5 Mar 2017

'मग्न तळ्याकाठी...'विषयी...

खोल खोल तळं...
-----------------
काल, शनिवारी 'मग्न तळ्याकाठी' नाटक पाहिलं. महेश एलकुंचवारांच्या वाडी चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी अन् युगान्त या गाजलेल्या त्रिनाट्यधारेतलं हे दुसरं नाटक. 'वाडा चिरेबंदी' हे यातलं पहिलं नाटकही काही काळापूर्वी पाहिलं होतं. त्यामुळं हा दुसरा भाग बघण्याची खूप उत्सुकता होती. तो काल अखेर पाहिला आणि धन्य झालो. त्या क्षणी एवढ्या भारावल्या अवस्थेत होतो, की कुठल्याही भावना व्यक्त कराव्याशा वाटत नव्हत्या. पण रात्री मात्र बांध फुटला अन् डोळे अखंड झरत राहिले. कुठं तरी काळजात काही तरी तुटत गेलं. शिवाय अतीव समाधानानंही कधी कधी डोळे वाहतातच की... केव्हा केव्हा तर काही कलाकृती बघून एवढा आनंद होतो की शरीराला कळतच नाही, याचं काय करायचं ते...! मग ते वेडं सगळे आउटलेट्स उघडतं. डोळे वाहायला एवढं निमित्त पुरेसं असतं. नाटककाराचे शब्द, दिग्दर्शकाचं आकलन आणि प्रेक्षकांची पंचेंद्रियं याचं असं काही मेतकूट जमून जातं, की वर्णन अपुरं पडावं. 'मग्न तळ्याकाठी' हे नाटकही आपल्याला असाच आत्मिक अनुभव देतं.
वऱ्हाडातल्या धरणगावात राहणाऱ्या धरणगावकर देशपांडे कुटुंबाची ही कथा. या नाटकाच्या पूर्वी पहिल्या भागात काय झालंय ते थोडक्यात निवेदनाद्वारे सांगितलं जातं. त्यामुळं पहिला भाग न पाहणाऱ्यांनाही बऱ्यापैकी संदर्भ कळतात. (पण माझी शिफारस अशी आहे, की पहिला भाग बघूनच हा भाग बघावा. म्हणजे आस्वादनात अजिबात कुठलीच त्रुटी राहणार नाही.) पहिल्या भागाचा काळ होता १९८५ चा, तर आत्ताचं नाटक घडतंय त्यानंतर दहा वर्षांनी - म्हणजेच १९९५ मध्ये! हा सगळा फारच नजीकचा भूतकाळ आहे. त्यामुळं आत्ता चाळिशीला असलेले लोकही त्या काळातल्या महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती निश्चितच डोळ्यांसमोर आणू शकतात. हे संदर्भ नाटक पाहताना महत्त्वाचे ठरतात. त्यामुळं एका अर्थानं हे नाटक प्रेक्षकांकडूनही एका विशिष्ट प्रगल्भतेची अपेक्षा करतं. असा प्रेक्षक असेल, तर ते त्याला दामदुपटीनं काही तरी परत देतं. ते जे काही आपल्याला परत मिळतं ना, त्याची पावती आपलं शरीरच आपल्याला देतं. आपण कधी हसतो, कधी चिडतो, कधी रडवेले होतो, कधी करुणेनं मन भरून जातं, तर कधी संतापानं कडेलोट होतो. पात्रांच्या कथेशी आपण असे तादात्म्य पावतो, याचं कारण एलकुंचवारांची लेखणी आणि चंदू कुलकर्णींच्या दिग्दर्शनाची कमाल... आणि अर्थातच कलाकारांचा अप्रतिम अभिनय!
आपल्याकडं ग्रामीण भागातील सामाजिक चौकटी वर्षानुवर्षं एकाच साच्याच्या होत्या. कुणी काय करायचं आणि कुणी काय नाही, याच्या नियम व शर्ती ठरलेल्या होत्या. महाराष्ट्रातल्या खेड्यांतल्या समाजजीवनाची एक विशिष्ट रचना होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ती बहुतेक सर्व प्रदेशांत सारखी होती. विदर्भात मालगुजार होते, देशावर पाटील होते आणि कोकणात खोत होते, एवढाच काय तो फरक! उत्तर पेशवाईचा अंमल सरून शंभर वर्षं झाली असली, तरी ब्राह्मणांचा समाजजीवनातील वरचष्मा आणि दबदबा कायम होता. याचं कारण इंग्रजी राजवट आल्यानंतर ब्राह्मणांनी चतुराईनं इंग्रजी शिक्षण पदरात पाडून नोकऱ्या मिळविल्या... तर ते असो. मुद्दा असा, की या ग्रामीण समाजजीवनातील चौकटीला पहिला धक्का लागला तो महात्मा गांधींच्या हत्येनंतर. विशेषतः खेड्यातील ब्राह्मणांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात घडून आलं ते याच काळात. (सुमित्रा भावेंचा 'वास्तुपुरुष' यानंतरच्या दहा वर्षांनंतरच्या खेड्यातील ब्राह्मणांची प्रातिनिधिक कथा सांगतो. विशेष म्हणजे त्यात एलकुंचवारांनीही भूमिका केली आहे.) एलकुंचवार मात्र आणखी पुढच्या काळात येतात आणि १९८५ च्या काळातील विदर्भातील खेड्यामधल्या ब्राह्मण कुटुंबाची शोकांतिका मांडतात.
एलकुंचवारांनी यात सामाजिक मूल्यसंघर्षाचा आणि ढासळत गेलेल्या कुटुंबव्यवस्थेचा असा काही उभा छेद घेतला आहे, की ती केवळ एका कुटुंबाची वा केवळ ब्राह्मणांची शोकांतिका राहत नाही. तिला व्यापक परिमाण लाभतं ते यातल्या चिरंतन मूल्यांच्या लढाईच्या अस्तित्वामुळं. (इथं शेक्सपिअरची आठवण आल्याशिवाय राहत नाही.) एलकुंचवारांच्या लेखणीत ही ताकद असल्यानं ते धरणगावकर देशपांड्यांच्या गोष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात.
आपण १९८५ चा काळ पाहिला तर महाराष्ट्रात व देशात तो बऱ्यापैकी अस्थैर्याचा काळ होता. ऐंशीच्या दशकाला सुमार दशकही म्हटलं जातं. केवळ समाज म्हणून नव्हे, तर देश म्हणूनही अनेक आघाड्यांवर आपण निकृष्टतेचे तळ गाठत होतो. इंदिरा गांधींची हत्या झाली होती, राजीव गांधी प्रचंड बहुमतानं सत्तेवर आले होते, भारतानं क्रिकेटचा वर्ल्ड कप नुकताच जिंकला होता, कपिल देव आणि सुनील गावसकर हे क्रिकेटचे हिरो होते, रवी शास्त्रीनं ऑडी पटकावली होती, टीव्ही नुकताच रंगीत झाला होता, दूरदर्शनवर हमलोग मालिका लोकप्रिय झाली होती, मुख्यमंत्री वसंतदादांनी नुकतीच विनाअनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजांना परवानगी दिल्यानं साखरसम्राट आणि शिक्षणसम्राटांची नवनवी शिक्षण संकुलं उभारण्याकडं वाटचाल सुरू झाली होती, शरद पवार अद्याप एस काँग्रेसमध्येच होते, पुलं-सुनीताबाई अद्याप अॅक्टिव्ह होते आणि गावोगावी कवितांचे कार्यक्रम करीत होते, कुसुमाग्रज, जयवंत दळवी, वसंत बापट, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगूळकर ही सर्व मंडळी चांगली कार्यरत होती आणि महाराष्ट्रभर कार्यक्रम करत हिंडत होती, महेश कोठारे आणि सचिन या नव्या जोडगोळीनं अनुक्रमे धुमधडाका अन् नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमांद्वारे मराठी सिनेमात जान फुंकली होती, राज कपूर अद्याप सक्रिय होता; पण आता त्याला सिनेमा चालण्यासाठी ओलेत्या मंदाकिनीचा पदर लागत होता, धर्मेंद्रचा मुलगा सनी देओलनं नुकतंच बेताब नावाच्या सिनेमातून पदार्पण केलं होतं... जागतिकीकरण अद्याप फार लांब होतं, सचिन तेंडुलकर नावाचा मुलगा अजून शिवाजी पार्कपलीकडं कुणाला माहिती नव्हता, मोबाइल ही परग्रहावरची गोष्ट होती आणि सोशल मीडिया हे नावही तेव्हा कुणी ऐकलं नव्हतं...
असं असलं, तरी मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांनी वर्षानुवर्षं जपलेल्या मूल्यांना, संस्कारांना तडे जायला केव्हाच सुरुवात झाली होती. स्वातंत्र्यानंतर देशात आलेल्या रोमँटिसिझमची पुढच्या वीस-पंचवीस वर्षांतच नेहरूंसोबतच राखरांगोळी झाली होती... इंदिरा गांंधींच्या काळात देशात नवा शिष्टाचार उदयास आला होता, त्याला भ्रष्टाचार असं म्हणत असत... लायसन्स राज, परमिट राजच्या काळात मुंबईतही हाजी मस्तान अन् वरदराजनच्या रूपानं तस्करांचे सम्राट जन्मू लागले होते...
खेड्यांत तर परिस्थिती फारच भीषण होती. अभावग्रस्तता संपत नव्हती, पण मूल्यांशी तडजोड करून पैशांची बेगमी करता येते याची उदाहरणं वेगानं आजूबाजूला दिसू लागली होती... भ्रष्टाचार करण्याची पहिली संधी मिळताच अनेकांनी वर्षानुवर्षं जोपासलेली नीतिमूल्यं क्षणार्धात बिछान्यावर घेतली अन् या नव्या लाटेत ते सर्वार्थानं पतित झाले.
हा सगळा बदल टिपत एलकुंचवारांनी 'मग्न तळ्याकाठी'ची कथा रंगवलीय. हे सगळं वर्णन केलेलं भू-राजकीय वास्तव त्यांच्या कथेत 'बिटवीन द लाइन्स' येत राहतं. पात्रांच्या न बोललेल्या वाक्यांतून ते टोचत राहतं. आणि मग... एका क्षणी पात्रांतलं आणि आपल्यातलं अंतर नष्ट होतं आणि आपणच यातले पराग होतो, आपणच यातला अभय होतो, आपणच बाई होतो, आपणच काकू होतो, आपणच चंदूकाका होतो अन् आपणच रंजू होतो... आपल्या स्खलनाचा सगळा आलेखच या पात्रांच्या रूपानं आरशासारखा लेखक आपल्यासमोर धरतो आणि त्यातलं आपलं नागडं प्रतिबिंब पाहून आपण अंतर्बाह्य हादरून जातो. सध्याच्या काळात आपण एवढे मुखवटे आणि गेंड्यालाही लाजवेल अशी जाड संभाविताची कातडी पांघरून बाह्य जगात वावरत असतो, की हे सगळं भेदून आत काही जाईल, अशी आपल्याला अपेक्षाच नसते. पण एलकुंचवारांमधला समर्थ लेखक आणि चंदू कुलकर्णींमधला प्रतिभावंत दिग्दर्शक असं काही जादूचं इंजेक्शन टोचतो, की हे सगळे मुखवटे, जाड कातडी भेदून या गोष्टीतलं मर्म थेट आपल्या काळजाला भिडतं. आपल्याला उभं-आडवं सोलवटून, आपलीच छिललेली त्वचा नाटककार आपल्या हातावर ठेवतो अन् सांगतो - बघ, यात काही प्राण शिल्लक आहेत का!
... म्हणून यातले भाऊ आपल्याला अगदी अस्सल वाटतात. आपल्याच घरात आपण असे भाऊ बघितलेले असतात. आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या रूपानं. बिघडलेल्या मुलासमोर हतबल झालेले... पण प्रसंगी कठोर होऊन त्याला सुनावणारे... आपण बघितलेल्या असतात मध्यरात्री ओसरीवर येऊन एकमेकींना सुख-दुःखाच्या गोष्टी सांगणाऱ्या मोठ्या वहिनी अन् मुंबईची त्यांची जाऊ - अंजली... नुसत्या बघितलेल्या नसतात, तर आपणच असतो वहिनी अन् अंजली... म्हणून मग वर्षानुवर्षं पदरांआड दडलेलं त्या बायाचं आभाळाएवढं दुःख असं त्या धरणगावातल्या चांदण्यांच्या साक्षीनं आपल्या काळजात झरू लागतं, तेव्हा डोळ्यांतल्या आसवांना खळ राहत नाही... म्हणून मग पराग अन् अभय पुन्हा बोलायला लागतात, तेव्हा आपलेच हरवलेले आत्ये-मामे-चुलतभाऊ आठवत राहतात आणि त्यांच्यासोबत केलेली दंगामस्ती... पुन्हा लहान व्हावंसं वाटतं...
'मग्न तळ्याकाठी'मधल्या स्त्रियांचं चित्रण हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. देवळात राहायला गेलेल्या मुलाच्या आठवणीनं व्याकुळ होणारी अन् ओसरीवर मध्यरात्री बसून (एरवी अजिबात ऐकू येत नसताना) त्याचा आवाज 'ऐकणारी' आजी, (नवऱ्याबरोबरचं नातं सांगताना) 'आमचं ते डिपार्टमेंट केव्हाच बंद केलंय' असं सहज सांगणारी वहिनी, नवरा अन् मुलगा या दोघांमध्ये भावनांचं सँडविच झालेली अंजलीकाकू, दहा वर्षांपूर्वी मास्तरांसोबत पळून गेलेली अन् आता परागदादाच्या करड्या धाकात कोमेजणारी रंजू... अन् सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे शिकू न दिल्यानं शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलेली अन् माडीवर शून्यवत होऊन बसलेली प्रभाआत्या... यातलं एकेक व्यक्तिचित्र म्हणजे एकेका कादंबरीचा ऐवज आहे. विशेष म्हणजे नाटकात या पात्रांना जेवढा अवधी मिळतो, तेवढ्यात त्यांच्या जगण्याची ही दीर्घ 'कादंबरी' आपल्याला कळतेही. हेच तर मोठ्या नाटककाराचं श्रेयस असतं....
'मग्न तळ्याकाठी' हा असा भलामोठा सामाजिक-सांस्कृतिक ऐवज आहे. यातल्या तळ्यातला उल्लेख फार सूचक आहे. दहा वर्षांपूर्वी ज्या तळ्यात अभय पोहायला शिकला, ते तळं आता गावची गटारगंगा झालंय.... ज्या स्वच्छ, निर्मळ पाण्यात निर्भयतेचा श्वास घेता येत होता, त्या पाण्याशेजारी आता असह्य दुर्गंधी सुटलीय...
समाज म्हणून तरी आपलं दुसरं काय झालंय? आपल्या समाजाचं तळंही असंच घाणीनं बरबटत अन् आटत चाललंय... ही तीव्र बोचरी भावना ही कलाकृती आपल्या मनात खोल कुठं तरी रुजवते. पण याचा अर्थ हे नाटक नकारात्मक आहे असं नाही. यात अनेक ठिकाणी विनोद आहेत, गमती आहेत, शिव्या आहेत, रांगडा रोमान्स आहे... शेवटी ग्रामीण भागातला अस्सल देशपांड्यांचा तो वाडा आहे... भले आता तो चिरेबंदी नसेल... पण अजूनही आपलं काही तरी चुकलंय या विचारात, आत्मचिंतनात मग्न आहे... शेजारच्या तळ्यासारखाच!
---
दर्जा - साडेचार स्टार
---

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Dear Sir,This is just fantastic..I follow your reviews and liked it all. I have watched the play also..It was one of the memorable theatrical experiences of my life..I just love this "Wada"triology..My birth year is 1992..so when i have watched the play,I wasn't completely aware about the socio-political details which you have mentioned above which plays the important role in this story..so thank you so much..I got to know better about the nuances and undercurrents..thanks again..
    And I request you to review "Don Special"I enjoyed it thoroughly.I would love to read your review about it.Thank you

    ReplyDelete