18 Dec 2018

नूतन - मोहनगरी दिवाळी अंक लेख

मुक्त-स्वच्छंद 'बंदिनी'
---------------------ती... मूर्तिमंत सोज्वळ सौंदर्य... अस्सल भारतीय, खानदानी, कुलीन चेहरा! तिच्या चेहऱ्यावर तेज होतं... तिच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांत सुंदर स्वप्नांची सैर करायचं शालीन आवाहन होतं... तिच्या हास्यात नैराश्य पळवून लावणारी आश्वासक मोहकता होती... भारतीय स्त्रीला सहसा न लाभणारी चांगली उंची तिला लाभली होतीच; पण आपल्या सहज, नैसर्गिक अभिनयाद्वारे तिनं चित्रपटसृष्टीत गाठलेली उंची अधिक उत्तुंग होती... 
ही अभिनेत्री म्हणजे नूतन! नूतन कुमारसेन समर्थ! नुसती आडनावाने नव्हे, तर खऱ्या अर्थानं समर्थ स्त्री... समर्थ, सोज्वळ, सात्त्विक आणि सुंदर! भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेल्या काही अप्रतिम अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नूतन. नूतन भारतीय स्त्रीचं साक्षात प्रतीक होती. तशीच दुसरी अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहमान! एक मराठी, तर दुसरी दाक्षिणात्य- तमिळी, पण हैदराबादमध्ये वाढलेली! एक हिंदू, तर दुसरी मुस्लिम... पण दोघींच्याही चेहऱ्यांत ते भारतीय स्त्रीचं देखणं रूप होतं. दोघींमध्येही आसेतुहिमाचल भारतवर्षाला भावणारं 'अपील' होतं. देशाच्या गंगा-जमनी परंपरेचं हे एक प्रतीकच जणू! 
या दोघींपैकी नूतननं केलेल्या सामाजिक चित्रपटांचा विचार इथं आपण करणार आहोत. कुठलीही कलाकृती सुरुवातीला त्या काळाचं 'प्रॉडक्ट' असते. पुढं त्या कलाकृतीला कालातीत असण्याचा दर्जा मिळणार की ती काळाच्या उदरात गडप होणार हेही काळच ठरवतो. तेव्हा बहुतांश कलाकृती जन्माला येताना त्यांच्यावर त्या काळाचा प्रभाव, परिणाम, शिक्का असतोच असतो. सिनेमासारख्या सामाजिक कलेच्या बाबतीत तर हे आणखीनच खरं ठरतं. नूतननं केलेल्या सामाजिक चित्रपटांचा विचार करताना त्या काळातल्या समाजजीवनाचा, सामाजिक परिस्थितीचा आणि एकूणच कलाव्यवहाराचा मागोवा घेणं अप्रस्तुत ठरणार नाही.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या भारतवर्षात एक चैतन्याचं, उत्साहाचं, आत्मविश्वासाचं सळसळतं वातावरण होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुत्सद्दी देशाला पंतप्रधान म्हणून लाभला होता. वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव काही तरी करून दाखविण्याचं स्वप्न त्यांनी इथल्या तरुणाईच्या डोळ्यांत पेरलं होतं. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सुधारणा, पायाभूत सुविधा, खेळ, कला या क्षेत्रांत नवनवे प्रयोग होते. कलाकारांसाठी तर 'नवनवोन्मेषशालिनी' वातावरण होतं. फाळणीनंतरच्या भारतात राहिलेल्या ३३ कोटी लोकांसाठी ती एका नव्या जन्माचीच सुरुवात होती. भारतात स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक सुधारणांमध्ये बंगाल आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये अग्रेसर होती. बंगालचे सुपुत्र बिमल रॉय आणि महाराष्ट्रकन्या नूतन यांनी पुढं जे 'एक से एक' चित्रपट दिले, त्याची मुळं या दोन्ही राज्यांच्या पुरोगामी परंपरेमध्ये होती. स्वातंत्र्यापूर्वीही 'अछूत कन्या'सारख्या सिनेमांद्वारे 'बॉम्बे टॉकीज'चे हिमांशू रॉय यांनी अशा सामाजिक सुधारणांना चालना देणाऱ्या सिनेमांची निर्मिती केलीच होती. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळातील दशकात या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं वेग आला. राज कपूर, मेहबूब खान, सत्यजित राय, बिमल रॉय, बी. आर. चोप्रा, व्ही. शांताराम आदी प्रमुख दिग्दर्शकांनी यात प्रामुख्यानं पुढाकार घेतला. या बहुतेकांवर नेहरू प्रणीत समाजवादी विचारसरणीचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो. राज कपूरवर चार्ली चॅप्लिनच्या शैलीचा पगडा होता, तर बंगाली दिग्दर्शकांवर बंगाली क्लासिक कादंबऱ्यांचा... यातूनच मग आवारा, श्री ४२०, दो बिघा जमीन, बूट पॉलिश, देवदास, पथेर पांचाली, सीमा, सुजाता, नया दौर, बंदिनी, दो आँखे बारह हाथ अशा चित्रपटांची निर्मिती झाली. यातले बहुतेक चित्रपट १९५१ ते १९६० या दशकात आले, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तत्कालीन सामाजिक जीवनाचं दर्शन या चित्रपटांमध्ये घडतं. आत्यंतिक गरिबी, स्त्रीला कस्पटासमान मिळणारी वागणूक, जमीनदारी व त्यातून येणारी मस्तवाल सरंजामशाही, जातिभेद, स्पृश्यास्पृश्यता अशा अनेक नकारात्मक रुढी-प्रथांनी तेव्हाचा समाज ग्रस्त होता. मुळात या काही चुकीच्या गोष्टी आहेत, याचीही जाणीव नव्हती. महाराष्ट्र व बंगालमध्ये अनेक समाजसुधारकांनी या प्रथांना कडाडून विरोध चालविला होता. जनजागृती होत होती. मात्र, ब्रिटिश राजवटीमुळं या सर्व प्रयत्नांना मर्यादा येत होत्या. स्वातंत्र्यानंतर या मर्यादा संपल्या. नेहरूंसारखा द्रष्टा नेता पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी पुढील काळात या सुधारणांना सर्व माध्यमांतून अप्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या वेग दिला. समाजातील बहुतेक सर्व घटकांनी त्यांना यात पाठिंबा दिला. एवढंच नव्हे, तर सक्रिय सहभागही घेतला. यात अर्थात लेखक, कादंबरीकार व चित्रपट दिग्दर्शकही आले. या दिग्दर्शकांना आपल्या कलाकृतींसाठी उत्तम कथा हवी होती, उत्तम अभिनेते-अभिनेत्री हव्या होत्या, उत्तम संगीत हवं होतं आणि उत्तम गीतकारही हवे होते! आपलं (आणि या दिग्दर्शकांचंही) भाग्य असं, की त्यांना नूतन मिळाली! 
नूतनचा जन्म ४ जून १९३६ चा. तिची आई अभिनेत्री शोभना समर्थ आणि पिता संगीतकार-दिग्दर्शक कुमारसेन समर्थ. नूतन उच्चभ्रू सीकेपी समाजात जन्मली. लाडाकोडात वाढली. जिला गरिबी माहिती नाही, अशा या अभिनेत्रीनं पुढच्या काळात वंचित, पददलित, असहाय अबला स्त्रियांच्या अनेक भूमिका केल्या. त्यासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. नूतनच्या अभिनय सामर्थ्याचीच ही पावती होय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पाच वेळा मिळविण्याचा विक्रम तिच्या नावावर तीस वर्षं होता. (पुढं तिचीच भाची काजोलनं त्याची बरोबरी केली.) नूतननं १९५० मध्ये 'हमारी बेटी' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि पुढची चार दशकं तिनं आपल्या दमदार अस्तित्वानं ही चित्रपटसृष्टी गाजवत ठेवली. वास्तविक तिचा पहिला चित्रपट तिच्या आईनंच दिग्दर्शित केला होता. मात्र, या चित्रपटात व पुढच्या काही चित्रपटांतही यश न आल्यानं शोभना समर्थ यांनी तिला स्वित्झर्लंडला पाठवून दिलं होतं. ते एक वर्ष आपल्या आयुष्यातलं एक संस्मरणीय वर्ष होतं, असं नूतन सांगत असे. त्यापूर्वी १९५२ मध्ये तिला 'मिस इंडिया' स्पर्धेत यश मिळालं होतं, पण चित्रपटसृष्टीत म्हणावा तसा ब्रेक मिळत नव्हता. तो तिला मिळाला १९५५ मध्ये आलेल्या अमिया चक्रवर्तींच्या 'सीमा'मुळं...

यशास 'सीमा' नुरली...

श्रीमंतीत, लाडाकोडात वाढलेल्या नूतनला या चित्रपटात साकारावी लागली 'गौरी' या अनाथ तरुणीची भूमिका. स्वतः नूतन त्या वेळी अवघी १८-१९ वर्षांची होती. काका-काकूंच्या घरी राहत असलेली, चुलीवर स्वयंपाक करणारी, श्रीमंत मालकांकडं घरकाम करणारी, तिथल्या दुष्ट नोकराच्या कारस्थानांना बळी पडणारी, पोलिसांकडून चोरीचा खोटा आळ आल्यावर संतापणारी, नंतर महिला अनाथाश्रमात दाखल झाल्यावरही अखंड धगधगत राहणारी गौरी नूतननं अशी काही कमाल उभी केली आहे, की बस्स! 
प्रेम नावाच्या भावनेलाच पारखी झालेली ही मुलगी मग अनाथाश्रमाचे संचालक अशोकबाबू (बलराज साहनी) आणि तिथंच काम करीत असलेली पुतली (क्या बात है! - शुभा खोटे यांचा पहिला चित्रपट...) यांच्या सान्निध्यानं हळूहळू कशी बदलत जाते, याची ही कथा! 'बात बात पे रुठो ना, अपने आप को लुटो ना' या हसरत जयपुरींच्या शब्दांवर, शंकर-जयकिशनच्या संगीतावर व लताच्या गोड गळ्यावर अगदी नैसर्गिक अभिनय करणारी नूतन पाहतच राहावीशी वाटते. 'तू प्यार का सागर है' या गाण्याच्या वेळी खोलीत बंद केल्यानं धुमसत असलेली नूतन केवळ लाजवाब! 'सुनो छोटी सी गुडिया की लंबी कहानी' म्हणत नूतननं तिच्या पुढच्या कारकिर्दीच्या दीर्घ यशाच्या कहाणीचं सूतोवाच जणू केलं होतं. या चित्रपटानं नूतनच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब केलं. सुरुवातीला मुलांसोबत गाणारी, नंतर काकूनं घराबाहेर काढल्यावर असहायपणे तिची विनवणी करणारी, नंतर तिला फसविणाऱ्या बांकेलालला (सी. एस. दुबे) छडीनं फोडून काढणारी, पुतलीला जीव लावणारी, बाबूजींच्या प्रेमानं विरघळणारी, मनातलं प्रेम सांगता न येणारी आणि शेवटी आश्रमाबाहेर पडलेल्या आजारी बाबूजींना परत आणण्यासाठी धाव घेणारी... गौरीची ही प्रत्येक रूपं नूतननं एवढ्या लहान वयातही विलक्षण प्रत्ययकारकरीत्या दाखविली. या चित्रपटामध्ये एक दृश्य आहे. घरातून काकूनं बाहेर काढल्यानंतर भर पावसात महात्मा गांधींच्या शिल्पाखाली पावसात भिजताना अश्रूंना मोकळी वाट करून देणारी गौरी दिसते. महात्मा गांधींची हत्या होऊन तेव्हा सहा-सात वर्षंच झाली होती. देश बापूजींच्या आठवणींनी तळमळत होता. दिग्दर्शक अमिया चक्रवर्तींनी या भावनेचा उपयोग या दृश्यात करून घेतला आहे. (त्या दशकातील बहुतेक सिनेमांत या ना त्या रूपानं महात्मा गांधींचा संदर्भ येताना दिसतो, हे लक्षात घेण्यासारखं आहे.) याखेरीज चित्रपटात तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं उत्तम प्रतिबिंब पडलेलं दिसतं. समाजात असलेली मोठी वर्गीय दरी, स्त्रियांकडं पाहण्याचा बदलत असलेला दृष्टिकोन आणि महिला अनाथाश्रमासारख्या नव्या संस्थांची वाढलेली गरज हे सगळं यात अधोरेखित असतं. यात तेव्हाची कमी गर्दी असलेली मुंबई दिसते. पुतलीचा म्हणजेच शुभा खोटेंचा सायकलीवरून चोरट्याच्या पाठलागाचा एक बराच मोठा, मसाला चित्रपटांना शोभेल असा सीन आहे. पण या सगळ्यांपलीकडं लक्षात राहतात ते बलराज साहनीसारख्या ताकदीच्या अभिनेत्यानं साकारलेले धीर-गंभीर, प्रगल्भ असे बाबूजी आणि त्यांच्यासमोर तेवढ्याच तडफेनं उभी राहिलेली अवघी १९ वर्षांची कोवळी नूतन! 
'सीमा'नं नूतनसाठी व्यावसायिक यशाची कवाडं खुली केली. या चित्रपटासाठी तिला 'फिल्मफेअर'चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला... आता यशाला 'सीमा' नुरली...!

सु-जात अन् 'सुजाता'

प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५९ मध्ये 'सुजाता' या चित्रपटाद्वारे अस्पृश्यतेच्या विषयाला स्पर्श केला. नूतननं यात साकारलेली 'सुजाता' ही कथित अस्पृश्य तरुणी सर्वांची मनं जिंकून गेली. या चित्रपटासाठी नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. भारताला स्वातंत्र्य मिळून एक दशक उलटून गेलं, तरी देशात स्पृश्यास्पृश्यतेची लज्जास्पद प्रथा अनेक ठिकाणी पाळली जात होती. बंगालसारखे पुरोगामी राज्यही याला अपवाद नव्हते. सुबोध घोष यांनी या प्रथेच्या विरोधात 'सुजाता' याच नावाची एक लघुकथा लिहिली होती. बिमल रॉय यांना त्या कथेवरून या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. नायिका म्हणून त्यांनी तोवर चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी प्रस्थापित झालेल्या नूतनला घेतलं आणि तिनं या भूमिकेचं सोनं केलं. 
उपेंद्रनाथ चौधरी (तरुण बोस) आणि चारू चौधरी (सुलोचना) या गर्भश्रीमंत ब्राह्मण जमीनदार दांपत्याला एक मुलगी असते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच गावकरी एका अनाथ बालिकेला त्यांच्याकडं घेऊन येतात. त्या कथित अस्पृश्य (सिनेमातला उल्लेख - 'नीच जात की') मुलीच्या आई-वडिलांनी तिला सोडून दिलेलं असतं. उपेनबाबूंना ही बला नको असते. आधी ते गावकऱ्यांना झिडकारतात. मात्र, नंतर नाइलाजानं त्या मुलीला घरात ठेवून घेतात. हीच मुलगी 'सुजाता'... त्यांच्याच घरात लहानाची मोठी होते. उपेनबाबू आणि चारू रमा (शशिकला) या स्वतःच्या मुलीसोबतच सुजातालाही वाढवतात. मात्र, तिची ओळख कायम 'हमारी बेटी जैसी' अशीच करून देत असतात. रमाची आत्या (ललिता पवार) तिचं लग्न अधीर (सुनील दत्त) या आपल्या नातवासोबत लावून देण्याच्या खटपटीत असते. मात्र, उपेनबाबूंच्या घरी येणारा अधीर सुजाताच्या प्रेमात पडतो. सुजाताला हे कळल्यावर ती आपण 'अस्पृश्य' असल्याचं सांगून त्याच्या प्रेमाला नकार देते. दुसरीकडं आत्या सुजाताचं लग्न एका जरठ, तोतऱ्या पात्रासोबत लावून देण्याचा घाट घालते. हे अधीरला कळल्यानंतर तो आपलं सुजातावर प्रेम असल्याचं सांगून आपण तिच्याशीच लग्न करणार असल्याचं ठामपणे सांगतो. हे ऐकून रमाची आई चारू संतापते. रागाच्या भरात ती जिन्यावरून कोसळते. तिला रक्त देण्याची वेळ येते तेव्हा फक्त सुजाताचा ब्लड ग्रुप तिच्याशी जुळतो. सुजाताचं रक्त आपल्या शरीरात आल्यानं आपला जीव वाचला हे कळल्यावर चारूचे डोळे उघडतात. त्यानंतर सुजाताचं अधीरसोबत लग्न होतं!
आज हा चित्रपट पाहताना आपण तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून हादरून जातो. आज जातीचा उघड उल्लेख करणंही इष्ट मानलं जात नाही. आपण आजच्या काळात कुठलीही जात-पात सामाजिक स्तरावर मानत नाही, पाळत नाही. तसं करणं हा कायद्यानंही गुन्हा आहे. मात्र, या चित्रपटात कथित 'अस्पृश्य' लोकांना तेव्हाचे कथित उच्चवर्णीय काय पद्धतीची वागणूक देत असत, हे पाहून मस्तक भणभणून जातं. सुजाताच्या दुःखाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. अर्थात बिमलदांच्या परंपरेनुसार त्यांनी या चित्रपटाद्वारे अस्पृश्यतेच्या रुढीवर आसूडच ओढले आहेत. याही चित्रपटात नायकाच्या तोंडून महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाविषयी ऐकायला मिळतं. नायकाच्या घरात रवींद्रनाथ, नेताजी आणि गांधीजींच्या तसबिरी असतात. नायक उच्चभ्रू आणि श्रीमंत असतो. नायिकेच्या पालकांच्या घरीही उच्चभ्रू वातावरण असतं. मात्र, तरीही तिच्या नशिबी दर वेळी वेगळी वागणूक येते. तिला 'अछूत' किंवा 'नीच जात' म्हणताना कुणालाही काही वावगं वाटत नाही. फक्त नायक तिचा एक माणूस विचार करतो. त्याच्याच तोंडून शेवटी पुरोगामी विचार ऐकायला मिळतात आणि दिग्दर्शकाला या चित्रपटातून द्यायचा संदेश योग्य रीतीने पोचतो. 
या चित्रपटाला बिमलदांचे लाडके संगीतकार सचिनदेव बर्मन यांचंच संगीत होतं. 'सुनो मेरे बंधू रे, सुनो मेरे मितवा' हे सचिनदांच्याच आवाजातलं यातलं गाणं आजही लोकप्रिय आहे. तलत मेहमूदच्या तलम आवाजातलं 'जलते हैं जिस के लिए तेरी आँखों के दिए' हे अप्रतिम टेलिफोनिक गाणं याच चित्रपटातलं... 'काली घटा छाए मोरा जिया तरसाए' हे आशा भोसलेंचं एव्हरग्रीन गाणंही यात पाहायला मिळतं. या गाण्यातला नूतनचा हसरा चेहरा आणि अप्रतिम मुद्राभिनय डोळ्यांसमोर हटता हटत नाही. (आणखी एक योगायोग म्हणजे या चित्रपटातील चारही मुख्य अभिनेत्री - नूतन, सुलोचना, ललिता पवार व शशिकला - मराठी आहेत.)
नूतननं यात साकारलेली 'सुजाता' म्हणजे तत्कालीन पददलित स्त्रीच्या जीवनाचा आरसाच! वास्तविक नूतन अतिशय श्रीमंतीत लहानाची मोठी झालेली. आई मोठी अभिनेत्री, वडील दिग्दर्शक. गरिबी तिला कधीच माहिती नाही. मात्र, 'सीमा' असो वा 'सुजाता', समाजातल्या तेव्हाच्या खालच्या स्तरातल्या नायिकांच्या भूमिका तिनं फार समरसून केल्या. त्यांचं जगणं तिनं कसं समजून घेतलं असेल, या बायकांच्या जीवनाविषयी तिनं कसं जाणून घेतलं असेल, याचं कुतूहल वाटतं. केवळ अभिनयाच्या जोरावर ही गोष्ट साध्य होईल, असं वाटत नाही. त्यासाठी मुळातच अंतःकरणात संवेदनशीलतेचा झरा खळाळत वाहता असावा लागतो. नूतनकडं ही संवेदनशीलता होती, यात शंका नाही. त्यामुळंच ती प्रातिनिधिक भारतीय स्त्री रूपेरी पडद्यावर रेखाटू शकली. जात, धर्म, वर्ण, वर्ग आदी भेद सोडून तमाम भारतीय स्त्रियांना ती आपलीशी वाटली, यातच तिचं खरं यश आहे.


नच ‘बंदिनी’, मी मुक्ता...

नूतननं नौदलात लेफ्टनंट कमांडर असलेल्या रजनीश बहल यांच्याशी ११ ऑक्टोबर १९५९ रोजी लग्न केलं. तिचा एकुलता एक मुलगा मोहनीश याचा जन्म १९६१ मध्ये झाला. त्यानंतर तिनं चित्रपटांत काम करणं जवळपास थांबवलंच होतं. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. बिमल रॉय यांना चारुचंद्र चक्रवर्ती उर्फ ‘जरासंध’ यांच्या ‘तामसी’ या कादंबरीवर चित्रपट करायचा होता. चारुचंद्र चक्रवर्ती बंगालमधील कारागृह अधीक्षक होते आणि त्यांनी आपल्या अनुभवांवर आधारित अनेक काल्पनिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी ‘तामसी’वर चित्रपट करायचं बिमल रॉय यांनी ठरवलं. यातल्या कल्याणीच्या भूमिकेसाठी त्यांनी आधी वैजयंतीमालाला विचारलं. वैजयंतीमालानं बिमल रॉय यांच्या ‘देवदास’ व ‘मधुमती’मध्ये आधी काम केलं होतं. त्यामुळं कल्याणीच्या भूमिकेसाठी त्यांच्या मनात पहिलं नाव तिचंच आलं. मात्र, वैजयंतीमाला त्या वेळी अन्य चित्रपटांत व्यग्र असल्यानं तिनं हा चित्रपट नाकारला. मग बिमल रॉय यांच्या मनात नाव आलं ते नूतनचंच! नूतननंही आधी त्यांच्याकडे ‘सुजाता’मध्ये काम केलंच होतं. मात्र, लग्नानंतर तिनं चित्रपटांत काम करणं थांबवलं होतं. पण बिमल रॉय यांच्या आग्रहावरून तिनं ‘बंदिनी’ स्वीकारला आणि पुढं अक्षरशः इतिहास घडला! हा चित्रपट बिमल रॉय यांचा शेवटचाच चित्रपट ठरला आणि त्यांच्या कारकिर्दीतला तो सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. नूतनच्या कारकिर्दीतही ‘कल्याणी’ ही भूमिका तिच्या सर्वांत उत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानली जाते.
बंदिनी चित्रपट आला, तो १९६३ मध्ये. त्यातली कथा पुन्हा त्या काळाच्याही आधी तीस वर्षांपूर्वीची, म्हणजे १९३४ मधली. देश पारतंत्र्यात होता. चित्रपटाची कथानायिका कल्याणी तुरुंगात खुनाच्या आरोपाखाली असते. हा खून तिनंच केलेला असतो का, का केलेला असतो, या प्रश्नांची उत्तरं फ्लॅशबॅकमध्ये मिळतात. तुरुंगात येणारा तरुण डॉक्टर देवेन (धर्मेंद्र) कल्याणीच्या प्रेमात पडतो. मात्र, कल्याणीच्या भूतकाळामुळं तिला हे प्रेम स्वीकारणं कठीण जातं आणि ती देवेनपासून लांब राहायला लागते. कल्याणी ही बंगालमधील एका खेड्यात राहणाऱ्या देशभक्त पोस्टमास्तरची (राजा परांजपे) मुलगी असते. या पोस्टमास्तरांनी स्वातंत्र्यसैनिक बिकाश (अशोककुमार) याला आश्रय दिलेला असतो. बिकाश भूमिगत होऊन पोस्टमास्तरांच्या घरी राहत असताना त्याचं व कल्याणीचं प्रेम जमतं. पुढं बिकाशला ते गाव सोडून जावं लागतं, तेव्हा तो कल्याणीला पुन्हा येऊन, लग्न करून घेऊन जाण्याचं वचन देतो. मात्र, तो काही परत येत नाही. कल्याणी व तिच्या वडिलांना समाजाकडून क्रूर वागणूक मिळते. त्यानंतर कल्याणी शहरात जाण्याच निर्णय घेते. तिथं तिच्या मैत्रिणीकडं ती जाते. मात्र, तिथूनही तिला जावं लागतं. अखेर एका महिलेची केअरटेकर म्हणून तिला काम मिळतं. ही महिला बिकाशची पत्नी आहे, हे कळल्यावर कल्याणी कोलमडते... पुढं अशा काही घटना घडत जातात, की त्यामुळं कल्याणीला 'बंदिनी' व्हावं लागतं...
बिमल रॉय यांच्या या चित्रपटात प्रथमच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तत्कालीन ग्रामीण स्त्रियांच्या योगदानाचं चित्रण दिसून येतं. स्त्री वेगवेगळ्या रूपांत 'बंदिनी' म्हणून कसं जीवन जगत होती, याचं प्रतीकात्मक दर्शन ते यातून घडवतात. बिमल रॉय यांनी स्त्रीप्रधान चित्रपट तयार केले आणि त्यापैकी 'बंदिनी' हा मास्टरपीस मानला जातो तो त्यातल्या वास्तववादी चित्रणामुळं... या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि संगीत अत्युच्च दर्जाचं होतं. सिनेमॅटोग्राफर कमल बोस यांनी 'बंदिनी'ची विविध रूपं कृष्णधवल रंगांत विलक्षण प्रत्ययकारकरीत्या टिपली आहेत. सचिनदेव बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिलंय. 'मेरे साजन हैं उस पार' हे स्वतः सचिनदांनी गायलेलं गाणं अतिशय गाजलं. प्रख्यात गीतकार गुलजार यांचं पहिलं चित्रपटगीत 'मोरा गोरा अंग लइ ले' (लता मंगेशकर) याच चित्रपटातील! 
धर्मेंद्र आणि अशोककुमार या दोघांनीही यातल्या भूमिका फार चांगल्या पद्धतीनं निभावल्या आहेत. पण या सर्वांहून प्रभावी ठरली ती नूतनची 'कल्याणी'. भारतीय स्त्रीची 'हृदयी पान्हा, नयनी पाणी' ही 'जन्मोजन्मीची कहाणी' नूतननं उभ्या केलेल्या कल्याणीच्या माध्यमातून आपल्यासमोर सगुण साकार होते. दुःख आणि वेदनेचा सागर पोटात घेऊन चेहऱ्यावर हास्य उमलवत ठेवणाऱ्या कल्याणीच्या दर्शनानं प्रेक्षक म्हणून आपण अवाक होतो. आयुष्यात पराकोटीचा अपेक्षाभंग, मानहानी, कडवटपणा सोसून पुन्हा या सगळ्यांवर मात करून आपल्या प्रेमासाठी सर्वस्व अर्पण करायला निघालेली भारतीय नारी नूतनच्या रूपात इथं भेटते. भारतीय स्त्रीची 'बंदिनी' म्हणून असलेली अशी विविध रूपं बिमलदांनी फार सुंदर पद्धतीनं या चित्रपटात मांडली आहेत. त्यामुळंच त्यांचा हा चित्रपट 'ऑल टाइम क्लासिक' मानला जातो. 

सरस्वतीचंद्र व मैं तुलसी तेरे आंगन की...

'बंदिनी'नंतर नूतनच्या लक्षात राहणाऱ्या दोन महत्त्वाच्या सामाजिक भूमिका होत्या त्या 'सरस्वतीचंद्र' (१९६८) आणि 'मैं तुलसी तेरे आंगन की' (१९७८) या दोन चित्रपटांमधल्या. 'सरस्वतीचंद्र' ही प्रसिद्ध गुजराती लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांनी लिहिलेली कादंबरी. एकोणिसाव्या शतकातील सरंजामशाहीचा काळ यात आहे. गोविंद सरैय्या दिग्दर्शित हा चित्रपट हिंदीमधला शेवटचा कृष्णधवल चित्रपट ठरला. मनीष नावाच्या कलाकाराने यात नायकाची भूमिका केली होती. त्याचं नामोनिशाणही आज कुठं शिल्लक नाही. लक्षात राहते ती 'मैं तो भूल चली बाबूल का देस, पिया का घर प्यार लगें' या गाण्यावर गरबा खेळणारी सुंदर नूतन. नूतनचं वैशिष्ट्य म्हणजे ती भारतातल्या कुठल्याही प्रांतातील स्त्री वाटू शकायची. तिच्या अभिनय कौशल्याचाही त्यात भाग होता, याद वाद नाही. 'सरस्वतीचंद्र'मधली सगळीच गाणी खूप गाजली. कल्याणजी-आनंदजी यांच्या कारकिर्दीतला हा एक महत्त्वाचा चित्रपट. 'चंदन सा बदन' हे मुकेश यांचं अजरामर गीत याच चित्रपटातलं... या चित्रपटात रमेश देव यांचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटाच्या यशामुळं नूतन नायिका म्हणून एकटीच्या जोरावर हिट चित्रपट देऊ शकते, हे सिद्ध झालं. 


मैं तुलसी तेरे आंगन की...

'मैं तुलसी तेरे आंगन की' हा १९७८ मध्ये आलेला चित्रपट. या चित्रपटातील संयुक्ता चौहानच्या करारी भूमिकेनं नूतनला तिच्या कारकिर्दीतला पाचवा व अखेरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. प्रख्यात दिग्दर्शक राज खोसला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चंद्रकांत काकोडकर यांच्या 'अशी तुझी प्रीत' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. त्यामुळं राज भारती, डॉ. राही मासूम रझा, सूरज सनीम यांच्यासह चंद्रकांत काकोडकर व ग. रा. कामत यांनी या चित्रपटाचं लेखन केलं होतं. नूतनसोबत या चित्रपटात विनोद खन्ना, आशा पारेख, विजय आनंद, देव मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि लता मंगेशकरांनी गायलेलं शीर्षकगीत खूप गाजलं. चित्रपटाची कथा काकोडकरांच्या कादंबरीवर आधारित म्हणजे टिपिकल कौटुंबिक मसाला टाइप होती. मात्र, नूतननं संयुक्ता चौहानच्या भूमिकेत जीव ओतून काम केलं. त्यामुळं वयाच्या ४२ व्या वर्षीही तिला मुख्य अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळविणारी ती सर्वांत वयस्कर अभिनेत्री ठरली. या चित्रपटासाठी नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री या दोन्ही गटांत नामांकन मिळालं होतं. आशा पारेखलाही याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकन मिळालं होतं. मात्र, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार रीना रॉयला 'अपनापन' चित्रपटासाठी देण्यात आला. गंमत म्हणजे आपली भूमिका सहायक अभिनेत्रीची नसून, मुख्य अभिनेत्रीची आहे, असे सांगून रीनानं तो पुरस्कार चक्क नाकारला होता. 'मैं तुलसी तेरे आंगन की' त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. 

'अनाडी' ते 'कर्मा'

नूतननं इतरही काही महत्त्वाच्या सामाजिक चित्रपटांतील भूमिका केल्या. 'अनाडी' हा हृषीकेश मुखर्जींचा सिनेमा नूतनच्या हिट चित्रपटांपैकी एक. यातली तिची श्रीमंत आरती सोहनलालची भूमिका गाजली. यात राज कपूर तिचा नायक होता. यातली शंकर-जयकिशन यांची गाणी अप्रतिम होती. 'वो चांद खिला' किंवा 'बन के पंछी' ही नूतनवर चित्रित झालेली गाणी रसिकांच्या आजही लक्षात आहेत. राज कपूरसोबतचाच 'छलिया' (१९६०) हा मनमोहन देसाई दिग्दर्शित चित्रपट नूतनच्या सामाजिक चित्रपटांपैकी आणखी एक. यात फाळणीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या झालेल्या जोडप्याची कहाणी होती. नूतननं यातली शांतीची भूमिका नेहमीप्रमाणे जीव ओतून केली होती. मनमोहन देसाईंचा हा पहिला चित्रपट. त्यांच्या 'लॉस्ट अँड फाउंड' फॉर्म्युल्याची सुरुवात याच चित्रपटापासून झाली, असं म्हणायला हरकत नाही. 'बाजे पायल छुम छुम', 'डम डम डिगा डिगा', 'छलिया मेरा नाम' ही यातली गाणी गाजली. या चित्रपटासाठी संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचे सहायक होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल... 
देवआनंदसोबत नूतनची जोडी चांगलीच जमली होती. 'पेइंग गेस्ट' आणि 'तेरे घर के सामने' हे त्यातले ठळक गाजलेले चित्रपट. 'तेरे घर के सामने' या चित्रपटातील शीर्षक गीतात मद्याच्या प्याल्यात हसताना दिसणारी नूतन विसरणं शक्य नाही.
इतर वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमध्ये नूतननं 'सौदागर' (१९७३) या चित्रपटात अमिताभ बच्चनची नायिका म्हणून काम केलं होतं. नव्वदच्या दशकात नूतन चरित्र भूमिका करू लागली. त्यापैकी 'मेरी जंग' (१९८५) आणि 'नाम' व 'कर्मा' (१९८६) विशेष गाजले. 'कर्मा'चं वैशिष्ट्य म्हणजे नूतननं प्रथमच दिलीपकुमार यांच्यासोबत काम केलं. वास्तविक तरुणपणी या जोडीनं काही चित्रपट करायला हवे होते, असं रसिकांना वाटल्यावाचून राहत नाही.

अत्यंत संवेदनशील, देखण्या अशा या अभिनेत्रीचा कर्करोगामुळं १९९१ मध्ये वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी अकाली अंत झाला. नूतन आज असती, तर ८२ वर्षांची असती. आजच्या पिढीतल्या शाहरुख, आमीर, अक्षय किंवा रणबीर कपूरसारख्या नव्या अभिनेत्यांसोबतही ती त्याच तडफेनं काम करत राहिली असती कदाचित... आणि त्यांची आजी म्हणूनही ती सर्वांत सुंदरच दिसली असती!
नूतनला एकदा पाहणारा माणूस तिला विसरणं अशक्य. आपल्याजवळ तर तिच्या असंख्य चित्रचौकटींचा खजिना आहे. त्यातली एखादी देखणी फ्रेम पाहताना मन भरून येतं.... डोळे झरू लागतात... ही भावना प्रेमाची असते, कृतज्ञतेची असते! अशा वेळी शांत मनाने मग मोकळ्या हवेत यावं... बाहेर आकाश चांदण्यांनी लगडलेलं असतं... 'वो चाँद खिला वो तारे हसें, ये रात अजब मतवाली है' आठवतं अन् मन कुठल्याशा अनाम भावनेनं उजळून, तेजाळून निघतं... तेव्हा आकाशात एक चांदणी जरा जास्तच तेजानं लखलखत असते...!

---

(पूर्वप्रसिद्धी : मोहनगरी दिवाळी अंक २०१८)
---

No comments:

Post a Comment