नाव आहे चाललेली...
-------------------------
झोया अख्तर
दिग्दर्शित दिल धडकने दो हा नवा हिंदी चित्रपट मला दोन कारणांसाठी आवडला. काही
काही कलाकृती जन्मताच अभिजातपणाचं कोंदण घेऊन आलेल्या असतात. झोयाचा चित्रपट याच
वर्गात मोडणारा आहे. कारण तो पाहताना एखाद्या कसलेल्या गायकाकडून विलंबित ख्याल ऐकत
गुंगून जाण्याचा फील येतो. अत्यंत तब्येतीत बनवलेला हा चित्रपट आहे. त्यामुळं
त्याच्या दोन तास ५० मिनिटं या आजच्या मानानं फारच दीर्घ वाटणाऱ्या कालावधीचीही
पर्वा झोयानं केलेली नाही. विशेष म्हणजे एवढा मोठा सिनेमा पाहताना आपल्याला मुळीच
कंटाळा येत नाही. हे निखालस पटकथेवर आणि चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यावर घेतलेल्या
मेहनतीचं यश आहे, यात शंका नाही. दुसरं कारण म्हणजे या सिनेमाचं परफेक्ट कास्टिंग.
म्हणजे यातल्या प्रत्येक भूमिकेत काम करणारे कलावंत त्या त्या भूमिकेत एवढे चपखल
बसले आहेत, की त्या जागी दुसऱ्या कुणाचा विचारही आपल्या मनात येत नाही. सिनेमा तयार
करताना प्रचंड पूर्वतयारी लागते. तो आधी दिग्दर्शकाच्या मनात तयार व्हावा लागतो,
असं म्हणतात. झोयानं (आणि तिच्यासह कथा-पटकथा लिहिणारी, दुसरी अत्यंत अत्यंत
गुणवान दिग्दर्शिका रीमा कागती हिनं) यातली फ्रेम न् फ्रेम आधी मनात पाहिली असणार.
त्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवताना त्यांना सर्व कलाकारांची उत्कृष्ट साथ लाभली
आहे. त्यामुळंच हा एक मस्ट वॉच सिनेमा ठरला आहे.
दिग्दर्शकाला आपल्या
कलाकृतीतून जे काही सांगायचं आहे, त्यासाठी तो माध्यम म्हणून एखादी गोष्ट निवडतो.
त्यात रंजक प्रसंग निर्माण करून ती पाहणाऱ्याला इंटरेस्टिंग वाटेल अशी तयार करतो.
तयार करणाऱ्याला जे काही सांगायचंय ते पाहणाऱ्यापर्यंत जसंच्या तसं पोचलं, की ती
कलाकृती यशस्वी झाली असं मानता येईल. हे जसंच्या तसं पोचणं हीच प्रक्रिया खूप अवघड
असते. प्रेक्षकांच्या मानसिकतेचा लसावि काढून त्याच्या जवळ जाईल, अशी कलाकृती तयार
करणं फारच कठीण. झोयानं हे साधलं, याचं एकमेव कारण ती स्वतः उत्तम क्राफ्ट्सवुमन
आहे. दिल धडकने दो या चित्रपटाच्या माध्यमातून ती आपल्याला नेहमीचीच गोष्ट सांगते.
पंजाबातल्या अतिश्रीमंत मेहरा कुटुंबाची ही कथा आहे. भारतातल्या कुटुंबसंस्थेची,
पालकांची, मुलांची आणि त्यांच्या एकमेकांत गुंतलेल्या नात्यांची आणि त्यांच्या ओढाताणीची
ही गोष्ट आहे. वरकरणी पाहता, यात विशेष काही वाटत नाही. पण या साध्याच गोष्टीला
विशेष बनवते ती झोयाची हाताळणी. एखादी दीर्घ कादंबरी वाचताना लेखक ज्या प्रकारे
पात्रांची रचना करतो, प्रत्येक पात्राला स्थापित होण्याचा अवकाश देतो, त्यांची
अन्य पात्रांशी असलेली वेगवेगळ्या स्तरांवरच्या नातेसंबंधांची वीण बांधतो त्याच
पद्धतीनं झोया आपली कलाकृती सादर करते.
इथं विलंबित लय असल्यानं प्रत्येक पात्र
आपल्या मनात व्यवस्थित प्रस्थापित होतं. त्याच्या भावभावना, त्याचा स्वभाव, त्याचे
विविध कंगोरे आपल्याला नीटच समजतात. कादंबरीत लेखकाचं निवेदन सूत्रधाराचं काम करतं
किंवा मैफलीत गायक स्वतःच ती भूमिका बजावत असतो, तद्वत झोयानं इथं मेहरा
कुटुंबातील प्लूटो या कुत्र्यालाच ही सूत्रधाराची भूमिका दिली आहे. यामुळं कथेतील
निवेदनाचं आणि सांधेजोडणीचं महत्त्वाचं काम प्लूटोनं पार पाडलं आहे. प्लूटोला आवाज
आहे आमीर खानचा. आमीरचं असं आवाजाच्या रूपानं या चित्रपटात असणं त्याच्या
गुणवत्तेला आणखी चार चाँद लावतं, यात शंकाच नाही. चित्रपटाचे संवाद फरहान अख्तरनं
लिहिले असले, तरी प्लूटोचे सर्व संवाद जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. अत्यंत
चुरचुरीत आणि मिश्कील असं हे भाष्य मुळातूनच ऐकायला हवं.
मेहरांची कंपनी
अडचणीत असतानाच ते लग्नाच्या तिसाव्या वाढदिवसाचं निमित्त काढून इस्तंबूलमध्ये
क्रूझवरची ट्रिप आयोजित करतात. त्यानंतरचा सगळा सिनेमा हा जवळपास त्या क्रूझवर
घडतो. एका अर्थानं मेहरांच्या आयुष्याचीच ही प्रतीकात्मक नौका आणि त्यातला त्यांचा
प्रवास सुरू आहे. त्यांच्या तरुण मुलांच्या - आयेशा आणि कबीरच्या - जीवनात काही
उलथापालथी घडताहेत. मेहरांना आपला बिझनेस वाचविण्यासाठी मुलाचं लग्न हा उपाय
दिसतोय. मुलगी स्वतः यशस्वी उद्योजक असली, तरी तिच्या उद्योगपती नवऱ्यासह ती खूश
नाही. कबीरलाही आई-वडिलांनी बिझनेस मॅरेज असल्यासारखं त्याचं एका उद्योगपतीच्या
मुलीबरोबर ठरवलेलं लग्न मान्य नाही. तो क्रूझवरच्या एका नर्तिकेच्या प्रेमात पडला
आहे. मुलीचा आधीचा प्रियकरही त्याच वेळी बोटीवर येतो. आतापर्यंत वरकरणी हसत-खेळत
चाललेल्या मेहरांच्या घराला हादरे बसू लागतात. आयुष्याच्या नौका हिंदकाळू
लागतात... अखेर नातेसंबंधांचं महत्त्व आणि पालक-मुलांच्या नात्यांवर मिश्कील, पण
बोचरं भाष्य करून सिनेमा शेवटाला येतो.
झोयानं अत्यंत
प्रेमानं यातली प्रत्येक फ्रेम सजवली आहे. उत्तरार्धात क्वचित काही प्रसंगी सिनेमा
रेंगाळल्यासारखा वाटतोही. पण लगेच तो पूर्ववत ट्रॅकवर येतो. यातल्या प्रमुख भूमिका
तर सोडाच, पण लहानातल्या लहान भूमिकेत काम करणारे कलाकारही प्रेक्षकांच्या मनात
एस्टॅब्लिश होतील, याची काळजी दिग्दर्शिकेनं घेतली आहे. कुठलाही अनावश्यक
फाफटपसारा नसतानाही हा सिनेमा एवढा मोठा झालाय, याचं कारण प्रत्येक प्रमुख
व्यक्तिरेखा आणि तिचे अन्य व्यक्तिरेखांशी असलेले संबंध दिग्दर्शिकेनं आपल्यासमोर
अगदी सविस्तर रेखाटले आहेत. त्यामुळं आपण काही वेळानंतर त्या व्यक्तिरेखेच्या जागी
आपणच आहोत, असं कल्पून तिच्या बाजूनं विचार करायला लागतो. प्रेक्षकांना असं
गोष्टीत खेचून नेल्यानंच ही कलाकृती आपल्या मनाची पकड घेते.
भूमिकेतील
कलाकारांची निवड याविषयी वर सांगितलंच आहे. अनिल कपूर आणि शेफाली शहा या दोघांनीही
मेहरा दाम्पत्याच्या भूमिकेत खासच रंग भरले आहेत. अनिल कपूर मला व्यक्तिशः आवडतोच.
हा कलाकार कुठल्याही भूमिकेत अगदी ग्रेसफुली काम करतो. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स
जबरदस्त आहे. याबाबत त्याची तुलनाच करायची तर ती फक्त अमिताभशी करता येईल. कमल मेहराची ही भूमिका त्याच्या वयालाही अगदी
साजेशीच आहे आणि ती त्यानं फारच तडफेनं सादर केली आहे. शेफाली शहानं साकारलेली
नीलम मेहरा पाहण्यासारखी आहे. पतीकडून अपमान झाल्यावर ती केकचा तोबरा भरून
स्फुंदते, तो प्रसंग तिनं फारच अप्रतिम केला आहे. रणवीरसिंह आणि प्रियांका चोप्रा
बहीण-भावाच्या भूमिकेत आहेत. दोघांनीही मजा आणली आहे. विशेषतः रणवीरचा कबीर झकासच. फरहान अख्तर, राहुल बोस यांनीही त्यांच्या
भूमिकांत जीव ओतला आहे. प्रियांका चोप्रानं आयेशाची तगमग चांगली दाखवली आहे.
अनुष्का शर्माला मात्र फार वाव नाही. बॉम्बे वेल्वेटची आठवण व्हावी, असं एक गाणं
तिच्या वाट्याला आलं आहे.
हा सिनेमा पाहताना
मला सारखी आरती प्रभूंच्या ‘दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली...
कालही अन् आजही’ या कवितेची आठवण येत होती. एका मोठ्या नावेवरचा हा प्रवास जवळपास
तेवढाच फिलॉसॉफिकल आणि आत्ममग्न व्हायला लावणारा आहे, हे निश्चित. जोडीला तो
मनोरंजकही आहे, हे आइसिंग ऑन द केक!
---
दर्जा - चार स्टार
----
No comments:
Post a Comment