29 Apr 2017

बाहुबली-२ रिव्ह्यू

'चांदोबा'तली गोष्ट
---------------------


'बाहुबली-२' जसा अपेक्षित होता, तसाच निघाला. बाहुबलीचे दोन्ही भाग मला आवडले. आपल्यापैकी अनेकांना आवडतीलच. लहानपणी 'चांदोबा'च्या गोष्टी आपल्याला वाचायला आवडायच्या. परिराज्याची सफर घडविणाऱ्या या गोष्टी आपल्या लहानपणीचा अनमोल ठेवा आहेत. या गोष्टींनी आपलं बालपण मजेत घालवलं. कोऱ्या कॅनव्हासवर अगदी साध्या जीवनमूल्यांच्या रंगरेषा उधळल्या. ही जीवनमूल्यं साधीच होती, पण जगण्यासाठी महत्त्वाची होती. थोरांचा मान राखावा, नेहमी खरे बोलावे, मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये, राजाने नेहमी रयतेचे कल्याण करावे ही त्या साध्या-सोप्या जगण्यातली तेवढीच साधी-सोपी, पण खरी खरी मूल्यं होती. अर्थात प्रत्येक गोष्टीला काही तरी तर्काचं वा मूल्यशिक्षणाचं अधिष्ठान पाहिजेच असंही नसायचं. काही गोष्टी निखळ करमणुकीच्या असायच्या. त्यात मग पऱ्यांची नगरी, जादूची छडी, जादूचा शंख, उडती चटई, गुहेतला राक्षस असे सगळे असायचे. या गोष्टी वाचताना मन त्यात रमून जायचं. आता वयानं मोठे झालो, तरी अशा गोष्टी चुकून कुठं वाचायला मिळाल्या, तरी त्या आवडतातच. याचं कारण त्या आपले हरवलेले दिवस कुठं तरी पुन्हा मनात जागवतात. नॉस्टॅल्जिया आपल्याला परमप्रिय आहे. या नॉस्टॅल्जिक मनांना योग्य ते अन्न पुरवण्याचं काम अशा गोष्टी करत असतात. मोठे होऊनही आपण मनात शैशव जपलं तर मग अशा गोष्टी मोठेपणीही आवडतातच.
'बाहुबली'चे दोन्ही भाग म्हणजे अशीच परिकथा आहे. ती बघताना सिनेमा पाहतानाचे रूढ चष्मे काढून ठेवावेत. वयानं दहा-बारा वर्षांचं व्हावं आणि समोर चाललेली जादुई सफर मस्त एन्जॉय करावी. पावणेतीन तास वेगळ्या दुनियेत हरवून जावं. लहान झालं, की मग तर्काचं इंद्रिय आवरतं घ्यावं. सगळेच सिनेमे आपल्याला अशी संधी देत नाहीत. 'बाहुबली' देतो, याचं कारण त्याची भव्यता. दिग्दर्शक एस. एस. राजामौलीनं अत्यंत आत्मविश्वासानं आणि मेहनतीनं हा सिनेमा साकारलाय. भव्यता आणि तंत्रकुशलता यात हा सिनेमा कुठल्याही हॉलिवूडपटापेक्षा कमी नाही. 'हॅरी पॉटर'चे सगळे भाग आपल्याला आवडतात किंवा जगभरच ते पाहिले जातात. तसाच 'बाहुबली' हा या मातीतला, अद्भुतरम्य सिनेमा आहे.
कटप्पानं बाहुबलीला का मारलं या प्रश्नापाशी गेल्या वेळचा सिनेमा थांबला होता. या वेळचा सिनेमा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जातो. एका अर्थानं हा पहिला भाग आहे. सिनेमाच्या अगदी शेवटी तो गेल्या भागाशी कनेक्ट होतो आणि तिथून पुढंही अर्धा तास चालतो. एकूण दोन तास ४७ मिनिटं चालणारा हा महासिनेमा शेवटी थोडा ताणल्यासारखा झालाय. किमान दहा ते १५ मिनिटं तरी तो कमी करता आला असता. कटप्पानं बाहुबलीला (म्हणजे थोरल्या बाहुबलीला - अमरेंद्र बाहुबली) का मारलं याचं समाधानकारक उत्तरही हा भाग देतो. मुख्य म्हणजे यात कुठलंही गिमिक नाही किंवा त्याबाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या खोट्या आहेत हे यातून स्पष्ट होतं. थोरला बाहुबली खरंच कटप्पाच्या हातून मरतो आणि म्हणूनच त्याचा मुलगा - महेंद्र बाहुबली (ज्याची संपूर्ण गोष्ट पहिल्या भागात आली आहे) भल्लालदेवाचा सूड उगवतो, अशी ही साधी-सरळ कथा आहे.
पहिल्या भागात तो महाप्रचंड धबधबा, शिवगामीदेवीचं ते लहान बाळाला वाचवणं, मग शिवाची प्रेमकथा वगैरे भाग फारच भव्यपणे समोर आला होता. या भागात पहिल्या भागात तुलनेनं तेवढा भव्यपणा नाही. सुरुवातीचा हत्तीचा प्रसंग एक तसा आहे. मात्र, नंतर सिनेमा थोरल्या बाहुबलीच्या प्रेमकथेकडं वळतो. गेल्या भागात साखळदंडानं जखडून ठेवलेल्या देवसेनेचा पूर्वेतिहास या भागात नीट कळतो. अमरेंद्र बाहुबली व कटप्पा देशाटन करीत असताना त्या कुंतल देशात जातात आणि तिथं त्यांना देवसेना दिसते. हा सर्व कथाभाग हलक्या-फुलक्या पद्धतीनं आपल्या समोर येतो. देवसेनेसमोर बाहुबली आधी मंदबुद्धी असल्याचं नाटक करतो आणि मग नंतर तिला खरं काय ते कळतं. मग कथेला अचानक एक ट्विस्ट मिळतो आणि बाहुबलीला व्हायचा राज्याभिषेक भल्लालदेवाला करावा, असा आदेश शिवगामीदेवी देते. बाहुबली काही तत्त्वांसाठी राजा होण्याचा प्रस्ताव नाकारतो. पुढेही तो आपल्या या तत्त्वांशी ठामच राहतो आणि शेवटी त्यासाठी जीवाचं मोल देतो. भल्लालदेव व त्याच्या पित्याची कारस्थानं सदैव चालू राहतात आणि त्यातूनच जे घडू नये ते घडतं.
हे सर्व येतं अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात... अमरेंद्र बाहुबली आणि देवसेनेचा रोमान्स आणि त्यांची धनुष्यबाणाची लढाई हा सर्व प्रकार जमून आलेला. कुंतलदेशातील लढाईच्या वेळी धरण फोडण्याचा आणि शेवटी नारळाची झाडं वाकवून माहिष्मतीच्या उंच उंच भिंतींवरून आत जाण्याची कल्पनाही गमतीशीर. पहिल्या भागात येणारी एक-दोन गाणी जरा कंटाळवाणी आहेत. मात्र, एकूण परिणाम डोळे दिपवणारा आणि स्तिमित करणारा असाच.
प्रभास आणि राणा दुगुबत्ती या दोन्ही अभिनेत्यांनी यात जबरदस्त काम केलंय. प्रभास अमरेंद्र बाहुबलीच्या रूपात जास्त आवडला व लोभस वाटला. त्या मानाने तरुणपणीची देवसेना काही एवढी खास वाटत नाही. शिवगामी झालेल्या रम्या कृष्णन या अभिनेत्रीनं अत्यंत दमदार काम केलंय. तिचा मुद्राभिनय पाहण्यासारखा. कटप्पा झालेला सत्यराज हा दक्षिणेकडचा सुपरस्टार अभिनेता आहे. हे लक्षात घेता, संपूर्ण सिनेमातच त्याला मिळालेलं एवढं फुटेज का मिळालं आहे, हे लक्षात येईल. पण सत्यराज यांनी कटप्पा प्रभावीपणे साकारला आहे, यात शंका नाही. भल्लालदेवच्या कारस्थानी पित्याच्या भूमिकेत नासर यांनी कमाल केली आहे. किंबहुना व्हीएफएक्स किंवा तंत्राच्या करामतीत या सिनेमात या सगळ्या लोकांचा अभिनय लक्षात राहतो, ही गोष्टच त्यांच्या अभिनयक्षमतेला दाद द्यावी अशी आहे. दिग्दर्शकानंही एकूणच हा भाग अधिक 'मानवी' करण्याकडं भर दिलाय हे जाणवतं. तरीही शेवटी ती परिकथा आहे. त्यामुळं यात प्रभासचा बाहुबली रजनीकांत स्टाइल अशक्य गोष्टी सहज करताना दिसतो, यात आश्चर्य वाटत नाही. किंबहुना एवढ्या मोठ्या सुपरहिरोकडून तीच तर अपेक्षा आहे. त्यामुळंच भल्लालदेवाच्या भव्य सुवर्णपुतळ्याच्या खाली चाललेली त्यांची मारामारी पाहताना आपल्याही मुठी वळल्या जातात.
अशा सिनेमात आपणही एक पात्र म्हणून प्रवेश केला, तर तो बघण्याची गंमत वाढते. सध्या सुट्ट्या सुरू असताना आपल्यालाही 'लहान मूल' होण्याची संधी या सिनेमानं दिली आहे. ती साधायलाच हवी.
---
दर्जा - चार स्टार
---

4 comments: