15 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - गुंडे

थोडा कोळसा, पण बराचसा हिरा...
 ----------------------------------------
साचेबद्धपणा किंवा पठडीबाजपणा (ज्याला इंग्रजीत क्लिशे म्हणतात) याला जर कोळसा म्हटलं, तर ‘गुंडे’ या नव्या हिंदी सिनेमात दिग्दर्शक अली अब्बास जफरनं तो भरपूर उगाळला आहे. इतका, की ऐंशीच्या दशकातल्या सिनेमासारखा सिनेमा काढून दाखवा, अशी कुणी स्पर्धा ठेवली असती, तर जफरच्या या सिनेमानं नक्कीच पहिला नंबर मिळवला असता. पण ‘गुंडे’चा विशेष हा, की तो या पठडीबाजपणाच्या घासाघाशीतून पुढं जातो. चांगली पटकथा, खटकेबाज संवाद, खणखणीत अभिनय, ठेकेदार संगीत, प्रेक्षणीय सिनेमॅटोग्राफी या मूलभूत गोष्टींवर काम केल्यानं आणि त्या जमून आल्यानं या उगाळलेल्या कोळशाच्या खाणीतून एका चांगल्या कलाकृतीचा हिरा बाहेर पडतो.
‘गुंडे’ची गोष्ट आहे विक्रम (रणवीरसिंह) आणि बाला (अर्जुन कपूर) या दोन जीवश्चकंठश्च मित्रांची. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तियुद्धानंतर तेथून कलकत्त्यात आलेल्या अनेक निर्वासित मुलांपैकी ही दोन मुलं. मात्र, दोघांच्याही अंगात रगेलपणा आणि मस्ती पुरेपूर. कलकत्त्यात आल्यानंतर कोळशाच्या रूपानं त्यांना जगण्याचा मार्ग सापडतो आणि त्या जीवावर हे दोघं त्या महानगरातले सर्वांत मोठे गुंड बनतात. १९७३ च्या ‘जंजीर’पासून ते १९८७ च्या ‘मि. इंडिया’पर्यंत त्यांचा बालपण ते तरुणपणाचा प्रवास घडतो. (या दोन्ही सिनेमांचे सूचक संदर्भ यात आहेत.) या काळात देशातील आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितीही एखाद्या कोळशाच्या भट्टीसारखीच अखंड धगधगती होती. ‘गुंडे’मधल्या प्रत्येक प्रसंगाला या स्थितीचं पूरक व पुरेसं बोलकं नेपथ्य आहे. बांगलादेश युद्धातील विजयानंतर देशाभिमानाचं वारं जोरदार होतं. तिथपासून ते ऐंशीच्या दशकातल्या अशांत, विस्फोटक स्थितीपर्यंत या सिनेमातल्या प्रमुख पात्रांचाही प्रवास घडतो. या दोघांच्या दोस्तीत फूट पाडणारी एक नायिका येते. या दोघांच्या मागावर असलेला एक पोलिस अधिकारी अवतरतो. त्यानंतर उंदीर-मांजराच्या खेळाचाच एक वेगळा अवतार दाखवीत पुढचा सिनेमा पार पडतो.
क्लिशेचा उल्लेख वर झालाच आहे. या सिनेमाच्या लेटरिंगपासून ते पहिल्या अर्ध्या तासाचा भाग पाहताना, दिग्दर्शकाच्या मनावर असलेली ‘शोले’ची तीव्र पकड लक्षात येते. विशेषतः रेल्वेतल्या मारामारीचे प्रसंग पाहताना तर हे प्रकर्षानं जाणवतं. त्यानंतरही अनेक हिंदी सिनेमांत पाहिलेले प्रसंग आणि त्यांच्या नकला एकेक करून समोर येऊ लागतात. कलकत्त्यात सिनेमा घडत असल्यानं अगदी ‘परिणीता’पासून ते ‘कहानी’ ते ‘बर्फी’पर्यंत आणि धनबादमध्ये एक भाग घडताना ‘काला पत्थर’पासून ते ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत सर्व सिनेमांची भेळ पाहत असल्यासारखं वाटायला लागतं. अगदी मध्यंतराची टिपिकल स्टाइल आणि शेवटाकडे नायिकेबाबत होणारा गौप्यस्फोट हे सगळं सराइत प्रेक्षक अगदी सहज ओळखू शकतो. पण हा अखंड क्लिशेचा मारा ठेवूनही हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवील, एवढी काळजी दिग्दर्शकानं घेतल्यानं पैसे वसूल झाल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण म्हणजे चांगल्या पटकथेसोबत दिग्दर्शकानं प्रमुख पात्रांवर केलेलं काम. रणवीर, अर्जुन, इरफान आणि प्रियांका चोप्रा या चौघांनीही जबरदस्त काम करून हा सिनेमा तोलला आहे. विशेषतः रणवीर आणि प्रियांका यांचा परफॉर्मन्स झकास झाला आहे. त्यामुळं तोचतोचपणा असूनही सिनेमा कंटाळवाणा होत नाही. 

 विक्रम आणि बाला यांच्यातील मैत्रीचा घट्ट धागा हाही या सिनेमाचा कणा आहे. हा धागा अगदी सुरुवातीच्या प्रसंगात लहानग्या विक्रमला बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याच्या लैंगिक शोषणापासून बाला वाचवतो, तेथपासून ते शेवटच्या दृश्यापर्यंत कायम राहतो. हे दोघंही परिस्थितीवश गुंड झालेले असतात आणि मूलतः ते निर्मळ मनाचे, अगदी लहान मुलांसारखे निरागस असतात म्हणे. अर्थात हे एकदा म्हणून झालं, की गुंडांचे बाकी सर्व ‘नाजायज’ उद्योग दाखवायला सिनेमावाले मोकळे होतात. अब्बास जफरनं या सिनेमातही हेच केलंय. अर्थात शेवटी गुंडांचं निर्दालन होतंच, तो भाग वेगळा.
या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची आहे. कोळसा हा सर्व कथानकाच्या पार्श्वभूमीवर येत असल्यानं काळा आणि प्रेमाचा, हाडवैराचा आणि पराकोटीच्या पॅशनचा रंग म्हणून लाल (रक्तवर्णी) हे दोन रंग पडद्यावर प्राधान्यानं दिसत राहतात. याला आगीच्या धगीचा पिवळा रंग जोड म्हणून येतो. ही अफलातून रंगसंगती या सिनेमाला ‘एक्सेप्शनली’ प्रेक्षणीय बनवते. याशिवाय सोहेल सेनचं ठेकेदार संगीत आहे. त्यातही ‘दिल की बजी घंटी यार’ हे गाणं जमलेलं आहे. या गाण्यातील बॉस्को-सीझरची कोरिओग्राफी अफलातून आहे. विशेषतः त्यातली ती घंटी हातात घेऊन लेझीमसारखी घेतलेली स्टेप एकदम खास!
रणवीर आणि अर्जुन या दोघांचीही कामं चांगली आहेत. त्३यातही रणवीर अधिक प्रभावी आहे. अर्जुन अजून थोडा तयार व्हायचा आहे. पण त्याचे प्रयत्न चांगलेच आहेत. प्रियांका या सिनेमात नेहमीपेक्षा अधिक छान दिसली आहे. तिची वेशभूषाही अप्रतिम आहे. दिल की घंटी गाण्यात तिघांनीही केलेला डान्स मस्त आहे. इरफान यांनी साकारलेला ‘सत्यजित सरकार’ नेहमीप्रमाणे झकास. पण त्याला ‘स्पेशल अॅपिअरन्स’ का म्हटलं आहे, कुणास ठाऊक!
थोडक्यात, हा ‘गुंडे’ एकदा पाहायला हरकत नाही.
---
निर्माता : यशराज फिल्म्स
दिग्दर्शक : अली अब्बास जफर
संगीत : सोहेल सेन
सिनेमॅटोग्राफी : असीम मिश्रा
प्रमुख : रणवीरसिंह, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा, इरफान, सौरभ शुक्ला
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १५ फेब्रुवारी २०१४)
----

No comments:

Post a Comment