24 Jun 2016

एक अलबेला - रिव्ह्यू




नाम बडे और दर्शन भी...
------------------------------

मा. भगवान म्हटलं, की अलबेला आणि अलबेला म्हटलं की मा. भगवान हीच नावं आठवतात, एवढं या नावांचं अद्वैत झालंय. भगवान पालव नावाच्या मराठमोळ्या माणसानं चाळीसच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अक्षरशः थैमान घातलं. भगवान यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं नृत्य. कमरेखालचा भाग अजिबात न हलवता, केवळ हात आणि कमरेवरील भाग यांचा वापर करून ते ज्या पद्धतीनं नृत्य करीत असत, ती शैली लोकांनी डोक्यावर घेतली. भगवान स्टाइल डान्स या नावानंच तो नृत्यप्रकार ओळखला जाऊ लागला. अशा या अवलिया कलाकारावर 'एक अलबेला' हा मराठी चित्रपट आला आहे. मराठी कलाकारावर असा बायोस्कोपिक पद्धतीनं आलेला हा दुसरा मराठी सिनेमा. (आधीचा फाळकेंवरचा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'.) शेखर सरतांडेल या दिग्दर्शकानं अत्यंत मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे हा प्रयत्न आपल्यासमोर मांडला आहे. 
'एक अलबेला'मध्ये एक वाक्य आहे. भगवान यांना काही कारणानं नृत्य कलाकार मिळत नसतात. तेव्हा ते फाइट सीन करणाऱ्या कलाकारांकडून नृत्य करून घेतात. त्या वेळी ते म्हणतात, की प्रत्येकाच्या शरीरात नाचाची लय असते. तुम्ही ती फक्त ओळखायला हवी. हे वाक्य म्हणजे या सिनेमाचं भरतवाक्य म्हणायला हरकत नाही. कारण नंतर सिनेमाचा जवळपास संपूर्ण भाग भगवान तयार करीत असलेला 'अलबेला' हा सिनेमा आणि त्यातील गाणी व नृत्यं यांनीच व्यापला आहे. भगवान यांचा मूळ सिनेमा पाहताना आणि त्यातल्या 'शोला जो भडके'सारख्या गाण्यावर गीताबाली आणि भगवान यांचा (आणि त्यांच्या सहनृत्यकलाकारांचा) डान्स पाहताना आपणही नकळत ताल धरतो आणि नाचू लागतो. शेखर सरतांडेल यांनी या गाण्यांचं 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएशन केलं आहे. ते पाहतानाही आपण तसाच ताल धरतो आणि (मनातल्या मनात का होईना) ते झिंग आणणारं नृत्य करू लागतो आणि हेच मला वाटतं, या सिनेमाचं यश आहे.
सरतांडेल यांनी सिनेमाचे सरळ सरळ दोन भाग केले आहेत. पहिला भाग भगवान यांचं सुरुवातीचं आयुष्य दाखविण्यात खर्च झाला आहे. त्यात अगदी १९३० च्या आंदोलनात भगवान यांनी शिवडीच्या मिठागारात केलेला 'सत्याग्रह' ते 'अलबेला'च्या निर्मितीपर्यंतचा प्रवास आला आहे. भगवान यांची कौटुंबिक परिस्थिती, त्यांना घर सोडावं लागणं, पानाच्या दुकानात काम करणं, त्या मोहल्ल्यातील शाहीन या तरुणीशी जुळलेले त्यांचे नाजूक भावबंध, मग तिचा विरह, त्यानंतर त्यांचं कुस्ती खेळायला जाणं, तिथल्या मित्रासोबत स्टुडिओत जाणं, मग अचानक सिनेमात काम करायची मिळालेली संधी, नंतर अॅक्शन हिरो म्हणून बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांनी कमावलेलं नाव आदी सर्व भाग तपशिलात येतो. सिनेमाचं संकलन झक्कास असल्यानं तो वेगानं पुढं सरकतो. कुठलंही दृश्य अकारण ताणलेलं नाही. अनेकदा तर नॅरेशनमधूनच गोष्ट पुढं जाते. प्रेक्षक सिनेमात गुंतून राहण्यासाठी हे असं वेगवान सादरीकरण पथ्यावर पडणारं आहे.
भगवान यांच्या आयुष्यात सी. रामचंद्र यांचं महत्त्वाचं स्थान होतं. त्यांची आणि भगवान यांची मैत्रीही सिनेमात दिसते. 'अलबेला'च्या यशात सी. रामचंद्र यांच्या संगीताचा आणि त्यांनी दिलेल्या तब्बल ११ गाण्यांचा मोठा वाटा आहे. 'भोली सुरत दिल के खोटे', 'शोला जो भडके', 'शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो' यासारखी सुपरहिट गाणी किंवा 'धीरे से आजा री अखियन में, निंदिया आजा री आजा'सारखी आजही सर्वश्रेष्ठ मानली जाणारी अंगाई ही सर्व अण्णा चितळकरांची कमाल होती. त्यांचा आणि लता मंगेशकरांचा आवाज, राम्बा-साम्बा म्युझिकच्या धर्तीवर दिलेलं ठेका धरायला लावणारं संगीत आणि पडद्यावर भगवान आणि गीताबालीचं अफलातून नृत्य हे कॉम्बिनेशन हिट होणारच होतं. पण तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. शेखर सरतांडेल यांनी 'एक अलबेला'च्या उत्तरार्धात हीच कहाणी मांडली आहे. 'अलबेला' सुपरहिट होण्यापर्यंतचाच प्रवास दाखवून त्यांनी या सिनेमासाठी नेमकी चौकट आखून घेतली आहे. सिनेमा केवळ एक तास ४७ मिनिटांचा आहे. वेगवान आणि क्रिस्पी मांडणीमुळं सिनेमाच्या वेधकतेत आणखी भरच पडली आहे.
उत्तरार्धाचं सर्वांत मोठं आकर्षण म्हणजे 'शोला जो भडके' आणि 'भोली सुरत दिल के खोटे' या गाण्याचं दिग्दर्शकानं केलेलं रिक्रिएशन आणि त्यातली मंगेश देसाई आणि विद्या बालन यांची जबरदस्त अदाकारी!  हे मूळचं सोनं एवढं बावनकशी आहे, की ते केवळ जसं आहे तसं मांडलं तरी भागणार होतं. सरतांडेल यांनी हे ओळखून या गाण्यांना व त्याच्या सादरीकरणाला धक्का लावलेला नाही. कुठलाही धोका न पत्करता ते 'फ्रेम टु फ्रेम' रिक्रिएट केलं आहे. हे करताना त्यांना मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी समरसून साथ दिल्यानं या दोन्ही गाण्यांचं सोनं पुनश्च झळाळून उठलं आहे, यात शंका नाही. विशेषतः विद्यानं गीताबाली खूपच तन्मयतेनं अंगी भिनवून घेतल्याचं जाणवतं. तिच्या प्रत्येक मुद्रेत, हावभावात आणि नृत्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये तिनं गीताबाली पुन्हा आपल्यासमोर उभी केली आहे. (विशेषतः 'भोली सुरत' या गाण्यात पहिल्या अंतऱ्याच्या शेवटी तिच्या अत्यंत बोलक्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहावेत.) आज ही दोन्ही (म्हणजे आताची आणि मूळची) गाणी पाहताना त्या गाण्यांतला ठेका आणि नृत्यातली लय एवढी भावते, की त्याचं वर्णन करायला शब्द नाहीत. अगदी समूह नृत्यातील कलाकारही एवढ्या फ्रेश चेहऱ्यानं आणि तन्मयतेनं नाचले आहेत, की आयुष्यात कधीही नाच न केलेल्या माणसांनाही उठून त्यांचा हात हाती धरून नृत्य करावंसं वाटलं पाहिजे.
भगवान यांना त्या वेळी हा सिनेमा बनवताना आलेल्या अडचणी, अॅक्शन पटांतून सामाजिक सिनेमाकडे वळताना चित्रपटसृष्टीतील वितरक, इतर लोकांनी व्यक्त केलेला अविश्वास, गीताबालीला सिनेमासाठी साइन करताना झालेला त्रास, नंतरही तिच्या सेक्रेटरीनं दिलेला त्रास हा सगळा भाग उत्तरार्धात येतो. भगवान यांचं कणखर व्यक्तिमत्त्व समोर येतं. 'लायकीपेक्षा मोठी नसतील, तर ती स्वप्नं काय कामाची?' हा त्यांचा सिद्धान्त होता. तो ते अखेरपर्यंत जगले. 'अलबेला' तयार झाला. प्रदर्शितही झाला. सुरुवातीला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद नव्हता. तेव्हा भगवानदादांनी स्वतःची सर्व संपत्ती गहाण ठेवून चित्रपट आणखी काही दिवस थिएटरमध्ये ठेवण्याची विनंती केली. त्या दिवशी ते इम्पिरियल थिएटरमध्ये जातात आणि दार उघडून हळूच आत पाहतात. त्यानंतर समोरच्या मोकळ्या जागेत एकटेच खास भगवान शैलीतलं नृत्य करतात हा शॉट जमून आलेला आहे. 'अलबेला' त्या दिवशी हिट झाला. लोकांनी 'शोला जो भडके' गाण्यावर पैसे उधळले. भगवान जिंकले...
प्रमुख व्यक्तिरेखेच्या जीवनात आपल्याला रस निर्माण झाला पाहिजे, त्याच्या सुख-दुःखाशी तो रममाण झाला पाहिजे, तर तो सिनेमा चांगला! 'एक अलबेला' या कसोटीला उतरला आहे, असं म्हटलं पाहिजे. हे दिग्दर्शक सरतांडेल यांचं जसं यश आहे, तसंच ते मंगेश देसाईचंही आहे. मंगेशचा चित्रपटसृष्टीतला प्रवास मी दीर्घकाळ पाहतो आहे. या गुणी कलाकाराला एकाच संधीची आवश्यकता होती. ती या सिनेमाच्या रूपानं त्याला मिळाली आहे आणि त्यानंही या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. 'एक अलबेला' हा त्याच्या कारकि‍र्दीतला माइलस्टोन सिनेमा ठरणार, यात शंका नाही. भगवानदादांच्या नृत्य शैलीची नक्कल करणं तसं सोपं नाही. पण मंगेशनं मेहनतीनं ते जमवलं आहे.
या सिनेमात गीताबालीच्या भूमिकेच्या रूपानं विद्या बालन प्रथमच मराठीत अवतरली आहे. तिचा प्रसन्न वावर या सिनेमाला 'चार चाँद' लावणारा ठरला आहे. विद्याच्या चाहत्यांसाठी तिला गीताबालीच्या भूमिकेत बघणं ही एक पर्वणी ठरेल. विद्यानं गीताबालीच्या नृत्याची लय अंगी भिनवून घेतल्याचं पदोपदी जाणवतं. तिच्याच आग्रहावरून चित्रित करण्यात आलेला 'शाम ढले खिडकी तले'चा तुकडाही यात आहे.
एवढं सगळं सांगितल्यावर हा सिनेमा आवर्जून पाहाच, हे वेगळं सांगणं म्हणजे भगवानदादा अफलातून नृत्य करीत असत, हे आवर्जून सांगण्यापैकी झालं. जो मनापासून नाचतो, तो जास्त जगतो. (भगवानदादा दीर्घायुषी होते. नव्वदाव्या वर्षी गेले...)
जा, नृत्याची लय अंगी भिनवून घ्या....! कारण आपल्यातही 'एक अलबेला' वस्ती करून आहे... त्याला मस्ती करण्याची संधी कधी देणार?
---

दर्जा - साडेतीन स्टार
---

8 comments:

  1. 'एक अलबेला' पाहायलाच हवा अशी भावना मनात निर्माण करणारा Review

    ReplyDelete
  2. Shripad da Apratim , Review Kasa asava hyacha sarvottam Udaharan :)

    ReplyDelete