2 May 2017

#सम्याआणिगौरीच्यागोष्टी #सीझन 2

सम्या आणि गौरीच्या गोष्टी
------------------------------

सीझन २
---------

#11

सावर रे...
------------
गौरी (गुणगुणते) : सावर रे, सावर रे, सावर रे... उंच उंच झुला, उंच उंच झुला... सुख मला भिवविते, सांगू कसे तुला...
समीर : ये अशी... मी सिनेमात नायक कसा नायिकेला दोन्ही हातांत उचलून घेतो, तसा उचलून घेतो तुला... मग बघ झुला...!
गौरी : गप रे... चहाटळपणा नकोय. मी काय म्हणतेय ऐक ना... मी मघापासून या गाण्यातल्या 'सुख मला भिवविते' या ओळींवर विचार करते आहे. किती महत्त्वाची आहे ही ओळ! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज कधी तरी येतेच बघ.
समीर : कसली फेज?
गौरी : बघ ना सम्या, कधी कधी सगळं कसं छान, सुरळीत चालू असतं. सुख असतं बघ. अगदी आपल्याला ते सुख जाणवण्याइतपत सुख अंगी येतं. मग त्याचीच भीती वाटू लागते. हे सगळं असंच राहणार नाही, हे आत आत कुठं तरी माहिती असतं...
समीर : याचं कारण आपल्याला फक्त सुख हवं असतं. पण ते जेव्हा नसतं, तेव्हाच जाणवतं. तुला ते असतानाही जाणवतं हे विशेष आहे.
गौरी : हो अरे, आणि चांगलंच जाणवतं. आणि मग भीती वाटू लागते... अनामिक भीती! हे मला गमवायचं नाहीय याची भीती...
समीर : 'सुख-दुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ...' असं काही तरी म्हटलंच आहे ना गीतेत... सुख आणि दुःख दोन्हीचा विचार करायचा नाही. पण त्याचा संदर्भ वेगळा आहे. अर्थात आपण आपल्या आयुष्यात त्याचा अंगीकार निराळ्या पद्धतीनं करू शकतोच.
गौरी : अरे, हे बोलणं सोपं आहे. पण हा विरक्त भाव अंगी येणं मुळीच सोपं नाही. अनेकांना दुःखाचाही मोह सुटत नाही. मग सुखाचा मोह सुटणं तर केवळ कठीणच.
समीर : गौरे, आज फारच तत्त्वज्ञान ऐकवतीयस. काय झालंय?
गौरी : सुखाची गोळी जास्त झालीय सम्या. मला दुःख हवंय. नाही तर हे भय वाढत जाईल... मग नंतर 'सावर रे' म्हणून काही उपयोग नसतो बाबा...
समीर : अगं तुझं वय काय? असं कितीसं आयुष्य पाहिलंयस तू? मग का हा विरक्त भाव येईल आपल्या अंगी? आपण आधी सुख तर उपभोगू... मग बघू इतर भावांचं...
गौरी : यशासारखं सुखसुद्धा पचवता यावं लागतं बघ. आपल्याला सुख झालं, तर ते वाटता आलं पाहिजे. अनेकांमध्ये हा गुण नसल्यानं ते सुखी असूनही दुःखीच असतात.
समीर : मी तसा नाहीय. मी कायम सुख वाटत फिरत असतो. तुला माहितीय.
गौरी : हो, 'सपनों का सौदागर' असतो, तसा तू सुखाचा व्यापारी आहेस. पण व्यापारीच आहेस मेल्या. सुख दिलं तरी त्याची किंमत वसूल करतोेसच...
समीर : हो. आजच्या सुखाची किंमत आहे फक्त एक स्मायली... तेवढी दे....
गौरी (हसत) : घे... स्मायल्यांची लाइन लावते... नशीब तेवढंच मागितलंस. नाही तर 'आवर रे' म्हणायची वेळ आणतोस...

---

#12 

एक्स इन्टु झिरो....
------------------

समीर : गौरी, तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही?
गौरी : नाही रे बाबा, काहीही काय!
समीर : हा हा हा, बरं, ऐक! या प्रेम नावाच्या गमतीशीर गोष्टीवरून किती काय काय सुरू असतं हं...
गौरी : आता काय झालं? परत प्रेमात पडलास का रे बाबा कुणाच्या?
समीर : ऐक तर... माझी एक मैत्रीण होती बरं का... संभाषणाच्या सोयीसाठी आपण तिला 'एक्स' म्हणू...
गौरी (खवचटपणे) : व्हेरी स्मार्ट... द्वयर्थी ना...
समीर : थांब गं जरा... तसं नाही. गणितात कसं आपण 'एक्स' धरतो ना, तसं समज. तर ही 'एक्स' आहे ना, हिच्या प्रेमाविषयीच्या कल्पना अचाट आहेत.
गौरी : म्हणजे?
समीर : म्हणजे असं, की 'एक्स'ला वाटायचं, की तिला तिचा एक मित्र खूप आवडतो. तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मग त्यालाही तिनं हे सांगितलं. पण एका अटीवर... हे प्रेम अमूर्त असेल.
गौरी : अगं बाई! पण मित्र समूर्त, सगुण, साकार होता ना... की हे ऐकूनच तो 'अमूर्त' झाला?
समीर : हा हा हा! त्याचं काय झालं मला माहिती नाही. पण असं कसं असू शकेल? अमूर्त प्रेम ही काय भानगड आहे?
गौरी : अरे, सरळ साधा अर्थ आहे. जे काही प्रेम करायचं ते लांबूनच करायचं. हात लावायचा नाही.
समीर : हात्तिच्या... मग हे सरळ सांगायचं ना... आणि हात नाही लावायचा तर सरळ राखी बांधून टाकावी...
गौरी : हेच तुला आणि एकूणच तुम्हा पुरुषांना कळत नाही सम्या... अरे, बाईचं प्रेम तुम्ही फक्त या दोनच शेड्समध्ये बघता...
समीर (चावट हसत) : असं काही नाही हं... किमान 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' ठाऊक आहेत मला...
गौरी : तू एक थोर आहेस. सगळ्यांचं तसं नसतं ना... तर मूळ मुद्दा असा, की तिचं खरंच तिच्या मित्रावर प्रेम असू शकतं आणि ते खरोखर स्पर्शाविनाही असूच शकतं...
समीर : मला या बायकांचे हे फंडेच कळत नाहीत. यांच्या प्रेमाच्या, विशेषतः विवाहोत्तर प्रेमाच्या, त्यातही पस्तिशीनंतरच्या प्रेमाच्या एवढ्या अटी आणि शर्ती असतात ना, की त्यापेक्षा खरंच राखी बांधून घेतलेली परवडते.
गौरी : फारच अभ्यास दिसतोय रे तुझा? अशा काय अटी अन् शर्ती असतात रे! हेच ना, स्पर्श करायचा नाही, अमक्या वेळी बोलायचं नाही, तमक्या ठिकाणी एकत्र दिसायचं नाही वगैरे... अरे, सदैव द्वंद्व चाललेलं असतं आमच्या मनात... प्रेम ही अशी भावना आहे, की मुक्त पाण्यासारखी ती वाट मिळेल तिथं धावत सुटते. मग आपल्या परंपरांचे, रुढींचे, कडक सोवळ्या-ओवळ्याचे, नीती-अनीतीचे बांध घालून त्याला अडवावं लागतं. मनाच्या विरुद्ध अडवावं लागतं.... हे करताना बाईला आनंद होत असतो असं नाही. पण ज्याच्यावर प्रेम जडलंय त्यानं तरी हे समजून घ्यावं एवढीच तिची अपेक्षा असते.
समीर : हं... आज 'एक्स'चं मन मला थोडं फार कळलंय असं वाटतंय...
गौरी : वेडा आहेस झालं... बाईचं मन अथांग महासागरासारखं असतं. असं सहजी कळत नाही...
समीर (हसत) : खरंय... बाई 'एक्स' असेल, तर आम्ही पुरुष मोठ्ठं शून्य आहोत, असं समज... बघ मग समीकरणाचं काय उत्तर येतं ते!

---

#13 


'वाय' धिस कोलावरी डी?
------------------------

समीर : गौरी, काल तुला मी माझ्या 'एक्स' नावाच्या मैत्रिणीची गोष्ट सांगितली ना, आज 'वाय'ची ऐक...
गौरी : काय सगळी इंग्रजी बाराखडी गोळा केलीयस की काय?
समीर (हसत) : अगं नाही. पण स्वभाववैशिष्ट्यं असतात एकेकीची... त्यानुसार सहज ही आद्याक्षरं त्यांना जोडता आली. त्यात विशेष असं काही नाही. तर ही 'वाय'...
गौरी : आधी हे सांग, की तिला 'वाय' का म्हणायचं?
समीर : सांगतो ना, ऐक तरी! ही ना, प्रत्येक गोष्टीत 'का?' असं विचारते. म्हणजे इंग्रजीत 'व्हाय?' त्याचं सुलभीकरण म्हणून मी तिला 'वाय' असं नाव ठेवलंय...
गौरी : हिनं काय केलं आता?
समीर : बघ हं... मैत्रीत किंवा प्रेमात आपण थोडं फार गृहित धरतो किनई एकमेकांना... पण हिला काही ते मान्य नाही. प्रत्येक गोष्टीला तिचा 'का?' हा प्रश्न ठरलेलाच असतो. उदा. आपण तिला म्हटलं, की अमुकतमुक सिनेमाला जाऊ, तर ही म्हणणार, का पण? तोच का? हा का नाही? किंवा असं म्हटलं, की मला अमुक एक सेंट आवडतो. तर हिचं सुरू.. तोच का? 
गौरी : अरे, असतात अशी काही माणसं... त्यांना ना नात्यात सदैव असुरक्षित वाटत असतं. म्हणून त्या सदैव खुंटा हलवून बळकट करत असतात. दर वेळी थेटपणे हे बोलणं किंवा विचारणं शक्य नसतं त्यांना. म्हणून मग हे 'का पण?'चं भूत उभं करतात. तुला अमका सेंट का आवडतो, असं ती विचारते, याचा अर्थ कुणा दुसरीमुळं तुला तो आवडतोय का, असं तिला विचारायचं असतं. तू अमुक एक सिनेमा दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून पाहतोयस का, असा प्रश्न तिला पडतो. म्हणून मग ती 'तोच का पाहायचा?' असं विचारते.
समीर : कमाल आहे. एवढा संशय काय उपयोगाचा? विश्वास पाहिजे ना थोडा...
गौरी : चुकतोयस सम्या, अरे, विश्वास असतोच. हा संशय नाही. पुन्हा सांगते. ही असुरक्षितता आहे नात्यातली. आता एखाद्याला अशी मैत्रीण किंवा असा मित्र मिळाला, तर त्याच्यावर फार जबाबदारी येते त्याला सांभाळून घेण्याची...
समीर : अगं, मग करायचं तरी काय अशा वेळी?
गौरी : अशा वेळी थोडं तिच्या कलानं घ्यायचं. किंवा खरं सांगू का, जे काही करायचं ते तिलाच विचारायचं. किंवा तिलाच करायला सांगायचं.
समीर : काही नाही. मागच्या वेळी पाहिला करून हा प्रयोग... 
गौरी : मग?
समीर : काही नाही. ती म्हणाली, का पण? मला का विचारतोयस? तुला नाही का ठरवता येत... (हसतो...)
गौरी (हसते) : हा हा हा... मग कठीण आहे.
समीर : मग मी आपलं ते गाणं म्हणतो - वाय धिस कोलावरी कोलावरी डी...
गौरी : अच्छा... 'डी' आलं का माझ्यावर... आता माझ्या डी नावाच्या मित्राची गोष्ट सांगते तुला थांब...
----
#14 
मि. 'डी'....
-----------
समीर : गौरी, तू सांगणार होतीस ना, तुझ्या 'डी' नावाच्या मित्राबद्दल... सांग मग आता...
गौरी : अरे हो, तू कसं तुझ्या त्या मैत्रिणीचं नाव 'वाय' ठेवलं होतं, तसं मी आणि माझ्या मैत्रिणी या मित्राला 'डी' म्हणतो.
समीर : ते कशामुळं?
गौरी : अरे, हा अगदी टिपिकल पुरुषी मेंटॅलिटीचा होता. मि. डाउटफायर...! संशयात्मा.... आमच्या एका मैत्रिणीबरोबर याचं जुळलं बरं का! म्हणजे आम्हालाच आपलं असं वाटत होतं. पण यानं संशयानं वागून तिला फार त्रास दिला. मग शेवटी तुटलंच ते...
समीर : कमाल आहे. लग्न झाल्यानंतर नवरा म्हणून एखाद्यानं संशय घेतला, तर समजू शकतो. पण हे आधीच?
गौरी : पुरुषांना काही फरक पडत नाही रे! लग्न झालंय वा न झालंय... यांची वृत्ती तीच राहते. उलट मी तर म्हणते, बरंच झालं आधी समजलं ते. नंतर आमच्या त्या मैत्रिणीला त्रासच झाला असता.
समीर : काय करत होता हा तुमचा हा मि. 'डी'?
गौरी : अरे, काही विचारू नकोस. तिला कुठं जाऊ द्यायचा नाही, की कुणा मित्राशी बोलू द्यायचा नाही. सदैव आपला हा भिंग घेऊन तिच्या मागे...
समीर : हं... हेच एखाद्या मुलीनं केलं असतं तर तू काय म्हणाली असतीस माहितीय? हा आम्हा बायकांचा पझेसिव्हनेस असतो वगैरे...
गौरी : कमाल आहे अरे... असं कशाला म्हणू? असं एखाद्या मुलीनं केलं तरी ते चूकच आहे. आपण जर कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असू ना, तर आपल्याला हे नीटच कळलं पाहिजे की पझेसिव्हनेस कुठं संपतो आणि संशय कुठं सुरू होतो...! आणि मुळात काय आहे, आपण निर्वात पोकळीत जगत नाही ना... आपल्या अवतीभवती असतातच माणसं... आपला संबंध येणारच आहे कुणा ना कुणाशी तरी...
समीर : अगदी बरोबर. म्हणजेच हे दोघांनीही जपलं पाहिजे ना...
गौरी : सम्या, यात काहीच वाद नाही. दोघांनाही हे नीट जपता आलं पाहिजे. नाही तर नाती तुटून जातील.
समीर : पण हे समजणार कसं? सांभाळायचं कसं?
गौरी : आपला आपल्या वागणुकीवर ताबा पाहिजे आणि जोडीदाराच्या वागण्यावर विश्वास... एवढं जपलं ना, तरी पुष्कळ साध्य होतं...
समीर : हं... नशीब तुझं, मी मि. 'डी' नाहीय...
गौरी (हसत) : आहेस तू सम्या मि. 'डी'... पण मि. डाउटफायर नव्हे; मि. डॅम्बिस!
---

#15
हॉट आणि कूल...

--------------------
गौरी : सम्या, अरे कुठं गायब होतास चार दिवस? वाट पाहत होते किती...
समीर : अगं, मी म्हटलं नव्हतं का राणी, जरा ब्रेक बरा असतो ते... सारखं सारखं भेटणंही खरं नाही...
गौरी : चुप्प बस... मी कितीही रागावले, वैतागले तरी प्रेम आहे रे तुझ्यावर राजा... मग तू नाही भेटलास की कसं चुकल्याचुकल्यासारखं होतं...
समीर : ते ठीक आहे. पण विरहानं प्रेम वाढतंच म्हटलं... किंमत कळते आपल्या माणसाची...
गौरी : मला तरी कुठल्याही नात्याचं ऋतुचक्रासारखंच असतं, असं वाटतं. म्हणजे त्या नात्यात कधी शिशिर असतो, तर कधी वसंत, कधी हेमंत, तर कधी वर्षा...
समीर : एवढ्या उकाड्याचं तुला बरं काव्यात्म काही तरी सुचतं गं?
गौरी : पण ते खोटं आहे का, सांग... नात्यांच्या ऋतुचक्राचा प्रत्यक्ष जगण्याशी मेळ बसला पाहिजे बाबा... नाही तर नात्यात कायमचा उन्हाळा...
समीर : नात्यातली माणसं 'हॉट' असली की नातंही कसं 'हिट अँड हॉट' राहतं...
गौरी : कसल्या कोट्या करतोयस... उगाचच...
समीर : आम्हाला नाही बुवा सुचत तुझ्यासारखं काव्यात्म वगैरे... मी आपला अगदीच गद्य आणि सरळ माणूस आहे...
गौरी : पण 'कूल' आहेस... म्हणूनच मला आवडतोस...
समीर (हसत) : अगं, तू 'हॉट' असशील तर मी 'कूल' असायलाच पाहिजे... नाही तर दोघेही भाजून मरायचो...
गौरी : हा हा हा, यावरून नुकताच मला व्हॉट्सअॅपवरून आलेला एक अतिच पांचट, कोमट जोक आठवला...
समीर : हा हा हा... माहितीय. हसून हसून मेलो... कठीण आहे. कोण असले जोक तयार करतं कुणास ठाऊक!
गौरी : तुझ्यासारखीच कोटीबाज माणसं... तुम्हाला काय उद्योग आहे दुसरा?
समीर : हसायला मजा येते ना... मग नावं कशाला ठेवतेस?
गौरी : ते जाऊ दे... नात्याचं ऋतुचक्र शिरलं का काही डोक्यात?
समीर : एवढा काही मी 'हा' नाहीय न कळायला... कळलं की... माझी तर इच्छा आहे, आपलं नातं कायम वसंताप्रमाणं फुलत राहावं...
गौरी : नुसती इच्छा व्यक्त करून काही होत नाही सम्या... तसं वागता आलं पाहिजे... मला तरी सध्या उकडतंय...
समीर (हसत) : मग मी तुझा 'एसी' आहे, असं समज...​
गौरी : म्हणजे?
समीर : ऑल्वेज कूल...!
---

#16

ये जवळी घे जवळी...
------------------------

समीर : गौरी, माणसाच्या जीवनातला सर्वोच्च आनंद कोणता?
गौरी : काय झालंय स्वारीला? खूश एकदम?
समीर : सांग तरी... शांग... शांग... शोना, शोना... शांग...
गौरी : अरे हो हो... सुख-दुःखाच्या पलीकडं गेलेली भावविरहित अवस्था?
समीर : किती अवघड बोलतेस गं? माझ्या लेखी अशी अवस्था फक्त आपण वर गेल्यावरच येऊ शकेल...
गौरी : आता तू सर्वोच्च वगैरे म्हटलास म्हणून मी तसं सांगितलं...
समीर : अगं राणी, तुला माहितीय ना, मी एक साधा-सरळ माणूस आहे. माझ्या सगळ्या भावभावना या अगदीच नॉर्मल वगैरे आहेत. तुझ्यासारखं असं तटस्थपणे किंवा फिलॉसॉफिकली मला नाही बघता येत स्वतःकडे...
गौरी : बरं, बरं... मान्य आहे. तुझ्या लेखी तो सर्वोच्च आनंद तरी सांग कोणता ते...
समीर : आपल्याला जे हवं ते करता येणं आणि तेही कोणताही लपवाछपवी न करता... हा माझ्या मते सर्वोच्च आनंद आहे.
गौरी : म्हणजे काय? उदाहरणासकट सांग...
समीर : म्हणजे बघ हं... मला समजा वाटलं, की आज अमुक एका माणसाची भेट व्हावी आणि ती झाली... आणि हे मला सगळ्यांना सांगताही आलं तर तो खरा आनंद... अर्थात हे एक उदाहरण झालं...
गौरी : मग सांग की...
समीर : तोच तर प्रॉब्लेम आहे ना... नात्यांचं ऋतुचक्र वगैरे... काही नावं घेतली तर आपल्या नात्यात एकदम उन्हाळा सुरू होईल हे माहितीय मला... हा हा हा!
गौरी (वैतागून) : सम्या, ताकाला जाऊन भांडं लपवू नकोस... बोल, कोण भेटलं होतं? कोण होती?
समीर : हर, हर... आली हरदासाची कथा मूळपदावर... अगं बाई, तेच तर सांगतोय ना... हा आनंद कसा शेअर करू? गैरसमजांचा ऋतू सुरू व्हायचा... आणि मुळात तो आनंद तरी खरा का?
गौरी : मग तुझ्या आणि माझ्या नात्याला अर्थ काय? तू मला सगळं सांगितलंच पाहिजेस...
समीर : मला तर काहीच समजत नाही. एकच कळतं, सर्वोच्च आनंदाचा क्षण हा सर्वोच्च दुःखाचाही क्षण असू शकतो... कारण तो क्षण परत कधीच मिळत नाही...
गौरी : तू नक्की कशाबद्दल बोलतोयस मला कळत नाहीय. पण एक नक्की... कुठलाही आनंद अपराधी भावनेनं किंवा चोरटेपणानं गोष्टी करून मिळत नसतो...
समीर : एक्झॅक्टली... मला हेच म्हणायचं होतं... मला हा आनंद फक्त तुझ्यासोबतच मिळतो गौरी....
​गौरी (हसत) : नव्हे, तो माझ्यासोबतच मिळेल... मी बरी तुला अशी जाऊ देईन कुठं?
समीर : ये जवळी घे जवळी... प्रिय सखये....
---

#17 


तू हापूस, मी पायरी
---------------------
समीर : गौरे, कुठं गेली होतीस एवढं दिवस? करमत नव्हतं मला...
गौरी : कामं असतात बाबा... मी काही रिकामी नाही तुझ्यासारखी लेख लिहीत बसायला... खूप बिझी गेला बघ गेला आठवडा... ऑफिसात मरणाची कामं होती...
समीर : लेख लिहिणं हे रिकामपणाचं काम असं का वाटतं तुला? माझी प्रतिभा पण शिणून जाते लेख लिहिताना... कित्येकदा आठवडा-आठवडाभर काही सुचत नाही.
गौरी : बरं असतं रे ब्रेक घेणं... उगाच पाडायचे म्हणून लेख पाडत जाऊ नकोस. तसंही तू उत्स्फूर्तपणे सुचल्याशिवाय काही लिहीत नाहीस हे बरंय. नाही तर आमचे काही मित्र फेसबुकवर रोज रतीब घालत असतात.
समीर : गौरी, ते लेख मरू दे. आंब्याचा सीझन आलाय. मला आमरस खायचाय...
गौरी : तुला कशाचे डोहाळे लागतील काही सांगता येत नाही.
समीर : आता आंब्याच्या सीझनमध्ये आंबा नाही खायचा तर काय चिंचा खायच्या?
गौरी (लाजते) : चिंचा...? इश्श!
समीर : फालतूपणा करू नकोस गौरे... डोहाळ्यांचे डोहाळे लागले की काय तुला?
गौरी : सम्या, टोपभर आंबे आणून देते, पण डोहाळ्यांचं नावही काढू नकोस...
समीर : देच आणून. आणि तोही हापूस... आणि तोही देवगडचा... बाकी आलतू-फालतू काही खात नाही मी...
गौरी : आहाहाहा, असं बोलतोयस की जन्मापासून दुसरा आंबा कधी खाल्ला नाही.
समीर : नाही, तसं नाही. माझी 'पायरी' नीटच ओळखून आहे गं मी... तू हापूस अन् मी पायरी... मान्यच आहे! पण कधी कधी माज करावा माणसानं...
गौरी : करावा की; पण झेपेल एवढाच करावा. सोसत नसता डझनभर आंबे खायचे, वर रस ओरपायचा आणि नंतर होते पळापळ मग...
समीर : अहो गौरी म्याडम, माझा मी समर्थ आहे सगळं सोसायला... मरू, पण हापूस खाऊनच मरू...
गौरी : गप रे, काहीही बोलतोस... तुझ्या जिभेला काही हाड?
समीर : नाही, सध्या तरी हापूसची कोय आहे. तुला हवीय का?
गौरी : म्हणजे काय... हवीच आहे...
समीर (हसत) : तुला काढून घ्यावी लागेल माझ्या तोंडातून... ये...
---

#18

भांडण...
-----------
समीर : तुला काही कळत नाही... तू बोलू नकोस माझ्याशी... मला तुझा राग आलाय...
गौरी : तुलाच कळत नाही काही... स्वतःचं सगळं बरोबर असं तुला वाटत असतं... पण तू चुकलायस... आणि चुकलायस तर मान्य कर...
समीर : अरे वा रे वा... तूच ठरव सगळं... नियम तुझेच, न्यायाधीश तूच... मला हे मुळातच मान्य नाही.
गौरी : मी काय चुकीचं बोलले होते रे... तू वागलास ते अत्यंत चुकीचं होतं. तुला ना सम्या, खरंच कळत नाही. तुलाच काय, तुम्हा पुरुषांनाच अनेकदा खूप काही कळत नाही. तुम्हाला वाटतं, आम्ही फार शहाणे. आपल्याला फार कळतं. पण बायकांपुढं बोलताना तुमची ही अक्कल का गहाण पडते?
समीर : मला जे वाटलं ते मी बोललो. आणि काही चुकीचं बोललो आहे असं वाटत नाही.
गौरी : तेच तर रे माझ्या भोळ्या सांबा... तुला कसं कळत नाही, की आपण फार सरळ असतो. पण जग तसं नसतं. लगेच लोक गॉसिपिंग सुरू करतात. आणि तुझ्याविषयी कुणी वेडंवाकडं बोललेलं मला खपणार नाही.
समीर : मला ज्यांच्याबद्दल विश्वास वाटतो त्यांच्याशीच मी बोलणार ना... कुणाशीही बोलायला जात नाही गं...
गौरी : पण समजा, नाही बोललास, गप्प बसलास तर काही झिजणार आहेस का? तुझ्या पोटात ना काही राहत नाही आणि मला याचीच काळजी वाटते. जरा डिप्लोमॅटिक वागायला शीक की...
समीर : असं मोजूनमापून, बेतशुद्ध मला वागता येईल गौरी; पण माझ्यातला 'सम्या' मरून जाईल... माझ्यातला 'मी' राहणार नाही...
गौरी : उगाच इमोशनल डायलॉग मारू नकोस. तुला बदलावंच लागेल. तुझ्या या मनमोकळ्या स्वभावामुळं मी तुझ्या प्रेमात पडले... पण याचा अर्थ मी सदैव तुझी भलावण करीत राहावी असा नाही. तुझ्या स्वभावाचे तुला फटके बसतात आणि याचं तुझ्यापेक्षा मला जास्त वाईट वाटतं रे राजा...
समीर : स्वतःतच रमणारा मी जीव आहे गौरी... कशाला माझ्या प्रेमात पडलीस?
गौरी : ते माझ्याही हातात नव्हतं रे... आणि आता पडले आहे तर असू दे.... तुझं सगळं मलाच पाहावं लागणार आहे. तुला स्वभाव बदल बाबा पण...
समीर : असा स्वभाव बदलता आला असता तर काय पाहिजे होतं गौरी! माझ्या गुण-दोषांसकट स्वीकार मला....
गौरी (हसत) : एवढा गोड का आहेस तू गाढव मुला! तुझ्याशी भांडता पण येत नाही रे मग मला.. चिडका... वेडू...
समीर (हसत) : खरं सांगू का, आमच्यासारख्या पॅम्पर्ड मुलांना नुसती बायको किंवा प्रेयसी नको असते... अशी वेळप्रसंगी आम्हाला दटावणारी आमची आई, बहीण, मैत्रीणही तुमच्यात हवी असते... तू तशी आहेस... म्हणूनच आवडतेस...
गौरी (गळ्यात हात टाकत) : अब रुलाएगा क्या, मेरे शोना....
---

#19


सूर निरागस हो...
------------------

गौरी : सम्या, सम्या... अरे, कसला खुललाय तुझा चेहरा... आणि सिनेमा बघतानाही किती एक्साइट झाला होतास... टाळ्या काय पिटत होतास... हसत होतास, ओरडत होतास... किती तरी दिवसांनी तुला असं बघितलं...
समीर : गौरी, खरं आहे. असा सिनेमा बघताना लहान होऊनच बघायला पाहिजे. मला दर वेळी आपण आता मोठे आहोत, ही झूल वागवून वावरायला आवडत नाही. थिएटरचा अंधार ही किती छान गोष्ट आहे! ती तुम्हाला हवं ते होण्याची संधी देते. आज त्या अंधारानं मला पुन्हा तो लहान सम्या करून टाकला. 'चांदोबा'मधल्या गोष्टी वाचणारा... त्यातल्या राक्षसाला भिणारा... जादूच्या छडीचं स्वप्न पाहणारा...
गौरी : खरंय यार सम्या. आपण मोठे होत जातो, तसतसे कोडगे होत जातो, निबर होऊन जातो... जून होतो. तू कविहृदयाचा आहेस, कविमनाचा आहेस.... 'वृद्धत्वी निज शैशवाचा बाणा जपणे' हा कवीचा धर्मच आहे.
समीर : ए, मी काय म्हातारा झालोय का? तरुण आहे आणि... (हसतो) तुला ते चांगलंच माहिती आहे... हा हा हा... 
गौरी : चूप रे! शब्दशः घेऊ नकोस. पण तू आजूबाजूला पाहा ना. पंचविशी-तिशीतले लोकही सगळ्या जगाची चिंता आपल्याच डोक्यावर असल्यासारखे गंभीरपणे वावरत असतात.
समीर : खरंय. किंबहुना माणूस हसायचं, नाचायचं, बागडायचं विसरला की म्हातारा होतोच. मग त्याचं खरं, शारीरिक वय काही का असेना...
गौरी : तू मात्र तसा नाहीस. एवढा घोडा झालायस तरी अगदी लहान मुलांसारखाच वागतोस. खरं तर तू मनानं अजून 'बाल' गटातच आहेस, सम्या...
समीर : पण मला आवडतं. मी तुला मागं नव्हतं का म्हटलं... आम्हा पॅम्पर्ड मुलांना लाड करवून घ्यायला आवडतात. 
गौरी : पण सिनेमा बघताना आज तू जो काही खूश दिसत होतास ना, ते दृश्य माझ्या कायमचं लक्षात राहणार आहे. असाच आनंदी राहा सम्या. आणि तुझ्यातलं हे लहान मूल आहे ना, ते कायम जप. 
समीर : गौरी, हे तुलाही लागू आहे. तू माझ्यापेक्षा किती तरी जास्त हुशार, समजूतदार वगैरे आहेस. तू पण मला तश्शीच हवीयस.
गौरी : हे निरागस असणं किती छान आहे. आपण कितीही मोठे झालो, तरी असंच निरागस राहायला हवं. समोरच्याला कित्येकदा आपल्यातलं हे निरागस मूल ओळखता येत नाही आणि मग गैरसमज होतात. खरं तर सगळ्याच नात्यांत असा निरागसपणा आला तर किती छान!
समीर : गौरी, सूर दे... मी थोडा घसा मोकळा करतो... सूर निरागस हो.....

---

#20


नसतोस तू जेव्हा...
 ------------------------

गौरी : का हा छळवाद मांडला आहेस सम्या? डोळ्यांसमोर नसलास की त्रास होतो... तुझ्या वागणुकीतून तुला माझ्याविषयी काही वाटत असेल याचा काही पुरावा मिळत नाही. पण मी इकडं तुझ्यात पूर्ण अडकलेय...
समीर : अगं, आज अचानक अशी इमोशनल का झालीस गौरे?
गौरी : कळत नाही का ते... डोळे झरताहेत सकाळपासून...
समीर (जवळ घेत) : तू जवळ ये अशी... माझ्या कुशीत... मी कुठंही जात नाहीय... इथंच आहे. तुझ्याजवळ!
गौरी : माझी एक जवळची मैत्रीण आहे. ती असंच वेड्यासारखं प्रेम करीत होती तिच्या मित्रावर... तो एके दिवशी अचानक गेलाच अरे अपघातात... तेव्हापासून ती अशी काही कोसळली, की परत सावरलीच नाही.
समीर : काय सांगतेस? कोण मैत्रीण? मला नाही का माहिती ती?
गौरी : गप्प बस... ती कोण हे महत्त्वाचं नाही. आणि नाहीय तुला ती माहिती... मुद्दा तिच्या असीम दुःखाचा आहे. काय करू शकतो आपण सांग ना...
समीर : खरं आहे. माणसानं आपल्या माणसाला जपावं हे खरंच. पण प्रत्येकानं स्वतःलाही आपलंच समजून जपावं. आपण आपले असतो त्याहीपेक्षा जास्त कदाचित दुसऱ्या कुणाचे तरी असतो. आपल्याला आपली 'ती' व्हॅल्यू माहिती नसते किंवा कळतच नाही अनेकदा...
गौरी : तूही अनेकदा असाच वागतोस. इग्नोअरंट... कधी कधी वाटतं, की का या माणसावर भाळले मी...?
समीर : गौरे, चुकत असेनही मी पुष्कळदा वागायला... पण प्रेम जेन्युइन आहे गं... तुला का असं वाटतं?
गौरी : माहिती नाही. सदैव गमावण्याची भीती वाटते. प्रेम ही भावना कितीही म्हटलं, तरी फार वैयक्तिक आणि जिवाजवळची असते रे. नाजूक जागेचं दुखणं ते... मनही फार हळवं असतं त्याबाबतीत... एवढंसं काही झालं तरी लगेच भळभळायला लागतं...
समीर : हे सगळं होतं याचं कारण तुझं प्रेम हेच आहे. पण आम्हा पुरुषांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते ना...
गौरी : माहिती आहे सम्या... तुम्हाला कधी अंदाजही येणार नाही आम्ही किती समजावून घेऊ शकतो एखाद्याला ते... पण आमची मात्र ती अपेक्षा पूर्ण होत नाही. मग असं निराश होऊन रडायला येतं...
समीर : मी काय बोलू मला कळत नाही. एकच सांगतो, यापुढं तुला पुन्हा कधीही रडू देणार नाही.
गौरी : एवढं म्हणालास हे काय कमी आहे! आता या जोरावर अनेक दुःखं पचवायला मी सज्ज होऊ शकते... लव्ह यू...
समीर (हसत) : आता पुढची कृती बोलण्याची नाही; करण्याची आहे!

----

No comments:

Post a Comment