8 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हँसी तो फँसी

पाहाल तर हसाल...
----------------------- 
 
फर्स्ट थिंग फर्स्ट. विनिल मॅथ्यू दिग्दर्शित ‘हँसी तो फँसी’ हा एक अवखळ, खेळकर अन् निखळ प्रसन्न असा सिनेमा आहे. सध्याच्या ताण-तणावाच्या काळात दोन तास साधं-सरळ मनोरंजन करणाऱ्या आणि त्याचबरोबर कुठं तरी मनाला भिडणाऱ्या अशा कलाकृतींची फार गरज आहे. हँसी तो फँसी ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतो. सुमारे १४१ मिनिटांच्या या प्रेमळ खेळात कुठंही एक सेकंदभरही कंटाळा येणार नाही, याची शंभर टक्के तजवीज करतो. तेव्हा ‘पाहाल तर हसाल...’ असं या सिनेमाबाबत खात्रीनं सांगता येईल.
आपला पहिलाच सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या विनिलनं या साध्या-सोप्या गोष्टीची हाताळणीही तशीच साधी-सरळ केली आहे. विषय तोच असला, तरी त्याला नावीन्याचा टवटवीतपणा आहे. आपल्या इवल्याशा आयुष्यात आपण आपल्याच हाताने किती प्रॉब्लेम करून ठेवतो. आपल्या जीवाभावाच्या माणसांशी भांडतो, अबोला धरतो, दुरावा निर्माण करतो. साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करून ठेवतो. त्याऐवजी आयुष्य खूप छान आहे, ते देवानं तुम्हाला जसं दिलं आहे तसं मस्त, हसत-खेळत जगा, असा खूप सकारात्मक संदेश हा सिनेमा (तसा कुठलाही संदेश देण्याचा आविर्भाव न आणता) सुरेख पद्धतीनं देतो.
सिनेमा या कलाकृतीचा जीव तिच्या कथेत, पटकथेत, संवादात आणि मग कलाकारांच्या अभिनयात असतो. विनिलनं या सर्व टप्प्यांवर उत्तम काम केलं आहे. हर्षवर्धन कुळकर्णीची कथा आणि पटकथा मुळात दमदार आहे. यात अगदी छोटीशी व्यक्तिरेखाही सशक्तपणे लिहिली गेली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला तिच्या अस्तित्वाचं प्रयोजन आहे. त्यामुळं ही छोटी छोटी पात्रंही सिनेमा घट्ट विणीसारखा बांधून ठेवतात.
निखिल (सिद्धार्थ) आणि मिता (परिणीती चोप्रा) या दोघांची ही गोष्ट आहे. निखिलचं लग्न मिताच्या बहिणीशी - करिश्माशी (अदा शर्मा) ठरलं आहे. त्यापूर्वीच त्याची मिताशी भेट होते. मिता आपल्या होणाऱ्या बायकोची बहीण आहे, हे त्याला अर्थातच माहिती नाही. मिता घराबाहेर का पडली आहे, याचीही एक मोठी कहाणी आहे. प्रत्यक्ष भेटीत वेड्यासारखं वागणारी, ड्रग अॅडिक्ट भासणारी, चित्र-विचित्र तोंडं करणारी, मध्येच मँडरिन भाषेत बोलणारी ही मुलगी प्रत्यक्षात आयआयटीची केमिकल इंजिनीअर आहे, हे कळल्यावर निखिलला अर्थातच धक्का बसतो. मिताच्या आयुष्यात काही पेच निर्माण झालेला असतो. तिचा पेच सोडवता सोडवता निखिलही तिच्यात गुंतत जातो.
जाहिरात क्षेत्राकडून सिनेमा दिग्दर्शनाकडं वळलेल्या विनिलनं, आपले दोन्ही नायक-नायिका पहिल्यापासूनच कसे वांड आहेत, हे दाखवण्यासाठी १९९२ मधील दोघांच्या घरातील एका प्रसंगाची सुरुवातीलाच योजना केली आहे. त्यानंतर २००६ मध्ये तरुण झाल्यानंतर हे दोघं पहिल्यांदा कसे भेटतात, तो प्रसंग येतो. त्यानंतर थेट सात वर्षांनी गोष्ट पुढं जाते आणि मग आजच्या काळात सुरू होते. असं असलं, तरी प्रमुख व्यक्तिरेखांसह दोघांच्या घरच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा वावर यांना दिग्दर्शक बऱ्यापैकी वाव देतो आणि त्यामुळं एखादी कादंबरी उलगडत जावी, तसतसं या गोष्टीतलं नाट्य उलगडत जातं. संपूर्ण सिनेमाला विनोदाचं एक प्रसन्न नेपथ्य आहे. परिणीतीचं सुरुवातीचं वागणं, निखिलचे मित्र, त्यांच्या गमतीजमती यातून हा हसरा झरा खळाळत वाहत राहतो. हाराच्या चोरीचा प्रसंग आणि परिणीतीनं वठवलेलं सीआयडीचं बेअरिंग हा संपूर्ण सीनच हास्यस्फोटक झाला आहे. परिणीती सर्वांना कपडे खरेदीला घेऊन जाते, तो प्रसंगही जमलेला. या सिनेमात दिग्दर्शकानं दाखवलेल्या मुंबईचा खास उल्लेख करायला हवा. मुंबईतला पाऊस, तिथले ओले रस्ते, समुद्र, चाळी, टोलेजंग इमारती, टॅक्सी, लोकल, विमानतळ ते कोपऱ्यावरची वडापावची गाडी इथपर्यंतच्या मनमौजी मुंबईची सफर मस्तच.
 मूळ कथा आणि त्यानंतर पटकथेची बांधणी घट्ट आणि नेटकी असल्याचा हा परिणाम. त्यानंतर येणारी बाब म्हणजे प्रमुख कलाकारांचा अभिनय. सिद्धार्थ आणि परिणीती या दोघांनीही छानच काम केलं आहे. विशेषतः परिणीतीनं तर हा सिनेमा खाऊन टाकला आहे, असं म्हटलं तरी चालेल. एवढा सहज अभिनय करणारी, बोलक्या डोळ्यांची ही लहान चणीची अभिनेत्री मोठ्या क्षमता बाळगून आहे, यात शंका नाही. या सिनेमात तिनं घेतलेलं सिनिकल बेअरिंग आणि सिद्धार्थशी मैत्री झाल्यानंतर त्याच्यासमोर उलगडत जाणारी खरी मिता तिनं फार सुंदर सादर केली आहे. सिद्धार्थ हा उमदा, देखणा तरुण अभिनेता निखिलच्या भूमिकेत छान शोभून दिसला आहे. या दोघांना अदा शर्मा, नीना कुळकर्णी, शरद सक्सेना, मनोज जोशी आदींनी उत्तम साथ दिली आहे.
सिनेमात काही वाईट बाबी अर्थातच आहेत. विशेषतः मिता आणि तिचे वडील यांच्या काही प्रसंगांत तर तर्काला पूर्ण फाटा दिल्यासारखा वाटतो. शिवाय शेवटही अगदीच फिल्मी. पण या त्रुटींकडं डोळेझाक करून आवर्जून पाहावी, अशीच ही प्रसन्न विनोदी गोष्ट आहे.
----
 निर्माते : करण जोहर, अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी
दिग्दर्शक : विनील मॅथ्यू
कथा-पटकथा : हर्षवर्धन कुलकर्णी
संगीत : विशाल-शेखर
पार्श्वसंगीत : अमर मंगरुळकर
प्रमुख भूमिका : परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज जोशी, अदा शर्मा, शरद सक्सेना, नीना कुळकर्णी, समीर खक्कर आदी.
दर्जा : *** १/२

---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे. ८-२-२०१४)
----

No comments:

Post a Comment