13 Jul 2025

फुलपाखरू - प्रस्तावना व परीक्षण

फुलपाखरू प्रस्तावना व परीक्षण
------------------------------------------------------

माझं ‘फुलपाखरू’ हे कुमारकथांचं पुस्तक मे महिन्यात प्रकाशित झालं. या पुस्तकाला प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका विभावरी देशपांडे हिनं प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना आणि सोबत या पुस्तकाचं साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका-कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी ‘मटा’साठी केलेलं परीक्षण...

----

मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन

विभावरी देशपांडे

‘करील मनोरंजन जो मुलांचे जडेल प्रभूशी नाते तयाचे’ ही सानेगुरुजींची उक्ती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपण त्या दर्जेदार, मूल्याधिष्ठित साहित्यावर वाढलोही आहोत. पण आजही बालसाहित्याला, बालनाट्याला आणि बालचित्रपटांना मुख्य प्रवाहात महत्वाचं स्थान मिळत नाही. तरीही त्या निर्मितीतून मिळणारा  निखळ आनंद आणि बालप्रेक्षकांचं, बालवाचंकांचं भरभरून मिळालेलं प्रेम माझ्यासारख्या मुलांसाठी काम करणाऱ्यांना हवंहवंसं वाटतं.
लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलाचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती  ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन  शोधाव्या लागतात. लहान मुलांच्या  नजरेतून जगाकडे बघावं लागतं. नाहीतर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं. श्रीपादच्या कथांमध्ये मला जाणवलेली आणि भावलेली ही एक महत्वाची गोष्ट आहे. श्रीपादच्या स्वभावातच त्यानी त्याच्या आत जपून ठेवलेलं एक मूल आहे. माणूस म्हणून त्याच्यात  असलेला उत्साह, प्रेम करण्याची, माणसं जोडण्याची वृत्ती त्याच्या ह्या कुमारकथांमध्ये तंतोतंत उतरली आहे.
ह्या कथांची भाषा साधी आणि ओघवती आहे. मुलांचं जग काही आपल्या जगापेक्षा वेगळं नसतं. आपल्याच भवतालात ती जगत असतात. फक्त त्यांचा दृष्टीकोन, निरीक्षण आणि जाणिवा वेगळ्या असतात. श्रीपादनी नेमकं हेच अचूक पकडलं आहे. त्याच्या कथांमधली मुलं ह्याच जगातली आहेत. त्यांचा भवताल हाच आहे. पण त्यात ती काय पाहतात, काय अनुभवात आणि त्यातून त्यांचा भावनिक, मानसिक प्रवास काय होतो हे ह्या कथा आपल्यासमोर हळूच उलगडतात. मग पौगंडावस्थेतल्या मुलीला जाणवणारा एकटेपणा, त्यातून तिची एका कृत्रिम यंत्राशी झालेली तात्पुरती मैत्री आणि त्यातली भावनाशून्यता जाणवल्यावर परत माणसांच्या जगापर्यंत तिचा झालेला प्रवास ही कथा असो किंवा लहान गावातल्या, सामान्य परिस्थितील्या एका मुलाच्या आयुष्यात एक दिवस काहीतरी अद्भुत घडल्याची कथा असो, ह्या कथांनी कुमार वयातल्या मुलामुलींचं संवेदनशील मन खूप छान पकडलं आहे. त्यात विषयांचं, सामाजिक, भौगोलिक वास्तवाचं वैविध्य आहे. आणि मुख्य म्हणजे मुलांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन आहे.
कथा लांबलचक नाहीत. मोजक्या शब्दांत एक संपूर्ण अनुभव देणाऱ्या आहेत. त्यात केंद्रस्थानी कुमार वयातली मुलं आहेत. घटना, प्रसंग प्रौढांच्या जगातले असले तरी ती फक्त पार्श्वभूमीच राहते. कथा घडते ती मुलांच्या तात्कालिक भावविश्वातच. तरीही ह्या कथा मोठ्यांसाठीही रंजक होतात कारण मुलांचा दृष्टिकोन आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातो.
आजच्या काळात पुढची पिढी मराठी भाषेपासून दूर जात असताना मुलांसाठी मराठीत उत्तम साहित्य निर्माण होणं, त्याची भाषा सुयोग्य आणि सुंदर असणं ही अपरिहार्यता   आहे. श्रीपादसारख्या अचूक आणि उत्तम मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लेखकांनी अशी साहित्यनिर्मिती करणं म्हणजे भाषा टिकवण्यासाठी उचललेले उत्तम पाऊल आहे असं मला वाटतं.
श्रीपादनी मुलांसाठी अधिकाधिक लिहीत राहावं. तो ते करीलच. माझ्याकडून ह्या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा.

-----------

फुलपाखरू परीक्षण
-------------------------

मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या कथा

डॉ. संगीता बर्वे

मोठी माणसं जेव्हा जेव्हा आपलं बालपण आठवतात तेव्हा ते त्यात रमून जातात. मग ते म्हणू लागतात, किती छान होतं ना आपलं बालपण... अगदी फुलपाखरासारखं!
आता मात्र अगदी उलट झालंय. माणसं मोठी झाल्यावर त्यांचा सुरवंट होत जातो आणि ती आपापल्या कोशात जातात. त्यांना अनेक कंगोरे फुटतात. जगण्यातले अनेक काटे त्यांच्या आणि दुसऱ्यांच्या अंगाला टोचू लागतात. मग मोठी माणसं म्हणू लागतात की रम्य ते बालपण... ते बालपण आपल्याला परत मिळाले पाहिजे.
खऱ्या खऱ्या फुलपाखराचं मात्र माणसापेक्षा वेगळं असतं… ते आधी सुरवंट असतं आणि नंतर त्याचं रूपांतर रंगीत फुलपाखरात होतं. मोठ्या माणसांची काही वेळा गडबड होऊन जाते. आधीचं फुलपाखरासारखं जगणं नंतर सुरवंटासारखं काटेरी होऊन जातं.
श्रीपाद ब्रह्मे यांनी मात्र आपलं बालपण अजूनही तसंच छान जपलं आहे. मुलांसाठी त्यांनी छान छान गोष्टी लिहिल्या आहेत. आणि बुकगंगा पब्लिकेशन्सनं सुबकपणे पुस्तकरूपात त्या मुलांपर्यंत पोहोचवल्याही आहेत. मुलांसाठी कुमारकथा लिहिणारे लेखक हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच असावेत.  श्रीपाद ब्रह्मे यांनी 'फुलपाखरू' या कथासंग्रहामध्ये ‘सुरवंटाचे फुलपाखरू होतानाच्या कुमारकथा’ लिहून ही उणीव भरून काढली आहे.
‘लहान मुलांसाठी लिहिताना आपल्या आतलं मूल जागं करावं लागतं. लहान मुलांचा निरागसपणा, प्रचंड कुतूहल, निस्सीम प्रेम करण्याची क्षमता, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय जगाकडे बघण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याच आत जाऊन शोधाव्या लागतात; नाही तर आपलं लिखाण अप्रामाणिक आणि उपरं वाटू लागतं,’ असं अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे यांनी ‘फुलपाखरू’च्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. ते किती यथार्थ आहे हे ब्रह्मे यांच्या कुमारकथा वाचताना जाणवतं.
ब्रह्मे यांनी अतिशय विचारपूर्वक मुलांच्या मनात शिरून लिहिलेल्या या कथा आहेत. रायगड येथे सहलीला गेलेली सायली फुलपाखराच्या मागे धावता धावता रस्ता चुकते आणि मैत्रिणी पुढे गेल्यानंतर मनातून जरा घाबरते. मात्र, हळूहळू स्वतःला सावरत मनाशी म्हणते, की  जास्तीत जास्त काय होईल? आपल्याला न घेता तर हे लोक नक्कीच जाणार नाहीत. त्यांना कळलंही असेल की मी हरवलेय म्हणून… फुलपाखराच्या नादापायी आपण रस्ता चुकलो म्हणून…  तिला फुलपाखराचा खूप राग येतो. मात्र, ते किती मस्त उडतंय, तसं छान आपल्याला जगता यायला हवं असं तिला वाटून जातं. ती हळूच फुलपाखराजवळ जाते. फुलपाखरू पुढं आणि सायली मागं असं करता करता पाण्याचा आवाज येऊ लागतो आणि ती रेंजमध्ये आल्यामुळे तिचा मोबाइल खणखणतो. सायलीला रस्ता सापडतो.
'अपना टाईम आयेगा 'ही तर फारच भन्नाट गोष्ट आहे. डिजिटल घड्याळ हवं असणाऱ्या रघूला चक्क विराट कोहलीकडूनच अशा घड्याळाची भेट मिळते. कशी ते तुम्हाला गोष्टीतूनच वाचावं लागेल. गोष्टी वाचता वाचताच आपण गोष्टींच्या जंगलात कधी शिरतो हे कळतच नाही.
‘एक होतं जंगल. जंगलात काहीच नव्हतं मंगल. झाडे दु:खी, प्राणी दुःखी, नदी दुःखी, नद्यांमधले मासेही दुःखी... का बर बाबा असं?’ असा प्रश्न मुलांना नक्की पडेल आणि उत्सुकतेने ते पुढे वाचतील तर जंगलामधले प्राणी का दुःखी आहेत, याचे कारण कळल्यानंतर त्यांच्या मनात सुरू होणाऱ्या विचारांचं अत्यंत प्रभावी चित्रण ‘सेल्फी, सेल्फी सेल्फिश’ या कथेमध्ये लेखकाने रेखाटले आहे.
समुद्रदेवतेच्या वेशात दिसलेली सुशी, राधाच्या रेंजमध्ये आलेले आई-बाबा, गाड्यांचे नंबर पाठ करणारा डोंगरवाडीचा रघू... रघूच्या तर सगळ्याच करामती कुमार वाचकांना नक्की आवडतील; कारण लेखकाने खरोखरच मुलांच्या मनाचा विचार करून, मुलांच्या मनात शिरून त्यांच्या मनात काय चालले असावे याचा अभ्यास करून या गोष्टी लिहिल्या आहेत. तेव्हा छोट्या मित्रांनो , श्रीपाद ब्रह्मे यांचा ‘फुलपाखरू' हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा आणि तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीरूपात आणण्याचा प्रयत्न करा असे जाता जाता सहज म्हणून सांगावेसे वाटते.

 …

फुलपाखरू
लेखक : श्रीपाद ब्रह्मे
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पृष्ठे : ११४, किंमत : १५० रुपये


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, १३ जुलै २०२५)

---

हे पुस्तक विकत घ्यायचे असल्यास इथे क्लिक करा...

----

No comments:

Post a Comment