29 Apr 2016

सैराट रिव्ह्यू

सुन्नाट
---------

फर्स्ट थिंग फर्स्ट. 'सैराट' पाहणं हा एक भन्नाट अनुभव आहे, यात शंकाच नाही. अलीकडच्या काळातील मराठीमधला हा महत्त्वाचा चित्रपट ठरावा. मराठीत प्रेमकथा फार आल्या नाहीत. मराठीला प्रेमकथा झेपत नाहीत. पण 'सैराट' ही अव्वल दर्जाची प्रेमकथा आहे.  अस्सल या मातीमधली आहे. कथित खालच्या जातीतला तरुण आणि कथित उच्चवर्णीय तरुणी यांच्या प्रेमाची आणि त्यातून येणाऱ्या अपरिहार्य, पण भीषण शेवटाची ही गोष्ट आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेला त्यातून काही तरी ठोस सांगायचंय. ते त्याला 'फँड्री'मधूनही सांगायचं होतं. ते याही सिनेमातून सांगायचं आहे. ते काय आहे, हे आपल्याला नीट कळतं. त्यामुळं 'सैराट' पाहून झाल्यावर ते सांगणं डोळ्यांमध्ये ठसठशीत भरून राहतं; कान बधीर होतात आणि मेंदू सुन्न होतो.
आपल्या समाजातलं जातिवास्तव ही आजही एक दाहक गोष्ट आहे. या जातिप्रथांमधून आलेल्या दुर्गुणांमुळं चांगली चांगली माणसं भैराट होतात; वेड्यासारखं वागतात. कथित प्रतिष्ठेपायी वाट्टेल ते प्रकार करतात. हे आपल्याला नवं नाही. दोन प्रेमी जीवांची त्यात होणारी होरपळही नवी नाही. एक दुजे के लिए, लव्हस्टोरी, कयामत से कयामत तक या सर्व चित्रपटांतून या प्रकारची प्रेमकहाणी आपण पाहिलेली असते. पण 'सैराट'मध्ये आणि त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. 'सैराट' हा त्या प्रेमाच्याही पलीकडं जाऊन काही भाष्य करतो. 'फँड्री'सारखंच. हे भाष्य अर्थातच नागराजच्या स्टाइलनुसार अंगावर येतं. चरचरीत चटका देतं. प्रेक्षकांना सामुदायिक उसासे सोडायला लावतं. पुढं काही सुचतच नाही...
सिनेमा म्हणून 'सैराट'कडं पाहताना काही गोष्टी चटकन जाणवतात. सिनेमा हे किती दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे 'सैराट' आपल्याला पुनःपुन्हा दाखवून देतो. इथं दिग्दर्शक अक्षरशः प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतो. कारण सिनेमात सगळेच कलाकार (छाया कदम यांचा काहीसा अपवाद) अगदीच नवखे आहेत. यापैकी कित्येकांनी या सिनेमाच्या निमित्तानं प्रथमच कॅमेराला तोंड दिलं आहे. असं सगळं असूनही आपण तब्बल १७० मिनिटांचा सिनेमा पाहताना एक क्षणही विचलित होत नाही की आपल्याला कंटाळा येत नाही. याचं कारण त्या सर्वांकडून दिग्दर्शकानं त्याला काय पाहिजे ते काढून घेतलंय. दिग्दर्शकाचा लखलखीत ठसा प्रत्येक ठिकाणी दिसत राहतो.
दुसरं म्हणजे या चित्रपटाचं संगीत. अजय-अतुल यांनी या चित्रपटासाठी दिलेलं संगीत आणि पार्श्वसंगीत हा या सिनेमाचा मोठाच प्लस पॉइंट ठरला आहे. त्यांनी हॉलिवूडमधील स्टुडिओत या चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत रेकॉर्ड केलंय, हे सर्वांना माहिती आहे. अत्यंत अव्वल दर्जाचं हे पार्श्वसंगीत चित्रपटाला वेगळी उंची नक्कीच प्राप्त करून देतं. सिनेमा पाहत असताना आपण तो 'ऐकत'ही जातो. चित्रपटाचं छायांकनही अप्रतिम दर्जाचं. सुधाकर रेड्डी यांचा कॅमेरा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग ते हैदराबादमधली झोपडपट्टी हे सर्व फार सुंदर पद्धतीनं दाखवतो. चित्रपटाच्या अनेक फ्रेममध्ये पक्ष्यांचा थवा येत राहतो. हे चित्रणही जमलेलं आणि खूपच बोलकं.
चित्रपटाचे सरळ सरळ दोन भाग पडले आहेत. पहिला भाग नायक-नायिकेच्या प्रेमकथेचा, प्रेम जमण्याचा, चेष्टा-मस्करीचा आणि मित्रांबरोबर केलेल्या धमाल गोष्टींचा आणि उत्तरार्ध त्यांच्या संघर्षाचा. पूर्वार्ध अर्थात खूपच आवडणारा आणि जमलेला. चित्रपटातील सर्व चारही गाणी पूर्वार्धातच होऊन जातात. ही सर्वच गाणी भावमारू आणि प्रेक्षणीय अशी जमली आहेत. सिनेमाचा उत्तरार्ध तुलनेत खूप रखरखीत आहे. नायक-नायिका हैदराबादमध्ये जातात आणि तिथं त्यांचं खरं आयुष्य सुरू होतं. दिग्दर्शकानं हे चित्रणही खूप मनापासून आणि वास्तववादी केलं आहे. पण पूर्वार्धाच्या तुलनेत यात धमाल-मस्ती नसल्यानं प्रेक्षक एकदम काहीसा अस्वस्थ होतो. चित्रपटाची संथ लय त्याला पटकन झेपत नाही. पण सिनेमाची मांडणी म्हणून दिग्दर्शकाची यात काही चूक आहे, असं वाटत नाही. असलीच तर चित्रपटाची एकूण लांबी हीच त्रुटी म्हणावी लागेल. हा सिनेमा आणखी वीस मिनिटांनी सहज ट्रिम करता आला असता. दोन तास पन्नास मिनिटांची ही लांबलचक स्टोरी पूर्वीच्या हिंदी सिनेमांची आठवण करून देते. पण मधेच प्रेक्षकांना अस्वस्थही करते. असो.
आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोन्ही तरुण मुलांनी अप्रतिम काम केलंय. विशेषतः रिंकूनं पाटलांच्या आर्चीचा ठसका फारच जबरदस्त दाखवला आहे. तिचे डोळे अत्यंत बोलके व प्रभावी आहेत. तिचं ग्रामीण बाजाचं बोलणं फार गोड आहे. बुलेट चालवताना, ट्रॅक्टर चालवताना तिनं दाखवलेला अॅटिट्यूड एक नंबर. उत्तरार्धात झोपडीतलं राहणं झेपेनासं झाल्यावर कोलमडलेली अर्चनाही तिनं अगदी तन्मयतेनं साकारली आहे. तिच्या रूपानं मराठीला एक बोलक्या डोळ्यांची प्रभावी अभिनेत्री लाभली आहे, असं म्हणायला हरकत नाही. आकाश ठोसरनंही कोळ्याच्या मुलाचं - परशाचं -  निरागस तारुण्य, काहीसं दबलेपण, काहीसा न्यूनगंड झकास दाखवला आहे. अर्थात यात दिग्दर्शकाचा वाटा मोठा आहे, हे ओघानं आलंच. परशाचे मित्र झालेले प्रदीप (तानाजी गलगुंडे) आणि सल्या (अरबाज शेख) यांचीही कामं फार जोरदार झाली आहेत.
सिनेमाचा शेवट फिल्मी असला, तरी अंगावर येतो. विशेषतः त्या लहान मुलावर कॅमेरा जाताना जो सायलेन्स आहे, त्यामुळं तर हा सर्वच प्रसंग भयंकर अंगावर येतो. पण या दिग्दर्शकाला असा आघात करून प्रेक्षकांना झटका देण्याची सवय आहे. मात्र, पुढच्या सिनेमात हा फंडा कदाचित उपयोगी येणार नाही. असो.
सैराट ही आपल्या ढोंगी, भोंदू, दांभिक जातिव्यवस्थेला मारलेली सणसणीत चपराक आहे. ती खायला थिएटरला जावंच लागेल.

दर्जा - साडेतीन स्टार
---

9 comments:

 1. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 2. Thank u shreepad..

  In nashij for some work.. so missed 1st day of d movie..

  But thanx for your show here on nashik-agra highway on my cell phone..

  Jite raho.. likhte raho.. :)

  ReplyDelete
 3. Thank u shreepad..

  In nashij for some work.. so missed 1st day of d movie..

  But thanx for your show here on nashik-agra highway on my cell phone..

  Jite raho.. likhte raho.. :)

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद... पण इथं Unknown असं येतंय. त्यामुळं हे कुणी लिहिलंय ते कळत नाहीये...

   Delete
 4. Thnx Shripad. I will surely see this movie in theatre.

  ReplyDelete
 5. Thnx Shripad. I will surely see this movie in theatre.

  ReplyDelete
 6. सर, चित्रपट रसग्रहण हे तर तुमचं उत्तमच आहे; त्यात शंका नाही. चित्रपट दिद्ग्दर्शक मंजुळे सरांच्या कथा/पटकथा ह्या राजन गवस, शंकर पाटील, शंकर खरात आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कथेप्रमाणे जिवंत वास्तव असतात. त्यांचा चित्रपट हा सद्य परिस्थितील जातीयता नेमकेपणाने दाखवतो. ग्रामीण प्रेक्षकांना ती आपल्या आजूबाजूला म्हणजेच पलीकडच्या गावात घडतीय की, काय ? असं वाटून जातं आणि शहरी भागातील प्रेक्षकांना " समाज असाही असतो " ह्याची नव्याने ओळख होते. बाकी नागराज मंजुळे समाजातील ' दिसत असतानाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या गोष्टींवर ' मार्मिक भाष्य करतात. हेच त्याचं धाडस म्हणावं लागेल.

  ReplyDelete