कुणाचं स्मारक होणार, कधी होणार, कसं होणार या सर्वांत जातीचं एक गणित अदृश्यपणे दिसलंच. उत्तर प्रदेशात यापूर्वी एक आग्रा सोडलं, तर मी यापूर्वी कधी गेलो नव्हतो. हरिपुरा हे खऱ्याखुऱ्या उत्तर प्रदेशाचं, एकविसाव्या शतकातलं दर्शन होतं. महाराष्ट्रासारख्या राज्यातून आलेल्या कुणालाही धक्काच बसेल, अशीच तेव्हा तिथली सामाजिक परिस्थिती होती. मी मनातल्या मनात या गोष्टींची नोंद घेऊन पुढच्या मुलाखतीकडं वळलो. आता मला अकबरपूर या गावी शहीद रामपाल यांच्या घरी जायचं होतं. ‘टप्पू’च्या मागं लटकून कोसीत आलो. मग जीपमध्ये बसून पलवलला आलो. तिथून मंडिकौलाला जायचं होतं. एक बस आली. खच्चून भरली होती. शिवाय टपावरही लोक बसले होते. मग त्यात घुसलो. मध्ये तर ती बस पार तिरपी झाली होती. मग कंडक्टरनं वरच्या काही लोकांना खाली उतरवलं. (धन्य धन्य तो उत्तर प्रदेश!) पुढं एका फाट्यावर बस पंक्चर झाली. (आनंदीआनंद!) बरेच लोक खाली उतरले. मीही उतरलो. तेवढ्यात त्या शहाण्या ड्रायव्हरनं लगेच गाडी पुढं ताबडली. मी भयंकर चरफडलो. पण इलाज नव्हता. मग मागून आलेल्या एका जीपच्या साइडपट्टीवर लटकून १५ किलोमीटरवर असलेल्या मंडिकौला गावात गेलो. तिथून अकबरपूरला जायला व परत यायला रिक्षा ठरवली. रामपाल यांच्या घरी (अखेर) पोचलो. त्यांचे भाऊ होते. त्यांच्याशी बोललो. तिथं समोरच रामपाल यांच्या स्मारकाचं व लायब्ररीचं काम सुरू आहे. हे गाव तर पारच छोटं, अगदी वस्ती म्हणावं एवढं लहान होतं. आजूबाजूला सर्वत्र शेती. गावापर्यंत जायला धड रस्ता नाही. संपूर्ण चिखलातून आमची रिक्षा चालली होती. आता या वास्तवाचे तेवढे धक्के बसत नव्हते. रामपाल यांच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन सुन्न अवस्थेत निघालो व रात्री दिल्लीला मुक्कामी परतलो.
शनिवार, ३० नोव्हेंबर २००२. आज राजस्थानात नीम का थाना येथे शहीद जगदीशप्रसाद यादव यांच्याकडे जायचं होतं. यापूर्वी या गावाचं नाव मी एका सूर्यग्रहणाच्या वेळीच ऐकलं होतं. या गावावरून ते स्पष्ट दिसणार असल्यानं तिथं तेव्हा बऱ्याच खगोल अभ्यासकांची गर्दी झाली होती, वगैरे मला थोडं आठवत होतं. मात्र, या गावाला जायचा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं. तो या निमित्ताने आला होता. मग 'अंतर्राज्यीय बस अड्डेपर’ गेलो. तिथं ‘नीम का थाना’कडं जाणाऱ्या गाड्यांची राजस्थानच्या काउंटरवर चौकशी केली, तर तिथल्या माणसानं सराई काले खाँ बसस्थानकावरून या गाड्या सुटतात, असं सांगितलं. अकरा वाजून गेले होते. मी कपाळावर हात मारून घेतला. मग निमूटपणे दुसरी रिक्षा करून त्या स्टँडवर गेलो. तिथं पोचेपर्यंत १२ वाजले. तिथं सीकरची बस एक वाजता सुटत असल्याची माहिती मिळाली. मात्र, एक वाजता बरोबर गाडी निघाली. ‘नीम का थाना’ला जायला ९० रुपये तिकीट होतं. चार तास लागतील, असं कंडक्टर म्हणाला. प्रत्यक्षात दिल्लीतून ‘गुडगाँवा’च्या दिशेनं बाहेर पडेपर्यंतच दोन वाजून गेले होते. ‘नीम का थाना’ला पोचेपर्यंत साडेसहा वाजले होते. मग रिक्षा करून जे. पी. यादव यांच्या घरी गेलो. माझ्या अपेक्षेपेक्षा पुष्कळ मोठ्ठं घर होतं त्यांचं. म्हणजे भरपूर नातेवाइक एकत्र राहत होते. ‘जे. पीं.’चे आई-वडीलही होते. सुरुवातीला वडील कन्हैयालाल हेच माझ्याशी बोलले. ‘जे. पीं.’चा मेव्हणा राजेश यादव (मिसेस प्रेम यांचा भाऊ) हाही तिथंच राहतो. त्यानंही पुष्कळ माहिती दिली. ‘जे. पीं.’ची मुलं अगदी छोटी. थोरला गौरव (पाच वर्षांचा) फारच गोंडस होता. धाकटी गरिमा तर अवघी पावणेदोन वर्षांची आहे. मला गलबलून आलं. ‘जे. पीं.’च्या पत्नीशीही नंतर बोललो. काय बोलणार खरं तर? अवघ्या तिशीच्या या मुलीवर काय प्रसंग आलाय! त्या आता शिक्षिका म्हणून काम करतात. तिथून परत दिल्लीला यायला नऊला बस होती. मला तर ते राहाच, म्हणत होते. पण मी नको म्हटलं. मग गरमागरम (संपूर्ण ‘घी’त माखलेल्या) रोट्या व दाल आणि लोणचं, मिरची असं छान जेवण त्यांनी दिलं. यादव कुटुंबीयांच्या या राजस्थानी आदरातिथ्यानं मी तर भारावून गेलो. मला काय बोलावं, तेच सुचेना. जगदीशप्रसाद यांचे वडील आता थकले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मुलगा गमावल्याचं अपार दु:ख स्पष्ट दिसत होतं. या कुटुंबाचं आदरातिथ्य आठवतच दिल्लीला जायला निघालो, तेव्हा डोळे नकळत पाणावले होते.
या हल्ल्यात एक महिला कॉन्स्टेबल कमलेशकुमारी याही शहीद झाल्या होत्या. त्यांच्या पतीला भेटायचं होतं. मात्र खूप प्रयत्न करूनही त्यांचा पत्ता मिळाला नाही आणि फोनवर बोलणंही झालं नाही. ते उत्तर प्रदेशात कुठे तरी कनौज किंवा आणखी कुठं तरी असल्याची माहिती उडत उडत मिळाली होती. हा एक अपवाद वगळता, मी सर्व हुतात्म्यांच्या घरी जाऊन आलो होतो. त्यामुळे आता पुण्याला परत निघण्याची तयारी सुरू केली. दोन डिसेंबरला दिल्लीतून पुन्हा गोवा एक्स्प्रेसनं पुण्याला परतलो.
आल्यानंतर दीक्षितसाहेबांना भेटलो. लिहिलेले लेख दाखविले. ‘सप्तरंग’ पुरवणीत ‘जरा याद करो कुर्बानी’ या नावाने दोन आठवडे माझे लेख प्रसिद्ध झाले. या लेखांना वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
ही असाइनमेंट केली तेव्हा मी २७ वर्षांचा होतो. पत्रकारितेत येऊन पाच-सहाच वर्षं झाली होती. त्या तुलनेत मला ही मोठी संधी संपादकांनी दिली होती. या निमित्ताने मला खूप काही शिकायला मिळालं. आपल्या शारीरिक, मानसिक, वैचारिक क्षमता तपासता आल्या. डोळे उघडे ठेवून, कुठलेही पूर्वग्रह न बाळगता अनुभव घ्यायला शिकता आलं. दिल्ली आणि आजूबाजूच्या हरियाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशात एकाच वेळी जाता आलं, तिथली लहान लहान गावं, रस्ते, धूळ-माती, शेती-जमीन, जेवण-खाण यांचा अनुभव घेता आला. माणसांचं वागणं-बोलणं, लहेजा, पेहराव-ठेहराव समजले. ही शिदोरी दीर्घकाळ पुरणारी असते. दहशतवादी हल्ल्यात घरातलं माणूस जातं, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळलेलं आभाळ थेट त्यांच्या डोळ्यांत बघायला मिळालं. या दौऱ्यानंतर माणूस म्हणून मी थोडा अधिक संवेदनशील झालो... त्यामुळं या अविस्मरणीय असाइनमेंटबद्दल मनात कायमची कृतज्ञता आहे!
---
(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०२१)
----