30 Aug 2015

रिव्ह्यू - हायवे : एक सेल्फी आरपार
स्वतःकडे नेणारा महामार्ग
-------------------------------


उमेश कुलकर्णी हा श्वासोत्तर मराठी सिनेमाच्या प्रमुख बिनीच्या शिलेदारांपैकी एक महत्त्वाचा चित्रकर्मी आहे. वळू, विहीर आणि देऊळ या त्याच्या तिन्ही मराठी चित्रपटांतून त्यानं स्वतःची अशी एक खास चित्रभाषा, शैली विकसित केली आहे. लेखक गिरीश कुलकर्णी त्याचा या प्रक्रियेतील महत्त्वाचा जोडीदार. त्यामुळंच या जोडगोळीचा नवा सिनेमा येतोय म्हटल्यावर अनेकांना त्याची उत्सुकता लागलेली असते. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चित्रपटातून काही तरी महत्त्वाचं, सकस असं आशयसूत्र गवसेल, अशी अनेकांना अपेक्षा असते. हायवे - एक सेल्फी आरपार हा त्यांचा नवा चित्रपट या दृष्टीनं आपली निराशा करीत नाही. किंबहुना उमेश-गिरीश यांच्या आधीच्या वाटचालीकडं पाहता, ती शैली आणि तो आशय पुढं नेणारीच कलाकृती त्यांच्याकडून तयार झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
मुंबईकडून पुण्याला निघालेली वेगवेगळ्या स्वभावाची, वयाची, पेशाची माणसं आणि त्यांचा एकाच वेळी सुरू असलेला, पण तरीही एकमेकांशी अनभिज्ञ असलेला प्रवास आणि अचानक या वेगवान प्रवासात खंड पडल्यानंतर त्यांचं थबकणं आणि त्यातून स्वतःकडं त्यांचा वेगळा प्रवास सुरू होणं ही या चित्रपटाची वनलायनर सांगता येईल. चित्रपटाचा प्रारंभ होतो तो एका वैशिष्ट्यपूर्ण फ्रेममधून. मुंबईत चाळीत राहणारा एक तरुण मुलगा बाहेर पडतो आहे, आणि तो चाळ सोडून रस्त्यावर येतोय तेव्हा मागे एक टोलेजंग इमारत जणू त्या चाळीला विळखा घालून तिचा घास घ्यायला टपलेली अशी. या एकाच दृश्यचौकटीमधून दिग्दर्शक किती तरी गोष्टी न बोलता सांगून जातो. 


महानगरांमधले वेगवान बदल, त्यात राहणाऱ्या लोकांचं बदललेलं जीवनमान आणि रस्त्यावर वाढलेली गर्दी अशा अनेक गोष्टींवरचं हे बोलकं भाष्य. त्यानंतर एकेका पात्राची ओळख होत जाते. यात सुनील बर्वे आणि व वृषाली कुलकर्णी (सौ. गिरीश कुलकर्णी) या उच्चभ्रू जोडप्यासह एक फडात नाचणारी तरुणी (मुक्ता बर्वे), तिची आई (शकुंतला नगरकर), एक एनआरआय इंजिनीअर (गिरीश कुलकर्णी), एका सीरियलमधल्या लोकप्रिय नटीला (हुमा कुरेशी) राजकीय कार्यक्रमासाठी पुण्याला घेऊन चाललेला कार्यकर्ता (श्रीकांत यादव), एक श्रीमंत पण एकटी महिला (टिस्का चोप्रा), तिच्यासोबत मसाज (!) करण्यासाठी लोणावळ्याला निघालेला तरुण,  एक निम्नमध्यमवर्गीय भांडणारं जोडपं (किशोर कदम व छाया कदम), गिरीश कुलकर्णीनं गाडीतून खाली उतरवलेला तरुण (निपुण धर्माधिकारी), किरकोळ अॅक्सिडेंट झाल्यामुळं गिरीश कुलकर्णीच्या गाडीत (पोलिसांच्या मध्यस्थीनंतर) बसलेलं जोडपं (विद्याधर जोशी व रेणुका शहाणे), एका गाडीत बसलेले सगळेच अनोळखी लोक (सतीश आळेकर आणि धीरेश जोशी आदी) आणि ट्रकमधून लिफ्ट घेणारे नागराज मंजुळे व त्याचे दोन संशयास्पद साथीदार अशी अनेक पात्रं भेटत राहतात. या प्रत्येकाची ओळख आणि त्यांच्या प्रत्येकाच्या वैचित्र्यपूर्ण तऱ्हा हे मांडण्यातच सिनेमाचा पूर्वार्ध जवळपास संपतो. पण या काळात अनेक पात्रं आपल्यासमोर येत असल्यानं आणि वेगवान घडामोडी घडत असल्यानं मध्यंतरापर्यंत हा सिनेमा चांगलाच खिळवून ठेवतो. या सर्व मांडणीत गिरीशचे चटपटीत संवाद, सर्वच अभिनेत्यांनी केलेला कमाल अभिनय आणि दृश्यमांडणीतले वेगळे प्रयोग (गाडीच्या वेगवेगळ्या कोनांतून दिसणारी पात्रं आणि त्यामुळं आपणच गाडीत बसलो आहोत असा येणारा फील किंवा हायवेवरच्या वेगाची अनुभूती देणारे प्रसंग इ.) यामुळं हा पूर्वार्ध पाहताना आपण दंग होऊन जातो. यात सगळ्यांत जमलेले प्रसंग आहेत ते सुनील बर्वे आणि वृषाली कुलकर्णी यांचे. व्यारूती असं नाव असलेली ही गर्भवती तरुणी गडबडीत लिफ्टमध्ये अडकते इथून पुढच्या सर्व प्रवासात या जोडप्याच्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या विसंगती विनोदी पद्धतीनं समोर येत राहतात. 
या तुलनेत उत्तरार्ध संपूर्ण वेगळा आहे. हायवेवर घाटात ट्रॅफिक जॅम होतं आणि आपले हे सगळे लोक एकाच ठिकाणी अडकून पडतात. त्यानंतर जे काही होतं, तो या सिनेमाचा कळसाध्याय आहे. सगळे जण वेगानं कुठं तरी निघाले आहेत आणि त्यांना त्यांची इच्छा नसतानाही अडकून पडावं लागलं आहे. यामुळं सगळेच जण आधी उद्विग्न, मग चिडचिडे, नंतर हतबल आणि शेवटी अगदी शांत होतात. त्यांचा हा जो स्वतःकडं जाण्याचा प्रवास आहे, तोच हा सिनेमा आहे. यातलं मर्म ज्याला कळलं, त्याला सिनेमा कळला! शेवटी रेणुका शहाणे घनतमी शुक्र बघ राज्य करी या भा. रा. तांब्यांच्या कवितेच्या ओळी म्हणते आणि मग त्या अनुषंगानं जे जे काही घडतं, ते या सगळ्या खटाटोपाचं सार आहे. आपलं आत्ताचं आयुष्य म्हणजे असाच एक वेगवान प्रवास आहे आणि तो करत असताना आपल्याला कुठंही थांबायचं नाहीये, कुणासाठीही थांबायचं नाहीये. कुठल्याही अज्ञात शक्तीनं जादू केल्याप्रमाणं आपण फक्त तिच्या दिशेनं वेगानं खेचले जात आहोत. हे करताना आपण स्वतःशी बोलायचंही विसरून जात आहोत. कुणी आपल्याला हा अवसर मिळवून दिलाच तर त्याचं महत्त्व कळण्याऐवजी आपण वेळ घालविल्याबद्दल त्याच्यावर चिडचिड करू, अशी आत्ताची स्थिती आहे. हे सगळं या सिनेमात नीट आलं आहे.
एक मात्र झालंय. कितीही समजून घ्यायचं म्हटलं तरी उत्तरार्धाचा अत्यंत कमी झालेला पेस प्रेक्षकांना लवकर झेपत नाही, हे खरं आहे. आत्तापर्यंत सुरू असलेला सगळा गोंधळ, सगळा केऑस एकदम थांबतो. त्यानंतर सिनेमा थेट पात्रांच्या एकमेकांशी सुरू होणाऱ्या संवादावर भर द्यायला लागतो. हा सांधेबदल अलवारपणे न होता, अगदी आघात केल्याप्रमाणं होतो. त्यामुळं त्या बदललेल्या गतीशी प्रेक्षक म्हणून आपल्याला मॅच करणं काहीसं कठीण जातं. शिवाय ट्रॅफिक जॅमचं चित्रिकरण (अर्थातच) स्टुडिओत किंवा इनडोअर झालंय हे स्पष्ट दिसतं. त्यामुळं पूर्वार्धातल्या हायवेवरच्या दृश्यांमुळं कथावस्तूला मिळालेली एक ऑथेंटिसिटी इथं मार खाते. आणि एकदा का नेपथ्याला भगदाड पडलं, की पात्रांमधील आपली गुंतवणूक आपोआपच कमी व्हायला लागते. इथं काही पात्रांच्या गोष्टीला लॉजिकल शेवट मिळतो आणि तो आपल्यालाही समजून घेता येतो. मात्र, काही दृश्यं यात का आहेत, हे शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजे मुक्ता बर्वे आणि तिची आई एका दाक्षिणात्य ट्रकड्रायव्हरला उभं करून निसर्गाच्या हाकेला साद द्यायला जातात तो, किंवा शशांक शेंडेचा मुलगा हरवतो तो प्रसंग किंवा श्रीकांत यादवचा कार्यकर्ता दारू पिऊन स्वतःची उद्विग्नता व्यक्त करतात तो, किंवा तो पक्षी पाळणारा मतिमंद माणूस आणि एक मुलगी यांचा संवाद यांचे धागेदोरे नीट जुळत नाहीत. मुक्ता बर्वेशी आधी भांडण करणारा माणूस, नंतर त्याला फीट आल्यावर याच दोघी त्याची शुश्रूषा करतात, तेव्हा मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो हा प्रसंग जबरदस्त आहे. मात्र, घनतमी गाण्याच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य दिसतं तेव्हा प्रेक्षकांत हशा पिकतो. (जो अगदीच अस्थानी आहे. वास्तविक या दृश्यातलं कारुण्य अंगावर येतं...) टिस्का चोप्राची कथाही यथातथाच आहे आणि त्या मसाजवाल्या मुलाचा सगळा भाग किंवा हुमा कुरेशीचा सगळा भाग हा सिनेमात ग्लॅम कोशंट अॅड करण्यासाठीच आला असावा, असं वाटतं. दोघींनी कामं मात्र झकास केलीयत. सगळ्यांत ठसतात वृषाली कुलकर्णी, छाया कदम आणि मुक्ता बर्वे. या तिन्ही बायकांनी (आणि अर्थात टिस्का व हुमा) कमाल केली आहे. गिरीश कुलकर्णीनं यात साकारलेला एनआरआय इंजिनीअर आणि त्याची भाषा बघण्या-ऐकण्यासारखी आहे. रेणुका शहाणेनं अगदी छोटया रोलमध्ये कमाल केली आहे आणि ती दिसलीयसुद्धा छान!
सिनेमाचं संगीत अमित त्रिवेदीचं आहे. ते फार काही लक्षात राहत नाही. मात्र, सिनेमॅटोग्राफी (सुधाकर रेड्डी) अप्रतिम. विशेषतः पहिल्या भागात तर झक्कासच.
तेव्हा स्वतःकडं जाणाऱ्या या महामार्गाची सफर न चुकता कराच.

दर्जा - साडेतीन स्टार

------------------

7 comments:

 1. आता तर खरच पाहावसा वाटतोय आणि तुम्हीही खुप छान मांडलय...खुप सुंदर शब्दांकित केलय :) लय भारी

  ReplyDelete
 2. श्रीपाद एकदम परफेक्ट लिहिलं आहेस।
  मला ही आवडला हा सिनेमा।
  त्याच त्या पठडीतला नाहीये। विषयाची मांडणी अवघड होती पण तरीही ती बाजू चांगली पेलली आहे।

  ReplyDelete
 3. पाहिला रे. अप्रतिम आहे

  ReplyDelete
 4. पाहिला रे. अप्रतिम आहे

  ReplyDelete