अश्लीलतेच्या आरोपातून सुटलेली ‘श्यामा’ पुन्हा भेटीला...
---------------------------------------------------------------------
विसाव्या शतकातील लोकप्रिय, प्रसिद्ध, पण काहीसे वादग्रस्त लेखक चंद्रकांत काकोडकर यांची ‘श्यामा’ ही विविध कारणांनी गाजलेली कादंबरी रोहन प्रकाशनाने पुन्हा वाचकांच्या भेटीसाठी आणली आहे. ‘श्यामा’ ही कादंबरी ‘रंभा’ या दिवाळी अंकातून १९६२ मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर लगेचच १९६३ मध्ये ती पुस्तकरूपात बाजारात आली. ती वाचल्यानंतर तिच्यावर अश्लीलतेचे आरोप केले गेले. पुण्यातील श्रीकृष्ण भिडे यांनी न्यायालयात खटला गुदरला. हा खटला रंभा या दिवाळी अंकावरच भरण्यात आला होता. त्यातील अनेक लेखकांना न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. न्यायालयाने अनेकांना २५ रुपये दंड करून सोडून दिले. मात्र, काकोडकर दंड भरण्यास तयार झाले नाहीत. ‘माझ्या कादंबरीत काहीही अश्लील नाही,’ असेच त्यांचे ठाम म्हणणे होते. पुढे त्यांचे स्नेही ॲड. सुशील कवळेकर यांच्या मदतीने काकोडकर यांनी आधी हायकोर्टात व तिथे हरल्यावर सुप्रीम कोर्टापर्यंत या निकालाविरोधात दाद मागितली. १९६३ ते १९६९ अशी सहा वर्षे व त्या काळातील साडेदहा हजार रुपये खर्च केल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही कादंबरी अश्लील नाही, असा निर्वाळा दिला आणि काकोडकर जिंकले. त्या काळातील माध्यमांतही या खटल्याची भरपूर चर्चा झाली होती. हा खटला जिंकल्यानंतर १९७१ मध्ये या खटल्याच्या साक्षीपुराव्यांसह ही कादंबरी पुन्हा एकदा प्रसिद्ध झाली आणि तीच या कादंबरीची पहिली व शेवटची आवृत्ती ठरली. खटला जिंकला असले तरी ‘अश्लील साहित्य लिहिणारे लेखक’ असा शिक्का बसल्याने काकोडकर मराठी साहित्याच्या ‘अभिजात व अभिरुचीसंपन्न’ मुख्य प्रवाहातून जणू बाहेर फेकले गेले. अर्थात मनस्वी स्वभावाच्या काकोडकरांनी हार मानली नाही. वर्षाला वीस ते पंचवीस कादंबऱ्यांचा अक्षरश: रतीब पुढे ते घालू लागले. आधी ‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकात ते चार ते पाच कादंबऱ्या लिहीत. नंतर ‘काकोडकर’ नावाचाच एक दिवाळी अंक काढायला त्यांनी सुरुवात केली. दहा हजार अंकांची आवृत्ती काढूनही त्यांना अनेकदा पुनर्मुद्रण करावे लागे, एवढी त्या अंकाची लोकप्रियता होती. ‘श्यामा’वरील खटल्याचा जणू सूड म्हणून त्यांच्या पुढच्या कादंबऱ्यांत ‘उरोजाधिष्ठित’ वर्णनांची रेलचेल वाढली. फिरत्या वाचनालयांमध्ये, तसेच एकूणच तेव्हाच्या महाराष्ट्रात सर्वदूर काकोडकर हे प्रचंड खपाचे, वाचले जाणारे लेखक ठरले. असे असले तरी तत्कालीन समीक्षकांनी त्यांच्याकडे कायमच दुर्लक्ष केले वा त्यांच्या साहित्याला ‘काकोडकरी साहित्य’ म्हणून हिणवले.
वास्तविक तरुण वयात काकोडकरांवर शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या सुरुवातीच्या ‘निसर्गाकडे’, ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ आआणि ‘९ ऑगस्ट’ या कादंबऱ्या सामाजिक विषयांवरच्या होत्या. ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ या कादंबरीला तर बंगालमधल्या भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी होती. पुढच्या काळातही त्यांनी अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. शंकरराव कुलकर्णी व वासू मेहेंदळे यांनी त्या प्रामुख्याने प्रकाशित केल्या. पुढे त्यांनी ‘राजाराम राजे’ हे डिटेक्टिव्ह पात्रही निर्माण केले. तत्कालीन मराठी मध्यमवर्गाच्या अनुभवविश्वाच्या पलीकडे असलेले अनेक विषय (उदा. रेसकोर्स, सुपर मार्केट) त्यांच्या लेखनात तेव्हा सहजी येत असत.
पुढे काकोडकरांनी श्यामा कादंबरी लिहिली, त्यामागे श्रीकृष्ण पोवळे या तत्कालीन प्रसिद्ध व काकोडकरांशी मैत्री असलेल्या कवीचे जीवनचरित्र काल्पनिक अंगाने रेखाटण्याचा हेतू असावा, असे निरीक्षण या नव्या आवृत्तीची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिणारे लेखक पंकज भोसले यांनी नोंदविले आहे. श्यामा कादंबरीचा नायक निशिकांत कदम हे पात्र पोवळे यांच्यावरच बेतलेले असावे, असे दिसते. किंबहुना कादंबरीचे शीर्षक ‘श्यामा’ असे असले, तरी ती मुख्यत: निशिकांतच्या ‘आत्म-देवदास’ वृत्तीची कहाणी सांगणारी कादंबरी आहे, असे भोसले प्रस्तावनेत नमूद करतात.
यासाठी भोसले यांनी श्रीकृष्ण पोवळे या आता पूर्ण विस्मृतीत गेलेल्या, मात्र तत्कालीन मराठी साहित्यवर्तुळात बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या कवीचा अभ्यासपूर्ण शोध घेतला आहे. त्यातून मिळालेली माहिती त्यांनी प्रस्तावनेत तपशीलवार दिली आहे. ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. याशिवाय खुद्द काकोडकर यांचे मनोगत आणि सर्वोच्च न्यायालयातील खटल्याबाबत ॲड. कवळेकर यांनी ‘ललित’मध्ये १९६९ मध्ये लिहिलेला लेख या नव्या आवृत्तीत मुद्रित करण्यात आला आहे. भोसले यांची प्रस्तावना, काकोडकर यांचे या खटल्याविषयीचे मनोगत आणि कवळेकर यांचा लेख आधी वाचून मग ही कादंबरी वाचण्यात अधिक मजा आहे.
‘श्यामा’चा नायक निशिकांत कदम हा शिक्षक आहे, तसेच ध्येयवादी विचारांचा कवीही आहे. श्यामा शिंदे या कलाशिक्षिकेशी त्याची ओळख होते. मात्र, आधीची दोन फसलेली प्रेमप्रकरणे आठवून तो श्यामाबाबत सावध पावले उचलतो. नीला आणि वनिता यांच्यासह झालेल्या निशिकांतच्या प्रेमक्रीडांच्या आठवणी हाच काय तो या कादंबरीतील शृंगाराचा (वा कथित अश्लील) भाग आहे. श्यामा विचारांनी मोकळीढाकळी असल्याने तिला शाळेतही इतर शिक्षकांकडून जाच होत असतो. त्यातून निशिकांत तिला बाहेर काढतो. आपल्या कवितांना चाली लावण्यास तो श्यामाला प्रवृत्त करतो आणि पुढे तिला आकाशवाणीवरील लोकप्रिय गायिका करतो. पुढे गायिका म्हणून होणारी श्यामाची प्रगती आणि संवेदनशील असलेल्या निशिकांतचे गैरसमज यांतून कादंबरीचे कथानक पुढे जाते.
यातील निशिकांत कदम ही व्यक्तिरेखा काकोडकरांनी श्रीकृष्ण पोवळे यांच्यावरून घेतली असावी, असे मानण्यास वाव आहे. एक तर या कादंबरीच्या नायकाच्या म्हणून ज्या कविता काकोडकरांनी कादंबरीत वापरल्या आहेत त्या पोवळे यांच्याच आहेत. पोवळे व काकोडकर स्नेही होते. त्यातूनच त्यांनी काकोडकरांना या आपल्या कविता त्यांच्या कादंबरीत वापरण्यास दिल्या. काकोडकरांनी कादंबरीच्या प्रस्तावनेत तसा उल्लेखही केलेला आहे. याच प्रस्तावनेत ही कादंबरी पोवळ्यांवर आधारित नाही, असे काकोडकरांनी म्हटले असले, तरी ‘कित्येकांना त्यात कदाचित श्रीकृष्ण पोवळे सापडतीलही’ असेही नमूद केले आहे. या उल्लेखानंतर पंकज भोसले यांनी बरेच परिश्रम घेऊन पोवळे यांच्याविषयीही माहिती गोळा केली. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘काकोडकरांनी श्यामा लिहिली तेव्हा पोवळ्यांचे समाजातील आणि साहित्य व्यवहारातील स्थानही रसातळाला गेले होते. अधिकाधिक काळ वेश्येच्या माडीवर आणि सातत्याचे मद्यास्वादक ही त्यांची छबी शिल्लक राहिली होती. पण त्या आधी वीस-पंचवीस वर्षे मराठीतील उमर खय्याम असा कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत होता.’
एकूणच, ‘श्यामा’ कादंबरी व तिच्या अश्लीलता खटल्याचे हे सारे नाट्य अतिशय रंजक आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात या घटनेची दखल घेतल्याशिवाय पुढे जाणे कठीण आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी व इतरही सर्व वाचकांनी आवर्जून वाचावी अशी ही ‘श्यामा’ची नवी आवृत्ती आहे. मूळ कादंबरी आज वाचली, तर ती ठीकठाकच आहे असे वाटते.
अर्थात काकोडकरांनी ज्या काळात ही कादंबरी लिहिली तो महाराष्ट्रात एका अर्थाने साहित्यिक ‘रेनेसान्स’चा काळ होता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर साहित्य, संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सरकारी संस्था स्थापन झाल्या. स्वातंत्र्यानंतर वेगवेगळे जनसमूह खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा व अभिव्यक्तीचा अनुभव घेत होते. साठोत्तरी साहित्यात विद्रोहाची जी ठळक वाट दिसते, त्या वाटेवर दलित साहित्य, स्त्री साहित्य, ग्रामीण साहित्य असे अनेकानेक प्रवाह वाहते झाले होते. वाचनालयांची संख्या वाढली. वाचणाऱ्यांची संख्या वाढली. या नव्याने वाचणाऱ्या वाचकांना काकोडकरांनी मोठंच खाद्य पुरवलं. जनप्रिय साहित्यनिर्मितीची जी वाट तिथून सुरू झाली, त्या वाटेची काकोडकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर, चंद्रकांत खोत आदी मंडळी महत्त्वाची शिलेदार होती.
काकोडकरांची ‘श्यामा’ याच काळाचं एक अपत्य. वर म्हटल्याप्रमाणे कादंबरी म्हणून ती ठीकठाकच असली, तरी केवळ त्या काळात तिच्यावर अश्लीलतेचा शिक्का बसल्याने तिची एवढी चर्चा झाली. आजच्या ‘लिव्ह-इन’, ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’ आणि ‘सिच्युएशनशिप’च्या काळात तर अनेकांना ही कादंबरी निव्वळ सात्त्विकही वाटू शकेल. ‘उरोजाधिष्ठित’ वर्णनांची जागा आता ‘इन्स्टा’वरच्या ‘प्रत्यक्ष दृश्यांनी’ घेतली आहे. असं सगळं बदललेलं असताना या कादंबरीचं आजचं रंजनमूल्य केवळ त्या प्रेमक्रीडा वर्णनांपेक्षा तिच्या या अद्भुत प्रवासामुळे अधिक झालं आहे, असं नक्की म्हणावंसं वाटतं.
----
(पूर्वप्रसिद्धी - रोहन मैफल)
---------
No comments:
Post a Comment