30 Jan 2022

दृष्टी-श्रुती दिवाळी अंक २०२१ - लेख

माझ्या तीन हिरोंची गोष्ट...
------------------------------

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतल्यानं लहानपणापासूनच सतत मान वर करून कुठल्या ना कुठल्या आदर्शांकडं बघायची सवयच लागली. आयुष्यात त्याच्यासारखं झालं पाहिजे, याच्यासारखं दिसलं पाहिजे, अमक्यासारखं मोठं झालं पाहिजे, तमक्यासारखं कमावलं पाहिजे, ढमक्यासारखं जगता आलं पाहिजे, या आणि अशाच 'अटी व शर्ती लागू'चा स्टार जन्मापासूनच आपल्या नावापुढं गोंदला जातो. संस्कार नावाची आणखी एक फार महत्त्वाची भानगड लहान वयातच आयुष्यात उपस्थित झाली होती. 'आपल्याकडं असं करत नाहीत,' हे तर आपल्या जीवनगाण्याचं ध्रुवपदच! तेव्हा त्या काळात जे हिरो वाटले, ते नक्की आपल्याला मनापासून वाटले, की या संस्कारांमुळं हेच आपले हिरो असं वाटलं, हे आता सांगता येणं कठीण आहे.
पं. जवाहरलाल नेहरू हे अगदी लहान वयातले माझे पहिले हिरो. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्याप्रमाणेच माझा जन्मही १४ नोव्हेंबरचा. त्यामुळं अगदी लहान वयापासून वाढदिवसाच्या वेळी नेहरूंची आठवण कुणी ना कुणी काढायचंच. माझा जन्म झाला तेव्हा नेहरूंना जाऊन अवघी ११ वर्षं झाली होती. माझ्या आईचे नेहरू हे फार लाडके होते. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या व वाढलेल्या पहिल्या पिढीची ती प्रतिनिधी असल्यानं त्या पिढीबाबत हे अगदी स्वाभाविक होतं. नेहरू गेले तेव्हा आपण ती बातमी रेडिओवर कशी ऐकली आणि नंतर दिवसभर कशा रडत होतो याची हकीकत आईकडून अनेकदा ऐकली होती. नेहरूंच्या मुलीची देशात सत्ता असताना मी शाळा शिकायला सुरुवात केल्यानं इतिहासात नेहरूंबाबतचे धडे आणि एकूणच त्यांची थोरवी मी सतत वाचत आणि ऐकत होतो. नंतरही शाळेमध्ये बालदिन साजरा करताना, त्यांच्याविषयीची भाषणं करताना आणि ऐकताना 'चाचा नेहरूं'विषयीचं माझं प्रेम ओसंडून वाहत असे. मी पुढं नगरला शिकायला आलो तेव्हा १९८९ मध्ये नेहरूंची जन्मशताब्दी आली. नेहरूंचा नातू तेव्हा देश चालवीत असल्यानं देशभर अगदी जोरदारपणे ही जन्मशताब्दी साजरी झाली. शाळाशाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. 'अपना उत्सव' नावाचा एक मोठा उत्सव साजरा होत होता. लालटाकी इथं नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं सुंदर कारंजंही होतं त्या काळी. समोरच अप्पू हत्तीचा एक पुतळा होता. तिथं झालेल्या कार्यक्रमात आम्ही नववीची मुलं सहभागी झाल्याचं आठवतंय. त्यात नगरच्या किल्ल्यात नेहरूंना ठेवलं होतं, तिथं आम्ही अनेकदा जायचो. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ नेहरूंनी तिथंच लिहिला होता. त्यांची खोली, त्यांच्या वापरातल्या वस्तू बघून भारावून जायचो. अनेकदा रडू यायचं. एकूणच शालेय वयापर्यंत नेहरूंची मोहिनी मनावर कायम होती. पुढं मी पुण्यात शिकायला आल्यानंतर इथं आयुष्यभर काँग्रेसला व त्यांच्या नेत्यांना शिव्याशाप देणारी अनेक माणसं भेटली. त्यातली तर काही माझी जवळची आप्तमंडळी होती. तोवर माझी स्वतःची अशी कुठलीही राजकीय विचारसरणी तयारही झाली नव्हती. गांधी-नेहरू, पटेल, आंबेडकर आणि सावरकर हे सर्वच मला सारखे होते. माझ्या लेखी हे भारताचे थोर सुपुत्र होते. मात्र, नेहरूंना प्रचंड शिव्याशाप देणारी माणसं भेटली आणि मी थक्क झालो. आपल्या हिरोला नावं ठेवणारे लोक आपल्याच आजूबाजूला विपुल संख्येनं आहेत, याचा धक्कादायक साक्षात्कार मला तेव्हा झाला. हळूहळू इतिहासाची वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचली. आपल्या हिरोच्या कार्यकर्तृत्वाला दुसरीही बाजू असू शकते, हे लक्षात यायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची नेहरूंची मतं समजल्यावर स्वाभाविकच वाईट वाटलं. महाराजांबद्दलचं त्यांचं आकलन एवढं कसं चुकीचं असू शकतं, याचं आश्चर्यही वाटायचं. स्वातंत्र्यलढा, काँग्रेस, फाळणी, तेव्हाच्या नेत्यांची व नेहरूंची जीवनशैली, एडविना प्रकरण या सर्वांबद्दल वाचत गेलो आणि आपल्या हिरोचे पायही मातीचे असू शकतात, हे समजू लागलं. माणूस म्हणून त्यांच्याकडूनही काही चुका, काही चुकीचे निर्णय होऊ शकतात, हे लक्षात यायला लागलं. नेहरू मुलांवर प्रेम करीत असले, तरी त्यांचा स्वभाव शीघ्रकोपी होता आणि ते अनेकदा संतापत असत, हे वाचूनही मग आश्चर्य वाटलं नाही. एखादी व्यक्ती समजून घ्यायला ३६० अंशांतून तिच्याकडे पाहायला पाहिजे, हे शिकलो. एवढं सगळं असलं, तरी त्यांच्या चुकांसकट नेहरू आजही आवडतात. एवढ्या उंचीचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेटसमन असलेला माणूस पहिला पंतप्रधान म्हणून आपल्या देशाला लाभला याचा अभिमानच वाटतो.

बालपणीचा माझा दुसरा हिरो होता गावसकर. द ग्रेट लिटल मास्टर सुनील गावसकर. मीच काय, माझी आख्खी पिढीच गावसकरच्या प्रेमात होती. आमच्या घरी तसा उशिरा टीव्ही आला. जानेवारी १९८६ मध्ये ब्लॅक अँड व्हाइट, शटरवाला क्राउन कॅसल टीव्ही घरात आल्यावर, तो सुरू केल्यावर टीव्हीवर सर्वांत पहिलं दर्शन झालं ते गावसकरचं. तेव्हा कुठल्या तरी कसोटी सामन्याचं दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण सुरू होतं. आमच्या गावी आम्ही क्रिकेट सोडून अन्य कुठलाही खेळ खेळलो नाही. शाळेच्या मैदानात आणि आमच्या वाड्यात अशा दोन्ही ठिकाणी आम्ही मित्र सतत फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत असायचो. तेव्हा वृत्तपत्रांमध्ये आलेले क्रिकेटपटूंचे फोटो कापून ठेवायचे हा छंद मला होता. त्यात सर्वाधिक फोटो गावसकर, कपिल देव आणि वेंगसरकर यांचे होते. गावसकरच्या दहा हजार धावा पूर्ण झाल्या, तेव्हा पेपरमध्ये आलेला फोटो मी कापून ठेवला होता. त्याची ती स्कल कॅप घातलेले तर अनेक फोटो माझ्याकडे होते. भारतीय संघ कितीही अडचणीत आला, तरी गावसकर मैदानात आहे तोवर काही भीती नाही, असं वाटायचं. मी १९८७ च्या पाकिस्तान दौऱ्यातील बंगळूर कसोटी तर आयुष्यात कधीही विसरणार नाही. पाच कसोटींची ती मालिका होती व पहिल्या चारही कसोटी अनिर्णित राहिल्या होत्या. पाचवी व निर्णायक कसोटी बंगळूरमध्ये सुरू होती. गावसकर भारताचा, तर इम्रान खान पाकिस्तानचा कर्णधार होता. बंगळूरच्या त्या आखाडा खेळपट्टीवर आपली चौथ्या डावात बॅटिंग होती. तौसिफ अहमद आणि इक्बाल कासिम यांचा फिरकी मारा दोन्ही बाजूंनी सुरू होता. एका बाजूने आपले एकेक खंदे फलंदाज बाद होऊन परतत होते आणि एका बाजूला गावसकरनं नांगर टाकला होता. पाचवा दिवस आणि सामन्याची वेळही संपत आली होती. शेवटचा फलंदाज मणिंदरसिंगला जोडीला घेऊन गावसकर खिंड लढवीत होता. त्याचं शतकही जवळ आलं होतं. मणिंदर पहिल्याच चेंडूवर बाद होण्यासाठी कुख्यात होता. इम्रान शेवटच्या चेंडूवर गावसकरला सिंगल धाव घेऊ देत नव्हता. अत्यंत टेन्स अशी ती कसोटी मी टीव्हीवर पाहत होतो. अखेर दुर्दैवानं गावसकर ९६ धावांवर स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला आणि आपण ती कसोटी हरलो. मात्र, माझ्या मते गावसकरची ती सर्वोत्कृष्ट कसोटी खेळी होती. आमच्या गावात उत्कृष्ट दर्जाचं वाचनालय असल्यानं खूप वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळायची. त्या काळात मी गावसकरची (बाळ ज. पंडित यांनी मराठीत अनुवाद केलेली) सनी डेज, रन्स अँड रुइन्स, वन डे वंडर्स, आयडॉल्स ही पुस्तकं अधाशासारखी वाचून काढली होती. 'एकच षटकार', 'चौकार' ही क्रीडाविषयक नियतकालिकं तेव्हा प्रसिद्ध होती. वाचनालयात मी ती कायम वाचायचो. त्यात गावसकरचे अनेक किस्से ऐकायला मिळाले. शाळेत गावसकरचा एक धडाही होता. त्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्याच दौऱ्यात प्रचंड दाढदुखी सुरू असतानाही गावसकरनं कसं शतक ठोकलं, हा भाग होता. पुढं त्याच्या ओव्हलवरच्या ऐतिहासिक २२१ धावांच्या खेळीबद्दलही वाचायला मिळालं. मी प्रत्यक्ष क्रिकेट पाहायला लागल्यानंतर अगदी लवकरच गावसकर निवृत्त झाला. मात्र, १९८७ च्या भारतात झालेल्या रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये नागपूरला त्यानं न्यूझीलंडविरुद्ध ठोकलेलं शतक मी विसरू शकत नाही. त्यात त्यानं त्या काळाच्या मानानं वेगवान शतक (९४ चेंडूंत) झळकावलं होतं. ते त्याचं वन-डेमधलं एकमेव शतक. इंग्लंडमध्ये १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद ३६ धावांची कुप्रसिद्ध खेळी करणाऱ्या गावसकरचं हे ट्रान्स्फॉर्मेशन थक्क करणारं होतं. झेवियर्समध्ये शिकलेला, उत्तम इंग्लिश जाणणारा, विचक्षण बुद्धिमत्ता आणि अजोड विनोदबुद्धी असलेला गावसकर नंतर कॉमेंटरीमध्ये शिरला तो आजतागायत कॉमेंटरी करतोच आहे. पुढे १९९९ मध्ये राज ठाकरे यांनी पुण्यात शिवउद्योग सेनेतर्फे गणेश कला-क्रीडा मंच येथे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत गावसकरला प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली. ते गणेश कला-क्रीडा मंच खचाखच भरलं होतं आणि मधल्या रांगेतही लोक बसले होते. गावसकरनं तिथंही तुफान टोलेबाजी केली. नूरजहाँचा तो प्रसिद्ध किस्सा त्यानं याच व्याख्यानात सांगितला होता. आपला संघ पाकिस्तानात गेल्यावर लाहोरमध्ये आपल्या आणि पाकिस्तानच्या टीमला भेटायला नूरजहाँ आल्या होत्या. गावसकरची ओळख करून देताना, ओळख करून देणाऱ्यानं 'हे सुनील गावसकर, यांनी बरेच विक्रम केले आहेत,' वगैरे स्तुतिपर ओळख करून दिली. त्यावर नूरजहाँ यांनी जराशा आढ्यतेनं, 'हम तो सिर्फ इम्रान खान को जानते है' असं उत्तर दिलं होतं म्हणे. मग त्यांची ओळख करून दिल्यावर फटकळ गावसकरनंही, 'हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते है' असं उत्तर देऊन बाईंचा तिथल्या तिथं तुकडा पाडला होता. उत्तम नकलाकार असलेल्या गावसकरची कॉमेंटरी ऐकणं हा बौद्धिक आनंद असतो.
असं असलं, तरी या हिरोबाबत काही गोष्टी खटकतातच. एक तर मेलबर्नच्या त्या कसोटीत चुकीचं बाद दिल्यानंतर गावसकरनं चेतन चौहानला घेऊन मैदान सोडणं चुकीचंच होतं. तो गावसकरच्या कारकिर्दीवर बसलेला काळा डाग आहेच. दुसरं म्हणजे मुंबईत सरकारी भूखंड घेऊनही गावसकरनं तिथं क्रिकेट अकादमी सुरू केली नाही. याशिवाय मुंबईच्या खेळाडूंना झुकतं माप देण्याचा आरोप तर बहुतेक मुंबईच्या खेळाडूंवर होतोच. गावसकरही त्याला अपवाद नसावा. कपिल आणि त्याच्यामधलं शीतयुद्ध प्रसिद्ध आहेच. अर्थात हे सगळं जाणल्यावरही आपला हिरोही चुकू शकतो, याचाच पुन्हा प्रत्यय आला आणि त्याच्याविषयीचं प्रेम जराही कमी झालं नाही. जन्मल्याबरोबर एका कोळिणीच्या मुलाबरोबर एक्स्चेंज झालेला हा मुलगा मामाच्या तीक्ष्ण नजरेमुळं पुन्हा आईकडं येतो काय आणि जगाला अचंबित करून सोडणारा पराक्रम गाजवतो काय! गावसकरचं आयुष्य असं भन्नाट आहे. उतारवयातही तो आपल्या आवडीची गोष्ट ज्या उत्साहानं करतोय ती फार हेवा वाटावा अशी गोष्ट आहे.

माझे तिसरे आणि महत्त्वाचे हिरो आहेत अर्थातच पु. ल. देशपांडे. पुलंचा आयुष्यावर एवढा प्रभाव आहे, की ते नसते तर आपण कुणी निराळेच झालो असतो, याची खात्री आहे. पुलंनी आपल्या सगळ्यांनाच काय दिलं आणि त्यांच्यात काय काय गुण होते याची उजळणी मी करणार नाही. ते सर्वविदित आहे. फक्त या हिरोविषयी कधी भ्रमनिरास झाला का, असा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर 'अजून तरी नाही आणि कदाचित कधीच नाही,' असंच असेल. एखादी व्यक्ती लेखनातून केवळ तुमच्या वागण्या-बोलण्यावर किंवा लिहिण्यावरच परिणाम करते असं नाही, तर तुमच्या एकूण जगण्यावर, जीवनविषयक दृष्टीवरही खूप सखोल परिणाम करते. पुलंनी माझ्यावर (आणि माझ्या पिढीतल्या बऱ्याच जणांवर) असा परिणाम केला आहे, असं म्हणायला जागा आहे. खूप लहानपणी पुलंची भरपूर पुस्तकं वाचल्यानंतर इतर काही पुस्तकं वाचायला गेलं तर ती बोअर होत असत. हे दीर्घ काळ टिकलं. याचा दुष्परिणाम नक्कीच झाला. वाचनातलं वैविध्य लहानपणी तितकं राहिलं नाही. पु. ल. टिपिकल मध्यमवर्गीय होते, त्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली'त त्यांना एकही स्त्री-व्यक्तिरेखा रंगवावीशी का वाटली नाही, वगैरे आक्षेप खूप नंतर वाचण्यात आले. मात्र, मला तेव्हा आणि आत्ताही त्यात काही तथ्य वाटत नाही. पुलंची जीवनविषयक दृष्टी अतिशय विशाल आणि उदार होती. एका जागी रमणारा हा माणूस नव्हता. वयाच्या पन्नाशीत बंगाली शिकणारा आणि त्यासाठी शांतिनिकेतनला जाऊन राहणारा, वेळप्रसंगी ठोस राजकीय भूमिका घेणारा आणि वेळीच त्यातून बाजूला होणारा... या त्यांच्या गोष्टी व्यक्ती म्हणूनही खूप अनुकरणीय आहेत. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे पुलंनी आम्हाला विनोदाचं शस्त्र दिलं. आपल्या जगण्यातल्या विसंगतीवर हसत हसत बोट ठेवता आलं पाहिजे आणि तितक्याच खेळकरपणे त्या विसंगती दूर करता आल्या पाहिजेत हे त्यांनीच शिकवलं. पु. लं.चं जगणं मध्यमवर्गीय असलं, तरी विचार तसे कधीच नव्हते. त्यांच्या गंभीर लिखाणातून हे जाणवतं. डाव्या, समाजवादी विचारसरणीचे 'भाई' सर्वच विचारसरणीच्या लोकांना आपलेसे वाटत. याचं कारण, त्यांचे विचार एकांगी नव्हते. माणसाच्या विचारापेक्षा तो माणूस महत्त्वाचा, हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून ते गांधीजींवरही उत्कट लिहू शकत असत आणि सावरकरांवरही त्याच तोलामोलानं बोलू शकत असत.
वैयक्तिक माझ्या आयुष्यात त्यांचा प्रभाव केवळ लिखाणावर पडला नाही. लिखाणावर तर पडलाच. आज अनेक जण माझं एखादं लेखन वाचलं, की पुलंची आठवण येते असं म्हणतात. हा त्या प्रभावाचाच परिणाम आहे. मी त्या प्रभावातून कधी तरी बाहेर येईनही. मात्र, जगण्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो पगडा आहे तो दूर होईल, असं वाटत नाही. उत्तमोत्तम गोष्टींचा आस्वाद कसा घ्यावा, गुणग्राहकता कशी असावी, जग कसं बघावं हे पुलंनी मला शिकवलं. त्यांची दानशूरता आणि उतारवयातील ऐहिकातील विरक्ती या गोष्टी तर केवळ स्तंभित करतात. या गोष्टी अशा आहेत, की त्या आयुष्यभर जोपाव्यात. जमेल तितकं करावं. त्यांची उंची गाठणं तर केवळ अशक्यच आहे. मात्र, त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चार पावलं तर नक्कीच टाकू शकतो.
माझ्या जगण्यातल्या तीन हिरोंची ही गोष्ट. या तिघांचीही मी अगदी व्यक्तिपूजा म्हणावी, अशी केली आणि त्यातून जमेस आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांतूनच मी जो काही आहे तो आहे.

-----

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२१)

 

---

3 comments:

  1. सर तीन हिरो बद्दल छान लिहिलतं, आपल्या चित्रपट परीक्षण लेखनाचा मी मोठा फॅन आहे

    ReplyDelete
  2. ग्रेट हिरो...ग्रेट लेख ...खूप छान लिहिला आहे हा लेख,👌👍👏

    ReplyDelete