9 Jul 2015

'आकाशवाणी सिडनी'चे दिवस



जगातील काही काही शहरांविषयी आपल्याला उगाच एक आपुलकी, जिव्हाळा वाटत असतो. मला लहानपणापासून लंडन, पॅरिस आणि सिडनी या शहरांचं आकर्षण वाटायचं. कधी तरी या शहरांना भेट द्यावी, तिथं फिरावं असं वाटायचं. अजूनही वाटतं. तो योग अजून आला नसला, तरी यातल्या सिडनी या शहराशी माझे अचानक ऋणानुबंध जुळले. तेही माझ्या आवाजाच्या माध्यमातून! आणि तब्बल साडेसहा वर्षं हा सिलसिला सुरू होता. म्हणजे जुलै २००० ते डिसेंबर २००६ या काळात दर महिन्याला माझा आवाज सिडनीतली शेकडो मराठी माणसं ऐकत होती. अर्थातच आकाशवाणी सिडनीच्या माध्यमातून...
पहिल्यापासूनच सांगायला हवं. मी पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रम (१९९९-२०००) करीत होतो, तेव्हाची ही गोष्ट. या एका वर्षाच्या अभ्यासक्रमात दिल्लीची ट्रिप हा एक आकर्षणाचा भाग असायचा. आमची दिल्ली ट्रिप झाली, त्यानंतर आमच्या शिक्षिका उज्ज्वला बर्वे यांनी आम्हाला त्या ट्रिपविषयी एक टिपण लिहायला सांगितलं. मी ते जरा रंजक पद्धतीनं, प्रवासवर्णन लिहावं तसं लिहिलं. ते त्यांना आवडलं असावं. त्या तेव्हा आकाशवाणी सिडनीसाठी दर आठवड्याला बातम्या सादर करायच्या. आता आकाशवाणी सिडनी हा काय प्रकार आहे, हे सांगायला हवं. सिडनीतल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन राबवलेला हा एक हौशी उपक्रम आहे. तिथं विविध भाषक गटांना विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर काही टाइम-स्लॉट मिळतात. मराठी कार्यक्रम मंगळवारी आणि रविवारी सादर होत असत. हे दोन तासांचे कार्यक्रम तिथली बहुतेक मराठी मंडळी आवडीनं ऐकतात. तर त्या वेळी त्यांना भारतातल्या घडामोडींचा काहीसा रंजक पद्धतीनं घेतलेला मासिक आढावा असा एक कार्यक्रम माझ्याकडून हवा होता. साधारण दहा मिनिटांचा हा पीस असेल आणि तो दर महिन्याच्या चौथ्या रविवारी प्रक्षेपित होईल, असं ठरलं. मी आधी एक पायलट एपिसोड लिहून दाखवला. तो त्यांना आवडला. 'भारत डायरी' असं या कार्यक्रमाचं नाव ठरलं. मग जुलैच्या चौथ्या शनिवारपासून, म्हणजे २८ जुलै २००० या दिवसापासून आमचा हा 'भारत डायरी'चा सिलसिला सुरू झाला. मी तेव्हा सकाळमध्ये काम करतच होतो. विषयांची वानवा नसायचीच. रंजक पद्धतीनं लिहिण्याची हातोटी होती. शिवाय रेडिओसाठी बोलीभाषेत कसं लिहायचं... 'व' हा शब्द न वापरता कायम 'आणि' लिहायचं (कारण आपण बोलताना व म्हणत नाही...) वगैरे ते सगळं मला माहिती होतं. बर्वेबाईंनीच शिकवलं होतं. मला हे काम आवडायचं.

तेव्हा आकाशवाणी सिडनीचे डॉ. पुरुषोत्तम सावरीकर यांच्याशी माझी ओळख झाली. डॉ. सावरीकर हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. ते दर शनिवारी दुपारी त्यांचं क्लिनिक संपवून पुण्याला फोन करायचे. त्यांच्याकडच्या साडेबारा वाजता ते फोन करायचे. म्हणजे तेव्हा इथं सकाळचे सात किंवा आठ (हिवाळा-उन्हाळा यानुसार) वाजलेले असायचे. तेव्हा मी भाऊमहाराज बोळात रूमवर राहत असे. माझ्याकडं मोबाइल सोडा, पण लँडलाइन फोनही असण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी दर चौथ्या शनिवारी बर्वे मॅडमच्या घरी जायचं असं ठरलं. मला रात्रपाळीच्या कामामुळं उशिरा उठायची सवय होती. पण चौथा शनिवार येऊ लागला, की माझं वेळापत्रक बदलायचं. साधारण दोन दिवस आधी, म्हणजे गुरुवारी व शुक्रवारी मी हा मजकूर हातानं कागदांवर लिहून काढत असे. दहा मिनिटांचा कार्यक्रम म्हणजे पाच ते सहा फुलस्केप पानं लिहावी लागायची. हा मजकूर घेऊन मी दर शनिवारी सकाळी सात-साडेसातपर्यंत बर्वेबाईंकडे जायचो. त्या तेव्हा डहाणूकर कॉलनीत राहायच्या. त्यांचं स्वतःचं बुलेटिनही असायचं. त्यामुळे भरपूर पेपर आजूबाजूला घेऊन त्या बुलेटिन लिहिण्याच्या गडबडीत असायच्या. त्यांचे यजमान सुनील यांच्याशीही चांगला परिचय झाला नंतर. त्यांच्या दोन्ही मुली तेव्हा लहान होत्या. त्या बऱ्याचदा झोपलेल्या असायच्या. मग आमची एक कॉफी व्हायचीच. बुलेटिन सुरू असताना दूधवाल्यानं डोअरबेल वाजवू नये, म्हणून सुनील दार उघडं ठेवून ती काळजी घ्यायचे. किंबहुना बुलेटिनचं रेकॉर्डिंग सुरू असताना कुठलाच आवाज व्हायला नको असायचा. पण आम्हाला एकदाही असा अडथळा कधी आला नाही. सावरीकरांचा फोन आला, की बहुतांश वेळा बर्वेबाई मला आधी तू डायरी सांग, असं म्हणायच्या. मग मी फोनवर ती वाचून दाखवायचो. आधी डॉक्टर ट्रायल म्हणून एखादं वाक्य म्हणायला सांगायचे. त्यांनी ओके म्हणून सांगितलं, की मी मंडळी नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी- श्रीपाद ब्रह्मे - पुण्याहून भारत डायरी सादर करीत आहे, असं म्हणून सुरू करायचो. क्वचित कधी तरी अडखळायला झालं, तर पुन्हा पहिल्यापासून सादर करायला लागायचं. कारण तेव्हा त्यांच्याकडं व्हॉइस एडिटिंगची सोय नव्हती बहुतेक. मग वन टेक ओके व्हावं यासाठी माझी धडपड चालायची. पण पहिल्या भागापासूनच हे चांगलं जमलं असं वाटतं. माझं बुलेटिन झालं, की मग बर्वेबाईंच्या बातम्या सादर व्हायच्या. आणि मग सावरीकरांशी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, की फोन संपत असे. सावरीकर नसतील, तर विजय जोशी फोन करायचे. (विजय जोशी हेही एक भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याचं तंत्रज्ञान शोधलं असून, त्यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा तिथल्या पद्म पुरस्कारासारखा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.) जोशी हे व्यक्तिमत्त्व एवढं मोठं आहे, याची मला तेव्हा मुळीच कल्पना नव्हती. मी अगदी निवांत त्यांच्याशीही बोलत असायचो. ते मला कायम श्रीपाद अशीच हाक मारायचे आणि ते मला आवडायचं. (तेव्हा मला ऑफिसमध्ये सगळेच ब्रह्मे अशी हाक मारायचे. मला ते मुळीच आवडायचं नाही. पण इलाज नव्हता. कारण माझ्याबरोबर श्रीपाद कुलकर्णी आणि मंदार कुलकर्णी हे दोघं असायचे. त्यामुळं मला श्रीपाद हाक मारली, तर कन्फ्युजन व्हायचं आणि कुलकर्णी हाक तर पुण्यात मारूच शकत नाहीत कुणी... सो, त्या दोघांना श्रीपाद अन् मंदार आणि मला मात्र सगळे ब्रह्मे म्हणायला लागले. पण बर्वेबाई आणि विजय जोशी हे अपवाद. असो.)
आकाशवाणी सिडनी हा हौशी उपक्रम असूनही ही मंडळी आम्हाला या सादरीकरणाचं मानधन द्यायची. दीपक बापट हेही या आकाशवाणी सिडनीच्या उपक्रमात असायचे. त्यांची माझी थेट ओळख कधी झाली नाही, पण त्यांच्या मातुःश्री शोभा बापट यांच्याशी झाली. कारण आमचं मानधन पुण्यात त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोचतं व्हायचं. मी एरंडवण्यात बापट आजींकडं जायचो. त्या अतिशय प्रेमळ होत्या आणि अत्यंत उत्साही होत्या. कायम एका वाटीत पेढा किंवा बर्फी आणि एक बाकरवडी असा खाऊ त्यांच्याकडं मिळायचा. क्वचित कधी तरी माझी पत्नीही बरोबर असायची. मग दोघांचाही पाहुणचार व्हायचा. बापट आजी सत्तरी ओलांडलेल्या होत्या, पण क्वांटास एअरलाइन्सच्या विमानानं त्या सिंगापूरचा हॉल्ट घेऊन एकटीनं मुलाकडं म्हणजेच दीपककडं सिडनीला जात असत.
आकाशवाणी सिडनीमुळं माझा आवाज आणि नाव सिडनीतल्या अनेक मराठी माणसांना माहिती झालं. विजय आणि अंजली श्रोत्रीय यांच्याशी घट्ट ओळख झाली. हे दांपत्य आधी सिडनीला होतं. आता ते पुण्यात परत आले आहेत. दोघंही अत्यंत हुशार आणि प्रेमळ. एकदा डॉ. सावरीकर पुण्यात आले. (ते मूळचे हैदराबादचे.) तेव्हा बर्वेबाईंकडं आम्हाला जेवायलाच बोलावलं. सावरीकरांनी आम्हाला 'आकाशवाणी सिडनी'च्या तेथील कार्यक्रमांची एक सीडी, एक मानपत्र आणि त्यांचं एक मासिक निघालं होतं, ते दिलं. खूप मजा आली.
'आकाशवाणी सिडनी'चा हा प्रवास डिसेंबर २००६ मध्ये संपला. माझे एकूण ७६ भाग लिहून झाले. दोन महिन्यांचा अपवाद सोडला, तर दर महिन्याला सलगपणे ही डायरी सादर झाली. नंतर माझ्या नगरच्या घरचा लँडलाइन फोन मी देऊन ठेवला होता. मी सुट्टीत घरी गेलो, तर तिथंही डॉक्टरांचा फोन यायचा आणि मी घरून डायरी सादर करू शकायचो. या ७६ भागांमुळं या साडेसहा वर्षांतील भारतातील प्रमुख घटनांचा एक महत्त्वाचा दस्तावेजच माझ्याकडं लिखित रूपात जमा झाला आहे. (या डायरीचे नमुना म्हणून पहिला आणि शेवटचा असे दोन भाग याच ब्लॉगवर खाली स्वतंत्रपणे दिले आहेत. जिज्ञासूंनी ते नक्की पाहावेत.)
'आकाशवाणी सिडनी'चे दिवस हा माझ्या आयुष्यातलाही खूप आनंददायक आठवणींचा काळ आहे. त्यासाठी बर्वेबाई, डॉ. सावरीकर, विजय जोशी, शोभा बापट आज्जी या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार...
---

3 comments:

  1. व्वा श्रीपाद, तुमचा लेख छानच झालाय. मला आकाशवाणी पुणे वरच्या बातम्यांचे दिवस आठवले. तेव्हा आकाशवाणीवरही बर्वे बाई बातम्या द्यायच्या.
    तुम्ही बातम्या देत होतात. इतकी वर्षे आणि सातत्याने ग्रेट..रेकॉर्ड झालेले एखादे बुलेटन ऐकायला आवडेल.
    सागर गोखले

    ReplyDelete
  2. सागर, थँक्स.. अरे पण नाहीये आता रेकॉर्ड माझ्याकडे... पण लिहिलेला मजकूर आहे सगळा...

    ReplyDelete
  3. व्वा श्रीपाद!
    तुमचा हा पैलू ठाऊकच नव्हता!

    ReplyDelete