30 Nov 2018

ग्राहकहित दिवाळी १७

मराठी चित्रपटांतील मुलांचं भावविश्व
----------------------------------


आधुनिक जगातील सर्व कलांमध्ये चित्रपटकला ही सर्वांत तरुण! तंत्रज्ञानावर आधारित ही कला एकोणिसाव्या शतकाच्या अगदी अखेरीस जन्माला आली आणि विसाव्या शतकात बघता बघता प्रचंड मोठी झाली. चित्रपटांनी अभिव्यक्तीच्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हे माध्यम विलक्षण प्रभावी; त्याचा आस्वाद घेण्यासाठी साक्षर असण्याचीही गरज नाही. पंचेद्रिये व्यवस्थित असली की झाले. त्यामुळं विसाव्या शतकात जगभर या माध्यमाचा फार झपाट्यानं विस्तार झाला. आज एकविसाव्या शतकात तर आपण चित्रपटांशिवाय हे जग कसं असू शकेल याची कल्पनाही करू शकत नाही, एवढा सिनेमा आपल्या जगण्याचा अभिन्न भाग झालाय. या सिनेमानं आपलं जगणं तर आपल्यासमोर मांडलंच; पण जे आपण जगू शकत नाही ते स्वप्नातलं विश्वही आपल्यासमोर सादर केलं. म्हणून तर चित्रकर्मींना 'सपनों के सौदागर' असं म्हटलं जातं. माणसाच्या मनात येऊ शकणारी प्रत्येक भावना टिपण्याचा प्रयत्न या माध्यमानं केला आहे. विविध वंश, धर्म, वर्ण, लिंग, भाषा, संस्कृती, जमाती अशा सर्व प्रकारांतील सर्व माणसांसाठी सिनेमे तयार झाले. केवळ माणसांचेच नव्हे, तर प्राण्यांचे, वनस्पतींचे, पर्वतांचे, सागराचे... थोडक्यात आपल्या सभोवती अस्तित्वात असलेल्या पंचमहाभूतांचे दर्शन घडविणारेही सिनेमे आले. 
यात अर्थातच लहान मुलांच्या भावविश्वाचा विचार करणारे अनेक उत्तमोत्तम सिनेमे जगभर तयार झाले. आपल्या सगळ्यांना लहान मुलांचे सिनेमे पाहायला आवडतात. याचं कारण आपण प्रत्येक जण आपापलं लहानपण 'मिस' करत असतो. आपल्या जगण्यातले तेव्हाचे अनुभव पुनःपुन्हा जगायला आपल्याला आवडतं. सिनेमा आपल्याला हा आनंद देतो. त्यामुळंच अगदी सुरुवातीपासून जगभरात मोठमोठ्या दिग्दर्शकांनी लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखविणारे सिनेमे केले. चार्ली चॅप्लिनपासून ते ख्रिस कोलंबस, स्टीव्हन स्पिलबर्गपर्यंत मोठी यादी सांगता येईल. 
मराठी सिनेमांचा विचार करायचा झाल्यास, मराठीत अगदी अलीकडच्या काळात अशा सिनेमांचं प्रमाण खूप वाढलंय असं म्हणता येईल. 'श्वास' हा या टप्प्यातला पहिला सिनेमा. 'श्वास' हा केवळ मुलांचं भावविश्वच नव्हे, तर इतर अनेक बाबतींत मराठी सिनेमांचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो, हे खरं. मात्र, या सिनेमाचा नायक एक छोटा मुलगा असणं ही गोष्ट त्याचा वेगळेपणा ठळकपणे अधोरेखित करते, हेही महत्त्वाचं. मराठीत त्यापूर्वी मुलांना केंद्रस्थानी ठेवणारे सिनेमे आले नव्हते असं नाही; पण 'श्वास'ची ट्रीटमेंट वेगळी होती. जगभरात मुलांचं भावविश्व टिपणारे अप्रतिम सिनेमे म्हणून इराणी सिनेमांची ख्याती आहे. माजिद माजिदी, जफर पनाही, मखमलबाफ, अब्बास किआरोस्तोमी अशा अनेक इराणी दिग्दर्शकांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून सुंदर सिनेमे तयार केले. ते जगभर नावाजले गेले. भारत आणि इराण सांस्कृतिकदृष्ट्या जवळचे असल्यानं आपल्यालाही ते सिनेमे फार आवडले. इथल्या चित्रपट महोत्सवांतून हजारो भारतीयांपर्यंत हे सिनेमे पोचले. या सिनेमांचा प्रभाव आपल्या दिग्दर्शकांवर नक्कीच पडला. 'श्वास'वर हा परिणाम जाणवतो. अर्थात कथानक अस्सल या मातीतलं आहे. मात्र, त्याची हाताळणी निश्चितच इराणी सिनेमांच्या धर्तीवरची आहे. 'श्वास'नंतर मराठीत मग अशा सिनेमांची एक लाटच आली. मंगेश हाडवळेचा 'टिंग्या' हा सिनेमा त्या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. आपल्या चितंग्या या बैलावर अतोनात प्रेम करणारा टिंग्या हा मुलगा आणि बैल विकावा लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्याच्या भावविश्वाची झालेली उलथापालथ असा हा सिनेमाचा विषय होता. ही स्वतः मंगेश हाडवळेचीच कहाणी आहे. मंगेश जुन्नरजवळच्या एका छो़ट्या गावात राहणारा शेतकरी कुटुंबातील मुलगा! त्याच्या जगण्याचीच ही गोष्ट असल्यानं त्यानं फार प्रेमानं, जीव ओतून हा सिनेमा केला. शरद गोयकर या मुलाकडून त्यानं 'टिंग्या'चं काम फार सुंदर करून घेतलं. 'टिंग्या' आपल्या इथं अनेकांना आवडला, काळजाला भिडला. याचं कारण इथल्या मातीतलं दुःख सांगणारा, इथली वेदना पोचवणारा, इथलं प्रेम दर्शविणारा असा हा साधा-सोपा सिनेमा होता. हा सिनेमा तयार करताना मंगेशवर 'द बायसिकल थीफ' हा जगप्रसिद्ध इटालियन सिनेमाचा प्रभाव होता, हे त्यानंच एका ठिकाणी लिहिलंय. 'बायसिकल थीफ'मध्ये गरिबीनं गांजलेल्या बाप व मुलाची कहाणी समोर येते. तो सिनेमा पाहताना मंगेशला स्वतःच्या आयुष्याशी त्या सिनेमाचं असलेलं साधर्म्य जाणवलं आणि त्यातून त्यानं 'टिंग्या' करण्याचा निर्णय घेतला. 'बायसिकल थीफ' हा सिनेमा त्यातल्या मुलाच्या - ब्रुनोच्या - दृष्टिकोनातून दिसतो. 'टिंग्या'लाही मंगेशनं तशीच ट्रीटमेंट दिली. त्यामुळं 'टिंग्या'च्या परिणामकारकतेत भरच पडली. 
यानंतरचा महत्त्वाचा सिनेमा म्हणजे सुजय डहाकेचा 'शाळा'. मिलिंद बोकील यांची २००४ मध्ये आलेली 'शाळा' ही कादंबरी खूप लोकप्रिय ठरली. पौगंडावस्थेतील शहरी मध्यमवर्गीय मुलाचं आयुष्य या कादंबरीत बोकिलांनी चितारलं होतं. यात अर्थातच त्याची पहिलीवहिली प्रेमकहाणीही होती. (म्हणूनच कदाचित अनेकांनी ती आपलीच गोष्ट वाटली असू शकेल.) याच कारणामुळं 'शाळा'चं माध्यमांतर करण्याचा मोह अनेक जणांना झाला. या कादंबरीवर एक नाटक आणि एक हिंदी सिनेमा येऊ गेल्यानंतरही सुजयला या कादंबरीवर मराठी सिनेमा करायचा होता. त्यानं हे आव्हान चांगलं पेललं. मूळ कादंबरी आणि सिनेमा यांची तुलना करण्यात अर्थ नाही. याचं कारण, अशा तुलनेत मूळ कलाकृती (त्यातही ते पुस्तक असेल तर अधिकच...) नेहमीच बाजी मारून जाते. सुजयनं कादंबरीचा नायक मुकुंद याचं भावविश्व तरलपणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर फोकस ठेवला. मूळ कादंबरीत आजूबाजूलाही बऱ्याच घटना-घडामोडी (आणीबाणी इ.) घडताना दिसतात. या सिनेमात मात्र मुकुंदची प्रेमकहाणीच ठळकपणे समोर येते. अंशुमन जोशीनं मुकुंदचं आणि केतकी माटेगावकरनं शिरोडकरचं काम उत्तम केलं होतं. त्यामुळं 'शाळा' चित्रपट परिणामाच्या दृष्टीनं चांगला ठरला.
किरण यज्ञोपवितनं दिग्दर्शित केलेले 'ताऱ्यांचे बेट' आणि 'सलाम' हे दोन्ही चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वाचा चांगला वेध घेणारे होते. 'ताऱ्यांचे बेट'मधल्या कोकणात लहान गावात राहणाऱ्या मुलाला मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायचं असतं. म्हणजे त्याच्या वडिलांनीच त्याला तसं प्रॉमिस केलेलं असतं. नंतर सगळा सिनेमा त्या लहान मुलाच्या नजरेतूनच घडतो. तरी पण हा निव्वळ लहान मुलांचा सिनेमा आहे, असं मला वाटलं नाही. भौतिक सुखांच्या मृगजळामागं धावणाऱ्या सगळ्या पिढीचाच हा सिनेमा आहे, असं मला वाटलं. मुंबईत जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं हे त्या अर्थानं फार प्रतीकात्मक आहे, असं जाणवतं. जगभरात, विशेषतः आपल्याकडं गेल्या २०-२५ वर्षांत जे ऐहिक बदल झाले, त्या बदलांना सामोरे जाणारी आमची एक आख्खी पिढी सुरुवातीला अत्यंत संभ्रमावस्थेत होती. नंतर तिनं झटकन या बदलांना स्वीकारलं आणि पुढं वाटचाल केली. ही प्रक्रिया तेवढी सोपी नव्हती. या बदलांच्या प्रक्रियेमध्ये एक नाट्यमयता होती. काही हरवणं, काही गवसणं अशी काही तरी गंमत होती. ती टिपण्याची ताकद प्रतिभावान कलाकारांमध्ये असते. किरण हा असाच एक प्रतिभावान दिग्दर्शक असल्यानं त्यानं 'ताऱ्यांचे बेट'मध्ये ही सगळी नाट्यमयता मनोरंजक पद्धतीनं आणली होती. त्यामुळं हा सिनेमा मला भावला. त्याचाच 'सलाम' हा चित्रपटही दोन लहान मुलांच्या नजरेतून घडतो. एकाचे वडील पोलिस आणि एकाचे वडील लष्करात जवान असतात. त्या दोघांत सुप्त स्पर्धा असते. अशा कथानकातून सुरू होणारा हा सिनेमा लहानांसोबतच मोठ्यांच्याही मनाची मशागत करू पाहतो. 
नागराज मंजुळेचा 'फँड्री' हा सिनेमा सर्व स्तरांवर गाजला. या सिनेमाचा नायक जब्या हा एक १४-१५ वर्षांचा मुलगा आहे. गावातली डुकरं पकडणे हा त्याच्या कुटुंबाचा पिढीजात धंदा. जब्याला ते काम करायचं नाही. त्याला आता शहरातली आकर्षणं खुणावताहेत. भारतात बाजारपेठ खुली झाल्यानंतर आधी प्रचंड महानगरं, मग मोठी शहरं, मग लहान शहरं आणि मग तालुक्याचं गाव अशाच गतीनं प्रगती खालपर्यंत झिरपली. जब्याचं गाव आणि कुटुंब अजूनही या प्रगतीपासून दूरच आहे. मात्र, आजूबाजूला ही प्रगती त्याला दिसते आहे. त्यालाही त्या प्रगतीची फळं चाखायची आहेत. पण समाजावर असलेली जात नावाच्या व्यवस्थेची पकड त्याला अस्वस्थ करते आहे. त्याला हवं तसं जगू देत नाही. नागराजनं या सिनेमातून स्वतःचीच कथा सांगितली आहे. बहुतेक दिग्दर्शक पहिला सिनेमा करताना स्वतःचीच गोष्ट सांगतात. त्यासाठी ते तन-मन अर्पून काम करतात. त्यामुळंच अनेकांचा पहिला सिनेमा मस्त जमून आलेला असतो. नागराजचा 'फँड्री' असाच जमून आलेला होता. मराठीत 'श्वास'नंतर सुरू झालेल्या वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाचा प्रवाह आता मोठा होत चालला होता. अनेक दिग्दर्शकांना त्यामुळं बळ मिळालं होतं. एरवी सोलापूर-नगरकडच्या ग्रामीण भागातील, कैकाडी समाजातील मुलाची ही कहाणी पडद्यावर येतीच ना! 'फँड्री'च्या शेवटी जब्या पडद्याकडं जो दगड भिरकावतो, तो केवळ प्रेक्षकालाच नव्हे, तर या चित्रपटसृष्टीलाही जागं करणारा ठरला. वेगळ्या आशयाची ही नांदी होती. 
लहान मुलांचं भावविश्व म्हणजे एका परीनं आपणच आपल्या बालपणाकडं पुन्हा डोकावून पाहणं... त्यामुळं अशा सिनेमांना प्रेक्षकवर्गही मोठ्या प्रमाणात लाभला. रवी जाधवसारख्या दिग्दर्शकानं हे हेरून 'बालक-पालक', 'टाइमपास'सारखे पौगंडावस्थेतल्या मुलांचं भावविश्व मांडणारे सिनेमे केले. 'बालक-पालक' ही पुन्हा दिग्दर्शकाची स्वतःची गोष्ट असावी, असं दिसतं. याचं कारण सिनेमा सगळा १९८५-८६ या काळात घडताना दाखविला होता. त्यामुळं त्या काळात जी मुलं १४-१५ वर्षांची होती, त्यांना त्या सिनेमातल्या पर्यावरणाची ओळख लगेचच पटली. त्यामुळंच या सिनेमाला गर्दीही वाढली. पौगंडावस्था हे तसं नाजूक वय. या वयातल्या मुलांच्या भावभावना काय असतात, हे आपल्याला माहिती आहे. मात्र, त्या थेट पडद्यावर मांडण्याचं धाडस कुणी केलं नव्हतं. मात्र, गेल्या काही वर्षांत मराठीत अगदी सहजपणे अशा आशयाचे सिनेमे काढण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यातले फारच थोडे अंतःकरणाची तार छेडू शकले. याचं कारण त्या वयातल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीबाबतच्या सुप्त आकर्षणाचंच आकर्षण बहुतेक दिग्दर्शकांना होतं. त्यामुळं बहुतेक सिनेमांचे नायक मुलगेच होते. मुलीच्या दृष्टिकोनातून या वयातली स्टोरी सांगणारी एकही गोष्ट आली नाही, ही बाब इथं आवर्जून नमूद करावीशी वाटते.
मुलग्याच्या भावविश्वाचा आणखी नेमका आलेख मांडणारा सिनेमा म्हणजे अगदी अलीकडं आलेला 'किल्ला'. हाही अविनाश अरुण या सिनेमॅटोग्राफरचा पहिलाच सिनेमा. (ही त्याची स्वतःचीच गोष्ट आहे, हे आता सांगायला नको.) वडील नसलेला हा मुलगा आईच्या बदलीमुळं पुण्यासारख्या मोठ्या शहरातून कोकणातल्या एका लहान गावात जातो. सातवीतून आठवीत गेलेला हा मुलगा अगदी पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर आणि फारच हळव्या वयात आहे. त्याची आई नोकरीच्या ठिकाणी सेटल होण्यासाठी धडपडते आहे. नायकाच्या अशा काहीशा एकाकी मनोवस्थेत सिनेमा सुरू होतो. मग हळूहळू त्याला इथं मित्र मिळतात. त्यांच्यासोबत तो एकदा त्या गावात असलेल्या एका मोठ्या भुईकोट किल्ल्यावर जातो आणि हरवतो... पुढचा सगळा प्रवास हा त्या मुलाच्या भावभावनांच्या आलेखाचा आहे. परिस्थिती माणसाला टणक बनवते, जगण्याची ऊर्मी माणसाला कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचं बळ देते असं सांगणारा हा सिनेमा आहे. यात तो मुलगा एका नावाड्याबरोबर खोल समुद्रात जातो, तो सीन पाहण्यासारखा आहे. आपल्या आयुष्यात लहानपणी अनेकदा असं घडतं. आपण काही तरी आपल्या मानानं धाडस करायला जातो, पण घर नावाचा किनारा आपल्याला कायम बांधून घेत असतो. किल्ल्याचं प्रतीकही असंच वाटतं. त्या मुलाच्या मनाचे तट किल्ल्यासारखेच अभेद्य असतात. या सिनेमाचं छायांकनही अव्वल दर्जाचं होतं. दिग्दर्शक स्वतः सिनेमॅटोग्राफर असला, की त्याला तो सिनेमा आधीच 'दिसतो' हे इथं अक्षरशः खरं वाटतं. सिनेमा हे शेवटी दृश्य माध्यम असल्यानं दृश्यमांडणीचा परिणाम सर्वांत जास्त असतो. त्या अर्थानं 'किल्ला' हा मुलांच्या भावविश्वावरचा अलीकडचा एक चांगला सिनेमा नक्कीच म्हणता येईल.
याच मालिकेत मी परेश मोकाशीच्या 'एलिझाबेथ एकादशी'चाही उल्लेख करीन. पंढरपूरच्या एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही कथा आकाराला येते. वडील नसलेली दोन मुलं आई आणि आजीसोबत पंढरपूरमध्ये एका वाड्यात राहत आहेत. आईचं विणकामाचं मशिन गहाण पडलंय आणि ते सोडवायला पैसे नाहीत. वडिलांनी मुलाला घेऊन दिलेली 'एलिझाबेथ' ही सायकल मात्र त्या कुटुंबाचा अनमोल असा ठेवा आहे. पैशांसाठी ही सायकल विकावी लागणार, असा पेच निर्माण होतो. त्यावर ही दोन लहानगी मुलं आपल्या परीनं मार्ग शोधतात, अशी ही हृद्य कथा. परेशची पत्नी आणि मूळची पंढरपूरनिवासिनी मधुगंधा कुलकर्णी हिनं या चित्रपटाची कथा लिहिली आहे. परेशच्या या सिनेमावर इराणी सिनेमाचा प्रभाव अगदी स्पष्ट दिसतो. साध्या माणसांचं साधंच जगणं त्यातल्या हळव्या-नाजूक क्षणांसह टिपणं ही इराणी दिग्दर्शकांची खासियत! परेशही या सिनेमात हे साधतो. शिवाय कथानकाला इथल्या अस्सल मातीची जोड असल्यानं हा सिनेमा वेगळीच उंची गाठतो.
मराठीत 'श्वास'नंतर जे वेगळे प्रयोग झाले, त्यात या सर्व सिनेमांचं योगदान महत्त्वाचं. याशिवाय काही उल्लेखनीय प्रयत्नही झाले. यात नितीन दीक्षित या दिग्दर्शकाच्या 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. लहान मुलांच्या स्वप्नांची एक वेगळीच दुनिया असते. आपल्याकडे विष्णूच्या दहा अवतारांची गोष्ट सांगितली जाते. तिचा उपयोग करून दिग्दर्शकानं यात लहानग्यांचं भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला होता. 'आरोही : गोष्ट तिघांची' नावाचा एक सिनेमा मध्यंतरी आला होता. त्यात केतकी माटेगावकरनं काम केलं होतं. यात गाण्याच्या स्पर्धेत चमकणाऱ्या एका मुलीची गोष्ट मांडण्यात आली होती. प्रमोद जोशी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. 'कुटुंब' या सिनेमातही अशीच स्पर्धात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबाची गोष्ट सादर करण्यात आली होती. 'आम्ही चमकते तारे' या सिनेमाचा विषयही असाच होता. 
याखेरीज काही सिनेमांमध्ये मुलांचं भावविश्व हा थेट विषय हाताळला नसला, तरी त्यात मुलांची भूमिका किंवा गरज महत्त्वाची होती. यात शिवाजी लोटन पाटील यांचा 'धग' हा सिनेमा महत्त्वाचा आहे. यातही नायकाच्या मुलाचं भावविश्व चांगल्या पद्धतीनं चितारण्यात आलं होतं. प्रमोद प्रभुलकर यांच्या 'गोड गुपित' या चित्रपटात नातवंडं आजी-आजोबांचं लग्न लावून देतात, अशी धमाल गोष्ट रंगविण्यात आली होती. 'तुझ्या-माझ्यात', 'छडी लागे छमछम', 'मामाच्या गावाला जाऊ या', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'आनंदी-आनंद' अशा काही सिनेमांतही मुलांची कामं महत्त्वाची होती. अक्षय दत्त याच्या 'आरंभ' या पहिल्याच चित्रपटात स्वतःच्या लहान मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या बापाची आणि त्याला धडा शिकवणाऱ्या आईची गोष्ट अत्यंत संयतपणे, तरलपणे मांडण्यात आली होती. 
या सर्व सिनेमांत एक अगदी वेगळा प्रयत्न म्हणता येईल, असा सिनेमा आला होता व त्याचं नाव होतं 'आम्ही असू लाडके'. अभिराम भडकमकर दिग्दर्शित या सिनेमात विशेष मुलांची गोष्ट सांगण्यात आली होती. सुबोध भावेनं यात काम केलं होतं आणि कोल्हापुरातल्या विशेष मुलांच्या संस्थेतल्या मुलांनीच यात काम केलं होतं. अभिरामचा हा सिनेमा केवळ लहान मुलांच्या नव्हे, तर अशा विशेष लहान मुलांच्या भावविश्वाचं अत्यंत मनोज्ञ दर्शन घडविणारा होता. 
'श्वास'पूर्वीही असे चांगले, मुलांचं मन जाणू पाहणारे चांगले सिनेमे आलेच होते. त्यात विशेष उल्लेख करायचा म्हणजे सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा 'दहावी फ'. चित्रपटाच्या नावावरूनच त्याचा कथाविषय स्पष्ट होतो. अभ्यासात कच्ची, सतत नापास होणारी, दुर्लक्षित अशी सगळी मुलं ई, फ अशा खालच्या तुकड्यांमध्ये असतात. अशाच एका दंगेखोर तुकडीतील वाया जाऊ पाहणाऱ्या मुलांचा एका शिक्षकाने केलेला कायापालट अशी या सिनेमाची गोष्ट होती. या गोष्टीला वास्तवातल्या एका बातमीचा आधार होता. अतुल कुलकर्णीनं यात शिक्षकाचं काम केलं होतं आणि हा सिनेमा तेव्हा (१९९७) चांगलाच चालला होता. याच जोडीच्या 'वास्तुपुरुष'मध्येही लहानग्या भास्करच्या रूपानं पौगंडावस्थेतील मुलाचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं होतं. 
याशिवाय माझा स्वतःचा एक अत्यंत आवडता सिनेमा म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी यांचा 'भेट'. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर अचानक एके दिवशी आई व तिच्या (आता मोठ्या झालेल्या) मुलाची एका लग्नात ओझरती भेट होते. त्यानंतर त्या मुलाला भेटण्यासाठी आईची जी तडफड सुरू होते, त्याची कहाणी म्हणजे हा सिनेमा. चंद्रकांत कुलकर्णी यांनी जुन्या, अभिजात मराठी कादंबरीचा लूक या सिनेमाला दिला आहे. यात अतुल कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर यांच्यासह त्या लहान मुलाचं काम करणाऱ्या अपूर्व कोरेगावे या मुलाचंही काम छान झालं आहे. रोहिणी कुलकर्णी यांच्या लघुकादंबरीवर निघालेला हा सिनेमा १९८० च्या काळातील नागपूर-इंदूर या शहरांचं दर्शन घडवतो व तेथील मराठी कुटुंबांची गोष्ट सांगतो. अगदी लहान वयातले श्रेयस तळपदे, प्रिया बापट हेही आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतात. 
तत्पूर्वी स्मिता तळवलकरांच्या 'कळत-नकळत' या चित्रपटातही दोन्ही मुलांची कामं महत्त्वाची होती. 'नाकावरच्या रागाला औषध काय' हे मृण्मयी चांदोरकर या बालकलाकारासह अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं व स्वतः अशोक सराफ यांनी गायलेलं अन् तेव्हा अतिशय गाजलेलं गाणंही याच सिनेमातलं! त्याआधीच्या काळात लहान मुलांची भूमिका असणारे भरपूर सिनेमे असले, तरी त्यांच्या भावविश्वावर केंद्रित असलेले फारच थोडे! राजा परांजपे यांचा 'हा माझा मार्ग एकला' (१९६३) या चित्रपटातून लहानग्या सचिन पिळगावकरनं पडद्यावर पदार्पण केलं होतं. या चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग हा लहान मुलगा होता. महेश कोठारे यांचंही पदार्पण बालकलाकार म्हणूनच 'छोटा जवान' (१९६३) या सिनेमातून झालं होतं. त्याहीपूर्वीचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे अर्थातच आचार्य अत्रे दिग्दर्शित 'श्यामची आई' (१९५३). या चित्रपटाविषयी वेगळं काही सांगायला नको. सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराचे सुवर्णकमळ देण्याची पद्धत त्या वर्षापासून सुरू झाली आणि हे पहिलं सुवर्णकमळ 'श्यामची आई'ने मिळविले होते, एवढे सांगितले तरी पुरे. गंमत म्हणजे त्यानंतर मराठीला सुवर्णकमळ मिळाले ते थेट ५१ वर्षांनी - 'श्वास'साठी. म्हणजेच मराठीची पहिली दोन्ही सुवर्णकमळं ही मुलांचं भावविश्व सांगणाऱ्या सिनेमांना मिळाली आहेत, हे लक्षणीय आहे.
मराठी सिनेमांत हल्ली वेगळे प्रयोग खूप होत आहेत आणि त्यात मुलांच्याही भावविश्वाचा विचार होतोय, हे नक्कीच चांगलं लक्षण आहे. अर्थात जागतिक सिनेमे पाहिले, तर आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय हे लक्षात येईल. पण प्रवास योग्य मार्गानं सुरू होणं हीच यशाची पहिली पायरी असते. मराठी सिनेमांनी त्या वाटेवर पाऊल टाकलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

---
(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक २०१७)
---

No comments:

Post a Comment