22 Jun 2015

सिडनी आकाशवाणीसाठी...

भारत डायरी (पहिला भाग)
--------------------------------

मंडळी नमस्कार,

आषाढी पौर्णिमा हा दिवस 'गुरुपौर्णिमा' म्हणून आपण साजरा करतो. 'गुरुःब्रह्मा गुरुःविष्णू' ही शिकवण देणाऱ्या आपल्या संस्कृतीनंच गुरूचं महत्त्व अधोरेखित केलंय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूला वंदन करावं, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी, ही आपली पद्धत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनीही या परंपरेचं पालन केलं. आपले एके काळचे गुरू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सात वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात कारवाई करावी, असे आदेश लिहिलेल्या कागदावर त्यांनी याच दिवशी सही केली. एकूण मग पुढचे पंधरा दिवस या प्रकरणानं महाराष्ट्रात, देशात जे रान पेटवलं तिचा अपरिहार्य फायदा बाळासाहेबांची लोकप्रियता वाढण्यात झाला. गेल्या काही दिवसांत भारतातल्या खऱ्या-खोट्या सगळ्याच वाघांवर संक्रांत आली आहे की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती होती. नंदनकानन हे ओरिसातलं प्राणिसंग्रहालय असो, की 'मातोश्री' हा बाळासाहेबांचा बंगला असो; वाघांचं काही खरं नाही, असंच चित्र दिसत होतं. मात्र, छगनरावांच्या सहीच्या एका फटकाऱ्यानिशी पांढऱ्या वाघांत नसलं, तरी शिवसेनेच्या वाघाच्या भुजांमधलं बळ वाढलं. शिवसेनेला एक प्रकारे जीवदानच मिळालं. मरगळलेले सैनिक आळस झटकून उठले. चक्क मुंबईतल्या रस्त्यांवर उतरले. ठाकऱ्यांना अटक होण्याआधीच त्यांना अटक झाली तर काय होईल, याचं प्रात्यक्षिकच या सैनिकांनी घडवलं. आता तुम्हीच सांगा, भुजबळ यांनी आपल्या एके काळच्या गुरूला ही 'दक्षिणा'च दिली की नाही?
वृत्तपत्रांनी मात्र विनाकारण भुजबळांनाच टीकेचं लक्ष्य केलं. अविवेकी निर्णय, अवेळी आणि अनाठायी पाऊल वगैरे वगैरे अग्रलेख लिहून छगनरावांवर टीका केली. ठाकऱ्यांच्या 'सामना' या मुखपत्रातूनही 'लखोबा'वर जहरी टीका होऊ लागली. भुजबळांना ठाकऱ्यांचा सूड घ्यायचा आहे वगैरे भाषा बोलली जाऊ लागली. ठाकरे यांना अटक होऊ नये, म्हणून केंद्रातील वाजपेयी सरकारवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेच्या मनोहर जोशी, बाळासाहेब विखे-पाटील आणि सुरेश प्रभू या तिन्ही मंत्र्यांनी राजीनामे दिले. ते वाजपेयींनी काही स्वीकारले नाहीत. भुजबळांनी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे मदत मागितली. केंद्रानं जादा निमलष्करी दले देण्यास चक्क नकार दिला. मग भुजबळ वैतागले आणि त्यांनी महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या मालकीच्या संस्थांचा बंदोबस्त काढण्याची धमकीच दिली.
अखेर या प्रकरणाचा कळसाध्याय काय होणार, यामुळं अवघा महाराष्ट्र चिंताक्रांत जाहला. मात्र, फार काही घडलंच नाही. गेल्या मंगळवारी ठाकरेंविरुद्धची ती केसच मुंबईच्या भोईवाडा न्यायालयानं काढून टाकली. हर हर! ज्यासाठी केला एवढा अट्टाहास, अगा ते घडलेचि नाही, असं म्हणायची पाळी भुजबळांवर आली. ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी सगळीकडं जल्लोष केला. मंगळवारी सकाळच्या घटना या दृष्टीनं पाहण्यासारख्या होत्या. ठाकरे भोईवाडा न्यायालयाकडं स्वतःहून निघाले, असं शिवसेनेतर्फे घोषित करण्यात आलं. खरं तर त्यांना सावरकर रोडवरील महापौर बंगल्यात नेऊन तांत्रिक अटक करण्यात आली आणि मग न्यायमूर्तींपुढं उभं करण्यात आलं. न्यायमूर्ती बी. पी. कांबळे यांनी हा खटलाच कालबाह्य झाल्यामुळं रद्द करून टाकला अन् बाळासाहेब निर्दोष सुटले.
भुजबळांची 'गुरुदक्षिणा' अशा रीतीनं फळाला आली. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना गेले तीन आठवडे दुसरा विषयच नव्हता. ठाकरे यांची अटक हा जणू राज्यापुढचा एकमेव महत्त्वाचा विषय आहे, अशी रीतीनं सगळीकडं याच विषयाची चर्चा होत होती. मंगळवारी ठाकरे निर्दोष सुटले अन् ही चर्चा एकदम थांबली. लोक आता दुसऱ्या विषयाकडं वळले. या सगळ्या घटनांतून समाजाचं एक वैशिष्ट्य अलीकडं ठळकपणे जाणवू लागलं आहे, की लोकांना चर्चेसाठी काही तरी एक निमित्त लागतं; एखादा विषय लागतो. दोन महिन्यांपूर्वी मॅच फिक्सिंगची चर्चा होती. ते वारं गेलं अन् ठाकरेंच्या अटकेची चर्चा सुरू झाली. पूर्वी हृतिक रोशनची चर्चा चाले; मग ती जागा अभिषेक बच्चननं घेतली. आता तोही जुना झाला आणि 'कौन बनेगा करोडपती' या 'स्टार प्लस'वरील चमत्कृतीपूर्ण मालिकेची चर्चा सुरू झाली. असं लोकांना सारखं काही तरी चघळायला लागतं. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे लोक चर्चा करीत नव्हते, असं नाही. पण त्यात चार जाणती माणसं सगळ्यांना समजावून सांगायची. बाकीचेही त्यांचं ऐकायचे. आता माहिती युगाचा परिणाम म्हणून की काय, सगळ्यांना सगळंच माहिती असतं. त्यामुळं जो तो तावातावानं आपलं म्हणणं मांडत असतो. दुसऱ्याचं ऐकून घेण्याची वृत्तीच नष्ट होत चाललीये. लोक अधिकाधिक असहिष्णू तचर बनत नाहीयेत ना, अशी शंका येते.
अलीकडंच मॅच फिक्सिंगचं प्रकरण ठाकरेंच्या अटकेच्या गदारोळातही पुन्हा असंच चर्चेला आलं. इन्कम टॅक्सवाल्यांनी देशभर ९३ ठिकाणी या क्रिकेटपटूंच्या घरोघर आणि संबंधित कार्यालयांवर छापे घातले. त्यातून दालमियाही सुटले नाहीत. कपिलदेव, अजहरुद्दीन, जडेजा, अजय शर्मा, सिद्धू आदी क्रिकेटपटूंनी अक्षरशः थक्क करणारी संपत्ती जमा केल्याचं या छाप्यांतून उघडकीला आलं. अजहरचा वांद्र्यातील हिल रोडवरचा दुमजली फ्लॅट म्हणजे अगदी राजमहाल भासावा, एवढा भारी होता म्हणे. महागडी चित्रे, उंची वस्त्रे, परदेशी बनावटीच्या मोटारी असा एकंदर अजहरभाईंचा नूर आहे. अजहरची पत्नी संगीता बिजलानी हिच्या फ्लॅटवरही छापे पडले. आपले क्रिकेटपटू केव्हाच 'करोडपती' बनले आहेत, हे सर्वसामान्य जनतेनं यावरून ओळखलं. अर्थात या क्रिकेटपटूंना त्यासाठी 'कौन बनेगा करोडपती'मधील प्रश्नांची उत्तरं देण्याचे कष्टही घ्यावे लागलेले नाहीत. सर्वसामान्यांना करोडपती बनायचं असेल, तर मात्र 'जनरल नॉलेज'ची कसून तयारी करायला हवी. स्टार प्लसवर गेले काही आठवडे सुरू असलेली 'कौन बनेगा करोडपती' ही मालिका सध्या सर्वत्र चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालकाच्या रूपानं प्रथमच छोट्या पडद्यावर आला आहे, हेही या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. सध्या 'स्टार प्लस'वाले भलतेच खूश असतील. त्यांनी या मालिकेच्या निर्मितीसाटी खर्चलेले पैसे दामदुपटीनं वसूल होतील, अशी चित्रं आहेत. 'हू वाँट्स टु बी अ मिलेनिअर' या पाश्चात्त्य मालिकेची कल्पना केंद्रस्थानी ठेवून 'स्टार प्लस'ने करोडपतीची निर्मिती केली आहे. जनरल नॉलेज या सदराखाली मोडणारे प्रश्न या मालिकेत विचारतात. प्रत्येक प्रश्नाला एक हजारपासून ते एक कोटीपर्यंतची बक्षिसं! फुकटात करोडपती बनण्याचं स्वप्न हे या मालिकेच्या यशाचं मुख्य कारण. गेले काही महिने स्टार प्लस वाहिनी तोट्यात चालली होती. 'झी' व 'सोनी' या प्रतिस्पर्धी वाहिन्यांनी जाहिरातीच्या वार्षिक उत्पन्नात 'स्टार प्लस'ला फार मागे टाकलं होतं. आता या मालिकेमुळं 'स्टार प्लस'चं भवितव्य पुन्हा उजळलं आहे, यात शंका नाही. फुकटात एक कोटी रुपये मिळवून देण्याचं स्वप्न कुठल्या मध्यमवर्गीयाला पडत नाही? भारतातल्या तीस कोटी मध्यमवर्गीयांचा हा 'वीक पॉइंट' अचूक हेरून, 'स्टार प्लस'नं हा जुगाराचा डाव मांडला आहे. या मालिकेत भाग घेण्यासाठी एक फोन करावा लागतो. भारतातल्या प्रमुख शहरांतील हे फोन क्रमांक दररोजच्या लाखो फोन कॉल्समुळे कायम 'एंगेज' मिळतात. दूरध्वनी खात्याचा त्यामुळं मोठाच फायदा झाला आहे. या मालिकेमुळं 'स्टार प्लस'ला १३३ भागांनंतर सुमारे १२०० ते दीड हजार कोटी रुपये मिळतील, असा अंदाज आहे. याशिवाय अमिताभची डबघाईला आलेली 'एबीसीएल'ही पुन्हा उभारी धरेल, अशी चिन्हं आहेत.
या मालिकेमुळं सध्या एक चर्चा सर्वत्र सुरू आहे - ज्ञानाला, माहितीला असं पैशांत तोलावं का? अमूक प्रश्नाच्या उत्तराची किंमत अमुक एक हजार हे ऐकायलाही कसंसंच वाटतं. या मालिकेचं समर्थन करणाऱ्यांच्या मते, जुगार काय आपल्याकडं महाभारत काळापासून चालत आलेला आहे. तेव्हा या मालिकेमुळं लोकांचं जनरल नॉलेज वाढत असेल, तर वाईट काय? आणि खरंच, या मालिकेमुळं स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांना एकदम भाव आलाय. अनेक दैनिकांनी, साप्ताहिकांनी आपल्या अंकांमधून असे जनरल नॉलेजचे प्रश्न वाचकांना विचारायला सुरवात केलीये.
लोकांचं सामान्यज्ञान वाढत असेल त्यानिमित्तानं, तर चांगलंच आहे. पण 'फुकटच्या पैशांचं' असं आमिष दाखवत राहिलं, तर श्रमांबद्दल वाटणारा आदर कमी होईल, त्याचं काय? 'मानवतेचे मंदिर माझे... श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती' असं सुधीर फडके यांचं प्रसिद्ध गीत आहे. उद्या 'करोडपती'च्या माध्यमातून लोक खरंच असे 'फुकटात' श्रीमंत व्हायला लागले, तर 'श्रमिक हो, घ्या इथे चिरविश्रांती' असं गायची वेळ यायची!

(२८-७-२०००)
---

No comments:

Post a Comment