रूपेरी पडद्याचे मानकरी - - सोहराब मोदी
--------------------------------------------------
(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी सोहराब मोदी यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)
श्रोते हो, नमस्कार...
भारतीय चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत ज्या कलाकारांनी या जगतावर आपला अमीट ठसा उमटवला, त्यात सोहराब मोदी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. मूकपटांच्या काळापासून ते अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत केवळ चित्रपट निर्मितीचा ध्यास घेणारे सोहराब मोदी यांनी आपल्या कारकिर्दीच्या ऐन भरात अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. त्यांची ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली एक महत्त्वाची चित्रपट निर्मिती संस्था ठरली. १९४१ मध्ये आलेला पृथ्वीराज कपूर यांचा ‘सिकंदर’ हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा आणि गाजलेला चित्रपट म्हणावा लागेल. त्यांच्या ‘मिर्झा’ गालिब या १९५४ मध्ये आलेल्या चित्रपटानं तर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिलं जाणारं राष्ट्रपतीचं सुवर्णकमळही जिंकलं होतं. अभिनेत्री सुरैया हिनं या चित्रपटात गायिलेल्या उत्तमोत्तम गाण्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही प्रभावित केलं होतं. या दोन चित्रपटांखेरीज ‘खून का खून’, ‘पुकार’, ‘पृथ्वी वल्लभ’, ‘झाँसी की रानी’, ‘जेलर’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. सोहराब मोदी यांनी अभिनेता म्हणूनही अनेक चित्रपटांत काम केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील अगदी सुरुवातीच्या काळातील ‘शो-मॅन’ असंच त्यांचं वर्णन करावं लागेल.
श्रोते हो, सोहराब यांचं पूर्ण नाव होतं सोहराब मेरवानजी मोदी. त्यांचा जन्म दोन नोव्हेंबर १८९७ रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांना एकूण १२ मुलं होती. त्यातले सोहराब हे अकरावं अपत्य. सोहराब केवळ तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचे वडील तत्कालीन ब्रिटिश अमदानीतील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. सोहराब यांचं बालपण उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं गेलं. त्यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला. उत्तर प्रदेशातल्या वास्तव्यामुळं लहानपणीच त्यांना हिंदी आणि उर्दू या भाषांची गोडी लागली. नंतर झालं असं, की शालेय शिक्षण झाल्याबरोबर सोहराब यांनी त्यांच्या प्राचार्यांना ‘मी पुढं कशात करिअर करू?’ असं विचारलं होतं. त्यांच्या प्राचार्यांनी सांगितलं, की तुझा आवाज अतिशय चांगला आहे. त्यामुळे तू एक तर राजकारणात जा किंवा अभिनय क्षेत्रात जा. सोहराब यांनी अर्थात सिनेमात जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी सोहराब यांनी त्यांचे मोठे भाऊ केकी यांच्यासह फिरते चित्रपट प्रदर्शक म्हणून काम सुरू केलं. ग्वाल्हेरच्या टाऊन हॉल इथं हे दोन भाऊ चित्रपट दाखवीत असत. याच काळात सोहराब मोदींना नाटकवेडानं झपाटून टाकलं. हे नाट्यप्रेम पुढं आयुष्यभर कायम राहिलं. आज हे ऐकून आश्चर्य वाटेल; पण बघा, वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी आर्यसुबोध थिएटर कंपनी स्थापन केली. भावाबरोबर त्यांनी भारतभर फिरून पारसी रंगभूमीवरचा नट म्हणून चांगलं नाव कमावलं. विशेषत: शेक्सपिअरची नाटकं सादर करण्यात या कंपनीची खासियत होती. सोहराब यांच्यावरही शेक्सपिअरच्या नाटकांचा खूप प्रभाव पडला. नाटकाचा पडदा पडला, तरी प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत असत. या टाळ्यांनी, या कौतुकामुळं सोहराब यांचं नाट्यकलेवरचं प्रेम अधिकच वाढत गेलं. याच काळात काही मूकपटांतही अभिनेता म्हणून त्यांनी नशीब आजमावलं.
श्रोते हो, आपण त्या काळाची कल्पना करा. विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात भारतात एकीकडं ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य लढा जोर धरू लागला होता आणि दुसरीकडं सिनेमाची कला दिवसेंदिवस प्रगती करत होती. तो काळ नाट्यकलेचा सुवर्णकाळ होता. बंगाल, महाराष्ट्र आदी राज्यांत अनेक दिग्गज कलाकार रंगभूमी गाजवत होते. महाराष्ट्रात केशवराव भोसले, बालगंधर्वांमुळं संगीत रंगभूमीही जोरात होती. त्याच जोडीला मूकपटांची निर्मितीही जोरात सुरू झाली होती. मुंबई हे या नव्या चित्रपटकलेची अनभिषिक्त राजधानी ठरली होती. तिकडं उत्तरेत लाहोरलाही चित्रपटसृष्टी आकार घेत होती. या वातावरणात सोहराब मोदींनी देशभर फिरून रंगभूमी गाजवली आणि त्याच जोडीला सिनेमा या तंत्राधिष्ठित आधुनिक कलेनंही त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
रसिक हो, काळ झपाट्यानं पुढं सरकत होता. १९३२ हे वर्ष उजाडलं. ‘आलमआरा’ या चित्रपटाद्वारे भारतात बोलपटांचं युग सुरू झालं. नाही म्हटलं तरी तत्कालीन नाटकांना याचा फटका बसू लागला. महाराष्ट्रासह सर्व देशातच रंगभूमी आणि नाट्यव्यवसाय काहीसा मागे पडू लागला. भारतातील बहुसंख्य जनता बोलपटांच्या प्रभावाने वेडावून गेली. चाणाक्ष सोहराब मोदींनी बदललेल्या काळाची ही पावलं ओळखली. त्यांनी १९३५ मध्ये स्टेज फिल्म कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारे तयार करण्यात आलेले पहिले दोन चित्रपट नाटकांवरूनच घेण्यात आले होते. यातील पहिला चित्रपट ‘खून का खून’ शेक्सपिअरची अजरामर शोकांतिका ‘हॅम्लेट’वरून घेण्यात आला होता. मेहदी हसन एहसान यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यासाठी त्यांनीच लिहिलेल्या ‘हॅम्लेट’च्या उर्दू रूपांतरित नाटकाचा आधार घेण्यात आला होता. त्यानंतर १९३६ मध्ये आलेला ‘सैद-ए-हवस’ हा चित्रपट शेक्सपिअरच्या ‘द लाइफ अँड डेथ ऑफ किंग जॉन’ या नाटकावरून प्रेरित होता. मात्र, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ कोसळले.
खरं म्हणजे एवढ्या अपयशानं कुणीही हाय खाल्ली असती. पण या अपयशानं खचून न जाता सोहराब मोदींनी १९३६ मध्ये ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ या पुढे प्रसिद्धीस पावलेल्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. या बॅनरखाली पुढे भविष्यात अनेक उत्तमोत्तम सिनेमे तयार होणार होते आणि इतिहास घडणार होता. नाटकावरून चित्रपट तयार करण्याचा नाद सोडून सोहराब यांनी आपल्या पुढील चित्रपटांसाठी समकालीन विषयांची निवड केली. सुरुवातीला त्यांना अपयश आलं. इथं श्रोते हो, त्याबाबतचा एक किस्सा नक्की ऐकण्यासारखा आहे. सोहराब यांनी १९३७ मध्ये ‘आत्मा तरंग’ नावाचा चित्रपट काढला होता. तो फ्लॉप झाला. त्यामुळं सोहराब दु:खात होते. एके दिवशी चार व्यक्ती थिएटरमध्ये हा चित्रपट बघून बाहेर पडत असताना त्यांना सोहराब दिसले. त्या चौघांनी यांना विचारलं, की आपणच सोहराब मोदी का? त्यावर सोहराब दु:खी चेहरा करून म्हणाले, ‘होय, मीच तो दुर्दैवी.’ त्यावर त्या चौघांपैकी एक जण सोहराब यांना म्हणाले, की आपण असं का म्हणता? आपण अशाच सामाजिक प्रश्नांवर चित्रपट तयार करीत राहा. एक ना एक दिवस आपल्याला खूप मोठं यश मिळेल. हे ऐकल्यावर सोहराब आनंदित झाले. नंतर त्यांना कळलं, की ते चौघे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. अशा लोकांकडून शाबासकी मिळाल्यामुळं सोहराब यांनी नव्या उत्साहानं पुढील चित्रपट निर्मिती हाती घेतली.
त्यांचा ‘मीठा जहर’ हा १९३८ मध्ये आलेला चित्रपट दारूच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन करणारा होता, तर त्याच वर्षी आलेला ‘तलाक’ हा चित्रपट तत्कालीन समाजातील घटस्फोटांची समस्या मांडणारा होता. १९३९ मध्ये आलेला ‘पुकार’ हा ऐतिहासिक चित्रपट बादशहा जहाँगीरच्या न्यायकाट्याच्या कसोटीच्या दंतकथेवर आधारित होता. यात स्वत: सोहराब यांनी संग्रामसिंह या राजपुताची भूमिका केली होती. यानंतर १०४० मध्ये आलेल्या ‘भरोसा’ या चित्रपटात सोहराब यांनी एका अतिशय धाडसी विषयाला हात घातला होता. एक बहीण व भाऊ अज्ञानातून एकमेकांच्या प्रेमात पडतात, असा तो विषय होता. मजहर खान, चंद्रमोहन आणि सरदार अख्तर यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. ‘फिल्म इंडिया’चे संपादक बाबूराव पटेल एरवी सोहराब यांच्या चित्रपटांना लक्ष्य करीत. मात्र, त्यांनीही ‘भरोसा’चं वर्णन ‘एक चांगला चित्रपट’ असं केलं होतं.
श्रोते हो, अशा पद्धतीनं सोहराब यांची घोडदौड सुरू होती. तोवर त्यांच्या चित्रपटांनी चांगलं यश मिळवलं असलं, तरी सोहराब मोदींना आकर्षण होतं ते ऐतिहासिक विषयांचं. यानंतर आलेली त्यांची पुकार, सिकंदर आणि पृथ्वी वल्लभ ही चित्रत्रयी त्यांच्या इतिहासप्रेमाची साक्ष आहे. यातला पुकार चित्रपट पडद्यावर आला १९३९ मध्ये, ‘सिकंदर’ आला १९४१ मध्ये, तर ‘पृथ्वी वल्लभ’ प्रदर्शित झाला १९४३ मध्ये. यातही सर्वाधिक गाजला तो पृथ्वीराज कपूर यांना सिकंदराच्या भूमिकेत अजरामर करणारा चित्रपट ‘सिकंदर’.
यातला पहिला चित्रपट ‘पुकार’ मुघल बादशहा जहाँगीर याच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाची बरीचशी दृश्यं प्रत्यक्ष राजवाड्यांत, महालांत चित्रित करण्यात आली होती. त्यामुळे त्याची भव्यता प्रेक्षकांना दिपवून गेली. तेव्हाचे प्रसिद्ध स्टार चंद्रमोहन आणि नसीम बानो यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. याच नसीम बानोशी नंतर सोहराब यांनी लग्न केलं.
यानंतर सोहराबची मोदींच्या जीवनातील सर्वांत भव्य, गाजलेला चित्रपट ‘सिकंदर’ आला. यात जगज्जेत्या सिकंदराच्या भूमिकेने पृथ्वीराज कपूर यांना अजरामर केले. स्वत: मोदी यांनी यात पोरस राजाची भूमिका केली होती. सोहराब मोदींनी ‘सिकंदर’च्या निर्मिती खर्चात कोणतीही कसूर ठेवली होती. मोठमोठे सेट्स. श्रीमंती थाट, उत्तम निर्मिती मूल्ये यामुळं ‘सिकंदर’ हा एक भव्य-दिव्य चित्रपट ठरला. यातील युद्धाच्या दृश्यांनी तर या चित्रपटाची तुलना तत्कालीन हॉलिवूडमधील युद्धपटांशी केली गेलो. या चित्रपटाने पृथ्वीराज कपूर आणि मोदी या दोघांनाही ऐतिहासिक यश आणि यशस्वी प्रतिमा मिळवून दिली. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. महात्मा गांधी यांचे असहकार आंदोलन देशभरात जोरात होते. अशा वेळी ‘सिकंदर’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग आणखी चेतवले. ब्रिटिशांच्या तत्कालीन बॉम्बे सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट संमत केला असला, तरी नंतर काही लष्करी कँटोन्मेंटमधील थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यास बंदी घालण्यात आली. असं असलं तरी या चित्रपटाची लोकप्रियता दीर्घकाळ कायम राहिली. गोवा मुक्ती आंदोलनाच्या वेळी, म्हणजे १९६१ मध्ये दिल्लीत हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये लावण्यात आला होता.
या चित्रत्रयीतला तिसरा चित्रपट म्हणजे ‘पृथ्वी वल्लभ’ हा कन्हैयालाल मुन्शी यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. यात स्वत: सोहराब मोदी नायकाच्या, तर दुर्गा खोटे नायिका राणी मृणावलतीच्या भूमिकेत होत्या. या दोघांच्या अभिनयाच्या जुगलबंदीची तेव्हा चर्चा झाली होती. चित्रपट तयार करत असले तरी मोदी यांचं नाट्यप्रेम या सर्व काळात शाबूत होतं. पारसी थिएटर तगविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले. चित्रपटरसिकांनीही मोदी यांच्यावर तेवढंच प्रेम केलं.
रसिक हो, याबाबतचा एक किस्सा सांगतात तो आपल्याला इथं सांगायलाच हवा. त्याचं असं झालं, की १९५० मध्ये मोदी यांचा शीशमहल हा चित्रपट मुंबईत मिनर्व्हा थिएटरमध्ये सुरू होता. तेव्हा स्वत: मोदी एका खेळाला थिएटरमध्ये उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पाहिलं, की पहिल्या रांगेत एक माणूस डोळे बंद करून बसला आहे. या माणसाला सिनेमा आवडला नसेल आणि त्यामुळे तो झोपला असेल, असं समजून मोदींना जरा वाईट वाटलं आणि त्यांनी त्या माणसाचे तिकिटाचे पैसे परत करा आणि त्याला थिएटरमधून जाऊ द्या, असं सांगितलं. त्यावर त्यांना सांगण्यात आलं, की तो माणूस अंध आहे. मात्र, केवळ मोदी यांचे संवाद ऐकण्यासाठी तो थिएटरमध्ये येतो. हे ऐकल्यावर मोदींना गहिवरून आलं.
मोदींच्या नावे अनेक विक्रम आहेत. भारतातील पहिला टेक्निकलर चित्रपट 'झांसी की रानी'साठी त्यांनी हॉलिवूडमधून तंत्रज्ञ बोलावले होते. त्यात ‘गॉन विथ द विंड’ या जगप्रसिद्ध चित्रपटाचे कॅमेरामन अर्नेस्ट हॉलर यांचाही समावेश होता. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी व इंग्लिश भाषेत तयार करण्यात आला होता. ‘द टायगर अँड द फ्लेम’ असं इंग्लिश चित्रपटाचं शीर्षक होतं. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या वेळी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलणाऱ्या झाशीच्या तरुण राणीची भूमिका मेहताबने साकारली होती. मोदींनी राणीचे प्रमुख सल्लागार असलेल्या राजगुरूंची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही त्यातल्या भव्य युद्धदृश्यांसाठी वाखाणला गेला. ऐतिहासिक घटनांचं नेमकं व यथार्थ चित्रण, भव्य सेट्स आणि मेहताबच्या अभिनयासाठी हा चित्रपट गाजला. झाशीच्या राजवाड्यातील अनेक प्रसंग उत्कृष्टपणे चित्रित करण्यात आले होते. त्यासाठी सोहराब यांनी त्यांचे कला दिग्दर्शक रुसी बँकर आणि पंडित दुबे यांना झाशीचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाठवलं होतं. यातील युद्धाची दृश्यं कोल्हापुरात चित्रित करण्यात आली होती. मोदींना आपल्या पात्रांमधील भावोत्कटतेचे खूप आकर्षण होते. त्यांनी अतिशय मनापासून हा चित्रपट तयार केला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने मोदींना मोठा फटका बसला. त्यामुळं त्यांना ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’ ही आपली कंपनी कर्जापायी गहाण ठेवावी लागली होती.
श्रोत हो, असं असलं तरी सोहराब मोदी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. ‘मिर्झा गालिब’ या १९५४ मधल्या चित्रपटातून त्यांनी दणदणीत पुनरागमन केलं. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याच्या कारकिर्दीत होऊन गेलेल्या गालिबवर आधारित या चित्रपटाला १९५४ चे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. ‘मिर्झा गालिब’मध्ये शीर्षक भूमिका भारतभूषणने केली होती. नायिका सुरैया होती. तिच्या गाण्यांमुळेही हा सिनेमा गाजला. ‘आह को चाइहिये एक उमर’, ‘नुक्ताचीन है गम-ए-दिल’, ‘दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है’, ‘ये न थी हमारी किस्मत’ अशी यातली तिची सगळीच गाणी खूप गाजली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही हा चित्रपट भावला. सुरय्याने मिर्झा गालिबला जणू जिवंत केल्याचे सांगून नेहरूंनी तिचे कौतुकही केलं होतं. ‘तुमने मिर्झा गालिब की रूह को जिंदा कर दिया,’ असे त्यांचे नेमके शब्द होते.
श्रोते हो, त्या काळात चित्रपट निर्मितीसाठी स्टुडिओची व्यवस्था होती. मुंबईत मोठमोठे स्टुडिओ तेव्हा कार्यरत होते. सोहराब मोदींची कंपनीही अशाच भव्य-दिव्य चित्रपटांसाठी प्रसिद्ध होती. पन्नासच्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार येऊन दाखल होत होते. सर्वांनाच काही ना काही करून दाखवायचं होतं. या कलाकारांच्या डोळ्यांतली स्वप्नं सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर मूर्त होऊन अवतरत होती. प्रेक्षकांना वेगळ्याच स्वप्नसृष्टीत नेत होती. अशाच वेड्या मंडळींपैकी एक ‘सपनों का सौदागर’ होते सोहराब मोदी.
श्रोते हो, काळ झपाट्यानं पुढं चालला होता. १९४७ मध्ये आपला देश इंग्रजांच्या राज्यापासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच सर्व देशात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण पसरलं होतं. प्रत्येक क्षेत्राला नवनिर्मितीचा ध्यास होता. हिंदी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नव्हती. या काळात सिनेमानिर्मितीचा वेग वाढला. राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद या त्रयीचं राज्य सुरू झालं. स्टुडिओंचं महत्त्व शाबूत असलं, तरी चित्रपटांचे विषय बदलत होते. आता पौराणिक आणि ऐतिहासिक सिनेमांचा काळ जरा मागं पडून, सामाजिक, कौटुंबिक आणि रोमँटिक चित्रपटांना मागणी वाढू लागली. सोहराब मोदीही या काळात आपली कलेवरची निष्ठा कायम टिकवून होते. यानंतर सोहराब यांनी ‘नौशेरवान-ए-आदिल’ हा १९५७ मध्ये आलेला आणि ‘समय बडा बलवान’ हा १९६९ मध्ये आलेला चित्रपट असे काही चित्रपट तयार केले. हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले असले, तरी या चित्रपटांमध्ये मोदींच्या आधीच्या चित्रपटांसारखी जादू नव्हती, असं चित्रपट अभ्यासकांचं मत होतं. त्यातल्या त्यात ‘जेलर’ या १९५८ मध्ये आलेल्या चित्रपटाची चर्चा झाली. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सोहराब यांनी १९३८ मध्ये तयार केलेल्या आपल्याच याच नावाच्या चित्रपटाचा २० वर्षांनी रिमेक केला होता. या चित्रपटात, मोदींनी एका विवेकी माणसाचे रूपांतर अत्याचारी माणसात कसं होतं, याचं प्रत्ययकारी चित्रण केलं होतं. यातील नायकाची भूमिका स्वत: सोहराब यांनीच केली होती. पहिल्या चित्रपटात त्यांच्या पत्नीची भूमिका लीला चिटणीस यांनी केली होती, तर २० वर्षांनी आलेल्या दुसऱ्या चित्रपटात कामिनी कौशल यांना नायिकेची भूमिका देण्यात आली होती. नायकाला त्याच्या पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय असतो. या संशय पिशाच्चामुळं एका विवेकी माणसाचं रूपांतर एका ‘राक्षसा’त कसं होतं, हे यात मोदींनी दाखवलं होतं. एका अर्थानं हा सायको-थ्रिलर प्रकारचा सिनेमा होता. १९५८ मध्ये आलेल्या चित्रपटाला मदनमोहन यांचं संगीत होतं. यातलं ‘हम प्यार में जलनेवालों को चैन कहाँ आराम कहाँ’ हे गाणं अतिशय प्रसिद्ध आहे.
त्यांच्या शेवटच्या काही हिट चित्रपटांमध्ये कुंदन (१९५५), राजहट (१९५६) आणि मेरी बिवी मेरे बच्चे (१९६०) यांचा समावेश होता. यातला ‘कुंदन’ हा चित्रपट व्हिक्टर ह्यूगो यांच्या ‘ला मिझराबल’ या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता. पं. सुदर्शन यांनी या चित्रपटाचं लेखन केलं होतं. यातील ‘कुंदन’ ही शीर्षक भूमिका स्वत: सोहराब यांनी साकारली होती.
प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती बंद केल्यानंतरही, सोहराब मोदींनी चित्रपट बनवण्याचा विचार कधीच सोडला नाही. १९८२ मध्ये, जेव्हा ते ८५ वर्षांचे होते) आणि त्यांना अगदी हालचाल करणेही कठीण होते, तरीही त्यांनी ‘गुरुदक्षिणा’ नामक चित्रपटाचा मुहूर्त केला होता. त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, लोकांनी चित्रपटाच्या त्यांच्या वेडाचा गैरफायदा घेतला. अनेकांना त्यांनी आगाऊ पैसे दिले आणि ते कधीही वसूल झाले नाहीत. यात त्यांना खूप पैसे गमवावे लागले. ‘गुरुदक्षिणा’ चित्रपटाच्या 'मुहूर्ता'नंतर दोनच दिवसांनी सोहराब मोदी आजारी पडले आणि नंतर कधीच बरे झाले नाहीत. त्यांना कर्करोगानं ग्रासलं आणि त्यातच मुंबईत २८ जानेवारी १९८४ रोजी त्यांचं निधन झालं. पुढे १९८६ मध्ये त्यांच्या पत्नीने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की सोहराबला फक्त चित्रपट निर्मितीचं वेड होतं आणि खरं तर त्यांना इतर कोणत्याही गोष्टीत रस नव्हता. अंगात अतिशय ताप असतानाही सोहराब चित्रपटाचं शूटिंग करत असत आणि अजिबात सुट्टी घेत नसत.
सोहराब यांचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या टिपिकल सिनेमा नटासारखंच होतं. नसीम बानोसोबतचं नातं संपल्यानंतर सोहराब मोदींनी त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री मेहताबशी २८ एप्रिल १९४६ रोजी तिच्या वाढदिवशी लग्न केलं. सोहराब त्या वेळी ४८ वर्षांचे होते. मेहताब यांचा जन्म गुजरातमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला आणि त्यांनी सोहराब दिग्दर्शित 'परख' (१९४४) या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. सोहराब यांच्या मोठ्या भावानं त्यांना श्री रामकृष्ण परमहंसांबद्दल माहिती दिली. याशिवाय माता श्री शारदादेवींचेही मार्गदर्शन ते घेत असत. त्यांनी सोहराब यांना त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात कलकत्त्यातील उद्बोधन इथं दीक्षा दिली होती.
रसिक हो, सोहराब मोदी स्वभावानं दिलदार होते. ‘मुघले आझम’बाबतचा त्यांचा एक किस्सा याची साक्ष देतो. ‘मुघले आझम’च्या निर्मितीतील विलंबामुळं या चित्रपटाला वित्तपुरवठा करणाऱ्या शापूरजी पालनजी या कंपनीने चित्रपटाचं दिग्दर्शन सोहराब मोदी यांच्याकडं देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंपनीच्या ड्रायव्हरने सोहराब यांना के. असीफ यांच्या या चित्रपटाच्या अफाट वेडाविषयी व दातृत्वाविषयी सांगितलं. ते ऐकल्यावर सोहराब यांना वाटलं, की नाही. या सिनेमाचं दिग्दर्शन आपण नाही, तर के. असीफनंच केलं पाहिजे. त्यांनी नंतर ‘शापूरजी पालनजी’ला हे पटवून दिलं आणि ‘मुघले आझम’च्या दिग्दर्शनाची सूत्रं असीफकडंच राहिली. पुढं त्या चित्रपटानं काय इतिहास घडवला हे आपल्याला माहिती आहेच.
अशा या सिनेमाचे सच्चे प्रेमी असलेल्या दिलदार सोहराब मोदींना १९८० मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ते या पुरस्काराचे दहावे मानकरी होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय चित्रपटसृष्टीनं जे ‘शोमॅन’ बघितले, त्यातल्या या बिनीच्या शिलेदाराला अभिवादन...!
---
(आकाशवाणीवर प्रसारित झालेला, निवेदक प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेला भाग आता यूट्यूबवर ऐका.)
हा भाग ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...
---
सोहराब मोदी यांच्या ‘जेलर’ चित्रपटातील एक लोकप्रिय गीत ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...
---------