स्वप्नांचं ‘टेकऑफ’...
-------------------------
आपल्या आयुष्यात स्वप्न हा प्रकारच नसता तर आयुष्य भलतंच नीरस झालं असतं. आपण स्वप्न पाहू शकतो, म्हणून आजचा दिवस काढू शकतो. एखादं स्वप्न पाहणं, कुठलं तरी उद्दिष्ट ठेवणं, जिद्दीनं ते पूर्ण करणं हा सगळा प्रवास म्हणजेच खरं तर आपलं आयुष्य असतं, असंही म्हणायला हरकत नाही.
आता इथं स्वप्न याचे दोन अर्थ संभवतात. एक आपल्याला झोपेत पडतं ते आणि दुसरं म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, ती पूर्ण व्हावी म्हणून धडपडतो ते... पण या दोन्हींचा एकमेकींशी अन्योन्य संबंध आहे. कसा? आपण झोपेत पडणारं स्वप्न पाहायला कधीपासून सुरुवात करतो बरं? आपण अगदी तान्हं बाळ असतानाही आपल्याला तसं स्वप्न पडत असणार. आता ते काही आपल्याला आठवणार नाही; पण अनेक लहान बाळं झोपेतल्या झोपेत खुदकन हसताना दिसतात, तेव्हा ती काय बघत असतील? कसला विचार करत असतील? काय दिसत असेल त्यांना? माहिती नाही. पण खूप लहानपणापासून आपण स्वप्नं पाहतो, हे नक्की. स्वप्न म्हणजे अबोध मनाच्या राज्यातला प्रदेश. आपल्या अबोध मनात जे काही विचार चालू असतात किंवा जे काही आपल्याला वाटत असतं, तेच स्वप्नांच्या रूपात दिसतं म्हणे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे किंवा एखादं पद हवं आहे किंवा बढती हवी आहे किंवा बंगला-गाडी-घोडा असं जे जे काही भौतिक हवं आहे ते ते आपल्याला स्वप्नात कधी ना कधी तरी दिसतं. त्यामुळंच आपल्या भाषेत स्वप्न याचा एक अर्थ मनातील इच्छा, आकांक्षा किंवा नुसतीच आशा असा आहे.
त्यामुळं अशा स्वप्नांविषयी बोलायचं तर ते काही अशा एखाद्या लेखात मावायचं नाही. अशी किती तरी स्वप्नं पाहिली! स्वप्नं पाहण्यावर अजून तरी कुणाची बंदी नाही. त्यामुळं हवी तेवढी स्वप्नं पाहावीत. ती पूर्ण होतील किंवा न होतील; किंबहुना बरीचशी तर नाहीच होणार. मग काय करायचं? काही नाही; स्वप्नं पाहत राहायचं. एक ना एक एखादं तरी स्वप्न पूर्ण होतंच, असा माझा अनुभव आहे.
यातल्या काही महत्त्वाच्या स्वप्नांचे, स्वप्नपूर्तीचे अनुभव सांगायलाच हवेत. यातलं पहिलं सर्वांत महत्त्वाचं माझं स्वप्नहोतं ते ड्रायव्हर व्हायचं! हो, ड्रायव्हर... तोही एसटीचा ड्रायव्हर! (बहुतेक मुलग्यांचं हे स्वप्न असतंच!) त्या वेळी सार्वजनिक प्रवासी वाहनांतूनच बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक प्रवास करायचे. त्यामुळं एसटीचा प्रवास नित्याचाच. अनेक लहान मुलांना ड्रायव्हरच्या मागची सीट हवी असे. त्यात मीही आलो. ड्रायव्हरच्या मागची आडवी सहा जणांची सीट ड्रायव्हरकडं पाठ करून असे. तिथं बसणाऱ्यांना स्वाभाविकच पुढचं काही दिसायचं नाही. त्यामुळं अनेक मुलं या सीटवर उलट तोंड करून, ड्रायव्हरच्या मागची जाळी धरून समोरच्या काचेतून पुढला रस्ता पाहत असत. मीही तसंच करत असे. अधूनमधून ड्रायव्हरचंही निरीक्षण करणं सुरू असे. एवढी मोठी गाडी चालवणारा, घाटात ते स्टिअरिंग गरगर फिरवणारा, मनात येईल तेव्हा तो हॉर्न वाजवणारा ड्रायव्हर म्हणजे त्या सहा चाकांवरच्या फिरत्या देखाव्याचा अनभिषिक्त राजाच असे. पूर्वी दिवाळी किंवा सुट्टीच्या काळात एसट्यांना प्रचंड गर्दी असे. आरक्षण करून प्रवास करणं वगैरे गोष्टी गावाकडच्या लोकांच्या अंगवळणी पडल्या नव्हत्या. एसटी आली की घुसायचं आणि मिळेल त्या मार्गाने (अगदी ‘संकटकालीन खिडकी’तूनही) सीट पटकवायची हेच एकमेव ध्येय असायचं. अशा वेळी संपूर्ण गाडीत ज्या दोनच सीट्सना कुणी हात लावायचं नाही त्या म्हणजे ड्रायव्हर व कंडक्टरच्या सीट्स. त्यातही एखादा कनवाळू कंडक्टर असेल तर तो सगळ्या गाडीची तिकिटं फाडून होईपर्यंत आपल्या जागेवर एखाद्या वृद्ध व्यक्तीला बसायला देतही असे. पण ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसणार? त्यामुळं सगळी गाडी खचाखच भरली, अगदी पुढच्या बॉनेटवर व शेजारच्या लाकडी पेटीवरही प्रवासी बसले, की ऐटीत येऊन स्टिअरिंगसमोरच्या सीटवर बसणारा, गळ्यातला गमछा सारखा करून घाम पुसणारा, कुणाचा तरी डबा शेजारी ठेवून घेणारा, ओळखीच्या एखाद्या पोराला उजव्या हाताला दारात अगदी कोंबून बसवणारा आणि निघण्यापूर्वी त्या खिडकीतून बाहेर पचकन पानाचा तोबरा थुंकणारा तो अफाट चक्रधर केवळ हेव्याचा विषय असे. त्या संपूर्ण गाडीवर सत्ता गाजवणारा तो सत्ताधीश वाटे. ड्रायव्हिंग सीटचा आणि सत्तेचा असा जवळचा संबंध आहे. ‘ड्रायव्हिंग सीटवर असणे’ वगैरे वाक्प्रचार त्यातूनच रूढ झाले असावेत.
एकदा तुम्हाला ड्रायव्हरची ही महती कळली, की मग ड्रायव्हर होणं हे मुख्य स्वप्न राहतं. कुठलं वाहन ते दुय्यम ठरतं. त्यामुळंच मग भविष्यात ट्रक, टॅक्सी, रेल्वे, आगबोट किंवा विमान (अगदी स्पेस शटलही) यापैकी कुठलंही वाहन चालवणाऱ्या ‘ड्रायव्हर’विषयी असूया, हेवा, त्याच वेळी आत्मीयता, जिव्हाळा अशा सगळ्याच भावना दाटून यायला लागल्या. पु. ल. देशपांडेंनी त्यांना ‘रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर’ व्हायचं होतं, यावर एक लेख लिहिला आहे. माझ्या आयुष्यात रेल्वे तेवढी आली नाही. मात्र, विमानाच्या ‘ड्रायव्हर’विषयी, अर्थात वैमानिकाविषयी पुढं पुष्कळ आकर्षण निर्माण झालं. हे ‘सीरियस अफेअर’ होतं. अगदी आजही, मला मी वैमानिक व्हायला हवं होतं, असंच वाटतं. बाकी कुठल्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रानं मला फार वेगानं आपल्याकडं खेचून घेतलं. आयुष्यात पहिला खराखुरा विमानप्रवास घडायला वयाची ३१ वर्षं उलटून जावी लागली. पुढं तो अगदी सातत्यानं नाही, तरी बऱ्यापैकी घडला. अगदी परदेश प्रवासही झाले. मात्र, पहिल्या विमान प्रवासाच्या वेळी टिकलेलं वैमानिक या जमातीविषयीचं आकर्षण किंवा प्रेम आजही कायम आहे. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे. मला उंचीची कधी भीती वाटली नाही. त्यामुळंच पहिल्यांदा विमान प्रवास करताना खरोखर कुठलीही भीती वाटली नाही; उलट ती उंचावरून दिसणारी दृश्यं छान एंजॉय केली. याउलट मला समुद्राची भीती वाटते. किंवा एकूणच पाण्याची! (पोहता येत नसल्यामुळं असेल...) पण पंचमहाभूतांपैकी एकाची तरी अशी भीती वाटतेच. तर, मुद्दा असा, की उंचीची भीती वाटत नसल्याने विमान चालवता यावं किंवा उंच आकाशात भराऱ्या माराव्यात, या स्वप्नाला बळच मिळत गेलं.
आजकालच्या मुलांमध्ये अनेक गोष्टी अत्यंत स्पष्ट असतात. आपल्याला पुढं काय व्हायचंय वगैरे हा त्यांचा फोकस अगदी लहान वयातच विकसित झालेला असतो. मी ज्या काळातून, शिक्षण व्यवस्थेतून आणि ग्रामीण भागातून आलो, तिथं दुर्दैवानं अशी स्वप्नं पाहण्याची मुभाच नव्हती. ‘हे आपल्यासाठी नाही,’ हे मनात अगदी आपोआप ठसून जात असे. त्यामुळं लहानपणापासून हे स्वप्न पाहण्याचा, त्याचा पाठपुरावा करण्याचा किंवा ते पूर्ण व्हावं म्हणून धडपड करण्याचा प्रश्नच आला नाही. अर्थात या सबबी नाहीत. तशी संधी मिळाली असती तरी केलं असतं का, हा प्रश्न आहेच. मात्र, आज अगदी तीव्रतेनं वाटतं, की आता सध्या मी ज्या पत्रकारितेच्या पेशात आहे (आणि तो मला आवडतो) त्यात नसतो, तर नक्कीच वैमानिक व्हायला आवडलं असतं. आता हे स्वप्न पूर्ण होणं अशक्यच. मग ते स्वप्न हीच आवड किंवा छंद म्हणून जोपासणं हा दुसरा पर्याय. मी आता तेच करतो. मी यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही समाजमाध्यमावर विमानांचे, वैमानिकांचे, विमानतळांचे व्हिडिओ पाहतो. सुदैवानं वैमानिकांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक रोचक घटना कुणी ना कुणी तरी चित्रित करून ठेवली आहे. वैमानिकांचे अनेक ग्रुप आहेत. अनेक पेजेस आहेत. तिथं या संदर्भातील माहिती सातत्याने लिहिली जाते. जगातल्या विविध विमानतळांवर टेकऑफ आणि लँडिंगचे अक्षरश: हजारो व्हिडिओ आज आंतरजालात उपलब्ध आहेत. कितीही वेळा हे व्हिडिओ पाहिले तरी मन भरत नाही. जगभरात आज विमानतळांची संख्या मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे. आता केवळ अमेरिका, युरोप या खंडांतच नव्हे, तर विकसनशील देशांतही विमानतळांची उभारणी होत आहे. जगभरातील महानगरांत तर एकाहून अधिक विमानतळ आहेत. ही बलाढ्य विमानतळं म्हणजे एक स्वतंत्र विश्वच आहे. विमानाचे उड्डाण आणि लँडिंग ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे, बिनचूक पार पाडावी लागते. त्यासाठी मोठी यंत्रणा काम करत असते. विमानतळावरचं लॉजिस्टिक्स आणि त्याचं व्यवस्थापन हाही एक अवाढव्य प्रकार असतो. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ आणि प्रत्यक्ष विमानातील वैमानिक या तिघांच्या समन्वयातून एक उड्डाण यशस्वी होते. अशी अक्षरश: हजारो उड्डाणं दररोज होत असतात. यात अगदी सेकंदासेकंदाच्या हिशेबाने कामं चाललेली असतात. एक बारीकशी चूक अनेक प्रवाशांच्या जिवाशी खेळ ठरू शकते. (नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताची आठवण या संदर्भात आल्याशिवाय राहत नाही.) एखादी गोष्ट जेवढी अधिक गुंतागुंतीची, तेवढी ती पार पाडण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसांची गरज लागते. अशा अनेक लोकांचा समूह एकत्र येऊन आपल्या बुद्धिसामर्थ्यावर व इतर विकसित कौशल्याच्या आधारावर विमानोड्डाणासारखं काम यशस्वी करून दाखवतो, तेव्हा मला त्या गोष्टीचं तीव्र आकर्षण वाटत राहतं.
विमानाचं उड्डाण ही मला आजही एक अद्भुत गोष्ट वाटते. आपणही पक्ष्यासारखं आकाशात तरंगत राहावं, हे माणसाचं कधीपासून स्वप्न होतं कोण जाणे. अमेरिकेच्या राइट बंधूंनी अखेर ते पूर्ण केलं, तो अगदी ताजा इतिहास. जेमतेम सव्वाशे-दीडशे वर्षांचा. मानवजातीच्या अस्तित्वाच्या कालखंडाशी तुलना केली तर ही प्रगती जेमतेम काही सेकंदांपूर्वी झालीय, असंच म्हणावं लागेल. प्रत्येक वेळी विमान आकाशाच्या अथांग पोकळीकडं झेप घेतं, तेव्हा माणसाच्या विजिगीषु वृत्तीला, त्याच्या प्रज्ञेला, त्याच्या जिद्दीला व अनंत ध्येयासक्तीला सलाम करावासा वाटतो. अगदी लहानपणी कधी आकाशातून उडणारं विमान पाहिलं, किंवा विमानाचा नुसता आवाज आला, तरी मी ते बघायला धावायचो. अगदी आजही, अनेकदा विमान प्रवास झाले असले तरीही, विमानाचा आवाज ऐकला की नजर आकाशाकडं जातेच. सुदैवानं पुण्यात मी जिथं राहतो, तिथून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) धावपट्टी अगदी जवळ आहे. एनडीएचं एक छोटं, दोन सीटर विमान जवळपास रोज सॉर्टीसाठी उड्डाण करतं. तेव्हा ते अगदी कमी उंचीवरून आमच्या घरावरून उडत जातं. ते मी न चुकता पाहतो. ते एवढ्या खालून जातं, की अनेकदा त्याच्या पंखांवर रोमन लिपीतून लिहिलेली NDA ही आद्याक्षरंही वाचता येतात. याच एनडीएच्या प्रांगणात वर्षातून दोन वेळा दीक्षान्त समारंभ होतात, तेव्हा सूर्यकिरण नामक पथकातील खास विमानांची प्रात्यक्षिकं होतात. ती बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये एकदा तरी बसून बघण्याचं माझं स्वप्न आहे. ते मात्र अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळंच तर मी कित्येकदा वैमानिकांच्या कॉकपिटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांतून चित्रित झालेले कित्येक टेकऑफ आणि लँडिंग पाहत असतो. अनेकदा पुष्कळ प्रवासीही विमानाच्या खिडकीतून दिसणारी कित्येक सुंदर दृश्यं टिपतात. तशी दृश्यं तुम्हाला एरवी स्वप्नातही बघायला मिळणं कठीण. उत्तर ध्रुवाच्या प्रदेशावरून विमान जात असतानाचं दृश्य, हिमालयाच्या शुभ्र पर्वतरांगांवरून जाताना दिसणारं दृश्य, एका विमानातून शेजारून चाललेल्या दुसऱ्या विमानाचं दृश्य, विमानाच्या खिडकीतून दिसणारे अथांग महासागर, ढगांचे कधी गोजिरवाणे, तर कधी भयावह दिसणारे अवाढव्य आकार, सूर्योदय, सूर्यास्त, वाळवंट, मोठमोठ्या नद्या... अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिडणारी अशी कित्येक दृश्यं अशा व्हिडिओंतून आपल्याला बघायला मिळतात. मला ते व्हिडिओ बघण्याचा अजिबात कंटाळा येत नाही. एकदा आपण तसे व्हिडिओ बघायला लागलो, की संबंधित समाजमाध्यमाद्वारे त्याच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपल्यासमोर आणले जातात. त्यातून आणखी वेगळे व्हिडिओ, वेगळी दृश्यं, कित्येक चित्तथरारक दृश्यचौकटी बघायला मिळतात.
वैमानिक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी विमान प्रवासाचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. मी माझ्या आयुष्यात पहिला विमान प्रवास केला तो वयाच्या ३१ व्या वर्षी. मुंबई ते बेंगळुरू असा तो प्रवास होता. विमानानं टेकऑफसाठी रनवेवर धावायला सुरुवात केली तेव्हा पोटात थोडा खड्डा पडल्यासारखं झालं. पण ते काही क्षणच. शरीराला एवढ्या प्रचंड वेगाची सवयच नव्हती. मात्र, पुढं मला काहीच त्रास झाला नाही व तो प्रवास अगदी एंजॉय केला. आभाळातून धरती कशी दिसते, ढगांचे पुंजके कसे विहरतात, लँडिंगच्या वेळी अगदी लहान लहान दिसणाऱ्या इमारती, घरं, शेतं हळूहळू मूळ रूपात कशी दिसू लागतात हे सगळं मी लहान मुलाच्या डोळ्यांनी अनुभवलं. लवकरच परदेश प्रवास करायचाही योग आला. आमच्या ऑफिसतर्फे थायलंड एका बिझनेस टूरवर जायला मिळालं. तो प्रवासही मोठा होता. समुद्रावरून होता. तो एक वेगळाच अनुभव होता. शिवाय एकट्याने केलेलाही तो पहिलाच परदेश प्रवास होता. आपण कधी विमानात बसू, परदेशात जाऊ असं मला लहानपणी कधीही वाटलं नव्हतं. मात्र, सुदैवानं आपल्या देशात अनेकांची ही (आता छोटी छोटी म्हणता येतील, अशी) स्वप्नं जशी पूर्ण झाली, तशी ती माझीही झाली. त्यानंतर एकदा सिंगापूरची सहल झाली. त्या वेळी ‘बोइंग ए ३८०’ या महाकाय, डबलडेकर जंबोजेटमध्ये बसण्याचंही स्वप्न पूर्ण झालं. मात्र माझं खरं स्वप्न होतं ते लंडनला जाण्याचं. पुलंचं ‘अपूर्वाई’ वाचल्यापासून मला लंडन शहराला भेट देण्याची ओढ लागली होती. अमेरिका किंवा इतर कुठल्याही देशापेक्षा मला लंडनला जावंसं वाटत होतं. का ते माहिती नाही. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता दिसत नव्हती. अखेर काही वर्षांपूर्वी तशी संधी मिळाली व मी कुटुंबासह फक्त लंडन व पॅरिस या दोनच शहरांना भेट देणारी छोटेखानी (पण तरीही बरीच खर्चीक) सहल बुक केली. मात्र, हाय रे दुर्दैवा! त्या वेळी कोव्हिडची साथ सुरू झाल्याने ती ट्रिपच बारगळली. लंडनचं स्वप्न अधुरंच राहिलं. मात्र, माझी इच्छाशक्ती तीव्र होती. त्यामुळं अखेर २०२३ च्या ऑगस्टमध्ये लंडनवारी करता आली. प्रवासी कंपनीकडून टूर न घेता, आम्ही आमची आमची ही सहल केली. लंडनमध्ये माझा मेव्हणा राहत असल्यानं तिथं राहण्याचा प्रश्न नव्हता. उलट या आठ दिवसांत मनाजोगतं शहर भटकता आलं. खूप वर्षांपासूनचं एक स्वप्न पूर्ण झालं.
जगातील किमान दहा मोठी शहरं बघायची असंही एक स्वप्न आहे. त्यातली निदान दोन ते तीन बघून झाली आहेत. इतरही होतील, अशी आशा आहे. याशिवाय इतर लहान-मोठ्या स्वप्नांचीही ‘बकेट लिस्ट’ बरीच मोठी आहे. सगळीच स्वप्नं पूर्ण होत नाहीत हे माहिती आहे. मात्र, पूर्ण होणार नाहीत म्हणून ती स्वप्नात बघण्याचं सुख का गमवायचं, नाही का?
---
(पूर्वप्रसिद्धी : समदा दिवाळी अंक, २०२५. संपादक - मनस्विनी प्रभुणे-नायक)
---

