12 Nov 2015

कट्यार काळजात घुसली

'कट्यार' काळजात घुसलीच!
----------------------------------


'कट्यार काळजात घुसली...' हे मराठी रसिकांच्या काळजात घुसून तिथंच अजरामर झालेलं संगीत नाटक. रंगभूमीचे 'मास्तर' पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि प्रतिभाशाली, प्रयोगशील संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या अद्वितीय संगीतानं नटलेलं हे नाटक त्यातल्या अंगभूत नाट्यमयतेनं आणि वेगळ्या धर्तीच्या संगीतामुळं रसिकांच्या पसंतीस उतरलं. याच नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' याच शीर्षकाचा सुबोध भावे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपटही या नाटकाप्रमाणंच आपल्या काळजात घुसतोच! नव्या-जुन्यांचा सुरेख मिलाफ करीत, सुबोधनं माध्यमांतराचं हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचं, सिनेमा संपल्यानंतर पडणाऱ्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटानं सिद्ध होतं.

विश्रामपूर या ब्रिटिशकालीन संस्थानात राजाश्रय मिळालेले ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक पं. भानुशंकर शास्त्री आणि त्यांनीच मिरजेहून विश्रामपूरला आणलेले दुसरे गायक उस्ताद आफताब हुसेन बरेलीवाले उर्फ खाँसाहेब यांच्यातील संघर्षाची, घराण्यांतल्या स्पर्धेची, वैमनस्याची ही कथा आहे. त्याहीपेक्षा ती कलाकाराच्या 'अहं'शी त्याची स्वतःचीच चाललेली स्पर्धा आहे. एक सच्चा, अंतःकरणापासून उमटलेला सूरच हा अहं मिटवू शकतो. त्याला प्रत्यक्षातल्या कट्यारीची गरज नसते, असा संदेश हा सिनेमा देतो. गायक आणि दोन घराण्यांची कथित स्पर्धा असा विषय असल्यानं या नाटकात वैविध्यपूर्ण संगीताला वाव होता. पं. जितेंद्र अभिषेकींनी त्यांच्या प्रयोगशील वृत्तीने यात रंग भरले. पं. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या कसलेल्या गायकाने तेव्हा खाँसाहेबांची भूमिका करून रसिकांना भरभरून आपल्या गायकीचा आनंद दिला. नंतरही या नाटकाचे आव्हान अनेक रंगकर्मींना खुणावत राहिले. अजूनही या नाटकाचे प्रयोग धडाक्यात सुरू असतात. अशा या नाटकाचं माध्यमांतर करताना दोन आव्हानं होती. एक तर भूमिकांना न्याय देणारे योग्य कलाकार निवडणं आणि दुसरं म्हणजे या कलाकृतीचा आत्मा असलेलं संगीत त्याच दर्जाचं कायम ठेवणं. सुबोध या दोन्ही परीक्षांना उतरला आहे.
खाँसाहेबांच्या भूमिकेत सचिनची निवड अनेकांना आश्चर्यकारक आणि काहीशी अनपेक्षित वाटली होती. मीही त्याला अपवाद नव्हतो. मात्र, प्रत्यक्ष पडद्यावर सचिनचं काम पाहिल्यावर आपलं हे मत सपशेल चुकलं, हे मी कबूल करतो. सचिननं खाँसाहेबांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. सचिन मूळचा गायक असल्यानं त्याला ही भूमिका साकारताना फायदा झाला असणार. शिवाय या भूमिकेला आधी न्यूनगंडाची आणि नंतर त्यातून आलेल्या अहंगंडाची जी गडद छटा आहे, ती साकारणं सचिनला सोपंच गेलं असणार. अर्थात कारणं काहीही असली, तरी प्रत्यक्ष पडद्यावरचा त्याचा परफॉर्मन्स त्याच्या सर्व टीकाकारांना गप्प बसवणारा आहे, यात वादच नाही. दुसरी महत्त्वाची भूमिका पं. शास्त्रींची. याही भूमिकेसाठी शंकर महादेवन या गुणी गायकाची निवड अशीच अनपेक्षित होती. मात्र, शंकरनंही ही भूमिका तन्मयतेनं साकारलीय आणि त्याची ही पहिलीच भूमिका आहे, हे कुठंही जाणवू दिलेलं नाही. हेही दिग्दर्शकाचंच यश. तिसरी महत्त्वाची भूमिका अर्थातच सदाशिवची. ती स्वतः सुबोधनं केली आहे. या भूमिकेच्या सर्व बारीकसारीक छटा त्यानं प्रत्ययकारकतेनं सादर केल्या आहेत.
यातला सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे संगीताचा. सुबोधनं यातही प्रयोग केला आहे. त्यानं काही रचना चालीसकट मूळ नाटकातल्या ठेवल्या आहेत, तर काही रचना पूर्णपणे नव्यानं केल्या आहेत. 'कट्यार...'ला जन्मापासूनच या सर्जनशील प्रयोगशीलतेची सवय आहे. त्यामुळं हा नवा प्रयोगही या कलाकृतीच्या स्वभावधर्माला धरूनच झाला. आणि सांगायला आनंद होतो, की तो प्रयोगही अत्यंत सुरेल ठरला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताएवढंच प्रयोगशील संगीत शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटानं दिलं आहे. उदा. मूळ नाटकात असलेल्या या भवनातील गीत पुराणे या पदाऐवजी सिनेमात सचिनच्या तोंडी एक हिंदी-उर्दू रचना देण्यात आली आहे. याशिवाय 'सूर निरागस हो' हे छान गाणं आणि कव्वालीही वेगळी. लागी कलेजवां कटार ही रचना यात अभिषेकीबुवांच्याच आवाजात पार्श्वसंगीतासारखी वापरण्यात आली आहे. शंकर महादेवन यांच्या भूमिकेला अर्थातच त्यांचा स्वतःचा आवाज, सचिन यांना राहुल देशपांडे यांचा, तर सदाशिवला महेश काळे यांचा आवाज वापरण्यात आला आहे. हे तिघेही आजचे तयारीचे, कसदार, सुरेल गळ्याचे गायक असल्यानं सिनेमा पाहताना (किंवा खरं तर ऐकताना) मूळ नाटकाएवढाच श्रवणानंद मिळतो, हे आवर्जून सांगायला हवं.

नाटकाचं माध्यमांतर करताना अनेकदा पडद्यावर नाटकच पाहत असल्याचा भास होतो. सुबोध हा दोन्ही माध्यमांत संचार करणारा असल्यानं त्यानं हे पडद्यावरचं नाटक वाटणार नाही, याची काळजी घेतली आहे. एक तर कट्यार स्वतःच या गोष्टीचं निवेदन (आवाज रिमा यांचा) करते, असं दाखवून सुबोधनं बरंच काम सोपं केलं आहे. मूळ नाटकात नसलेलं खाँसाहेबांच्या बेगमचं पात्र इथं प्रत्यक्ष दाखवण्यात आलं आहे. शिवाय पं. शास्त्री आणि छोटा सदाशिव काजवे पकडायला जातात, तो प्रसंग आणि शास्त्रीबुवा त्या काजव्यांनी भरलेली मशाल छोट्या सदाशिवच्या हाती देतात, हा सूचक प्रसंग दिग्दर्शकाला दाद द्यावी असाच. याशिवाय खाँसाहेब शास्त्रीबुवांच्या हवेलीत राहायला जातात, तेव्हा ते झरीनाला एकेक दार-खिडकी बंद करायला सांगतात तो प्रसंगही सिनेमा माध्यमाची ताकद सांगणारा. तलावाच्या काठी कविराज (पुष्कर श्रोत्री) सदाशिवला विद्या आणि कला यातला फरक समजावून सांगतो, तो प्रसंगही असाच दाद मिळविणारा झाला आहे. 'वाह...' म्हणायला लावणारे असे अनेक छोटे-मोठे प्रसंग यात आहेत.
सिनेमाचा पूर्वार्ध शास्त्रीबुवा आणि खाँसाहेब यांच्यातील मैत्री, मग जुगलबंदी आणि मग खाँसाहेबांची वाढती ईर्षा यामुळं अत्यंत वेगवान झाला आहे. मध्यंतराच्या काही वेळापूर्वी सदाशिवचं आगमन होतं आणि मग नव्या संघर्षाची नांदी होऊन मध्यांतर होतो. इथपर्यंत सिनेमा विलक्षण उंचीवर जातो. त्रुटीच काढायची तर उत्तरार्ध ही उंची आणखी फार वाढवत नाही, एवढीच म्हणावी लागेल. शिवाय उत्तरार्धात काही ठिकाणी सिनेमा थबकतो, संथ होतो. दीर्घकाळ खाँसाहेबांचं दर्शन होत नाही. पण शेवटी तो लवकरच पुन्हा पूर्वपदावर येतो आणि शेवटपर्यंत रंगत जातो.
चित्रपटाची निर्मितीमूल्ये अत्यंत उच्च दर्जाची आहेत. राजदरबारातील सर्व दृश्ये अप्रतिम. सिनेमॅटोग्राफी (सुधीर पलसाने) आणि ध्वनिसंयोजन (अनमोल भावे) अव्वल दर्जाचं. सर्व कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. शंकर, सचिन आणि सुबोधचा वर उल्लेख झालाच आहे. अमृता खानविलकरनंही झरीनाच्या भूमिकेत जान ओतली आहे. उमाच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडेनं सदाशिववरचं अव्यक्त प्रेम छान दर्शवलं आहे.
तेव्हा अजिबात न चुकवावा असाच हा देखणा स्वरानुभव आहे.

--
दर्जा - चार स्टार
---

9 comments:

 1. वा!... मस्त लिहिलं आहेस आणि हे वाचून चित्रपट आधीपेक्षा आता तीव्रतेने पाहावासा वाटत आहे... "जमाना हमसे हैं , माहोल हम बनायेंगे" :)

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद सुप्रिया....

   Delete
  2. मी भोपाळला राहतो।त्या मुळे कधी मुंबई ला जाऊन हा सिनेमा पाहतो असे झाले आहेत।त्यातून चला हवा येऊद्या इ. कार्यक्रमांत सिनेमाबद्दल आपल्या आवडत्या कलावंतांनी जे काही सांगितले आहे त्याने ओढ शिगेला पोचली आहे।पण तुमची समीक्षा वाचुन कट्यार आपल्या समोर आल्या सारखे वाटले।खूप छान परीक्षण केल्या बद्दल अनेक आभार।

   Delete
 2. वा!... मस्त लिहिलं आहेस आणि हे वाचून चित्रपट आधीपेक्षा आता तीव्रतेने पाहावासा वाटत आहे... "जमाना हमसे हैं , माहोल हम बनायेंगे" :)

  ReplyDelete
 3. सिनेमाची अभ्यासपूर्ण आस्वादक समीक्षा

  ReplyDelete