30 Jun 2022

पासवर्ड जुलै अंक - कथा

‘नंबर’गेम
------------

आषाढाचे दिवस सुरू झाले होते. सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या डोंगरवाडीलाही संततधार पावसानं न्हाऊ घातलं होतं. डोंगरांच्या माथ्यावरून पावसाचं पाणी खळाळत जमिनीकडं धाव घेत होतं. सगळीकडं चहाच्या रंगाच्या पाण्याची डबकी तयार झाली होती. घरं, अंगण, शाळा, ग्रामपंचायत, रस्ते, दुकानं, एसटीचा स्टॉप सगळं सगळं ओलंचिंब झालं होतं. शेतखाचरांमध्ये भाताची लावणी सुरू होती. सगळीकडं कसं हिरवंगार, प्रसन्न वातावरण होतं.
रघूला हे असं वातावरण फार आवडतं. पावसाळा हा त्याचा सर्वांत आवडता ऋतू होता. त्याची शाळा नुकतीच सुरू झाली होती. तो यंदा सातवीत गेला होता. पण शाळेत अजून फार अभ्यास सुरू झाला नव्हता. त्याच्या वडिलांचं गावात इस्त्रीचं दुकान होतं. ते माळकरी होते. दर वर्षी या काळात ते पंढरपूरला वारीला जात असत. त्याची आई शेतात काम करायला जाते. रघूला कुणी भावंड नाही. मात्र, त्याच्याच वर्गातला गणू त्याचा खास जीवलग मित्र आहे. दोघांनाही पावसात भटकायला फार आवडतं. डोंगरवाडीच्या पलीकडं शहराकडं जाणाऱ्या रस्त्यापासून आत एक फाटा जातो. तिथं भैरोबाचा धबधबा प्रसिद्ध आहे. जवळ भैरोबाचं एक छोटंसं देऊळ आहे. हल्ली तिथं शहरातून येणाऱ्या तरुण पोरा-पोरींची वर्दळ वाढत चाललीय. गणूची आई त्या वाटेवर एके ठिकाणी भज्यांचा गाडा लावते. पावसाळ्यात तेवढीच थोडीफार कमाई आणि घरखर्चाला मदत म्हणून ती हे काम करते. गणूही अनेकदा शाळा संपली, की त्या गाड्यावर येऊन बसतो आणि त्याला मदत म्हणून रघूही तिथंच येऊन बसत असतो.
येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटक तरुणाईचं, त्यांच्या भारी भारी बाइकगाड्यांचं निरीक्षण करणं, त्यांचे नंबर लक्षात ठेवणं याचा रघूला छंद होता. विशेषत: गाड्यांच्या नंबरमध्ये सारखे आकडे किंवा क्रमाने आलेले आकडे त्याच्या विशेष लक्षात राहत असत.
त्या दिवशी असाच खूप जोरदार पाऊस बरसत होता. त्यात रविवार असल्यामुळं धबधब्याच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी उसळली होती. दुचाक्यांवरून शहरातले अनेक तरुण-तरुणी धबधब्याकडे जाताना दिसत होते. त्या छोट्याशा रस्त्यावर खूप वाहतूक कोंडी झाली होती. गाड्या वेड्यावाकड्या कुठेही, कशाही लावून ती मुलं जोरजोरात आरडाओरडा करीत जात होती. रघू आणि गणू दोघेही त्या दिवशी भज्यांच्या दुकानावरच होते. आज गर्दी जास्त असल्याने धंदाही जास्त होणार म्हणून खूश होते. गणूच्या आईच्या दुकानाशेजारीच त्या दिवशी इतरही बऱ्याच स्थानिक लोकांनी वेगवेगळे स्टॉल टाकले होते. सगळ्याच दुकानांसमोर मोठी गर्दी होत होती. एकूणच एरवी शांत-निवांत असलेल्या त्या भैरोबा धबधबा परिसराला त्या दिवशी अगदी जत्रेचं स्वरूप आलं होतं. या गर्दीतही रघूचं लक्ष त्या गाड्यांच्या नंबरप्लेट्सकडं होतं. अनेक चित्र-विचित्र प्रकारच्या नंबरप्लेट्स त्याला दिसत होत्या. काही नंबरप्लेट्सवर चित्रं काढली होती, तर काही ठिकाणी आकडेच अशा आकारात लिहिले होते, की त्यातून नाना, दादा अशी नावं तयार होतील. रघूला या सगळ्याची गंमत वाटत होती. त्यातही एक १०१ क्रमांकाची काळी बुलेट त्याच्या विशेष लक्षात राहिली. त्या बुलेटच्या मागं नंबरप्लेटवर एक कवटीचं चित्र काढलं होतं. ते बघून त्याला जरा विचित्र वाटलं. काही वेळानं त्याला या निरीक्षणाचाही कंटाळा आला. गणूच्या आईनं त्यांच्या घरून आणलेला भाकरी-भाजीचा डबा दोघांनीही तिथंच बसून खाल्ला. त्यानंतर पेरूच्या फोडींवर ताव मारल्यानंतर रघूला पेंग येऊ लागली. तो त्या दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका बाजेवर आडवा झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे हॉर्न आणि पोरांचा आरडाओरडा यामुळं त्याच्या झोपेत व्यत्ययही येत होता. तरी डोळ्यांवर गुंगी होतीच.
अचानक त्याला पलीकडं धबधब्याच्या बाजूनं जोरदार आरडाओरडा ऐकू आला. तो ऐकून रघूची झोप खाडकन उडाली. हा नेहमीचा पर्यटकांचा गलका नव्हता. काही तरी भयंकर घडलं असावं, असा तो आवाज होता. रघू आणि गणू एकदम धबधब्याकडं निघाले. समोरच्या शेतातून जाणारी एक जवळची वाट त्यांना ठाऊक होती. तिथला चिखल तुडवीत ते धबधब्याच्या पायथ्याशी निघाले. जवळ जाऊन पाहिलं तर अनेक लोक गोल करून उभे होते. मधे नक्की काय होतं ते कळत नव्हतं. दोघांनीही अजून जवळ जाऊन गर्दीचं ते रिंगण भेदण्याचा प्रयत्न केला, पण लोक त्यांना पुढं जाऊ देईनात. तेवढ्यात रघूला दोन पाठमोऱ्या मुलांच्या मधे एक फट दिसली. तीमधून तो एकदम तीरासारखा आत घुसला. तिथलं दृश्य बघून त्याला भोवळच यायची बाकी राहिली. मधोमध एक तरुण मुलगी जखमी अवस्थेत पडली होती. ती अजिबात हालचाल करत नव्हती. बेशुद्धच होती. तिच्या डोक्याच्या मागे रक्ताचं मोठं थारोळं साचलेलं दिसत होतं. आजूबाजूचे लोक नुसतेच आरडाओरडा करत होते. रघूला ते दृश्य बघून भीती वाटली. तो तिथूनच मागं फिरला. मागंच थांबलेल्या गणूला त्यानं, आपण आत्ता काय बघितलं ते सांगितलं. ते ऐकून गणूची तर बोबडीच वळली. दोघंही आल्यापावली गणूच्या आईच्या स्टॉलकडं परत आले. दोघांचीही छाती धडधडत होती. गणूची आई तर त्यांना ओरडलीच. एव्हाना सगळीकडं ‘धबधब्यातल्या अपघाता’ची बातमी पसरली होती. एक तरुण आणि एक तरुणी धबधब्याच्या वरच्या बाजूला उभे होते. त्यातील तरुणी अचानक पाय घसरून धबधब्यात पडली म्हणे. म्हणजे असं येणारे-जाणारे लोक सांगत होते. रघू तिथंच जरा एका दगडावर टेकला. त्याला तहान लागली होती. म्हणून त्यानं गणूच्या आईकडं पाणी मागितलं. पाणी पीत असतानाच रघूचं लक्ष अचानक त्या मगाच्या बुलेटकडं गेलं. एक तरुण डोक्याला पूर्ण काळं फडकं गुंडाळून घाईघाईनं त्या बुलेटपाशी आला. त्यानं बुलेटच्या मागच्या नंबरप्लेटपाशी काही तरी खुडखुड केली, मग गाडी स्टार्ट केली आणि तो अतिशय घाईत समोरच्या रस्त्यानं शहराच्या बाजूला वेगानं निघून गेला. रघूला काही तरी विचित्र वाटलं, म्हणून तोही पळत त्या गाडीच्या मागं धावला, तर त्याला ती नंबरप्लेट वेगळ्याच नंबरची दिसली. मगाशी १०१ नंबर होता, तो आता तिथं नव्हताच. त्याऐवजी ३०२ असा नंबर त्या गाडीवर लावला होता. रघूला हे काय कोडं आहे ते कळेना.  तो आणि गणू सुन्न मनानेच घरी गेले. त्या दिवशी गावात ही एकच चर्चा सगळीकडं होती. त्या मुलीचं पुढं काय झालं, हे रघू आणि गणूला कळलं नव्हतं. तिला एका रुग्णवाहिकेतून शहराकडं नेलं, एवढंच त्यांना समजलं होतं.
दुसरा दिवस उजाडला आणि गावात पोलिसांच्या गाड्यांचा सायरन ऐकू यायला लागला. एक मोठा पोलिस अधिकारी कालच्या अपघाताची चौकशी करायला तिथं आला होता. त्यांच्याकडून गावकऱ्यांना एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी समजत गेल्या. आदल्या दिवशी धबधब्यात पडलेल्या मुलीचा तो अपघात नसून, खून असावा असा पोलिसांना संशय होता. याचं कारण तिच्यासोबत आलेला तरुण ती घटना घडल्यापासून गायब होता. मुलगी खाली पडल्यावर त्यानं तिच्यापाशी धाव घेऊन मदतीसाठी आरडाओरडा करणं तरी अपेक्षित होतं. मात्र, तो तिथून चक्क पळून गेला होता. इतर लोकांनीच मग त्या मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात हलवलं होतं. आता पोलिस त्या मुलाचा शोध घेत होते. तो तिथून पळून का गेला, त्यांच्यात आधी काही भांडण वगैरे झालं होतं का, त्या मुलानं त्या मुलीला धबधब्यात ढकलून दिलं का, की खरोखर तिचा अपघात झाला या सर्व प्रश्नांनी पोलिसांना भंडावून सोडलं होतं. त्या मुलीच्या नातेवाइकांनाही त्या तरुणाविषयी फार काही माहिती नव्हती, असं पोलिसांकडून गावकऱ्यांना समजलं.
भैरोबा धबधब्यात अलीकडच्या काळात एवढी मोठी दुर्घटना प्रथमच घडली होती. तेथील पर्यटनावर या घटनेचा विपरीत परिणाम होऊ शकेल, अशी भीतीही गावकऱ्यांना वाटत होती. त्यामुळं ते पोलिसांना या घटनेचा वेगाने तपास करावा, अशी विनंती करत होते. दुसरीकडं पोलिस सर्व गावकऱ्यांना त्या मुलीचा फोटो दाखवून तिच्यासोबत असलेल्या तरुणाची माहिती काढण्याचा प्रयत्न करीत होते. तुम्हाला काहीही वेगळं जाणवलं असेल तरी सांगा, असं म्हणत होते. ‘काही वेगळं जाणवलं असेल तर...’ हे ऐकून रघूची ट्यूब एकदम पेटली. त्याला तो बुलेटवरून पळून जाणारा तरुण आठवला. तो पोलिसांना काही सांगायला जाणार, एवढ्यात एका गावकऱ्याने त्याला मागे जायला सांगितलं. रघू हिरमुसला, पण त्यानं पोलिसांना ही माहिती द्यायचीच असा निर्धार केला.
दुसऱ्या दिवशी तो आणि गणू शाळेतील कम्प्युटर लॅबमध्ये गेले. दोघांकडेही अजून मोबाइल फोन नव्हते. मात्र, ई-मेल अकाउंट दोघांनीही उघडले होते. रघूनं इंटरनेटवरून त्याच्या जिल्ह्याच्या पोलिसप्रमुखांचा मेल आयडी शोधून काढला. त्यानं गणूच्या मदतीनं भराभर एक मेल टाइप केली आणि त्या मेल आयडीवर पाठवून दिली.
मग दोघेही एकमेकांच्या हातावर टाळी देऊन घरी परतले.
दुसऱ्या दिवशी रघूच्या घरावर टकटक झाली. पाहतो तो एक पोलिस उभा. त्यानं रघू नावाचा मुलगा इथंच राहतो का, अशी चौकशी केली. रघूच पुढं आला आणि ‘हो’ म्हणाला. मग तो पोलिस रघूला घेऊन बाहेर गेला. तिथं जीपमध्ये एक मोठे अधिकारी बसले होते. त्यांनी रघूला गाडीत बसवलं आणि त्याला मेलमध्ये लिहिलेली घटना पुन्हा नीट सांगायला लावली. रघूनंही अजिबात न घाबरता जे काही त्यानं पाहिलं होतं, ते सगळं सांगितलं. ‘शाब्बास मुला, तुझ्यामुळं आम्ही लवकरच त्या मुलापर्यंत पोचू,’ असं म्हणून त्या अधिकाऱ्यानं रघूला कॅडबरी दिली आणि ते निघून गेले.
दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत बातमी झळकली - डोंगरवाडीच्या मुलाने पकडून दिला खुनी!
आणि त्यात चक्क रघूचं नाव होतं. रघूनं बुलेटच्या संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी त्या वर्णनाच्या गाडीचा शोध सर्वत्र सुरू केला. तो तरुण राज्याची हद्द ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला पकडलं आणि अटक केली. त्यानं किरकोळ भांडणातून त्या मुलीला धबधब्यात ढकलून दिल्याचा आरोप मान्य केला आहे. त्याच्यावर लवकरच रीतसर खटला भरला जाईल, असंही त्या बातमीत म्हटलं होतं.
ही बातमी येताच डोंगरवाडीत एकच जल्लोष झाला. कालपर्यंत गल्लीपुरता माहिती असलेला रघू आज सगळ्या राज्याला माहिती झाला होता. नंबर लक्षात ठेवण्याच्या आणि निरीक्षण करण्याच्या त्याच्या वृत्तीमुळं आणि धाडसाने पोलिसांना मेल पाठविण्याच्या कृतीमुळं त्याची केंद्र सरकारच्या बाल पुरस्कारांसाठी निवड झाली आणि रघूनं मोठ्या ऐटीत राष्ट्रपतींकडून तो पुरस्कार स्वीकारला.
डोंगरवाडीच्या त्या धबधब्याजवळ आता सुरक्षेसाठी मोठे रेलिंग लावण्यात आले आहेत. गणूच्या दुकानात रघूचा राष्ट्रपतींकडून पुरस्कार घेताना फोटो मोठ्या आकारात लावला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांत तो आता कायमचा कौतुकाचा विषय झाला आहे.

---

(पूर्वप्रसिद्धी : पासवर्ड जुलै २०२२ अंक)

---


19 Jun 2022

‘पुनश्च हनीमून’ नाटकाबद्दल...

दुभंगलेल्या काळाचा खेळ
-------------------------------


संदेश कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘पुनश्च हनीमून’ हे नाटक बघण्याचा योग काल आला. खूप दिवसांनी एक अतिशय तीव्र संवेदनांचं, नाट्यमय घडामोडींचं अन् टोचणी लावणारं नाटक बघायला मिळालं. काही कलाकृती साध्या-सोप्या, सरळ असतात. काही कलाकृती गुंतागुंतीच्या आणि समोरच्या प्रेक्षकाकडून काही अपेक्षा ठेवणाऱ्या असतात. अशा ‘डिमांडिंग’ कलाकृती पाहायला नेहमीच मजा येते. आपल्या बुद्धीला काम देणारी, मेंदूला चालना देणारी आणि पंचेंद्रियांना हलवून सोडणारी कलाकृती अनुभवण्याने एक आगळा बौद्धिक ‘हाय’ मिळतो. ‘पुनश्च हनीमून’ ही कलाकृती तसा ‘हाय’ निश्चित देते. याबद्दल संदेश कुलकर्णी यांचं सर्वप्रथम अभिनंदन. ते स्वत:ही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत अमृता सुभाष व अमित फाळके आहेत. हे तिघंही रंगमंचावर अक्षरश: नजरबंदी करतात.
‘पुनश्च हनीमून’ या नावातच स्पष्ट आहे तशी ही एका दाम्पत्याची कथा आहे. यात ते पुन्हा एकदा हनीमूनसाठी माथेरानला गेले आहेत. त्यांना १२ वर्षांपूर्वीचंच हॉटेल, तीच खोली हवी आहे. ते तिथं जातात आणि सुरू होतो एक वेगळा मनोवैज्ञानिक खेळ! हा खेळ सोपा नाही. यात माणसांचं मन गुंतलं आहे. अस्थिर, विचित्र, गोंधळलेलं, भांबावलेलं; पण तितकंच लबाड, चलाख, चतुर अन् धूर्त मन! हे मनोव्यापार समजून घेताना समोर येतो तो काळाचा एक दुभंग पट! त्यामुळं स्थळ-काळाचा संदर्भ सोडून पात्रं विविध मितींमध्ये ये-जा करू लागतात आणि आपलंही मन हा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करू लागतं. पात्रांच्या मनासारखाच विचार आपणही करू लागतो आणि एका क्षणी तर समोरची पात्रं आणि आपण यातलं अंतरच नष्ट होतं. एकाच वेळी दुभंग, पण आतून जोडलेलं असं काही तरी अद्भुत तयार होतं.
नाटकाची नेपथ्यरचना या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. आपण काही तरी तुटलेलं, दुभंगलेलं, हरवलेलं पाहतो आहोत, याची जाणीव पहिल्या दृश्यापासूनच होते. एका काचेच्या खिडकीचे तिरके दोन भाग दोन दिशांना दिसतात. हा तडा पहिल्या क्षणापासून आपल्या मनाचा ताबा घेतो. समोर एक मोठं घड्याळ आहे. त्यात कुठलेही काटे नाहीत. (पुढं संवादात दालीच्या घड्याळाचा संदर्भ येतो.) साल्वादोर दालीपासून आरती प्रभूंपर्यंत आणि ग्रेसपासून दि. बा. मोकाशींपर्यंत अनेक संदर्भ येतात. हे सारेच जगण्यातल्या अपयशाविषयी, माणसाच्या पोकळ नात्यांविषयी, काळ नावाच्या पोकळीविषयी आणि या पोकळीतच आपापल्या प्रेमाचा अवकाश शोधणाऱ्या सगळ्यांविषयी बोलत असतात. त्यातला प्रत्येक संदर्भ कुठे तरी काळजाला भिडतो आणि काटा मोडून जातो.
संदेश कुलकर्णी यांनी हे नाटक लिहिताना प्रयोगात नाटकातील सर्व शक्यता आजमावण्याचा विचार केला आहे. त्यात कायिक-वाचिक अभिनयापासून ते नेपथ्यापर्यंत आणि चटकदार संवादांपासून ते प्रकाशयोजनेपर्यंत सगळा विचार केलेला दिसतो. नेपथ्यात केलेल्या अनेक स्तरांचा वापर या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. प्रमुख दोन पात्रं सोडून यात आणखी दोनच पात्रं आहेत. ती दोन्ही पात्रं एकाहून अधिक भूमिका करतात. खरं तर प्रमुख दोन पात्रंही एकाहून अधिक पात्रं साकारत असतात. त्यांच्या मनाची दुभंग अवस्था पाहता, तीही एकाच शरीरात दोन व्यक्ती वागवत असतात. या दोघांच्या नात्यात नक्की काही तरी बिनसलंय. लेखक असलेल्या नायकाला त्याची कादंबरी लिहिण्यासाठी एकांत हवा आहे, तर न्यूज अँकर असलेल्या त्याच्या पत्नीला एकांत किंवा शांततेपेक्षा आणखी काही तरी हवंय. दोघांचंही काही तरी चुकलंय आणि हे नाटकात येणारं पहिलं वाक्य - ‘आपण वाट चुकलोय’ - नीटच सांगतं. नंतर नायिकेचा पाय घसरतो इथपासून ते नायक बोलताना शब्दच विसरतो इथपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचं हे तुटलेपण, दुभंगपण लेखक अधोरेखित करत जातो.
अवकाश, काळ व मिती या तिन्ही गोष्टी आपण आयुष्यात एका समन्वयानं उपभोगत असतो. किंबहुना या तिन्ही गोष्टी कायम ‘इन सिंक’ असतात असं आपण गृहीत धरलेलं असतं. मात्र, माणसाच्या मनाचे जे अद्भुत खेळ सुरू असतात त्यात या तिन्ही गोष्टींचा समन्वय बिघडू शकतो किंवा पुढे-मागे होऊ शकतो. समोरचा माणूस आपल्या मितीत, आपल्या अवकाशात आणि आपल्या काळात असेल तरच संवाद संभवतो. या नाटकातली पात्रं वेगळ्या मितीत, वेगळ्या अवकाशात आणि वेगळ्या काळात जगत आहेत, हे बघून आपल्या पाठीतून एक भयाची शिरशिरी लहरत गेल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर विचार येतो तो आपल्या स्वत:चा. आपणही अशाच ‘इन सिंक’ नसलेल्या अवकाश-काळ-मितीत वावरत आहोत हा विचार येतो आणि भीती वाटते. ‘पुनश्च हनीमून’ नाटक आपल्याला या भीतीसोबतच शेवटी एका दिलाशाची सोबत देते आणि तो सकारात्मक शेवट बघून खरं तर हुश्श व्हायला होतं.
संदेश कुलकर्णी आणि अमृता या खऱ्या आयुष्यातल्या जोडप्यानेच यातल्या नायक-नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. दोघांनाही ‘हॅट्स ऑफ’! याचं कारण या भूमिका केवळ शारीरिकदृष्ट्या दमवणाऱ्या नाहीत, तर त्या मानसिकदृष्ट्याही प्रचंड दमवणाऱ्या आहेत. मात्र, या जोडीनं रंगमंचावर अक्षरश: चौफेर संचार करून त्या अवकाशावर, त्या काळावर व तिथल्या मितींवर आपली सत्ता निर्विवादपणे प्रस्थापित केली आहे. अनेक प्रसंगांत या दोघांना टाळ्या मिळतात, तर अनेकदा आपण केवळ नि:शब्द होतो. या दोघांच्या अभिनयक्षमतेला न्याय देणारं हे नाटक आहे, यात वाद नाही. सोबत अमित फाळके आहे आणि त्यानंही त्याच्या सगळ्या भूमिका अगदी सहज केल्या आहेत. दीर्घकाळाने अमित रंगमंचावर आला आहे आणि त्याचा वावर फारच सुखद व आश्वासक आहे. आणखी एक अशितोष गायकवाड नावाचा कलाकार यात आहे. त्यानंही चांगलं काम केलंय. या नाटकाला पार्श्वसंगीत दिवंगत नरेंद्र भिडे यांचं आहे. ते अतिशय प्रभावी आहे. नेपथ्य मीरा वेलणकर यांचं आहे, तर वेषभूषा श्वेता बापट यांची आहे.
सुमारे १२ वर्षांपूर्वी प्रथम हे नाटक रंगमंचावर आलं होतं. तेव्हा मी ते पाहिलं नव्हतं. मात्र, आता हा प्रयोग बघायला मिळाला याचा आनंद आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे नाटक जरूर बघा.

---