22 Jun 2015

सिडनी आकाशवाणीसाठी...

भारत डायरी (शेवटचा भाग)
---------------------------------

मंडळी नमस्कार,

आकाशवाणी सिडनीसाठी, मी - श्रीपाद ब्रह्मे - पुण्याहून भारत डायरी सादर करीत आहे.
मंडळी, भारत डायरीचा हा शेवटचा भाग. गेली साडेसहा वर्षं या डायरीच्या माध्यमातून आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांशी मी संवाद साधू शकलो, याचं सर्व श्रेय आकाशवाणी सिडनीच्या संयोजकांनाच आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भारतातील राजकीय घडामोडींवर टीकाटिप्पणी करणारी ही डायरी मला खूप समृद्ध करून गेली. ही डायरी सादर करायची म्हणून स्वतःला अपडेट ठेवणं, वेगवेगळी माहिती संकलित करणं आणि मग सिडनीहून डॉ. सावरीकर किंवा विजय जोशींचा फोन आला, की ती सादर करणं यात मला खूप आनंद मिळाला. सिडनीत स्थायिक झालेल्या मराठी जनांना मातृभूमीतल्या घटना-घडामोडी सांगून त्यांना अपडेट करता आलं, याचं समाधान काही निराळंच आहे!
ही डायरी सादर करण्यासाठी माझ्याकडं आली याचं सगळं श्रेय उज्ज्वला बर्वे यांना! त्यांनी माझं नाव सुचवलं नसतं, तर आपल्याला भेटण्याची संधी मला मिळाली नसती. २८ जुलै २००० रोजी भारत डायरीचा पहिला भाग रेकॉर्ड झाला आणि त्यानंतर आत्तापर्यंत ती दर महिन्याला अव्याहतपणे सुरू राहिली. अपवाद दोनच. तेही याच वर्षी आलेले. अन्यथा २००० पासून सलग ६७ महिने ही डायरी एकदाही खंड न पडता ध्वनिमुद्रित झाली, याचं श्रेय आकाशवाणी सिडनीच्या संयोजकांनी पाळलेल्या शिस्तीलाच आहे.
आतापर्यंत एकूण ७५ भाग पूर्ण झाले आणि हा शेवटचा, ७६ वा भाग आज प्रसारित होतोय. अर्थात प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. त्याच न्यायानं आणि नव्या वर्षात काही नव्या कार्यक्रमांना स्थान देण्यासाठी ही डायरी आता थांबते आहे. अर्थात निरोप घेण्यापूर्वी या वेळची डायरी मी सादर करतो आहे.
मंडळी, डिसेंबरमधील आपली डायरी म्हणजे संपूर्ण वर्षाचा आढावा घेणारी डायरी. यंदाचं २००६ हे वर्ष आता मावळतीकडं निघालं आहे. हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचं ठरणार आहे. भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक आण्विक कराराची पायाभरणी या वर्षानं केली आहे. एक मार्चला अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश भारताच्या दौऱ्यावर आले आणि त्यांच्या या भेटीनं भारत-अमेरिका संबंधांची परिमाणंच बदलली. वर्ष संपता संपता बुश यांनी अमेरिकी काँग्रेसनं संमत केलेल्या या संदर्भातल्या विधेयकावर स्वाक्षरीही केलीय.
प्रतिस्पर्धा कमकुवत असल्यामुळं केंद्रातील काँग्रेस आघाडीचं सरकार दिवसेंदिवस भक्कम होत चाललंय. डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखा सोज्वळ चेहरा पंतप्रधान म्हणून या सरकारला लाभला आहे; तर सोनिया गांधीही आपण मुरब्बी राजकारणी असल्याचं अधिकाधिक सिद्ध करीत चालल्या आहेत. वर्षभरात केरळमधली काँग्रेसची सत्ता गेली; पण त्या बदल्यात झारखंडमधलं भाजपचं सरकार घालवून तिथं मधू कोडा नामक अपक्षाला मुख्यमंत्रिपदावर बसविण्यात काँग्रेसनं यश मिळवलं. काँग्रेसला आता उत्तर प्रदेशातली मुलायमसिंह यादवांची सत्ता काट्यासारखी सलते आहे. येत्या फेब्रुवारीत तिथं विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेव्हा काँग्रेस राहुल गांधींना प्रचारात उतरवणार, हे नक्की.
आर्थिक आघाडीवर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची शिस्त या सरकारला पूरकच ठरते आहे. देशातील सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर फोफावत असून, ते अधिकाधिक कराच्या जाळ्याखाली आणण्याचा प्रयत्न चिदंबरम करीत आहेत. मराठी माणसांच्या दृष्टीनं या वर्षातील कटू घटना म्हणजे साताऱ्याच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचं आयडीबीआय बँकेत झालेलं विलीनीकरण. पुण्यातली सुवर्ण सहकारी बँक, सांगली बँक या सहकारी क्षेत्रातल्या बँकाही विलीनीकरणाच्या मार्गावर आहेत. असो.
काँग्रेसचं असं बरं चाललेलं असताना, विरोधकांच्या, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हे वर्ष काळंकुट्ट म्हणावं एवढं वाईट गेलं. प्रमोद महाजन यांची त्यांच्या धाकट्या भावानंच गोळ्या घालून केलेली हत्या हा भाजपवर या वर्षात झालेला वज्राघात होता. २२ एप्रिल रोजी सकाळी महाजन यांच्या वरळीतील फ्लॅटमध्ये येऊन प्रवीण महाजनने त्यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयात तीन मेपपर्यंत महाजन जन्म-मृत्यूची झुंज देत होते. अखेर नियतीचा विजय झाला आणि हा उमदा राजकारणी अकालीच आपल्यातून निघून गेला. महाजन यांच्या अशा मृत्यूमुळं भाजपला संघटना पातळीवर मोठा धक्का बसला. अर्थात भाजपचं नष्टचर्य एवढ्यावर संपलं नाही. महाजन यांचा मुलगा राहुल आणि त्यांचा स्वीय सचिव विवेक मैत्रा यांना अमली पदार्थांचं अतिसेवन केल्याच्या प्रकारातून दोन जून रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेत मैत्रांचा मृत्यू झाला, तर राहुल मात्र बचावला. पुढचे काही दिवस या वादातच सापडल्यामुळं त्याच्या राजकीय भवितव्याला पूर्णविराम मिळाला. अगदी अलीकडं पत्नी श्वेता हिला कथित मारहाण केल्याच्या प्रकारातून तो चर्चेत राहिला. एकूणच भाजपच्या राशीत सध्या सर्व अनिष्ट ग्रहांची दाटी झाल्याचं दिसतं आहे.
वाजपेयी आणि अडवानी दोघंही आता मावळतीकडं निघाले आहेत. महाजन यांच्यानंतर राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी आदी नेत्यांवर भाजपची भिस्त आहे. अर्थात यापैकी कुणालाही सोनिया गांधींएवढा देशव्यापी करिष्मा नाही. प्रत्येकालाच आपलं कर्तृत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध करावं लागेल.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीही अवस्था फारशी निराळी नाहीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आता पूर्णपणे निवृत्त जीवन व्यतीत करीत आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या वर्षाच्या शेवटीच बंडाचं निशाण फडकावलं होतं. त्या राज ठाकरेंनी या वर्षी नऊ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाची अवस्था रांगत्या मुलासारखी असली, तरी हा पक्ष राज्याच्या सत्ता-समीकरणांत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, यात शंकाच नाही. किंबहुना येत्या एक फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी महापालिकांच्या निवडणुकांत राज ठाकरेंच्या पक्षाची खरी कसोटी लागणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांनी या वर्षावर आपली मुद्रा उमटवली, असं म्हणावं लागेल. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना राजीनामे द्यायला लावले आणि एक श्रीवर्धनचा अपवाद वगळता, सगळीकडं त्यांना पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणलं. अगदी अलीकडं चिमूर आणि दर्यापूर या विदर्भातल्या मतदारसंघांतही विजयश्री खेचून आणून, राणे यांनी आपला प्रभाव केवळ कोकण किंवा मुंबईपुरता नाही, हे सिद्ध केलं. राणे यांच्या वाढत्या वर्चस्वाची दखल सोनिया गांधींनीही घेतली आहे. राणेंची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. त्यामुळं काँग्रेसच्या एका गोटात अस्वस्थता आहे. अर्थात राणेंनीही हळूहळू काँग्रेसी शैलीचं राजकारण आत्मसात करायला सुरवात केलीय. राज ठाकरे आणि नारायण राणे ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली भविष्यातली दोन महत्त्वाची नावं आहेत.
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याच वर्षी संसदीय राजकारणात पदार्पण केलं. ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांचं नोव्हेंबर महिन्यात निधन झालं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या राजकारणातला संतपरंपरेशी नातं सांगणारा एक दुवा संपला.
साहित्य क्षेत्रात तर मराठीसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरलं. विंदा करंदीकरांना आठ जानेवारीला साहित्य क्षेत्रातला देशातला सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ‘विंदां’च्या कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या मराठी मनाला त्यामुळं अत्यंत आनंद झाला. दहा ऑगस्टला विंदांना राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिल्लीत प्रदान करण्यात आला. वर्ष संपता संपता आशा बगे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. जानेवारीत सोलापुरात पार पडलेलं साहित्य संमेलन वाचकांच्या प्रचंड प्रतिसादामुळं गाजलं. विश्वास पाटील यांची बहुचर्चित ‘संभाजी’ कादंबरी या वर्षी प्रसिद्ध झाली. पुढील वर्षी फेब्रुवारीत नागपुरात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण साधू यांची निवड झालीय. साधू हे लोकप्रिय लेखक तर आहेतच; पण कृतिशील पत्रकार, चिंतनशील समाजशास्त्रज्ञ आणि व्यासंगी अभ्यासक आहेत. त्यांच्या निवडीमुळं मराठी साहित्यरसिकांना निश्चितच आनंद झालेला आहे.
मनोरंजनाच्या क्षेत्रात बोलायचं झालं, तर यंदा ‘रंग दे बसंती‘, ‘फना’, ‘क्रिश’, ‘कभी अलविदा ना कहना’ असे काही सुपरहिट चित्रपट बॉलिवूडनं दिले. पण सगळ्यांत भाव खाऊन गेला तो संजय दत्तचा ‘लगे रहो मुन्नाभाई’. या चित्रपटानं देशात ‘महात्मा गांधी’ ही एक ‘इन थिंग’ करून टाकली. ‘गांधीगिरी’ हा शब्द ज्याच्या त्याच्या मुखी घोळू लागला. अर्थात संजय दत्तला वैयक्तिक आयुष्यात त्याचा फार उपयोग झाला नाही; कारण मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयानं त्याला शस्त्रं हाताळल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. आता शिक्षा कधी सुनावली जाते, याची प्रतीक्षा आहे. या वर्षाच्या सुरवातीला १७ फेब्रुवारीला चिंकारा शिकार प्रकरणी सलमान खानलाही एक वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली. अर्थात त्याला जामीन मिळाला आहे. या वर्षात उस्ताद बिस्मिल्ला खाँ, संगीतकार नौशाद, अभिनेत्री नादिरा, कन्नड सुपरस्टार राजकुमार, ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी हे नामवंत कलावंत हे जग सोडून गेले.
अर्थात असं असलं तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वावर जगरहाटी चालतच राहते. ऋतूमागून ऋतू येतात, जातात. एक पिढी जाते, दुसरी येते. एक चक्र अव्याहत सुरू असतं. दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध दिग्दर्शक किम की डूक याच्या ‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर अँड स्प्रिंग अगेन’ या अप्रतिम चित्रपटात दाखवलेल्याप्रमाणे काळाचं हे चक्र पूर्ण झालं, की पुन्हा वसंत फुलतच असतो.
मला हे सगळं विस्तारानं सांगावंसं वाटतंय, ते यामुळंच, की जरी गेल्या साडेसहा वर्षांपासून सुरू असलेली ही भारत डायरी आज संपत असली, तरी कुठल्या ना कुठल्या रूपात ती तुम्हाला भेटत राहील. तुम्हीही तिची आठवण ठेवा. नवं वर्ष येतंय. ते आपल्या सर्वांच्या जीवनात यशाचा वसंत ऋतू घेऊन येवो, अशी शुभेच्छा देतो. आकाशवाणी सिडनीच्या सर्व उपक्रमांनाही मनापासून सुयश चिंतितो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो आणि निरोप घेतो. नमस्कार. जय हिंद!

(२३-१२-२००६)
----

No comments:

Post a Comment