रूपेरी पडद्याचे मानकरी – आशा भोसले
-------------------------------------------------
(पुणे आकाशवाणीवर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावर आधारित ‘रूपेरी पडद्याचे मानकरी’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत मी काही भाग लिहिणार आहे. त्यापैकी आशा भोसले यांच्यावर लिहिलेला भाग नुकताच प्रसारित झाला. या भागासाठी लिहिलेली संहिता...)
(नोंद - संहिता बरीच दीर्घ झाल्यामुळे कार्यक्रमात सर्वच गोष्टी समाविष्ट झाल्या नाहीत. खाली कार्यक्रमाची लिंक दिली आहे. मूळ अर्ध्या तासाचा कार्यक्रम वाढवून ४० मिनिटांचा करण्यात आला. तरीही या संहितेतील काही गोष्टी वगळाव्या लागल्या. त्यामुळे ही मूळ संहिता जरूर वाचावी.)
------
श्रोते हो, नमस्कार!
आशा भोसले… भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुरेल स्वप्न… आवाजाच्या दुनियेतील एक महान व्यक्तिमत्त्व… कमालीची वैविध्यपूर्ण गाणी गाणारी ज्येष्ठ गायिका…. अतिशय खडतर अशा संघर्षातून तावून-सुलाखून बावनकशी सोन्यासारखी लखलखणारी एक खंबीर स्त्री… स्वयंपाकाच्या आवडीपासून ते गायकांच्या नकला करण्यापर्यंत अनेकविध कलागुणा जोपासणाऱ्या आणि वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात वावरणाऱ्या जणू एखाद्या मोहक आजीबाई… आशाताईंचं नाव घेतलं, की त्यांच्या एवढ्या प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर सहज उभ्या राहतात. अर्थात या सर्व प्रतिमांना दशांगुळे पुरून उरणारी दैवी सुरांची त्यांची प्रतिभा आणि तिला कठोर मेहनतीची जोड देऊन घडलेली एक असामान्य गायिका ही प्रतिमा सर्वांत लखलखीतपणे कायमच समोर येते. भारतीय चित्रपट संगीत विश्वातली जणू ‘फर्स्ट फॅमिली’ म्हणावी, अशा मंगेशकर कुटुंबात जन्म, मात्र त्या आडनावाचं कोंदण फार लहान वयातच त्यागण्याचं प्राक्तन, त्यानंतर वाट्याला आलेला प्रचंड मोठा संघर्ष आणि अतोनात अडचणींना तोंड देत फक्त गाण्यावर लक्ष केंद्रित करणारी अफाट ताकदीची गायिका… आशा भोसले म्हणजे हे सर्वच….
भारतीय बोलपटांचा इतिहास अद्याप शंभर वर्षांचाही नाही. किंबहुना ‘आलमआरा’ हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला १९३२ मध्ये आणि पुढच्याच वर्षी आशाताईंचा जन्म झाला. याचाच अर्थ ९४ वर्षांच्या बोलपटांच्या इतिहासात आशाताईंची कारकीर्द जवळपास आठ दशकांची आहे. ही नुसती आकडेवारीच थक्क करून टाकणारी आहे. आशाताईंनी या आठ दशकांतील तब्बल ५० वर्षं तरी नक्कीच आपल्या खणखणीत आवाजानं दणाणून टाकली आहेत. केवळ हिंदीच नव्हे, तर जवळपास सर्व भारतीय भाषा, एवढेच नव्हे तर काही जागतिक भाषांतही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीएवढं वैविध्य अन्य कोणत्याही गायिकेला आतापर्यंत दाखविता आलेलं नाही. मोठ्या वृक्षाखाली दुसरी झाडं वाढत नाहीत, हा निसर्गनियम आहे. असं असलं तरी लता मंगेशकर या आपल्याच मोठ्या बहिणीच्या आकाशाहून विशाल अशा प्रतिभाप्रभावापासून जाणीवपूर्वक दूर राहून आशाताईंनी आपली स्वतंत्र कारकीर्द घडवली. एवढंच नव्हे, तर लताशी सतत तुलना होण्याचा अटळ धोका पत्करून गायलेल्या प्रत्येक गाण्यावर स्वत:ची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली.
नावाप्रमाणेच आशा भोसले यांचं सगळं जीवन म्हणजे आशेचा, विजिगीषू जीवनेच्छेचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास आहे. त्यांचा जन्म आठ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत झाला. वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांची बलवंत नाटक कंपनी तेव्हा जोरात होती. त्या कंपनीतर्फे गावोगावी नाटकांचे खेळ होत. कंपनीत दोनशे माणसं कामाला होती. या सर्वांचे पालनपोषण पं. दीनानाथ करत असत. लता आणि मीना यांच्या पाठीवर आशाचा जन्म झाला. आशा जन्मापासूनच तब्येतीनं सुदृढ आणि खोडकर होती. कंपनीत सर्वांच्या चहापाण्यासाठी भलंमोठं दुधाचं भांडं असे. त्यावर येणारी सगळी साय लहानगी आशा गट्टम करत असे. मी या सायीवरच वाढले, म्हणून नव्वदीपार जगले, असं स्वत: आशाताईंनी एका मुलाखतीत मिश्कीलपणे सांगितलं आहे. लता आणि मीना यांना वडील गाणं शिकवत. आशा मात्र हुंदडत खेळत असे. असं असलं तरी तिचा कान तयार होता. वडील तिला लहापणी पठाण, हब्ब अशा टोपणनावांनी हाका मारत असत. लता लहानग्या आशाला कडेवर घेऊन तिचे भरपूर लाड करी. एकदा शाळेत शिक्षक आशाला कशावरून तरी ओरडले. झालं. लताला राग आला. ती आशाला कडेवर घेऊन तडक घरी निघून आली. यापुढं त्या शिक्षकाच्या शाळेत जाणार नाही, असा निश्चय तिनं बोलून दाखवला. या बहिणींचं औपचारिक शिक्षण तिथंच थांबलं. मात्र, जीवनाच्या शाळेत त्या जे काही शिकल्या, त्यातून अनेकांना भरपूर काही शिकायला मिळालं. अतिशय विपरीत परिस्थिती असताना, दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत असताना आपण केवळ गाण्यामुळं जिवंत राहिलो, असं आशाताई सांगतात तेव्हा त्यांच्या कठोर तपश्चर्येची थोडीशी कल्पना येते.
आशाताईंचा स्वभाव लहानपणापासूनच बंडखोर होता. वृत्ती स्वाभिमानी होती. वडील दीनानाथ मंगेशकर यांचं १९४२ मध्ये निधन झालं तेव्हा आशाताई केवळ नऊ वर्षांच्या होत्या. आई व लता या सर्व लहान भावंडांना घेऊन मुंबईत आल्या. तिथं चर्नीरोडला पं. नवरंग नागपूरकर यांच्याकडं महिना पाच रुपये फी देऊन आशाचं संगीत शिक्षण सुरू झालं. तिची परीक्षा घ्यायला शंकरराव व्यास हे तेव्हाचे नामवंत गायक आले होते. आशानं त्यांच्यासमोर परीक्षा म्हणून गाणं म्हणायला सुरुवात केली असताना, त्यांनी तिला थांबवलं आणि सांगितलं, की तुझा पहिला नंबर आला आहे. तुला इथं शिकायची गरज नाही. त्यानंतर त्यांच्याच ओळखीनं वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आशाला गाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून स्टुडिओतला माइक आणि आशाताई यांचं अद्वैत झालं. या माइकला देव मानून त्यांनी हजारो गाणी गायली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जावं, एवढ्या प्रचंड संख्येनं गाणी गायली. माइक समोर असताना दुसरा कुठलाही विचार करायचा नाही; तहानभूक विसरून जायची, फक्त गाणं उत्तम होईल कसं एवढाच ध्यास घ्यायचा अशा तडफेनं आशाताईंनी आपली झळाळती कारकीर्द उभी केली. अर्थात त्या कधीही आपले ते संघर्षाचे दिवस विसरल्या नाहीत.
आशाताईंच्या कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस कष्टाचे होते. दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘माझं बाळ’ या १९४३ मध्ये आलेल्या चित्रपटात ‘चला चला नवबाला’ हे आशाताईंनी गायलेलं पहिलं चित्रपट गीत. तेव्हा त्या अवघ्या ९ वर्षांच्या होत्या. हिंदीत त्यांना पहिली संधी मिळाली ती ‘चुनरिया’ या चित्रपटात. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी ‘सावन आजा’ हे पहिलं गीत गायलं. याच वर्षी त्यांची गाणी असलेला ‘अंधों की दुनिया’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यांनी पहिलं सोलो हिंदी गाणं गायलं ते ‘रात की रानी’ या चित्रपटात. असं असलं तरी खूप मोठं यश आशाताईंना अद्याप मिळालं नव्हतं. त्यातच त्यांनी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या गणपतराव भोसले यांच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं आणि त्यांच्या आयुष्यानं एक फार खडतर वळण घेतलं. पुढची सात-आठ वर्षं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होती. त्यांना तीन मुलं झाली. शिवाय उत्पन्न फार नव्हतं. या काळात अक्षरश: एक वेळ जेवून दिवस काढल्याचे अनुभव आशाताई सांगतात. गणपत भोसले तसे लवकरच निवर्तले. त्यानंतर आशाताई आणि उर्वरित मंगेशकर कुटुंब पुन्हा एकत्र आलं. अर्थात ते भविष्यात… पन्नासच्या दशकात आशाताईंचा संघर्ष सुरूच होता. त्या काळात शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी, गीता रॉय या गायिकांचा दबदबा होता. लता मंगेशकरांनीही ‘महल’पासून स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं आणि पुढं हे साम्राज्य वाढतच जाणार होतं. त्यामुळं मुख्य नायिकेची गाणी याच गायिकांना मिळायची. या काळात आशाताईंनी पोटापाण्यासाठी मिळेल ते काम स्वीकारलं. कमी बजेटच्या, दुय्यम चित्रपटांसाठी त्या पार्श्वगायन करू लागल्या. ए. आर. कुरेशी, सज्जाद हुसैन, एस. मोहिंदर, सरदार मलिक, गुलाम महंमद या संगीतकारांनी त्यांना प्रामुख्यानं गायची संधी दिली. ‘संगदिल’ या सज्जाद हुसैन यांचं संगीत असलेल्या, १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात गाणं गायल्यामुळं आशाताईंचं थोडं नाव झालं. याच वर्षी ओ. पी. नय्यर यांनी त्यांना ‘छम छमा छम’ या चित्रपटासाठी फार मोठी संधी दिली. या चित्रपटाच्या एकूण ११ पैकी १० गाणी आशाताईंना गायला मिळाली. त्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५३ मध्ये त्यांच्या ‘परिणीता’ या चित्रपटासाठी आशाताईंना संधी दिली. राज कपूरने १९५४ मध्ये आलेल्या ‘बूट पॉलिश’ या त्याच्या चित्रपटातील गाणी आशाताईंकडून गाऊन घेतली. या चित्रपटातील गाणी गाजली. आशाताईंचं नाव होऊ लागलं. याच काळात संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी आशाताईंचे सूर जुळले. १९५२ ते १९५७ या काळात नय्यर यांनी आशाताईंकडून भरपूर गाणी गाऊन घेतली. त्यातही ‘नया दौर’ या बी. आर. चोपडांच्या चित्रपटातील गाण्यांमुळं आशाताई अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘माँग के साथ तुम्हारा‘ किंवा ‘साथी हाथ बढाना’, किंवा ‘उडे जब जब झुल्फें तेरी’ ही गाणी तर आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मुख्य नायिकेची सर्वच्या सर्व गाणी आशाताईंनी पहिल्यांदा या चित्रपटासाठी गायली. ओ. पी. नय्यर यांचा आशाताईंच्या कारकिर्दीत आणि यशात फार मोठा वाटा आहे. यापुढेही जवळपास दहा वर्षं नय्यर-आशा जोडीनं अनेक लोकप्रिय गीतं दिली. आशाताईंच्या आवाजाची ताकद ओपींना कळली होती. त्यांनी या आवाजाच्या अफाट रेंजचा पुरेपूर वापर करून घेतला. ‘आईए मेहेरबाँ’ हे मधुबालावर चित्रित झालेलं गाणं असेल किंवा ’ये हे रेशमी जुल्फों का अंधेरा’सारखं गाणं घ्या, किंवा ‘आँखों से जो उतरी है दिल में’ घ्या, ‘आओ हुजूर तुम को’मधली ती प्रसिद्ध उचकी घ्या; ‘वो हसीन दर्द दे दो’सारखं गाणं घ्या; आशाताईंच्या आवाजाचा पुरेपूर कस लागलेला दिसतो. आशाताईंनीही ही गाणी अशी गायली आहेत, की त्यांच्यासारखी अन्य कुणी गाऊ शकेल असं वाटतही नाही. दुर्दैवानं कालांतरानं आशाताई व नय्यर यांचे मतभेद झाले आणि त्यांनी एकत्र काम करणं बंद केलं. ‘चैन से हम को कभी’ या आशाताईंनी गायलेल्या अप्रतिम गीताला नय्यर यांचंच संगीत होतं. अनेक रसिकांना ते या जोडीचं ‘स्वान साँग’ किंवा भैरवी आहे, असं वाटतं. याच दशकात नय्यर यांच्याबरोबरीने एस. डी. बर्मन आणि रवी या संगीतकारांनीही आशाताईंना भरपूर संधी दिली. त्यांच्याकडून अनेक लोकप्रिय गाणी या काळात या दोन्ही संगीतकारांनी गाऊन घेतली.
पुढं १९६६ मध्ये आलेल्या ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटानं आशाताईंच्या जीवनात आणखी एक वळण आणलं. संगीतकार आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा त्यांच्या आयुष्यात आले. पंचमदांसोबत आशाताईंचे सूर सर्वार्थानं जुळले. अनेक उत्तमोत्तम आणि अवघड गाणी पंचम यांनी आशाताईंकडून गाऊन घेतली. ‘तिसरी मंजिल’मधल्याच ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे’ या गाण्यापासून ते ‘इजाजत’मधल्या ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’पर्यंत किती गाणी सांगावीत!
‘तिसरी मंजिल’मधलं ‘आ आ आजा’ हे गाणं ऐकलं तेव्हा आशाताईंना आपण हे गाऊच शकणार नाही, असं वाटलं होतं. त्यांनी पंचमदांना तसं सांगितलं. त्यावर पंचमदांनी आपण ही चाल बदलू या, असं त्यांना सांगितलं. मात्र, नंतर आशाताईंनी हे एक आव्हान म्हणून घेतलं. त्यांचा स्वभाव तसाच होता आणि आहे. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणजे काय, या विचारानं त्यांनी या गाण्याचा आठ दिवस सराव केला. एकदा तर त्या त्यांच्या गाडीत सराव करत असताना त्यांचा ड्रायव्हर म्हणाला, ‘ताई, काय होतंय तुम्हाला? श्वास लागतोय बहुतेक… गाडी ‘जसलोक’ला घेऊ का?’ आशाताईंचा ‘आ आ आ आ आ जा’ ऐकून ड्रायव्हर घाबरला होता. आशाताईंनीच एका मुलाखतीत त्यांच्या मिश्कील शैलीत हा किस्सा सांगितला आहे. पुढं पंचम आणि आशा यांनी त्यांच्या गाण्यांत अचाट प्रयोग केले. विशेषत: हेलन यांचं नृत्य आणि आशाताईंचा आवाज व पंचमचं दणकेबाज संगीत ही त्रयी चांगलीच लोकप्रिय झाली. मग ते ‘कारवाँ’मधलं ‘मोनिका ओ माय डार्लिंग, पिया तू अब तू आजा’ असो किंवा ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ असो. आशाताईंनी सगळी कॅब्रे गाणी जोरदार गायिली आणि ती तुफान लोकप्रिय ठरली. असं म्हणतात, की हेलन स्वत: आशाताईंच्या रेकॉर्डिंगला उपस्थित राहायच्या आणि त्या कसं गात आहेत, याचं निरीक्षण करायच्या. त्यानुसार त्या त्यांच्यी नृत्याची रचना करायच्या. त्यामुळंच ती सगळी गाणी चांगलीच हिट झाली. ‘कटी पतंग’ या चित्रपटातलं ‘मेरा नाम है शब्बो’ हे गाणं म्हणजे तर कमाल आहे. या गाण्यात आशाताई रूढ अर्थानं गायलेल्या नाहीत. त्या केवळ गुणगुणल्यासारख्या गद्य ओळीच म्हणतात. त्याला पंचमची ‘हा हा हा हा हा’ची जोड…. यातून त्या प्रासंगिक गाण्यानं कमाल परिणाम साधला आहे. पंचम-आशा जोडीचीही अशी अनेक गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. ‘चुरा लिया है दिल को जो तुमने’, ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’, ‘एक मैं और एक तू’, ‘दम मारो दम’ अशी किती गाणी सांगावीत!
आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्णपर्व आलं ते ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या निमित्तानं… या वेळी संगीतकार होते खय्याम. ‘उमराव जान’ची आशाताईंनी गायलेली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय ठरली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही याच चित्रपटानं मिळवून दिला. या गाण्यांसाठी खय्याम यांनी आशाताईंना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आशाताईंना स्वत:लाही विश्वास नव्हता, की त्या हाफ नोट खाली गाऊ शकतील का, म्हणून. मात्र, अखेर त्यांनी खय्याम यांचं ऐकलं आणि पुढचा सगळा इतिहास आहे. मूळ उमराव जान हिचा आवाज त्या पट्टीतला होता हे खय्याम यांना माहिती होतं. त्यामुळंच त्यांनी आशाताईंच्या गायनात हा बदल केला. ‘दिल चीज क्या है’, ’ये क्या जगह है दोस्तों’, ‘इन आँखो की मस्ती’, ‘जुस्तजू जिस की की…’ या सर्वच गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटामुळं आशा भोसले यांचं स्थान ‘एक चांगली, मेहनती गायिका’ यापासून ‘एक सर्वश्रेष्ठ, अभिजात गायिका’ या स्थानावर जे गेलं ते कायमचं. स्वत: आशाताईंनाही जणू त्या नव्यानं सापडल्या. ‘उमराव जान’ आला तेव्हा आशाताईंचं वय ४८ होतं. त्यांच्या आवाजातील परिपक्वता सर्वोच्च पातळीवर पोचली होती. इथून पुढची दोन दशकं आशाताईंनी त्यांच्या आवाजाचे विपुल प्रयोग करून रसिकांना अक्षरश: वेड लावलं. ‘उमराव जान’नंतर पाचच वर्षांत आला तो गुलजार यांचा ‘इज़ाज़त’! या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ आणि ‘कतरा कतरा मिलती है’ या दोन गाण्यांनी आशा-पंचम यांची जादू आपल्याला परत एकदा अनुभवता आली. आदल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘जीवा’ या तुलनेत दुर्लक्षित चित्रपटातही ‘रोज रोज आँखो तले’ हे अप्रतिम गाणं आशाताई-पंचम जोडीनं दिलं होतं. यात आशाताईंचे सहगायक होते किशोरकुमार यांचे पुत्र अमितकुमार.
नव्वदच्या दशकातही आशाताईंनी आपला प्रभाव कायम ठेवला. १९९५ मध्ये आलेल्या ‘रंगीला’त त्यांनी ए. आर. रेहमानच्या संगीत दिग्दर्शनात निम्म्याहून कमी वयाच्या ऊर्मिला मातोंडकरला आवाज दिला. ‘याई रे याई रे जोर लगा के नाचे रे’ या आशाताईंच्या गाण्यानं तरुणाईला थिरकायला लावलं. ‘कंबख्त इश्क है ये’, ’जरा सा झूम लू मैं’, ‘किताबें बहुत सी पढी होंगी तुमने’ अशा किती तरी लोकप्रिय गाण्यांनी तेव्हा रसिकांना वेड लावलं. एकविसावं शतक उजाडल्यावरही चिरतरुण आशाताई वयानं किती तरी लहान नायिकांना पडद्यावर खणखणीत आवाज देत होत्या. ‘लगान’मध्ये ‘राधा कैसे ना जले’ गाण्यात आशाताईंनी बहार उडवून दिली होती. अगदी अलीकडं आलेल्या ‘बेगम जान’ चित्रपटातही त्यांनी ‘प्रेम में तोहरे’ हे गाणं गाऊन रसिकांना सुखद धक्का दिला होता. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनव्या गोष्टी शिकण्याची हौस, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदासतेज व्यक्तिमत्त्वाची सहज जाणवणारी वैशिष्ट्यं.
ओ. पी. नय्यर, खय्याम आणि आर. डी. बर्मन या संगीतकारांचं आशाताईंच्या कलाजीवनात अनन्यसाधारण स्थान असलं, तरी इतर संगीतकारांसोबतही त्यांनी भरपूर काम केलं आणि अनेक अजरामर गाणी दिली. मदनमोहन आणि लता यांची जोडी प्रसिद्ध असली, तरी ‘मेरा साया’मधलं ‘झुमका गिरा रे बरेली की बजार में’ हे अतिशय लोकप्रिय गाणं मदनमोहन यांनी आशाताईंकडून गाऊन घेतलं. ‘शोख नजर की बिजलियाँ’, ‘कभी तेरा दामन ना छोडेंगे हम’, ‘जमीं से हमें आसमाँ पर…’, ‘आप को प्यार छुपाने की बुरी आदत है’ ही या जोडीची आणखी काही प्रसिद्ध गाणी. हेमंतकुमार यांनी ‘भँवरा बडा नादान हाय’सारखं अप्रतिम गाणं आशाताईंकडून गाऊन घेतलं.
शंकर-जयकिशन यांनीही आशाताईंकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. ‘परदे में रहने दो परदा ना हटाओ’ हे ‘शिकार’मधलं गाणं आजही लोकप्रिय आहे. याच गाण्यानं आशाताईंना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. ‘अंदाज’मधलं ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे किशोरसोबतचं, तर ‘रात के हमसफर’ हे ‘ॲन इव्हिनिंग इन पॅरिस’मधलं रफीसोबतचं गाणं हीही शंकर-जयकिशन जोडीचीच गाणी. ‘आवाज दे के हमें तुम बुलाओ’, ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ ही अशीच आणखी काही लोकप्रिय गीतं या जोडीनं दिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीकडंही आशाताईंनी विपुल गाणी म्हटली, ‘लोफर’मधलं ‘कोई शहरी बाबू’, ‘अनहोनी’मधलं ‘हंगामा हो गया’, ‘हमजोली’मधलं ‘ढल गया दिन’ अशी किती तरी गाणी सांगता येतील. कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे आशाताईंनी ‘डॉन’मधलं ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’, ‘विधाता’मधलं ‘उडीबाबा’ अशी उडत्या चालीची अनेक गाणी गायली. संगीतकार रवी यांच्याकडेही आशाताईंनी अनेक गाणी गायली. ‘दो बदन’मधलं ‘जब चली ठंडी हवा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘तोरा मन दर्पण कहलाए’, ‘मुझे गले से लगा लो’ अशी किती तरी गाणी या जोडीच्या नावावर जमा आहेत. बप्पी लाहिरी आणि आशाताई या जोडीने तर ‘डिस्को युगा’त आपल्या झिंगाट गाण्यांनी एकच धमाल उडवून दिली होती. ‘हिंमतवाला’मधलं ‘ताकी ओ ताकी’, ‘नमक हलाल’मधलं ‘आज रपट जाए’, ‘जवाने जानेमन’, ‘रात बाकी’ अशी किती तरी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. अजित वर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘विजेता’ या चित्रपटासाठी आशाताईंनी सत्यशील देशपांडे यांच्यासह गायलेलं ‘मन आनंद आनंद छायो’ हे अप्रतिम गाणं आजही रसिकांच्या लक्षात आहे.
आशाताईंनी बहुतेक सर्व मोठ्या पुरुष सहगायकांबरोबर गाणी गायली. मात्र, त्यांची विशेष जोडी जमली ती किशोरकुमारसोबत. किशोरच्या अवलिया व्यक्तिमत्त्वाला तोडीस तोड अशा आशाताई होत्या. त्यामुळे त्यांची गाणीही तशीच खुलून यायची. ‘सीएटी कॅट, कॅट माने बिल्ली’ किंवा ‘हाल कैसा है जनाब का…’, ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘ये रातें ये मौसम’, ‘भली भली सी इक सुरत’, ‘एक मैं और एक तू’ अशी किती तरी अवखळ, नटखट गाणी त्यांनी अगदी धमाल पद्धतीनं गायली. किशोरच्या यॉडलिंगला किंवा रेकॉर्डिंगच्या वेळी चालणाऱ्या दंग्याला आशाताई पुरून उरायच्या. त्यामुळं दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळली होती.
किशोरप्रमाणेच महंमद रफी यांच्यासह आशाताईंनी अनेक अजरामर गाणी दिली. ‘दिवाना हुआ बादल’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘इशारों इशारों में’, ‘अच्छा जी मैं हारी चलो’, ‘ढल गया दिन’, ‘बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी’, ‘आजा पंछी अकेला है’, ‘ये परदा हटा दो’, ‘गुनगुना रहे है भंवरे’, ‘हम तेरा इंतजार करेंगे कयामत तक’…. किती गाणी सांगावीत! मुकेश यांच्याबरोबरही अगदी सुरुवातीच्या काळात ‘पतली कमर है तिरछी नजर है’, ‘छोड गये बालम’, ‘जाने न नजर पहचाने जिगर’ अशी चांगली गाणी आशाताईंनी दिली.
मन्ना डे यांच्यासह आशाताईंनी अनेक गाणी गायली. सध्या पुन्हा गाजत असलेलं ‘ना तो कारवाँ की तलाश है’ हे मन्नादा आणि आशाताईंचंच ओरिजनल गाणं. ‘श्री ४२०’मधलं ‘मुड मुड के ना देख’ हेही आशा-मन्नादा जोडीचं सुपरहिट गाणं. याशिवाय ‘तू छुपी है कहाँ’, ‘दुख भरे दिन बीते रे भय्या’, ‘ये हवा, ये नदी, ये किनारा’, ‘धीरे धीरे चलना’ अशी अनेक लोकप्रिय गाणी या जोडीनं दिली. महेंद्र कपूर यांच्यासह आशाताईंनी ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘अरे जा रे नटखट’, ‘आजा आजा रे तुझको मेरा प्यार पुकारे’, ‘धडकने लगी दिल की तारों की दुनिया’, ‘चलो बुलावा आया है’ अशी किती तरी चांगली गाणी दिली आहेत. ही सर्व गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
पुरुष सहगायकांप्रमाणेच काही गायिकांबरोबरही आशाताईंनी सहगायन केलंय. त्यात अर्थातच लतादीदींबरोबर गायलेलं ‘उत्सव’मधलं ‘मन क्यूं बहका रे बहका’, शमशाद बेगम यांच्याबरोबरचं ‘लेके पहला पहला प्यार’, उषा मंगेशकरांसह गायलेलं ‘काहे तरसाये’ ही चटकन आठवणारी काही गाणी.
बाबूजींप्रमाणेच भाऊ पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह आशाताईंनी मराठीत अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. यात चित्रपटगीतांबरोबरच भावगीतांचा समावेश होता. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी आशाताईंकडून गाऊन घेतलेले गाणे आशाताईंच्या गायनकौशल्याची कसोटी पाहणारे होते. यात फारशी वाद्ये नाहीत. चालही अवघड. पं. हृदयनाथांच्या चाली ऐकायला सोप्या, पण गायला अतिशय अवघड, असं आशाताई आणि लतादीदी नेहमी म्हणत. ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपुन बसले गं’ ही सुरेश भटांची, ‘गेले द्यायचे राहुनी’, ‘समईच्या शुभ्र कळ्या’ ही आरती प्रभूंची, ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे राजा बढेंचं आणि ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ ही संत ज्ञानेश्वर माउलींची अशा वैविध्यपूर्ण रचना पंडितजींनी आपल्या मोठ्या बहिणीकडून गाऊन घेतल्या. चित्रपट संगीतात ‘जैत रे जैत’मधली गाणी कोण विसरू शकेल? ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे तर अगदी भरपूर लोकप्रिय झालेलं गाणं आशाताईंनी अत्यंत ठसक्यात म्हटलंय. याशिवाय ‘नभ उतरू आलं… चिंब थर्थर वल्लं’ हे गाणंही आशाताईंच्या अफाट गायकीचा प्रत्यय देणारं आहे. याच चित्रपटात ‘कोण्या राजानं राजानं’ हे गाणं आशाताईंनी त्यांची कन्या वर्षा हिच्यासह म्हटलं आहे. या दोघींना एकत्र ऐकण्याचा दुर्मीळ अनुभव हे गाणं आपल्याला देतं.
आशाताईंनी १९७० मध्ये आलेल्या ‘घरकुल’ या चित्रपटात सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ हे सुरेश भटांचं अफाट रोमँटिक गाणं गायलं आहे. हे गाणं आजही तितकंच टवटवीत आणि कमाल वाटतं. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताईंनी अनेक लावण्या गायल्या. अर्थात आशाताई आणि लावण्या या प्रवासाची सुरुवात १९५९ मध्ये आलेल्या ‘सांगत्ये ऐका’मधल्या वसंत पवार यांच्या संगीतातल्या ‘हाय, बुगडी माझी सांडली गं’पासून झाली होती. आशाताईंच्या त्या ‘हाय’वर अनेक जीव आजही फिदा आहेत. आनंदघन अर्थात लतादीदींनीही आशाताईंकडून ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ ही लावणी गाऊन घेतली होती. राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनात आशाताईंनी ‘सुगंधी कट्टा’ या चित्रपटात गायलेली अनेक गाणी गाजली. ‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली’, ‘तीळगूळ घ्या हो गोड गोड बोला’ ही गाणी आजही रसिकांना प्रिय आहेत. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाताई आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे ‘भालू’मधलं सुंदर गाणं कोण विसरू शकेल?
आशाताईंच्या मराठीतल्या गाण्यांची रेंज खरोखरच थक्क करणारी आहे. पुलंनी संगीत दिलेल्या ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ या गाण्यापासून ते ‘गोरी गोरी पान फुलांसारखी छान’ किंवा ‘तुझ्या गळ्या माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’ ही गाणी ते ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला’पर्यंत अनेक वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी गायिली आहेत. पिढ्यांमागून पिढ्यांचे कान तृप्त केले आहेत. बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्यासह केलेला ‘ऋतू हिरवा’ हा नव्वदच्या दशकात आलेला भावगीतांचा अल्बमही रसिकांनी डोक्यावर घेतला. यातलं ‘सांज ये गोकुळी’ हे गाणं पुढं ‘वजीर’ चित्रपटात घेण्यात आलं. याच अल्बममधलं ‘भोगले जे दु:ख त्याला’ ही भटांची गज़ल म्हणजे तर आशाताईंचं स्वगत म्हणावं असंच आहे. अगदी हीच भावना ‘हम दोनो’मधलं ’जहाँ में ऐसा कौन है जिस को गम मिला नहीं‘ हे आशाताईंचं गाणं ऐकताना मनात येते.
मराठीप्रमाणेच हिंदीतही आशाताईंच्या गैरफिल्मी गाण्यांचं प्रमाण आणि त्याची लोकप्रियता थक्क करणारी आहे. गुलाम अलींसोबत त्यांनी केलेला ‘मिराज-ए-गज़ल’ हा अल्बम खूप गाजला. यातलं ‘सलोना सा सजन है और मैं हूँ’ हे गाणं आजही अतिशय लोकप्रिय आहे. आशाताईंना खूप लहानपणापासून चांगल्या नकला करता यायच्या. त्यांना अगदी लहान वयात काही पाश्चात्त्य गायक आणि गायिकांची गाणी ऐकायला मिळाली. आशाताईंनी तो ढंग आपल्या गायकीत आणला. पुढं आर. डी. बर्मन यांनी तर त्यांच्या या गुणाचा खूपच उपयोग करून घेतला आणि अतिशय वेगळ्या चालीची, ढंगाची गाणी दिली. ‘अलिबाबा और चालिस चोर’मधलं ‘खतूबा खतूबा’ हे आशाताईंनी अरबी ढंगात गायलेलं गाणं याचं एक उदाहरण म्हणून सांगता येईल.
आशाताई आज ९२ वर्षांच्या आहेत. आयुष्य भरभरून जगल्या आहेत. अगदी अलीकडं ‘माई’ या चित्रपटात त्यांनी अल्झायमर असलेल्या वयस्कर स्त्रीची भूमिका केली होती. पाश्चात्त्य गायकांसोबत गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग त्या करत असतात. क्रिकेटपटू ब्रेट लीबरोबर २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आदी त्यांनी ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणंही गायलं होतं.
खरं तर त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्व गाण्यांचा वा त्यांच्या आयुष्यातल्या सर्व घटनांचा आढावा या कार्यक्रमात घेणं अशक्यच आहे. आशाताईंना अनेक पुरस्कार मिळाले. दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ही त्यांना मिळालेला आहे आणि अर्थातच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अजोड योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या, ‘मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे. मीही भाजी आणायला जाते, मुलांचा डबा करते. स्वयंपाक करायला मला फार आवडतं. सणवार करायला आवडतात. खरेदी करायला आवडते, साड्या विकत घ्यायला आवडतात. फक्त हा जो गळा आहे तिथं देवानं जे काही ठेवलं आहे, तेवढाच आपल्यात फरक आहे. बाकी मला तुमच्यातलीच समजा…’
आशा भोसले हे काय रसायन आहे हे यावरून कळतं. व्यक्ती म्हणून तर त्या श्रेष्ठ आहेतच; पण त्यांच्या अद्भुत, अलौकिक सूरांचं गारूड या सर्वांपलीकडं आहे. आशाताई, तुमच्या संपूर्ण जीवनाकडं पाहूनच बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुमच्या अलौकिक आवाजाला, जिद्दीला, मेहनतीला, विनोदबुद्धीला आणि झुंजार वृत्तीला आमचा मानाचा मुजरा!
----
हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे क्लिक करा...
----
रूपेरी पडद्याचे मानकरी - लता मंगेशकर हा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
-----


