20 Jan 2016

कॉफीशॉप - चार परीक्षणे...

१. 
मार्मिक व रंजक 
----------------------

ह. मो. मराठे
------------



वर्तमानपत्रांत नियमित सदर लिहिणाऱ्या लेखकावर काही बंधने असतात. मुख्य बंधन असते ते शब्दमर्यादेचे. संपादकांनी जेवढी शब्दसंख्या ठरवून दिलेली असेल त्या शब्दमर्यादेतच लेखकाला आपला विषय फुलवावा लागतो. आपला विषय अगदी नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोचवावा लागतो. तो विषय तेवढ्या शब्दमर्यादेतच रंजक बनवावा लागतो. त्या शब्दसंख्येच्या बंधनात राहूनच त्याला आपला विषय रंजक बनवावा लागाते आणि अर्थपूर्णही बनवावा लागतो. ‘कॉफीशॉप’ या पुस्तकातील छोट्या छोट्या लेखांत ही किमया श्रीपाद ब्रह्मे यांना उत्तम प्रकारे साधता आली आहे. या लेखांचे लेखन काही वर्षांपूर्वी झाले होते. ते लेख पुस्तकरूपात नुकतेच वाचकांच्या हाती येत आहेत. सर्व लेखांचे विषय पाच-सात वर्षांपूर्वीचे असले तरी शैलीच्या रंजकतेमुळे ते आज वाचतानाही ताजे आणि टवटवीत वाटतात. लेख पुस्तकात समाविष्ट करताना लेखकाने त्यांचे विषयवार गट पाडले आहेत. पण त्या गटांचा विचार न करता लेख वाचले, तरी ते तेवढेच रंजक आणि टवटवीत वाटतात. खरेदी, पर्यटनस्थळाचा प्रवास, नवनव्या हौसिंग कॉम्प्लेक्सच्या उत्कंठावर्धक पण फसव्या जाहिराती, ‘एकावर दोन फुकट’सारख्या योजना, महागाई, राजकारण, क्रिकेट इ. रोजच्या जीवनाला भिडलेले विषयच या लेखांतून नव्या दृष्टिकोनातून वाचकांना भेटतात. पुस्तकातला कोणताही लेख काढा आणि वाचू लागा. तो नावीन्यपूर्ण विषय गमतीदार शैलीत लेखकाने तुमच्यासमोर ठेवल्याचे आढळेल. ‘मांजराला न घाबरणारा उंदीर शास्त्रज्ञांनी तयार केला,’ अशी बातमी लेखकाच्या वाचनात आली. त्यावरून लेखकाने काही नवे न घाबरणारे प्राणी तयार करायला शास्त्रज्ञांना सुचवले. त्यात बायकोला न घाबरणारा नवरा, बॉसलाच घाबरवणारा क्लार्क, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला हरवणारा क्रिकेट संघ, वाहतूक पोलिस नसतानाही सिग्नलला थांबणारा पुणेरी वाहनचालक असे ‘प्राणी’ बनवायला लेखक सुचवतो. यातला खरा टोमणा आहे, चिमटा काढलेला आहे तो ‘खास’ पुणेकर वाहनचालकांना! खुसखुशीत शैलीत काढलेला चिमटा, असा टोमणा प्रत्येक लेखातच भेटतो. या टोमण्यामुळे, चिमट्यामुळेच लेख मार्मिक आणि रंजक बनतात.
शब्दांवर केलेल्या कोट्या ही या लेखातली आणखी एक गंमत आहे. उदा. १) मंडळी हळूहळू गप्पांत ‘रम’ली! २) आमच्या मनात मात्र आंब्याविषयी कोणतीही ‘अढी’ नाही, ३) हापूस आंबा खाताना खाणाऱ्याने आपली ‘पायरी’ ओळखावी, ४) सध्याचे लग्नसमारंभ म्हणजे यजमानांना आपल्या बँक बॅलन्सचं रुखवत मांडण्याची संधीच! अशा लग्नसमारंभात जाणारेही त्याच ‘तोळा’-मोलाचे असतात, ५) आपल्याला आंब्यात ‘रस’ आहे हे समोरच्या पार्टीला व्यवस्थित पटवून देता आले पाहिजे.
जवळजवळ प्रत्येक लेखातच अशा श‌ाब्दिक कोट्या आढळतात.
काही प्रसिद्ध लेखकांच्या खास अशा शैलीची विडंबने करणारेही काही लेख या पुस्तकात आहेत. उदा. आचार्य अत्रे, मिरासदार, कवी ग्रेस. या लेखकांच्या शैलीची नस ब्रह्मे यांनी बरोब्बर ओळखली आहे आणि त्या शैलीचे नमुने पेश केले आहेत. त्यापैकी ग्रेस यांच्या गद्यलेखनाच्या शैलीचे विडंबन एकदम टॉप! ग्रेस यांच्या गद्यलेखनाचा अर्थ कधीच कोणाला लावता आला नाही. ग्रेसच्या गद्यलेखनाचा हा ‘गुणधर्म’ ब्रह्मे यांनी अचूक पकडला आहे.
चालू घडामोडींवर आधारित हलक्या-फुलक्या शैलीतील लेखानामागे लेखकाची काही अशी वि‌शिष्ट अशी भूमिका नसते. काही तरी गंमत करणे एवढाच मर्यादित हेतू असतो. पण आपल्या या शैलीतील लेखनाच्या मुळाशी एक सामाजिक हेतू आहे, असे आपल्या प्रास्ताविक निवेदनात लेखकाने म्हटले आहे. समकालीन, राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांवरचे मि‌श्कील शैलीचे भाष्य असे या लेखांचे स्वरूप असले, तरी या घटनांचे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) भावी पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे लेखकाला वाटते. म्हणून आपण तात्कालिक विषयांवरचे हे लेख पुस्तकात संग्रहित केले आहेत, असे लेखक म्हणतो. मलाही ही भूमिका पटली. हे लेख २००७-१० या चार वर्षांतले आहेत. एका लेखात तूरडाळ ५० रुपये किलो झाली, असा उल्लेख आहे. सध्या तूरडाळ १५०ते २०० रुपये किलोपर्यंत वाढली आहे. अवघ्या पाच-सहा वर्षांत महागाई चारपट वाढली, हे सहजच या उल्लेखामुळे लक्षात येते. आणखीही एक उल्लेख लेखकाने प्रस्तावनेत केला आहे, तो सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण आहे. लेखक म्हणतो, १९९० च्या सुमारास मुक्त अर्थव्यवस्था आली. त्यानंतर समाजात अनेक बदल झाले. या सर्व बदलांना आजचे तरुण पिढी सहज सामोरी गेली. संकटे आली तरी तरुण पिढीने ती झेलली आणि जगण्याचा उत्सव साजरा करण्याची वृत्ती कायम ठेवली. या सामाजिक आशयामुळे हे तत्कालीन विषयावरचे हसत्या-खेळत्या शैलीतले लेख पुस्तकरूपाने संग्रहित करणे आपणाला आवश्यक वाटले. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे होणारे सामाजिक बदल समजून घ्यायचा लेखकाचा हा दृष्टिकोन मला स्वतःलाही उपयोगी पडला.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी - १७ जानेवारी २०१६)

२. 

खुसखुशीत वाचनीय लेखांचे पुस्तक
-------------------------------

पद्मनाभ हिंगे
-------------

‘कॉफीशॉप’ हे श्रीपाद ब्रह्मे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. श्रीपाद ब्रह्मे यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या रविवारच्या अंकात केलेल्या सदर लेखनातले हे लेख. २००७ ते २०१० या काळात हे लेख प्रसिद्ध झाले होते. कॉन्टिनेन्टल प्रकाशनने हे लेख पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणले आहेत.
‘कॉफीशॉप’ : क्वचित् गेलो असेन. कारण आयुष्यातल्या वयाच्या आकड्यात एकदाच कधी तरी सहा आणि तीन एकमेकांसमोर बघून अगदी पाय बाहेर काढून डान्सताहेत अशी केवळ मनोकल्पना असल्याने या वयात त्या तरुणाईत आम्हा महाताऱ्यांचा तो काय निभाव लागणार? पण कोणी तरी कधी तरी एका यंगिस्तानमधल्या रहिवाशाने - शेलिब्रेटीने - आम्हाला चर्चेसाठी तिथे बोलावले होते. म्हणून कॉफीशॉपची तोंडओळख. असो.
आता ‘कॉफीशॉप’ म्हटले की गप्पाटप्पा, गुदगुल्या, टपल्या, तिरकस टोमणे यात रंगलेली आनंदी तरुण मंडळी. अशा गप्पांत रंगलेली स्माईली चेहऱ्यांनी व्यापलेली टेबले या ‘कॉफीशॉप’मध्ये आढळणार.
एरवी ‘कॉफीशॉप’ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कॉफी मिळण्याचे ठिकाण असायचे, म्हणजे आमच्यासारख्या दोन कानांमध्ये पसरलेल्या थंडगार, पण विरळ झालेल्या केसाळ बर्फाच्या डोक्यांत तरी हीच कल्पना. आमच्या डोक्यात अमृततुल्यमधे स्पेशल चहा आणि काचेच्या बरणीतले क्रीमरोल मिळण्याचे ठिकाण. मात्र, ब्रह्म्यांच्या ‘कॉफीशॉप’मध्ये चविष्ट पदार्थपण, नव्हे, खाद्यपदार्थच आहेत.
ब्रह्मे यांच्या या ‘कॉफीशॉप’ मध्ये सुरुवात झाली आहे ती ‘हसऱ्या दसऱ्या’ने. एका वेगळ्या सीमोल्लंघनाचा हा दिलखुलास आनंद. खुसखुशीत, चमचमीत, कुरमुरीत, कुरकुरीत, चवदार, लज्जतदार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पचनेबल खाद्य वाचकांसाठी या स्पेशल ‘कॉफीशॉप’ मध्ये उपलब्ध झाले आहे. यातले मसालेदार पदार्थ वाचकांच्या डोळ्यातल्या/मनातल्या चवख्याली जिभेला रसरशीत खाद्य पुरवतात. अर्थात् आम्लपित्ताचा त्रास होणार नाही, अशी उत्तम रसाकृती यात वापरल्याने जसपाल भट्टींना जशी भट्टी जमून गेली तशीच येथे लेखकाला जमली आहे.
व्हॉट्सअप-फेसबुक साइझचे हे बारा पंचेस (१२ बाय ५) लेख दहा गटांतून वाचकांना भेटतात. आपल्यातल्या आणि आजूबाजूच्या माणूस नावाच्या विविध वकूबजातीच्या मनोवृत्तीतील विसंगती नेमकेपणाने शोधून त्यावर नेमक्या शब्दांत भाष्य करण्याचे कौशल्य ब्रह्मे यांनी साधले आहे.

वाचकांना प्रश्न पडेल की, ह्या अगदी अलीकडचे लेखन असलेल्या पुस्तकातील लेखांचा उल्लेख ‘ऐसी अक्षरे’मध्ये कसा? हे का तुम्ही वाचायला सांगताय? खरं म्हणजे ‘ऐसी अक्षरे’साठी अपेक्षित असलेले लेखन कसे असायला हवे, त्यासाठी नव्या लेखकांनी ऐसी अक्षरे वाचायला हवे. भाषा, आशय, लेखनाची गुणवत्ता जी जातिवंत वाचकांना अपेक्षित असते, तसे लेखन ‘ऐसी अक्षरे’मध्ये प्रसिद्ध करायला का नाही आवडणार? ‘कॉफीशॉप’चे लेखन त्या अपेक्षा पूर्ण करते असे जाणवल्याने, या पुस्तकाची वाचकांना माहिती द्यायलाच हवी, हा हेतू. ब्रह्मे यांच्यासारख्या नव्या पिढीतल्या लेखकाने ज्या सहजतेने हे लेख लिहिले आहेत, ते केवळ वाचनवेड्यांनाच आवडतील असे नाही. ‘आमच्या काळातले लेखक जसे दर्जेदार लेखन करायचे तसे आत्ता कुठे हो वाचायला मिळते?’ अशी टिप्पणी करणाऱ्यांना, साठीशांती झालेल्यांना हे लेख आवडतील. सहस्रचंद्राची सुवर्णफुले डोक्यावर उधळल्या गेलेल्या वाचकांनाही आवडतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आंग्लाळलेल्या, संगणकाळलेल्या, वाचनापासून दूर गेलेल्या तिशी-चाळिशीतील पिढीलाही हे लेख नक्की आवडतील असे आहेत. हे छान छोटे, गोड मोठे असे लेख वाचनाचा आनंद नक्की देतील अशी खात्री वाटते.
म्हणजे असे आहे तरी काय या पुस्तकात? सध्याच्या मोबाइल युगात सभोवताली घडणाऱ्या नित्यनैमित्तिक घटना, त्यातून समोर आलेल्या वास्तवाचे होणारे दर्शन ह्या छोटेखानी लेखांत होते. मनुष्यस्वभाव, समाजस्वभाव, समाजातली खुळचटं, विसंगती या नेमक्या समजू शकतील; पण त्यावरचं भाष्य खुबीने शब्दांत मांडणे, त्या लिखाणाला एक लय प्राप्त करून देणे हे अवघड असते. श्रीपाद ब्रह्मे यांना ते छान जमते. आडनावात ब्रह्म आणि नाव श्रीपाद म्हणजे साक्षात गुरुर्ब्रह्मा. त्यामुळे या विसंगती उत्कृष्ट लेखनाच्या, मांडणीच्या भिंगातून मोठ्या करून दाखवण्याचे कसब ब्रह्म्यांच्या लेखनात दिसून येते. टपली कशी मारावी, लाडीक चिमटा कसा काढावा, हळूच नेत्रपल्लवी कशी करावी, मिश्किली कशी करता यायला हवी यांचा एक सुंदर पाठ ब्रह्म्यांच्या लेखनशैलीतून ‘कॉफीशॉप’ मध्ये शिकायला मिळतो.
मध्यमवर्गीयांच्या कल्पनेच्या हास्यास्पद - खरं म्हणजे केविलवाण्या भरारीची, स्वप्नांची, अपेक्षाभंगांची, कुणीही उपहास करावा अशा दैवगतीची लेखकाला उत्तम जाण आहे. मध्यमवर्गीय कट्टा-चर्चांची नेमकी समज लेखकाला आहे. मध्यमवर्गीय स्वभावाची नेमकी नस लेखकाला कळल्याचे जाणवते. लेखनशैली प्रवाही आहे. पत्रकार असल्याने भोवतालची सखोल माहिती लेखकाला आहेच. त्याचबरोबर विविध विषयांचे, दिग्गज साहित्यिकांचे लेख नुसतेच वाचले नसून लेखकाने अभ्यासले आहेत हे कळते. काही लेखांतला चावटपणाही खुलून दिसतो. हे लेख वाचता वाचता लेखकाला त्या फेमस ‘मुझे गाजर का हलवा पसंद है’वाल्या डायलॉगसारखे विचारावेसे वाटते, की ‘तुम्हें कैसे पता चला की मुझे भी ऐसाच लगता है?’
‘सेलेब्रेशन... उत्सवी जगण्याचं!’, ‘श.. श.. शॉपिंग’, ‘ऋतू हिरवा’, ‘साईऽऽ सुट्ट्यो’, ‘खेळखंडोबा’ अशा दहा विषय गटांमधून येणारे सर्वच लेख वाचनीय आहेत. ‘दिवाळी’, ‘रंगीला रे’, ‘मॅड मॅड वर्ल्ड’, ‘क्या कूल है हम’, ‘वाईच रशिक’, ‘हुकी हुकी सी ज़िंदगी’, ‘३६५ - (८/३) = ०’ हे लेख वाचल्यावर वाटतं की लेखकाच्या अंगणात पुलं, अत्रे येऊन गोष्टी सांगत होते की काय न कळे. लेखकाचा ‘मोरू’ आर. के. लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखा अवतरतो. त्याच्या समस्या लेखक सहज चिमटीत पकडून दाखवतो. हायफाय क्लासची सुखासीनताही लेखकाला अशीच चिमटीत पकडून दाखवता येते. हेलपटायटिस, भारोत्तोलन यासारखे शब्द गंमत आणतात.
तुम्हा आम्हाला अगदी नकोशा झालेल्या उत्सवी खणखणाटावर लिहिताना लेखकाने ज्ञानोबांच्या ‘भिंती’चा मोठ्या खुबीने वापर केलाय. शेवटच्या ‘त्यांची क्षमा मागून’ या विषय गटातले, ‘हसा लेको हसा’, ‘उगाच तंटा कशाला?’, ‘मृगजळ’ लाजबाब. ‘श्वासाचं गाणं’ सुरेख.
आम्हा वाचकांना जसे साहित्य वाचायला आवडते, तसे साहित्य नव्या पिढीने दिले तर आम्ही का नाही त्याचे गुणगान करावे समीक्षक नसलो म्हणुनि काय जहाले? सामान्य का होईना, वाचक तर आहोत. काय आवडले, ते सांगायला कुणाची हरकत? बघा, दैनंदिन जीवनातल्या आजूबाजूच्या घटनांमुळे वैताग आणणाऱ्या चिडचिड रोगावर हे ब्रह्मेबाण औषध वापरून तुमची कळी खुलतेय का?
---

(पूर्वप्रसिद्धी - बेलवलकर हाउसिंगचे ऐसी अक्षरे नियतकालिक, जानेवारी-फेब्रुवारी २०१६)
----

३.
जगणं रिफ्रेश करणारं लज्जतदार 'काॅफीशाॅप'
--------------------------------------------------------------------------------------
- ममता क्षेमकल्याणी 
---------------------------

नाक्यावरच्या टपरीवर कटिं​ग चहा पिऊन तृप्तीचे ढेकर देणार्‍या मराठी माणसाची नवीन पिढी झगमगत्या लज्जतदार '​कॉफीशॉप​'​मध्ये कधी समरसून गेली हे, त्याचं त्यालाही कळलं नाही. 
कॉफीशॉप​! ​त्याच्या नुसत्या उच्चारानेच मनात उत्साह, चैतन्य आणि नवतेचा गंध दरवळतो. कारण ​'​कॉफीशॉप​'मध्ये अनुभवायला मिळतो मैत्रीचा दिलासा, नात्याचा ओलावा आणि प्रेमाचा फुलोरा. मन प्रसन्न करणारा असाच लज्जतदार गंध मराठी वाचकांना अनुभवायला मिळतो आहे तो ​'​कॉफीशॉप​' या ललित लेख संग्रहाच्या माध्यमातून. पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या अनुभवी, तिरकस आणि तितक्याच नर्मविनोदी लेखणीतून सिद्ध झालेले ​'​कॉफीशॉप​'​'​मधील छोटेखानी ललित लेख म्हणजे तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या विचार आणि कृतीवर नेमकेपणाने केलेले भाष्य आहे. मात्र​, हे भाष्य करत असताना त्यात कोणताही अभिनिवेश नाही की, प्रबोधनाचे डोस पाजण्याचा आविर्भावही नाही. या ललित लेखनाला विषयाचे बंधन नाही; पण मानवी वृत्ती हा त्याचा केंद्रबिंदू आहे. पुलं म्हणाले त्याप्रमाणे, 'नियतीच्या फसवणु​कीतून, हसवणुकीशिवाय आपल्या हाती काही येत नाही,' याचा प्रत्यय हे ललित निबंध वाचताना आपल्याला हमखास येतो. कारण यातला प्रत्येक विषय हा आयुष्य साधेपणाने, मोकळ्या मनाने आणि सकारात्मकतेने जगणार्‍या सर्वसामान्यांच्या भूमिकेशी जोडला गेला आहे.
​याच सर्वसामान्य मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणारा लेखक मध्यवर्ती भूमिकेतून आपल्याशी संवाद साधतो. लेखकाचं मराठमोळं घर, त्या घरातल्या व्यक्ती, तिथं साजरे होणारे विविध सण, सभोवतालच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी या सगळ्यांविषयी केलेले भाष्य आणि नोंदवलेली निरीक्षणं '​कॉफीशॉप​'​मध्ये वाचायला मिळतात. आपल्याच भोवतीचं हे जग वाचकाला इतकं जवळचं वाटतं, की समोर आरसा ठेवून आपल्याच विश्वाचं प्रतिबिंब न्याहाळण्याचा आनंद त्यातून मिळतो.​
एके काळी मराठी माणसाच्या घरातल्या चुलीवर केवळ विशिष्ट समारंभाच्या, मुख्यतः हळदी-कुंकवाच्या वगैरे निमित्ताने (किंवा क्वचित घरातील एखाद्या व्यक्तीच्या पोटदुखीवरील उपाय म्हणून) कॉफी उकळली जायची. त्या​ ​काळी वाण्याच्या दुकानात वडी स्वरूपात मिळणार्‍या या कॉफीला एकमेव दरवळ लाभायचा तो जायफळाचा. आल्याचा चहा आणि जायफळाची कॉफी एवढाच काय तो चॉईस होता. पण कालौघात कॉफीचे असंख्य प्रकार आणि स्वाद आपल्यासमोर आले आणि आपल्या मूडप्रमाणे पाहिजे तशा कॉफीचा आस्वाद घेण्याचा चॉईस आपल्याला मिळाला. कॉफीचं हे पुराण इतक्या विस्तारानं लिहिण्याचं कारण म्हणजे या असंख्य प्रकारच्या कॉफीप्रमाणे 'कॉफीशॉप​' वाचतानाही आपल्या मूडप्रमाणे या पुस्तकातील एखादा लेख वाचावा आणि रिफ्रेश व्हावं इतकं ते वैविध्यपूर्ण आहे.
श्रीपाद ब्रह्मे यांना पत्रकारितेच्या निमित्ताने प्रसिद्ध विनोदी लेखक आणि कलाकार जसपाल भट्टी यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. ही मुलाखत फारच भन्नाट झाली. मुख्य म्हणजे या मुलाखतीतून जसपाल भट्टी यांचा कोणत्याही समस्येकडे बघण्याचा दृ​ष्टिकोन, त्यातून व्यक्त होणारी आयुष्याविषयीची सकारात्मकता यामुळे त्यांनाही नवा दृष्टिकोन मिळाला. 
​थोडेथोडके नाही तर सुमारे १७६​ रविवार श्रीपाद ब्रह्मे​ यांनी हे सदर लिहिलं. ​पदोपदी भेटणारा यातला मोरू पहिल्या एक-एकदोन लेखातच आपल्याशी इतकी पक्की दोस्ती करून घेतो की, क्वचित असलेली त्याची गैरहजेरी ​चुकल्या-चुकल्या सारखी वाटते. ​​प्रत्येक पुस्तकाचा आपला स्वतःचा असा एक माहोल असतो आणि खरं तर असा माहोल तयार करणं आणि शेवटपर्यंत तो टिकवून ठेवणं यातच लेखकाचं कसब आणि त्याचं यश लपलेलं असतं. '​कॉफीशॉप​'मध्ये या चिरतरुण, उत्साही आणि सेलिब्रे​टिं​ग माहोलचा प्रत्यय पदोपदी येतो. कारण कधी इथल्या वाफाळत्या काफीचे एकएक घोट रिचवत खूप मह​त्त्वाच्या गोष्टींवर टाकलेला प्रकाश आपल्या मनाच्या तळाशी साचलेला अंधार दूर करतो, तर कधी कोल्ड कॉफीच्या सुखद गारव्याबरोबर दोस्तांशी शेअर केलेल्या बालपणीच्या आठवणींचा पट इथं उलगडतो. पण अर्थातच या दोन्हीचा माहोल सारखाच असतो, तो म्हणजे वाचकाला चिअरअप करणारा. पण इथं आवर्जू​न नमूद करावंसं वाटतं, की हा माहोल निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी लेखकाने खास करून प्रयत्न केलेला नाही, तर त्यामध्ये खूपच सहजता आहे. ही सहजता लेखक उत्तम प्रकारचं स्वतंत्र विनोदी लेखन ताकदीने करू शकतो, याची खात्री देणारी आहे. 
कॉम्पॅक्ट आकारातलं हे पुस्तक घरी-दारी कुठेही बरोबर घेऊन हिंडावं आणि रिफ्रेश करणार्‍या छोटेखानी लेखांचा आस्वाद येता-जाता घेत पुन्हा आपल्या ताणतणावात बुडण्यासाठी सज्ज व्हावं इतकं हे '​कॉफीशॉप​' आश्वासक आहे. 'फास्ट रिलीफ'चा फंडा अजमावणार्‍या नव्या पिढीची नाळ पुन्हा मराठी साहित्याशी जोडण्यासाठी सर्वार्थाने जगणं रिफ्रेश करणार्‍या अशा '​कॉफीशॉप​'ची गरज होती, ती पूर्ण केल्याबद्दल लेखक आणि प्रकाशकांचे आभार मानायला हवेत. ​
---

(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक मासिक - जानेवारी  २०१६)
---
४.रसिक दखल - कॉफीशॉप
---------------------------------

 
गायत्री राजवाडे
--------------------------

श्रीपाद ब्रह्मे हे नाव मराठी वृत्तपत्रवाचकाला सुपरिचित आहे. त्यांचे हे पहिलेच पुस्तक. वृत्तपत्र सदरलेखनाच्या परंपरेचे पाईक असलेले लेखक ब्रह्मे यांनी सकाळ वृत्तपत्रात २००७ ते २०१० या काळात दर रविवारी लिहिलेल्या सदरांमधील निवडक लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. लेखकाच्या शब्दांत सांगायचे तर हे लेख-संकलन 'उत्सवी लेखन' म्हणता येणारे असे आहे.

नर्म विनोदी शैलीमध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीतल्या विविध घटना-विचारप्रवाहांमधल्या कधी सूक्ष्म आणि कधी स्थूल विसंगतीवर नेमकेपणाचे बोट ठेवत केलेले हे लेखन आहे. वाचकाला कालसुसंगत संदर्भमूल्य असलेलं हे साहित्य पुस्तकरूपात उपलब्ध करून देण्याचा लेखकाचा स्तुत्य प्रयत्न भावतो.
आता साधारण किमान तिशीत, तसेच अधिक वयस्क वाचकांना आठवत असतील २००७-२००८ च्या सुमारास (नंतर बंदी आलेली) नवरात्रीत मिरवणुकीने वाजत-गाजत रस्त्यातल्या रहदारीला अरेरावीनं पीडत जाणाऱ्या देवीला वाहिली जाणारी नारळांची वगैरे तोरणे. ह्या औटघटकेच्या प्रथेवरचा 'बांधले मी बांधले' हा लेख सुरुवातीपासूनच लेखकाच्या लेखनकौशल्याची जाणीव करून देतो आणि वाचक कमालीच्या उत्सुकतेने पुढची पाने उलटू लागतो. अनुक्रमणिकेतील 'सेलिब्रेशन - उत्सवी जगण्याचं', 'श... श... शॉपिंग...', 'ऋतू हिरवा', 'साई... सुट्ट्यो', 'तिरकस सर्कस!' असे खूप वैविध्यपूर्ण स्थूल विषय पुस्तक वाचनाची हुरहूर निर्माण करतात.
'त्यांची क्षमा मागून...' ह्या स्थूल विषयातले वेगळेपण नमूद करावेसे वाटते. आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार आणि ग्रेस या तिघांच्या लेखनशैलीत लेखक श्रीपाद ब्रह्मे यांनी व्यक्त होणे वाचकाला दुहेरी पातळीवरचा आनंद प्रत्यय देऊन जाते. आचार्य अत्रे यांची जोरकस, अतिरंजिततेकडे झुकणारी आत्मविश्वासपूर्ण विषयमांडणी करणारी शैली, द. मां.ची नेमस्त, आडवळणांनी विषयातल्या विसंगतीवर बोट ठेवणारी विनोदी लेखनशैली आणि ग्रेस यांच्या दुर्बोध, सामान्यांना पटकन समजायला अवघड जाणाऱ्या, पण सौंदर्यरसाची निर्मिती करणाऱ्या शब्दांतली अभिव्यक्ती लेखकाने सहजशैलीत मांडली आहे.

---
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य सूची, फेब्रुवारी २०१६)
----

No comments:

Post a Comment