22 May 2016

प्रियांका चोप्रावरील लेख

डॅडीज लिटल गर्ल 
---------------------

सर्वांची लाडकी पीसी चॉप्स किंवा पिग्गी चॉप्स (तिचं खरं नाव प्रियांका चोप्रा) राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये ‘पद्मश्री’ स्वीकारायला गेली, तेव्हा तिच्याभोवती असलेल्या ग्लॅमरमुळं सर्वांचं लक्ष तिनं वेधून घेतलं यात आश्चर्य नाही. पण त्या पिवळ्या साडीच्या झगमगाटापलीकडं तिच्या हातावर गोंदलेल्या ‘डॅडीज लिटल गर्ल’ या वाक्याकडं फार कुणाचं लक्ष गेलं नसणार. प्रियांका वेगळी आहे, यशस्वी आहे, जग गाजवते आहे त्यामागं हे वाक्य आणि यासारख्या अनेक प्रेरणा आहेत. आधुनिक भारतातल्या नव्या स्त्रीचा प्रियांका हा चेहरा आहे. तो केवळ सेक्स अपीलपुरता मर्यादित नाही; तर त्यापलीकडं जाऊन खऱ्या अर्थानं स्त्रीत्वाचं भान राखून जग जिंकणाऱ्या मुलीचा चेहरा आहे. ही आपल्या डॅडींची फार लाडकी मुलगी आहे. बहुतेक सर्व मुली आपल्या वडिलांच्या लाडक्या असतात आणि त्यांचे वडीलही त्यांचे फार लाडके असतात. आपले वडील म्हणजे त्यांचं विश्वच असतं. प्रियांका अशा सर्व मुलींसारखीच आहे आणि तरीही ती वेगळी आहे. कुठल्या गोष्टींमुळं प्रियांकाला हे वेगळेपण साधता आलं?
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी. प्रियांका चोप्राचा जन्म जमशेदपूरचा. १८ जुलै १९८२ ही तिची जन्मतारीख. अशोक आणि मधू चोप्रा हे तिचे आई-वडील. वडील पंजाबी, तर आई झारखंडची. दोघेही लष्करात फिजिशियन. त्यामुळं सारख्या बदल्या होत असत. त्यामुळं प्रियांकाचं बालपण दिल्ली, अंबाला, चंडीगड, लेह, लखनौ, बरेली आणि पुण्यात गेलं. तिचं शालेय शिक्षण लखनौच्या ला मार्टिनेअर गर्ल्स हायस्कूलमध्ये, तर कॉलेज शिक्षण बरेलीच्या सेंट मारिया गोरेटी कॉलेजात झालं. पण तेही अर्धवट सोडावं लागलं. त्यापूर्वी ती वयाच्या तेराव्या वर्षी अमेरिकेत आपल्या काका-काकूंकडं शिकायला गेली. तिथंही त्यांच्या फिरतीमुळं तिचं शिक्षण न्यूटन, मॅसेच्युसेट्स, क्वीन्स-न्यूयॉर्कमध्ये झालं. त्यामुळं एक झालं, की लहान वयातच तिला वेगवेगळी शहरं आणि जग पाहता आलं. वेगवेगळ्या संस्कृतींशी परिचय झाला. त्यामुळं स्वाभाविकच तिचं भावविश्व प्रगल्भ झालं. अमेरिकेत की वेगवेगळ्या नाट्यसंस्थांमध्ये कामं करू लागली. वेस्टर्न क्लासिकल संगीत शिकली... 
 ‘क्वांटिको’मधल्या तिच्या यशस्वी भूमिकेचं मूळ हे त्यात असावं नक्कीच! अमेरिकेत तिला वंशभेदाचाही सामना करावा लागला, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलंय. त्यातूनच पुढं तिथल्या जनमानसावर राज्य करण्याची जिद्द तिच्यात निर्माण झाली असणार. अर्थात स्वप्नं सगळेच पाहतात. पण ते सत्यात उतरवणं फार थोड्यांना जमतं. कारण त्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. आयुष्यात फार ‘फोकस्ड’ असावं लागतं. बॉलिवूडसारख्या ग्लॅमर जगाशी केवळ अठराव्या वर्षी संबंध येऊनही प्रियांकानं हे कसं साधलं असेल?
तिनं त्याच मुलाखतीत पुढं म्हटलंय, ‘मी अगदीच अडाणी होते. अत्यंत कमी आत्मविश्वास असणारी होते. अगदी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली होते. त्यात भरीस भर म्हणजे माझ्या पायावर पांढरे डाग होते. पण मी प्रचंड मेहनती, कष्टाळू होते. आज माझे पाय १२ ब्रँड्स विकत आहेत...’ प्रियांकाच्या या उत्तरात बरंच काही दडलेलं आहे. भारतात आर्थिक उदारीकरणाचं पर्व सुरू झालं, तेव्हा ती ९ वर्षांची मुलगी होती. सुश्मिता आणि ऐश्वर्या यांना ‘मिस युनिव्हर्स’ आणि ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मिळाला, तेव्हा ती १२-१३ वर्षांची होती. पुढं सहा वर्षांनी तिलाही तो ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मिळायचा होता. ती अमेरिकेहून पुन्हा भारतात परतली, तेव्हा तिच्या आत्मविश्वासात चांगलीच वाढ झाली होती. त्यानंतर तिनं बरेलीच्या कॉलेजमध्ये एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. तिथं विजेती ठरल्यावर तिच्या आईनं मग जरा सीरियसली या उपक्रमाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली. मग फेमिना मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी प्रियांकाला उतरवलं. तिथं ती दुसरी आली म्हणजेच ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ झाली. स्वाभाविकच तिची निवड मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी झाली आणि लंडनमध्ये ३० नोव्हेंबर २००० मध्ये तिला तो ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट मिळालाही. त्यानंतर स्वाभाविकच तिला बॉलिवूडच्या ऑफर येऊ लागल्या आणि तिनं कॉलेज सोडलं. मात्र, बॉलिवूडमध्येही तिच्या वाट्याला येणारा संघर्ष टळणार नव्हताच. सुरुवातीला तिनं जे काही सिनेमे केले त्यात ती तशी शोभेची बाहुलीच होती. फार काही प्रभाव नव्हता तिच्या भूमिकांचा. अखेर २००६ मध्ये आलेल्या ‘क्रिश’ (हृतिक रोशनसोबत) आणि ‘डॉन’ (शाहरुखसोबत) या दोन सिनेमांनी ती घराघरांत पोचली. 
पुढं २००८ मध्ये आलेल्या मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’नं प्रियांकाचं करिअर स्थिर केलं. याच सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. तिथून या मुलीनं मागं वळून पाहिलेलंच नाही. मग ‘मेरी कोम’ असो, ‘बाजीराव-मस्तानी’ असो, की ‘क्वांटिको’ असो. पण या सर्व काळात तिचं तिच्या कुटुंबासोबतचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं. तिच्या गायनॅकॉलॉजिस्ट आईनं बरेलीतली प्रॅक्टिस सोडून पूर्णवेळ प्रियांकासाठी देण्याचं ठरवलं. आज मुंबईत प्रियांका आलिशान फ्लॅटमध्ये राहते; पण शेजारीच तिचं सर्व कुटुंबीयही राहतं. प्रियांका तिच्या वडिलांची फार लाडकी होती. तिचे वडील २०१३ मध्ये गेले. त्यापूर्वीच तिनं २०१२ मध्ये त्यांच्या हस्ताक्षरातली ‘डॅडीज लि’ल गर्ल’ ही अक्षरं हातावर गोंदवून ठेवली होती. प्रियांकाला कुठलंही फिल्मी बॅकग्राउंड नव्हतं की कुणी गॉडफादर नव्हता. पण तिनं स्वतःच्या हिमतीवर हे सर्व यश मिळवलं. जगातले सर्व मान-मरातब तिच्यासमोर आज हात जोडून उभे आहेत. यशासारखं दुसरं काहीच नसतं म्हणतात. प्रियांकानं यश मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर...! ही गोष्ट अर्थातच सोपी नसते. मोहमायेच्या दुनियेत राहूनही स्वतःच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्नशील असणं अवघडच... पण प्रियांकानं ते साधलं याचं कारण तिच्या स्वतःच्या कणखर व्यक्तिमत्त्वात आणि परिस्थितीनुसार तिनं स्वतःमध्ये केलेल्या बदलांत असणार. 
 उदा. ‘फॅशन’ हा सिनेमा अर्थातच नायिकाप्रधान होता आणि प्रियांकानं या संधीचं सोनं केलं. फॅशन इंडस्ट्रीशी ती जवळून परिचित होतीच. त्यामुळं तिनं ही भूमिका फार संवेदनशीलतेनं साकारली. समीक्षकांकडून आणि सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही ही भूमिका उचलली गेली. पुढं आशुतोष गोवारीकरच्या ‘व्हॉट्स युअर राशी?’ या चित्रपटात तब्बल १२ भूमिका करण्याचा विक्रम तिनं केला. याशिवाय ‘सात खून माफ’ (२०११) हा विशाल भारद्वाजचा सिनेमाही तिच्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. 
याशिवाय अनुराग बसूच्या ‘बर्फी’मधली तिची झिलमिल कोण विसरेल? एका ऑटिस्टिक मुलीची ही भूमिका प्रियांकानं अतिशय जबरदस्त साकारली होती. या भूमिकेचा तिनं फार बारकाईनं अभ्यास केला. अनेक स्वमग्न मुलांच्या संस्थांना भेटी दिल्या. यातून एक अभिनेत्री आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून ती फार प्रगल्भ झाली. श्रीदेवीनं ‘सदमा’मध्ये साकारलेल्या भूमिकेशी तिच्या या भूमिकेची तुलना करण्यात आली. नंतर हृतिकच्या ‘अग्निपथ’मध्येही तिची भूमिका लक्षणीय होती. पण २०१४ मध्ये आलेल्या ‘मेरी कोम’ या सिनेमानं प्रियांकाची अभिनेत्री म्हणून ताकद सगळ्यांच्याच लक्षात आली. भारताची जगप्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित या सिनेमासाठीही प्रियांकानं अफाट मेहनत घेतली. मेरी कोमसोबत अनेक दिवस ती राहिली. चार महिने बॉक्सिंगचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग तिनं घेतलं. नंतर ‘दिल धडकने दो’पासून ते ‘क्वांटिको’मधल्या अलेक्स पॅरिश या व्यक्तिरेखेपर्यंतचा तिचा यशस्वी प्रवास आपल्यासमोरच आहे. अन्य अभिनेत्री आणि तिच्यात प्राधान्यानं जाणवणारा फरक म्हणजे वाढत्या वयानुसार अनेक जणी स्वतःमध्ये बदल करणं नाकारतात. वाढतं वय स्वीकारणं ही अवघडच गोष्ट आहे. प्रियांका मात्र सहजतेनं ते करताना दिसते. तिनं अलीकडच्या काळात स्वीकारलेल्या भूमिकांवरूनच ते दिसून येईल. मूळची बुद्धिमान असलेली ही अभिनेत्री खरं तर कुठल्याही क्षेत्रात गेली असती, तरी यशस्वीच झाली असती, असं वाटतं.
प्रियांकाची आणखी एक बाजू म्हणजे तिचा हात सढळ आहे. अनेक संस्थांना ती कायम मदत करीत असते. जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघापासून ते अनेक संस्था-संघटनांशी ती वेगवेगळ्या प्रकारे जोडली गेली आहे. सर्वार्थानं ती आज एक यशस्वी स्त्री आहे. ‘सेल्फ-मेड वुमन’ आहे.... अन् म्हणूनच ३३ वर्षांची प्रियांका आज भारतातली ‘मोस्ट डिझायरेबल’ स्त्री आहे!
मुंबईसारख्या मायानगरीत देशभरातून रोज शेकडो तरुणी मधुबाला, श्रीदेवी, माधुरी, दीपिका व्हायला येत असतात. प्रियांकाही अशीच एक मुलगी होती. मात्र, अतूट कौटुंबिक बंध, उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अफाट कष्ट करायची तयारी... सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला कमी न लेखता उलट स्त्रीत्वातून येणाऱ्या सकारात्मक गोष्टींचा फायदा घेत स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द यातून ती आज खऱ्या अर्थानं यशस्वी सेलिब्रिटी झाली आहे. पण मला नक्की ठाऊक आहे, की ती मनातून अजूनही कुठं तरी ‘डॅडीज लिटल गर्ल’च आहे. आणि तीच तिच्या अफाट यशाची गुरुकिल्ली आहे! 
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - २२ मे २०१६)

----

No comments:

Post a Comment