29 Nov 2021

अक्षरदान दिवाळी अंक २०२१ - लेख

लेखणी मेकअप करते तेव्हा...
-----------------------------------

चित्रपटकला आणि लेखक किंवा साहित्यिक यांचा संबंध या कलेच्या सुरुवातीपासूनच आहे. चित्रपटकला ही विसाव्या शतकाची देणगी. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे ही कला जन्माला आली. लेखन किंवा सर्जनाची प्रक्रिया मात्र त्यापूर्वी किती तरी वर्षांपासून चालत आलेली आहे. तेव्हा चित्रपटात काम करणारे साहित्यिक किंवा लेखक यांचा संबंध किती घनिष्ठ असेल, याची कल्पना आपण करू शकतो. लेखकांनी कथा लिहायची, दिग्दर्शकांनी चांगल्या अभिनेत्यांना घेऊन सिनेमा तयार करायचा अशी सर्वसाधारण पद्धत. अभिनय करता येणे ही अगदीच वेगळी कला आहे. त्यासाठी वेगळी प्रतिभा लागते. तीच गोष्ट लेखनकलेची. मात्र, या दोन्ही कला प्रसन्न असलेले काही थोर कलावंत आपल्याकडे होऊन गेले. त्यामुळे त्यांनी सिनेमा लिहिला पण आणि त्यात काम पण केले. याशिवाय पाहुणे कलाकार म्हणून झळकणारे लेखक, साहित्यिक तर आहेतच.

मराठीत सर्वांत प्रथम नाव आठवतं ते पु. ल. देशपांडे यांचं. पु. ल. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चित्रपट क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं. 'गुळाचा गणपती' हा सबकुछ पु. ल. चित्रपट होता. यात पुलंचीच कथा होती, पटकथा होती, संगीतही होतं आणि नायकाची भूमिकाही त्यांनी केली होती. याखेरीज पु. ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी नायक-नायिका म्हणून वंदे मातरम् या चित्रपटात सुरुवातीला काम केलं होतं. पुलंनी तर अनेक नाटकांत, चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते लेखक म्हणून अधिक नावारूपाला आले. त्यानंतर दीर्घ काळाने त्यांनी एक होता विदूषक (१९९३) या चित्रपटासाठी पुन्हा पटकथा लेखन केलं होतं.

आचार्य अत्रे हेदेखील असेच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक नाटके लिहिली, चित्रपट केले. मात्र, त्यांनी स्वतः व्यावसायिक भूमिका कधी केल्या नाहीत. मात्र, श्यामची आई या चित्रपटात त्यांनी चक्क प्रबोधनकार ठाकरे यांना झळकावलं होतं. यात प्रबोधनकार अगदी छोट्या भूमिकेत दिसले होते.

ग. दि. माडगूळकर म्हणजे महाराष्ट्राचे महाकवी. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखन, गीतलेखन केलं. अगदी सुरुवातीला मा. विनायक यांच्या ब्रह्मचारी या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका केली होती. याशिवाय १९४७ मध्ये आलेल्या लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातही त्यांनी अगदी लहान भूमिका केली होती. मात्र, वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका करताना रसिकांनी बघितलं, तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला होता. गदिमांनी यातील कन्नड माणसाच्या विनोदी भूमिकेत धमाल केली होती. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट व पेडगावचे शहाणे या चित्रपटांतही गदिमांनी भूमिका केल्या होत्या. वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात दिग्दर्शक राजदत्त यांनी शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार या तेव्हाच्या प्रसिद्ध लेखकत्रयीला पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत झळकवलं होतं. द. मा. मिरासदार यांनी अनेक चित्रपटांचं पटकथा लेखन केलं. त्यापैकी 'एक डाव भुताचा' या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी स्वतः हेडमास्तरची भूमिका केली होती, हे अनेक चित्ररसिकांच्या स्मरणात असेल. 'द. मां.'चे नुकतेच निधन झाले, तेव्हाही या आठवणींना उजाळा मिळाला होता.

वास्तविक, ना. सी. फडके, पु. भा. भावे, वसंत कानेटकर ही सर्वच लेखकमंडळी दिसायला देखणी व रुबाबदार होती. मात्र, त्यांनी त्या काळात चित्रपटात किंवा नाटकात कुठे काम केल्याची नोंद नाही. क्वचित केल्याच असतील, तर हौशी भूमिका एखाद्या प्रयोगात केल्याही असतील. मात्र,  पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगूळकर हे दोघेही याला सणसणीत अपवाद ठरले. पुढे दादा कोंडके यांनी हा वारसा चालविला. दादा हे रूढार्थाने प्रस्थापित लेखक नसले, तरी शाहीर होते. ते स्वतः उत्तम गीते लिहीत असत. त्यांच्या चित्रपटांतील द्व्यअर्थी संवाद व गाण्यांची नकारात्मक चर्चा खूप झाली. परंतु 'अंजनीच्या सुता...'सारखं अतिशय उत्कृष्ट गीत दादांनी लिहिलं आहे, हे विसरता कामा नये.

त्यानंतर दीर्घकाळ लेखक मंडळींचं दर्शन रूपेरी पडद्यावर झालं नाही. अगदी अलीकडे लेखकांना पडद्यावर झळकवण्याचा मान मिळविला तो सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी. त्यांच्या नितळ या चित्रपटात त्यांनी थेट विजय तेंडुलकरांना एक छोटी भूमिका दिली होती. तेंडुलकरांनीही नायिकेच्या आजोबांची ही छोटेखानी भूमिका फार सुंदर केली होती. त्याआधी वास्तुपुरुष या चित्रपटात सुमित्राताईंनी महेश एलकुंचवार यांना रूपेरी पडद्यावर पेश केलं होतं. यातील भास्कर या पात्राची मोठेपणीची भूमिका एलकुंचवार यांनी साकारली होती. या चित्रपटाचं कथानक आणि एलकुंचवार यांची वाडा नाट्यत्रयी यांचा जैव संबंध असल्यानं या चित्रपटात एलकुंचवारांचं असणं फारच सूचक व महत्त्वाचं होतं. अवलिया लेखक अनिल अवचट हेदेखील असंच बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विविध कलागुणांचा वापर त्यांच्या जवळच्या स्नेही असलेल्या सुमित्राताईंनी वास्तुपुरुष चित्रपटात करून घेतला होता. यात चित्रपटाच्या सुरुवातीला येणारं एक स्तोत्र अनिल अवचट यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतलं. चित्रपटात येणारी बासरी अनिल अवचट यांनीच वाजविली आहे. नंतर एक कप च्या या चित्रपटात सुमित्राताईंनी थेट कमल देसाईंना छोटी भूमिका दिली होती. त्यांना या चित्रपटात आजीच्या भूमिकेत बघणं हा त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. सुमित्रा भावे स्वतः समाजशास्त्रज्ञ व लेखिका होत्याच. मात्र, त्यांनी स्वतः भूमिका कुठे केली नाही. अगदी अलीकडं चैतन्य ताम्हाणे यानं त्याच्या 'डिसायपल' या चित्रपटात सुमित्रा भावे यांच्या आवाजाचा निवेदनासाठी चपखल वापर करून घेतला होता. दुर्दैवानं तो सुमित्रा भावे यांचा शेवटचाच चित्रपट ठरला.

लेखक आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांत रमणारं आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे दिलीप प्रभावळकर. चित्रपटांत ब्रेक मिळण्यापूर्वीपासूनच प्रभावळकर लेखन करीत होते. क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा विषय. शिवाय मुलांसाठीही त्यांनी विपुल साहित्य लिहिलं आहे. चिमणराव व गुंड्याभाऊ या मालिकेपासून त्यांची अभिनयाची मोठी व प्रदीर्घ कारकीर्द सुरू झाली. मात्र, त्यांचं लेखनही सोबतच सुरू राहिलं. अनुदिनी या वृत्तपत्रीय स्तंभावरून तयार झालेली श्रीयुत गंगाधर टिपरे ही टीव्ही मालिका म्हणजे प्रभावळकरांच्या दोन्ही क्षेत्रांतील हुकुमतीचं दर्जेदार उदाहरण आहे. लेखक व अभिनेते म्हणून दोन्ही क्षेत्रांत त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. 'बोक्या सातबंडे' हा त्यांचा मानसपुत्र आणि त्याच्या करामती यांचा उल्लेख केल्याशिवाय मराठी बालसाहित्याचा इतिहास सांगणं अशक्य आहे.
प्रभावळकरांसारखंच दोन्ही क्षेत्रांत दमदार कामगिरी करणारं अलीकडच्या काळातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी व अभिनेता सौमित्र ऊर्फ किशोर कदम. किशोर हा जेवढा प्रतिभाशाली कवी आहे, तेवढाच तो दमदार अभिनेता आहे. गारवा हा अल्बम गाजल्यानंतर सौमित्रचं नाव सर्व महाराष्ट्राला माहिती झालं. त्यानंतर जोगवा ते अलीकडच्या 'दिठी'पर्यंत अभिनयातही त्याचं नाव दुमदुमतं आहे. किशोरप्रमाणंच असंच एक जोरदार नाव म्हणजे नागराज मंजुळे. नागराज मूळचा कवी. त्याच्या कविता अतिशय संवेदनशील आहेत. चित्रपटात तो नंतर आला. आपल्या चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसतो. मात्र, दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी अतिशय वरच्या दर्जाची आहे.
याशिवाय अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, (थोरली) सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, हृषीकेश जोशी, किरण यज्ञोपवित ही सर्व मंडळी उत्तम लेखक आहेत. यांच्यावर केवळ अभिनेता किंवा नाटककार म्हणून शिक्का मारणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. यातल्या मृणाल कुलकर्णीच्या तर घरातच साहित्याचा वारसा आहे. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर हे तिचे आजोबा. आई वीणा देव मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका. तो वारसा मृणालकडे आपोआपच आला आहे. हृषीकेशदेखील विपुल लिहीत असतो. उत्तम विनोदी नटाप्रमाणेच उत्तम विनोदी लेखक होण्याची मोठी क्षमता त्याच्यात आहे. सोनाली कुलकर्णीही विविध वृत्तपत्रांतून स्तंभांद्वारे लेखन करत असते. हे लोक आधीपासूनच उत्तम लिहिणारे होते आणि नंतर त्यांनी अभिनयाची वाट चोखाळली, असंही म्हणता येईल. अभिराम भडकमकर लेखक, कादंबरीकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. महेश कोठारे यांच्या 'पछाडलेला' या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार करता, मीनाकुमारीपासून ते दीप्ती नवलपर्यंत अनेक अभिनेत्रींची उदाहरणे सांगता येतील. मीनाकुमारी उत्तम शायरा होत्याच. त्यांच्या लिखाणात एक खोल 'दर्द' आहे. मीनाकुमारी यांना चित्रपटाच्या पडद्यावरही 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणूनच ओळखलं गेलं. त्या चित्रपटसृष्टीत फार काळ रमल्या नसत्या, तर एक उत्तम लेखिका, शायरा, गझलकार म्हणूनही प्रसिद्ध झाल्याच असत्या, यात वाद नाही. दीप्ती नवलही उत्तम लेखिका, कवयित्री आहे. तिच्या सर्व भूमिकांप्रमाणेच तिची ही लेखिका म्हणून भूमिकाही तिच्या चाहत्यांना आवडते. अगदी अलीकडच्या काळातलं, जरा उलटं उदाहरण द्यायचं तर ट्विंकल खन्नाचं देता येईल. अभिनेत्री म्हणून अपयशी कारकिर्दीनंतर ट्विंकलनं लेखनाकडं लक्ष वळवलं. आज ती इंग्लिशमधील उत्तम विनोदी लेखन करणारी यशस्वी लेखिका म्हणून गणली जाते. तिचं पुस्तकही प्रसिद्ध झालं आहे.
प्रसिद्ध लेखक-गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांना घेऊन बासू भट्टाचार्य यांनी सत्तरच्या दशकात 'असमाप्त कविता' नावाचा चित्रपट करायला घेतला होता. यात गुलजार यांची नायिका शर्मिला टागोर असणार होती. गुलजार यांना यात एका प्रकाशकाची भूमिका करायची होती. मात्र, काही रिळं शूटिंग झाल्यावर हा चित्रपट डब्यात गेला आणि नायक म्हणून पदार्पण करण्याचं गुलजार यांचं स्वप्न अधुरंच राहिलं. शीर्षकाप्रमाणेच हा सिनेमाही 'असमाप्त'च ठरला. मात्र, बासू भट्टाचार्य यांनी नंतर १९७७ मध्ये 'गृहप्रवेश' या चित्रपटाच्या वेळी गुलजार यांना पडद्यावर झळकावलंच. याखेरीज एन. चंद्रा यांच्या 'वजूद' नावाच्या चित्रपटातही गुलजार यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
अलीकडच्या काळातील ठळक नाव म्हणजे पीयूष मिश्रा. पीयूष मिश्रा हे नाटकातलं बहुरंगी-बहुढंगी व्यक्तिमत्त्व. गीतकार म्हणून नाव कमावल्यानंतर पीयूष मिश्रांनी अनेक चित्रपटांतून लहान-मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा चेहरा आता सिनेरसिकांना चांगलाच परिचित आहे. गुलाल, तेरे बिन लादेन, गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत. असेच आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे इंदूरचे मूळ मराठी स्वानंद किरकिरे. प्रसिद्ध गीतकार असलेल्या स्वानंद किरकिरेंनी पडद्यावरही अनेक भूमिका केल्या आहेत. अगदी अलीकडे आलेल्या चुंबक नावाच्या मराठी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय 'भाई : व्यक्ती आणि वल्ली' या चित्रपटात त्यांनी कुमार गंधर्वांची छोटीशी भूमिका केली होती.
याखेरीज अनेक लेखक, साहित्यिकांना कधी गमतीत, तर कधी गांभीर्याने कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचं धैर्य दाखवलं आहे. त्यातले काही चित्रपट डब्यात गेले असतील, तर काही विस्मरणात गेले असतील. या लेखातही सर्वांचा आढावा घेणं अशक्य आहे. काही नावं विस्मृतीत गेलेली असू शकतात, तर काही नोंदी नोंदवायच्या राहून गेलेल्या असतील. मात्र, यापैकी काही प्रतिभाशाली मंडळींचं स्मरण यानिमित्तानं करता आलं, यामुळं माझ्यासाठी तरी ही आनंदाची स्मरणयात्रा ठरली आहे, यात वाद नाही.

----


(पूर्वप्रसिद्धी : अक्षरदान दिवाळी अंक २०२१)


---


No comments:

Post a Comment