अळागना पोन्नू...
-------------------
गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला पन्नाशीत पदार्पण करताना आपण जगातल्या सर्वांत उंच इमारतीवर -बुर्ज खलिफावर - असायला हवं असं मला वाटत होतं. अगदी त्या दिवशी नाही, पण गेल्या डिसेंबरमध्येच दुबईला जाऊन ते स्वप्न पूर्ण करता आलं. आता पन्नाशी पूर्ण करताना आपण जमीन व समुद्र या दोन पंचमहाभूतांच्या सान्निध्यात असायला हवं, असं मनात आलं. या दोन्ही गोष्टी एकत्र अनुभण्यासाठी अंदमानसारखी दुसरी जागा नाही. त्यामुळं पन्नाशी पूर्ण करताना अंदमानला जाऊ, असं ठरवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या काळकोठडीचं दर्शन घेण्याची आस होतीच. मात्र, सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काही कारणानं अंदमानला जाणं रद्द झालं. मात्र, निदान निम्म्या वाटेत तरी जाऊ, असं मनात आलं. अनेक दिवसांपासून 'बकेट लिस्ट'मध्ये असलेल्या पाँडिचेरीचं (पाँडिचेरीचं आताचं अधिकृत नाव पुदुच्चेरी. मात्र, या लेखनात सगळीकडं पाँडिचेरी हाच अधिक रूढ असलेला उल्लेख केला आहे.) नाव अचानक वर आलं. त्यामुळं तिथंच जायचं निश्चित केलं. पाँडिचेरी ही एके काळी भारतातील फ्रेंचांची महत्त्वाची वसाहत होती आणि तिथं योगी अरविंदांचा आश्रम आहे, या दोन गोष्टींपलीकडं मला पाँडिचेरीची माहिती पत्रकारितेत येईपर्यंत नव्हती. पाँडिचेरीच्या जमिनीला पाय लागण्याचं भाग्य मात्र तब्बल २४ वर्षांपूर्वी, २००१ मध्ये माझ्या वाट्याला आलं होतं. तेव्हा मी सकाळतर्फे तमिळनाडूत विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो. तेव्हा चेन्नईवरून कडलूरला बसनं जाताना पाँडिचेरीला आमची बस काही वेळ थांबली होती. मला आमची बस पाँडिचेरीमार्गे जाणार आहे, हेच माहिती नव्हतं. त्यामुळं पाँडिचेरी आल्यावर मी अतिशय उत्सुकतेनं जेवढं दिसेल तेवढं ते टुमदार गाव डोळे भरून पाहिलं होतं. तिथल्या बसस्टँडवर मी डोसाही खाल्ला होता. मात्र, तिथं थांबून ते सगळं गाव नीट पाहणं तेव्हा शक्य नव्हतं आणि नंतर तब्बल दोन तपं हा योग काही आला नाही. तो आला गेल्या महिन्यात. पन्नाशीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन खरोखर महिनाभर चाललं होतं. त्याची सांगता करण्यासाठी ही ट्रिप म्हणजे एकदम योग्य पर्याय होता. मी दोन-तीन महिन्यांपूर्वीच २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अशी चार दिवसांची ट्रिप आखून टाकली. आमचे नेहमीचे भिडू या वेळी नव्हते. आम्ही तिघंच जाणार होतो. पुणे ते चेन्नई फ्लाइट आणि नंतर कॅब करून पाँडिचेरीला जाऊ, असं ठरवलं. कुठल्याही प्रवासी कंपनीची किंवा एजंटची मदत न घेता, सगळी बुकिंग वगैरे आमची आम्हीच केली. ट्रिपला जाण्याआधी एका ठिकाणी बोलताना असा विषय निघाला, की नोव्हेंबरअखेरीला गेल्या वर्षी चेन्नईत मोठं चक्रीवादळ आलं होतं आणि त्या लोकांचा सगळा प्लॅन त्यात वाहून गेला होता. मी या संकटाची कल्पनाच केली नव्हती. (पुढं ते चक्रीवादळ आलंच.) त्यामुळं मी रोज पाँडिचेरीचं हवामान पाहू लागलो. तिथं जवळपास रोजच पाऊस पडण्याचा अंदाज येत होता. मग आम्ही आमच्या सामानात छत्र्या घेतल्या. आमचं जातानाचं विमान पुण्याहून दहा वाजता होतं. ते बारा वाजता चेन्नईला पोचणार होतं. आम्ही सकाळी साडेसात वाजता घरातून निघालो. बरोबर साडेआठ वाजता पुणे एअरपोर्टला पोचलो. इंडिगोचं विमान वेळेत निघालं आणि वेळेच्या आधी म्हणजे ११.३० वाजताच चेन्नईत लँड झालं. (एकाच आठवड्याने या एअरलाइन्सचा काय महागोंधळ होणार आहे, याची तेव्हा अर्थातच कल्पना नव्हती.) जाताना हवा अतिशय स्वच्छ होती. नव्या मोबाइलचा कॅमेरा चांगला होता. म्हणून विमानातून खंबाटकी घाट, कऱ्हाडचा कृष्णा-कोयना संगम असे फोटो टिपता आले. जसजसं चेन्नई जवळ येऊ लागलं, तसतसं निरभ्र आकाश जाऊन ढगांची दाटी दिसून आली. त्या ढगाळ वातावरणातच आम्ही चेन्नईत उतरलो. तोवर आम्हाला डिटवाह नावाच्या दिवट्या चक्रीवादळाची खबर नव्हती. चेन्नईत उतरल्यावर मला बातम्यांत त्या वादळाविषयी समजलं. तेव्हा ते श्रीलंकेच्याही खाली होतं आणि दुसऱ्या दिवशी ते श्रीलंकेत येऊन धडकणार होतं. अर्थात इथं त्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली होती. आम्ही उतरलो तेव्हा चेन्नईत हवा स्वच्छ होती आणि पाऊसही नव्हता. अगदी थंडी नव्हती, पण उकाडा अजिबात नव्हता. आम्ही बाहेर पडल्यावर तातडीनं एक टॅक्सी ठरवली. बरंच अंतर चालत जाऊन एअरोमॉलमधून ती टॅक्सी पकडावी लागली. मात्र, बारा वाजता आमचा प्रवास सुरूही झाला होता.
आम्हाला आधी महाबलिपुरमला जायचं होतं. चेन्नईहून पाँडीला जाताना महाबलिपुरम लागतं. इथली ती प्रसिद्ध मंदिरं, शिल्पकारांची कार्यशाळा आणि ती प्रसिद्ध लोण्याचा गोळा असलेली शिळा हे सगळं बघायचं होतं. आम्ही दोन वाजता तिथं पोचलो. आधी पोटपूजा करायची होती. अड्यार आनंदा भवन या तिथल्या प्रसिद्ध साखळी हॉटेलांपैकी एक असलेल्या हॉटेलमध्ये आमच्या जयशंकरनं आम्हाला नेलं. तिथं सेल्फ सर्व्हिस आणि टेबल सर्व्हिस असे दोन विभाग होते. मात्र, गर्दी बरीच होती. तेवढ्यात एक वेटर आला आणि हिंदीत आम्हाला म्हणाला, की तुम्ही इथं बसा. मी तुमची ऑर्डर जागेवर आणून देतो. मग मी सांबार राइस मागवला. धनश्री व नीलनं पावभाजी घेतली. तो वेटर बिहारचा होता. आमचे चेहरे बघूनच त्याला आम्ही पर्यटक असल्याचं समजलं आणि त्यानं आम्हाला अशी मदत केली होती. आमचा जरासा गबाळा आणि बराचसा गबदुल असा चक्रधर जयशंकर हाही तिथं जेवायला बसला. त्यानं आमच्याकडं बोट दाखवून 'हे माझे पैसे देतील,' असं वेटरला सांगून मिल्स मागवलं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेवण झाल्यावर बरं वाटलं. नंतर मस्त कॉफी पण घेतली. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. मात्र, आता आम्हाला महाबलिपुरम बघायचंच होतं. जयशंकर आम्हाला मुख्य शोअर टेम्पलच्या दारात घेऊन गेला. तिथं आम्ही दरडोई ४० रुपयांची तिकिटं घेऊन आत गेलो. थोडं आत गेल्यावर ते मंदिर होतं. तिथं इंग्लिशमध्ये माहिती देणारे कुठलेही फलक नव्हते. माझा सहकारी अभिजित थिटेनं मला, तिथं पोचल्यावर फोन किंवा व्हिडिओ कॉल कर, सगळी माहिती सांगतो, असं सांगितलं होतं. मात्र, आता जोरात पाऊस सुरू झाला. शेजारीच समुद्र होता आणि तो चांगलाच उधाणला होता. आमच्याबरोबर असलेले बरेच पर्यटक भिजत होते. आमच्याकडं दोन छ्त्र्या होत्या, मात्र आता त्या वाऱ्यानं उलट्या व्हायला लागल्या. अखेर ते मंदिर पाहिलं. तिथं फोटो काढले. अनेक पर्यटक कंपन्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत 'फोटोस्टॉप' नावाचा प्रकार असतो. तोच आम्हाला इथं नाइलाजानं करावा लागत होतं. आम्ही भिजतच बाहेर आलो. अभिजितला फोन केला. त्यानं बरीच माहिती दिली. मात्र, व्हिडिओ कॉल न झाल्यानं त्या माहितीला मर्यादा आली. पुढं जयशंकर आम्हाला अर्जुनाचा रथ आणि त्या शिळेपर्यंतही घेऊन गेला, एके ठिकाणी लेण्यासारखी जागा असल्यानं आम्ही तिथं आत शिरलो. तिथं पाऊस लागत नव्हता, त्यामुळं बरेचसे पर्यटक आतच थांबले होते. तिथं छायाप्रकाशाचा सुंदर खेळ रंगला होता. फोटो सुंदर येत होते. मग बरंचसं फोटोसेशन तिथं केलं. तिथून जरा पुढे गेल्यावर तो प्रसिद्ध तिरपा दगड दिसला. तिथंही आत जायला तिकीट होतं. मात्र, पाऊस परत वाढल्यानं आम्ही बाहेरूनच फोटो काढले आणि निघालो. मोदी आणि जिनपिंग यांची भेट याच ठिकाणी झाली होती. पल्लव राजांच्या काळातलं हे सगळं काम आहे. त्या महाकाय शिळेला श्रीकृष्णाचा लोण्याचा गोळा असंही म्हणतात.
इथं बघण्यासारखं बरंच काही होतं. मात्र, आता पाऊस वाढल्यामुळं आम्हाला निघणं भाग होतं. मग पुन्हा टॅक्सीत येऊन बसलो आणि जयशंकरनं लगेच टॅक्सी पाँडिचेरीच्या दिशेनं दामटली. त्याला इंग्रजी जेमतेम येत होतं आणि हिंदी समजत होतं. त्यामुळं आमचा तोडकामोडका संवाद सुरू होता. 'चेन्नई आता किती वाढलंय' इथून आमच्या चर्चेची सुरुवात झाली. तो अण्णा द्रमुकचा कार्यकर्ता होता. त्यामुळं आताच्या स्टॅलिन राजवटीला शिव्या घालत होता. सगळीकडं भ्रष्टाचार बोकाळला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. येत्या निवडणुकीत स्टॅलिन यांच्या द्रमुकला विरोधकांचं मोठं आव्हान असेल, असंही तो म्हणाला. तमिळनाडूत येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमचं हे बोलणं चाललं होतं. चेन्नईहून पाँडीला जाणाऱ्या रस्त्याला ईसीआर (ईस्ट कोस्ट रोड) म्हणतात. हा रस्ता निसर्गसुंदर आहे. डाव्या बाजूला सतत समुद्र दिसत राहतो. मात्र, जयशंकर त्या रस्त्याला शिव्या घालत होता. खरं तर हा रस्ता चौपदरी करण्याचं काम सुरू असलेलं दिसत होतं. त्यामुळं अनेक ठिकाणी डायव्हर्जन होती. मात्र, जयशंकर सतत कचरा रोड, कचरा रोड म्हणत त्या रस्त्याचा उद्धार करत होता. जसजसं आम्ही पाँडीच्या जवळ येऊ लागलो, तसतसं समोरचं आकाश भरून आलेलं दिसायला लागलं. ऑरोव्हिलेचा बीच लागला. थोड्याच वेळात आमची टॅक्सी पाँडीत शिरली.
पाँडिचेरीविषयी आपण जे काही ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, तसं काही या गावाचं रूपडं लगेच जाणवत नाही. कुठल्याही भारतीय गावात गेल्यावर जे दिसतं तसंच याही गावात दिसतं. पाँडीचं अंतरंग आम्हाला अजून उलगडायचं होतं. हळूहळू आमची टॅक्सी मिशन स्ट्रीटवरल्या आमच्या कोरामंडल हेरिटेज हॉटेलकडं धावू लागली. मुख्य टाउन भागात शिरल्यावर पाँडीचं अंतरंग दिसू लागलं. अतिशय झगमगीत, ब्रँडेड कपड्यांची दुकानं असलेला रस्ता लागला. या गावावर पूर्वीपासून काँग्रेसचं वर्चस्व होतं. तेव्हा वल्लभभाई पटेल सलाई, कामराज सलाई, नेहरू मार्ग, गांधी पुतळा वगैरे सगळं इथं आहे.
फ्रेंचांची ही वसाहत. इथल्या व्हाइट टाउन या भागात त्या वसाहतीच्या खाणाखुणा दिसतात. बाकीचं गाव आता इतर चार भारतीय गावांसारखंच दिसतं. तीच गर्दी, तोच गजबजाट... अर्थात पुण्याच्या तुलनेत पुष्कळच शांत. एकूण टुमदार. वर्गात सर्वसामान्य दिसणाऱ्या अनेक मुलींत एखादीच देखणी मुलगी असावी, तशी तमिळनाडूच्या पोटात ही 'अळागना पोन्नू' (सुंदर मुलगी) दिसते. फ्रेंच वाइनप्रमाणे अधिक मुरल्यानंतर तर तिची खुमारी अधिकच वाढलेली दिसते. त्या सौंदर्याच्या खाणाखुणा इथल्या व्हाइट टाउननं प्राणपणानं जपल्या आहेत. काही काही ठिकाणी तर केवळ तमिळ व फ्रेंच या दोन भाषांतच पाट्या आहेत.
पुदुच्चेरी हे केंद्रशासित राज्य. इथं विधानसभा आहे, मुख्यमंत्री आहेत. मात्र, दिल्लीप्रमाणेच हा भाग सगळा केंद्रशासित. एन. रंगास्वामी हे गृहस्थ अनेक वर्षं इथले मुख्यमंत्री आहेत. सर्वसामान्यांत मिसळणारे, स्कूटरवरून फिरणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. (आमच्या आशिष चांदोरकरने पूर्वी यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून आम्ही रंगास्वामींना आशिषचे मित्र म्हणतो.) असो.
आम्ही हॉटेलमध्ये येऊन टेकलो. आमची रूम दुसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळं सतत जिन्यानं चढ-उतार करणं आलं. त्यात पाऊस. संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता. आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं. आम्ही जरा फ्रेश होऊन बाहेर पडलो. पाऊस होताच. छ्त्र्यांचा उपयोग झाला. इथं जवळच सुरगुरू नावाचं व्हेज साउथ इंडियन हॉटेल होतं, असं समजलं होतं. मात्र, ते रिनोव्हेशनमुळं तात्पुरतं बंद असल्याचं कळलं. मग आम्ही अगदी शेजारी असलेल्या एका घराच्या टेरेसवर असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. इथं अगदी कलोनियल व्हाइब्स होत्या. इथलं आर्किटेक्चर, टेबल, कटलरी, भिंतींवरचे फोटो सगळं तसंच होतं. पाऊस नसता तर टेरेसवरही बसायची सोय होती. मात्र, आम्हाला आत आत बसावं लागणार होतं. तिथं एक तरुणी (ती बहुतेक मालकीणच असावी...) आणि दोन-तीन कामावर असलेली मुलं होती. आम्ही लवकर आलो होतो. त्यामुळ बाकी ग्राहक कुणीही नव्हते तेव्हा. आम्ही शांततेत सगळं ऑर्डर केलं आणि निवांत जेवलो. नंतर काही जण जेवायला आले. बिल आल्यावर कळलं, की हॉटेल जरा महागच आहे. ते सगळे त्या अॅम्बियन्सचे पैसे होते. जेवणही बरंच बरं होतं. सूप विशेष छान होतं. मग पुन्हा पावसात जरा भिजत आमच्या शेजारीच असलेल्या हॉटेलमध्ये परतलो. मोबाइलमध्ये बातम्या बघितल्या. उद्या श्रीलंकेत चक्रीवादळ धडकणार, अशाच बातम्या होत्या. इथं तर सतत पाऊस पडत होता. आमच्या ट्रिपचं काय होणार असा प्रश्न पडला. त्या चिंतेत असलो तरी बरेच दमलो असल्यानं लगेच डोळा लागला. उद्याचं उद्या बघू, असं म्हणत झोपलो...
(पूर्वार्ध)
--------------------
पुदुच्चेरी हे केंद्रशासित राज्य. इथं विधानसभा आहे, मुख्यमंत्री आहेत. मात्र, दिल्लीप्रमाणेच हा भाग सगळा केंद्रशासित. एन. रंगास्वामी हे गृहस्थ अनेक वर्षं इथले मुख्यमंत्री आहेत. सर्वसामान्यांत मिसळणारे, स्कूटरवरून फिरणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. (आमच्या आशिष चांदोरकरने पूर्वी यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून आम्ही रंगास्वामींना आशिषचे मित्र म्हणतो.) असो.
आम्ही हॉटेलमध्ये येऊन टेकलो. आमची रूम दुसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळं सतत जिन्यानं चढ-उतार करणं आलं. त्यात पाऊस. संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता. आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं. आम्ही जरा फ्रेश होऊन बाहेर पडलो. पाऊस होताच. छ्त्र्यांचा उपयोग झाला. इथं जवळच सुरगुरू नावाचं व्हेज साउथ इंडियन हॉटेल होतं, असं समजलं होतं. मात्र, ते रिनोव्हेशनमुळं तात्पुरतं बंद असल्याचं कळलं. मग आम्ही अगदी शेजारी असलेल्या एका घराच्या टेरेसवर असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. इथं अगदी कलोनियल व्हाइब्स होत्या. इथलं आर्किटेक्चर, टेबल, कटलरी, भिंतींवरचे फोटो सगळं तसंच होतं. पाऊस नसता तर टेरेसवरही बसायची सोय होती. मात्र, आम्हाला आत आत बसावं लागणार होतं. तिथं एक तरुणी (ती बहुतेक मालकीणच असावी...) आणि दोन-तीन कामावर असलेली मुलं होती. आम्ही लवकर आलो होतो. त्यामुळ बाकी ग्राहक कुणीही नव्हते तेव्हा. आम्ही शांततेत सगळं ऑर्डर केलं आणि निवांत जेवलो. नंतर काही जण जेवायला आले. बिल आल्यावर कळलं, की हॉटेल जरा महागच आहे. ते सगळे त्या अॅम्बियन्सचे पैसे होते. जेवणही बरंच बरं होतं. सूप विशेष छान होतं. मग पुन्हा पावसात जरा भिजत आमच्या शेजारीच असलेल्या हॉटेलमध्ये परतलो. मोबाइलमध्ये बातम्या बघितल्या. उद्या श्रीलंकेत चक्रीवादळ धडकणार, अशाच बातम्या होत्या. इथं तर सतत पाऊस पडत होता. आमच्या ट्रिपचं काय होणार असा प्रश्न पडला. त्या चिंतेत असलो तरी बरेच दमलो असल्यानं लगेच डोळा लागला. उद्याचं उद्या बघू, असं म्हणत झोपलो...
(पूर्वार्ध)
--------------------



