6 Apr 2016

चड्डी पहन के (फिर) फूल खिला है...


प्रख्यात ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या 'जंगलबुक' या नीतिकथांच्या संग्रहानं जगभरात अनेकांना मोहिनी घातली आहे. या 'जंगलबुक'ची पुन्हा आठवण येण्याचं कारण म्हणजे वॉल्ट डिस्ने स्टुडिओजचा याच नावाचा भव्य सिनेमा येत्या आठ एप्रिलला भारतात प्रदर्शित होतोय. या निमित्तानं आमच्या पिढीचा दूरदर्शनवरील जंगलबुक या गाजलेल्या मालिकेचा स्मरणगंध ताजा झालाय. 
किपलिंग यांनी १८९४ मध्ये या कथा लिहिल्या. त्यांचा जन्म भारतातला. जन्मानंतर सहा वर्षांनी ते इंग्लंडला गेले. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा भारतात आले आणि इथं साडेसहा वर्षं राहिले. त्या काळात त्यांनी लिहिलेल्या या कथा आहेत. 'मोगली' हा जंगलात 'हरवलेला' माणसाचा मुलगा या सर्व गोष्टींचा नायक असून, त्याला लांडग्याच्या कळपानं लहानाचं मोठं केलेलं आहे. त्याच जंगलात राहणारे भालू हे अस्वल आणि बघिरा हा काळा चित्ता मोगलीचे मित्र आहेत. याच जंगलात राहणारा शेरखान हा ढाण्या वाघ त्यांचा शत्रू, म्हणजेच या गोष्टीतला खलनायक आहे. या सर्व पात्रांच्या सहभागातून 'जंगलबुक'मधील गोष्टी आकार घेतात. 
'जंगलबुक'ची भारतीय मुलांना असलेली ओळख ही प्रामुख्यानं १९९३ मध्ये सादर झालेल्या 'दूरदर्शन'वरच्या मालिकेमुळं आहे. ही मालिका भन्नाट गाजली ती त्याच्या शीर्षकगीतामुळं. प्रख्यात कवी-गीतकार गुलज़ार यांनी हे गीत लिहिलं होतं आणि या गीताचे बोल होते - जंगल जंगल बात चली है, पता चला है... चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है... या गाण्याला संगीत दिलं होतं विशाल भारद्वाज यांनी. हे गाणं तेव्हा लहानांसोबतच मोठ्यांच्याही ओठी रुळलं होतं. तेव्हा चड्डीत असणारी मुलं आता फुलपँटमध्ये आली आहेत आणि त्यांची मुलं आता कार्टून बघण्याच्या वयाची झाली आहेत. तेव्हा आता वॉल्ट डिस्ने स्टुडिओजनं 'जंगलबुक'वर आधारित नवा सिनेमा काढला आहे, म्हटल्यावर त्यातल्या अनेकांचा नॉस्टॅल्जिया नक्कीच जागा झाला असेल. हा सिनेमा आठ एप्रिलला, म्हणजे अमेरिकेच्याही आधी आठ दिवस भारतात प्रदर्शित होत आहे, हे विशेष. अमेरिकेत तो १५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. जोन फॅवरिऊ यानं हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
'जंगलबुक'वरून प्रेरणा घेऊन अनेक सिनेमे मालिका निघाल्या. अमेरिकेत पहिली मालिका निघाली ती १९६७ मध्ये. भारतात १९९३ मध्ये दाखविण्यात आलेली अॅनिमेशन मालिका मात्र जपानी मालिकेवर आधारित होती. 'जंगल बुक शोनेन मोगली' असं त्या मूळ मालिकेचं नाव होतं आणि ती १९८९ मध्ये तयार करण्यात आली होती. भारतात ही मालिका आल्यानंतर ती अर्थातच हिंदीत डब करण्यात आली. विशाल भारद्वाज-गुलज़ार जोडीनं त्याचं हे गाजलेलं शीर्षकगीत तयार केलं. अमोल, हिया, नेहा, गौतम, विशाल आणि दीप्ती यांनी हे गाणं धम्माल गायलं आहे. शेरखानला तेव्हाही नाना पाटेकरनंच आवाज दिला होता आणि त्यामुळं ही मालिका फारच लोकप्रिय ठरली होती. अन्य आवाज कमलाकर सोनटक्के, दीपा साही, वीरेंद्र सक्सेना, देवाशिष शेडगे, उदय सबनीस, विनोद कुलकर्णी यांनी दिले होते. 
आता जो सिनेमा येतो आहे, तोही हिंदीत डब करण्यात आला आहे. मूळ इंग्लिश सिनेमात इद्रिस एल्बा (शेर खान), बेन किंग्जले (बघिरा), बिल मरे (भालू), स्कार्लेट जॉन्सन (का) आदी नामवंत कलाकारांनी आवाज दिले आहेत; तर हिंदी सिनेमात शेरखानला अर्थातच पुन्हा नाना पाटेकर, बघिराला ओम पुरी, भालूला इरफान खान, तर 'का'ला प्रियांका चोप्रा या नामवंतांनी आवाज दिला आहे. मोगलीची 'आई' असलेल्या रक्षा या मादी लांडग्याला शेफाली शहानं आवाज दिला आहे. 
या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात खरे कलाकार आणि अॅनिमेशन यांचं मिश्रण आहे. नील सेठी या भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलानं मोगलीचं काम केलं आहे. यातील प्राण्यांचं काम अर्थातच अॅनिमेशन पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. वॉल्ट डिस्नेच्या परंपरेला धरून हा सिनेमा भव्य आणि उत्कृष्ट तांत्रिक दर्जा असणारा आहे, यात शंका नाही. त्यामुळं बालगोपाळांना सुट्टीत ही एक चांगली पर्वणी मिळाली आहे. यातल्या प्रमुख भूमिकेसाठी डिस्ने स्टुडिओनं अक्षरशः जगभरातून हजारो मुलांच्या स्क्रीन टेस्ट घेतल्या. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, न्यूझीलंड आदी ठिकाणी अनेक मुलांची चाचणी घेण्यात आली. मात्र, अखेर या भूमिकेसाठी नील सेठीची निवड झाली.
किपलिंग यांनी भारतातल्या वास्तव्यात या गोष्टी लिहिलेल्या असल्याने भारतीयांना 'जंगलबुक'विषयी विशेष आस्था आहे. यातली पात्रं, त्यांची नावं भारतीयच आहेत. किपलिंग यांनी त्यांच्या मुलीसाठी या गोष्टी लिहिल्या होत्या, अशी माहिती नंतर पुढं आली. त्यांची ही मुलगी वयाच्या केवळ सहाव्या वर्षी (१८९९ मध्ये) दुर्दैवानं मरण पावली. किपलिंग यांनी १८९५ मध्ये 'द सेकंड जंगल बुक' हे पुस्तक लिहिलं. यात मोगलीच्या आणखी पाच गोष्टींचा समावेश होता. या गोष्टी लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिलेल्या असल्यानं त्यात शेवटी काही तरी बोध दिलेला असतो. या बोधकथा स्वरूपामुळं स्काउट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी त्या बाल स्काउटसाठी वाचायला देण्याची परवानगी किपलिंग यांच्याकडं मागितली. त्यानंतर जगभरात ही पुस्तकं स्काउट चळवळीशी जोडली गेली. त्यानंतरही जगभरात या पुस्तकाची अनेक भाषांतरं, रूपांतरं झाली. अगदी आपण दूरदर्शनवर पाहिलेल्या मालिकेतले सगळे भाग मूळ कथानकाबरहुकूम नव्हते. त्यात त्या त्या वेळी अनेक बदलही करण्यात आले आहेत. अर्थात मूळ कथांचा स्वाद कायम ठेवूनच हे बदल होत असल्यानं त्यातली मजा कायमच आहे.
नव्वदच्या दशकात आपल्याकडं दूरदर्शन हे एकमेव चॅनेल होतं आणि अनेक घरांत पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आला, तेव्हा लहान असणारी मुलं आता पस्तीस-चाळिशीत आहेत. मीही याच पिढीचा एक भाग. या २५-३० वर्षांच्या काळात जग खूपच वेगानं बदललं. आमचं बालपण समृद्ध करणाऱ्या दूरदर्शनवरच्या ज्या काही क्लासिक मालिका होत्या, त्यात 'जंगलबुक' निश्चितच एक आहे. या नव्या सिनेमाच्या निमित्तानं गुलज़ारसारख्या कलंदर गीतकाराचं 'चड्डी पहन के फूल खिला है' हे तेव्हाचं लोकप्रिय गाणंही यूट्यूबवर पुनःपुन्हा पाहिलं/ऐकलं जातंय. (बाकी या असल्या कल्पना फक्त गुलज़ारनाच सुचू शकतात.) आम्ही मोठे झालो असलो, तरी आमच्या मनात एक मूल दडलेलं आहे आणि तेही चड्डी घालून फुलासारखं उमलतंय, याची जाणीव पुन्हा करून दिल्याबद्दल या नव्या 'जंगलबुक'चंही उत्साहानं स्वागत करायला हवं.
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे; ६ एप्रिल २०१६)
---

No comments:

Post a Comment