‘शहर’ नावाचा चक्रव्यूह
-----------------------------
दूर राजस्थानातून मुंबईसारख्या महानगराच्या
चक्रव्यूहात शिरणाऱ्या एका ‘अभिमन्यू’ची एक अत्यंत संवेदनशील, तरीही रंजक
कथा दिग्दर्शक हंसल मेहतानं ‘सिटीलाइट्स’च्या रूपानं सादर केली आहे. शॉन
एलिसच्या ‘मेट्रो मनिला’ या सिनेमावर ‘सिटीलाइट्स’ आधारित आहे. (म्हणजे
रीतसर फ्रेम टु फ्रेम रिमेक आहे.) गोष्टीचं रंजनमूल्य कायम ठेवून,
पात्रांच्या अंतःकरणातले सर्व पापुद्रे सोलवटून दाखवण्याची किमया
दिग्दर्शकानं यात साधली आहे. गोष्टीतलं मध्यवर्ती सूत्र व्यक्तिकेंद्री
ठेवूनही तिला प्रतीकात्मक, व्यापक आशय देण्यात मेहता यशस्वी झाले आहेत.
त्यामुळंच काही त्रुटी असल्या, तरी ‘सिटीलाइ्टस’ हा मेंदूला खाद्य देणारा
एक सुखद अनुभव ठरतो.
जगात सर्वच ग्रामीण भागातून शहरांकडे, कमी
विकसित भागाकडून विकसित महानगरांकडे नागरिकांचा लोंढा वाहत असतो. हे
स्थलांतर सोपं नसतं. एक आख्खी पिढी, एक संस्कृती यात खर्ची पडत असते. त्या
स्थलांतराची वेळ आलेल्या व्यक्तिविशेषांवर तर फारच बिकट प्रसंग आलेला असतो.
एखादं जुनं झाड मुळासकट उपटून दुसरीकडं रुजवण्याचा प्रयत्न करण्याएवढंच हे
अवघड असतं. हा संघर्ष अस्सल असतो; त्या त्या पिढीच्या मूल्यांची,
नीतिमत्तेची, तत्त्वनिष्ठेची परीक्षा पाहणारा असतो. पोटात आग पडलेली
असताना, डोक्यावर छत नसताना, कुठलाच आसरा नसताना जगणं टिकवायचं असतं.
त्यासोबत जन्मापासून आलेल्या सर्व रुढी-परंपरांची, तथाकथित प्रतिष्ठेची बूजही
राखायची असते. हा सनातन झगडा ज्यांच्या वाट्याला येतो, त्यांची त्यात पार
होरपळ होते. शहर नावाच्या चक्रव्यूहात अनेक जण शिरतात. पण त्यातून बाहेर
पडणं त्यांना कधीच जमत नाही. अशी हजारो, लाखो माणसं गिळून, त्यांचं
‘शहरवासीय’ नावाच्या एका बिनचेहऱ्याच्या महान गर्दीत रूपांतर करण्याचं काम
‘महानगर’ नावाची चेटकीण वर्षानुवर्षं करीत आली आहे. तिचा हा भेसूर चेहरा
सर्वांनाच दिसतो; पण आपला चेहरा नाहीसा झाल्यानं तो दिसूनही काहीच करता येत
नाही. तिला शरण जाऊन, पोटासाठी तिच्याच पोटात आश्रय घेऊन, जगणं धुंडाळायची
पाळी सर्वांवर येते.
हा संघर्ष अनेक प्रतिभावंतांना प्रेरणा देत आला
आहे. २०१३ मध्ये आलेल्या शॉन एलिसच्या ‘मेट्रो मनिला’त (फिलिपिन्सच्या
राजधानीसाठी रूढ असलेला शब्द म्हणजे ‘मेट्रो मनिला’) हा संघर्ष दिसतो. हंसल
मेहतानं त्याला भारतीय रूपडं देऊन ‘सिटीलाइट्स’ सादर केला आहे. तिथला
ऑस्कर रामीरेझ इथं राजस्थानातला दीपकसिंह (राजकुमार राव) झाला आहे. माई
रामीरेझ इथं राखी (पत्रलेखा) झाली आहे. तिथला आँग इथं विष्णू (मानव कौल)
झाला आहे. कर्जाच्या विळख्यात बुडालेल्या दीपकचं दुकान जप्त होतं. त्यामुळं
पोटापाण्यासाठी महानगरी मुंबईचा रस्ता धरण्याचा निर्णय तो घेतो आणि बायको व
मुलीसह मुंबईत येतो. दाखल झालेल्या दीपकला शहरातील फसवणुकीचा फटका
प्रारंभीच बसतो. अखेर त्याला एका खासगी सिक्युरिटी कंपनीत विष्णूच्या
मदतीनं नोकरी लागते. या विष्णूला एका कामासाठी हवा असाच माणूस दीपकच्या
रूपानं मिळतो. काय असतं त्याचं काम? राखी काय करते? या कुटुंबाचं पुढं काय
होतं, हे प्रत्यक्षच पाहायला हवं.
हंसल मेहतांनी हा संघर्ष चांगला रंगवला असला,
तरी दोन तासांच्या या सिनेमात काही क्षण कंटाळवाणे येतात. विशेषत:
पूर्वार्धात. मुंबईत आल्यानंतर ज्या पद्धतीनं हे कुटुंब फसतं आणि स्वतःचे
सर्व पैसे घालवून बसतं, ते पटत नाही. उलट शहरी माणसांपेक्षा ग्रामीण
भागातील माणसं अधिक चतुर असतात. त्यांच्याकडं व्यावहारिक शहाणपण अधिक असतं.
पण एखाद्या परदेशी सिनेमाची कथा ‘जशीच्या तशी’ सादर करताना हे दुवे
दिग्दर्शकाकडून निसटले असावेत. शिवाय दीपकला आपली पत्नी डान्सबारमध्ये
कामाला जाते, हे आधी कसं कळत नाही? तो स्वतः विष्णूबरोबर जेव्हा तिथं जातो
तेव्हाच त्याला हे कळतं. हेही पटत नाही. कारण त्याआधी एकदा त्यानं पत्नीला
‘पैसे कुठून आणलेस,’ असं विचारलेलं असतं. त्यावर ती रडते आणि तो प्रसंग
तिथंच संपतो. शिवाय क्लायमॅक्स अगदीच अतर्क्य नसला, तरी ‘फिल्मी’ आहे.
तोपर्यंत कथेनं राखलेलं एक जिवंतपण, सच्चेपण या शेवटामुळं मार खातं, असं
वाटून जातं. शिवाय या सिनेमाच्या ‘लूक’मध्येही प्रॉब्लेम आहे. अनेक
फ्रेममधील लाइट आणि एकूणच त्या फ्रेमची रचना मार खाणारी झाली आहे.
या त्रुटी असल्या, तरी राजकुमार राव या
अभिनेत्यासाठी हा सिनेमा पाहावा. यापूर्वी राव-मेहता जोडीनं ‘शाहिद’साठी
सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार
पटकावलेला आहेच. या सिनेमातही राजकुमार रावनं कमाल केली आहे. दीपकसिंहची
भूमिका त्यानं खूपच तन्मयतेनं साकारली आहे. कर्जात बुडालेला, कुटुंबाची
काळजी असलेला, सुरुवातीला सदैव खांदे पाडून चालणारा, नंतर सूडाच्या भावनेनं
पेटून उठलेला असा दीपक रावनं जबरदस्त उभा केला आहे. पत्रलेखा या नवोदित
अभिनेत्रीचं कामही उल्लेखनीय. विशेषतः डान्सबारमध्ये नोकरी मागायला
जाण्याचा प्रसंग आणि मोबाइलवरील गाण्यावर नृत्य करायला लागण्याचा करुण
प्रसंग तिनं फारच प्रभावीपणे साकारला आहे. हल्ली हिंदी सिनेमांत
नायक-नायिकांची शारीर जवळीक अफाट असते आणि याही सिनेमात सुरुवातीलाच तो
प्रसंग दाखवून दिग्दर्शकानं आपला एक ‘केआरए’ पूर्ण केला आहे. पत्रलेखाही या
रोमँटिक चुंबनदृश्यात अत्यंत सहजरीत्या वावरली आहे. असो. या सिनेमातलं खरं
सरप्राइज पॅकेज ठरला आहे तो मानव कौल. दीपकला नोकरी देणाऱ्या विष्णू या
सुपरवायझर सिक्युरिटी ऑफिसरच्या भूमिकेत मानवला खूपच फुटेज मिळालं आहे आणि
त्यानंही हा रोल चांगला साकारला आहे. नायकाचा मित्र ते (जवळपास) खलनायक अशी
चांगली रेंज त्याला मिळाली आहे.
सिनेमाला संगीत जित गांगुली यांचं संगीत आहे.
‘सोने दो’ हे गाणं लक्षात राहतं. बाकीचीही गाणी चांगली असली, तरी ती अनेकदा
मध्येच येऊन रसभंग करतात. त्यांचं प्रमाण कमी ठेवायला हवं होतं.
एक चांगली गोष्ट म्हणजे, परकीय सिनेमावरून थेट
ढापण्यापेक्षा भट्ट मंडळींनी ‘मेट्रो मनिला’चे रीतसर हक्क घेऊन आणि
सिनेमाच्या नामावलीत मूळ सिनेमाचं श्रेय देऊन प्रेक्षकांप्रती पुरेशी
पारदर्शकता राखली आहे.
थोडक्यात, एक वेगळा, डोक्याला झिणझिण्या आणणारा
अनुभव घ्यायचा असल्यास या सिनेमाच्या वाट्याला जावं. ज्यांनी ‘मेट्रो
मनिला’ पूर्वीच पाहिला आहे, त्यांनीही किमान राजकुमारसाठी एकदा हा सिनेमा
पाहायला हरकत नाही.
---
निर्माता : मुकेश भट्ट
दिग्दर्शक : हंसल मेहता
पटकथा : रितेश शाह
संगीत : जित गांगुली
प्रमुख कलाकार : राजकुमार राव, पत्रलेखा, मानव कौल
कालावधी : दोन तास सहा मिनिटे
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ३१ मे २०१४)
---
No comments:
Post a Comment