28 Apr 2017

विनोद खन्ना लेख

देखणा... 
-----------विशेषणांचीही गंमत असते. कपड्यांप्रमाणेच ती नीट अंगाला बसावी लागतात; अन्यथा बोंगा होतो. ‘देखणा’ हे विशेषण ज्याच्यासाठीच जणू जन्माला आलं असावं, असं वाटायचं असा विनोद खन्ना गेला. आपल्या चित्रपटसृष्टीत ‘माचो’ पुरुषांची कमतरता नव्हती आणि नसेल; पण मर्दानी रांगडेपणासोबतच देखणेपणाचं देणं फार थोड्यांना लाभतं. विनोद खन्ना तसा होता. स्त्रियाच काय, पण पुरुषांनाही हेवा वाटावा असं काही तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतं. शरीरसंपदेकडं जरा दुर्लक्षच करणाऱ्या भारतीय जनमानसासाठी देखणे स्त्री-पुरुष ही दिवसाही स्वप्नात पाहण्याची चीज होती, त्या काळात विनोद खन्ना आपल्यासमोर आला. अप्राप्य सौंदर्याची आसक्ती अफाट असते. त्यामुळं मधुबाला, नूतन, वहिदा यांनी तत्कालीन पुरुषांच्या काळजाचं जे केलं, तेच देव आनंद, राज कपूर, धर्मेंद्र, अमिताभ, विनोद खन्ना यांनी स्त्रियांच्या काळजाचं केलं. या सर्वांतही विनोद खन्ना वेगळा होता. याचं कारण एखाद्या ग्रीक देवतेसारखा दिसणारा हा पीळदार शरीराचा देखणा पुरुष रूपेरी पडदा व्यापून पाहणाऱ्याच्या मनात उतरायचा. त्याला पाहिल्याबरोबर प्रथम नजरेत भरायचा तो त्याचा पुष्ट देह. साडेसहा फुटांची उंची, दणकट बाहू, रुंद छाती, कपाळावर येणारे भरघोस केस असा हा पंजाबी मातीतला रांगडा गडी संधी मिळताच चित्रपटसृष्टीत हिरो होणार यात नवल नव्हतंच... पण विनोद खन्नाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी अशा सरळ घडायच्या नव्हत्या...
खलनायक म्हणूनच त्याला पहिल्यांदा पडदा बघावा लागला. ‘मेरा गाँव मेरा देश’मधला त्याचा जब्बारसिंह रूढार्थानं खलनायक असला, तरी विनोद खन्नाचा देखणेपणा त्या भूमिकेतही सगळ्यांना जाणवून गेला. त्यापूर्वीही दुय्यम भूमिका किंवा नकारात्मक भूमिका करीत त्याला दोन-तीन वर्षे काढावी लागली. विनोद खन्नाचा जन्म १९४६चा. तो पहिल्यांदा चित्रपटात झळकला बाविसाव्या वर्षी म्हणजेच १९६८ मध्ये. हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर-दिलीपकुमार व देवआनंद या लोकप्रिय त्रयीच्या संधीकालाचा होता. याच काळात धर्मेंद्र, सुनील दत्त, राजेंद्रकुमार आणि एक-दोन वर्षांच्या कालावधीत शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांचा एक तर उदय झाला किंवा ते हळूहळू मोठे स्टार होत गेले. विनोद खन्नाही याच काळात चित्रपटांत आला. दैवदत्त देखणेपण असूनही त्याचा पटकन जम बसला नाही. काही काळ संघर्ष करावा लागला. अखेर गुलजार यांच्या ‘मेरे अपने’ (१९७३) आणि ‘अचानक’नं विनोद खन्नाला नायक म्हणून सूर गवसला. यातला ‘अचानक’ तर प्रसिद्ध नानावटी खटल्यावर आधारित होता. याच खटल्यावर आधारित गेल्या वर्षी आलेल्या ‘रुस्तुम’ने अक्षयकुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘अचानक’ किती तरी सरस असूनही विनोद खन्नाच्या वाट्याला हे भाग्य आलं नाही. नंतर आलेला त्याचा ‘इम्तिहान’ (१९७४) गाजला. यातल्या तत्त्वनिष्ठ प्राध्यापकाची भूमिका विनोदनं कमाल साकारली होती. ‘रुक जाना नहीं तू कभी हार के’ हे  या सिनेमातलं किशोरकुमारचं गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत १९७३ नंतर अमिताभ नावाचं पर्व सुरू झालं होतं. राजेश खन्ना अधिकृत व एकमेव सुपरस्टार होता. या दोघांचाही चाहतावर्ग दिवसागणिक वाढत होता. अशा काळात विनोद खन्नाला स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं. 
त्याच्याकडे असलेलं जन्मजात व अप्राप्य देखणेपण हीच त्याची एकमेव जमेची बाजू होती, हे निर्विवाद. विनोद खन्नाचा विवाह १९७१ मध्येच झाला होता. पुढच्या काळात अनेक नामवंत नायिकांसोबत त्यानं काम केलं; मात्र कुठल्याही नटीसोबत त्याच्या नावाची चर्चा कधी ऐकू आली नाही. त्या काळात एका सिनेमात दोन किंवा तीन हिरो सर्रास असायचे. शशी कपूर व अमिताभ, अमिताभ व विनोद खन्ना, राजेश खन्ना व अमिताभ असे दोन किंवा तीन हिरो सहजच एका चित्रपटात दिसायचे. विनोद खन्नानेही सोलो हिरो म्हणून भूमिका केल्या, तशाच या मल्टिस्टार चित्रपटांतही तो सहजतेनं वावरला. ‘अमर, अकबर, अँथनी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर ‘मुकद्दर का सिकंदर’ही! याच काळात राजेश खन्नाचा हळूहळू अस्त होत चालला होता. पुढचा सुपरस्टार कोण, याच्या चर्चा चित्रपटसृष्टीत रंगत असताना अमिताभला विनोद खन्नाची सशक्त स्पर्धा होती, हे स्पष्ट दिसत होतं. मात्र, वर म्हटलं तसं विनोद खन्नाचं नशीब सरळ कधी वागलं नाही. त्याचा फिरोझ खानसोबतचा ‘कुर्बानी’ सुपरहिट ठरला असतानाही विनोद मात्र चित्रपटसृष्टीतून एकाएकी गायब झाला. वैयक्तिक आयुष्यात एकापेक्षा एक दुःखाचे आघात सोसावे लागलेल्या विनोदला आचार्य रजनीश (नंतर ओशो) यांच्या तत्त्वज्ञानाची भुरळ पडली. विनोदनं चित्रपटसृष्टीतून चक्क संन्यास घेतला व तो पुण्याला ओशो आश्रमात येऊन राहिला. ‘हाजीर तो वजीर’ हा चित्रपटसृष्टीचा नियम असल्यानं विनोद खन्नालाही सगळे विसरले. त्याच्या सुपरस्टारपदाची चर्चाही थांबली. 
 विनोद खन्ना पाच वर्षांनी परत आला. ‘इन्साफ’ आणि ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट त्यानं केले. त्याचं देखणेपण कायम असलं, तरी माणूस म्हणून तो अंतर्बाह्य बदलला होता, हे जाणवत होतं. पुढच्या वीस वर्षांपर्यंत म्हणजे अगदी परवा त्याचा आजारपणाचा फोटो व्हायरल होईपर्यंत सगळा प्रवास उताराकडचाच होता... खरं तर ‘दबंग’मध्ये तो सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला, तेव्हा छान वाटलं होतं पाहताना...अमिताभसारखी उत्तम भूमिकांची त्याची ‘सेकंड इनिंग’ पाहायला मिळेल, असं वाटून गेलं होतं. पण ते व्हायचं नव्हतं!
प्रत्येक व्यक्तीला या जगात काही विशिष्ट काम करण्यासाठी ओळखलं जातं. त्यासाठीच ती व्यक्ती भूतलावर अवतरली आहे, असं वाटून जातं. विनोद खन्ना म्हणजे भारतीय पुरुषांच्या मर्दानगीचं व देखणेपणाचं मूर्तिमंत स्वप्न होतं. पूर्वी टीव्हीवर सिंथॉलच्या जाहिरातीत घोड्याबरोबर धावणारा विनोद खन्ना पाहताना अनेक स्त्रियांच्या (अन् पुरुषांच्याही) काळजात एक गोड कळ उठायची. त्या कळीवर फक्त विनोद खन्नाचाच स्टॅम्प होता... आपलं काळीज धडधडतंय तोवर हा स्टॅम्पही कायमच राहणार! अलविदा...
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २८ एप्रिल २०१७)
-------

विनोद खन्नाची सिंथॉलची जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

https://www.youtube.com/watch?v=rSqaoQBgacY


---

No comments:

Post a Comment