15 Jul 2018

सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज आणि आपण...

(नॉट सो) सेक्रेड गेम...
----------------------तंत्रज्ञान आणि समाज यांच्या प्रगतीचा खो खो सदैव चालू असतो. कधी तंत्रज्ञान पुढे जातं, तर कधी समाज... सध्याचा काळ मात्र असा आहे, की तंत्रज्ञान वेगानं पुढं जातंय आणि समाज त्या वेगाला गाठण्यासाठी धडपडताना दिसतोय. मनोरंजनाच्या जगात सध्या वेबसीरीज किंवा खासगी नेटवर्कसाठी तयार होणाऱ्या खास सिनेमांनी काहीशी खळबळ उडवून दिली आहे. मोबाइल किंवा घरच्या स्मार्ट टीव्हीवर, लॅपटॉपवर किंवा नोटबुकवर पाहता येणाऱ्या या सशुल्क सेवांद्वारे आत्तापर्यंत पाहायला मिळत नसलेले आशय-विषय प्रेक्षकांसमोर येऊन आदळत आहेत. या आशयाचा दर्जा हा वेगळ्या चर्चेचा विषय असला, तरी आगामी काळात या मालिका किंवा सिनेमांचा धबधब्यासारखा ओघ सुरू होणार, असे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. या सगळ्यांमागे अर्थातच या खासगी स्ट्रीमिंग कंपन्यांचे मोठे अर्थकारण आहे, व्यापारयुद्ध आहे आणि गळेकापू स्पर्धाही आहे. एरवीही सर्वच क्षेत्रांत हे सुरू असलं, तरी त्याचा समाजावर थेट परिणाम होत नाही. मात्र, इथे हा विषय मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांवर मोठ्या प्रमाणावर आदळत असलेल्या विविक्षित आशयाचा असल्यामुळे त्यातून होणाऱ्या संभाव्य सामाजिक उलथापालथीचा किंवा बदलांचा वेध घेणे गैर ठरू नये.
भारतात स्मार्टफोनचे आगमन झाले, त्याला आता एक दशकाहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आणि त्यातही ‘फोर जी’सारखी वेगवान सेवा दूरसंचार कंपन्यांनी द्यायला सुरुवात केल्यानंतर मोबाइल म्हणजे ‘ऑल इन वन’ असं उपकरण होऊन गेला आहे. ‘रिलायन्स’च्या ‘जिओ’नं ग्राहकांना अत्यंत स्वस्तात डेटा द्यायला सुरुवात केल्यानंतर या दूरसंचार बाजारपेठेतील स्पर्धेची सगळी परिमाणंच बदलून गेली आहेत. भारतीयांना स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूचं आकर्षण असल्यानं (आणि बहुतांश ग्राहकांची क्रयशक्तीही कमी असल्यानं) स्वस्तात डेटा मिळायला सुरुवात झाल्यानंतर स्मार्टफोनवर इंटरनेटचा वापर करून वापरल्या जाणाऱ्या ‘अॅप्स’ची संख्या कमालीची वाढली. भारताच्या १३० कोटी लोकसंख्येपैकी ५० कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहे, असा या क्षेत्रातील अनेक सर्वेक्षणांचा निष्कर्ष आहे. त्यातही मोबाइलवर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ३० ते ३५ कोटी एवढी आहे. भविष्यात ही संख्या किती विस्तारू शकते, याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो. 
भारतातल्या या वाढत्या इंटरनेट मोबाइलधारकांच्या संख्येचा मोह न आवरता येण्याजोगा आहे. ही वाढती बाजारपेठ जगभरातल्या स्ट्रीमिंग कंपन्यांना भुरळ घालणारी आहे. नेटफ्लिक्स या अमेरिकी स्ट्रीमिंग कंपनीने सर्वप्रथम दोन वर्षांपूर्वी भारतात आपली सेवा सुरू केली. तेव्हा आणि आताही आपली सेवा ‘प्रीमियम’ दर्जाची आहे, असा या कंपनीचा दावा आहे. याचा अर्थ भारतीय ग्राहकांपैकी ज्यांना दरमहा ५०० (नंतर ६५० आणि आता ८०० - एचडी आदी सेवांसह) रुपये देणे शक्य आहे, त्यांनाच ही सेवा मिळते. गेल्या वर्षी जुलैत ‘अॅमेझॉन’ने आपली ‘अॅमेझॉन प्राइम’ ही स्ट्रीमिंग सेवा भारतात सुरू केली. ‘अॅमेझॉन’ने भारतीय प्रेक्षकांची मानसिकता ओळखून सुरुवातीला अगदी स्वस्तात म्हणजे ४९९ रुपयांत वर्षभर ही सेवा देऊ केली. आता हा दर वाढून ९९९ रुपये प्रतिवर्ष झाला असला, तरी ‘नेटफ्लिक्स’च्या तुलनेत तो किती तरी स्वस्तच आहे. याशिवाय ‘हॉटस्टार’, ‘आल्टबालाजी’ किंवा ‘झी-५’सारख्या स्थानिक कंपन्या आपापला कंटेट घेऊन बाजारात उतरल्या आहेतच. ‘नेटफ्लिक्स’चा व्याप मोठा आहे. अमेरिकेत १९९७ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीची सेवा आज १९० हून देशांत उपलब्ध आहे. जगभरात १२.५ कोटीहून अधिक ग्राहक आहेत. त्यात केवळ अमेरिकेतील साडेपाच कोटी ग्राहकांचा समावेश आहे. भारतात या कंपनीचे नक्की किती ग्राहक आहेत, याची अधिकृत माहिती मिळत नसली, तरी ही संख्या देशभरात केवळ ५० ते ६० लाखांच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. त्या तुलनेत ‘अॅमेझॉन प्राइम’च्या ग्राहकांची संख्या एक कोटी १० लाखांवर, तर ‘हॉटस्टार’च्या ग्राहकांची संख्या तब्बल साडेसात कोटींवर आहे. भारतात स्वस्त दरात सेवा दिल्याशिवाय जास्त ग्राहक मिळत नाहीत, हे वास्तव आहे. एक तर स्वस्तात सेवा द्यायला हवी किंवा मग ज्याची चर्चा होईल, असा खळबळजनक कंटेट द्यायचा, असे दोन पर्याय या कंपन्यांसमोर असतात. ‘नेटफ्लिक्स’नं सध्या दुसरा पर्याय स्वीकारल्याचं दिसतं. त्यामुळंच त्यांनी धडाक्यात भारतात स्वत:च्या मालिका आणि सिनेमे तयार करून ते ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित करायला सुरुवात केली आहे. या सेवेद्वारे आपण पाहत असलेला कंटेट ‘खासगी ठिकाणी’ व ‘वैयक्तिक’ पाहत असल्यानं त्यावर कुठलीही सेन्सॉरशिप (सध्या तरी) नाही. त्यामुळंच भारतीय सिनेमा व टीव्हीवर पाहायला मिळणार नाहीत, अशी (कथित) बोल्ड लैंगिक वा हिंसक दृश्ये या मालिकांमध्ये वा सिनेमांमध्ये दाखवणं सहज शक्य आहे. ‘नेटफ्लिक्स’नं हेच केलंय. त्यासाठी त्यांनी अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानी यांच्यासारखे बडे दिग्दर्शक हाताशी धरून ‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेचे पहिले आठ भाग सहा जुलैला प्रदर्शित झाले. तेव्हापासून त्या मालिकेची चर्चा मनोरंजन विश्वात व काही प्रमाणात विशिष्ट वर्तुळातील प्रेक्षकवर्गात सुरू झाली आहे. याआधीही ‘लस्ट स्टोरीज’सारखा चित्रपट खास ‘नेटफ्लिक्स’साठी तयार झाला. त्यातल्याही बोल्ड दृश्यांची अपेक्षेप्रमाणे चर्चा झाली. हे सर्व ‘नेटफ्लिक्स’च्या मनाजोगते घडले.
भारतातील मनोरंजनाची बाजारपेठ सव्वा लाख कोटी रुपयांची आहे. इथे मनोरंजनासाठी पैसे मोजणारा वर्ग दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. जगातल्या नामवंत स्ट्रीमिंग कंपन्यांनी हे ओळखलं आहे आणि भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. या कंपन्यांची उलाढाल अब्जावधी डॉलरची आहे. जगभरातले नामवंत, सर्जनशील लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांच्यासाठीही ही पर्वणी आहे. भारतात अनुराग कश्यप, सैफ अली खान प्रभृतींनी काळाची पावले ओळखून आत्ताच या नव्या माध्यमाला आपलेसे केले आहे. यापुढील काळात अन्य कंपन्यांकडूनही अशाच नवनव्या कलाकृतींची निर्मिती होईल. एका अर्थाने या व्यवसायात अनेक नव्या संधी उपलब्ध होणार, ही चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळात लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी या कलाकृतींमध्ये टोकाचा हिंसाचार व मुक्त लैंगिक संबंधांच्या दृश्यांसह मानवी भावभावनांचे आत्तापर्यंत दडपून ठेवलेले विविध भावाविष्कार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यातून दोन गोष्टी उद्भवतात. एक तर ‘पब्लिकला हेच आवडतं’ या नावाखाली याच पद्धतीचा एकांगी कंटेंट पाहायला मिळेल; किंवा दुसरी चांगली शक्यता म्हणजे या नव्या माध्यमाचा फायदा घेऊन चांगले दिग्दर्शक पुढं येतील आणि सकस असा कंटेंट देतील. आपल्या देशात कुठल्याही विषयावर वाद-चर्चा झडू शकतात. त्यामुळं या नव्या माध्यमातील कंटेंटविषयीही दोन्ही बाजूंनी हिरिरीने वाद-चर्चा झडतीलच; नव्हे, आत्ताच झडत आहेत! त्यातून अखेर प्रेक्षकशरण कलाकृतींचं प्रस्थ वाढेल की नव्या आशयाचा निनाद कानी पडेल, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. एक मात्र निश्चित, आगामी काळ हा या स्ट्रीमिंग कंपन्यांसाठी सुगीचा असणार आहे. त्यातून सिनेमा आणि मालिकांच्या वैयक्तिक आस्वादाची नवी सवय लोकांना लागू शकेल. अर्थात सिनेमाचा मोठ्या पडद्यावर घेता येणारा अनुभव ही काही औरच गोष्ट असल्यानं सिनेमा तयार करताना या भव्य-दिव्यपणाचा देखावा बहुतेक निर्माता-दिग्दर्शकांना करावा लागू शकेल. यामध्ये लागणाऱ्या प्रचंड मोठ्या गुंतवणुकीचे प्रमाण लक्षात घेता, मोठमोठ्या स्टुडिओंनाच अशी निर्मिती करणं शक्य आहे. त्यामुळं पुन्हा छोटे निर्माते वा दिग्दर्शक वैयक्तिक स्ट्रीमिंगकडं वळण्याची शक्यता आहे. थोडक्यात, मनोरंजनाचा हा नवा बाजार आणि पैशांचा खेळ आता आपल्या घरात, आपल्या खिशात येऊन ठाकला आहे. त्यापासून सुटका नाही! हा सगळा बाजार असल्यानं त्यातल्या खेळाला रूढार्थानं ‘पवित्र’ म्हणता येत नसलं, तरी तो एक वेगळीच मूल्यव्यवस्था घेऊन आपल्या समाजात अवतरतो आहे.... तेव्हा पावित्र्याच्या संकल्पनाही बदलतील! हे होईल ते चांगलं की वाईट, हे काळच ठरवील. तूर्त, सावध ऐका पुढल्या हाका...

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, १५ जुलै २०१८)
---

‘सेक्रेड गेम्स’विषयी...

मला ही मालिका आवडली. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी हे दोघेही दिग्दर्शक हुशार आहेत, कल्पक आहेत. विक्रम चंद्रा (अनुपमा चोप्रा व तनुजा चंद्राचा भाऊ; एनडीटीव्हीचा अँकर तो हा नव्हे!) याने २००६ मध्ये लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित ही आठ भागांची मालिका खास ‘नेटफ्लिक्स’साठी कश्यप-मोटवानी यांनी तयार केली आहे. मुंबईत वाढलेल्या गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दिकी) या गुंडाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना प्रामुख्याने कथाक्रमाचा ठळक भाग आहेत. हा गँगस्टर सरताजसिंग (सैफ अली खान) या पोलिस इन्स्पेक्टरला फोन करतो आणि त्याला भेटायला बोलावतो. गणेश गायतोंडे मधला काही काळ गायब असतो. तो अचानक मुंबईत उगवलेला पाहून सरताजला आश्चर्य वाटतं. बऱ्याच ‘भवती न भवती’नंतर तो त्याला भेटतो, तेव्हा गायतोंडे मुंबईत २५ दिवसांत काही तरी भयंकर घडणार आहे आणि यातून फक्त त्रिवेदी नावाचा माणूस वाचणार आहे, असं सांगतो. यानंतर गणेश गायतोंडे डोक्यात गोळी घालून घेऊन आत्महत्या करतो इथून ही मालिका सुरू होते. फ्लॅशबॅक तंत्राने गणेश गायतोंडेची कहाणी समजत जाते. यात सरताजसोबत अंजली माथूर (राधिका आपटे) नावाची ‘रॉ’ची एक एजंटही गायतोंडेच्या माहितीचा माग काढत असते. पुढे वेगवान घडामोडी घडत जातात. कश्यप आणि मोटवानींचे सिनेमे पाहणाऱ्यांना पुढं साधारण काय घडणार आणि कशा पद्धतीनं घडणार, याचा एक अंदाज येत जातो. या आठही भागांना ‘अश्वत्थामा’, ‘हलाहल’, ‘रुद्र’, ‘ययाति’ अशी नावं आहेत. कथानक गुंडाच्या जीवनावर आधारित असल्यानं त्यात शिवराळ भाषा आणि हिंसेचा भडीमार आहे. ‘नेटफ्लिक्स’ला सेन्सॉरचं कोणतंही बंधन नसल्यानं अनुराग आणि मोटवानीनं मनमुरादपणे हिंसा, शिव्या आणि लैंगिक दृश्यांचा मारा केला आहे. हे नसतं, तर ही मालिका कुणी पाहिली नसती, असा त्यांचा समज झाला की काय, कोण जाणे! आंतरराष्ट्रीय महोत्सवांतले सिनेमे पाहणाऱ्या प्रेक्षकांना काही वाटणार नाही. मात्र, अशी दृश्ये पाहण्याची सवय नसलेल्या अन्य भारतीय प्रेक्षकांना ही मालिका पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अर्थात, तोच हेतू असेल, तर मग विषय मिटला.
बाकी या मालिकेत सैफ व नवाजुद्दीनसोबतच लक्षात राहतो तो आपला जितेंद्र जोशी. त्यानं यातील काटेकर कॉन्स्टेबलची भूमिका अगदी जीव ओतून केली आहे. या अभिनेत्याचा वकूब मोठा आहे, हे या मालिकेतून लक्षात येतं. कथानक मुंबईत घडत असल्यानं (आणि ‘नेटफ्लिक्स’वर सबटायटल्सची सोय असल्यानं) अनेक पात्रं मराठीत बोलतात. बऱ्याचदा बोलतात. प्रामुख्यानं मराठी व हिंदी भाषेतीलच ही मालिका आहे. सैफ त्याच्या आईशी पंजाबीतूनच बोलतो. कथानक अस्सल वाटायला या गोष्टी उपयुक्त ठरल्या आहेत. मात्र, ही फारच टॉप क्लास मालिका आहे आणि यापूर्वी असं काही काम आपल्याकडं झालंच नव्हतं, अशी जी चर्चा सोशल मीडियातून केली जात होती, त्यावर फार विश्वास ठेवू नये. ही चांगली मालिका असली, तरी ग्रेट वगैरे अजिबातच नाही. (माध्यमांतून हितसंबंधीयांकडून केला जाणारा प्रचार दिवसेंदिवस अतिरेकी होत चालला आहे, हे मात्र खरं!)
बाकी, ‘नेटफ्लिक्स’नं या मालिकेद्वारे भारतीय प्रेक्षकांना आपलंसं केलं, तर ते या मालिकेचं सर्वांत मोठं यश ठरेल. ही मोठी कंपनी आहे आणि तिची गुंतवणुकीची क्षमताही मोठी आहे. त्यामुळं भविष्यात फक्त सेक्स आणि हिंसा यांच्या पलीकडं जाणारा चांगला कंटेंट या माध्यमातून आपल्यासमोर येईल, अशी आशा करायला हरकत नाही. 
मी या मालिकेच्या पुढच्या सीझनची नक्की वाट पाहीन.

दर्जा - साडेतीन स्टार
----


‘लस्ट स्टोरीज’विषयी...

‘नेटफ्लिक्स’नं ‘सेक्रेड गेम्स’ लाँच करण्यापूर्वी जणू ‘लाँचिंग पॅड’ म्हणून ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट आणला. अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी व करण जोहर या आपल्याकडच्या चार दिग्गज दिग्दर्शकांनी यातल्या चार गोष्टी दिग्दर्शित केल्या होत्या. स्त्रीची लैंगिकता हा अत्यंत महत्त्वाचा विषय या चौघांनी आपापल्या पद्धतीनं हाताळला होता. मला वैयक्तिकरीत्या यातली दिबाकर बॅनर्जीची गोष्ट सर्वाधिक आवडली. त्यातली मनीषा कोईराला सर्वांत अधिक भावली. करण जोहरनं त्याच्या गोष्टीची माती केली. बाकी अनुराग कश्यपची राधिका आपटे व आकाश ठोसर अभिनीत गोष्ट ठीकठाक वाटली. झोया अख्तरची गोष्टही गंडलेली वाटली. या सर्व गोष्टींत मुक्त लैंगिक दृश्यांची पखरण केली होती व त्यामुळं आंबटशौकिनांनी या फिल्मची पायरेटेड कॉपी मि‌ळवून ती पाहिली. या गोष्टींवर सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली आहे. त्यामुळं फार तपशिलात लिहीत नाही. हा काही फार ग्रेट प्रयोग नव्हता. मात्र, स्त्रीची लैंगिकता हा महत्त्वाचा विषय यातल्या कथांनी हाताळला, ही गोष्ट महत्त्वाची आहे. यापुढील काळात अधिक संवेदनशीलतेनं हा विषय हाताळणाऱ्या फिल्म्स ‘नेटफ्लिक्स’ देईल, अशी आशा आहे. बाकी यात सांगण्यासारखं काही नाही.

दर्जा - तीन स्टार
---

1 comment:

  1. Both scraed n lust I saw on their opening only . U have assessed both very well
    Many subject are getting open on the netflix.some like suit designated are making u know a altogether new aspect.thanks to my son for sponsorship of Netflix .

    ReplyDelete