4 Jul 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - घनचक्कर

क्रेझी लॅड...


काही काही सिनेमे नक्की कोणत्या प्रकारात मोडतात, हे सांगणं काहीसं अवघडच. घनचक्कर या सिनेमाचा जॉनर सांगणं तसंच आहे. त्यातल्या त्यात कॉमेडीचा तडका मारलेला क्राइम थ्रिलर असं या सिनेमाचं वर्णन करता येईल. राजकुमार गुप्तानं या चित्रपटात गोष्ट सांगण्याची पद्धत नेहमीचीच ठेवली असली, तरी शेवट मात्र वेगळा केला आहे. मूल्यांच्या संदर्भात हा शेवट पारंपरिक चौकटीतलाच असला, तरी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पारंपरिक चौकटीतला नक्कीच नाही. हे थोडं कोड्यातलं सांगणं होतं आहे. मात्र, सिनेमाचा रहस्यभेद करता येत नसल्यानं ही कोडवर्डी भाषा समजून घेता येईल, अशी आशा आहे.
संजय अत्रे (इम्रान हाश्मी) या मुंबईतल्या तरुणाच्या आयुष्यातल्या तीन महिन्यांची ही गोष्ट आहे. संजू व्यवसायाने तिजोरीफोड्या आहे. मात्र, त्यानं हा धंदा आता सोडून दिला आहे. असं असतानाही एक तोंडाला पाणी सोडणारी ऑफर त्याला आली आहे. ती पूर्ण केली तर त्याला किमान दहा कोटी मिळणार आहेत. पंडित व इद्रिस (राजेश शर्मा व नमित दास) या दोन चोरांच्या मदतीनं संजू ही कामगिरी फत्ते करतो. चोर तीस कोटींची बॅग संजूकडं ठेवायला देतात आणि तीन महिन्यांनी सर्व वातावरण शांत झाल्यावर त्याच्याकडं येऊन पैसे घेण्याचं ठरवतात. तीन महिन्यांनंतर चोर संजूला फोन करतात. मात्र, संजू त्यांना ओळखतच नाही. ते हादरतात. संजूला पकडून ठार मारायचा बेत आखतात. शेवटच्या क्षणी संजू त्यांना सांगतो, की त्याला अपघात झाल्यानं विस्मरणाचा आजार जडलाय. चोर हॉस्पिटलमध्ये जाऊन संजूला खरंच हा आजार झाल्याची खात्री करून घेतात. या आजारामुळं संजूला आपण पैशांची बॅग कुठं ठेवलीय हेच आठवत नसतं. या कथेत आणखी एक अत्रंगी पात्र आहे. ती म्हणजे संजूची पंजाबी, फॅशनवेडी बायको - नीतू (विद्या बालन). अखेर पैशांची वसुली करण्यासाठी चोर संजूच्याच घरी मुक्काम ठोकतात आणि त्याला सात दिवसांची मुदत देतात. त्यानंतर उडणारी पळापळ म्हणजे घनचक्कर.
हा प्लॉट तर मस्तच आहे. त्यात विनोदनिर्मितीच्या, फार्सच्या, रहस्याच्या, गुंतागुतीच्या  उपकथानकाच्या अनेक शक्यता दडल्या आहेत. राजकुमार गुप्तानं त्या सर्वच चाचपून पाहण्याचं ठरवलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच दाखवलेल्या काही दृश्यमालिकेत आणि त्या मालिकेच्या पुनरुक्तीत काही रहस्यं दडली आहेत. मुख्य पात्राला विस्मरण होणं ही बाब दिग्दर्शक त्याच्या हुशारीनुसार कशीही वापरू शकतो. राजकुमार गुप्तानंही ती हुशारी दाखविली आहे. संजूला काही गोष्टी आठवत असतात, तर काही आठवत नसतात. यामुळं संजूविषयी कायमच एक संशयाचं वातावरण प्रथमपासूनच निर्माण होतं. त्यात नीतूची पैशांची आवड आणि संजूचा जीवलग मित्र उत्तम (प्रवीण डबास) याचं एक उपकथानक गुंफून त्यानं संशयाची सुई आणखी काही पात्रांकडं वळविली आहे. ती बॅग कुठं गेली, हेच या सिनेमातलं मुख्य रहस्य असून, ते दिग्दर्शकानं शेवटपर्यंत चांगलं निभावलं आहे. विस्मरण झालेल्या नायकाचं आयुष्य दाखविण्यासाठी दृश्यमालिकांची पुनरुक्ती आणि काही दृश्यांची साखळी यांचा गोफ दिग्दर्शकानं बऱ्यापैकी विणला आहे. संजूचं घर आणि विरार फास्ट लोकल या सिनेमातल्या दोन महत्त्वाच्या नेपथ्यरचना आहेत. त्यातच बहुतांश घटना घडतात आणि रहस्याची उकलही यापैकी एका स्थळावरच होते. मधल्या काळात चोर आणि नीतू यांच्यातील काही विनोदी घटना दिग्दर्शकानं पेरल्या आहेत. त्यांचा रिलीफ म्हणून चांगला वापर होतो. संवाद अतिशय चटपटीत आणि दाद देण्याजोगे झाले आहेत. त्यातही जेवणाच्या टेबलवरचे संवाद आणि गजनीबाबतचा संवाद यांचा उल्लेख करता येईल.
सिनेमाचं संकलन अव्वल दर्जाचं आहे. विशेषतः क्लायमॅक्सच्या वेळी धावत्या रेल्वेचा वेग आणि डब्यात घडणाऱ्या घटनांचा वेग चांगला पकडला आहे.
इम्रान हाश्मीनं विसरण्याचा आजार जडलेला तरुण चांगला उभा केला आहे. अभिनेता म्हणून त्याच्यातली परिपक्वता वाढत चालल्याचं हे निदर्शक आहे. सदैव ताणाखाली वावरणारा, पण क्वचित स्वतःच्या वागणुकीबाबत संशय उत्पन्न करणारा संजू त्यानं ताकदीनं साकारला आहे. विद्या बालननं पंजाबी पत्नी नेहमीच्याच झोकात उभी केली आहे. फॅशनचं वेड असलेली, मासिकं वाचून त्याप्रमाणे कपडे घालणारी, सलवार-कमीजचा तिरस्कार करणारी, नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, वेळप्रसंगी चोरांना बडवून काढणारी तिची नीतू अतिशय गोड. या भूमिकेसाठी तिनं वाढवलेलं वजनही दिसत राहतं.
राजेश शर्मा आणि नमित दास यांच्या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. किंबहुना हाश्मी-बालन यांच्याएवढंच फुटेज या दोघांना आहे. त्यांनीही पंडित व इद्रिस ही दोन चोर पात्रं झकास उभी केली आहेत.
लेझी लॅड हे ममता शर्माचं गाणं यापूर्वीच लोकप्रिय झालं आहे. पण सिनेमात ते हाश्मी-बालन जोडीवर चित्रित झालेलं नाही, तर टायटल क्रेडिटला अॅनिमेशनवर येतं. तेवढी एक निराशा सोडली तर हा वेगळ्या पद्धतीचा थ्रिलर एकदा नक्की पाहायला हरकत नाही.

निर्मिती - यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - राजकुमार गुप्ता
संगीत - अमित त्रिवेदी
प्रमुख भूमिका - इम्रान हाश्मी, विद्या बालन, राजेश शर्मा, नमित दास
दर्जा - ***

---
(पूर्वप्रसिद्धी - २९ जून, मटा, पुणे)

No comments:

Post a Comment