27 Nov 2024

मनशक्ती दिवाळी अंक २०२४ लेख

यश म्हणजे नक्की काय असतं?
-------------------------------------

आयुष्यात आपण मोठं झालं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे असं जन्माला आल्यापासून आपण सतत ऐकत आहोत. यश मिळवायचं म्हणजे नक्की काय करायचं, असा प्रश्न पडायच्या आतच त्या प्रश्नाची उत्तरं आपल्यासमोर तयार ठेवण्यात आली होती. परीक्षेत चांगले मार्क मिळवून पास व्हायचं हे एक प्रकारचं यश असायचं. त्यातून तुम्ही सहज पुढं गेलात तर आणखी कठीण आव्हानं तयार असायची. मग नुसतं पास होऊन चालायचं नाही तर पहिल्या तीन नंबरांत तुम्ही पास व्हायला पाहिजे असायचं. त्यातून तुम्ही कधी दुसरे किंवा तिसरे आलात तर पहिल्या नंबरचं उद्दिष्ट तातडीनं समोर ठेवलं जायचं. आयुष्यात पहिला नंबर मिळवून सातत्यानं पास झालात तर पुढच्या कठीण परीक्षाही लगेच तयार असायच्या. आता तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनीअर होऊन दाखवायचं असतं. त्यासाठी पुन्हा तुमच्या राज्यातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये नंबर मिळवून दाखवणं हेही तुमच्या यशाचं एक माप असायचं. ती कसोटी पार केलीत की मग पुढं उत्तम नोकरी मिळवणं, ‘चांगली’ बायको (किंवा नवरा) मिळवणं, मग आजी-आजोबांना नातवंडं मिळवून देणं, नोकरीत सतत चांगल्या ग्रेड मिळवत राहणं, खाली मान घालून काम करणं, नेटका संसार करणं या सगळ्या क्रमाक्रमानं येणाऱ्या ‘यशा’च्या पायऱ्या असायच्या. तुम्ही एक पायरी चढलात, की पुढची तयारच असते. आता नक्की काय केलं म्हणजे आपण सर्वोच्च यश मिळवलं असं सगळे म्हणतील, असं कित्येकदा वाटून जातं. या ऐहिक किंवा भौतिक यशाच्या मोजमापाला काही मर्यादा नाही. ते कितीही मिळवा, त्याहून अधिक मिळवणारा कुणी तरी असतोच. शिवाय आपल्याकडं सगळ्या यशाचं मोजमाप हे इतरांशी तुलनेनं चालतं. ‘भला उस की कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ हा तर त्या तुलनेचा मुख्य आधार. मग ते सर्वोच्च म्हणवलं जाणारं यश मिळणार तरी कसं?
यश नक्की कशाला म्हणायचं असा प्रश्न पडेपर्यंत आपलं निम्मं आयुष्य सरलेलं असतं. आयुष्यात स्थिरस्थावर होण्याची लढाई संपली, की मग आपल्याला जरा स्वत:बद्दल विचार करण्याची उसंत मिळते. तेव्हा लक्षात येतं, की आपण एवढे दिवस ज्या कथित यशासाठी राबत होतो, ते यश खरंच आपल्याला साध्य करायचं होतं का? की आपण एवढे दिवस कुणा दुसऱ्याच्याच स्वप्नांच्या यादीसाठी स्वत:चा जीव कष्टवत होतो? आपल्याला आयुष्यात जे करायचं होतं, ते आपण करतो आहोत का? आपल्याला ज्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो, त्या आपण करतो का? जरा विचार केल्यावर आणि आजूबाजूला नजर टाकल्यावर आपल्या असं लक्षात येतं, की केवळ आपणच नव्हे, तर आपल्या पिढीतले बहुसंख्य तरुण आपल्यासारखंच तर करत आले आहेत! ही ‘मेंढरांच्या कळपा’ची मानसिकता हे आपलं व्यवच्छेदक लक्षण. सगळे इंजिनीअरिंगला जात आहेत ना, मग आपणही तिकडंच जायचं. सगळे डॉक्टर होताहेत तर मग आपणही तीच वाट निवडायची. यात धोका नाही. वाट मळलेली आहे. आपण फक्त पुढच्या मेंढरामागं चालत राहायचं. डोळ्यांना परंपरेची, रुढीची, स्वतंत्र विचार न करण्याची अदृश्य झापडं लावलेली असतातच. त्यामुळं इकडं-तिकडं बघायचं काही कारणही उरत नाही. एखाद्याला चुकून वाटलं, की आपल्याला चित्रकलेत रस आहे, तर तो रस मारून टाकण्याकडं आपला सगळ्यांचाच कल. समाजानं मान्य केलेल्या चौकटीत मिळालेलं यश तेच ‘यश’ असतं, असंच आपल्यावर लहानपणापासून बिंबवलं जातं. आपण वेगळा विचार करण्याची थोडी फार शक्यताही त्यातून नष्ट होते. मी स्वत: दहावीनंतर इंजिनीअरिंगला जाऊन, अपयशाच्या थपडा खाऊन शहाणा झालेला एक विद्यार्थी आहे. आपल्याला भाषा विषयात गती आहे, आपण वृत्तपत्रात, माध्यमात लेखनाचं काम करून यश मिळवू शकतो, हे कळेपर्यंत तारुण्यातली महत्त्वाची तीन-चार वर्षं गेली. अर्थात ती ‘वाया गेली’ असं मी म्हणणार नाही. याचं कारण शिकण्याची प्रक्रिया सुरू होतीच. त्यावर परीक्षेतील गुणांचं वा प्रमाणपत्राचं शिक्कामोर्तब झालं नाही इतकंच. अनेक थोर-मोठे कलावंत लौकिक अर्थानं फार शिकलेले नव्हते. परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण सोडावं लागलं किंवा नीट घेता आलं नाही. मात्र, पुढं त्यांच्या कर्तृत्वात त्यामुळं कुठेही उणेपणा आला नाही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ही अगदी सर्वांना माहिती असलेली उदाहरणं. या दोघांनीही जेमतेम प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण घेतलं होतं. मात्र, लतादीदी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात एवढ्या उत्तुंग स्थानी गेल्या, की ते स्थान गाठणं इतरांना जवळपास अशक्य व्हावं. तीच गोष्ट वसंतदादांची. दादांकडं शाळेचं प्रमाणपत्र नसेलही; मात्र, जगण्यातून ते जे शिकले होते, ते कित्येकांना पदवी घेऊनही समजलं नसतं. खेड्यापाड्यांतील माणसांची वेदना, दु:ख जाणणारा असा हा मुख्यमंत्री होता. राजभवनाचं ऐश्वर्य मिळालं, तरी भाजी-भाकरी गोड मानून खाणारा मातीतला नेता होता. मग यांनी जे ‘यश’ मिळवलं ते कसं मोजायचं? सचिन तेंडुलकरचं उदाहरणही महत्त्वाचं. रूढार्थानं बारावी पण उत्तीर्ण नाही. मात्र, त्याच्या क्षेत्रात त्यानं एवढं यश मिळवलं, की त्याचं यश हीच एक दंतकथा झाली. बारावी किंवा त्याआधीच्या वर्गांना त्याचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा लागला. ‘यश’ या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल, एवढं उदंड यश मिळवलं. ‘मायक्रोसॉफ्ट’चं साम्राज्य उभं करणाऱ्या बिल गेट्सची कथाही अशीच. थोर गायक पं. भीमसेन जोशींची कहाणी पण तशीच. किती तरी उदाहरणं आहेत. शाळेतलं किंवा मार्कांचं यश हा नेहमीचा मापदंड ओलांडून ही माणसं पुढं गेली. त्यांनी रूढ यशाच्या चौकटी लांघल्या. आपले स्वत:चे मानदंड प्रस्थापित केले.
याशिवाय प्रयत्नपूर्वक चौकट मोडून वेगळं काही तरी करून धजणारे, त्यासाठी अविरत कष्ट करणारे, त्याची किंमत मोजणारे असे किती तरी लोक आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातला प्रत्येक जण प्रसिद्ध होऊ शकतो असं नाही. पण माझ्या मते, असा प्रत्येक माणूस हा सेलिब्रेटीच आहे. आपल्याकडं ५०-६० वर्षांपूर्वी किंवा अगदी ३०-४० वर्षांपूर्वी जी शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती होती, त्या तुलनेत आता काळ थोडा बदलला आहे. आता निदान मुलांना त्यांच्या आवडी-निवडी समजतात. कल चाचणी असते. त्यानुसार अभ्यासक्रम निवडता येतो तरी. शिवाय आता पालकही पुरेसे जागरूक झाले आहेत. मुलांना एखाद्या क्षेत्रात गती नसेल तर तिकडं त्याला पाठवू नये एवढा विचार तरी ते नक्कीच करतात. ‘तुला हवं ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,’ असं म्हणणाऱ्या पालकांची संख्या वाढते आहे. निदान शहरांत तरी असे पालक दिसताहेत ही जमेची बाजू आहे. किमान चौकट मोडता येणं, ही भावी यशाची नांदी असू शकते. आपल्या चौकटबद्ध, चाकोरीबद्ध, पारंपरिक विचारांमुळं आपण किती तरी वेगळ्या, अज्ञात वाटा धुंडाळण्याविना राहिलो. किती तरी ज्ञानशाखा आपल्याला ठाऊकच झाल्या नाहीत. आता ही सगळी वाट खुली होताना दिसते आहे. दार निदान किलकिलं झालं आहे. पायवाट दिसते आहे, तिचा लवकरच महामार्गही होईल. त्यामुळे यशाच्याही नवनव्या व्याख्या तयार होतील. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, तो किती मोलाचा आहे, याची जाण होणंही महत्त्वाचं. त्यामुळं आपण जन्माला आलो आहोत ते काही तरी करून दाखवण्यासाठी अशी एक जिद्द मनात तयार होते. निदान तयार व्हायला पाहिजे. आपलं जगणं कायम उदात्त आणि उन्नत असायला पाहिजे, याची खूणगाठ मनाशी बांधता येते. आपल्या जगण्यातून आजूबाजूच्या चार लोकांचं भलं कसं होईल, याचा विचार सुरू होतो. आतापर्यंत जगात विज्ञानानं जी प्रगती केली, शास्त्रज्ञांनी जे मोठमोठे शोध लावले त्यामागे हाच मूलभूत विचार आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ हे जसं खरं आहे, तसंच ‘जगाच्या कल्याणा शास्त्रज्ञांच्या विभूती’ हेही तितकंच खरं आहे. विशेषत: मध्ययुगापासून गेली चार-पाच शतकं माणसाच्या इतिहासात जी क्रांती घडली, त्यामुळं आपलं अवघं जीवनच बदलून गेलं आहे. या क्रांतीच्या मुळाशी हाच अभ्यास होता, हाच ध्यास होता. त्यामुळं एकेका शोधामुळं मानवी जीवनानं प्रगतीचा एकेक पुढचा टप्पा गाठला. मोठी मजल मारली. विविध औषधांचे शोध असोत, किंवा तंत्रज्ञानातील प्रगतीचे अद्भुत आविष्कार असोत; या प्रत्येक शोधामुळं आपलं जीवन आणखी सुकर, आणखी सुखकर झालं आहे. मानवी कल्याणासाठी केल्या गेलेल्या या प्रत्येक गोष्टीला आपण यश म्हटलं, तर या यशाचं परिमाणही फार वेगळं व उच्च असेल.
यशाच्या फूटपट्ट्या अनेक आहेत. माझ्या मते, माणसाच्या जगण्यातील मूलभूत मूल्यांचा आदर राखून मिळवलेलं यश हे अधिक उजवं मानायला हवं. उदा. प्रामाणिकपणा, सचोटी, मेहनत, जिद्द हे गुण आणि सामाजिक समानता, भिन्नलिंगी व्यक्तीवषयी आदर, देशाप्रति निष्ठा, आपल्या कामावरील प्रेम, समाजाचे नियम पाळण्याची असोशी ही मूल्यं यांचं पालन करून मिळवलेलं यश खरोखर सुवर्णयश मानायला हवं. आपण वरील गुणांचं व मूल्यांचं पालन करून यश मिळवलं आहे का, हे जाणण्याची छोटी कसोटी आहे. यश मिळाल्यावरही आपल्या अंगी विनम्रता कायम असेल किंवा आपले पाय जमिनीवर असतील तर आपण ही कसोटी उत्तीर्ण झालो, असं खुशाल समजावं.
हे जग अतिशय विशाल आणि वैविध्यानं भरलेलं आहे. आपल्याला ते जेवढं उमजत जाईल, तेवढे आपण विनम्र होत जाऊ. आपल्याआधी या जगात किती तरी थोर माणसांनी केवढे तरी महान पराक्रम करून ठेवले आहेत. आपल्याला त्याची नुसती जाणीव असणंही पुरेसं आहे.

 तुम्ही कधी रायगडावर गेला आहात का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेथील पुतळ्यासमोर आपण काही क्षण उभे राहिलो, तरी डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. राजांचं अवघं जगणं त्या अश्रूधारांत प्रतिबिंबित होत असतं. आपल्या सर्वांसाठी महाराजांनी काय काय करून ठेवलं आहे, याची नुसती उजळणी केली तरी आपली छाती अपार कृतज्ञतेनं भरून येते. अवघ्या पन्नास वर्षांच्या जीवनात महाराजांनी यशाचे एकेक मानदंड स्वत: प्रस्थापित केले. असा युगपुरुष हजारो वर्षांतून एकदाच जन्माला येतो. अर्थात म्हणूनच त्यांना युगपुरुष म्हणतात.
महाराजांचे समकालीन म्हणावेत असा ज्येष्ठ शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन किंवा महान शास्र्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन किंवा जेम्स वॅट किंवा लुई पाश्चर किंवा मार्कोनी किंवा जगदीशचंद्र बोस यांचाही मी विचार करतो, तेव्हा माझं मन कृतज्ञतेनं असंच भरून येतं. या मंडळींनी मूलभूत स्वरूपाचे असे शोध लावले नसते तर आपण आज कसलं आयुष्य जगत असतो कुणास ठाऊक. हीच गोष्ट महात्मा गांधी किंवा डॉ. आंबेडकर किंवा सावरकर यांच्याविषयी म्हणता येईल. या सर्व महान विभूतींनी त्यांच्या आयुष्यात जे काही केलं, जे काही मिळवलं त्याला निर्विवाद यश म्हणता येईल. ही यशाची एक वेगळीच व्याख्या होऊ शकते.
या सर्वांच्या जगण्यातलं एक समान सार काढलं, तर एक लक्षात येईल, की या सर्वांनी केवळ स्वत:चा विचार केला नाही. त्यांनी संपूर्ण समाजाचा, किंबहुना सर्व मानवजातीचा विचार केला. त्यामुळंच त्यांच्या हातून एक किंवा अनेक अलौकिक गोष्टी होऊ शकल्या.
आपल्याकडं मोठी संतपरंपरा आहे. संत म्हटलं, की त्यांच्याविषयी आपल्या मनात एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. आपल्यासारख्या सामान्य संसारी माणसांशी त्यांची तुलना होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं. ते काहीसं खरं असलं, तरी पूर्णांशांनं खरं नाही. संत म्हणजे आपल्यासारखीच हाडामासांची माणसं होती. संत तुकाराम महाराज तर संसारी गृहस्थ होते. मात्र, त्यांनी विठ्ठलभक्तीचा ध्यास घेतला आणि त्यातून त्यांच्या हातून गाथेसारखी अजरामर रचना निर्माण झाली. मात्र, या संतांकडून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांची त्यांच्या श्रद्धास्थानावर असलेली प्रचंड भक्ती आणि ऐहिकाबाबत असलेली विरक्ती. आपल्याला आपल्या साध्या जगण्यात या दोन गोष्टी जरी साध्य करता आल्या, तरी आपण मोठं ‘यश’ मिळवलं असं म्हणता येईल. भौतिक सुखाची आसक्ती आणि ते मिळविण्याची सक्ती हाच आपल्या आयुष्यातला कार्यकारणभाव असला तरी एका मर्यादेनंतर आपल्याला या ऐहिक गोष्टींबाबत विरक्ती अंगी बाणवता आली पाहिजे. ‘सगळ्यांत असूनही कशात नसल्याची अवस्था’ गाठली आणि सोपे मोह टाळले तर आपलं सगळ्यांचंच आयुष्य अतिशय सहजपणे सुखी होऊन जाईल.
या सर्व कथनामागचा खटाटोप एवढाच, की यश ही संकल्पना सापेक्ष असली तरी आपल्यापुरतं आपल्याला तिचं गमक सापडलं तरी पुरे. हे गमक कशात आहे? आपल्या आयुष्याचं, आपल्या जन्माचं प्रयोजन आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येक जण काही तरी थोर कार्य करायलाच जन्माला आलेला असतो असं नाही, हे मान्यच! मात्र, आपल्या वाट्याला जे काही काम आलं आहे ते नेटकेपणानं, प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीनं करणं म्हणजेसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अनेकदा हीच गोष्ट अनेकांकडून होताना दिसत नाही, म्हणून अनेक समस्या निर्माण होत आहेत. आपल्यासमोर लहानपणापासून ज्या ‘यशा’चं गाजर ठेवलं जातं, त्या यश नावाच्या मृगजळाच्या मागं उरस्फोड करीत धावण्यातून काहीही साध्य होत नाही. याउलट आपल्याला जगण्याचं प्रयोजन सापडलं, की त्यातून होणारी प्रत्येक कृती आनंददायी होते आणि यश आपोआप मागून येत राहतं. उदाहरण द्यायचं झालं, तर डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे असोत, किंवा डॉ. अभय बंग – डॉ. राणी बंग असोत… जगण्याचं प्रयोजन सापडलेली ही माणसं आहेत. त्यांच्या जीवनाशी आपलं जगणं ताडून बघितलं तरी कळेल, की ‘यश’ या संकल्पनेचं नक्की काय करायचं ते… या मंथनातून आपल्याला आपलं जगणं थोडं अधिक समृद्ध करता आलं, थोडं अधिक आनंददायी करता आलं, तरी ते आपल्या पातळीवरचं, लहानसं का होईना, पण यशच असेल!

----

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती दिवाळी अंक, २०२४)

---