2 Sept 2018

सचिन पिळगावकर - मटा लेख


बूमरँग
-------- 


लोकप्रियता हे दुधारी शस्त्र असतं, याचा अनुभव सध्या चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलाकार घेत आहेत. सोशल मीडिया नावाचं हत्यार सर्वसामान्य रसिकांच्या हातात आल्यापासून तर हे अधिकच जाणवतं आहे. जे लोक डोक्यावर उचलून घेतात, तेच क्षणात काही चुकलं की पायदळी तुडवतात, याचा भयावह म्हणावा असा अनुभव या कलाकारांना येतोय. सचिन कुंडलकर, सचिन पिळगावकर राधिका आपटे यांच्याबाबत गेल्या काही दिवसांत जे घडलं ते विचार करण्यासारख आहे. पूर्वीच्या काळी सहज खपून गेली असती अशी लहानशी चूक हल्ली कुणी खपवून घेत नाही. अर्थात, प्रेक्षकही आपल्या हातात असलेलं हे हत्यार लहानग्या जॉर्ज वॉशिंग्टनसारखं वापरून जो दिसेल त्याच्यावर सपासप वार करताहेत का, असं वाटण्याजोगी स्थिती आहे.
सध्या सर्वाधिक ट्रोल झाले आहेत ते सचिन पिळगावकरया गृहस्थांचं सध्या काय बिनसलंय? सध्यामुंबई अँथमनावाच्या महाभयानक आणि बीभत्स, फालतू व्हिडिओमुळं एके काळच्या या लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शकाला लोकांनी बेदमट्रोलकेलंयहा व्हिडिओ ज्यांनी कुणी पाहिला, त्यांना प्रचंड धक्का बसला. तो व्हिडिओ बकवास आहे म्हणून तर बसलाच; पण त्यात आपला आवडता कलाकार वेड्यासारखे चाळे करताना दिसला, म्हणून जास्त बसला. त्यामुळं सचिन पिळगावकरांना लोकांनी सोशल मीडियावर अक्षरशः पिळून वाळत घातलं. टीका एवढी झाली, की यूट्यूबवरून तो व्हिडिओ काढून टाकावा लागला. सचिन पिळगावकर एका रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक होते. त्यात ते स्वतःला 'महागुरू' म्हणवून घेत. त्यामुळं त्यांचं ते एक टोपणनाव रूढ झालंय. (या नावावरून कोट्या करूनही त्यांची यथेच्छ टर उडविण्यात आली...) तर हा व्हिडिओ डिलिट झाल्यावर 'महागुरूं'नी स्वतः एक निवेदन जारी करून आपण हा व्हिडिओ कसा मित्राच्या मैत्रीखातर केला वगैरे लंगड्या सबबी सांगायला सुरुवात केली. मात्र, त्या मुळीच पटण्यासारख्या नव्हत्या. उलट ज्या मित्राच्या मैत्रीखातर त्यांनी हा व्हिडिओ केला, त्यालाच हे प्रकरण अंगाशी आल्यावर त्यांनी आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, हे त्यातून दिसलं. त्यातून त्यांची प्रतिमा आणखी खालावली
सचिन पिळगावकरांवर सोशल मीडियावर नुसती चर्चा झाली नाही, तर त्यांच्या आणि एकूणच कलाकारांच्या विचित्र वागण्याचं विश्लेषणही होऊ लागलं. पिळगावकरांचा 'नार्सिसस' का झाला, यामागं दोन-तीन कारणं वाटतात. एक तर अत्यंत बालवयात त्यांना मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. मीनाकुमारीपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत आणि राजा परांजपेंपासून ते संजीवकुमारपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास त्यांना मिळाला. वैयक्तिक स्नेह लाभला. ज्या व्यक्तीला समज येण्याच्या आधीपासून असं प्रसिद्धीच्या झोतात राहायची सवय आहे, तिला आयुष्यभर या झोताची एक प्रकारची सवय होऊन जाते. प्रसिद्धीचे ते गुलाम होतात. दुसरं कारण म्हणजे असे लोक स्वतःला कुणी तरी 'फार भारी' समजायला लागतात आणि स्वतःच विणलेल्या स्वमग्नतेच्या कोषातून कधीच बाहेर येत नाहीत. तिसरं म्हणजे आपलं वय झाल्याचं 'ग्रेसफुली' स्वीकारता येणं आणि त्यानुरूप स्वतःचं वर्तन ठेवणं हे भल्याभल्यांना जमत नाही. आपण अजून त्याच काळात आहोत आणि तरुणच आहोत, असं या लोकांना सतत वाटत वाटतं. सचिन पिळगावकर यांचंही तेच झालं. बालवयात पडदा गाजवल्यावर, पुढं मोठे झाल्यावर त्यांना हिंदीत नायक म्हणून 'राजश्री'नं संधी दिली. नंतर मराठीत त्यांनी अनेक सिनेमे तयार केले, दिग्दर्शित केले, त्यात अभिनय केला, गाणीही म्हटली. 'अष्टविनायक', 'मायबाप', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'गंमत-जंमत', 'अशी ही बनवाबनवी', 'एकापेक्षा एक, 'आत्मविश्वास' असे एकाहून एक चांगले सिनेमे सचिन पिळगावकरांनी दिले. त्यातून त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. यातून या गृहस्थांचा स्वमग्नतेचा कोश तयार झाला असावा. आपण मराठीतले 'अमिताभ' आहोत, असं त्यांना वाटू लागलं असावं. नंतर त्यांनी हिंदी मालिकाही केल्या. दुसऱ्या इनिंगमध्येही काही यशस्वी, तर काही अयशस्वी सिनेमे दिले. गेल्या दहा-बारा वर्षांत तर त्यांच्या कामाचा गुणवत्तेचा आलेख सातत्यानं घसरताना दिसतो आहे. अभिनयाच्या पातळीवर 'शर्यत' 'कट्यार काळजात घुसली' या दोन चित्रपटांत उत्तम खलनायकी भूमिका करून त्यांनी हा घसरता आलेख सावरण्याचा चांगला प्रयत्नही केला. मात्र, वाढतं वय स्वीकारणं त्यानुसार 'ग्रेसफुली' वागणं, स्वतःचा आब राखणं या गोष्टी त्यांना मुळीच जमल्या नाहीत.
या सर्व काळात त्यांचं वागणं, बोलणं, स्वतःला 'बढा-चढा के' म्हणतात तसं वाढवून पेश करणं, आपण कुणी तरी वेगळे, खास कलाकार आहोत; खरं तर सुपरस्टारच आहोत हे सतत समोरच्याला जाणवून देणं हे प्रेक्षकांच्या वारंवार समोर येत गेल्यानं ते अत्यंत खटकत राहिलं. 'रिअॅलिटी शो'मध्ये लहान मुलांना अहो-जाहो करणं, शंभर रुपये बक्षीस देणं असले आचरट प्रकार सुरू केल्यानं हे 'महागुरू' अनेकांच्या डोक्यात गेले. त्यातच त्यांचं 'हाच माझा मार्ग' या नावाचं एक कथित 'आत्मचरित्र' बाजारात आलं. ते वाचल्यानंतर हेआत्मचरित्रआहे कीआत्मप्रौढीचरित्र’, असाच प्रश्न अनेकांना पडलाते वाचल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला सुरुवात झाली. 'सचिन 'पीळ'गावकर' या नावाचं एक फेसबुक पेज सुरू झालं. यात त्यांच्या 'हे घे शंभर रुपये' प्रकाराची खूप टिंगल उडवण्यात आली. 'महागुरू' आणि त्यांचे लाडके शिष्य स्वप्नील जोशी हे दोघे लोकांच्या टिंगल-टवाळीचे हक्काचं गिऱ्हाइक बनले. आत्ताच्या ताज्या व्हिडिओनं तर लोकांना आयतं कोलीतच मिळवून दिलं. सचिन पिळगावकर पुन्हा एकदा लोकांच्या टवाळीचा विषय झाले.
हे बूमरँग आहे! लोकप्रियता ही अशी दुधारी तलवारीसारखी असते. लोक तुम्हाला जेवढं डोक्यावर घेतात, तेवढंच जोरात खालीही आपटून फेकून देतात. पायदळी तुडवतात. काही प्रसंगी संबंधित कलाकाराचा दोष नसतो, तर परिस्थितीचाही दोष असतो. सचिन पिळगावकरांच्या बाबतीत मात्र तसं फारसं म्हणता येत नाही. त्यांची स्वतःची वर्तणूक याला अधिक दोषी आहे, असंच मला वाटतं. प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा एक काळ असतो, हे ते विसरले. पिळगावकरांचा उत्कर्षाचा परमोच्च काळ १९९०-९२ या काळातच संपला. त्यानंतर जन्मलेली पिढी आज पंचविशीत आहे किंवा त्याहून मोठी झाली आहे. तिला सचिन पिळगावकर या व्यक्तीविषयी वा तिच्या कारकिर्दीविषयी कुठलाही भावनिक 'कनेक्ट' नाही. (जो माझ्या पिढीला आहे आणि त्यामुळंच त्यांचं हे स्खलन बघून वाईटच वाटतं.) त्यामुळं आपल्या पूर्वपुण्याईच्या जोरावर लोक आपली अजूनही 'वाहव्वा' करतील किंवा आपण म्हणू त्याला माना डोलावतील, ही त्यांची अपेक्षा मुळातच फोल होती. मात्र, पिळगावकर स्वतःच्याच कोषात रममाण असल्यानं त्यांना या बदलत्या परिस्थितीची अजिबातच जाणीव नसावी, असं वाटलं. त्यांच्या आत्मचरित्रातले आत्मप्रौढीचे एकेक किस्से वाचून हसावं की रडावं तेच कळत नाही. आपण वयाच्या साडेतीन की साडेचार वर्षांचे असताना घरी आलेल्या फोटोग्राफरला लाइट कुठे आहे, वगैरे सांगून नीट फोटो काढायला सांगितले आणि तेच आपले पहिले दिग्दर्शन होते, असं हे गृहस्थ लिहितात. ‘संजीवकुमारला आपण भारी पडतोय हे लक्षात आल्यावर त्यानं यश चोप्रांकडंत्रिशूलमध्ये माझा रोल कमी करायचा लकडा लावला,’ असंही यांनी लिहून ठेवलंय. मजरुह सुलतानपुरी की हसरत जयपुरी यांना आपण उर्दूचे धडे दिले की कुठलेसे शब्द सांगितले, अशीही शेखी मिरवून ठेवलीय. मीनाआपाचे (म्हणजे मीनाकुमारी) किस्से तर मुळातून वाचावेतआता ज्या व्यक्ती खुलासा करायला हयात नाहीत, त्यांच्यावर आक्षेपार्ह किंवा अहंमन्य किंवा टीकात्मक असं काही लिहू नये, असा एक साधा संकेत आत्मचरित्रात पाळतात. तोही यांनी पाळलेला नाही. एकूणच ते पुस्तक वाचल्यावर कुठल्याही नॉर्मल माणसाच्या डोक्यात त्या लेखकाविषयी तिडीक गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळंच आता या व्हिडिओ प्रकरणात त्यांनी जे काही खुलासेवजा लिहिलंय त्यावर लोकांचा विश्वास बसत नाहीय.
कलाकारानं कायम नम्र असावं असं म्हणतात. आपलं वय त्याला स्वीकारता आलं पाहिजे आणि त्यानं ' लाल मेरी' हे गाणं गायचं सदैव टाळायला हवं. सचिनसारख्या मोठ्या कलाकारांना मोठं फॅन फॉलोइंग आहे. लोक तुमच्याकडं सदैव पाहत असतात. तुमचं अनुकरण करत असतात. सेलिब्रिटींना खासगी आयुष्य असं काही नसतंच. त्यांच्या 'सेलिब्रिटी' असण्याची ही किंमत असते आणि ती प्रत्येक 'सेलिब्रिटी' चुकवत असतो. वय वाढल्यानंतरही कलाकार माणूस कसा ग्रेसफुल राहू शकतो, याची उदाहरणं अमिताभ, हेमामालिनी किंवा वहिदा रेहमान यांच्या रूपात आपल्या आजूबाजूलाच आहेत. तेव्हा सचिन पिळगावकर यांनी आपल्याच या सहकलाकारांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. तसं झाल्यास त्यांचं हे जे ट्रोलिंग सुरू आहे, ते कमी होईल.
हल्ली कलाकारांना औचित्य या प्रकाराशी काही घेणं-देणं राहिलेलं नाही, हे दुसऱ्या तरुण सचिननं (कुंडलकर) दाखवून दिलं आहे. एवढ्या संवेदनशील कलावंतानं अशी संवेदनाहीन पोस्ट का टाकावी, हे माझ्या तरी आकलनापलीकडचं आहे. या सचिनला त्याच्याच क्षेत्रातल्या सहकलाकारांनी चोख शब्दांत उत्तर दिलं, ते बरं केलं. विजय चव्हाण या लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनानंतर कुंडलकर यांनी 'प्रत्येक जण कुणाचा तरी मामा किंवा मावशी कशी काय असते?' असा सवाल करणारी एक पोस्ट प्रसिद्ध केली. ती वाचल्यानंतर अनेकांना खटकली. कुंडलकरांना त्यांचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे मान्य केलं, तरी ही पोस्ट अगदी त्याच दिवशी प्रसिद्ध करणं गरजेचं होतं का, असं अनेकांना वाटलं. औचित्य नावाचा काही एक प्रकार असतो. त्यालाच या ठिकाणी बगल दिली गेली. आपल्याकडं लोक काही विषयांत कमालीचे संवेदनशील असतात. मृत्यू हा विषयही असाच आहे. त्यामुळं अगदी गरजेचं असेल त्याशिवाय अशा वेळी संबंधित विषयावर बोलू नये, हा साधा संकेत इथं पायदळी तुडवला गेला. त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. जितेंद्र जोशीसह अनेक कलाकारांनी सचिन कुंडलकर यांना यावरून खडे बोल सुनावले. काही जण सचिन कुंडलकरांच्या बाजूनंही उभे राहिले. त्यांचा मुद्दा समजून घ्या, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र, तरीही या पोस्टची वेळ चुकली हे खरंच. त्यामुळं कुंडलकरांना 'ट्रोल'ला सामोरं जावं लागलं.
अर्थात दर वेळी फक्त कलाकारांची किंवा सेलिब्रिटींची चूक असते असं नाही. अनेकदा केवळ विनाकारण कलाकारांना ट्रोल केलं जातंआपल्या हाती स्मार्टफोन आलाय म्हणून आपण प्रत्येकाला ट्रोल करू शकतो, असा (अति)आत्मविश्वास सर्वसामान्य प्रेक्षकांना, रसिकांना कशामुळं आला असेल? उदा. 'नेटफ्लिक्स'वर राधिका आपटेच्या सतत दिसण्यावरून तिला जे काही ट्रोल केलं गेलंय ते काही उचित म्हणता येत नाही. तिच्यावर अनेक 'मिम' तयार केले गेले. आपण हे 'मिम' एंजॉय केले, असं राधिकानं म्हटलं आहे. ही टीका खेळकरपणानं घेण्याची तिची वृत्ती वाखाखण्यासारखी असली, तरी विनाकारण झालेलं ट्रोलिंग सगळेच कलाकार सहन करू शकतील, असं नाही. विशेषतः महिला कलाकारांना अनेकदा असभ्य गलिच्छ ट्रोलिंगला तोंड द्यावं लागतं. तो प्रकार तर सगळ्यांनीच टाळला पाहिजे
तेव्हा हे बूमरँग जसं कलावंतांसाठी आहे तसंच ते रसिक, मायबाप प्रेक्षकांसाठीही लागू आहे. तारतम्य ही गोष्ट जन्मतःच लाभत नाही. ती अभ्यासानं, सवयीनं, मेहनतीनं अंगी बाणवावी लागते
तेव्हा 'ट्रोल', पण 'तोल मोल के ट्रोल'...

---

(महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीत २ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)
----

11 comments:

 1. आरसा दाखवलात पिळगावकरांना..

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. आपण आपले नाव लिहा...

   Delete

 2. सचिन पिळगावकर यांच्याबद्दल मनापासून जे वाटत होतं ते सर्व यात आलय. येत्या काळात स्वप्नील जोशीबद्दल असं लिहायची वेळ येऊ नये, यासाठी शुभेच्छा सर

  ReplyDelete
  Replies
  1. हा हा हा... ती भीती आहे बाबा अजून...

   Delete
 3. हा मी पणा खूप आधीपासून होता. त्यांनी इकडूूून तिकडून चोऱ्या माऱ्या करून प्रसिद्धी मिळवली आहे. सर्व मीच करूू शकतो हा अहंगंड. पहिली पटकथाा भुताचा भाऊ ही गजब वरून चोरलेली होती. आम्ही सातपुते सत्ते पे सत्ता... बरं आपणं गाणं गातो हे ठिक आहे. संगीत पण द्यायचं? आयडीयाची कल्पना या चित्रपटात हे म्हाग्रु संगीतकाराच्या भूमिकेतही आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

   Delete
 4. Very apt for the present situation. Anyone who has met him personally will also certify the same. But to tell you very frankly this is what we experience with most of the individual from each part of industry. Following protocol and morals is a different scenario but projecting one self to be different is ridiculous. In last few years of my working in industry i do have come across these people. It sometimes make me wonder..... Very few like Ankush are genuinely different.
  Anyway appreciate your observation.
  Warm regards

  ReplyDelete
 5. अवधूत गुप्ते सारखा जमिनीवर पाय असलेला परीक्षक पाहिला की मग महागुरुंचा जास्तच वैताग येतो.

  ReplyDelete