8 Aug 2018

इंदूर ट्रिप ट्रॅव्हलॉग


इंदूरची 'बिनधास्त' अन् 'सैराट' ट्रिप
----------------------------------------
मराठी सिनेमावर मी एखादा कार्यक्रम करीन आणि त्याचा पहिला प्रयोग महाराष्ट्राबाहेर, इंदूरमध्ये होईल, असं कुणी मला एका वर्षीपूर्वी सांगितलं असतं, तरी मी त्यावर विश्वास ठेवला नसता. पण विश्वास बसणार नाही अशाच गोष्टी अनेकदा वास्तवात घडून जात असतात. मलाही इंदूरच्या ट्रिपमुळं याचं प्रत्यंतर आलं. चपराक प्रकाशनाचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांनी माझं 'फर्स्ट डे फर्स्ट शो' हे सिनेमा परीक्षणांचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. गेल्या वर्षी त्यांच्या कार्यालयात विश्वनाथ शिरढोणकर या गृहस्थांची आणि माझी भेट झाली. शिरढोणकर इंदूरचे. गेली अनेक वर्षं ते तिथंच स्थायिक आहेत. इंदूरमध्ये मराठी माणसांची वस्ती मोठी आहे. सुमारे चार लाखांहून अधिक मराठी माणसं तिथं राहतात. शिरढोणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये 'लिवा (लिहावे-वाचावे) क्लब'ची स्थापना केली. त्या क्लबच्या माध्यमातून ते अनेक कार्यक्रम तिथं करत असतात. आमची भेट झाली, तेव्हा त्यांनी मला इंदूरला असा एखादा कार्यक्रम करा, असं सांगितलं आणि इंदूरला येण्याचं आमंत्रण दिलं. आपण सहज गप्पांमध्ये बोलताना 'या एकदा आमच्या गावाला' असं म्हणतो, तशाच धर्तीवरचं हे आमंत्रण असावं असं समजून मी नंतर ती गोष्ट विसरूनही गेलो. मात्र, शिरढोणकरकाका विसरले नव्हते. त्यांनी या वर्षी फेब्रुवारीत इंदूरमध्ये कार्यक्रम करा, असं आमंत्रण दिलं. मात्र, तेव्हा मी बडोद्याच्या संमेलनाला जाणार असल्यानं मला इंदूरला जायला जमणार नव्हतं. तसं मी त्यांना कळवलंही. मात्र, पुन्हा मे महिन्यात त्यांचा फोन आला आणि आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही इंदूरला या आणि मराठी सिनेमावर व्याख्यान द्या, अशी प्रेमळ गळ त्यांनी घातली. आता माझ्याकडं नाही म्हणायला कोणतंच कारण नव्हतं. पण मला एकदम वाटलं, की एकट्यानं फक्त तोंडी व्याख्यान देण्यापेक्षा, दोन जणांनी दृकश्राव्य माध्यमातून सिनेमावरचा कार्यक्रम सादर केला, तर ते अधिक चांगलं दिसेल. तसं मी शिरढोणकरांना कळवताच त्यांनाही ही कल्पना पसंत पडली. त्यातूनच 'मराठी सिनेमा - बिनधास्त ते सैराट' या कार्यक्रमाची बीजं रोवली गेली. मला सहकारी म्हणून सर्वप्रथम अभिजितचंच (पेंढारकर) नाव डोळ्यांसमोर आलं. एक तर आता आम्ही १७-१८ वर्षांहून अधिक काळ मित्र आहोत. महत्त्वाचं म्हणजे अनेक सिनेमे आम्ही सोबत पाहिले. सिनेमांचं परीक्षणही एकाच काळात लिहीत होतो. मराठी सिनेमाचा पडता काळ ते आताचा अगदी सुवर्णकाळ याचे आम्ही जवळून साक्षीदार होतो. त्यामुळंच मराठी सिनेमाचा गेल्या वीस वर्षांतला प्रवास मांडावा असं डोक्यात आलं. स्वाभाविकच १९९९ मध्ये आलेला 'बिनधास्त' ते २०१६ मध्ये आलेला 'सैराट' असा एक पट डोळ्यांसमोर आला. साधारण दोन तासांच्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात दहा दिग्दर्शक घ्यावेत आणि त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून हा प्रवास मांडावा असं ठरलं. मग आम्ही सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर, चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर, गजेंद्र अहिरे, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, संजय जाधव, आदित्य सरपोतदार, रवी जाधव आणि नागराज मंजुळे असे दहा दिग्दर्शक घेतले. याशिवाय इतर महत्त्वाच्या दिग्दर्शकांचा कार्यक्रमाच्या शेवटी उल्लेख करायचा असंही ठरवलं. मी पाच, तर अभिजितनं पाच दिग्दर्शकांविषयी सांगावं, प्रत्येक दिग्दर्शकाच्या गाजलेल्या कलाकृतींच्या एक किंवा दोन दृश्यफिती दाखवाव्यात आणि त्याअनुषंगाने चर्चा करावी, असं कार्यक्रमाचं स्वरूप ठरवलं. मग तसं स्क्रिप्ट लिहिलं, वाचन केलं. काही फेरबदल केले. वेळ जास्त लागत होता, असं लक्षात आल्यावर पुन्हा दोन तासांत तो कार्यक्रम बसवायचं नियोजन केलं. एक रंगीत तालीम केली आणि मग इंदूरला जायला सज्ज झालो
इंदूरला मी यापूर्वी एकदा, २००५ मध्ये माझा मित्र सिद्धार्थ खांडेकर याच्या लग्नासाठी गेलो होतो. तेव्हाही सोबत अभिजितच होता. योगेश कुटे मागून आला. मी तेव्हा उज्जैनलाही जाऊन आलो होतो. दुसऱ्या दिवशी योगेश आल्यावर त्याला घेऊन परत आम्ही उज्जैनला गेलो होतो. सराफ्यात रात्रीची खादाडीही केली होती. होळकरांचा पॅलेस पाहिला होता. तेव्हा स्मार्टफोन नव्हते, त्यामुळं कॅमेरा नेऊन त्यात फोटो काढले होते, एवढं आठवतंय

...

...तर तेरा वर्षांनंतर पुन्हा इंदूरवारी करायची ठरल्यावर मी आणि अभिजितनं आधी ट्रेनचं बुकिंग केलं. दोघांनाही बसपेक्षा ट्रेनचा प्रवास आवडतो. शिवाय पुणे-इंदूर एक्स्प्रेस ही अगदी सोयीची गाडी होती. ही गाडी दुपारी साडेतीनला पुण्यातून निघून सकाळी साडेआठ वाजता इंदूरला पोचते आणि तिकडून दुपारी अडीचला निघून पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी आठला पोचते. शिवाय ऑगस्ट म्हणजे तसा ऑफ-सीझन असल्यानं गाडीला फार गर्दी नसणार, हेही गृहीत धरलं होतं. सगळी तयारी झाल्यावर शनिवारी (४ ऑगस्ट २०१८) दुपारी मी कॅब करून स्टेशनला निघालो. अभिजितला सोबत सिंहगड रोडला घेतलं आणि निघालो. तीन वाजता स्टेशनला पोचलो. गाडी पुण्यातूनच निघत असल्यानं फलाटावर आधीच येऊन उभी होती. तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मला लागली असल्यानं जिना चढून पलीकडं जावं लागलं. गाडी वेळेत सुटली. या गाडीचा मार्ग लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, गोध्रा, रतलाम, उज्जैन, देवास इंदूर असा होता. थोड्याच वेळात लोणावळा आलं. घाटात पाऊस होता. अशा वेळी मी कायम दारात जाऊन उभा राहतो. एसी डब्यात बसून बघायची ही गोष्टच नव्हे. त्या पावसाचे चार थेंब अंगावर पडल्यावरच मला बरं वाटतं. सगळे बोगदे ओलांडत, धुक्यातून वाट काढत आमची वीस डब्यांची लांबलचक गाडी हळूहळू कर्जतकडं उतरत होती. ट्रेनच्या प्रवासात त्या गाडीची स्वतःची अशी एक लय असते. आपण गाडीत बसल्यावर आपण थोड्याच वेळात त्या लयीशी तादात्म्य पावतो. नंतर आपल्या शरीरालाही त्या लयीची सवय होऊन जाते. आम्ही बुकिंग करतानाच साइडचे बर्थ घेतले होते. त्यामुळं आम्हाला इतर लोकांचा डिस्टर्बन्स नव्हता. या गाडीत बहुतांश मराठी, गुजराती थोडे फार हिंदी लोक होते. आमचा थ्री-टिअर एसीचा डबा होता. त्यामुळं त्यात बसलेल्या बहुसंख्य लोकांची आर्थिक पातळी बहुतांश एकसमानच होती. बहुतेक लोकांना गाडी सुटली, की पांघरूण घेऊन गुडूप झोपायची सवय असते. मला आणि अभिजितलाही उगाच दिवसा झोपायचं नसतं. मग आम्ही गप्पा रंगवतो. विषयांचं बंधन नसतंच. शिवाय सोबत पुस्तकं असतात. ती निवांत वाचणं होतं. ट्रेनमध्ये सारखं खायचं विकणारे लोक येत असल्यानं खादाडीही चालूच असते. जाताना आम्हाला अगदी पाचच्या सुमारास चांगली भेळ मिळाली. त्यानंतर फक्कडसा चहाही मिळाला. त्यामुळं बरं वाटलं. पुढचा सगळा प्रवासही मजेत आणि मस्त झाला. गाडी वेळेत होती. 'व्हेअर इज माय ट्रेन'सारख्या अॅपमुळं बसल्या जागी सगळी माहिती मिळत होती. रात्री आम्ही घरून आणलेला डबा खाल्ला. बाराच्या सुमारास झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा गाडी उज्जैन आणि देवासच्या मधे होती. थोड्याच वेळात देवास आलं. देवास आलं, की कुमारजी आठवतात. अशा वेळी त्यांचं एखादं भजन ऐकणं क्रमप्राप्तच असतं. 'शून्य गढ शहर बस्ती' ऐकत बसलो. ट्रेनच्या लयीत त्यांच्या भजनाची लय अद्वैतासारखी मिसळून गेली होती... मन काही काळ वेगळ्याच विश्वात - ट्रान्समध्ये - गेलं. बाहेर हिरवीगार, लांबलचक शेतं पसरली होती. माळव्यातली गार हवा आतल्या एसीपेक्षा कैकपटीनं अधिक सुख अंगावर उधळत होती. मी पुन्हा ट्रेनच्या दारात होतो आणि कुमारांचं देवास हळूहळू मागं पडत होतं...
थोड्याच वेळात इंदूर आलं. होळकरांच्या साम्राज्याची राजधानी असलेलं इंदूर. (स्थानिक - इन्दौर...) स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचं जन्मगाव इंदूर... मध्य प्रदेशाची सांस्कृतिक राजधानी इंदूर आणि सराफ्यातल्या खाऊगल्लीचं इंदूर... माझ्या डोळ्यांसमोर इंदूरच्या एवढ्या प्रतिमा उभ्या राहिल्या. अलीकडच्या काळात इंदूर हे भारतातलं एक स्वच्छ शहर म्हणून उदयास येत असल्याचं वाचत होतो. ही सगळी पार्श्वभूमी डोक्यात घेऊन इंदूर स्टेशनात पाय ठेवला...

....

आम्ही उतरताच रिक्षावाले अंगावर धावूनच आले. एकाशी डील केलं. आम्हाला महाराष्ट्र अतिथी निवास इथं जायचं होतं. रिक्षानं जास्तीत जास्त ५० रुपये होतील, असं शिरढोणकरांनी आधीच सांगितलं होतं. तेवढेच पैसे देऊन आम्ही त्या ठिकाणी पोचलो. तिथं नितीन धोडपकर नावाचे मॅनेजर होते. त्यांना भेटलो. आमच्या नावे एक रूम बुक होतीच. ती ताब्यात मिळाली. आन्हिकं उरकून जरा बसलो, तोच शिरढोणकर आले. आम्हाला नाश्ता करायला जायचं होतंच. मग त्यांनी आम्हाला सराफ्यातच नेलं. तिथं पोहे, जिलेबीचा नाश्ता झाला. हे इंदूरचे खास पोहे! त्यावर इथला फेमस जिरावण मसाला, कच्चा कांदा, खारी बुंदी, थोडी शेव, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर असा सगळा जामानिमा असतो. नंतर द्रोणातून आलेली गरमागरम जिलेबी... अहा... असा जोरदार नाश्ता झाल्यावर चहा हा हवाच. मग जरा पायपीट करून एक चहाचं दुकान गाठलं. मधल्या काळात जिरावण मसाल्याची 'मस्ट' अशी खरेदीही करून टाकली. होळकर राजवाड्यासमोर चहा घेतला
तिथं जरा फोटोसेशन केलं. मग शिरढोणकरांना निघायचं होतं. आम्हीही अतिथी निवासात परतलो. मग जरा कार्यक्रमाची पूर्वतयारी करीत बसलो. एक-दीडला जेवायला जायचं होतं. धोडपकरांनी जवळच 'अन्नपूर्णा' नावाचं भोजनालय आहे, असं सांगितलं होतं. मग तिथं गेलो. पहिल्या मजल्यावर हे आपल्या पूना गेस्ट हाऊससारखं, पण थोडं लहान असं भोजनालय होतं. तिथं चक्क कुणीच नव्हतं. वेटर आणि मॅनेजर मंडळी (ग्राहकांची) वाट पाहत बाकड्यांवर बसून होती. आम्ही तिथं आत शिरल्याशिरल्या त्या सर्वांच्या चेहऱ्यावर चैतन्य पसरलं. जो तो आमची सरबराई करू लागला. हे भोजनालय धड आहे ना, असं आधी वाटून गेलं. पण नंतर लोक आले. कदाचित इकडं उशिराच जेवत असावेत. त्या दिवशी रविवार म्हणून लड्डू बाफले होते. म्हणजे लाडवासारखे केलेले ते बाफले चुरून त्यावर त्यांची ती विशिष्ट मसालेदार डाळ ओतून भिजवून खायचं. मग आम्ही मॅनेजरच्या सूचनेनुसार, एक रेग्युलर थाळी आणि एक बाफलेवाली थाळी मागवली. ते बाफले बरे होते, पण गरमागरम रोट्या मिळाल्यानं आमचं जेवण भरपेट अन् व्यवस्थित झालं. परत रूमवर आलो... जरा वेळ पडलो. चार वाजता कार्यक्रमस्थळी जायला निघालो. रिक्षावाल्याला ते ठिकाण माहिती होतं
त्यामुळं त्यानं रवींद्रनाथ टागोर मार्गावरील मध्य प्रदेश हिंदी समितीच्या 'शिवाजी भवन' या वास्तूसमोर नेमकी रिक्षा आणून उभी केली. कार्यक्रमाला अजून वेळ होता. आम्ही आधीच पोचलो होतो. थोड्या वेळानं सगळे पदाधिकारी आले. आपल्या भारत इतिहास संशोधक मंडळासारखी छान इमारत होती. ७०-८० लोकांची बसण्याची व्यवस्था होती. आमच्या कार्यक्रमाच्या आधी तीन पुस्तकांचं प्रकाशन (तिथल्या भाषेत - विमोचन) होतं. आम्ही प्रोजेक्टर नीट काम करतोय ना, हे आधी तपासलं. अपेक्षेप्रमाणे त्यात काही तरी गडबड झालीच. पण त्या माणसानं नंतर बरीच धावपळ करून आम्हाला ते सगळं नीट चालू करून दिलं. कार्यक्रमाला लोक निवांतपणे येत होते. एकूण रविवारचा सुशेगादपणा त्या शहराच्या अंगात चांगलाच भिनल्याचं जाणवत होतं. अभिजित मी जरा साशंक झालो होतो. पण लवकरच बरेच लोक आले आणि तो हॉल बऱ्यापैकी भरला. शिरढोणकरांनी त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष रमेश खांडेकर, मध्य प्रदेश सरकारच्या मराठी भाषा अकादमीचे संचालक अश्विन खरे आदी नामवंतांशी ओळख करून दिली. तीन पुस्तकांचं प्रकाशन भाषणं यात बराच वेळ गेला. अखेर पावणेसात-सातला आमचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम लोकांना आवडत होता, असं त्यांच्या प्रतिसादावरून वाटलं. तरीही साडेआठला आम्हाला कार्यक्रम संपवायचा असल्यामुळं शेवटी काही क्लिप ड्रॉप केल्या. बाकी कार्यक्रम आम्ही आखल्यानुसार संपूर्ण सादर झाला. सांगतेचं गाणंही दाखवलं. नंतर लोकांनी समक्ष भेटून कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं. देवासवरून एक कुटुंब आलं होतं. त्यांच्यासोबत एक अपंग मुलगी होती. तिनं व्हीलचेअरवर बसून संपूर्ण कार्यक्रम पाहिला. शेवटी तिनं आम्हाला बोलावून कार्यक्रम खूप छान झाल्याचं सांगितलं. तेव्हा खरोखर धन्य झाल्यासारखं वाटलं. सगळ्या श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटलं
कार्यक्रम झाल्यावर अश्विन खरे स्वतः आम्हाला त्यांच्या 'टीयूव्ही'मधून जेवायला घेऊन गेले. 'नैवेद्य' नावाच्या हॉटेलमध्ये मग आम्ही सगळे जेवलो. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका दीप्ती प्रधान त्यांचे यजमान अमिताभ प्रधान यांनी त्यांच्या कारमधून आम्हाला आमच्या निवासस्थानी सोडलं. त्या दिवशी फ्रेंडशिप डे होता. त्यामुळं इंदूरच्या रस्त्यांवर तरुणाईचा बहर आला होता. आम्हाला रूमवर बसवेना. दहाच वाजले होते. मग आम्ही सराफ्यात जायचं ठरवलं. खरं तर जेवण खूप झालं होतं. त्यामुळं तिकडं जाऊन काही खायचं नव्हतं. पण तरीही एक चक्कर मारू या, म्हणून रिक्षानं तिकडं गेलो
सराफा गर्दीनं नुसता फुलला होता... फ्रेंडशिप डे असल्यामुळं तर आणखीनच गर्दी होती. इंदूरमधली तरुणाई सगळी तिथं अवतरली होती. एफसी रोडवर असल्याचा भास होत होता. मला मी मागच्या वेळी कुठं कुठं काय काय खाल्लं होतं, ते लगेच आठवलं. आम्ही तेव्हा गरमागरम गुलाबजाम हाणले होते. नंतर समोसे हादडून वर मसाला खिचडीही चापली होती. इंदूरच्या फेमस शिकंजीनं आम्ही सांगता केली होती. सध्या पावसाळा असल्यानं शिकंजी नव्हती. बाकी एवढे काय काय पदार्थ होते, पण खाण्याची इच्छा नव्हती. भरपेट जेवून आल्यामुळं आम्ही तिथं काही न खाता नुसतेच हिंडलो. थोडं हिंडल्यानंतर खिचडी खाण्याची इच्छा झाली व ती आम्ही लगेच अंमलात आणली. नंतर मस्तपैकी पान खाल्लं आणि राजवाड्यापर्यंत चालत आलो. तिथं एक रिक्षा करून रूमवर परतलो…

....

दुसऱ्या दिवशी दुपारी अडीचला ट्रेन होती. त्यामुळं आम्ही तसे निवांत होतो. सकाळी सावकाश आवरून आम्ही साडेनऊ-दहाला खाली नाश्ता करायला गेलो. तिथं (परत) पोहे खाल्ले. चहा घेतला. त्यानंतर महत्त्वाची अशी साड्यांची खरेदी करायची होती. इथं पुन्हा धोडपकर मदतीला आले. अन्नपूर्णा भोजनालयाच्या शेजारीच महालक्ष्मी वस्त्र भांडार हे मराठी माणसाचंच साड्यांचं दुकान आहे, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही लगेच तिकडं गेलो. सुरेंद्र भिडे यांचं हे दालन होतं. त्यांची महेश्वरलाही एक शाखा होती. ते स्वत: दुकानात नव्हते, पण देवळेकर नावाचे मॅनेजर होते. त्यांना आम्ही पुण्याहून आल्याचं सांगितलं. तिथं एक मराठी बोलणाऱ्या बाई होत्या. मग त्यांनीच आम्हाला साड्या दाखवल्या. त्या दुकानात तेव्हा कुणीही नव्हतं. तेव्हा आमची खरेदी निवांत झाली. मग थोडा वेळ रूमवर विश्रांती घेऊन परत अन्नपूर्णा भोजनालयात जेवून आलो. तोपर्यंत दीड वाजला होता. सगळं आवरून स्टेशनला निघालो. शिरढोणकरांना फोन करून, त्यांचा निरोप घेतला. रिक्षानं स्टेशनला आलो. चार नंबरच्या फलाटाला गाडी लागली होती. आम्ही वेळेत पोचलो. गाडीही वेळेत निघाली. परतीचा प्रवास नेहमीच थोडा कंटाळवाणा होतो. पण इथं पुस्तकं आणि मोबाइलवरची गाणी सोबतीला असल्यामुळं कंटाळा आला नाही. गाडीनं देवास ओलांडलं, तेव्हा पुन्हा कुमारांचं काही तरी ऐकणं भाग होतं. मग ‘हंस अकेला’ (माझं फेव्हरिट) ऐकलं. आमच्याकडं रात्रीचा डबा नव्हता. त्यामुळं ट्रेनमध्येच जेवण ऑर्डर केलं. ते आठ वाजताच आलं. मग साडेआठला आम्ही जेवून घेतलं. ते जेवण तथातथाच होतं, पण पर्यायच नव्हता. पुढं साडेनऊला गाडी गोध्रा स्टेशनवर आली. मी खाली उतरलो. आमचा डबा मुख्य फलाटाच्या बराच पुढं उभा होता. डाव्या बाजूला गाव दिसत होतं. गार वारा सुटला होता. मला गोध्रा स्टेशनवर सोळा वर्षांपूर्वी घडलेलं ते भयंकर हत्याकांड आठवलं. आठवणारच होतं. तेव्हा इथं काय माहौल असेल, असं वाटून अंगावर काटा आला. आत्ता तिथं अगदी शांतता होती. माझ्या समोर गाडीतले एक मुस्लिम काका उतरले होते. दाढी, डोक्यावर गोल टोपी, शर्ट-पँट अशा वेषातले, पन्नाशीतले असावेत. ते शांतपणे माझ्यासारखेच तिथं उभे होते. गावातून अजानची बांग ऐकू आली… मी तिथंच स्तब्ध उभा… मग त्या शांततेला भगदा़ड पाडणारी गाडीची मोठी शिट्टी वाजली अन् मी भानावर येऊन गाडीत शिरलो… गोध्रा इफेक्ट लवकर जात नव्हता. शेवटी सोबत घेतलेले ‘दळवी’ मदतीला आले.
बडोद्याला आमच्या गाडीत एक मोठं गुजराती कुटुंब शिरलं. त्यांच्या कलकलाटात बराच वेळ गेला. आल्या आल्या त्यांनी डबे उघडले. हे लोक इथंच गाडीत बसले होते, मग घरून जेवून का नाही आले, कुणास ठाऊक. त्यांच्या त्या गोंधळाने मी चांगलाच डिस्टर्ब झालो, पण साडेबाराला मला झोप लागली. सकाळी उठलो, तेव्हा गाडी कर्जत सोडून घाट चढत होती. मी आन्हिकं उरकून चहा घेईपर्यंत गाडी लोणावळ्याला आली. समोरचं गुजराती कुटुंब झोपलंच होतं. लोणावळ्याला त्यातल्या एकाला जाग आली. हे लोणावळा स्टेशन आहे का, असं त्यानं विचारल्यावर मी हो म्हटलं. त्यावर तो खडबडून जागा झाला. त्यांना लोणावळ्यालाच उतरायचं होतं. गाडी तिथं फक्त दोन मिनिटं थांबते. मग त्यांची फारच तारांब‌ळ उडाली. त्यांच्या सोबत दोन-तीन छोटी मुलंही होती. त्या बिचाऱ्यांना तर काही कळायच्या आतच त्यांच्या आयांनी उचललं आणि त्या लगालगा बाहेरच्या दिशेनं चालू पडल्या. गंमत म्हणजे हे लोक उतरून गेल्यावरही गाडी बराच वेळ तिथंच उभी होती.
अशा प्रवासात शेवटचा एक तास निघता निघत नाही. अखेर पंधरा मिनिटे उशिरा आमची गाडी पुणे स्टेशनात प्रवेश करती झाली. बुक केलेली उबर कॅब यायलाही वेळ लागला. पण अखेर आली. अभिजितला वाटेत सोडलं आणि साडेनऊला घरी पोचलो…
इंदूरची ही ट्रिप खरोखर ‘बिनधास्त’ अन् ‘सैराट’ झाली…

----

8 comments:

  1. Sundar varnan 👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद. पण नाव कळलं नाही. कृपया कळवावे.

      Delete
  2. खूपच छान. सगळं चित्र डोळ्यासमोर आलं.
    अमराठी भागातील मराठी बांधवांपर्यंत आपण गेलंच पाहिजे. म्हणूनच आम्ही 'चपराक'चा साहित्य महोत्सवही तिकडे घेतला होता. शिरढोणकरांचं 'मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता' हे पुस्ककही आपण 'चपराक'कडून प्रकाशित केले.
    तुमचे हे अनुभव वाचून आमचेही इंदूरमधील तीन दिवसांचे वास्तव्य आठवले.

    ReplyDelete
  3. वा... वा... चला, परत जाऊ...

    ReplyDelete
  4. वर्णन वगैरे ठीक पण 'अस्सल' इंदूरच्या साड्या आणल्या बद्दल special कौतुक झालं की नाही?

    ReplyDelete
  5. श्रीपाद अभिनंदन...इंदूर ची सफर डोळ्यासमोर तंतोतंत उभी केलीत

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद, धनंजय...!

      Delete