महानगरांतले ‘महासागर’
------------------------------
टायटॅनिक चित्रपटातला एक संवाद मला फार आवडतो. रोझ म्हणते - ए वुमन्स हार्ट इज ॲन ओशन ऑफ सिक्रेट्स... किती खरं आहे ते! मला वाटतं, केवळ स्त्रीच का, आपल्या सर्वांचीच हृदयं म्हणजे गुपितांचे महासागर असतात. अनुराग बासूच्या ‘मेट्रो... इन दिनों’मधली सगळी पात्रंही अशीच. हृदयात कसल्या कसल्या गुपितांचे - रागाचे, द्वेषाचे, तिरस्काराचे, व्यक्त न केलेल्या भावनांचे, अलोट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आतल्या आत कुढण्याचे - महासागर बाळगणारी. हा सिनेमा बघण्याचं एक खास कारण होतं. याच दिग्दर्शकानं २००७ मध्ये आणलेल्या ‘ए लाइफ इन ए मेट्रो’ या चित्रपटानं तेव्हाच्या जाणिवांना चांगलाच हादरा दिला होता. आपला भवताल बदलतो आहे यात फार धक्कादायक नव्हतं; मात्र आपणही बदलतोय, आपल्या धारणाही बदलताहेत हे जाणवून जास्त हादरा बसला होता. आता १८ वर्षांनी त्या सिनेमाचा - कथानक म्हणून नव्हे; तर कथनाचा आत्मा म्हणून - जणू सीक्वेल असलेला हा सिनेमा कसा झाला असेल, हे पाहण्याची उत्सुकता होती. महानगरी जगण्यात आपण आपल्या भावभावनांचं व्यवस्थापन करताना (किंवा करता न आल्यानं म्हणा) जे काही घोळ घालून ठेवतो, त्या गोंधळाची - आतल्या अन् बाहेरच्या ‘केऑस’ची - ती कहाणी होती. आता १८ वर्षांनी तर काळ आणखीनच बदललाय. तेव्हा आकार घेत असलेली महानगरं आता अक्राळविक्राळ रूप धारण करून बिनचेहऱ्याची झाली आहेत. मॉलपासून मेट्रोपर्यंत सर्वत्र चकचकाट वाढला आहे, पण आपल्या आतला संवेदनांचा दिवा तेवतो आहे का? काहीच कळेनासं झालंय. आधीचा सिनेमा आला होता, तेव्हा सात वर्षांची असलेली पिढी आता पंचविशीत आहे. त्यांचं जगणं सुरुवातीपासूनच महानगरी आणि त्यामुळं सर्वच बाबतींत ‘केऑटिक’ आहे. मग त्यांचं आणि त्यांच्यासोबत जगत असलेल्या माझ्यासारख्या मधल्या पिढीचं आणि त्याहून मोठ्या म्हणजे सीनिअर्सचं जगणं आता कसं झालं आहे? मूलभूत भावना त्याच असल्या, तरी त्या हाताळण्यातला गोंधळ वाढला आहे की कमी झाला आहे? या आणि अशा सगळ्या प्रश्नांना भिडणारा ‘मेट्रो... इन दिनों’ या कारणांसाठी तरी बघायला हवा. एक प्रकारे आपणच आरशात बघितल्यासारखं हे आहे.
‘मेट्रो... इन दिनों’ चित्रपट चांगला मोठा आहे. तब्बल पावणेतीन तासांचा. दिग्दर्शकानं तब्येतीत यातली सगळी पात्रं उभी केली आहेत. अर्थात तब्बल आठ प्रमुख व्यक्तिरेखा असल्यानं त्यातही सर्वच्या सर्व पात्रं तितक्याच ताकदीनं ठसतात, असं नाही. काही जमली आहेत, तर काही फसली आहेत. उदा. पार्थ (आदित्य रॉय कपूर) या व्यक्तिरेखेचा संपूर्ण आलेख चांगला उभा राहिला आहे. वस्तुत: या व्यक्तिरेखेला सिनेमात नातेसंबंधांचा काहीच आगापिछा नाही. तरीही एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून ते पात्र आपल्यासमोर नीट उभं राहतं. याउलट अनुपम खेरनं साकारलेला ज्येष्ठ नागरिक किंवा आकाश (अली फजल) ही पात्रं तेवढ्या परिपूर्णतेनं उभी राहत नाहीत. काजोल (कोंकणा सेनशर्मा) व माँटी (पंकज त्रिपाठी) यांच्या ट्रॅकला जरा जास्तच महत्त्व दिलंय. त्यामुळं तो ताणल्यासारखा झाला आहे, तर याउलट चुमकी (सारा अली खान) आणि काजोलची टीनएजर मुलगी यांचे ट्रॅक काहीसे अर्धवट राहिल्यासारखे झाले आहेत.
असं असलं तरी पहिल्या सिनेमाप्रमाणे यातही प्रीतम आणि त्याचा ऑर्केस्ट्रा महानगरांत, कुठे रस्त्यावर, कुठे टेरेसवर, कुठे पात्रांच्याच आजूबाजूला, कुठे पार्टीत गात गात सिनेमा पुढं नेतो. हा सिनेमा म्हणजे स्वतंत्रपणे एक ‘म्युझिकल’ आहे असं म्हणावं इतकं यातलं संगीत अविभाज्य आहे. यातले शब्द लक्षात राहिले नसले तरी सिनेमात ऐकताना ते चांगले वाटत होते. किंबहुना प्रत्येक पात्राची कहाणी या छोट्या छोट्या गाणुल्यांमधून आपल्यासमोर येते. कधी कधी या गाण्यांचा अतिरेकही होतो. त्यात संगीत प्रीतमचं असल्यामुळं ते कंठाळी आहे हेही वेगळं सांगायला नको. मात्र, असं असलं तरी या सिनेमात ते खपून गेलंय. या सिनेमातल्या पात्रांच्या मनात सुरू असलेला कल्लोळच जणू त्या कंठाळी वाद्यमेळांतून आपल्यावर आदळतोय, असंही वाटून गेलं. आता हे प्रीतमनं हेतुत: केलंय की नकळत झालंय ते आपल्या आपण ठरवावं.
सिनेमाच्या नावात ‘मेट्रो’ असल्यानं तो स्वाभाविकपणे भारतातल्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता व पुणे या पाच प्रमुख महानगरांत घडतो. (पुण्यात चुमकी व काजोलचं माहेर असलं, तरी ते एका घरापुरतंच दिसतं. सिनेमात मुंबई, कोलकता जसं ‘दिसतं’ तसं पुणे शहर ‘दिसत’ नाही. त्यामुळं ते इथं फक्त उल्लेखाच्या पातळीवरच राहतं.) याशिवाय या शहरी गोंगाटावर उतारा म्हणून कालका-शिमला ट्रेन आहे आणि समुद्राशिवायचा गोवाही आहे. याशिवाय बरंच काही आहे. महानगरी जगण्याची पार्श्वभूमी बऱ्याच फ्रेम्समधून दिसत राहते. मग ती मेट्रो असेल, उंच उंच इमारती असतील, कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा रस्त्यावरची वाहतूक असेल. कोलकत्यात ट्राम आवर्जून दिसते. मुंबईतल्या दृश्यांत उंच उंच इमारती आणि मुंबईचा झगमगाट दिसतो. दिल्ली, बंगळुरूतही तिथली मेट्रो आणि महत्त्वाची ठिकाणं नेपथ्य म्हणून दिसत राहतात. या सर्व दृश्यांमुळे सिनेमातल्या पात्रांच्या मनातल्या कल्लोळाला योग्य तो कॅनव्हास मिळतो.
यातली काजोल आणि माँटीची गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहते. ती जरा ताणलेली आहे आणि त्यामुळे नंतर जरा कंटाळवाणी आणि काहीशी प्रेडिक्टेबल वाटते. त्या तुलनेत पार्थ आणि चुमकीचा ट्रॅक अधूनमधून येत असला तरी तो जास्त फ्रेश आणि ‘खरा’ वाटतो. गंमत म्हणजे यातलं पार्थ हे पात्र मात्र तसं नाही. ते काहीसं ‘अनरिअल’ किंबहुना आपल्याला आपण जसं व्हावं असं वाटतं, पण होऊ शकत नाही, त्या धर्तीवरचं वाटतं. वर म्हटल्याप्रमाणे लिखाणातही या पात्राला चांगला न्याय मिळाला असल्यानं ते शेवटपर्यंत भाव खाऊन जातं. त्या तुलनेत पंकज त्रिपाठीचा ‘माँटी’ मात्र सतत मार खात राहतो. त्या पात्राच्या मूर्खपणामुळे त्याच्याविषयी सहानुभूतीही वाटत नाही. अनुपम खेरला फारसं फुटेज नसलं तरी त्यानं आणि नीना गुप्तानं मिळालेलं काम नेहमीच्या जोशात केलं आहे. त्यांच्यातली एनर्जी अफाट आहे. फातिमा सना शेख आणि अली फजलचा ट्रॅकही विस्कळित झाला आहे. कदाचित त्यांच्यातल्या विस्कळित संबंधांसारखाच.
सुरुवातीला या सर्व पात्रांचं इंट्रोडक्शन येतं, तेव्हा या सर्व कथा स्वतंत्र आहेत की काय, असं वाटतं. मात्र, नंतर हळूहळू ही पात्रं एकमेकांशी संबंधित आहेत हे कळतं. काही पात्रं थेट एकमेकांशी संबंधित नसली तरी त्यांचे रस्ते एकमेकांना छेदून जातात. कुठे ना कुठे, कुणी ना कुणी एकमेकांना भेटत राहतं. ही सगळी गुंतागुंत दिग्दर्शकानं नीट हाताळली आहे. (तरी एकदा पंकज त्रिपाठी कार चालवत असताना अचानक अली फजल त्याच्या कारसमोर येतो, तेव्हा त्याला ‘अरे गुड्डू’ असा डायलॉग (संदर्भ - मिर्झापूर ही वेबसीरीज) देण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही.)
यातल्या तरुण पिढीचं चित्रण स्वतंत्रपणे कौतुकास्पद आहे. यातल्या तिघींचे व्हिडिओ कॉल सुरू असताना त्यातली जी सर्वांत तरुण आहे (चुमकी) तिच्या फोनची बॅटरी अगदी संपत आलेली असते, हेही दिसतं. (‘जेन झी’च्या मुलांच्या फोनच्या बॅटरी कायम लो असतात आणि ज्येष्ठ नागरिक आपले मोबाइल सतत चार्ज करून ठेवतात, असं एक इंटरेस्टिंग निरीक्षण आहे.) आता हे दिग्दर्शकानं मुद्दाम केलं की ते नकळत तसं चित्रित झालंय हे माहिती नाही. मात्र, बारकाईने पाहिल्यास हे दिसतं खरं. यातल्या काजोल व माँटीच्या टीनएजर मुलीचा ट्रॅक त्या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. आपल्याला मुलं आवडतात की मुली याचा निर्णय ही पंधरा वर्षांची मुलगी करू शकत नसते आणि तिच्या आयुष्यातला तो सर्वांत मोठ्ठा प्रॉब्लेम असतो. हा ट्रॅक दिग्दर्शकानं म्हणावा तसा खुलवलेला नाही. तो काहीसा मुग्धच राहिला आहे.
असं सगळं असलं तरी हा सिनेमा आवर्जून पाहा. कथेला महत्त्व असलेला, अनेक कलाकारांचा समावेश असलेला तरी एकही ‘सुपरस्टार’ नसलेला, एकही ‘आयटेम साँग’ नसलेला, शक्य असूनही एकही अश्लील किंवा तुलनेनं बोल्ड दृश्य नसलेला असा हा एक स्वच्छ, पण अंतर्मुख करायला लावणारा सिनेमा आहे. सिनेमा अगदी शंभर टक्के परिपूर्ण नाही, हे खरंच; पण पावणेतीन तासांचा असूनही ‘बोअर’ होत नाही, हेही खरं. त्यामुळं आपल्या आवडत्या व्यक्तीसह मोठ्या पडद्यावरच पाहावा, हे नक्की.
(दर्जा - साडेतीन स्टार)
----